डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

मित्र विलास सोनावणे : अजूनही संवादात

विलास सोनावणे यांचा कंपू नव्हता. एकीकडे त्यांच्या संपर्कात फक्रुद्दीन बेन्नूर होते, तर दुसरीकडे यशवंत सुमंत होते. परंतु त्या यादीमध्ये ज्ञानाच्या अंगाने पुढे जाऊ पाहणाऱ्या स्त्रिया आपल्याला दिसत नाहीत. त्यांच्या खाजगी जगण्याचा कप्पाही बंद होता. मुस्लीम मराठी साहित्य संमेलन, सकल साहित्य संमेलन असे वेगवेगळे राजकीय मंच उभारत नवनव्या अभ्यासक तरुणांना विलास सोनावणे जोडत होते. जात आणि धर्माच्या एकसत्त्वी आकलनाची मर्यादा फोडण्याचे त्यांचे योगदान महत्त्वाचे वाटत असतानाच पुरुषसत्तेचे ‘मोनोलिथ’ फोडण्याची गरज त्यांच्यासोबत असलेल्या संवादातून जाणवत होती. अतिशय गतीचे आणि झंजावाती आयुष्य जगात होते. या झंजावातात त्यांचे त्यांच्या कुटुंबीयांशी असणारे नाते, मित्र-मैत्रिणींशी असणारे नाते यांचा त्यांनी फारसा खोलात विचार केला नाही असे वाटते.

कॉम्रेड विलास सोनावणे यांच्याशी माझी भेट ही काहीशी अपघाताने झाली. त्या वेळी कॉम्रेड शरद पाटील यांची मांडणी चर्चेत होती. भारतीय संदर्भातील जात-वर्गीय वास्तव समजून घेण्यासाठी ते प्रस्तुत करत असलेला मार्क्सवाद आणि फुले-आंबेडकरवादाचा संयोग अनेकांचे लक्ष वेधून घेत होता. भारतीय प्राचीन इतिहासातील मातृसत्ता-स्त्रीसत्ता ते जातिसमाज बनण्याचा शरद पाटील यांनी मांडलेला पट थक्क करणारा होता. त्या वेळी शरद पाटलांची मांडणी समजून घेण्यासाठी आम्ही अनौपचारिकपणे जमायचो.

साधारण ते 1990चे दशक होते. नुकतीच मला पीएच.डी.ची पदवी मिळाली होती. तोपर्यंत अनेक अनौपचारिक प्रकल्पांमध्ये काम करता करता मी चळवळींमध्ये जमेल तसा सहभाग घेत होते. विद्यापीठासारख्या प्रमुख प्रवाही चौकटीत काम करावे का, अशा संभ्रमात मी होते. जिवंत चळवळी महत्त्वाच्या, तिथेच खरी ज्ञाननिर्मिती होते, असाही एक प्रभुत्वशाली सूर त्या काळी चळवळीत असायचा. शिकण्या-शिकवण्याच्या क्षेत्रात काम करत स्थिर नोकरी मिळणे हेही मला भौतिक दृष्टीने गरजेचे वाटत होते आणि अशातच पुणे विद्यापीठात नव्याने सुरू होत असलेल्या स्त्री-अभ्यास केंद्रासाठी रीडर या पदाची जाहिरात आली. मग मी मनातला संभ्रम दूर करून नोकरी करण्याचा ठाम निर्णय घेतला आणि त्या पदासाठी अर्ज केला. काही कारणांमुळे त्या पदासाठी दोन वेळा मुलाखत घेतली गेली आणि दोन्ही वेळा मी एकटीच त्या पदासाठी पात्र ठरले व माझा विद्यापीठाच्या अधिकृत चौकटीत प्रवेश झाला.

विद्यापीठात त्या वेळी अशी कुजबुज होती की, या कुठे प्रमुख प्रवाही समाजशास्राच्या आहेत? काहीशा अशा विरोधाच्या वातावरणात मी स्त्री-अभ्यास केंद्राच्या कामाला सुरुवात केली. स्त्री-अभ्यासाच्या विद्यापीठीय चौकटीत लिंगभाव अभ्यास करताना चळवळीच्या परिघात होणारी चर्चाही खूप उपयोगाची आहे हे पटत होते. त्यामुळे विद्यापीठीय अकादमिक चौकट आणि चळवळीचे सघन कृतिशील क्षेत्र यांच्याशी जैविक नाते असणाऱ्या अनेक व्यक्तींशी मी संवादी होते.

त्या काळामध्ये विद्यापीठामध्ये गोपाळ गुरू, सुहास पळशीकर, राजेंद्र व्होरा ही मंडळी जोरदारपणे काम करत होती. इरावती कर्वे किंवा दुर्गा भागवत यांनी लिहिलेले ‘व्यासपर्व’ किंवा महाभारताचे नवे अर्थ लावणारे लिखाण किंवा इरावती कर्वे यांनी केलेला ॲन्थ्रोपोलोजीचा अभ्यास यांच्याबद्दल प्रश्न उपस्थित केले जात होते. राजकीय वातावरणही या सर्व बाबींसाठी काहीसे खुले होते. राजकीय फतवे काढणारे सरकार तेव्हा नव्हते आणि त्या फटीतच स्त्री-अभ्यास केंद्र म्हणून काही करण्याची आमची धडपड सुरू होती.

अशातच एकदा विलास सोनावणे आणि यशवंत सुमंत हे माझ्या घरी आले. त्या वेळी गोवंश हत्याबंदीच्या कायद्याचा मुद्दा संघर्षाचे केंद्र बनलेला होता आणि त्या संदर्भातच त्या दोघांना शरद जोशी यांच्याशी चर्चा करायची होती. त्या वेळी मी शेतकरी संघटनेच्या महिला आघाडीची महासचिव म्हणून काम करत होते. त्यामुळे शरद जोशी यांच्याशी माझा अत्यंत मोकळा संवाद होता. मग आम्ही तिघेही शरद जोशी यांच्याशी चर्चा करण्यासाठी चाकणला गेलो. सावरकरांच्या मांडणीतील गाईविषयीच्या विचारांवर शरद जोशी यांनी लिहिले होते आणि त्यामुळे या कायद्याच्या विरोधात संघर्ष उभा करण्याच्या दृष्टीने शरद जोशी यांनी खूप महत्त्वाचे मुद्दे त्या वेळी सांगितले.

गोवंश हत्याबंदीच्या कायद्याच्या निमित्ताने विलास सोनावणे यांच्याशी सुरू झालेला संवाद पुढे उत्तरोत्तर वाढत गेला. त्यांचा ‘कास्ट-क्लास’ दृष्टिकोन मला लिंगभाव अभ्यासाच्या संदर्भात महत्त्वाचा वाटू लागला. त्यांच्या बरोबरच्या चर्चेतून जात, वर्ग आणि लिंगभाव दृष्टिकोनातून सघन असे अकादमिक काम करता येईल असा आत्मविश्वास येत गेला. त्या वेळी शर्मिला रेगे ही माझी सहकारी म्हणून स्त्री-अभ्यास केंद्रात काम करत होती. तिचीही पोस्ट ही तात्पुरत्या स्वरूपाची होती. आम्ही केंद्राच्या वतीने विविध व्याख्याने, लेक्चर्स आयोजित करायचो.

एकदा आम्हांला विद्यापीठाच्या वतीने टीचर्स ट्रेनिंग प्रोग्रामचे काम मिळाले. विविध विद्यापीठांतील शिक्षक, प्राध्यापकांपर्यंत नवे ज्ञान व माहिती पोहोचावी या उद्देशाने तो ट्रेनिंग प्रोग्राम आजोजित केला गेला होता. त्या कार्यक्रमात आम्ही मांडणी करण्यासाठी विलास सोनावणे यांना निमंत्रित केले. त्यांची मांडणी ही अतिशय धारदार, नेमकी आणि मुद्देसूद असायची. जात-वर्गीय दृष्टीतून समस्येचे अगदी वेगळे मुद्दे ते समोर आणायचे. त्या कार्यक्रमात कला, समाजविज्ञान, इतिहास अशा विविध विषयांचे शिक्षक आलेले होते. तिथे विलास सोनावणे यांनी केलेल्या मांडणीमुळे आम्ही अत्यंत प्रभावित झालो.

त्या वेळी चळवळीच्या क्षेत्रात ज्या काही मांडण्या होत होत्या त्यांत ‘शहर विरुद्ध खेडे’ अशा स्वरूपाच्या द्वैती मांडण्या होत होत्या. परंतु विलास सोनावणे यांच्या मांडणीत मात्र खेड्यांमध्ये होणारे उत्पादन आणि शहरांमध्ये होणारे पुनरुत्पादन यांचे आंतरिक नाते काय आहे हे उकलताना जात-वर्गीय वास्तवाचे धागे उलगडले जात होते. फाळणीच्या पार्श्वभूमीवर अल्पसंख्य विरुद्ध बहुसंख्य अशी मांडणी होत होती, परंतु विलास सोनावणे यांनी या द्वैती मांडणीला नाकारून मुस्लीम समुदायाची एकसाची कल्पना कशी चुकीची आहे हे सिद्ध केले आणि मुस्लीम समाजातील जातीय आणि वर्गीय अंतर्विरोध समोर आणले. मुस्लीम समाजातील जातीची उतरंड आणि ब्राह्मणीकरण त्यांनी अतिशय स्पष्टपणे मांडले. त्यांच्या मांडणीतून सामाजिक विभेदन घडवून आणणाऱ्या जात आणि धर्म या शक्तींच्या एकसाची आकलनाला छेद दिला जात होता आणि संघर्ष व बदलाच्या नव्या शक्यता समोर येत होत्या.

टीचर्स ट्रेनिंग प्रोग्राममध्ये त्यांनी दोन मांडण्या केल्या. त्या वेळी मी पाहिले की, नवी आणि सघन अशी प्रक्रिया उकलणारी मांडणी असूनही सर्व शिक्षक असे म्हणत होते की, आम्हांला हे समजतेय. ऐकणाऱ्यापर्यंत लीलया पोहोचणे हे विलास सोनावणे यांचे वैशिष्ट्य होते. त्यांनी लिहिलेले अधूनमधून वाचायलाही मिळत होते. परंतु सलग अशी विस्तीर्ण मांडणी त्यांनी लिहिण्याच्या स्वरूपात फारशी केली नाही. मुंबई येथील सामाजशास्राचे त्यांचे शिक्षक नेहमी म्हणायचे, ‘‘विलास हा हुशार विद्यार्थी होता, पण वाया गेला.’’ मी त्याला विचारायचे की, तू तुझी मांडणी सलग लिहीत का नाहीस? त्यावर तो हसून म्हणायचा, ‘‘हे माझे राजकारण आहे.’’

माझी समाजवादी शाळा, राजारामशास्त्री भागवतांचा वारसा असलेले पुरोगामी सासर आणि या पार्श्वभूमीवर माझा चळवळीशी असलेला जैव संबंध यांमुळे अंतर्विरोध पाहणे, नवी मांडणी समजून घेणे मला महत्त्वाचे वाटत होते. त्यामुळे पाहता पाहता विलास सोनावणे हेही राम बापट, जयंत लेले यांच्याप्रमाणे आमच्या घराचा भाग झाले.

कार्यकर्ता म्हणून ते भारतभर फिरत असायचे आणि त्यामुळे त्यांच्याकडे खूप इनसाइट्‌स असायच्या. विविध राजकीय घटनांच्या संदर्भात ते नवनवे तपशील सांगायचे. या दरम्यान त्यांनी अनेक घरे जोडली होती. कार्यकर्त्यांच्या आयुष्यातील ताणतणाव स्वतः अनुभवतानाच ते त्याबद्दल जे बोलायचे त्यात मात्र लिंगभावाच्या अंगाने काहीशी विसंगती जाणवत होती.

स्त्रीवादी अभ्यास क्षेत्रात काम करताना ‘बाय द विमेन, फॉर द विमेन, ऑफ द विमेन’ असा घेटो करणे मला मान्य नव्हते. त्यामुळे अनेकांशी संवादी राहण्याची माझी भूमिका होती. विलास सोनावणे यांच्या सोबत मला अनेक ठिकाणी जाता आले. त्या वेळी त्यांच्याशी जो काही संवाद झाला त्यातून माझ्या हे लक्षात आले की, स्त्रीवाद एक राजकीय भूमिका म्हणून त्यांना फारशी मान्य नाही. मग माझे सोनावणे यांच्याशी वाद व्हायचे. त्यावर ते त्यांची भूमिका मांडायचे. मी त्यांची भूमिका ऐकून माझी प्रतिक्रिया द्यायचे. यातून आम्हांला समृद्ध करणारा असा संवाद व्हायचा. जात, वर्ग, लिंगभावी आकलनाचे क्षेत्र विस्तारत जायचे.

विलास सोनावणे यांचे राजकीय स्वप्न मोठे होते. आणीबाणीच्या काळात त्यांनी नीला भागवत यांच्या घरी आसरा घेतला होता. नंतर त्यांना तुरुगवास भोगावा लागला. ग. प्र. प्रधान यांसारख्या मंडळींनी त्या वेळी त्यांना मदत केली होती. एकीकडे समाजवादी, गांधीवादी मंडळींशी त्याचा संपर्क होता, त्याच वेळी नेपाळच्या प्रचंडाशीही ते संवादी होते.

मला आठवतेय की, माझी आजी ही हैदराबाद, बिदर भागातली. तर आजोबा हे उर्दूचे विशेषज्ञ म्हणून काम करत होते. त्यामुळे मुस्लिमांचे जीवन हे वेगळे वाटत नव्हते. उर्दू ही साहित्याची भाषा म्हणून जवळची वाटत होती. त्याच वेळी शेती व्यवसायातील उत्पादक मुस्लीम शेतकऱ्यांची अस्सल मराठी भाषा ही आश्चर्याचा भाग नव्हती. मुस्लीम समुदाय म्हणून त्यांना भाषेच्या राजकारणातून अलग-थलग पाडले गेले नव्हते. विलास सोनावणे यांच्या मुस्लीम प्रश्नासंदर्भातील मांडणीमुळे हा सगळा अनुभव मला सत्याच्या स्वच्छ नजरेने पाहण्याचे बळ मिळाले.

त्या वेळीही लैंगिकतेच्या प्रश्नाकडे चळवळीत फारसे गांभीर्याने पाहिले जात नव्हते. एखादी स्त्री कोणासोबत एकटी प्रवास करत असेल किंवा बोलत असेल तर लगेचच त्याबद्दल चर्चा व्हायची आणि त्या स्त्रीच्या चारित्र्यावर संशय घेतला जायचा. त्यावर शर्मिला रेगे यांनी अशी भूमिका घेतली की, जे जे खाजगी ते ते राजकीय म्हणताना राजकीय बाबींचेच खाजगीत रूपांतर करणे योग्य नाही. त्यामुळे कुणाच्याही खाजगी संबंधांची चर्चा करणे योग्य नाही.

शर्मिला रेगे ह्या त्या वेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मांडणीचा जात आणि लिंगभावाच्या अनुषंगाने नवा अन्वयार्थ लावण्याचा प्रयत्न करत होत्या. बाबासाहेबांच्या ‘शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा’ या संदेशाचा त्यांनी अत्यंत सर्जनशील असा अर्थ लावलेला होता. त्यांच्या मते बाबासाहेबांच्या वरील संदेशाचा अर्थ असा होता की, शिकताना संघर्ष करा, संघर्ष करताना संघटित व्हा आणि संघटित होताना आलेल्या अनुभवातून पुन्हा शिका. शर्मिलाचा हा प्रयत्न मला आकलनाच्या दृष्टीने फार नवा वाटला. परंतु विलास सोनावणे यांची शर्मिलाच्या या कामाबद्दलची प्रतिक्रिया मात्र वेगळीच होती. त्यांच्या मते ते आंबेडकरांचे दैवतीकरण करणे होते. मार्क्स, फुले-आंबेडकर असे म्हणता म्हणता केवळ दलित अनुभवालाच जास्त महत्त्व देणे व समग्रतेत चिकित्सकपणे पाहण्याऐवजी आंबेडकरांचे एकसत्त्वीकरण करणे हे घातक आहे.

त्या एकूण चर्चेमध्ये कनिष्ठजातीय स्त्रियांच्या तिहेरी शोषणाचा मुद्दाही महत्त्वाचा होता. त्यामुळे साहजिकच त्या चर्चेतून दलित पितृसत्तेचा मुद्दा अधोरेखित होत होता. विलास सोनावणे यांचा त्यावरही टोकाचा मतभेद होता. विलास सोनावणे यांच्या मांडणीत पोलिटिकल इकॉनॉमीला महत्त्व असायचे. त्यामुळे जातिसंस्थेच्या पोलिटिकल इकॉनॉमीच्या आधारावर ते सेवा देणाऱ्या जाती आणि उत्पादन करणाऱ्या जाती यांच्या अनुभवांत फरक केला पाहिजे, असे म्हणत होते. काही उदाहरणे देऊन उत्पादन करणाऱ्या जातींमधील पुरुषप्रधानता कशी कमी आहे आणि त्यातील स्त्रीवादाच्या शक्यता स्त्री-अभ्यासात कशा दुर्लक्षित राहिल्या आहेत, यावर सोनावणे भर देत होते. त्यांच्या या बहुजन स्त्रीवादी मांडणीतील बराचसा भाग मला भालचंद्र नेमाडे यांच्या देशीवादी मांडणीच्या प्रभावात असल्यासारखा वाटतो. त्यातील काही मुद्दे लख्खपणे नवे दर्शन घडवणाऱ्या असल्या तरी बहुजन स्त्रीवादाची सबंध मांडणी प्रतिक्रियेच्या स्वरूपातील वाटत होती. स्त्री-अभ्यासातील पद्धती, शास्त्रीय योगदान विलास सोनावणे लक्षात घेत नाहीत असे जाणवत होते.

विलास सोनावणे यांचा कंपू नव्हता. एकीकडे त्यांच्या संपर्कात फक्रुद्दीन बेन्नूर होते, तर दुसरीकडे यशवंत सुमंत होते. परंतु त्या यादीमध्ये ज्ञानाच्या अंगाने पुढे जाऊ पाहणाऱ्या स्त्रिया आपल्याला दिसत नाहीत. त्यांच्या खाजगी जगण्याचा कप्पाही बंद होता. मुस्लीम मराठी साहित्य संमेलन, सकल साहित्य संमेलन असे वेगवेगळे राजकीय मंच उभारत नवनव्या अभ्यासक तरुणांना विलास सोनावणे जोडत होते. जात आणि धर्माच्या एकसत्त्वी आकलनाची मर्यादा फोडण्याचे त्यांचे योगदान महत्त्वाचे वाटत असतानाच पुरुषसत्तेचे ‘मोनोलिथ’ फोडण्याची गरज त्यांच्यासोबत असलेल्या संवादातून जाणवत होती. अतिशय गतीचे आणि झंजावाती आयुष्य जगात होते. या झंजावातात त्यांचे त्यांच्या कुटुंबीयांशी असणारे नाते, मित्र-मैत्रिणींशी असणारे नाते यांचा त्यांनी फारसा खोलात विचार केला नाही असे वाटते. मुस्लीम ओबीसी चळवळीचे काम जोरात सुरू असताना शबाना वारणेसारखी मुलगी ही कृतिशीलपणे चळवळीशी जोडली गेली होती. तिच्यात व्यावहारिक आणि वैचारिक नेतृत्व करण्याची क्षमता होती. तिच्याशी माझा चांगला संवाद होता. एकदा मला ती म्हणाली, ‘‘मला आता ही दगदग, ताणतणाव काहीही नको आहे. मला आता शांत जगायचे आहे.’’ नंतर तिने एका हिंदू मित्राशी लग्न केले आणि ती संसारात रमली. चळवळीत नेतृत्वाची क्षमता असणारी शबाना या निर्णयाप्रत का आली? माझ्या मते चळवळीने तेव्हा लिंगभावाचा गांभीर्याने विचार केला नाही. विलाससारख्या नेतृत्वाने लिंगभावाचा विचार गांभीर्याने करावा असे मला वाटत होते. शबानासारख्या चळवळीत धडपडणाऱ्या कितीतरी मुलींना त्यामुळे ठामपणे उभे राहण्याचे बळ मिळाले असते.

त्याच वेळी विलास सोनावणे यांनी चळवळीतील त्या त्या जातीतील स्त्रियांना पारंपरिक खुणा ह्या अस्मिता म्हणून वापरण्यास प्रोत्साहन दिले. मला आठवतेय, आगरी कोळी समाजातील स्त्रियांच्या कानांतील मोठी आभूषणे, त्यांचे विशिष्ट पद्धतीचे पेहराव यांतून त्यांच्या अस्मितेला प्रोत्साहन दिले गेले. म्हणजे ज्या प्रतीकांमधून बाई घडते त्या प्रतीकांमधूनच स्त्रियांकडे पाहिले गेले. या मुद्द्यावर आमची चांगलीच वादावादी होऊ लागली. खारखंड समाजातील स्त्रिया किंवा समुद्रात जाळी टाकून मासेमारी करणाऱ्या कोळी समाजाच्या सर्वच स्त्रिया तशा पद्धतीने प्रतीकात्मक जगतात का? त्यांचे आधुनिकीकरण आणि व्यक्ती होणे याबद्दल विलास सोनावणे यांना काय वाटते, असे प्रश्न माझ्या मनात निर्माण होत होते आणि निराशा वाढत होती.

जातीचा पोशाख, चिन्हे आणि त्यातून त्या स्त्रीची नवी ओळख उभी करण्यातील धोका लिंगभावाच्या अंगाने समजून घेण्याकडे विलास यांनी दुर्लक्ष केले होते. स्त्री-अभ्यास केंद्राचे काम करताना आम्हांला मात्र असे दिसत होते की, कोळी समाजातील स्त्रिया काय किंवा विद्यापीठातील विद्यार्थिनी काय- या जातींच्या प्रतीकात्मक ओळखींपेक्षा स्वतंत्र व्यक्ती होण्यासाठी धडपडत होत्या.

नंतरच्या काळातही डाऊ केमिकल कंपनीच्या विरोधातील आंदोलनात विलास सोनावणे यांनी बंडातात्या कराडकर यांचे नेतृत्व पुढे आणले. परंतु मुक्ताबाई, जनाबाई यांचे विचार सांगत पुढे आलेले स्त्रीनेतृत्व घडवल्याचे दिसत नाही. इथे त्याचे पुरुष असणे आणि त्यातून दृष्टिकोन घडणे हे नाकारता येणार नाही. चळवळीत पुरुषी नेतृत्वाची स्पर्धा तेव्हाही होती आणि आजही दिसते. त्यामुळे सतत एकमेकांबद्दल संशय बाळगून आपापल्या संघटनांच्या हद्दी सुरक्षित करण्यावर भर राहिल्याचे दिसते. साहजिकच त्यातून समविचारी मित्र-मैत्रिणींशी आवश्यक असलेला संवाद घडला नाही. विलास सोनावणे यांनी अतिशय थक्क करणारे काही प्रयोग केले; परंतु संवादाच्या अभावात ते एकारले गेले.

यासोबतच मला आणखी एक मुद्दा या निमित्ताने अधोरेखित करणे गरजेचे वाटते आणि तो मुद्दा आहे, कुटुंब या संकल्पनेचा मर्यादित राहिलेला अर्थ. चळवळीतील मित्र-मैत्रिणींच्या आयुष्यांत सतत काही ना काही उलथापालथी घडत असतात. अशा नाजूक काळात त्यांना कोणाची मदत होते? पारंपरिक चौकट नाकारण्यासाठी त्यांच्यापाशी काय पर्याय असतो? अशा प्रश्नांचा विचार केला, तर व्यापक अशा पर्यायी कुटुंबांचा आपल्याला विचार करावा लागेल. विलास सोनावणे आणि त्यांच्या सबंध काळाचीच मर्यादा म्हणून आपल्याला हा मुद्दा आजतरी अतिशय गांभीर्याने लक्षात घ्यावा लागेल.

जात-वर्गीय गुंतागुंत काळाच्या पुढे जाऊन समजून घेत अतिशय कल्पक चळवळ करणारे विलास सोनावणे नंतर नंतर मला लिंगभावाच्या संदर्भात चुकीचे वाटू लागले. ‘‘आम्ही विद्यापीठीय डिग्रया महत्त्वाच्या मानत नाही, त्यापेक्षा एखादा विचार संपूर्णपणे पचवणे महत्त्वाचे मानतो’’, असे म्हणत प्रमुख प्रवाही ज्ञानव्यवहार पूर्णतः नाकारणारा विलास दुसऱ्या टोकाचा अहंकार जपत आहे का असा प्रश्न पडला. चेहऱ्यावर सुरकुत्या पडलेली वयस्कर बाई त्याने त्याच्या ‘बहुजन स्त्रीवाद’ या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर नेतृत्वाची प्रतिनिधी म्हणून दाखवली. एका अर्थाने त्या बाईची लैंगिकता जात पितृसत्तेच्या दृष्टीने चिंतेची बाब उरलेली नसताना तिच्या ठायी विलास सोनावणे यांनी कल्पिलेले नेतृत्व हे लिंगभाव या कोटिक्रमाची गांभीर्याने दखल न घेण्याचीच परिणती होती. त्या मांडणीत  विलास यांनी अधोरेखित केलेला स्त्रीवादी चळवळीतील ब्राह्मणी नेतृत्वाचा मुद्दा महत्त्वाचा होता. परंतु त्यामुळे त्यांनीही चळवळीतील ब्राह्मण स्त्रियांच्या प्रतिक्रियेत नकाराचे टोक गाठणे हे योग्य नव्हते.

वयाच्या उत्तरार्धाच्या अगदी सुरुवातीच्या टप्प्यावर त्यांना पार्किन्सनसारख्या आजाराने गाठले. हळूहळू शक्ती जात राहिली आणि अखेरीला त्यांची धारदार वाचाही मंद झाली. माझ्यापेक्षा वयाने लहान असलेल्या या मित्राने जीवघेणा त्रास सोसत अखेरचा श्वास घेतला. जवळच्या मित्राचे असे कायमचे दूर जाणे, त्याच्या मृत्युपश्चात त्याच्यावर आठवणपर लेख लिहिण्याची माझ्यावर वेळ येणे हे सगळे वेदनादायक आहे. परंतु या वेदनेतही त्याच्याशीचा संवाद निदान मी माझ्या पातळीवर जिवंत ठेवला आहे हीच एक समाधानाची बाब.

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

विद्युत भागवत,  पुणे

स्त्रीवादी लेखिका, साहित्यिका आणि महाराष्ट्रातील स्त्री चळवळीतील कार्यकर्त्या 


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके