डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

25 सप्टेबर 1922 ते 18 जानेवारी 1971 असे जेमतेम 50 वर्षांचे आयुष्य लाभलेल्या बॅ.नाथ पै यांची ओळख उत्तम संसदपटू आणि जनतेच्या गळ्यातील ताईत म्हणावा असा नेता. अशी दुहेरी आहे. त्यांचे जीवन म्हणजे एक झंझावात होता. त्यांच्या निवडक भाषणांचे पुस्तक ‘लोकशाहीची आराधना’ या नावाने आले आहे, तर त्यांचे राजकीय चरित्र म्हणावे असे पुस्तक वासू देशपांडे यांनी ‘लोकशाहीचा कैवारी’ या नावाने लिहिले आहे. (दोन्ही पुस्तके साधना प्रकाशनाकडून आलेली आहेत.) ‘लोकशाहीचा कैवारी’ या पुस्तकातील एक प्रकरण या अंकात घेत आहोत, कारण गेल्या आठवड्यात त्यांचे जन्मशताब्दी वर्ष सुरू झाले आहे.

बेळगावला 1946 मध्ये मराठी साहित्य संमेलन झाले. या संमेलनाचे अध्यक्ष होते श्री. ग.त्र्यं. माडखोलकर. या संमेलनात एक महत्त्वाचा ठराव मंजूर झाला. त्या ठरावाने भाषावार राज्यरचनेचा पुरस्कार करून संयुक्त महाराष्ट्राची मागणी करण्यात आली. मराठी भाषक मुंबई राज्य हैदराबाद व मध्य प्रदेश यांत विभागले गेले होते. मुंबई राज्यातील मराठी प्रदेश, हैदराबादमधील मराठी प्रदेश आणि मध्य प्रदेश यांतील मराठी प्रदेश एकत्र करून मराठी भाषकांचे एक वेगळे राज्य करण्यात यावे, अशी ती मागणी होती. मराठी भाषकांच्या भावनेचा आदर साहित्य संमेलनाने या ठरावाने केला होता.

बेळगाव हा वादाचा विषय होणार होता, हे स्पष्ट होते. महात्मा गांधी हे भाषावार राज्यघटनेचे कडवे पुरस्कर्ते होते. इंग्रजांनी आपल्या सोईप्रमाणे राज्यरचना केली होती; परंतु स्वतंत्र भारतात लोकांची भाषा, संस्कृती आदी गोष्टी लक्षात घेऊन राज्यांची फेररचना करण्याची मागणी आता मूळ धरू लागली होती. पारतंत्र्यातही महात्माजींच्या आग्रहामुळे भाषावार काँग्रेस समित्या बनविल्या होत्या. महात्माजींनी मराठीतील एक ज्येष्ठ पत्रकार व साहित्यिक, टिळकांचे अनुयायी श्री. नरसिंह चिंतामण केळकर यांच्याकडे- भाषिक प्रदेश कसे बनवावेत, घटक म्हणून काय स्वीकारावे- याबद्दल मतप्रदर्शनाचे काम सोपविले होते. श्री. केळकर यांनी जिल्हा हा घटक मानावा, असे सुचविले. त्यानुसार बेळगाव जिल्हा हा कर्नाटक प्रदेश काँग्रेस समितीच्या अधिकारकक्षेतील भाग झाला. 1929 मध्ये श्री. शिवरामपंत परांजपे यांच्या अध्यक्षतेखाली बेळगावात साहित्य संमेलन भरले होते, त्या वेळी कानडी मंडळींनी हा प्रश्न उपस्थित केला. बेळगाव जिल्ह्याचा कर्नाटक प्रांतिक काँग्रेसमध्ये समावेश आहे, ही गोष्ट आम्हाला मान्य आहे, अशा आशयाचे पत्रक काढले. श्री. न. चिं. केळकर यांची जिल्हा हा घटक असावा ही सूचना आणि महाराष्ट्रातील मराठी साहित्यिकांचे पत्रक शेवटी बेळगावला खूपच भोवले व तापदायक ठरले. बेळगाव कर्नाटकमध्ये जावे, असे म्हणणाऱ्या कानडी नेत्यांनी याचा पुरावा म्हणून वेळोवेळी वापर केला.

1946 च्या साहित्य संमेलनानंतर संयुक्त महाराष्ट्र परिषदेची स्थापना झाली. तिचे अध्यक्ष शंकरराव देव झाले. बेळगावातील तरुण कार्यकर्ते श्री. अरविंद याळगी व कल्याण देशपांडे यांनी श्री. शंकरराव देवांना पत्र पाठवून सभासद नोंदणी करून पुस्तके पाठविण्याची विनंती केली, पण त्यांच्याकडून ही पुस्तके आली नाहीत. मग या दोघांनी श्री. ग.त्र्यं. माडखोलकरांना लिहिले आणि पावती पुस्तके आली. हे दोघे डॉ. कोवाडकर यांना भेटले. मग निमंत्रितांची सभा झाली. महाराष्ट्र एकीकरण समितीचा जन्म झाला. बेळगाव, खानापूर, कारवार, निपाणी आदी भाग भाषावार राज्यरचनेनंतर महाराष्ट्रात जावा, अशी मागणी करण्यात आली. महाराष्ट्र एकीकरण समितीचे डॉ. कोवाडकर हेच सरचिटणीस झाले.

स्वातंत्र्य आले, त्या वेळी मुंबई राज्याचे प्रधानमंत्री श्री. बाळासाहेब खेर हे होते. आता भाषांचा चांगला अभ्यास व्हावा, प्रादेशिक वैशिष्ट्ये व्यक्त व्हावीत, म्हणून नव्या विद्यापीठांची त्यांनी घोषणा केली. पूर्वी मुंबई विद्यापीठ हे एकमेव विद्यापीठ होते व मॅट्रिकसह सर्व परीक्षा हेच विद्यापीठ घेत असे. या घोषणेनुसार कमिशन्स नेमण्यात आली. त्यांचे अहवाल प्रसिद्ध झाले. त्यानुसार कायदे झाले आणि पुणे विद्यापीठ व धारवाडला कर्नाटक विद्यापीठाची स्थापना झाली. या कर्नाटक विद्यापीठाला बेळगावातील सर्व महाविद्यालये जोडण्यात आली. विद्यार्थ्यांनी आंदोलन उभे केले. नामदार बाळासाहेब खेर हे शिक्षणमंत्रीही होते, त्यांच्याकडे शिष्टमंडळे गेली. बेळगावातील महाविद्यालये, निदान बेळगावचे आर.पी.डी. कॉलेज तरी मुंबई विद्यापीठास जोडण्यास अनुमती द्या, अशी मागणी करण्यात आली. आर.पी.डी.चे पदाधिकारी, तरुण भारतचे संपादक श्री. बाबूराव ठाकूर यांनीही खूप प्रयत्न केले. पण काही फायदा झाला नाही. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीने या बाबतीत जी दक्षता दाखवायला हवी होती, ती दाखवली नाही. नामदार खेर म्हणाले, ‘‘आज जरी ही महाविद्यालये कर्नाटक विद्यापीठाला जोडली असली, तरी बेळगाव हा कर्नाटकाला जोडला जाण्याचा संभव आहे असा त्याचा अर्थ नाही; असा अर्थ आपण घेऊ नये.’’ अर्ज, विनंत्या, आंदोलने यांचा काही उपयोग झाला नाही आणि बेळगावातील महाविद्यालये कर्नाटक विद्यापीठाला जोडली गेली. अशा प्रकारे अन्यायाची गाथा सुरू झाली.

मुंबई राज्याने लोकमान्य टिळक पुण्यतिथी व शिवजयंती या सुट्‌ट्या रद्द केल्या. यासंबंधी विधी मंडळात प्रश्न विचारण्यात आले. त्या वेळी मुंबई राज्याचे पंतप्रधान श्री. बाळासाहेब खेर यांनी लोकमान्य टिळक व शिवछत्रपती हे युगपुरुष नसल्याचे सूचित केले आणि युगपुरुषांच्या जयंती व पुण्यतिथींना सुट्टी देण्यात येते, असा खुलासा केला. याची तीव्र प्रतिक्रिया बेळगावातही उमटली. निषेधसभा आदी झाल्या. बेळगावात अशा प्रकारच्या प्रतिक्रिया चटकन उमटत याचे प्रमुख कारण त्यांच्यावर पदोपदी अन्याय होत आला आहे, हे होते. बऱ्याच वेळी तो अन्याय स्वकीयांनी पण केला.

1951 मध्ये शिरगणती सुरू झाली. या शिरगणतीचा उपयोग बेळगावच्या प्रश्नासाठी केला जाणार आहे याची कल्पना मराठी जनतेला होतीच. शिरगणती करणाऱ्यांच्या बरोबर कानडी स्वयंसेवक जात. त्याविरुद्ध तक्रारी करण्यात आल्या. बेळगावच्या कलेक्टरांनी 7 फेब्रुवारी 1951 रोजी पत्रक काढून कानडी स्वयंसेवकांना गणती करणाऱ्यांबरोबर जाण्यास परवानगी दिली. म्हणजे कानडी नेत्यांच्या दडपणाला कलेक्टरसारखे अधिकारीही बळी पडत याचे हे उदाहरण आहे. मराठी जनता जागृत राहिली आणि आपण मराठीभाषक आहोत, असे त्यांनी नोंदवून घेतले.

पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर राज्य-पुनर्रचना व्हावी व ती भाषावार व्हावी, या मागणीने जोर पकडला. ही मागणी साऱ्या देशाची मागणी झाली. ‘आमच्या भाषेत आमचा कारभार चालला पाहिजे’, हे या मागणीचे सूत्र होते. लोकशाहीच्या यशासाठी लोकांना समजेल त्या भाषेतच कारभार चालला पाहिजे, म्हणजे लोकांचे सहकार्य अधिक मिळेल; तसेच मातृभाषेतून शिक्षण व मातृभाषेच्या विकासासाठी प्रयत्न भाषावार राज्यरचनेतच होऊ शकेल, असा युक्तिवाद भाषावार राज्यरचनेचे पुरस्कर्ते करू लागले.

बेळगावातील समाजवादी नेहमीच न्यायाची भूमिका घेत. ‘कर्नाटक माता की जय’ प्रकरणात ही न्यायाची भूमिका घेऊन राष्ट्र सेवादलात त्यांनी कानडी-मराठी वैमनस्य येऊ दिले नाही; ‘कर्नाटक माता की जय’ची घोषणा सेवादल शाखांवर दिली नाही. नाथ पैंनी नेहमीच विवेक शिकविला. कटुता टाळावी म्हणून प्रयत्न केला. बेळगाव महाराष्ट्रात जावे, हा प्रश्न भाषावार राज्यरचनेच्या वेळी सर्वांनी मिळून लढवावा, असे त्यांना वाटे. पण त्यांनी कधी कानडीचा द्वेष केला नाही, की कानडीला कमी लेखले नाही. कर्नाटकही भारताचाच भाग आहे, हे ते आग्रहाने सांगत. स्वातंत्र्याच्या आंदोलनात रायनगौडा तल्लूर, चन्नाप्पा वाली आदी कानडी नेते नाथचे जिवाभावाचे मित्र झाले होते. नाथने कोठल्याच भाषेचा कधीही द्वेष केला नाही. एकात्म भारताचे चित्र त्यांनी सतत डोळ्यांसमोर ठेवले, हे विशेष होय.

नाथ 1952 च्या मध्यावर परदेशी गेले आणि पुन्हा ते इंग्लंडमधील विविध संस्थांच्या कामात गुरफटले गेले. पण या वेळी त्यांनी अभ्यासाकडे विशेष लक्ष पुरवले आणि त्रेपन्नच्या सुरुवातीलाच बॅरिस्टरीची परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. पै कुटुंबाचे स्वप्न पूर्ण झाले! भाई व भाऊ यांनी उपसलेल्या कष्टांचे चीज झाले. नाथच्या आईलाही अतीव समाधान झाले.

नाथने इंग्लंडमध्ये एक नवी जबाबदारी स्वीकारली. ती पूर्ण झाल्यावर भारतात परतायचे त्यांनी ठरविले. ती जबाबदारी म्हणजे पूज्य साने गुरुजींचे लंडनमध्ये उचित स्मारक करायची. पूज्य साने गुरुजींच्या नावे वसतिगृह सुरू करायचे त्यांनी ठरविले. त्याची पूर्वतयारी सुरू झाली. या होस्टेलचे स्वरूप आंतरराष्ट्रीय राहणार होते. वसतिगृहात हिंदी व इतर देशांतील विद्यार्थ्यांची राहण्याची सोय करण्यात येणार होती. मानवतेचा थोर संदेश सांगणाऱ्या पूज्य साने गुरुजींची स्मृती जागृत ठेवण्याचा हा नाथचा प्रयत्न होता. श्री. नानासाहेब गोरे यांचा नाथशी अधून-मधून पत्रव्यवहार होत होता. श्री. नानासाहेबांना ही कल्पना खूप आवडली व त्यांनी आपले आशीर्वादही पाठवले. श्री. परशुराम शहापूरकर यांना पाठविलेल्या पत्रात नाथ पै म्हणतात, ‘नानासाहेब खरेच कर्तबगार व थोर आहेत. पक्षाचे जनरल सेक्रेटरी असताना त्यांनी सादर केलेला वार्षिक अहवाल अत्यंत प्रामाणिक होता. मला त्यांच्याबद्दल फारच आदर वाटतो.’ शेवटी गुरुजींच्या नावे लंडनमध्ये वसतिगृह सुरू झाले.

नाथचा जुना रोग पुन्हा बळावला. हात पुन्हा दुखू लागले. लिहिता येणेही अडचणीचे झाले आणि नाथ यूसीच्या कामासाठी व्हिएन्नाला आले. यूसीच्या कामावर नाथचा प्रभाव वाढू लागला. यूसीच्या कार्यकारिणीच्या बैठकीचे उद्‌घाटन लॉर्ड क्लेमंट ॲटलींनी केले. East and West या मासिकाच्या संपादक मंडळावरही नाथ होते. यूसीसमोर केलेल्या भाषणाचा परिणाम असा झाला की नाथला फिनलंड, जर्मनी, इस्राईल आदी देशांतून भाषणे करण्यासाठी आमंत्रणे आली! नाथने ही आमंत्रणे स्वीकारायचे ठरवले.

व्हिएन्नामध्ये नाथच्या आजारावर उपचार सुरू झाले आणि संधिवात हळूहळू कमी होऊन नाथ खडखडीत बरे झाले. व्हिएन्नामध्ये 1954 मध्ये गेल्या 26 वर्षांत पडली नव्हती एवढी थंडी पडूनही नाथच्या हाताने फारसा त्रास दिला नाही. पण उपचार चालू असताना वेळ वाया जाऊ देणे नाथला योग्य वाटले नाही. व्हिएन्नामधील युनिव्हर्सिटीच्या प्राध्यापकांचा परिचय झाला. त्यांनी नाथला पीएच.डी. करण्याचा सल्ला दिला. ‘उपनिषदांचा जर्मन तत्त्वज्ञानावरील परिणाम’ हा विषय प्राध्यापकांनी सुचविला. नाथने तो स्वीकारला. व्हिएन्ना विद्यापीठातील प्राध्यापकांचा भारतीय तत्त्वज्ञानाचा अभ्यास गाढा होता आणि त्यांचे संस्कृतचे व भारतीय तत्त्वज्ञानाचे ज्ञानही सखोल. नाथलाही भारतीय तत्त्वज्ञानाची गोडी लागली होती. या संशोधनाच्या निमित्ताने नाथने संस्कृत वाङ्‌मयाचे पुन्हा अध्ययन करण्यास सुरुवात केली. ही चालत आलेली संधी त्यांनी स्वीकारली. अर्थात पीएच्‌.डी.सारखी पदवी मिळवायची म्हणजे आणखी काही वर्षे परदेशात राहणे आले. पण नाथला हे सर्वच दृष्टींनी अशक्य होते. नाथचे जर्मन भाषेचे ज्ञान चांगले म्हणून विद्यापीठाने भारतातून प्रबंध पाठविण्यास नाथला अनुमती दिली. नाथचे वास्तव्य वाढले, त्यामुळे खर्चही वाढला. नाथने अरविंद याळगीला पत्र पाठवून एक-दोन गृहस्थांकडून कर्ज मिळते का पाहा, असे लिहिले. पण ती व्यवस्था झाली नाही. मग नाथनेच व्यवस्था केली. घरच्या मंडळींना तरी किती त्रास द्यायचा, असे नाथला वाटे.

राष्ट्र सेवादलाचे संघटक श्री. भाऊसाहेब रानडे यांना साठ वर्षे पूर्ण झाली. त्यांना जयप्रकाशजींच्या हस्ते एक थैली देण्यात आली. या पैशांचा विनियोग भाऊंनी परदेशप्रवासासाठी करावा, असे त्यांना सुचविण्यात आले. भाऊंनी ते मान्य केले. लंडनमधील मित्रांकडून वर्गणी गोळा करून नाथने पाठवली होती. युरोपमधील युवक संघटनांच्या नेत्यांशी नाथचा घनिष्ठ परिचय. भाऊंच्या दौऱ्यात युवक संघटनांचे काम पाहणे हे प्रमुख कार्य होते. नाथच्या लंडनमधील वास्तव्याचा आणि युरोपमधील विविध संस्थांच्या संबंधांचा भाऊंना त्यांच्या दौऱ्यात खूप उपयोग झाला.

भाषावार राज्यरचनेबद्दल आता अधिक तीव्रता आली होती. मद्रासपासून आंध्र अलग व्हावा, म्हणून गांधीवादी नेते श्रीरामलू पोट्टलू यांनी प्राणांतिक उपोषण सुरू केले. त्यांच्या उपोषणाने भाषावार राज्यरचनेच्या मागणीला गती मिळाली. त्या उपोषणात त्यांचा अंत झाला. त्यामुळे आंध्रच्या मागणीचे आंदोलन अतिशय तीव्र झाले. मध्यवर्ती सरकारला तेलुगू भाषकांची मागणी मान्य करावी लागली आणि मद्रासपासून आंध्र अलग करावा लागला. भारतातील हा पहिला भाषिक प्रांत होय.

बेळगावमध्येही चळवळ गती घेऊ लागली. त्याच वेळी नाथने परशुराम शहापूरकरला पत्र लिहून बेळगावच्या मागणीचे स्वरूप निश्चित केले. ते त्या पत्रात म्हणतात : ‘गावगन्ना शिरगणती करून प्रत्येक गावाचे भवितव्य ठरविण्यात यावे. अर्थात भौगोलिक एकतेकडे दुर्लक्ष करून भागणार नाही. मराठी बहुसंख्याक भाग महाराष्ट्राकडे जोडण्यात यावा व कानडी प्रदेश कर्नाटकला द्यावा. पण हे करताना द्वेष शक्यतो फैलावला जाणार नाही, अशी खबरदारी घेण्यात यावी. 1951 ची शिरगणती हे प्रमाण धरावे.’

मद्रास आणि आंध्र यांच्या सरहद्दी ठरविण्यासाठी मध्यवर्ती सरकारचे कायदेमंत्री श्री. हरिभाऊ पाटसकर यांनी हाच फॉर्म्युला स्वीकारला. ‘खेडे हे घटक, भौगोलिक संलग्नता आणि भाषिक बहुमत या तत्त्वांवर सरहद्दी ठरविण्यात याव्यात’, असा त्यांनी निवाडा दिला. हाच पुढे पाटसकर निवाडा म्हणून प्रसिद्धीस आला.

स्वीडन येथे यूसीचे नववे अधिवेशन भरले आणि त्या अधिवेशनात येत्या तीन वर्षांसाठी यूसीचे अध्यक्ष म्हणून नाथची निवड झाली. नाथ हे पहिले भारतीय की, जे या आंतरराष्ट्रीय समाजवादी युवक संघटनेचे अध्यक्ष झाले. नाथचा हा गौरव होता असे म्हणण्यापेक्षा, नाथने समाजवादी आंदोलनात केलेल्या कार्याचा तो विजय होता. धडाडी, संघटनकौशल्य, समाजवादावर गाढ श्रद्धा आणि पददलितांच्या हक्कांबद्दल झगडण्याची तयारी यांमुळे नाथच्या गळ्यात ‘यूसी’च्या अध्यक्षपदाची माळ पडली. नंतर नाथचा स्वीडनमध्ये दौरा झाला. नाथचे सर्वत्र प्रेमाने स्वागत झाले. स्टॉकहोम स्टेशनवर गाडी पोहोचली तेव्हा बँड व पुष्पगुच्छ यांनी नाथचे स्वागत झाले. नाथच्या आगमनाची फिल्म सबंध स्वीडनभर दाखविण्यात आली. सर्व वृत्तपत्रांतून नाथचा गौरव करणारे लेख लिहिले गेले. नाथचे फोटो प्रसिद्ध झाले आणि नाथच्या मुलाखती प्रसिद्ध झाल्या.

इतका गौरव चालू असतानाही नाथचे लक्ष भारताकडे गुंतून राहिले होते. नाथने परशुराम शहापूरकरला पत्र लिहिले : ‘इथे राहून मी समाजवादाची इथली किंवा भारतातील सेवा करू शकेन, असे मी कधी मानले नाही. इथे राहण्यात माझ्या मनाला- विशेषतः गोमंतकातील लढा चालू असताना, पक्षात पक्षाच्या जीवनमरणाचा लढा लढला जात असताना- जे क्लेश झाले आहेत त्याची वाच्यता किंवा चर्चा मी करू शकत नाही, इच्छित नाही. पुन्हा तुमच्याबरोबर आम्हाला योग्य वाटणाऱ्या मार्गाने जाण्यास माझे मन आतुर आहे. विल्यम मॉरिस नावाचा एक थोर समाजवादी इथे गेल्या शतकात होऊन गेला. तो एकदा म्हणाला, आजच्या युगात सुखी होण्याचे केवळ दोनच मार्ग आहेत : समाजवादासाठी झगडणे व समाजवादी जीवन जगणे. मला ही सुखाची कल्पना मोठी हृद्य वाटते. इथे राहिल्याने समाजवादासाठी झटायला मी अधिक पात्र झालो आहे, असे मला वाटते.’

याच वेळेला वासू देशपांडेला लंडनहून नाथने एक पत्र पाठवले. वासू आता वेंगुर्ल्यात येऊन नोकरी करीत होते. सेवादल व समाजवादी पक्षाचे काम पाहत होते. नाथ वेंगुर्ल्याचे. त्यांनी पाठविलेले पत्र म्हणजे सुरेख इंग्रजी गद्य-काव्याचा एक नमुना होता. ते पत्र असे आहे :

My dear Vasu,

Do you remember a fellow called Nath Pai? Indays gone he used to boast of the privilege ofclaiming you as a friend and a colleague. Now he can only fiddle with the fond memories of those begone days, days of glory and idealism, of little struggles and battles fought and lost, and days of comradeship and friendship! But they are now no more! They belong to a dim and remote past never to be called back! Vasu seems to have consigned all these memories and all that goes with them to the limbo of forgotten things.

First my belated congratulations to Leela upon having presented you with a son. She has done something of which she and even we should legitimately feel proud. Rebellious tradition of Vasudeo Gopal has been now secured. It was a heritage worth preserving and handing over. I am waiting for the day when your son will rebel against you (and us too if we are in the same camp) and join our opponents (or join me if we are in opposing
camps).

So you are in Vengurla. I hope you are aware of the great historic importance of the place. Do you know who was born there? Of course you do. Apart from this don't you think it is a lovely little town, what with its many temples, its blue sea, golden sand beach and its intelligent, friendly citizens. Blessed are those who live in that little town. And have you visited the dreamy, poetic, enchanting little villages near by? I mean Dabholi, Arli,

Shiroda, Redi, Math, Vetora. Their very names breathe music. Konkan is a land of beauty, land of poetry, land of the great. Now don't you accuse me of parochialism. What I have written is an objective appreciation of a people and I had the good fortune of knowing intimately.

How often you visit our  ‘कर्मभूमी’? How is Dal and the party? I am sure you must have built a fine cadre in Vengurla : Does Leela like Vengurla? Life on Thames here is as usual, foggy, cloudly, bleak. The song of the sea, the glorious sunset and the divine dawn at Belgaum, the intoxicating moonlight, and the starry blue skies are calling me back, pulling me homeward. I can't hold any longer.
Please write.

Nath.

या पत्रात कोकणबद्दलच्या नाथच्या भावना उचंबळून आल्या आहेत. वेंगुर्ला-बेळगाव येथे पुन्हा यायला नाथ अतिशय आतुर झाले आहेत. संपूर्ण युरोपमध्ये नाथचा गौरव होत होता. व्याख्याने होत होती. दौरे होत होते. पण नाथचे लक्ष मात्र भारताकडे लागले होते. नाथ समाजवादी चळवळीत उडी घेण्यास आतुर झाले होते. गोमंतकाच्या लढ्यात सहभागी होण्यास आतुर झाले होते. इंग्लंडमधील वास्तव्याने समाजवाद व संसदीय लोकशाहीचे अध्ययन परिपूर्ण झाले होते. नाथचा झुंजार स्वभाव स्वस्थ कधीच नव्हता. नाथने आपल्या युरोपमधील सर्व दौऱ्यांतून गोमंतकाचा प्रश्न उपस्थित करून पोर्तुगीजांची दडपशाही व अन्याय स्पष्ट केला होता. युरोपियन जनतेची सहानुभूती गोव्याच्या लढ्याला त्यांनी मिळवली होती.

प्रत्यक्ष गोव्यात ‘नॅशनल काँग्रेस, गोवा’ या संस्थेने भूमिगत चळवळ सुरू केली होती. नॅशनल काँग्रेस, गोवाचे अध्यक्ष पीटर अल्वारिस झाले होते. आपले सहकारी माधव चव्हाण, सिंधू देशपांडे, पांडुरंग मुसळे व शिवाजी सावंत यांच्या मदतीने आणि गोव्यातील कार्यकर्त्यांच्या सहकार्याने त्यांनी आंदोलन उभे केले होते. आंदोलनाला गोव्यातूनही मोठा पाठिंबा मिळू लागला होता. 1942 च्या लढ्यासारखे घातपाताचे प्रकारही सुरू झाले होते. श्री. विश्वनाथ लवंदे यांच्या आझाद गोमंतक दलाची स्थापना झाली होती. शस्त्रे घेऊन ते लढत होते. भारत स्वतंत्र होऊन आठ वर्षे झाली. गोवा-दीव-दमणसारखा छोटासा भाग अजूनही परकीय दास्याखाली राहावा याची खंत अनेकांना वाटत होती. त्यासाठी गोमंतकात आणि गोमंतकाबाहेर आंदोलन उभे केले जात होते. भारतात राहणारे गोमंतकीय गोव्यात जाऊन सत्याग्रह करू लागले होते.

इकडे समाजवादी पक्षात फूट पडली होती. 1952 च्या निवडणुकीनंतर प्रजा पक्ष व समाजवादी पक्ष एकत्र होऊन प्रजासमाजवादी पक्ष स्थापन झाला होता. फॉरवर्ड ब्लॉकमधील एक गटही या पक्षात येऊन सामील झाला होता. केरळमध्ये अल्पसंख्य असूनही प्रजासमाजवादी पक्ष अधिकारावर आला होता. पट्टम धाणू पिल्ले हे मुख्यमंत्री झाले. त्यांच्या कारकिर्दीत एक गोळीबार झाला. त्या वेळी डॉ. राममनोहर लोहिया यांनी पट्टम धाणू पिल्ले यांना तार करून ‘मंत्रिमंडळाने राजीनामा द्यावा’ अशी मागणी केली. ही मागणी एकांगी आहे, असे पक्षनेत्यांना वाटले. पट्टम धाणू पिल्ले यांची बाजू ऐकून न घेता असा निर्णय घेणे अनुचित होते, असे अनेकांना वाटले आणि याच वेळी पिल्ले मंत्रिमंडळाने गोळीबाराची न्यायालयीन चौकशी करण्याचा निर्णय घेतला व तशी चौकशी सुरू झाली. चौकशी कमिशनने निर्णय दिला, गोळीबार समर्थनीय होता. पण हे वादळ शमले नाही. आचार्य नरेंद्र देव पक्षातील जुने नेते. त्यांनी पक्षातील मतभेद मिटविण्याचा खूप प्रयत्न केला. त्यांनी नाथला लिहिले, समेटाची शक्यता आहे. पुढे आचार्य नरेंद्र देव इंग्लंडला गेले. नाथने त्यांचे ब्रिटनमधील कार्यक्रम आखले. त्यांचा दौरा निश्चित केला. त्यांची व्यवस्था केली. नाथने त्यांच्याशी खूप चर्चा केली. पक्षाची आजची अवस्था समजावून घेतली. नाथ व आचार्य नरेंद्र देव यांची ही भेट नाथच्या दृष्टीने खूप उपयुक्त ठरली. देशातील अनेक प्रश्नांची साद्यंत माहिती नाथला मिळाली. श्री. नरेंद्र देवांचा परिचय होताच; तो आता वृद्धिंगत झाला.

नाथला इंग्लंड सोडण्यापूर्वी कामांची जबाबदारी सोपविणे आवश्यक होते; त्याचप्रमाणे घेतलेल्या काही जबाबदाऱ्या पूर्ण करणे आवश्यक होते. बेल्जियम, जर्मनी, युगोस्लाव्हियाची आमंत्रणे होती. हॉलंडलाही एका परिसंवादासाठी जायचे होते. गोमंतकाच्या प्रश्नावरून परदेशात भारतावर टीका सुरू झाली होती. वसाहतवादाचा पुरस्कार करणाऱ्या वृत्तपत्रांनी ही टीका सुरू केली होती. नाथने भारताची बाजू, गोमंतकीयांची बाजू, व्याख्यानांतून, वृत्तपत्रांना दिलेल्या मुलाखतींतून तसेच वृत्तपत्रांतून लेख लिहून मांडली होती.

नाथने आपला दौरा सुरू केला. युगोस्लाव्हिया सरकारने नाथचे स्वागत केले. नाथचा युगोस्लाव्हियाचा दौरा अत्यंत यशस्वी झाला. बेल्जियम, जर्मनी व हॉलंडचा दौराही नाथने पुरा केला. हॉलंडबद्दल नाथचे मत फार चांगले झाले. हॉलंड हा कालव्यांचा देश. एका ॲमस्टरडॅममध्येच 400 कालवे आहेत, असे नाथने लिहिले. लोक उद्योगी, नम्र आणि व्यवहारी आहेत, असा नाथने अभिप्राय व्यक्त केला. नाथच्या भाईने नाथच्या परतीच्या प्रवासाची व्यवस्था केली. नाथच्या सर्व अध्ययनात भार्इंना खूप दगदग झाली. नाथबद्दलचे अपार प्रेम आणि नाथ करीत असलेल्या कार्याबद्दल आस्था व श्रद्धा यांमुळे त्यांना दगदगीचे काहीच वाटले नाही. ते अगदी सहजपणे त्यांनी केले.

नाथचा परतीचा प्रवास सुरू झाला. भारतात येऊन पोहोचण्यापूर्वी नाथ इस्रायलला गेले. नाथचे इस्रायलमध्ये हार्दिक स्वागत झाले. दुसऱ्या महायुद्धानंतर जन्माला आलेले हे राष्ट्र. जगातील विविध भागांतून ज्यू इस्रायलमध्ये येऊन स्थायिक झाले होते. हिटलरच्या आमदानीत क्रूरपणे छळले गेलेले ज्यू, त्यांना हक्काची जागा मिळाली होती. आपल्या अपार कष्टांनी त्यांनी आपला देश बांधला होता. त्यांची जिद्द दांडगी व प्रवृत्ती युयुत्सू. नाथ इस्रायलमध्ये काही दिवस राहिले. इस्रायलच्या दर्शनाने नाथ प्रभावित झाले. जेरुसलेममध्ये तेथील युनिव्हर्सिटीचे अध्यक्ष प्रा. मझार यांची व नाथची मैत्री झाली. भारत व इस्राईल यांमध्ये विद्यार्थी व शिक्षक यांच्यामध्ये परस्पर अदलाबदल करणे कसे शक्य आहे, यासंबंधी त्यांची चर्चा झाली. इस्रायलच्या पंतप्रधानांशीही त्यांची चर्चा झाली. इस्रायलमध्ये समाजवादाचा नवा प्रयोग सुरू झाला आहे, असे नाथचे मत पडले. तेथील समाजवादी पक्षाचे चिटणीस, पार्लमेंटचे सभासद, युवक कार्यकर्ते, परराष्ट्रसंबंध समितीचे अध्यक्ष आदींशी नाथने चर्चा केली. नाथला इस्रायली नेत्यांनी, युवकांनी मोठ्या प्रेमाने व आदराने वागवले. नाथला इस्रायलमधील युवक संघटना प्रभावी, ध्येयवादी व विधायक कार्याला वाहिलेली वाटली. त्यामुळे नाथचे त्यांच्याशी लगेच नाते जुळले. इस्रायलमध्ये नाथला वृत्तपत्रीय प्रसिद्धी खूप मिळाली.

नाथ आपल्या पुढच्या जीवनाची शिदोरी घेऊन भारताकडे यायला निघाले. आईला भेटण्याची तीव्र ओढ त्यांना लागली होती. मित्रांना लिहिलेल्या सर्व पत्रांत ‘आईला भेटत जा, धीर देत जा’ असे ते लिहीत. भारतामध्ये गोमंतकाची चळवळ जोर धरत होती. नाथला त्यात भाग घेण्याची इच्छा होती. भारतीय राजकारणातही आपला वाटा नाथला उचलायचा होता. श्रमजीवी जनतेच्या संघटना पुन्हा बांधायच्या होत्या. त्यासाठी भारतात येण्यास ते अतिशय आतुर झाले होते. नाथ पै मुंबईला येऊन पोहोचले आणि भारतातील श्रमजीवी सामान्य  जनतेसाठी त्यांनी कामाला सुरुवात केली. अन्यायाविरुद्ध लढण्यास कटिबद्ध झालेले निगर्वी नाथ पै भारतात- आपल्या मातृभूमीत तीन वर्षांनंतर आले होते. ते बॅरिस्टर झाले होते. गोरगरिबांची वकिली ते आता करणार होते. त्यांच्या आगमनाच्या वेळी बेळगाव, गोमंतक आणि अनेक प्रश्न आ वासून उभे होते! नाथ पै त्यांना विश्वासाने, श्रद्धेने आणि निश्चयाने सामोरे गेले. 

Tags: बॅ.नाथ पै remembering B. Nath Pai weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

वासू देशपांडे

लेखक (साधना प्रकाशनाकडून प्रकाशित 'लोकशाहीचा कैवारी' हे नाथ पै यांच्यावरील पुस्तक प्रसिद्ध)


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके