साने गुरुजींचा एक धडपडणारा मुलगा गेला. त्याला गुरुवार अत्यंत प्रिय. प्रत्येक गुरुवारी गुरुजींचा एखादा विचार घेऊन तो शाळेत विद्यार्थ्यांसमोर बोले. साने गुरुजी अमृत महोत्सवानिमित्त त्याने श्रमशिबिर घेतले. त्याने चिंचवड गावची पाहणी आपल्या विद्यार्थ्यांना करावयास लावली.
ता. 28 मेची सकाळ. माझी लेक ओरडत रडत ‘सकाळ’ हातात धरून ‘बाबा, चिंचवडचे शहा काका गेले’ असे सांगत आली.
वृत्त विलक्षण धक्का देणारे होते.
सी. एन्. चा तसा परिचय गेल्या सहा-सात वर्षातला. पण तो जीवाभावाचा झाला होता. माझ्या सुख-दुःखाचा तो साथीदार झाला होता. त्याचा पिंड राष्ट्रीय चळवळीत जोपासलेला होता. बेळगाव जिल्ह्यांतील चिक्कोडी तालुक्यातील एकासंबा गावचा तो. स्वातंत्र्य आंदोलनात वडिलांनी तुरुंगवास सोसलेला. तेव्हा सेवादलात सहजपणे तो रमून गेला. एकसंब्याला सांगली जवळ. तेथे त्याचे महाविद्यालयीन शिक्षण. सांगलीतील सेवा दलातली मंडळी त्याचे अंतेवासी झाली. श्यामराव पटवर्धनांचा तो एक सहकारी झाला.
चिंचवडच्या श्री फत्तेचंद विद्यालयाचा तो पुढे मुख्याध्यापक झाला. तंत्र आणि शेतकी विषय या शाळेला त्याने जोडून घेतले. तो येण्यापूर्वी शेती सतत तोट्यात. त्याच्या हातात शेती आली जाणि लाखभराचे उत्पन्न तो काढू लागला. ऊस, भात, गहू, जोंधळा, मटार, विविध भाज्या निघू लागल्या. पहाटे 4.30 वा. उठून तीन-चार तास शेतात फेरी हे ठरलेले. त्याच्या एका शाळेच्या त्याने तीन शाळा केल्या. मुलींची शाळा व चिंचवड स्टेशनवर शाळा या दोन नवीन माध्यमिक शाळा, अनेक प्राथमिक शाळा, बालवाड्या.
त्याने संस्थेचा प्रपंच पाहता पाहता वाढवला.
संस्था संचालकाचा लोभ व विश्वास मिळवला.
चिंचवडला महाविद्यालयाची गरज–पुढाकार त्याचाच.
पालक आणि गावकरी यांचे सहकार्य तो सतत मिळवी. त्यांच्या बैठका घेऊन, सूचना –सल्ला घेत असे.
कलोपासना मंडळ– त्याचे हार्दिक सक्रीय सहकार्य. नूतन वसंत व्याख्यानमाला असो वा पुणे विद्यापीठाची बहि:शाल व्याख्यानमाला असो, याचे सहकार्य असेच.
पण त्याला गर्व वा अहंकार शिवला नाही. ‘मी हे केले’ असे तो कधी म्हणाला नाही.
शिक्षकांनी नवीन नवीन उपक्रम करावे म्हणून त्याचे प्रयत्न. त्याच्या शिक्षकांनी एक छोटेसे विमान केले. आम्हा सर्वांना बोलावून त्याने ते विमान उडवून दाखवले.
मुख्याध्यापक संघाचा तो सहकार्यवाह झाला. श्रीरामपूरला मुख्याध्यापक महासंघाचे अधिवेशन झाले. त्या वेळी पुणे मुख्याध्यापक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी गाडीची डिकी उघडून त्यातील अधिवेशनाचे सामान त्यास उचलण्यास सांगितले. आपल्यापेक्षा कनिष्ठ ही भावना त्यामागची. मी त्याला सामान उचलू दिले नाही. मी त्याला स्पष्टपणे सांगितले, ‘खबरदार, त्या गठ्ठ्यांना हाव लावू नकोस. त्यांनी एक गठ्ठा उचलला तर उरलेले सारे गठ्ठे मी उचलीन.’ त्याने गठ्ठे उचलले नाहीत. पण अपमान मात्र सहजपणे पचवला!
नंतर आम्ही सहविचारांचे मुख्याध्यापक एकत्र झालो आणि पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघात आमचे वर्चस्व निर्माण झाले. सी. एन्. ला प्रमुख कार्यवाह केले. त्याने संघाला बळकटी आणली. आर्थिक स्थैर्य आणले. अनेक उपक्रम सुरू केले. शिक्षण खात्यातील अधिकारी व मुख्याध्यापक संघ यांच्यात अनुबंध निर्माण केला.
सी. एन्. चे व्यवहार अत्यंत स्वच्छ. पदरचे घालील, पण सार्वजनिक पैशाला स्पर्श करणार नाही.– इतकी साफ नियत.
शाळेतील विद्यार्थी हे त्याचे दैवत. एस्. एस्. सी. ची फी भरावयास पैसे नाहीत, असे कोणी म्हणाला की त्याने स्वतःचे पैसे द्यावयाचे हे ठरलेलेच. दुसऱ्याला वेदना झाली की याच्या डोळ्यांत पाणी.
माझ्या स्वतःच्या अडचणीत व आजारपणात त्याचा केवढा आधार. न मागता तो पैसे घेऊन हजर. नको म्हणत असताना ठेवून जाई. त्याच्या घरी काही विशेष असले की तो आम्हा सर्वांना घेऊन जाई. माझ्या आजारपणातही आपल्या घरी त्याने मला नेऊन ठेवले. माझे ते माहेर होते.
त्याच्या कर्तबगारीचे व कर्तृत्वाचे फळ म्हणजे 1974 मध्ये चिंचवड येथे त्याच्या शाळेत झालेले मुख्याध्यापक महासंघाचे अधिवेशन. त्याची योजकता, संघटन कौशल्य, सर्वांना बरोबर घेऊन जाण्याची प्रवृत्ती साऱ्यांचे दर्शन तेथे घडले. या अधिवेशनाचे अध्यक्ष श्री. डी. आर. घोरपडे क्रॉनीक डिसेंट्रीने आजारी. अधिवेशनाचे भाषण तरी करू शकतील की नाही शंका पण याचा विश्वास दांडगा. त्याने डॉक्टर आणले. उपचार केले आणि श्री घोरपडे तीन दिवस अधिवेशनाचे अध्यक्षपदाचे काम यशस्वीपणे रेटू शकले.
अधिवेशन सुरू होण्यास दोन तास राहिलेले. पुण्यातील एक विख्यात मुख्याध्यापक म्हणाले, ‘हा मंडप अर्धा तरी भरणार का?’
हे जखमेवर मीठ चोळण्याचे काम! त्याने हा जिव्हारी घाव सोसला. मंडप नुसता भरलाच नाही तर मंडपाच्या बाहेरही शेकड्यांनी लोक होते! सर्वार्थाने हे अधिवेशन यशस्वी झाले.
अशा प्रकारे त्याच्या कर्तृत्वाला बहर येत होता. बायको –मुलीला घेऊन सुट्टीत माऊंट अबूला गेला आणि तेथेच हृदयविकाराचा झटका येऊन तो निधन पावला.
एक कर्तबगार जीवन असे अचानक वयाच्या 47 व्या वर्षी ध्यानीमनी नसताना संपले!
साने गुरुजींचा एक धडपडणारा मुलगा गेला. त्याला गुरुवार अत्यंत प्रिय. प्रत्येक गुरुवारी गुरुजींचा एखादा विचार घेऊन तो शाळेत विद्यार्थ्यांसमोर बोले. साने गुरुजी अमृत महोत्सवानिमित्त त्याने श्रमशिबिर घेतले. त्याने चिंचवड गावची पाहणी आपल्या विद्यार्थ्यांना करावयास लावली. त्याच्या किती गोष्टी सांगावयाच्या– एक की दोन?
‘धर्म आचरणात आणावा. माणसातील देव पहावा माणुसकीने जगावे.’ असे तो नेहमी म्हणे. आचारावर त्याचा भर अधिक. त्याच्या जाण्याने माणसातील देव पाहणारा देवमाणूस गेला आहे! त्याची पत्नी इंदुभाभी व त्याचे कैवल्य म्हणजे त्याची एकुलती एक कन्या शुभा यांचे सांत्वन कोणत्या शब्दांनी करायचे?
मला मात्र माझ्या जीवनातला मित्र गमावला याची जाणीव होते. आणि डोळ्यांत अश्रू उभे राहतात.
Tags: साने गुरुजी वासू देशपांडे सी. एन. शहा Vasu Deshpande C. N. Shaha weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
वर्गणी..
चौकशी
देणगी
अभिप्राय
जाहिरात
प्रतिक्रिया द्या