डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

जगभरच्या समाजजीवनातील खडतर वास्तवांचे, त्यासाठीच्या संघर्षाचे इंटरनेट माध्यमातून मिळालेले खास वेध, साधनाच्या वाचकांसाठी सादर करणारे हे नवे सदर प्रत्येक अंकात प्रसिद्ध होईल.

नैसर्गिक सौंदर्य, रम्य सागरी किनारा आणि जोडीला खास आशियाई संस्कृती. एवढी संपन्नता असलेल्या थायलंडकडे पर्यटक, विशेषतः पाश्चिमात्य पर्यटक, आकर्षित न होतील, तरच नवल. थायलंडने विविध मार्गांनी परदेशी पर्यटकांचा रोख आपल्या देशाकडे वळवला आणि अल्पावधीतच एक यशस्वी पर्यटन उद्योग असलेला देश म्हणून आपलं स्थान निश्चित केलं. थायलंडच्या अर्थकारणाचा डोलारा आजही प्रामुख्याने पर्यटन उद्योगावरच उभा आहे, पण त्याच्या यशस्वीपणापुढे मात्र काही प्रश्नचिन्ह उभी आहेत. लाभ रेषेची अधोगती आणि समस्यारेषेची उन्नती अशी गेल्या दोन वर्षांतील या उद्योगाची देशातील स्थिती आहे. 

थायलंडने, विशेषतः गेल्या दहा-पंधरा वर्षांत, पर्यटन उद्योगाची पद्धतशीर वाढ केली. त्यामुळे देशात परकीय चलनाचा ओघ वाढला. परकीय गुंतवणूक वाढली आणि भरपूर प्रमाणात रोजगारही वाढला. इथं वीस लाख लोकांचा रोजगार पर्यटन उद्योगावर अवलंबून आहे. परंतु गेल्या दोन वर्षांत मात्र देशात कोणतीही मोठी परकीय गुंतवणूक झालेली नाही. परदेशी पर्यटकांच्या राहण्याचा कालावधी कमी होत चालला आहे. पर्यटन उद्योगातील आंतरराष्ट्रीय स्पर्धेला तोंड देण्यासाठी कमी दर आकारावे लागत आहेत. त्याचबरोबर पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी खर्चिक कल्पना लढवाव्या लागत आहेत. त्यामुळे पर्यावरणाची जोपासना करण्यासाठी आणि पर्यटन स्थळांचा आणखी विकास करण्यासाठी लागणाऱ्या तरतुदींना कात्री लावावी लागत आहे. 1980 ते 2000 या काळात इथल्या पर्यटन उद्योगाची खरी भरभराट झाली. दरवर्षी येणाऱ्या पर्यटकांची संख्या दहा लाखांपासून एक कोटीपर्यंत वाढली. पण गेल्या दोन वर्षांत अनुभवाला येणाऱ्या मंदीच्या काळात मात्र पर्यटन स्थळांबरोबरच विमानतळ, विमानं, हॉटेल्स आणि गोल्फ क्लब सारख्या उंची सुविधांचा, गुंतवणुकींच्या तुलनेत पुरेसा वापरही होत नाही. याशिवाय गेल्या वर्षी वर्ल्ड ट्रेड सेंटरवर झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर जागतिक अर्थकारणात जे बदल झाले त्याचे परिणामही थायलंडमधील पर्यटन उद्योगावर पडले आहेत. पर्यटक कमी झाले आहेत. रोजगारासाठी परदेशांत गेलेल्या अनेकांच्या नोकऱ्या गेल्याने त्यांना मायदेशी परतावे लागत आहे व आता रोजगारासाठी त्यांची भिस्तही पर्यटन उद्योगावरच आहे.

झपाट्याने पर्यटन उद्योगाचा विस्तार करण्याच्या प्रयत्नांत इथल्या पर्यावरणावर अनेक आघात झाले आहेत आणि होत आहेत. नैसर्गिक आणि सामाजिक असे दोन्हीही पातळ्यांवरचे पर्यावरण ढवळून निघत आहे. हा उद्योग सागरी किनारे, समुद्री जीव, डोंगर, जंगले या साऱ्यांच्याच ऱ्हासास कारणीभूत ठरत आहे. समुद्री, नैसर्गिक आणि सांस्कृतिक संपन्नतेचा व्यावसायिक नफेखोरीसाठी वापर होत आहे. सतत नवनवे भाग महत्त्वाकांक्षी पर्यटन प्रकल्पांसाठी राखून ठेवले जात आहेत. शिवाय पर्यटकांच्या सेवेसाठी मसाज पार्लर पासून वेश्याव्यवसायापर्यंत सर्व सुखे देणारी सेक्स इंडस्ट्री, पाश्चिमात्य संस्कृतीचा मारा यांतून इथली सांस्कृतिक घडीही पूर्ण विस्कटली जात आहे. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी दरवर्षी काही नवी शक्कल लढवली जाते. इकोटूरिझम ही अशीच एक कल्पना, जागतिक बँक आणि अन्य आंतरराष्ट्रीय बँकांकडून कर्ज घेऊन पर्यटनासाठी सुसज्ज यंत्रणा उभारणीचे काम सुरू झाले. अशा मोठ्या आणि महत्त्वाकांक्षी प्रकल्पात स्थानिक लोकांचा विचार केलाच जात नाही. स्थानिक लोकांनाही या प्रकल्पांचा लाभ होईल असे चित्र रंगवले जाते. पण अंतिमतः लोकांचे नुकसान होते. विस्थापन, लोकांच्या स्वयंपूर्ण जीवनपद्धतीच मुळापासून उखडून काढल्या जातात.

अशा प्रकारे सामाजिक आणि पर्यावरणीय नुकसान होऊ नये म्हणून विरोधही होत आहे. पर्यटनाचे काही प्रकल्प, धोरणे यांना विरोध झाले आहेत, होत आहेत. लिओनार्डो डिकॅप्रिओ काम करत असलेल्या 'द बीच' या चित्रपटाच्या शूटिंगसाठी 1999 साली फीफी बेटावरील नॅशनल पार्कची नैसर्गिक रचना पूर्णपणे बदलण्याचा सरकारने घाट घातला होता. त्यामुळे पर्यटक वाढतील हा त्यामागचा धंदेवाईक विचार. लोकांच्या विरोधामुळे हा प्रकल्प होऊ शकला नाही. हे असे ठराव होत आहेत.

1990 साली इथे झालेल्या एका अभ्यासातून असे निदर्शनास आले की परदेशी कंपन्यांनी केलेल्या गुंतवणुकीमुळे पर्यटन उद्योगातून होणाऱ्या उलाढालीपैकी अंदाजे साठ टक्के रक्कम ही परकीय गुंतवणूक करणाऱ्या देशांतच जाते. तरीही पर्यटन उद्योगावर भिस्त असलेला थायलंड आर्थिक पेचप्रसंग आले की पुन्हापुन्हा पर्यटन उद्योगाचा विस्तार करण्याचेच धोरण ठेवत आला आहे. पर्यटनातून पर्यावरणावर, स्थानिक विकास प्रक्रियांवर, लोकांवर होणारे विपरित परिणाम आणि या उद्योगाची अस्थिर अवस्था पाहता पर्यटनातून अर्थकारण उभारण्याच्या धोरणाचाच पुनर्विचार करण्याची या देशाला तातडीची गरज आहे.

साद-पडसाद वृत्तलेख सेवा

Tags: पर्यटन व्यवसाय संस्कृती इंटरनेट थायलंड उद्योग पर्यटन Travelling Transport Net bhet Tourism Weekly Sadhana weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके