डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

व्यक्तिजीवनात आणि समाजजीवनात संयम हा फार मोठा गुण आहे, हे आपण जवळजवळ विसरून गेलो आहोत. जीवनेच्छा व तिच्यातून निर्माण होणारी भोगेच्छा ही मानवाची प्रमुख प्रेरक शक्ती आहे हे कोण नाकारील ? पण ती सर्वस्वी आंधळी व स्वच्छंद शक्ती आहे. तिचे नियंत्रण करणारी कोणत्याही स्वरूपाची आत्मिक शक्ती आज आपल्या समाजात अस्तित्वात नाही.

पुराणातील ययातीची सुखविलासाची कल्पना स्त्रीसुखापुरतीच मर्यादित होती. आजचा ययाति तसा नाही. शास्त्राने, यंत्राने आणि संस्कृतीने निर्माण केलेले सारे आधुनिक सुंदर व संपन्न जग त्याच्यापुढे पसरले आहे. सुखोपभोगाची विविध साधने हाती घेऊन ते त्याला पळापळाला आणि पावलोपावली मोह घालीत आहे. प्रत्येक क्षणी त्याची वासना चाळवली जात आहे. त्याच्या सुखस्वप्नांत कुणालाही, कशालाही मज्जाव नाही ! पडद्यावर कामुक हावभाव करणाऱ्या सुंदर नट्यांपासून रस्त्यावर अंगावरून जाणाऱ्या नटव्या तरुणीपर्यंत सर्व स्त्रिया त्यात येतात आणि जातात. मोटारी, बंगले, बँकबुके, नाना प्रकारची नवी नवी पक्वाने घटके घटकेला बदलावयाचे सुंदर सुंदर वेष, गुदगुल्या करणारी गोड, नाचरी, हलकीफुलकी गाणी, हरघडी गळ्यात पडणारे, गेन्देबाज प्रतिष्ठित पुष्पहार, आकाशाला भिडलेली सत्तेची उत्तंग शिखरे - सारे सारे काही या सुखस्वप्नांत येते आणि जाते ! 

ते त्याच्या अंतर्मनाला भूल घालते आणि त्याची तृप्ती न करता, स्वर्गात निघून जाणाच्या अप्सरेप्रमाणे अदृश्य होते. अशा रीतीने चाळवल्या जाणाऱ्या असंख्य वासनांमुळे आधुनिक मानवाचे मन हा एक अतृप्त, हिंस्र प्राण्यांनी भरलेला अजबखाना बनत आहे. सार्वजनिक व्यवहारातली लाचलुचपत, समाजातील वाढती गुन्हेगारी, कुटुंबसंस्थेतील अस्वस्थता व असंतुष्टता, विद्यार्थिवर्गात पसरलेले बेशिस्तीचे वातावरण, नाचगाण्याचे चित्रपट, कामवासना आणि प्रेमवासना यांची समाजात वाढत्या प्रमाणात होत असलेली गल्लत, कोणत्याही दुर्गुणाविषयी दिसून येणारी सामाजिक बेफिकिरी किंबहुना कुठल्या तरी अर्धवट आधाराने त्याचे मंडन करण्याची प्रवृत्ती, यांचा परस्परांशी किंवा सामान्य माणसाच्या मनाला आलेल्या या अवकळेशी काही संबंध नाही असे ज्यांना वाटत असेल ते भाग्यवान आहेत. पण त्यांच्या पंक्तीत परमेश्वराने माझे पान मांडलेले नाही. मी अभागी आहे. 

समाजात दिसून येणाऱ्या या सर्व अप्रिय गोष्टी एकाच विषवृक्षाच्या फांद्या आहेत असे मला वाटते. वेगाने बदलणारे व माणसाला यांत्रिक करून सोडणारे जीवन या विषवृक्षाचे संवर्धन करीत आहे. उद्या हा विषवृक्ष फळांनी लगडून जाईल आणि ती फळे आपल्या समाजाला - ज्या समाजाचे सुखदुःख सहोदरपणामुळे मला अधिक तीव्रतेने जाणवते, अशा या माझ्या समाजाला चाखावी लागतील या कल्पनेने मी अतिशय अस्वस्थ होतो. गेल्या अनेक वर्षात संयम हा शब्द आबालवृद्धांना जुनाट वाटू लागला आहे. तो जवळजवळ हास्यास्पद झाला आहे. व्यक्तिजीवनात आणि समाजजीवनात संयम हा फार मोठा गुण आहे, हे आपण जवळजवळ विसरून गेलो आहोत. 

जीवनेच्छा व तिच्यातून निर्माण होणारी भोगेच्छा ही मानवाची प्रमुख प्रेरक शक्ती आहे हे कोण नाकारील ? पण ती सर्वस्वी आंधळी व स्वच्छंद शक्ती आहे. तिचे नियंत्रण करणारी कोणत्याही स्वरूपाची आत्मिक शक्ती आज आपल्या समाजात अस्तित्वात नाही. उलट पूर्वीच्या चार पुरुषार्थांची जागा अर्थ व काम हे दोनच पुरुषार्थ कसे घेतील, याची काळजी गेली कैक वर्षे आमचे अनेक पंडित करीत आले आहेत ! या दोन पुरुषार्थांतील अर्थाचा पुरस्कारसुद्धा ही मंडळी नाइलाजाने करीत असावीत. 

सकाळी उठल्यावर पैसे टाकल्यावाचून उपाहारगृहात चहा मिळत नाही म्हणून ! या पंडितांचे मत काही असो, अर्थ व काम यांच्या स्वैर संचारावर आणि नग्न वर्तनावर ज्या समाजात धर्माचे नियंत्रण नसेल - मग तो धर्म जुन्या काळच्या ईश्वर श्रद्धेसारखा अथवा कर्तव्यनिष्ठेसारखा असो किंवा नव्या काळातल्या समाजसेवेसारखा अथवा मानवप्रेमासारखा असो - त्या समाजाचे अधःपतन आज ना उद्या झाल्याशिवाय राहत नाही. ययातीच्या कथेची चिरंतन स्वरूपाची ही शिकवण आहे. भारतीय समाजाला तिचा केव्हाही विसर पडू नये एवढीच माझी इच्छा आहे.

('विचारधारा' या पुस्तकातून)

Tags: पुरस्कार   आधुनिक मानव ययाती विचारधारा वि. स. खांडेकर Awards The modern human yayati Ideology V. S. Khandekar weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

विष्णू सखाराम खांडेकर

  जन्म : 19 जानेवारी 1898 (सांगली, महाराष्ट्र) -निधन : 2 सप्टेंबर 1976

 पदवीपूर्व शिक्षण घेतल्मानंतर शिरोडा इथे शाळेत 1920 ते 1938 पर्मंत शिक्षक म्हणून कार्मरत. 1939 ते 1946 पर्मंत कोल्हापूर इथे चित्रपटासाठी लेखन. 1955 मध्मे दृष्टिहीनत्व प्राप्त. प्रमुख पुरस्कार / सन्मान : ‘ममातिफसाठी साहित्म अकादमी पुरस्कार (1974), अकादमी फेलोशिप, पद्‌ भूषण.

 

 


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके