डिजिटल अर्काईव्ह

कर्मवीरांचे एकनिष्ठ मदतनीस मुल्लासाहेब !

मुल्लासाहेब सरळ मार्गी होते. निगर्वी कामसू व लोकसंग्राहक होते. कचेरीत आले म्हणजे संस्थेच्या पैशाने चहासुद्धा घेत नसत ! मानसेवी म्हणजे मूर्तिमंत मानसेवी. अगदी मृत्यूच्या आदल्या दिवशी पण रात्रीच्या चहाचे बिल त्यांनी दिले! संस्थेच्या नव्या पैशालाही ते स्पर्श करत नसत. रात्र झाली, उशीर झाला. त्यांच्या घरावरून संस्थेची गाडी जाणार असली तरी त्या गाडीतून घरापर्यंत जात नसत. चालत यायचे- चालत जायचे; हे व्रत त्यांनी कधी सोडले नाही.

कराडजवळील काले हे एक छोटे खेडे. आय्. एम्. एस्. मुल्ला या खेडयातील तल्लख आणि बुद्धिमान विद्यार्थी. ते 1923 च्या प्राथमिक शालान्त परीक्षेत दहा जिल्हांत सर्वप्रथम आले. 80 टक्के गुण या विद्यार्थ्याला मिळाले. कर्मवीर भाऊराव पाटलांनी, या मुलाला हेरले. हाताशी धरले. हा विद्यार्थी पुढे बी. ए., एल्ए. बी. झाला, आणि कर्मवीरांच्या आदेशानुसार सातारा कोर्टात त्यांनी वकीली सुरू केली. 1937 च्या ऑक्टोबरमध्ये धनिणीच्या बागेत विशाल वटवृक्षाखाली रयत शिक्षण संस्थेची सभा महर्षी अण्णासाहेब शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली भरली असता 12 तरुण पदवीधरांनी आजीवन रयत शिक्षण संस्थेचे काम करावयाची प्रतिज्ञा केली. त्यातील मुल्लासाहेब हे प्रथम क्रमांकाचे.

भाऊराव पाटलांचे विश्वास मदतनीस
दिवसभर वकिलीचे काम करावयाचे, सायंकाळी 6 वाजता रयत शिक्षण संस्थेच्या कार्यालयात यावयाचे, आणि रात्री दहापर्यंत काम करावयाचे-यात कधी खंड पडला नाही. वेश अतिशय साधा. धुवटट पायजमा, त्यावर पांढरा शर्ट, साधा कोट, आणि डोकीवर काळी टोपी. या देशात कधी फरक नाही.आपण फार मोठे काम करतो हा गर्व नाही. सेवकाच्या भूमिकेतून आपल्यावर पडलेले काम नेकीने करावयाचे ही वृत्ती. या सेवाभावी वृत्तीमुळे कर्मवीर भाऊराव पाटलांचा मुल्लासाहेबांच्यावर अति विश्वास. कर्मवीरांनी सोपवलेल्या साऱ्या जबाबदाऱ्या त्यांनी समर्थपणे पेलल्या.

निरपेक्ष सेवेचा आदर्श
मुल्लासाहेबांची वृत्ती धार्मिक, नमाज पढावयाचे, रोजा पाळावयाचे. उभ्या आयुष्यात त्यांनी कोणावे अहित चिंतले नाही. आपली सात्विक वृत्ती कधी सोडली नाही. रयत शिक्षण संस्थेव्यतिरिक्त अन्य कशाची चिंता वाहिली नाही. सदा प्रसन्न प्रवृत्ती. ते 1951 साली रयत शिक्षण संस्थेचे मानसेवी सचिव झाले, ते अखेरपर्यंत या पदावर राहिले. मुल्लासाहेब सरळ मार्गी होते. निगर्वी कामसू व लोकसंग्राहक होते. कचेरीत आले म्हणजे संस्थेच्या पैशाने चहासुद्धा घेत नसत ! मानसेवी म्हणजे मूर्तिमंत मानसेवी. अगदी मृत्यूच्या आदल्या दिवशी पण रात्रीच्या चहाचे बिल त्यांनी दिले! संस्थेच्या नव्या पैशालाही ते स्पर्श करत नसत. रात्र झाली, उशीर झाला. त्यांच्या घरावरून संस्थेची गाडी जाणार असली तरी त्या गाडीतून घरापर्यंत जात नसत. चालत यायचे- चालत जायचे; हे व्रत त्यांनी कधी सोडले नाही. संस्थेच्या कचेरीत पण कोणाची चुकी झाली म्हणून कधी आक्रस्ताळेपणा केला नाही. सर्वांचे ऐकून घ्यायचे. शांतपणे समजून मग कृती करायची. रयत शिक्षण संस्थेसारखी मातबर आणि मोठी संस्था. अनेक वेळा किचकट समस्या निर्माण होत. मुल्लासाहेब हे निष्णात वकील शांतपणे त्यावर तोडगा काढायचा, आणि संस्थेचे तारु सुरक्षितपणे पैलतीरावर पोचवायचे. प्रामुख्याने कर्मवीरांच्या मृत्यूनंतर त्यांच्यावर फार मोठया जबाबदाऱ्या पडल्या. संकटे आली. त्यांनी अतिशय समर्थपणे या संकटांना तोंड दिले. संस्थेचा व्याप त्यांनी जबाबदारीने पेलला. 

सेवादलाच्या मेळाव्यासाठी हडपसर येथील साधना विद्यालय हवे होते. मी मुद्दाम साताऱ्याला गेलो होतो. डॉ. खुटाळे आणि मी त्यांना भेटलो. ते म्हणाले, एका सेवापरायण संस्थेला आम्हाला आमची शाळा देताना खूप बरं वाटतं! मला त्या प्रसंगी सेवादल कार्याचे चीज झाले असे वाटले. आणि थोड्याच दिवसांत त्यांच्या निधनाची वार्ता वाचली! ता. 17 डिसेंबर रोजी पहाटे 5 वाजता हृदयविकाराच्या झटक्याने ते निधन पावले. ता. 24 डिसेंबर रोजी मी रयत शिक्षण संस्थेत गेलो. संस्थेचे सचिव श्री. आनंदराव साळुंखे डोळ्यांत पाणी आणून म्हणाले, “अण्णा गेले. त्या वेळी समर्थपणे मुल्लासाहेब उभे राहिले. आपल्या दृढ निश्चयाने त्यांनी अनेक संकटांवर मात केली. आज मात्र आम्ही पोरके झाल्याची भावना अधिक तीव्रतेने वाटू लागली आहे. हा धक्का संस्थेला दीर्घकाळ जाणवत राहील.” कर्मवीरांच्या सान्निध्यात मुल्लासाहेबही कर्मवीर झाले होते. 

Tags: Mr. Anandrav Salunkhe. Rayt Shikshan Sanstha Maharshi Annasaheb Shinde Karmvir Bhaurav Patil I.M. S. Mulla Kale Karad श्री. आनंदराव साळुंखे रयत शिक्षण संस्था महर्षी अण्णासाहेब शिंदे कर्मवीर भाऊराव पाटील आय्. एम्. एस्. मुल्ला काले कराड weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

वासू देशपांडे ( 58 लेख )

साधना प्रकाशनाकडून प्रकाशित 'लोकशाहीचा कैवारी' हे नाथ पै यांच्यावरील पुस्तक प्रसिद्ध




साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 1300, 2500, 3600 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख 2008-2025

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1948-2007

सर्व पहा

जाहिरात

देणगी

साधना प्रकाशनाची पुस्तके