नंतरच्या सभेत खाजगी प्राथमिक शाळांतील अध्यापकांच्या अडचणींचा पाढा मी पुन्हा वाचला आणि तो वर्दे यांनी शांतपणे व सहानुभूतीने ऐकला. मुधोळकरांचा आक्रस्ताळेपणा पुन्हा एकदा उघड झाला. मुधोळकरांसारखी माणसे आपल्या अशिष्ट वर्तनाने संघटनेचीच परिस्थिती अवघड करून ठेवतात. खणखणीतपणे त्यांना त्यांची जागा कोणीतरी दाखवायला हवी होती.
श्री आर. के. मुधोळकर या खाजगी प्राथमिक शाळेतील शिक्षकांचे एक पत्र साधनेच्या 'टपाल' सदरात प्रसिद्ध झालेले पाहून फार आश्चर्य वाटले. आपले शिक्षणमंत्र्यांच्या संदर्भातले गर्हणीय वर्तन झाकून टाकण्याचा त्यांनी हास्यास्पद प्रयत्न या पत्रात केला आहे. भा.क.पा.च्या मताचे ते असल्याने महाराष्ट्रात संमिश्र सरकारचा जो प्रयोग सुरू आहे तो बदनाम करण्याचा कावाही त्यामागे असण्याची शक्यता नाकारता येणार नाही. शिक्षणमंत्री सदानंद वर्दे नांदेडला आले असताना त्यांच्याशी खाजगी प्राथमिक शाळांतील शिक्षकांच्या संघटनेची चर्चा झाली. वर्दे यांनी त्यांचे निवेदन शांतपणे ऐकले व त्यांच्या पगाराच्या प्रश्नाबाबत ते जी खटपट करीत आहेत त्याची माहिती त्यांनी दिली. खाजगी प्राथमिक शाळांतील शिक्षकांचे म्हणणे मंत्रिमंडळापुढे आश्वासन दिल्याप्रमाणे मांडल्याचेही त्यांनी सांगितले. निदर्शने, उपवास इत्यादी मार्गाचा उतावीळवणे अवलंब करू नये, असेही त्यांनी विनवले. सर्व चर्चा अत्यंत स्नेहसौहार्दाच्या व समंजस वातावरणात चालली होती. मध्येय श्री मुधोळकर उठले आणि तावातावाने बोलू लागले. ‘‘खाजगी प्राथमिक शाळातील शिक्षकांचा पगार चेकने देता येत नसेल तर शिक्षणमंत्र्यांनी राजीनामा द्यावा,’’ असे अद्वातद्वा मुधोळकर बोलू लागले तेव्हा संघटनेच्या सर्वच माणसांना अवघडल्यासारखे झाले. सदानंद यांनी शांतपणे सर्वांना विचारले, ‘‘ही तुमच्या संघटनेची मागणी आहे काय?" तेव्हा सर्व जण अर्थात मुधोळकरांचा अपवाद- म्हणाले की ती आमची मागणी नाही. एवढेच नव्हे तर मुधोळकर यांनी जो उद्धटपणा केला त्याबद्दल पदाधिकाऱ्यांनी दिलगिरीही व्यक्त केली.
ह्या संदर्भात वर्दे असे म्हणाले की, जनता पक्षाने सर्वांचे लोकशाही हक्क पुनःस्थापित केले असल्यानेच आज अशा प्रकारे संघटितपणे आपली गाऱ्हाणी मांडण्याची मुभा मिळाली आहे. हे लोकशाही हक्क पुन्हा स्थापित व्हावे म्हणून अनेकांना कारावास सोसावा लागला आणि त्यात माझाही काही वाटा आहे, असे मला वाटते. मुधोळकरांसारखी आज उद्दामपणे बोलणारी माणसे त्या वेळी मात्र मूग गिळून स्वस्थ बसली होती, एवढेच नव्हे तर त्यांचे सगेसोयरे डांग्यांच्या नेतृत्वाखाली कामगारांचे हक्क एकाधिकारशाहीत हिरावून घेतले तरी त्याचेही निर्लज्ज समर्थन करीत होते! श्री सदानंद वर्दे यांनी मुधोळकरांना ह्या वस्तुस्थितीची जाणीव करून दिली ते योग्यच झाले असेच तिथे हजर असणाऱ्या सर्व खाजगी शाळांतील प्राथमिक शिक्षकांचे मत पडले. श्री वर्दे आपल्यासाठी जे कळकळीचे प्रयत्न करीत आहेत त्याची जाणीव असल्याने त्यांनी शिक्षण मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा असे कोणीही शोबूत डोक्याचा शिक्षक म्हणणे शक्य नव्हते. त्यांनी तसे स्पष्टपणे सांगितलेदेखील. मुधोळकरांच्या साऱ्या आक्रस्ताळेपणामुळे ते एकाकी पडले आणि फजीत झाले. त्याचा वचपा काढण्यासाठी मग त्यांनी वृत्तपत्रांकडे धाव घेतली. नंतरच्या सभेत खाजगी प्राथमिक शाळांतील अध्यापकांच्या अडचणींचा पाढा मी पुन्हा वाचला आणि तो वर्दे यांनी शांतपणे व सहानुभूतीने ऐकला. मुधोळकरांचा आक्रस्ताळेपणा पुन्हा एकदा उघड झाला. मुधोळकरांसारखी माणसे आपल्या अशिष्ट वर्तनाने संघटनेचीच परिस्थिती अवघड करून ठेवतात. खणखणीतपणे त्यांना त्यांची जागा कोणीतरी दाखवायला हवी होती. वर्दे यांनी सौम्य शांतपणे आणि सर्वांदेखत हे केले, हे चांगले झाले असे माझे मत आहे. मीही माध्यमिक शिक्षक संघटनेचे काम करीत असतो आणि त्यामुळे अनेक शिक्षणमंत्र्यांशी माझ्या गाठीभेटी झाल्या आहेत. वर्दे यांच्याइतकी सौजन्याची व समजूतदारपणाची वागणूक आम्हांला क्वचितच मिळाली, असे मला म्हणावेसे वाटते.
Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
वर्गणी..
चौकशी
देणगी
अभिप्राय
जाहिरात
प्रतिक्रिया द्या