डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

अनिष्ट रूढींमध्ये गुंड, दादा मंडळी अडकलेली असतात. त्यांना फायदा उठवायचा असतो. अनेक हितसंबंध त्यात गुंतलेले.

श्रीपाद नाईक यांची कादंबरी 'प्रकोप' या नावाने प्रसिद्ध झाली आहे. यातील विषय अपवादानेच अन्यत्र कोठे आढळले. जोगतीण आणि ती तशी का बनते अशा एका वेगळ्या विषयावर लिहिलेली ही विलक्षण कादंबरी आहे. अंधविश्वासामुळेच हे सर्व घडते असे त्यांना म्हणायचे आहे कुटुंब, समाज यांच्या दडपणामुळे ही जीवघेणी प्रथा चालू राहते. कायदा होतो पण प्रथा बंद होत नाही. समाजसेवकांमुळे या प्रश्नाला वाचा फुटली आणि समाजावरही एक प्रकारचे बंधन आले. त्यातून तीव्रता काही प्रमाणात कमी होते.

श्रीपाद नाईक यांनी प्रकोप कथेचे बीज आपल्या मनात लहानपणीच पेरले गेले, असे आपल्या मनोगतात लिहिले आहे. एक जोगत्या हिरवं लुगडं, हातांत हिरव्या बांगड्या, कपाळावर कुंकू आणि भंडारा यांचं मिश्रण झालेला मळवट, हिजड्याचा तो विशिष्ट आवाज, पाहताक्षणी एक प्रकारची भीती वाटावी असा- असे वर्णन वाचायला मिळते. या जोगत्याने एक आणा मागितला, दिला नाही. पैसे नाहीत वगैरे. मग हाच ‘‘खोटं बोलू नकोस, तुझं वाटोळं व्हईल. अंगात किडे पडून पंधरा दिसांत मरून जाशील’’ असे उंच आवाजात म्हणू लागला. लेखकाने त्याला जोरात धक्का मारला. डोक्यावरची टोपली पडली. देवीच्या मूर्तीसह सर्व खाली. लेखकाला काही झाले नाही. यातून कादंबरी मनातून घर करीत होती. यामुळे पुढे ही कथा कादंबरीच्या रूपाने आली. 

मला एक अनुभव द्यावासा वाटतो. मुंबईतील शास्त्र विषयातील एक पदवीधर कन्या, तिला जटा....पिता तिच्या जटा काढायला तयार नाही, कोप होईल. कुटुंबाचा नाश होईल. दोष आपल्या माथ्यावर नको. शेवटी जे कोणी तिच्या जटा सोडवायचा प्रयत्न करतील त्यांचे काय व्हायचे ते होवो. ही महिला कणखर निघाली. ती कोल्हापूरला आली. तिच्या जटा सोडवण्यात आल्या. खालून कापून टाकल्या. तिला सांगण्यात आले ‘‘सध्या बॉयकट, बॉबकट आहे. तेव्हा केस कापणे गैर नाही.’’ तिने मान्यता दिली... डोक्यावरचे ओझे कमी झाले. ती मुंबईला आनंदाने परतली. शेवटी अंधश्रद्धेमुळे जटा प्रकरण निर्माण झाले. अंधश्रद्धांचे मूळ दारिद्र्‌यात आहे. तसेच निरक्षरता, रूदी, परंपरा यांमुळे ही दुष्ट प्रथा टिकून राहिली. श्री. नाईक बेळगावचे. त्यांनी जोगतिणी पाहिलेल्या. त्यांच्या भयानक आयुष्याचे दर्शन त्यांना झाले. यल्लम्माला जोगतिणी अर्पण केल्या जातात. कादंबरीतील नायिका शालन चर्मकाराची मुलगी. तिला जटा आणि सारा चांभारवाडा तिला जोगतीण करण्याच्या मागे लागतो, शालनचे आई वडील सुशिक्षित, अंधश्रद्धेवर विश्वास नाही. शक्य असेपर्यंत शालनचे संरक्षण करतात. पण दुर्दैव तिच्या आड येते . कॉलऱ्याने भाऊ दगावतो.

अनेक वर्षे पक्षाघाताने आजारी असलेले 90 दर्षांचे चुलते मरतात. आजी जिन्यावरून पडून मरते. वडील हृदयविकाराने आजारी. चुलती मागे लागते. आता ते जगायचे असतील तर जोगतीण हो. हा बुद्धिभेद खाष्ट काकू करते. शालनला ती जोगतीण करते. चित्रमय रचना हे श्रीपाद नाईक यांचे हे वैशिष्ट्‌य. वास्तवदर्शी वर्णन ठिकठिकाणी जाणवत राहते. नाईक यांनी अशा प्रकारे एक महत्त्वाच्या प्रश्नाला हात घातला आहे. माधव शालनचा मित्र. तो तिला घाणीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो. तिने सन्मानाने जगावे असा त्याचा सर्व सायास असतो. हे अंधश्रद्धेचे विवर. यातून बाहेर काढण्याला अनेकांचा विरोध असतो. अनेकांचे त्यात हितसंबंध जडलेले असतात. यल्लम्मा म्हणजे सर्वांची आई. मला हजारो निरपराध मुलींना आपल्या सेवेसाठी सोडण्याची मागणी करणारच नाही, असा लेखकाचा विश्वास. मग काय होते? पुजाऱ्यापासून दुष्टांची साखळी असते. धनाढ्य मुजोरांची शेज सजवण्यासाठी हा सारा खटाटोप असतो. लेखक कादंबरीत कमालीचे गुंतलेले आहेत. प्रश्नाची तीव्रता त्यांना जाणवते. तसेच बोचत राहते. हे पदोपदी वर्णनातून प्रकट होते. 

पण तेच गावचा पुढारी गणपतराव यांच्या तरुण मुलीच्या केसाच्या जटा होतात. कोणाची हिंमत होत नाही. दडपण तर कोठून येणार? फक्त पुटपुटतील. पण अन्य काही करणार नाहीत ही विषयरचना. लेखक दाखवून देतो, गोरगरिबांच्या वाटणीला हे दुःख का, या प्रश्नाचा शोध या कादंबरीतून नाईक घेतात. पट मोठा आहे. या अर्थाने कादंबरीने आपले उद्दिष्ट साध्य केले आहे. अनिष्ट रूढींमध्ये गुंड, दादा मंडळी अडकलेली असतात. त्यांना फायदा उठवायचा असतो. अनेक हितसंबंध त्यात गुंतलेले.

लेखक हे अनेक पात्रांच्या मुखातून स्पष्ट करतात. ही कादंबरी आहे याचे भान लेखकाने हरवलेले नाही, त्यामुळे तोल चांगला साधला आहे. गुंड दिगंबराचा खून हाही प्रकार त्यात आहे. या पाजी माणसाचा मुडदा पडला. त्याचे समर्थन प्रत्येक जोगतीण करते. या दुष्टाचा अंत ही समाधानाची बाब समजली जाते. या माणसाने कसे अनेक मुलींना फसवले याची कहाणीही त्यात दडली आहे. शाली स्पष्टपणे कबूल करते, आपण वरवंट्याने त्याला मारला. पोलीस विचारतात, ‘‘तुला एकटीला एवढी छान जागा का दिली ?’’ ह्याचं उत्तर शिवाण्णा आणि गणपतराव देतील. असे हे संगनमत वकिली कौशल्याने शालन सुटली. पण खचलेली. आपल्या मैत्रिणी आदींच्या लग्नाची ती चिंता वाहते. काही प्रमाणात यश मिळते. माधवचे आभार मानते. तिच्या छातीत अतिकष्ट, दारुण अनुभव याचा परिणाम होऊन कळ येते आणि ती देह ठेवते. त्या वेळी तिच्या चेहऱ्यावर मात्र विलक्षण समाधान दिसत असते. येथे ही कादंबरी यांबते.

ही उद्बोधक कादंबरी आहे. भावनातिरेक लेखक करीत नाही. देवदासी प्रथा ही अंधश्रद्धेचेच एक रूप असते ते मानतात. म्हणून या क्षेत्रात कार्य करणाऱ्यांना ही कादंबरी अर्पण करतात हे उचितच. एकदा ही कादंबरी वाचावयास हवी. या कादंबरीला महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या नवलेखक अनुदान योजनेतून अनुदान मिळाले आहे.

----------

प्रकोप

लेखक : श्रीपाद नाईक
320-ए, शाह आणि नाहर इंडस्ट्रियल इस्टेट, अ-1, धनराज मिल आवार, सीताराम मार्ग, लोअर परेल, मुंबई 411 013
मायबोली प्रकाशन,
पृष्ठे 165 : किंमत : 48 रुपये

Tags: श्रीपाद नाईक प्रकोप पुस्तक परिचय shripad naik prakop book review weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

वासू देशपांडे

लेखक (साधना प्रकाशनाकडून प्रकाशित 'लोकशाहीचा कैवारी' हे नाथ पै यांच्यावरील पुस्तक प्रसिद्ध)


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके