डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

म्हातारीनं अर्धा लिटर दुधाच्या प्लॅस्टिकच्या पिशवीत ठेवलेल्या दहा- दहाच्या नोटा काढल्या आणि पुन्हा सावकाश मोजून काऊंटरवर ठेवल्या. एकवार त्या नोटांच्या गठ्‌ठ्याकडे आणि एकवार एजाजशेठकडे नजर टाकून ती दुकानाच्या दारात आली. म्हातारीच्या चेहऱ्यावर समाधान पसरलं होतं. अंगावर घातलेल्या स्वेटरनं संध्याकाळच्या पडू लागलेल्या थंडी विरुद्ध छान ऊब धरली होती.

असरची नमाज पढून एजाजशेठ दुकानात आले आणि उंबऱ्यातूनच एकवार दुकानातून नजर फिरवली. रविवार पेठेतलं त्यांचं आशियाना क्लॉथ अँड मॅचिंग सेंटर ग्राहकांनी फुललं होतं. संध्याकाळचे साडेपाचच वाजले होते, तरी सूर्य चांगलाच कलला होता. या वर्षी पाऊस चांगला झाला असल्यानं नोव्हेंबरचा महिना असला तरी थंडीनं चांगलाच जोर धरला होता. रात्री थंडी जोर धरत होती, ती दुपारी दोन वाजले तरी जात नव्हती. मग दिवसा दोन ते चारपर्यंत काय ती ऊब राहायची पण सूर्य जरा कलला की, सावल्या लगेच गार पडू लागायच्या. एरवी उगाच चौकात टंगळमंगळ करणारे लोकही हुहुहू करत संध्याकाळी लवकर घराकडे वळत होते.

एजाजशेठनं आपल्या खिशात हात घातला आणि मोबाईल काढून बघितला. मघाशी नमाज चालू होती म्हणून त्यांनी आलेला एसएमएस पहिला नव्हता. मेसेज पाहिला आणि गल्ल्याकडे वळले. गल्ल्यावर त्यांचा मॅनेजर निरंजन गद्रे बसला होता. शेठ येताच तो उठला.

‘‘लेडीज स्कार्फचा स्टॉक संपत आलाय.’’

‘‘अरे... मागच्याच आठवड्यात...’’

‘‘होय शेट...डिमांडय... मी ऑर्डर पन टाकलीय, आन तुम्हाला एसेमेस पन टाकलाय.’’

‘‘बरं केलं... बाकी... स्टाफ काय आज...’’ ‘‘वनिता नाई आली.’’ ‘‘का रे?’’

‘‘काय निरोप पन नाय... मोबाईल केला तर उचलला नाय.’’

कपडे दाखवणे-देणे यासाठीच्या स्टाफमध्ये निवडक जुने सोडून सतत नवी ये-जा चालू असे. त्यामुळे एक न सांगता आली नाही त्याची एजाजशेठला फार चिंता नव्हती.

‘‘बसताय?’’ निरंजननं गल्ल्याच्या खुर्चीवरून उठून तिथे एजाजशेठना बसायला बोलावलं.

बस- बस, अशी हातानेच खूण करत शेठ आपल्या लांबलचक दुकानात शिरले आणि दोन पावलं जाऊन थांबले. ते थांबले तसा गल्ल्यावर बसू लागलेला निरंजन पुन्हा उठून उभा राहिला.

‘‘चहा सांग ना... प्लीज’’ एजाजशेठनं विनंती केली. मालक असूनही ते अशी विनंती करतात याचं निरंजनला फार कौतुक वाटे. निरंजननं हाक मारली.

‘‘नीलेश, उठेय... पळऽऽ चा सांग.’’

तसा हातातलं बॉक्स आवरण्याचं काम सोडून नीलेश उठला. एका कपाटाजवळ गेला, त्यातून एक कागदाचं भेंडोळं घेतलं आणि दुकानाबाहेर पडला.

शेठजी दुकानात अगदी आत गेले.

तानाजी वूलन डिपार्टमेंटला उभा होता. एजाजशेठच्या मागून एक म्हातारी दुकानात चढली आणि सावकाश काठी टेकत दुकानातल्या वूलन डिपार्टमेंटला आली आणि खाली जमिनीवरच बसली. तानाजी काऊंटरच्या पलीकडे होता. म्हातारी खाली बसल्यामुळे त्याला ती दिसेना.

‘‘ओ आजी, हिकडं या. उबं ऱ्हावा.’’

‘‘बाबा, गुडगं दुकत्यात माजं...’’

‘‘काय पायजेल?’’

‘‘शुटर दे बाबा मला.’’

‘‘कुटला पायजे? डिजाईनमदी का प्लेन मदी?’’

कसाबसा आपला देह सावरत बसलेल्या त्या म्हातारीला ऐकूही नीट येत नव्हतं. तानाजी मोठ्यांदा पुन्हा तेच बोलला.

तानाजी काय विचारतोय, हे कळल्यावर म्हातारीला काय उत्तर द्यावं ते कळेना.

तिला नीट कळावं म्हणून तानाजी म्हणाला, ‘‘भारीतला दाखवू का साद्यातला?’’

म्हातारीनं क्षणभर विचार केला आणि म्हणाली, ‘‘दाव बाबा तुज्या ह्यानं.’’

तानाजीनं म्हातारीकडं एक नजर टाकली. विटकरी रंगाचं विरू लागलेलं पातळ तिनं घातलं होतं. तोंडावर सुरकुत्यांची जाळी पसरली होती. हिरव्या रंगाच्या तिच्या अंगातल्या ब्लाऊजवरही दोन ठिगळं दिसत होती. कपाळावर गोंदवलेलं होतं. एक जुनाट काठी आणि हातात एक वापरून-वापरून दुकानाचं नावही गेलेली प्लॅस्टिकची पिशवी होती. तिच्याकडे बघून तिची स्वेटर घ्यायची ऐपत नाही, हे तानाजीनं ताडलं. एरवी दुकानात शेठ नसते तर त्यानं म्हातारीला अव्वाच्या-सव्वा किंमत सांगून कधीच बाहेर काढलं असतं. पण आत्ता एजाजशेठ साडी डिपार्टमेंटमध्ये उभे राहून बघत आहेत, हे त्यानं पाहिलं होतं.

*

‘‘या आज्जी, बसा हितं, दावतो तुमाला शुटर...’’ म्हणत तानाजीनं म्हातारीला दुकानात अंथरलेल्या बैठकीच्या गादीवर बसवलं आणि एकेक स्वेटर काढून तिच्याजवळ फेकू लागला. म्हातारीच्या सुकल्या चेहऱ्यावरच्या सगळ्या सुरकुत्या एकदम हलल्या. एक- एक स्वेटर घेऊन ती अंगावर लावून बघत होती. प्रत्येक स्वेटरच्या लोकरीचा स्पर्श आपल्या सुरकुतल्या हातांनी कुरवाळून घेत होती. एक-एक करून ती स्वेटर पाहू लागली. शेवटी तिनं एक मरून रंगाचा स्वेटर उचलला... त्या क्षणी तिच्या चेहऱ्यावर खूप मोठं हसू उमललं... तिनं तो स्वेटर आपल्या अंगावर धरला. काही तरी शोधत असताना नेमकं तेच गवसल्याचा भाव तिच्या तोंडावर उमटला. खोल गेलेले तिचे डोळे एकदम लकाकून गेले. तिनं तानाजीकडं पाहिलं.

‘‘चांगला दिसतोय... पन लई भारीतलाय आज्जी त्यो.’’

तानाजीच्या त्या वाक्यानं म्हातारीच्या तोंडावरचं सगळं हसू मावळलं. डोळे पुन्हा निस्तेज झाले.

*

नीलेश चौकातल्या दो भाई टी-स्टॉलवर आला.

‘‘टाका पेशल!... शेटजींचा-’’ म्हणत त्यानं गवती चहाचं भेंडोळं दत्तासमोर काऊंटरवर ठेवलं. तशी दोन गिऱ्हाइकं कुरकूर करू लागली.

‘‘ओ मालक, आमाला द्या आदी... जावद्या आमला.’’

‘‘देनार गाववाले!!! तुमालाच देनार आदी... ह्यांचा पेशलय...’’ म्हणत दत्तानं गवती चहाचं भेंडोळं उचललं आणि नाकाजवळ धरून सुगंध घेतला.

‘‘आमचाबी पेशलच हाय की.’’

‘‘आओ हे रोजचं गिराईक, त्यात ह्यांचा पेशल पेशल! बसा देतो... मल्हारी, ह्यांचा पेशल वत लवकर... अन्‌ ह्यो इजाजशेटचा पेशल ठेव-’’ म्हणत गवती चहाचा भेंडोळा मल्हारीकडं देत दत्ता नीलेशकडं वळला.

‘‘म्हातारी गेल्यापास्नं आजच दिसलं शेट दुकानात.’’

‘‘सावडून झालं की शटर लगीच उघडलं पन! शेटजी यायला मागत नायेत आजून... आलं तरी थांबत नायेत.’’

‘‘आसं? मंग म्हणूनच च्या नाय सांगितला का इतकं दिवस?’’ दत्तानं पुन्हा प्रश केला.

‘‘थांबत्यातच कुटं? एकाद चक्कर टाकत्यात की लगीच घरला म्हागारी.’’ नीलेशनं माहिती पुरवली.

‘‘लका लका लका... राब राब राबली म्हातारी, पन आता दिवस पालाटलं तर सुक बागाय थांबली नाई!’’ दत्ता हळहळला.

‘‘लई जीव शेटजीचा म्हातारीवं.’’ नीलेशनंही संभाषण वाढवलं.

‘‘मग आज कसा सांगितला चा?’’

‘‘सांगितला खरं... आजच सांगितला. टाका चला-’’ नीलेशला चहा घेऊन पट्‌कन परत जायचं होतं. नाही तर एवढा वेळ काय करत होता, म्हणून निरंजन ओरडला असता.

‘‘पन गवती च्याशिवाय चा पीत नायत शेटजी हा!’’ दत्ताचं तोंड चालूच होतं.

‘‘तर!!!’’

‘‘पंधरा दिवस झालं नाय का?’’ दत्ता आठवून म्हणाला.

‘‘कुटं?? पाच तारकेला महिना हुईल की... आज तीन तारीक!’’

‘‘मायला, दिवस कुटं जात्यात, कळत नाय बग!’’ म्हणत दत्ता आपलं टक्कल पडू लागलेलं डोकं खाजवू लागला.

आई गेल्यापासून एजाजशेठ दुकानावर येतच नव्हते. घरीच बसून कुराण वाचत आणि इबादतमध्ये वेळ घालवत. सगळं दुकान निरंजन सांभाळत होता. त्याचं तोंड फाटकं असलं तरी तो विश्वासू होता. एजाजशेठ सगळं दुकान त्याच्या जीवावर टाकून घरी थांबत. एखादी चक्कर कधी तरी दुकानावर मारून पुन्हा आपल्या प्रार्थनेत विलीन होऊन जात. राहून-राहून त्यांना अम्मीची आठवण येई आणि उमाळा दाटे. दुकानात स्टाफसमोर कसं रडायचं, म्हणून ते घरीच बसत.

*

आज मात्र ते चक्कर मारून परत जाण्याऐवजी साडी सेक्शनपाशी उभे राहून विटकरी मळकट पातळ नेसलेल्या त्या म्हातारीचा आणि तानाजीचा संवाद ऐकत होते. म्हातारीचं हसू मावळलं तसे ते वूलन डिपार्टमेंटकडे निघाले.

*

‘‘द्या की लवकर राव... चला ना लवकर-’’ नीलेश गडबड करू लागला.

‘‘आरं, आत्ताच तर आलायस... पानी तरी तापलंय का अजून...? थंडी किती पडतीय...!’’

नीलेश काहीच बोलला नाही; कारण तो काही बोलला तर दत्ता आणखी वर काही तरी बोलणार, हे त्याला ठाऊक होतेच. त्याप्रमाणे दत्ता बोललाच.

‘‘शेट काय रागावत्यात वय? आ? आन्‌ रागावलं तर सांग माजं नाव. म्हणावं, दत्ता टाईम लावतो च्या करायला. शेट वळीकत्यात मला.’’

‘‘शेटजींचं काय नाय ओ- पन त्यो निऱ्या हाय ना बामनाचा... है बामनाचा, पन तोंड पार गटार-’’ नीलेश वैतागून म्हणाला, ‘‘मायला चापेक्षा किटलीच गरमय आमच्या हितं.’’

‘‘आन्‌ शेटजी हाय मसुलमानाचं, पन बोलतंय बामनावानी!’’ म्हणत दत्ता पुन्हा ख्या-ख्या-ख्या करत हसला आणि त्यानं टाळी मागितली. नीलेशनं कुत्सितपणे हसत-हसत दिली आणि पुढे म्हणाला,

‘‘बरं उरका लवकर-’’ तसा दत्तानं काउंटरवरून आत आवाज टाकला-

‘‘मल्ल्याऽऽ ठिवला का रे शेटजींचा?’’

*

‘‘हाच पायजे ना? घ्या की- एजाजशेट जवळ येत म्हणाले.

‘‘केवड्याला?’’ म्हातारीनं वर बघितलं.

‘‘तीनशे!’’ एजाजशेठ म्हणाले. तानाजी काही बोलणार तेवढ्यात शेटजींनी हाताने चूप राहण्याची खूण केली तसा तानाजी गप्प झाला.

म्हातारीनं वर बघितलं आणि तिच्या चेहऱ्यावर तोंडभर हसू उमललं! डोळे पुन्हा उजळून आले.

‘‘तीनशे?’’ डोळे विस्फारून म्हातारीनं आनंदयुक्त आश्चर्यानं पुन्हा विचारलं.

‘‘हो, तीनशेच!’’

म्हातारीनं स्वेटर घेतला, उराशी लावला आणि तिच्या डोळ्यांतून एक अश्रू टपकला. एजाजशेठच्याही डोळ्यांच्या कडा ओलावल्या. तानाजीला कळेना- काय चालू आहे! पण या वेळी गप्प बसण्यात शहाणपण आहे, हे त्यानं ताडलं. म्हातारीनं उराशी लावलेला स्वेटर खाली ठेवला व शेठजीकडे बघत आपल्या मोठ्या प्लॅस्टिकच्या पिशवीत हात घातला. त्यातून एक अर्धा लिटर दुधाच्या प्लॅस्टिकच्या पिशवीत गुंडाळून ठेवलेल्या दहा-दहाच्या नोटा काढल्या. मळक्या नोटा काढून ती एकेक सावकाश मोजू लागली.

‘‘पैशे ठेवा आत मावशी... तिकडं काऊंटरवर द्या.’’ शेठजी म्हणाले आणि पुढे झाले.

‘‘शुटर घालता?... थंडीये बाहेर...’’ असं म्हणत एजाजशेठनं तो मरून रंगाचा स्वेटर हातात घेतला आणि म्हातारीच्या पाठीवर अलगद ठेवला... म्हातारीला ऊब जाणवली. तिनं सावकाश दोन्ही बाह्यांमध्ये हात घातले आणि समोरची बटणं लावली. एजाजशेठकडं कृतकृत्य नजरेनं पाहत म्हातारीनं प्लॅस्टिकच्या पिशवीची घडी केली आणि काठीचा रेटा लावून उठली.

*

तानाजी काऊंटरवर आला आणि म्हणाला,

‘‘तीनशे घ्या.’’

‘‘तानाजी, हा सहाशे ऐंशीचाय... एमआरपी तरी बगा की जरा! कसली कामं करताय?’’ निरंजन जवळजवळ डाफरलाच.

‘‘शेटजींनी सांगितलंय.’’ अत्यंत निर्विकार चेहऱ्यानं तानाजी बोलला. त्याला आता निरंजनचा गोंधळलेला चेहरा बघायचा होता.

निरंजन पुरता गोंधळला.

तेवढ्यात एजाजशेठ तिथे आले.

‘‘शेटजी... चारशे पन्नास तर...’’

निरंजनला मधेच तोडून शेठजी म्हणाले, ‘‘अरे, तीनशेच आहे... लक्ष नाही तुमचं कामावर... घे तीनशे, तीनशे घे... कशी काम करता तुम्ही? गिऱ्हाईक यायचं नाही अशानं आपल्या दुकानात... द्या मावशी, तीनशे द्या.’’

म्हातारीनं अर्धा लिटर दुधाच्या प्लॅस्टिकच्या पिशवीत ठेवलेल्या दहा-दहाच्या नोटा काढल्या आणि पुन्हा सावकाश मोजून काऊंटरवर ठेवल्या. एकवार त्या नोटांच्या गठ्‌ठ्याकडे आणि एकवार एजाजशेठकडे नजर टाकून ती दुकानाच्या दारात आली. म्हातारीच्या चेहऱ्यावर समाधान पसरलं होतं. अंगावर घातलेल्या स्वेटरनं संध्याकाळच्या पडू लागलेल्या थंडी विरुद्ध छान ऊब धरली होती. ती हातानं अंगात घातलेला स्वेटर पुन:पुन्हा कुरवाळत होती. तिच्या हडकुळ्या शरीरावर मरून रंगाचा स्वेटर नीट बसला होता.

शेवटी पुन्हा एकदा स्वेटरवरून हात फिरवून तिनं लोकरीचा स्पर्श हातात सामावून घेतला आणि सावकाश काठी टेकत दुकानाबाहेर आली. बाहेर थंडीच्या दिवसांतली धुरकट हवा गडद होऊ लागली होती. काठी टेकत-टेकत ती पायऱ्या उतरून खाली गेली.

‘‘शेटजी...’’ निरंजन म्हणाला.

चहाचा कप हातात धरून एजाजशेठ पाठमोऱ्या म्हातारीकडे एकटक बघत होते. थंडीच्या दाट हवेमुळे बाजारपेठ आणखीच जड दिसत होती. जड हवा आणि हवेतले धूलिकण माणसांच्या वाहनांच्या डोक्यावर स्थिरावले होते. हळूहळू चालत म्हातारी गर्दीत मिसळून गेली. धूसर-धूसर त्या वातावरणात म्हातारी दिसेनासी झाल्यावर शेठजी निरंजनकडे वळले.

‘‘शेटजी, आपण पर्चेसेच्या पन खाली विकला स्वेटर.’’

‘‘नीलेश, गवती चहा किती शिल्लक आहे?’’

बॉक्स सोडून नीलेश पुन्हा उठला.

‘‘एखाद दिवसच चालंल शेट.’’

‘‘दोन रुपयांत गवती चहाचा भेंडोळा मिळतो. तो  महिनाभर जातो, म्हणजे महिना दोन रुपयात... पर डे किती पडला?’’

निरंजन संभ्रमात पडला.

‘‘म्हणजे चोवीस रुपयात वर्षभर माझा रोजचा चहा सुगंधी होतो.’’

‘‘ही कोनय म्हातारी?’’

‘‘ती मला किंमत विचारून गेली होती.’’

‘‘विचारून गेली होती?’’

‘‘मागच्या हिवाळ्यात, याच स्वेटरची!’’

निरंजन चमकला...

‘‘ती आली होती त्याच पुरचुंडीत पैसे घेऊन. मागच्या वर्षीपण तीनशे रुपये ऐकून परत गेली होती... हा स्वेटर फार आवडला होता तिला, पण त्या वेळी एकशे तीसच रुपये होते तिच्याकडे... मी दिलाही असता तिला तसाच... पण तिनं घेतला नसता... मानी आहे... अम्मीसारखी... आज मोजून तीनशे रुपये घेऊन आली, एक वर्षानंतर.’’

निरंजनकडे वळून म्हणाले, ‘‘किती गवती चहा विकावा लागला असेल रे तिला?’’

निरंजनला अजूनही कळत नव्हतं की, काय बोलावं? दर महिन्याला एजाजशेठ स्वतः बाजारातून गवती चहाचा भेंडोळा घेऊन दुकानात येत... हीच का ती म्हातारी? त्याच्या मनात विचार चालू झाले. ही तीच का? पुदिना, गवती चा, आळूची पानं विकती मंडईत...

‘‘अख्खा मागच्या वर्षीचा हिवाळा तिनं कसा काढला असेल, हे त्या अल्लालाच ठाऊक... अम्मीच्या शेवयांच्या पाकिटांची आठवण आली मला... माझ्या गणवेशासाठी पाकिटांचा ढीग करावा लागे तिला... दिवस-रात्र राबून...’’ एजाजशेठचा गळा पुन्हा दाटून आला. निरंजनला उलगडा होऊ लागला.

*

दुकानाचा पहिला दिवस होता. एजाजशेठ अम्मीला कौतुकाने दुकान दाखवत होते. आयुष्य कष्टात काढलेली ती माऊली आपल्या मुलाचं कौतुक डोळ्यांत साठवत होती.

‘‘अम्मी, ले तो क्या तबी... भवानी हुंदे तेरे हातशे.’’ एजाजशेठ तिला म्हणाले.

‘‘नको रे बाबा, मजे कूच... है सब मेरे कने.’’

‘‘आगे भवानी तो कर हमारी-’’ म्हणत एजाजशेठनं एक साडी तिच्या हातात टेकवली.

‘‘आठ्‌सो रुपय???’’ किंमत बघून अम्मी उडालीच,

‘‘लई म्हंगी है बाबा.’’

‘‘आगे नवी दुकान है.’’

‘‘जीवराज के ह्या तीनसो कू मिलिंगी ईच!’’

‘‘नै ह्या तो आठ्‌सोच देने पडींगे-’’ निरंजन मध्ये तोंड घालत म्हणाला.

‘‘भला मैच मिली रे तुमना लुटने कू.’’

‘‘पैशे तो देनेच पडींगे-’’ म्हणत एजाजशेठ मोठ्यांदा हसू लागले.

‘‘आ घरकू तुजे खानेकू देती क्या देक!’’ अम्मीला ह्या महागडेपणाचा फार राग आला होता आणि हे दोघं अम्मीच्या रागाची मजा घेत होते.

*

सूर्य मावळतीकडं बुडाला आणि रस्त्याचे दिवे लागले. आज एकदम बरोब्बर वेळेवर दिवे लागले. निरंजननं मोबाईल फोन काढून स्क्रीन स्वॅप केला आणि स्क्रीनवर दिसणाऱ्या मोरगावच्या गणपतीला नमस्कार केला. एजाजशेठनं चहाचा शेवटचा घोट घेतला आणि कप काऊंटरवर ठेवला, तोच मगरीबची अजान सुरू झाली. अजानचे दुरून येणारे स्वर थंडीच्या घट्ट हवेत म्हातारीच्या संथ चालीचा सूर धरत सावकाश ऐकू येत होते.

‘‘अल्ला... या म्हातारीच्या कमाईत बरकत देतोय. अरे, असा पैसा आपल्याकडं येणं हेच आपलं भाग्यय!’’ म्हणत एजाजशेठनी आपले डोळे पुसले.

‘‘शेटजी, ह्यो मजी सुगंधी शुटर झाला आपल्यासाठी!’’ निरंजन आनंदून बोलला.

शेटजींच्या चेहऱ्यावर अम्मी गेल्यानंतर पहिल्यांदा स्मित उगवलं... निरंजनला ते पाहून बरं वाटलं.

एजाजशेठ चपला पायांत सरकवत म्हणाले, ‘‘आणि तुला तर माहितीये... मी घाट्याचा सौदा कधीच करीत नाही, अगदी अम्मी असली तरी!’’

पाणावल्या डोळ्यांच्या कडांतून एजाजशेठ मनमोकळे हसले आणि मगरीबच्या नमाजसाठी ते दुकानाबाहेर पडले.

*

निरंजनला कळून चुकलं, आता शेठ उद्यापासून नियमित दुकानावर येणार!

Tags: स्वेटर कथा सुगंधी शुटर वसीम मणेर मराठी कथा Sweater Sugandhi Shutar Vasim Maner Story weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

वसीम मणेर
wasim@biroba.com


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके