डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

अंतरीचे घेते जेव्हा बाह्याकार....

सदाशिव साठे हे भारतातील एक नामवंत शिल्पकार आहेत. प्रचंड स्मारकशिल्प म्हणजेच पुतळा असो की टेबलावर ठेवायची छोटेखानी आकृती- सर्वांवर त्यांच्या अभिजात प्रतिभेची मुद्रा असते.

 

रंगकलेची सुंदर प्रदर्शने मुंबईला, दिल्लीला वारंवार भरतात. त्या मानाने शिल्पकाराच्या मनात जन्म घेणाऱ्या अमूर्त जातींच्या मूर्त प्रतिरूपांचे प्रदर्शन क्वचितच पहायला मिळते! गेल्या आठवड्यात मुंबईच्या ताज कलादालनात सदाशिव साठे यांच्या मोजक्या पण मोलाच्या कलाकृतींचे दर्शन रसिकांना घडले. 

दिल्लीला जाऊन राहिलेल्या या एकांड्या शिल्पकार शिलेदाराची कलेची कारकीर्द 1952 साली सुरू झाली. दिल्लीचा महात्मा गांधींचा पुतळा हे या शिल्पकारच्या भव्य कलादृष्टीचे घडलेले पहिले दर्शन. तेव्हापासून आजतागायत... मुंबईच्या गेटवेजवळ उभा केलेला अश्वारूढ शिवछत्रपतींचा पुतळा, ग्वाल्हेरला उभा राहिलेला झाशीच्या राणीचा पुतळा आणि दिल्लीचेच सुभाषचंद्रांचे स्मारक किंवा टिळकांचा पुतळा, अशी अनेक प्रभावी स्मारकशिल्पे साठ्यांनी आपल्या देशाला दिली आहेत. चिंतामणराव देशमुख, डॉ० राधाकृष्णन, जयप्रकाश नारायण, माउंटबॅटन अशीही मोठी माणसे साठ्यांनी आपल्या किमयागार बोटांनी चिरंतन केली आहेत.

त्यांची ही शक्ती पाहून प्रिन्स फिलिप यांनी त्यांना लंडनच्या बकिंगहॅम पॅलेसमध्ये बोलावून आपली प्रतिकृती करवून घेतली. असा सम्मान मिळवलेला हा पहिलाच भारतीय शिल्पकार असावा. मात्र असल्या सम्मानांनी तृप्तीची ढेकर देण्याइतकी साठ्यांची प्रतिमा सुस्त नाही! स्मारके उभारणे पुरे झाले, हा आर्थिक दृष्ट्या हानिकारक निर्णय साठ्यांनी अगदी सहजपणे घेतला. हूबेहूब प्रतिकृती करण्याचा यशस्वी  छंद त्यांनी पूर्वीच सोडून दिला होता.. म्हणून तर गांधीजींचे प्रतिरूप त्यांनी ‘नोआखलीचा खिन्न यात्रिक’ या स्वरूपात घडविले आणि टिळक, नेहरू यांच्याही अंतर्यामीची शक्ती प्रतीकांतून प्रकट करण्याचा साहसी प्रयत्न केला. अमूर्त गुणांचे चित्रण करणारी त्यांची प्राणी शिल्पेही लक्षणीय ठरली. बैलाचा उन्माद, एडक्याचा वायफळ उद्धटपणा आणि अश्वाचा बेबंद मनस्वीपणा साठे घनाकृतीत पकडतात, तेव्हा ते या प्राण्यांच्या मूर्ती घडवत नाहीत तर त्यांच्या प्रकृतिविशेषाची दर्शने सादर करतात! तसेच ते साठ्यांचे भासे. गोठलेले सफाईदार चापल्य. 

साठे संगीताचेही रसिक भोक्ते आहेत, हे त्यांच्या शिल्पांच्या लयदार लपेटीवरूनही लक्षात येते. त्यांच्या अमूर्त आकृतीच्या वाहत्या खेळत्या रेषा पहिल्या की, येथे आलापच तान, मींढ आणि मूर्कतीसह दृश्यमान होत असल्याचा भास होतो. त्यांची प्रतिभा अमूर्त आणि मूर्त यातली विभाजक रेषा पुसून टाकणारी आहे. म्हणून ती ज्ञाताच्या कुंपणावरून उड्डाण करून अज्ञातात गेली तरी ज्ञाताची लक्षणे सोडीत नाही. वास्तव आणि काल्पनिक, पूर्ण आणि अपूर्ण, असली बाळबोध विभागणीही या कलेला मंजूर नाही. 
 

शेष
शेपटीवर आपले शरीर तोलणारा हा सर्प म्हणजे जीवनशक्तीचा एक तोलदार अविष्कारच.

पक्षियाचे पक्षीपण
पक्षी डोळयांवर ठसा उमटवून नाहीसा होतो; पण कलावंताच्या मनाने त्याला पकडलेले असतेच ना? तो डौलदार बाक, ती पिसाऱ्याची ऐट ते पक्षी पण… 

नुकत्याच झालेल्या प्रदर्शनात या सर्व वैशिष्ट्यांचे देखणे पुरावे मिळत होते. मिश्र धातू, आणि त्यावर दिलेले रोगणाचे लेप, ही साठ्यांना सहजतेने वापरता येते अशी सामग्री आहे! अशा सामग्रीतून शिल्प उभे करताना कला आणि कारागिरी यांचा मनोज्ञ संगम व्हावा लागतो. साठ्यांची ताकद वेगळी वाटते ती या त्यांच्या परिपक्व कौशल्यामुळे. अर्थात महत्त्व असते ते शिल्पकाराने मनातल्या मनात पाहिलेल्या आकारबंधांना! त्या आकाराच्या आंतरिक शक्तीचा शिल्पकार जो प्रत्यय घेतो, त्याला. नंतर त्याची शहामत असते, ती त्याने उभवलेल्या घन आकृतींना प्रभावी प्रतिरूप देण्यात. 

आधीच शिल्पदर्शन दुर्लभ. तशात सदाशिव साठे यांच्या कृती सटीसामाशीच पहायला मिळणाऱ्या. खरे म्हणजे तरुण विद्यार्थ्यांना ललित कलांचे तरल भान व्हायला हवे असले, तर व्याख्यान प्रवचनांपेक्षा अशी प्रत्यक्ष कला-दर्शने घडायला हवीत! उत्कृष्ट संगीत ऐकण्याची उत्कृष्ट चित्रकला शिल्पकला पहाण्याची उत्कट नाट्याचे रंगभूमीवर समर्थ दर्शन घडण्याची संधी ज्यांना मिळते, त्यांच्या संवेदना तरल होतात आणि रसग्रहणशक्ती वाढते याची जाणीव आपल्या विचारवंत शिक्षणतज्ज्ञांना होईल तो सुदिन!

तो उगवेल तेव्हा उगवो. तोपर्यंत सगळं सदाशिव साठे वाट पहाणार नाहीत! आणि कलाप्रेमिकांनीही तेवढ्यासाठी खोळंबून रहायला नको. ‘झड मारोनिया बैसलो पंगती-’ अशा प्रदर्शनांवर आणि मैफिलींवर खुशाल झड मारावी!
 

Tags: स्मारके शिल्पकार सदाशिव साठे प्रदर्शने पुतळे शिल्प smarake shilpakar sadashiv sathe pradarshane putale shilp weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके