तरी अटलबिहारी वाजपेयी त्यांच्या इस्लाम-द्वेष्ट्या सहकाऱ्यांपासून कितपत अलिप्त आहेत, याची खरी परीक्षा झाली ती गुजरातमध्ये 2002 साली घडलेल्या मुस्लिम-विरोधी दंग्यात. गुजरात नरसंहाराचा त्यांच्यावर निश्चितच परिणाम झाला असे दोन प्रसंगातून वाटले. त्यादिवशी सकाळी शाह आलम शरणार्थी शिबिरात 9000 मुस्लिम स्त्री-पुरुष व मुले आश्रयाला आलेली पाहून त्यांना हिंसेचा अंदाज आला आणि 2002 ची दंगल ही राष्ट्रीय शरमेची बाब असून, हिंसेपोटी भारताच्या प्रतिष्ठेचा बळी गेला, असे उद्गार त्यांनी काढले. त्याच संध्याकाळी विमानतळावर पत्रकार परिषदेत तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदींना काही संदेश आहे का- असे विचारले असता, वाजपेयींनी मोदींना राजधर्माचे पालन करायचा सल्ला दिला आणि आपण स्वतः तसेच करत असल्याचे सांगितले.
भाजपचा 1998च्या निवडणुकीचा प्रयोगही अखेर कोसळला- पक्षात वाढत चाललेल्या अनिर्बंध महत्त्वाकांक्षांमुळे, मित्रपक्षांच्या लहरीपणामुळे आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं अडवाणी-प्रेम किंचितही न अटल्यामुळे! वाजपेयी सरकारचे सुरुवातीचे महिने अर्थातच संघाला खूप समाधानकारक होते. जागतिक निर्बंधांची भीती झुगारून भाजप सरकारने अणुस्फोट घडवून आणले आणि आधीच्या सरकारांनी झाकून ठेवलेली भारताची अण्वस्त्रक्षमता उघड केली. वाजपेयींनी भारताची दुबळी, बोटचेपी प्रतिमा बदलून तिला अण्वस्त्रसज्ज, बलाढ्य केलं. म्हणूनच संघाचं वाजपेयी-प्रेम दुप्पटीने वाढलं.
वाजपेयींचा अण्वस्त्रसज्ज भारत हा संघाच्या हिंदूराष्ट्र संकल्पनेत चपखल बसत होता. बलाढ्य राष्ट्र आणि हिंदू एकता हेच त्या राष्ट्रसंकल्पनेचे दोन आधार होते. सरकारच्या नवलाईचा काही काळ वगळता वाजपेयी-संघ संबंध तणावाचेच ठरले आणि संघाकडून क्वचितच पंतप्रधान वाजपेयींचे कौतुक झाले, आणि झाले तरी त्याला जोडून संघाचे असमाधानही समोर यायचे. याचे कारण वाजपेयी संघाप्रति फारसा आज्ञाधारकपणा दाखवत नव्हते. 1998 अखेर संघाने सावधपणा सोडून वाजपेयींना सरळ तंबीच दिली. डिसेंबर 1997च्या ‘पाञ्चजन्य’च्या अंकातून संघाचे सह-सरकार्यवाह सुदर्शन यांनी वाजपेयी सरकारला आपल्या जाहीर धोरणापासून फारकत घेतल्याबद्दल झापलं. सरकार राष्ट्रहिताविरुद्ध गेल्यास आम्ही गप्प बसणार नाही... मग सरकार कोणाचेही असो, असा त्यांचा सूर होता. नेमकं काय बिनसलं होतं ते सांगितलं नाही, पण आर्थिक उदारीकरणासंबंधी वाजपेयींचं धोरण संघाला मान्य नसावं.
इतक्या गोंधळात एक सरकार कोसळले, कारगिल युद्ध लढले गेले, जिंकलेही गेले, परंतु वाजपेयींच्या लोकप्रियतेत किंचितही घट झाली नाही. किंबहुना आता विजयी युद्धविराचा शिरपेच त्यांच्या माथी आला आणि वाजपेयी निर्विवाद, निःसंशय, अजिंक्य वाटू लागले.
अनपेक्षित मित्रपक्ष
वाजपेयींची लोकप्रियता 70 टक्क्यापर्यंत पोहोचली, आणि ते नव्या वाढत्या अंगाच्या भाजप आघाडीसह 1999 मध्ये केंद्रात सरकार बनवू शकले. अशक्य वाटणारे पक्ष आघाडीत दाखल झाले. त्याआधी कुणाला खरे वाटले असते की, स्थापनेपासून द्रविड हक्कासाठी झुंझणारा द्रमुक पक्ष या हिंदी-हिंदुत्ववादी पक्षाला केंद्रात पाठिंबा देईल? किंवा गोमांसभक्षक ईशान्य भारतातले पक्ष, गोरक्षणासाठी कटिबद्ध भाजपला पाठिंबा देतील?
तरी अटलबिहारी वाजपेयी त्यांच्या इस्लाम-द्वेष्ट्या सहकाऱ्यांपासून कितपत अलिप्त आहेत, याची खरी परीक्षा झाली ती गुजरातमध्ये 2002 साली घडलेल्या मुस्लिम-विरोधी दंग्यात. गुजरात नरसंहाराचा त्यांच्यावर निश्चितच परिणाम झाला असे दोन प्रसंगातून वाटले. त्यादिवशी सकाळी शाह आलम शरणार्थी शिबिरात 9000 मुस्लिम स्त्री-पुरुष व मुले आश्रयाला आलेली पाहून त्यांना हिंसेचा अंदाज आला आणि 2002ची दंगल ही राष्ट्रीय शरमेची बाब असून, हिंसेपोटी भारताच्या प्रतिष्ठेचा बळी गेला, असे उद्गार त्यांनी काढले.
त्याच संध्याकाळी विमानतळावर पत्रकार परिषदेत तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदींना काही संदेश आहे का- असे विचारले असता, वाजपेयींनी मोदींना राजधर्माचे पालन करायचा सल्ला दिला आणि आपण स्वतः तसेच करत असल्याचे सांगितले. उत्तर नेहमीप्रमाणेच काहीसे अप्रत्यक्ष होते. पण याचा अर्थ असा लावला गेला की, पंतप्रधानांनी आपले कर्तव्य बजावले आणि मुख्यमंत्र्यांनी मात्र ते न बजावल्यामुळे पंतप्रधानांनी तशी सूचना केली. गुजरात दंगलींनंतर तीन महिन्यांनी वाजपेयींनी मोदींना एक पत्र लिहिले, ज्यात मुस्लिम मालमत्तेच्या नुकसानाचे अंदाज कमालीचे तोकडे असल्याचे सांगत, त्यात त्वरित सुधारणा आवश्यक असल्याचेही अधोरेखित केले. तसेच, दंगलग्रस्तांना स्वगृही परतण्याजोगे वातावरण निर्माण करण्याविषयी सूचनाही पत्रात केली. अहमदाबादमध्ये नरोडा-पातिया भागात आणि पंचमहालमध्ये लुनावाडा भागात झालेल्या सर्वांत हिंस्त्र दंगलींच्या पीडितांना स्थलांतराशिवाय पर्याय नाही. त्यांचे समाजकंटकांपासून सक्रिय सरंक्षण सरकारच करू शकेल. अशा तत्त्वांच्या प्रभावामुळे परिस्थिती आहे त्यापेक्षा खराबच होईल, हे सांगायला नको, असे वाजपेयींनी पुढे लिहिले.
कोण होते हे समाजकंटक? वाजपेयींनी नावाने उल्लेख केला नसला तरी ते समाजकंटक भाजप मित्रपरिवारांपैकी होते हे जाणकारांना उघड होतं. या दोन प्रसंगांतून वाजपेयी हे वेळप्रसंगी पक्षाचा रोष ओढवूनही न्यायासाठी लढू शकतात ही समजूत उधळून लावली. दरम्यानच्या काळात वाजपेयींनी दोष मुसलमानांच्या पदरात घालून झाला होता. एप्रिल 2002 मध्ये गोव्यात भाजपच्या राष्ट्रीय अधिवेशनात त्यांनी केलेल्या भाषणातला उद्रेक तर सर्वश्रुत आहे. गोध्रा जळितकांड आणि त्यानंतर हिंदूंनी मुसलमानांवर गुजरातमध्ये राज्यभर चढवलेले तीव्र आणि अविरत हल्ले या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. ते म्हणाले- ‘काय झालं गुजरातेत? निष्पाप, निकोप, असहाय्य यात्रेकरूंना जाळायचे कांड रचले गेले नसते तर दंगल झालीच नसती. पण तसे घडले नाही. माणसे जाळली गेली...’ इथे रागाने लालबुंद होत ते म्हणाले- ‘कोणी लावली ती आग? कशी पसरली ती आग?’ ते इथेच थांबले नाहीत. मुसलमान कुठेच गुण्यागोविंदाने नांदत नाहीत अशी त्यांनी टीका केली. ते म्हणाले, ‘मुसलमान कुठेही असोत, त्यांना इतरांमध्ये मिळून मिसळून राहायला आवडत नाही. आपल्या विचारांचा शांततेने प्रचार-प्रसार करणे त्यांना आवडत नाही. त्याऐवजी ते धमक्या आणि दहशतीचा वापर करतात. जगालाही हे आता समजू लागलेय. (Bhatt, S.2002. Muslims don't want to live in harmony, says Vajpayee, rediff.com, April 12. http://www.rediff.com/news/2002/apr/12bhatt.htm.)
मुस्लिमांवर केलेल्या या एकगठ्ठा दोषारोपाविरोधात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. लवकरच पंतप्रधान कार्यालयाने घाईघाईने स्पष्टीकरण दिले की, ते वक्तव्य काहीच मुसलमानांबद्दल होते, सगळ्या नाही. तरीही व्हायचे ते नुकसान झालेच. नुसता वरील उताराच नव्हे तर ते आख्खे भाषण मुस्लिमविरोधी होते. सिद्धार्थ वरदराजन यांनी नुकत्याच लिहिलेल्या एका लेखात म्हटलेय, ‘शेकडो निष्पाप जीवांच्या हत्येविषयी भाषणात काडीमात्र पश्चाताप दिसत नाही. त्यांना संरक्षण द्यायला सरकार असमर्थ ठरलं, याबद्दल कोणती दिलगिरी दिसत नाही. गोध्रा जळितकांडाच्या अपराध्यांमध्ये आणि त्यानंतर दंगलीत मारल्या गेलेल्या निष्पाप बळींमध्ये ते कोणता फरक पाहत नाहीत...’
कोणते वाजपेयी खरे?
कोणते वाजपेयी खरे? शहा आलम शरणार्थी शिबिरात मुसलमानांच्या अवस्थेमुळे हेलावून गेलेले? मोदींना राजधर्म पाळायला सांगणारे (पर्यायाने पालन न झाल्याचे दर्शविणारे)? दंगलग्रस्तांना समाजकंटकांपासून संरक्षण द्या म्हणून मोदींना लिहिणारे? पणजीला प्रक्षोभक भाषण देणारे? मुस्लिम समाजावर सरसकट राग व्यक्त करणारे? निर्दोष दंगलग्रस्तांविषयी संवेदना व्यक्त करण्याऐवजी त्यांनाच त्यांच्या अवस्थेसाठी जबाबदार ठरवणारे? संपूर्ण कारकिर्दीत वाजपेयी सतत अशाप्रकारे भूमिका बदलत राहिले- कधी जगाला आपल्या मुत्सद्दीपणाने किंवा दिलदारपणाने भुलवून टाकणारे, कधी स्वयंसेवकांच्या संकुचित भावनांना गोंजारणारे.
बाबरी मशिदीच्या विध्वंसाने उद्विग्न झालेल्या वाजपेयींनी त्वरित आपला राजीनामा लिहून काढला, असे भाजपच्या आतल्या गोटातून सांगितले जाते. परंतु काही काळाने एक असा व्हिडिओ बाहेर आला की, ज्यात ते विध्वंसाच्या आदल्याच दिवशी आलेल्या गर्दीचे आनंदाने स्वागत करताना दिसतात. सर्वोच्च न्यायालयाची परवानगी असल्यामुळे कारसेवा बंद करण्याचा प्रश्नच येत नाही, असे ते जोषाने हातवारे करत म्हणताना दिसतात. गर्दी जमा होण्याचे समर्थनही ते त्या व्हिडीओत करतात. भजन अखेर समूहाचेच असते, एकट्याचे नव्हे. कीर्तनाला तर अजून माणसे आली पाहिजेत... असं म्हणतात.
2002 च्या गुजरात दंगलींच्या वेळेस वाजपेयी प्रधानमंत्री होते. सुरुवातीला वाजपेयी मोदींना बडतर्फ करण्यास उत्सुक असल्याचे दिसले. परंतु बाहेर वाजपेयींची लोकप्रियता आकाशाला जाऊन भिडली असली आणि मित्रपक्षांचा त्यांना कितीही पाठिंबा असला तरी पक्षावर ते आपले मत लादू शकले नाहीत. उलट कालांतराने ते पक्षाची धर्मांध पोपटपंची करू लागले, ती त्यांना पटत असो किंवा नसो. तसेच, संघाबरोबर तणाव चालले असतानासुद्धा ते आपले मूळ संघात आहे, हे सांगायला कधी चाचरले नाहीत. 2002 मध्ये अमेरिकेत न्यूयॉर्क येथे संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेत खास सौम्य, पंतप्रधानांना अनुरूप वावरले, परंतु नंतर लगेच टोपी फिरवून जवळील स्टॅटन बेटावर तापट संघिष्टांच्या बैठकीतही सामील झाले. तसेच विश्व हिंदू परिषदेच्या मंचावरून बोलताना ते कडाडले, ‘मी प्रथम संघाचा स्वयंसेवक आहे. आणि हा अधिकार माझ्यापासून कोणीच हिरावून घेऊ शकत नाही.’
त्यानंतर सुमारे तीन महिन्यांनी बाबरी मशिदीवरील हल्ल्याचा स्मृतिदिन होता. मुसलमानांसाठी अत्यंत भावनिक असा दिवस. नेमके त्याच दिवशी राम मंदिर कसे राष्ट्रभावनेशी निगडित आहे याविषयी वाजपेयी बोलले. या विधानावरून गदारोळ उठला. त्याबद्दल संसदेत बोलताना जयपाल रेड्डी म्हणाले, ‘वाजपेयींचा मुखवटा सरकला वाटतं.’ वाजपेयींनी आपली चूक ओळखत लगेच आपल्या मूळ वक्तव्याला पुस्ती जोडली, ‘अयोध्या प्रश्नावर कोणताही तोडगा शांततेने आणि सलोख्यानेच शोधला पाहिजे.’
काश्मीर आणि पाकिस्तान प्रश्नांवर मात्र त्यांचे असंख्य चाहते त्यांना श्रद्धांजली वाहताना म्हणाले त्याप्रमाणे, मागील सर्व चुका आणि ठेचा टाळत वाजपेयी एक थोर मुत्सद्दी ठरले. काश्मीरमधील संभाव्यतः पहिली खरी निवडणूक वाजपेयी सरकारच्या काळात घडली. इन्सानियत, काश्मिरियत, जमुरियत (माणुसकी, काश्मिरी अस्मिता आणि लोकशाही) ही त्यांची त्रिसूत्री घोषणा अजरामर ठरली. लाहोर बसप्रवास तर त्यांचा फारच धाडसी निर्णय होता. तिथून मिनार-ए-पाकिस्तानला भेट देण्याच्या त्यांच्या उत्तुंग कृतीमुळे त्यांचे भारतात आणि पाकिस्तानातच नव्हे तर जगात कौतुक झाले. वातावरणनिर्मितीची त्यांची हातोटी होती.
त्यांना पाकिस्तानशी मैत्री हवी होती, तेव्हा त्यांच्याबरोबर भारतीयांनी पाकिस्तानला मिठ्या मारल्या. त्यांना युद्ध हवे होते, तेव्हा भारतीयांनी युद्ध जिंकून दिले. वाजपेयींच्या पाकिस्तानधोरणाची गाडी, प्रेम आणि रागाच्या मार्गाने, ज्या स्टॅन्डवर थांबली तेव्हा तिन्ही वेळेला भारताने त्यांना पाठिंबा दिला. याउलट मनमोहन सिंगांनी पाकिस्तानशी सौहार्दपूर्ण संबंध स्थापित करण्याचे प्रयत्न केले, तेव्हा त्यांच्यावर टीकेची झोड उठली. तसेच आज काश्मीर आणि पाकिस्तानप्रश्नी भारतात जे द्वेषाचे वातावरण आहे, त्या पार्श्वभूमीवर वाजपेयींची कामगिरी अधिक उल्लेखनीय ठरते. वाजपेयींमध्ये काय जादू होती कोण जाणे, त्यांच्यावर अगदी अनपेक्षित ठिकाणी स्तुती सुमने यायची.
रा.स्व. संघाच्या ‘पांचजन्य’ या मुखपत्राने 2003 मध्ये विविध विचारवंतांना वाजपेयी सरकारचे खुले मूल्यांकन करायचे आमंत्रण दिले. त्यात ‘एशियन एज’चे संपादक एम.जे. अकबर आणि ‘आऊटलुक’चे संपादक विनोद मेहता, तसेच राजकीय समालोचक सैद नकवी हे होते. पैकी पहिले दोघे काँग्रेसला झुकते माप देणारे समजले जायचे तर नकवी स्वतःला अलिप्त मानायचे. अकबर म्हणाले, ‘वाजपेयींची सर असलेलं सरकारमध्ये आणि विरोधी पक्षांमध्ये कोणी नाही. त्यांना देशाची समज आहे आणि देशाच्या गरजांची उपजत जाणीव आहे. मोह आणि महत्त्वाकांक्षेसारखे दोष त्यांना शिवत नाहीत.’ विनोद मेहता म्हणाले, ‘इतिहास वाजपेयींना मोठे स्थान देईल. 544 पैकी फक्त 180 जागा तुमच्या पक्षाकडे असतांना यशस्वी आघाडी सरकार चालवण्याला तेज, कल्पकता आणि संघटनकौशल्य लागतं’.
नकवी त्याही पुढे एक पाऊल जाऊन म्हणाले, ‘वाजपेयी हे नुसते उत्तम मुत्सद्दी नाहीत. दृष्टी, समर्पण, आणि इच्छाशक्ती या त्यांच्या जमेच्या बाजू आहेत. एक उत्तुंग नेताच अयोध्यावादाची पार्श्वभूमी झुगारून प्रचंड लोकप्रियता खेचून आणू शकतो. ते संघाच्या पाठशाळेतले असले तरी मध्यममार्गाच्या दिशेने त्यांची वैचारिक उत्क्रांती झाली आहे.’ ही विधाने वाचताना लक्षात ठेवले पाहिजे की, ही वक्तव्ये 2003 मधली आहेत, 2018 मध्ये श्रद्धांजली वाहताना काढलेल्या आठवणी नाहीत. म्हणून पुनःपुन्हा प्रश्न पडतो की, ‘खरे वाजपेयी नेमके कोणते?’
कदाचित यांचे उत्तर त्यांनी शाळेत लिहिलेल्या ओळीत असेल. हिंदू तन मन, हिंदू जीवन, रग-रग में मेरा हिंदू परिचय. खरेच, वाजपेयी म्हणजे एवढेच होते का? हिंदू आणि फक्त हिंदू? उत्तर आहे हो... आणि नाही. त्यांच्याच शब्दांत ते मुख्यत्वे (संघाचे) स्वयंसेवक होते. आणि तसे असले तरी... जेव्हा त्यांनी पंतप्रधानपद ग्रहण केले तेव्हा ते अशाप्रकारे वावरले की, त्यांच्या संपर्कात येणाऱ्या कोणालाही त्यांच्यात काही दोष किंवा चुका दिसल्या नाहीत... किंवा त्या दिसल्या तरी त्यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष करणे पसंत केले.
अनुवाद : संजय पेंडसे
लेखाचा पूर्वार्ध वाचण्यासाठी क्लिक करा
Tags: 2002 गुजरात अटलबिहारी वाजपेयी मृत्युलेख 2002 gujrat mrutyulekh atalbihari vajpeyi weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
वर्गणी..
चौकशी
देणगी
अभिप्राय
जाहिरात
प्रतिक्रिया द्या