डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

प्लॅस्टिकपासून पेट्रोल; संगणक क्षेत्रात पुढचे पाऊल; औषधी वनस्पती

विज्ञान क्षेत्रात संगणक विज्ञान हे सर्वांत प्रगत समजले जाते. दळणवळण, क्लिष्ट आकडेमोड, शास्त्रीय प्रश्नांचा सखोल आणि सर्वांगी अभ्यास यांमध्ये संगणकाचा उपयोग वादातीत आहे. जपान, अमेरिका, जर्मनी इत्यादी देश संगणकाच्या विविध प्रकारांच्या निर्मितीत अग्रेसर आहेत. प्रत्येक वर्षी संगणकाचे नवे मॉडेल बाजारात येते आणि त्याआधीची सर्व मॉडेल्स कालबाह्य ठरतात. भारतात संगणकावरील संशोधन अतिप्रगत अवस्थेत नसले तरी त्याचा वापर व्यापक प्रमाणात होऊ लागला आहे. बँका, प्रवासी आरक्षण, संशोधन संस्था, खासगी उद्योग यांतील संगणकाच्या वापरामुळे आपले जीवनमान उंचावत आहे आणि जीवन सुकर होत आहे.

प्लॅस्टिकपासून पेट्रोल

प्रगत राष्ट्रांत औद्योगिक क्रांती झाली. तिचे लोण सर्व जगात पसरले. या क्रांतीने मनुष्याचे जीवनमान बदलून टाकले. हस्तोद्योग आणि त्यासारख्या उद्योगांऐवजी प्रचंड कारखाने निर्माण झाले. कच्च्या तसेच उत्पादित मालाची आयात-निर्यात करण्यासाठी परिवहन यंत्रणा तयार झाल्या. हे सर्व आधुनिक जगाचे गतिमान चक्र फिरत आहे, खनिज तेल आणि इतर इंधन यांच्यापासून मिळणाऱ्या ऊर्जेवर! बेसुमार औधोगीकरणाबरोबरच या इंधनाचा वापर वाढत गेला. आता स्थिती अशी आली आहे की या इंधनाच्या मर्यादित साठ्यांमुळे हे चक्र थांबते की काय, अशी भीती वाटावी. खनिज तेलाचे साठे मर्यादित असून पुढील पन्नास वर्षांत ते संपून जातील. त्यानंतर काय, ही समस्या सर्वांनाच भेडसावत आहे. तेव्हा इंधनाचा प्रश्न सोडविण्यासाठी अनेक संशोधक इंधन (खनिज तेल) तयार करण्याचा किंवा पर्यायी इंधन शोधण्याचा प्रयत्न करीत आहेत. याबरोबरीने कच्च्या तेलाचे साठे शोधून काढले जात आहेत. याचा परिणाम म्हणजे अनेक देशांनी आपल्या भूगर्भातील तेलसाठ्यांचा शोध घेतला. भारताला ‘बाँबे हाय’ येथे असे साठे सापडले. ब्रिटनसारख्या देशाला तेलाचे इतके साठे सापडले की एके काळी कच्च्या तेलाची आयात करणारा ब्रिटन आता त्याची निर्यात करत आहे. पण ह्या प्रयत्नांचा उपयोग तात्कालिक आहे. कारण हजारो वर्षे भूपृष्ठाखाली राहिल्यामुळे जैविक अवशेषांपासून हे तेल तयार झाले. पण हे साठे केवळ पन्नास वर्षांत संपुष्टात येतील. आणि नैसर्गिक प्रक्रियेतून असे नवे साठे तयार व्हायला हजारो वर्षे लागतील. तेव्हा नैसर्गिक प्रक्रियेवर अवलंबून न राहता कृत्रिमपणे हे तेल तयार करायचे प्रयत्न युरोप, अमेरिका, रशिया, भारत इत्यादी देशांत चालू आहेत. या संशोधनात जपानच्या संशोधकांनी वाया गेलेल्या प्लॅस्टिकपासून पेट्रोल, डिझेल आणि रॉकेल तयार करायची आधुनिक प्रक्रिया शोधली आहे. ही प्रक्रिया जपानच्या ‘शासकीय औद्योगिक विकास प्रयोगशाळा’ आणि ‘फ्युजी इंडस्ट्रीज’ यांच्या संयुक्त प्रयत्नांनी विकसित झाली आहे.

पारंपरिक पद्धतीत पेट्रोलियम या कच्च्या तेलापासून अनेक प्रक्रियांद्वारे प्लॅस्टिक बनविले जाते. टाकाऊ प्लॅस्टिकपासून पेट्रोल, डिझेल व केरोसीन तयार करणे ही त्याच्या पूर्णपणे उलटी प्रक्रिया आहे. यासाठी प्लॅस्टिक प्रथम 300 अंश सेल्शिअस तापमानाला वितळवले जाते. यानंतर हे तप्त आणि द्रवरूप प्लॅस्टिक दोन रिअॅक्टर्समधून पाठवले जाते. यामध्ये ‘झिओलाईट्स’ (Zeolite Catalyst) या प्रकारची संप्रेरके वापरली जातात. या संप्रेरकांमुळे ही उलटी अभिक्रिया घडते. याप्रकारे प्रायोगिक तत्त्वावर या नव्या अभिक्रियेने पेट्रोल तयार करण्यात आले. याचे निष्कर्ष उत्साहवर्धक आहेत. एक किलो टाकाऊ प्लॅस्टिकपासून अर्धा लिटर पेट्रोल आणि अर्धा लिटर डिझेल व रॉकेल तयार होते. यामुळे या पद्धतीपासून तयार केलेले पेट्रोल आणि रॉकेल आजच्या किंमतीच्या तुलनेत महाग असणार नाही, व्यापारी तत्त्वावर ही प्रक्रिया वापरताना काही सुधारणा कराव्या लागतील. टाकाऊ प्लॅस्टिकमधील माती, कचरा आणि असेंद्रिय भाग काढून टाकावा लागेल, आणि मग उरलेल्या प्लॅस्टिकवर प्रक्रिया करता येईल.

ही पद्धत अनेक प्रकारे उपयुक्त आणि महत्त्वपूर्ण आहे. आज प्लॅस्टिक्स पदार्थांचा व्यवहारात विविध वस्तूंत उपयोग होतो. आवरणे, वेष्टने आणि डबे इ. प्लॅस्टिकपासून बनवतात. ह्या वस्तू कचऱ्यात टाकल्या असता त्यांचे नैसर्गिकपणे विघटन होत नाही. त्यामुळे प्लॅस्टिक वस्तूचे ढीग साचतात. हे पदार्थ जाळल्यास त्यांतून विषारी वायू तयार व्हायचा धोका आहे. जेव्हा तेव्हा कचऱ्याचा निचरा करणे ही डोकेदुखीच आहे. अशा वेळी वरील अभिक्रिया, केवळ निचरा न करता त्याचा सदुपयोग करून, किमती पेट्रोल मिळवून देते. या अभिक्रियेमुळे क्रूड तेल – प्लॅस्टिक – क्रूड तेल असे चक्र तयार होईल. यामुळे तेलाची टंचाई कमी होईल आणि नैसर्गिक साठ्यांच्या मर्यादेचे बंधन राहणार नाही. आखाती आणि अन्य तेल निर्यात करणाऱ्या राष्ट्रांचे महत्त्व आपोआप कमी होईल. ह्या प्रक्रियेचा अजून एक फायदा म्हणजे सर्व तऱ्हेचे प्लॅस्टिक वापरून पेट्रोल-डिझेल मिळू शकते. पॉलिइथिलीन, पॉलिप्रॉपिलिन, पी.व्ही.सी. अशा सर्व प्लॅस्टिकचा वापर यात करणे शक्य आहे. या अभिक्रियेचा उपयोग करणारे कारखाने लवकरच निघतील अशी आशा आहे. पुढील दोन वर्षांत कोरिया, तैवान आदि देशांत हे कारखाने येतील असा अंदाज आहे.

संगणक क्षेत्रात पुढचे पाऊल

विज्ञान क्षेत्रात संगणक विज्ञान हे सर्वांत प्रगत समजले जाते. दळणवळण, क्लिष्ट आकडेमोड, शास्त्रीय प्रश्नांचा सखोल आणि सर्वांगी अभ्यास यांमध्ये संगणकाचा उपयोग वादातीत आहे. जपान, अमेरिका, जर्मनी इत्यादी देश संगणकाच्या विविध प्रकारांच्या निर्मितीत अग्रेसर आहेत. प्रत्येक वर्षी संगणकाचे नवे मॉडेल बाजारात येते आणि त्याआधीची सर्व मॉडेल्स कालबाह्य ठरतात. भारतात संगणकावरील संशोधन अतिप्रगत अवस्थेत नसले तरी त्याचा वापर व्यापक प्रमाणात होऊ लागला आहे. बँका, प्रवासी आरक्षण, संशोधन संस्था, खासगी उद्योग यांतील संगणकाच्या वापरामुळे आपले जीवनमान उंचावत आहे आणि जीवन सुकर होत आहे. असे कोणतेही क्षेत्र नाही की जेथे आज आपल्या मदतीला संगणक नाही. परदेशांत या संगणकांसंबंधी स्पर्धात्मक संशोधन चालू आहे. या स्पर्धेतील एक टप्पा म्हणजे ‘Digital Optical Computer’, या क्रांतिकारक संगणकाविषयी ‘ए.टी.अँड टी. बेल लॅबोरेटरी’ येथे संशोधन चालू आहे. या संगणकात वीजप्रवाह वाहून नेण्यासाठी नेहमीच्या तारांऐवजी प्रकाश किरणांचा (म्हणजेच विधुतचुंबकीय लहरींचा) उपयोग केला आहे. याच्या उपयोगामुळे अत्यंत शक्तिशाली आणि कार्यक्षम संगणकाची निर्मिती करता येईल. विद्युत तारांचे जंजाळ नसल्याने आणि नव्या सुधारणांमुळे संगणकाला अत्यंत कमी जागा पुरते. आधुनिक संगणकाच्या काम करण्याच्या वेगाहून या संगणकाचा वेग हजार पटींनी अधिक असेल. हा संगणक विकसित करण्याचे काम सर्वप्रथम चार वर्षांपूर्वी, 1987 मध्ये सुरू झाले.

‘ए.टी.अँड.टी' कंपनीने या संगणकाचे ‘हार्डवेअर’ विकसित केले. हे संशोधन आता अंतिम टप्यात आले आहे. हा अत्याधुनिक संगणक लवकरच बाजारात येईल, अशी अपेक्षा आहे. या संगणकाचा फायदा दूरसंचार सेवांना होईल.

दूरध्वनीच्या लाखो तारांऐवजी विद्युत्-चुंबकीय लहरी वापरल्याने दूरसंचार सेवांची कार्यक्षमता वाढेल. विद्युत्-चुंबकीय लहरींचा वापर हे या क्षेत्रातील क्रांतिकारक पाऊल आहे.


औषधी वनस्पती

आयुर्वेदामध्ये आणि ‘आजीच्या बटव्या’मध्ये अनेक औषधी वनस्पती येतात. या निसर्गदत्त औषधांचा गुण आपल्यापैकी प्रत्येकाला कधी ना कधी येतच असतो. अशा या घरगुती आणि वनस्पतिजन्य औषधांची उपयुक्तता वादातीत आहे. पारंपरिक अॅलोपॅथीतील औषधांपेक्षा या औषधांचे अवांतर दुष्परिणाम कमी असतात किंवा जवळ जवळ नसतातच. चीनमधील वैद्यकीय संशोधकांनी ‘अपोसिनम व्हेनेटम’ या औषधी पाल्याचे आश्चर्यकारक उपयोग शोधले आहेत. अनेक दुर्धर व्याधींवर काही प्रमाणात किंवा पूर्ण प्रमाणात औषध मात करते असे दिसून आले आहे. रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार यांसारख्या रोगांवर याचा गुणकारी प्रभाव तर पडतोच पण मानवाची आयुर्मर्यादा वाढायलाही ही वनस्पती मदत करते. चिनी शास्त्रज्ञांनी या औषधाचा काढा तयार केला. त्याचे सेवन सलग चार आठवडे केल्याने रक्तदाबाचा विकार दहा टक्क्यांनी कमी होतो. तसेच रक्तातील कोलेस्टेरॉल या घटकाचे प्रमाण पंचवीस टक्क्यांनी घटते. तसेच या औषधाच्या सेवनाने हृदयातील पेशींची कार्यक्षमता वाढत असल्याचे दिसून आले आहे. याचा परिणाम म्हणून या पेशींचे आयुष्य चार ते पाच टक्क्यांनी वाढले आहे. हे शास्त्रज्ञ टक्क्यांच्या परिभाषेत सांगत असले तरी औषधांचा एकूण गुण प्रभावकारी असल्याची जाहिरात भरपूर झाली आहे. यामुळे हा शोध प्रसिद्ध होताच चीनमध्ये अनेकांनी या औषधाची मागणी नोंदवली आहे. या औषधामुळे आयुर्मान चार ते पाच वर्षांनी वाढते अशीही पुस्ती या संशोधकांनी जोडली आहे. यामुळे या औषधाच्या मागणीला अधिक जोर आला आहे. तूर्त उपलब्ध माहितीनुसार या शास्त्रज्ञांनी आपल्या शोधाचे रहस्य बऱ्याच अंशी गुप्त राखले आहे. यामुळे या औषधाचा निश्चित परिणाम कसा होतो, याचे स्पष्टीकरण मिळत नाही. अर्थातच या औषधाचे काही दुष्परिणाम आहेत किंवा नाहीत याबद्दलही काही माहिती नाही. यामुळे या लेखाविषयी संशोधकांत दोन मतप्रवाह आहेत. या औषधाला ‘रामबाण’ उपाय मानणारे एका बाजूला आहेत. त्यांच्या मते अनेक असाध्य विकारांवर या औषधीमुळे उत्तम उपाय उपलब्ध झाला आहे. या औषधावर अजून संशोधन करून ते योग्य प्रकारे विकसित केले पाहिजे असे ह्या संशोधकांचे म्हणणे आहे. याउलट दुसरा गट याबाबतीत सावधपणे सल्ला देत आहे. या औषधाबद्दल पुरेशी माहिती सध्या उपलब्ध नसल्याने त्याविषयी खात्रीपूर्वक विधान करणे धाडसाचे आहे. यावर सर्व बाजूंनी संशोधन करून, त्याचे काही दुष्परिणाम आहेत का, याचा अभ्यास होणे आवश्यक आहे. तेव्हा या निसर्गवैद्यकीय तज्ज्ञांनी या औषधाचा उपयोग योग्य प्रकारे आणि योग्य प्रमाणात करावा असा सल्ला दिला आहे.

तेव्हा आपले आयुष्य चार-पाच वर्षांनी वाढण्याचे औषध तयार होईपर्यंत अजून चार-पाच वर्षे वाट बघितली पाहिजे!

Tags: शास्त्रज्ञ चीन संशोधन औषधी वनस्पती आयुर्वेद ए.टी. अँड टी नवे मॉडेल संगणक रॉकेल डिझेल पेट्रोल प्लास्टिक  औद्योगिक क्रांती विज्ञानाचे प्रयोग सुहास पानसरे Science  Suhas Pansare Scientists China Research Medicinal Plants Ayurveda A.T&T Digital Optical Computer New Models Computers Kerosene Diesel Petrol Plastics Industrial Revolution Experiments weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके