डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

अपारंपरिक ग्रंथ पुरस्कार : आणि दोन हात
डॉ. श्रीखंडे यांनी इंग्लंडमधील दोन्ही एफ.आर.सी.एस. परीक्षा पहिल्याच प्रयत्नात यशस्वीपणे पार केल्या. एक निष्णांत शल्यचिकित्सक म्हणून त्यांनी नावलौकिक मिळवला. स्वादुपिंड आणि पित्ताशय या पोटामधील सर्वांत कठीण शस्त्रक्रियांध्ये त्यांनी विशेष प्रावीण्य प्राप्त केले. या देदीप्यमान यशोशिखराच्या मागील श्रीखंडे यांचा चढणीचा प्रवास मात्र अत्यंत कष्टाचा, मेहनतीचा आणि जिद्दीचा होता. त्यांच्या कुशल हातांनी अत्यंत कठीण आणि नाजूक शस्त्रक्रिया सहजपणे आणि यशस्वीपणे करण्यापर्यंत मजल मारली. ही त्यांची कष्टसाध्य यशाची कहाणी म्हणजे ...‘आणि दोन हात’ हे अनुभवकथन. इतर अनेक लोकप्रिय आत्मचरित्रांप्रमाणे केवळ चटकदार नाही. या अनुभवकथनाच्या लेखनामागे डॉ. श्रीखंडे यांची निश्चित अशी भूमिका आहे. आपल्या नेत्रदीपक यशाच्या मागील प्रेरणा त्यांना सर्वांपुढे ठेवावयाच्या आहेत.

मी अभ्यासात गोडी नसलेला एक सामान्य मुलगा. मला जिभेतील दोषाने आयुष्यभर त्रास दिला. आत्मविश्वासानं जगावं असं माझ्याकडे काहीही नव्हतं. भाग्य हे की घरातील सुसंस्कृत वातावरण व आपल्या हातामध्ये कौशल्य आहे याची लहानपणी झालेली जाणीव व घरामध्ये झालेलं त्याचं कौतुक, यामुळे तोच मी, जिद्दीने, अतोनात श्रम घेऊन (कोणतेही आर्थिक, सामाजिक, राजकीय पाठबळ नाही, मुंबईत ओळखी नाहीत अशा परिस्थितीत) देशात एक नावाजलेला सर्जन व उत्कृष्ट वक्ता म्हणून आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवू शकलो, हे उदाहरण अनेकांना स्फूर्ती देऊ शकेल असा मला विश्वास वाटला. म्हणून वयाच्या 77व्या वर्षी ‘आणि दोन हात’ हे पुस्तक लिहायचा निर्णय घेतला. याला मिळालेले यश माझ्या स्वप्नापलीकडले ठरले. माझं भाग्य की मला दीपस्तंभ बघण्याकरता घराबाहेर बघावं लागलं नाही. सदोदित कष्ट करून, पाहुण्यांनी, नातेवाईकांनी भरलेल्या घराचा गाडा कसा चालवायचा हे जाणणारी, सातवीपर्यंत शिकलेली माझी आई किती मोठी होती याची जाणीव वृद्धिंगत होत चालली आहे. माझे वडील उत्कृष्ट मानवाचे प्रतीक होते. साधेपणा, निष्कलंक चारित्र्य, प्रे ळ, आनंदी स्वभाव, हसतमुख चेहरा, लोकांना सतत मदत करण्याची वृत्ती. त्यांच्यामधल्या उदारमतवादी माणसाचं मला रोज दर्शन घडलं. ‘सर्वसामान्य माणसाचा असामान्य सर्जन हो...’ हा त्यांचा सल्ला वेदमंत्रासारखा मार्ग दाखवत राहिला.

राष्ट्रपती डॉ. शंकरदयाळ शर्मांवर शस्त्रक्रिया करण्यासाठी मी दिल्लीला गेलो. सतत वडिलांची आठवण येत होती. ही भाग्याची घटना बघायला माझी आई मात्र हयात होती. मेडिकल कॉलेजमध्ये डिग्री मिळते. तिथे माणुसकी शिकवली जात नाही. जन्मजात मिळालेल्या देणगीमुळे माझ्या नशिबाने लाभलेले हातातील कौशल्य मला लोकांची दु:खे घालविण्याकरिता वापरता आले. त्यामुळे माझ्या जीवनाला अर्थ मिळाला. उत्तम कलावंत, नट, खेळाडू, सर्जन यांना अनेक वेळा यश पेलता येत नाही. ती शक्ती मला घरच्या संस्कारांतून लाभली. कदाचित माझ्या अडखळणाऱ्या जिभेचे लगाम माझे पाय जमिनीवरच ठेवत होते. गेली 55 वर्षे ऑपरेशन थिएटरमध्ये गेलो. माणसाच्या पोटात शिरून कार्यपद्धती, रोग समजले. जखमा आपोआप भरतात याचं सदैव आश्चर्य बघितलं. व्यवस्थित पौष्टिक आहार घेतला तर आतड्याला पडलेलं भोक कसं बंद होतं हा चमत्कार अनेक वर्षं बघितला. जठराला जोडलेलं लहान आतडं दोन-तीन दिवसांत कायमचं एकरूपी होतं. अदृश्य जंतू अथवा कॅन्सर विरोधी शरीराचा लढाईचा प्रसंग सदोदित सुरू असतो याची माहिती अजून थक्क करते.

आपल्याला लाभलेलं शरीर ही किती मोठी देणगी आहे याची डॉक्टरना, विशेषत: सर्जनना सतत जाणीव होत राहाते. जीवनामध्ये घडणाऱ्या रोजच्या घटनांमागे एक मोठं रहस्य दडलेलं आहे, याची जाणीव आपल्या मनाला रोज प्रचंड ऊर्जा देत असते. डॉक्टर कारणाशिवाय शस्त्रक्रिया करून पैसे उकळतात याची वर्णनं चवीनं केली जातात. लोकांना फसवून पैसे कसे कसे मिळवायचे याची साथ दिल्लीपासून गल्लीपर्यंत पसरलेली आहे. सर्जन यापासून अलिप्त नाहीत. प्रश्नांची चर्चा करण्यापेक्षा, उत्तर शोधायचा प्रयत्न केला जात नाही. मी 1972 साली एक माहितीवजा लिखाण करून रुग्णांना, त्यांच्या नातेवाईकांना वाटलं. त्यात सांगितलेला सोपा मार्ग म्हणजे... डॉक्टरला खालील प्रश्न विचारावेत : 1) शस्त्रक्रियेची गरज आहे का? 2) ती केली नाही तर काय होईल? 3) शस्त्रक्रियेनंतर अपेक्षित फायदा न मिळाल्यास काय करायचं? 4) रोग झालेला जो भाग काढला जातो, त्याची मायक्रोस्कोपखाली तपासणी झालीच पाहिजे. 5) मला सगळा रिपोर्ट तु च्याकडून हवा आहे. असं जर केलं, तर कोणतेही नैतिकतेचे धडे न देता, कित्येक अनावश्यक शस्त्रक्रिया टाळता येतात. कठीण परिस्थितीतून मार्ग कसा काढावा याचा एकदा ध्यास घेतला, की बाष्फळ टीका करण्यात ताकद खर्च न होता त्यातून सकारात्मक कार्य निर्माण होतं. पोटातील तक्रारींकरिता येणाऱ्या 30 टक्के लोकांना कोणताही रोग नसतो.

रोजच्या कटकटी, सुखी जीवनाच्या खोट्या अपेक्षा, कृतज्ञतेचा अभाव, असमाधानी स्वभाव, इतरांबद्दल सहानुभूतीचा अभाव, खाण्यावर ताबा नाही, व्यायामाचा कंटाळा यामुळे शरीरातील कोणताही अवयव नीट काम करत नाही. त्यासाठी तपासण्या, एन्डोस्कोपी, सी.टी. स्कॅन... आणि मग यामध्ये रोग सापडत नाही म्हणून वैद्यकीय व्यवसायावर टीका. नसलेला रोग कसा सापडणार? पेशंटच्या समाधानाकरिता डॉक्टर तपासण्या करतात. त्याचप्रमाणे महागड्या तपासण्या करून त्यांना व मेडिकल इंडस्ट्रीला भरपूर फायदा मिळतो, कोणतीही जबाबदारी न घेता! रुग्णाला आत्मविश्वास देण्याऐवजी, ‘धोका पत्करू नका, ताबडतोब तपासण्या करून घ्या’ याचा प्रचार सध्या मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. मी रोज कन्सल्टिंग रूममध्ये लोकांना ऐकवतो माझ्या सल्ल्याचं ध्रुवपद - मधुमेह नाही व रक्तदाब नाही याची वर्षातून एकदा तपासणी करून घ्या. जोपर्यंत वजन घटत नाही, ॲनिमिया होत नाही, थुंकीतून अथवा परसाकडच्या वाटेने रक्त जात नाही तोपर्यंत बाकी तपासण्यांच्या मागे लागू नका. मी व्याख्यानातदेखील सांगतो की रोज व्यायाम करा, सकारात्मक वृत्ती जागृत ठेवा, सायंकाळी भलत्या गोष्टी दूरदर्शनवर बघू नका, हसत चला.... मग कसल्याही काळजीचं कारण नाही.

काही रुग्ण रागावतात की आम्ही काय उगाच तक्रारी करत आलो का? त्यांना योग्य सल्ला देणं हे माझं काम (त्यांना खूष ठेवणं नाही) हे व्रत मी आयुष्यभर पाळलं. मी जेव्हा वॉर्डा ध्ये जातो, त्या वेळेला 80 नजरा माझ्याकडे विश्वासानं बघतात. माझं हस्तकौशल्य इत्यादीबद्दलच्या कथा व दंतकथा त्यांना माहिती असतात. पण माझी उत्साहाने चाललेली वागणूक त्यांना मोठी मोलाची वाटते. डॉक्टरी व्यवसाय किती भाग्याचा! मी जेव्हा रुग्णासमोर शस्त्रक्रियेसाठी उभा असतो, तेव्हा माझा देह उभा नसतो - तर माझ्याबद्दलची माहिती, माझी ख्याती, प्रामाणिकपणा, माझी आश्वासक नजर, माझा स्पर्श त्याला शांत करतो. याकरिता डॉक्टरने माणुसकीचा उत्तम आदर्श आपल्या रोजच्या वर्तनातून दाखवला पाहिजे. रुग्ण आणि डॉक्टर यांचे संबंध बिघडणं ही चिंतेची गोष्ट आहे. आजवरच्या वाटचालीत, प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या अनेक व्यक्तींच्या क्षुद्र मनांचं दर्शन घडलं, नैतिक दारिद्य्र उघडं पडलं; त्याचप्रमाणे सामान्य जीवन जगणाऱ्या, जिद्दीने, मनापासून काम करणाऱ्या अनेक व्यक्ती भेटल्या. मोठा मध्यमवर्गीय समाज असणाऱ्या, प्रचंड लोकसंख्या असणाऱ्या आपल्या देशात, लोकांच्या जीवनाचं राहणीमान उंचावण्याच्या प्रयत्नांतून भारताची उन्नती होत आहे.

परंतु ह्या प्रगतीत तितकाच किंवा त्यापेक्षाही मोठा वाटा भारतातील लक्षावधी अतिसामान्य लोकांच्या जिद्दीचा, कुरकुर न करता सकारात्मक काम करणाऱ्या श्रमजीवी जनतेचा कसा आहे हे मला रुग्ण म्हणून हॉस्पिटलमध्ये असताना समजलं. नर्स पहाटे साडेपाचला घर सोडते, दोन तासांचा प्रवास करून साडेसातला हॉस्पिटलमध्ये पोचते. मन लावून हसतमुखाने काम करते, गर्दीतून परत जायला रात्रीचे अकरा वाजतात. सहा तासांत दुसरा दिवस सुरू होतो. वडील रिक्षा-ड्रायव्हर, बहीण कॉम्प्युटर शिकते, भावाला नुकतीच नोकरी लागली, आईने लग्नं झाल्यावर ओपन युनिव्हर्सिटीतून शिक्षण घेतलं व आता बालवाडी चालवते... सर्वजण एका खोलीत राहतात. काबाडकष्ट करून, अस्तित्वाची लढाई झुंजणारे असंख्य शिलेदार भारतामध्ये आहेत, याचं निकटचं दर्शन माझ्या बॉम्बे हॉस्पिटलच्या एक महिन्याच्या वास्तव्यात मला घडलं. ‘आदर्श’ इमारतीमधील लोक भारताची प्रगती मंदावतील, परंतु बंद पाडू शकणार नाहीत हा विश्वास बळावला. मी आशावादी आहे. 1957 साली मी इंग्लंडला गेलो. आपल्यावर सत्ता गाजवणाऱ्या इंग्रजी लोकांकडे बघून माझे धाबे दणाणले. परंतु त्यांच्यातील मोठे गुण समजले. गांधीजींचा लढा इंग्रजी सत्तेशी होता, इंग्रजी माणसांविरुद्ध नव्हता. त्यांच्यातील शिस्त, प्रामाणिकपणा, गुणग्राहकता, न्यायी प्रवृत्ती यांचा अतिशय जवळून परिचय झाला. माझ्या तेथील वास्तव्यातील आठवणी मौल्यवान आहेत. 

माझ्या संकोची स्वभावामुळे, अडखळणाऱ्या जिभेुळे माझ्या शिक्षणक्रमात कुणी मला गुरू लाभला नाही. मला जे आयुष्यात मिळालं नाही ते मी माझ्या विद्यार्थ्यांना भरभरून दिलं व स्फूर्ती देणारा शिक्षक म्हणून माझी ख्याती सर्वत्र पसरली. मेडिकलला असताना, ‘श्रीखंडे, तुला चार वाक्यं बोलता येत नाहीत. तू डॉक्टर व्हायचा नाद सोडून दे. वडिलांचे पैसे फुकट घालवू नकोस...’ हे सांगणारे शिक्षक, 1980 साली, मी स्वादुपिंडावर करत असलेल्या शस्त्रक्रिया बघण्याकरिता हजर राहिले व आपल्या जावयाला त्यांनी माझ्याकडे ट्रेनिंगकरिता पाठवलं. मी कोणत्याही विद्यार्थ्याला कधीही कमी लेखलं नाही. हजारो रोगी माझे खरे गुरू बनले आणि त्यांनी मला आयुष्याचा अर्थ समजावून दिला.

मी भारतातील सहिष्णुतेचा, चांगल्या परंपरेचा पूजक आहे. एकमेकाला मदत करणाऱ्या समाजाचं मला आकर्षण आहे. देवावर विश्वास नसणाऱ्या नेहरूंवर भारतीय जनतेनं प्रे केलं. ‘पीड परायी जाणे रे’ म्हणणाऱ्या गांधीजींवर प्रे ाचा वर्षाव केला. शिवाजी महाराजांबद्दल मला नितांत आदर आहे. या जाणत्या राजाचा लढा मोगल सत्तेविरुद्ध होता, मुसलमानांविरुद्ध नव्हता. त्यांच्या सैन्यात अनेक मुसलमान होते. ही सर्वसमावेशक भारतीय परंपरा आहे. विवेकानंद भारतातील चांगल्या संस्कृतीचे पाईक होते. ह्या देशात ‘लोकशाही’ ही किती महत्त्वाची देणगी आहे हे समजण्याकरिता ‘हुकूमशाही’ देशात काय चालतं याची कल्पना असली पाहिजे. ज्ञानेश्वर, रामदास, तुकाराम ही आपली भक्तिस्थानं आहेत. जो दुसऱ्यासाठी झिजला, त्याला स्वत:मध्ये देव दिसला. या बहिणाबाईच्या देवावर माझा विश्वास आहे, अनुभवाच्या आधारे. दु:खांनी काजळलेली हॉस्पिटलं ही माझी कर्मभूमी. बंदिस्त ओ.टी.मध्ये संपूर्ण विश्वासाने आपली शरीरं ज्या हजारो रुग्णांनी माझ्यावर विश्वास ठेवून ताब्यात दिली त्यांचा मी ऋणी आहे. वेदनांनी ग्रासलेली, खंगलेली शरीरं घेऊन, मृत्यूलादेखील हसतमुखाने सामोरे जाणारे कोकणातले केरोबा व जर्मनीतील याब्लॉस्की हे माझे आदर्श आहेत.

माझ्या संकोची स्वभावामुळे, अडखळणाऱ्या जिभेमुळे माझ्या शिक्षणक्रमात कुणी मला गुरू लाभला नाही. मला जे आयुष्यात मिळालं नाही ते मी माझ्या विद्यार्थ्यांना भरभरून दिलं व स्फूर्ती देणारा शिक्षक म्हणून माझी ख्याती सर्वत्र पसरली. मेडिकलला असताना, ‘श्रीखंडे, तुला चार वाक्यं बोलता येत नाहीत. तू डॉक्टर व्हायचा नाद सोडून दे. वडिलांचे पैसे फुकट घालवू नकोस...’ हे सांगणारे शिक्षक, 1980 साली, मी स्वादुपिंडावर करत असलेल्या शस्त्रक्रिया बघण्याकरिता हजर राहिले व आपल्या जावयाला त्यांनी माझ्याकडे ट्रेनिंगकरिता पाठवलं. मी कोणत्याही विद्यार्थ्याला कधीही कमी लेखलं नाही. हजारो रोगी माझे खरे गुरू बनले आणि त्यांनी मला आयुष्याचा अर्थ समजावून दिला. विविधतेने नटलेल्या माझ्या समृद्ध जीवनाचा अनुभव लोकांच्यामध्ये वाटावा, त्यांच्या मनातील मरगळ कमी करावी, सकारात्मक वृत्ती जोपासावी या हेतूने (आत्मस्तुती अथवा अतिशयोक्तीचा दर्प असता कामा नये याची खबरदारी घेऊन) 77व्या वर्षी पुस्तक लिहायला घेतलं. मला किती यश मिळालं हे सांगण्याचा हेतू मनाला शिवला नाही, पण मी काय शिकलो, कसं शिकलो, जीवनाचा अर्थ कसा समजला याची माहिती समजून काहीजणांच्या विचारात-आचारात फरक पडेल हा माझा विश्वास होता. तो किती मोठ्या प्रमाणात खरा ठरला याचा अनुभव गेले दीड वर्ष येत आहे. शेकडो पत्रं, फोन आले. पंचवीस ठिकाणी मुलाखती झाल्या.

आयुष्याच्या सायंकाळी जेव्हा केस गळतात, स्मरणशक्ती मंदावते, सांधे धरतात, बरोबरीची माणसं अनंताच्या प्रवासाला निघून जातात, एकटेपणाची जाणीव नैराश्य गाठते, त्या काळामध्ये माझ्या ‘‘...आणि दोन हात’’ ह्या पुस्तकाने जादूची कांडी फिरवली. एकाच आयुष्यामध्ये पुनर्जन्माचा लाभ मिळाला. सर्जनच्या शानदार प्रतिमेला सुसंगत असं, छाप पाडणारं भारदस्त व्यक्तिमत्त्व नाही, हुशार असल्याचा आरोप(!) कधी माझ्यावर केला गेला नाही, असं असूनही भारतातील व इंग्लंडमधील हजारो रुग्णांनी माझ्यावर त्यांचं जीवन सोपवलं याचा मला कधीकधी अचंबा वाटतो. रुग्णांना माझ्यामधील एका मजबूत गाभ्याचा स्पर्श होतो हेच मानावं लागेल. मी किती भाग्यवान! प्रचंड नैतिक बळ आणि असामान्य कर्तृत्व असलेली माझी साधी आई व ‘सामान्य माणसांचा असामान्य सर्जन हो’ हे सांगणारे माझे संतप्रवृत्तीचे वडील, ही माझी दैवते! शाळे ध्ये पहिला नंबर कधीही न सोडणाऱ्या माझ्या मोठ्या भावाचं मला नेहमीच कौतुक वाटायचं व अजून वाटतं. त्याने कधीही मला कमी लेखलं नाही. सत्तर वर्षांपूर्वी, सायकॉलॉजीचा गंध नसलेल्या काळात आई-वडिलांनी आमच्यात तुलना केली नाही. घरातील समंजस वागणुकीमुळे घराबाहेर चालणाऱ्या टीकेचा माझ्यावर परिणाम झाला नाही.
 

Tags: साहित्य अपारंपरिक ग्रंथ पुरस्कार महाराष्ट्र फाउंडेशन पुरस्कार2011 महाराष्ट्र फाऊंडेशन डॉ. वि. ना. श्रीखंडे आणि दोन हात weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके