डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

गुरुवर्य रवींद्रनाथ टागोर यांचे निधन 1941 मध्ये ऑगस्ट महिन्यात झाले. त्यानंतर त्यांच्या स्मरणार्थ विश्वभारती विद्यापीठात रवींद्र-भवन नावाची एक मोठी इमारत उभी केली गेली. तिथे रवींद्रनाथांनी लिहिलेल्या सर्व कविता, कथा, लेख, ग्रंथ, पत्रे आणि त्यांची चित्रे यांच्या मूळ प्रती व हस्तलिखिते ठेवलेली आहेत. त्यामुळे या रवींद्र-भवनात देशोदेशीचे अनेक अभ्यासक गर्दी करतात. औपचारिक शिक्षणासोबत लोकसंवाद, लोकसंस्कृती, निसर्गप्रेम, मानवतावाद आणि विश्वशांती यांची बीजे रुजवू पाहणाऱ्या रवींद्रनाथांचे तत्त्वज्ञान तेथील काही धर्मवादी संघटना आणि व्यक्तींना मान्य नव्हते. त्या संघटना, व्यक्ती यांच्या दबावाखाली विश्वभारती विद्यापीठाच्या सध्याच्या कुलगुरूंनी वसंत-उत्सव आणि पौष-मेळा हे दोन उत्सव बंद करण्याचा निर्णय घेतला. या अनिष्ट निर्णयांमुळे शताब्दीच्या उंबरठ्यावर असणाऱ्या या विद्यापीठाच्या उद्दिष्टांनाच ग्रहण लागले आहे.

गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी ‘शांतिनिकेतन’ येथे स्थापन केलेल्या ‘विश्वभारती’ विद्यापीठाला यंदा शंभर वर्षे पूर्ण होतात. त्याच्या शताब्दी-महोत्सवाची सुरुवात येत्या डिसेंबर 2020 महिन्यापासून होणार आहे. नेमक्या या शताब्दी वर्षातच या विश्वभारती विद्यापीठाचे सध्याचे कुलगुरू विद्युत्‌ चक्रवर्ती यांनी एक खळबळजनक घोषणा केलेली आहे. त्यांनी म्हटले आहे की, या विद्यापीठातर्फे वर्षानुवर्षे साजरे होणारे लोकप्रिय असे वसंत-उत्सव आणि पौष-मेळा हे दोन उत्सव ह्या वर्षापासून बंद केले जात आहेत! वसंत-उत्सव हा गुरुदेव रवींद्रनाथांनी वसंत ऋतूच्या आगमनाप्रीत्यर्थ सुरू केलेला उत्सव होय. विश्वभारती विद्यापीठाचे अबीर-गुलाल कपाळी लावलेले छात्र आणि आसपासच्या संथाळ वस्त्यांतील कलावंत लोक या उत्सवात सामील होत असतात. गेल्या सुमारे 80 वर्षांपासून साजऱ्या  होणाऱ्या ह्या उत्सवाची सुरुवात रवींद्र-संगीताने होते. त्यानंतर तिथे असणाऱ्या अमरकुंज वृक्षाखाली, विद्यार्थी-वसतिगृहांत, संगीतभवनात, कलाभवनात आणि खेळांच्या मैदानांवर- असे सगळीकडे संगीत, नृत्ये व नाट्ये यांचे कार्यक्रम होतात. 

या कार्यक्रमांना अवघ्या देशभरांतले आणि जगातील विविध जाती-धर्मांचे, वर्ण-वर्गांचे लोक प्रेक्षक, कलावंत म्हणून उपस्थित राहतात. याचसाठी हा वसंत-उत्सव विश्वबंधुत्व आणि संस्कृतिसंवर्धन यांचा संदेश देणारा महत्त्वाचा कार्यक्रम मानला जातो. तसेच पौष-मेळा हादेखील येथे एक ऐतिहासिक महत्त्वाचा कार्यक्रम आहे. लाहोरमध्ये पंडित नवीनचंद्र रॉय यांनी सनातन हिंदू समाजातील कर्मकांड, वर्णभेद, अस्पृश्यता, सतीची प्रथा अशा अनिष्ट रूढी नष्ट करून धर्मसुधारणा करण्यासाठी ब्राह्मो समाजाची निर्मिती 1861 मध्ये केली. मग 1863 मध्ये महर्षी देवेन्द्रनाथ टागोर यांनी पौष-सप्तमीच्या दिवशी ब्राह्मो समाजाची दीक्षा घेतली. तेव्हापासून शांतिनिकेतनमध्ये प्रत्येक पौष-सप्तमीला पौष-मेळा साजरा होऊ लागला. या मेळ्याची सुरुवात प्रात:काळी सनईच्या स्वरांनी होते. नंतर स्थानिक कलाकारांचा एक वैतालिक नावाचा ग्रुप या आश्रमातील विश्वभारती, शांतिनिकेतन, श्रीनिकेतन, उत्तरायण संकुल या सर्व जागी फिरून वेगवेगळी गीते सादर करतो. अखेर छत्तीमताल या वनराईत होणाऱ्या प्रार्थनेने या पौष-मेळ्याची सांगता होते. या पौष-मेळ्यात दारोदारी फिरून लोकगीते गाणारे बावल, भुटिया, खारिया, गारो वगैरे भटक्या जमातींचे गायक, संथाळ जमातीचे नर्तक व नर्तिका आणि कित्येक विद्यार्थी कलाकार हे सलग तीन दिवस आपल्या कला सादर करतात. आसपासच्या अनेक गांवातील रहिवासीही या उत्सवात त्यांच्या कलाकुसरीच्या हस्तकला उत्पादनांचे स्टॉल्स लावतात.

ह्या विश्वभारती विद्यापीठात औपचारिक शिक्षणासोबत विद्यार्थ्यांना मानवता, विश्वबंधुत्व आणि सर्जनशीलता यांचे आदान-प्रदान प्राप्त व्हावे आणि निसर्गाच्या सान्निध्यात राहून ज्ञानसाधना करता यावी, ही गोष्ट गुरुदेव रवींद्रनाथ टागोरांच्या दृष्टीने महत्त्वाची होती. म्हणूनच चैत्र-वैशाखातला वसंत-उत्सव आणि हेमंत ऋतूतला पौष-मेळा हे उत्सव साजरे करण्यास तिथे आगळे महत्त्व प्राप्त झालेले होते. शांतिनिकेतन ज्या वंग-भूमीत स्थापन झाले, त्या भूमीचा सांस्कृतिक वारसा जगापुढे मांडणारे हे दोन उत्सव होते. म्हणूनच आता विश्वभारती विद्यापीठाची कुवत नाही, हे कारण सांगून हे दोन्ही उत्सव रद्द करण्याचा निर्णय तिथल्या कुलगुरूंनी घेतल्यामुळे या विद्यापीठाच्या मूळ उद्देशालाच तडा गेला आहे, असे अनेक विश्लेषकांचे म्हणणे आहे. तसेच ‘विश्वभारती’च्या ज्या मैदानांवर हे उत्सव साजरे होतात, त्यांभोवती एक उंच भिंत बांधून विद्यापीठाचे सभोवतालच्या परिसराशी असलेले नाते तोडण्याच्या कुलगुरूंच्या निर्णयासही अनेक लोकांनी आक्षेप घेतलेला आहे. 

रवींद्रनाथांची कर्मभूमी असणाऱ्या शांतिनिकेतनला भेट देता येणे हा माझ्या आयुष्यातला एक अपूर्व योग होता. त्यासाठी कोलकाता शहरापासून सुमारे 162 कि.मी. अंतरावरील बोलपूर (जिल्हा बीरभूम) येथे जावे लागते. ह्या प्रवासात बर्दवानपासून शांतिनिकेतनपर्यंतचा संपूर्ण रस्ता हा हिरव्यागार वृक्षांच्या दुतर्फा रांगांनी सजलेला दिसतो. फार पूर्वी इसवी सन 1863 मध्ये गुरुवर्य रवींद्रनाथांचे पिता महर्षी देवेन्द्रनाथजी टागोर यांनी बोलपूर गावानजीक एका निसर्गरम्य स्थळी वीस एकर शेतजमीन कायम भाडे-तत्त्वावर घेतली होती. तिच्या उत्तर व दक्षिण दिशांना अजय आणि कोपयी नावाच्या दोन नद्या वाहत होत्या. त्या जागेत महर्षी देवेंद्रनाथांनी एक आश्रमसंकुल निर्माण केले आणि तिथे एक छोटेसे गेस्टहाऊस बांधून त्याचे नाव ‘शांतिनिकेतन गृह’ असे ठेवले. तिथे एक ‘ब्रह्म विद्यालय’ स्थापन करण्याचा त्यांचा मानस होता. पुढे तो संपूर्ण परिसरच शांतिनिकेतन ह्या नावाने ओळखला जाऊ लागला.

स्वत: रवींद्रनाथ हे 1873 मध्ये त्यांच्या वयाच्या 12 व्या वर्षी तिथे प्रथम गेले. त्यांनी 1901 मध्ये तिथे ‘ब्रह्मचर्याश्रम’ स्थापन केला. पुढे 1925 नंतर त्याचे नामकरण ‘पथभवन’ असे झाले. या पथभवनात नंदलाल बोस ह्या चित्रकाराची काही सुरेख भित्तिचित्रे आहेत. त्या रम्य जागेत राहून गुरुवर्य रवींद्रनाथ टागोरांनी गद्यलेखन, काव्यलेखन, संगीत, चित्रकला, शिल्पकला अशा निरनिराळ्या अभिजात कलांची उपासना सुरू केली. वयाच्या अवघ्या सतराव्या वर्षी त्यांनी भानुसिंह ठाकूर पद-बाली नावाचा त्यांचा पहिला काव्यसंग्रह ब्रज भाषेत प्रकाशित केला. हा संग्रह त्यांनी ‘भानुसिंह’ या टोपणनावाने लिहिला होता. या पहिल्याच काव्यसंग्रहाने एक श्रेष्ठ कवी म्हणून त्यांची ख्याती साऱ्या जगभर पसरली. त्यानंतरच्या काळात मात्र त्यांनी त्यांच्या साऱ्या कविता, कथा आणि नाटके ही खऱ्या नावाने प्रसिद्ध केली. वाल्मीकी-प्रतिभा, डाकघर, चांडालिका, रक्तकरबी ही नाटके; भिकारिणी, गल्पगुच्छ, काबुलीवाला, क्षुधित पाषाण यांसारख्या अनेक कथा; गोरा, घरे-बाहेरे, चतुरंग, नौकाडुबी इत्यादी कादंबऱ्या आणि मानसी, सोनार तोरी, बलाक, गीतांजली असे अनेक काव्यसंग्रह शांतिनिकेतनात राहून रवींद्रनाथांनी लिहिले. गीतांजली या त्यांच्या काव्यसंग्रहासाठी त्यांना साहित्याचा जागतिक प्रतिष्ठेचा नोबेल पुरस्कार 1913 मध्ये मिळाला. स्वतंत्र भारताने राष्ट्रगीत म्हणून स्वीकारलेले ‘जनगणमन अधिनायक जय हे, भारत भाग्यविधाता’ हे गीत गुरुवर्य रवींद्रनाथ टागोरांनीच लिहिलेले आहे. तसेच 1971 मध्ये भारत-पाक युद्धानंतर स्वतंत्र राष्ट्र म्हणून उदय झालेल्या बांगलादेशाचे (जुन्या पूर्व पाकिस्तानचे) ‘आमार शोनार बांगला’ हे राष्ट्रगीतसुद्धा रवींद्रनाथांनीच 1909 मध्ये लिहिलेले गीत होय. या दोन्ही गीतांमुळे अवघ्या भरतखंडाचे टागोरांशी कायमचे नाते जोडले गेलेले आहे.  

रवींद्रनाथांच्या गीतलेखनावर वैष्णवी, सूफी आणि बांगला लेखनशैलीचा प्रभाव होता. त्यांनी आध्यात्मिक भक्तिसंगीत आणि जीवनवादी लोकसंगीत यांचा सुरेख मिलाफ असणारी जी संगीतशैली निर्माण केली, ती रवींद्र-संगीत म्हणून प्रसिद्ध झाली. महत्त्वाची गोष्ट ही की, त्या काळात प्रचलित असणाऱ्या सनातनी, रूढीग्रस्त व कर्मकांडवादी धार्मिक-सामाजिक परंपरांच्या विरोधात आंतरिक श्रद्धा, आत्मिक भक्ती आणि जीवनवादी परंपरांचा पुरस्कार करणारे काव्य त्यांनी लिहिले. नंतर 1921 मध्ये त्यांनी शांतिनिकेतनात विश्वभारती विद्यापीठ स्थापन केले. विश्वभारती, शांतिनिकेतन आणि श्रीनिकेतन ह्या तीन पीठांद्वारे तिथे साहित्य-शास्त्र-कला शिक्षण, संस्कृतिसंवर्धन, मानवता, विश्वशांती आणि निसर्गरक्षण यांची जोपासना त्यांनी सुरू ठेवली. या संकुलात ‘देहाली’ नावाच्या एका छोट्या घरात स्वत: गुरुदेव रवींद्रनाथ हे त्यांची पत्नी मृणालिनीदेवी यांच्यासह राहत असत. परंतु नंतर ते शांतिनिकेतनगृहात राहावयास गेले. देहालीसोबतच तिथे संतोषालय, सिंहसदन, द्विजविराम, दिनांतिका, पंथशाला अशा अनेक निवासिका उभ्या केलेल्या आहेत.

या शांतिनिकेतनात छत्तीमताल नावाची एक वनराई आहे. तिथे प्रथमपासून जे दोन सप्तपर्णी वृक्ष होते, त्यांना बंगाली भाषेत ‘छत्तिम’ वृक्ष असे म्हणत. त्यांतल्याच एका मोठ्या वृक्षाखाली रवींद्रनाथांचे पिता महर्षी देवेन्द्रनाथ हे ध्यानधारणेसाठी बसत. कालांतराने या छत्तीम वृक्षांची संख्या तिथे वाढत गेली आणि त्यातूनच छत्तीमताल वनराई तयार झाली. अवती-भवतीच्या निसर्गाशी तादात्म्य राखता यावे, ह्या उद्देशाने गुरुदेव रवींद्रनाथ हे आपल्या विद्यार्थ्यांचे वर्ग या छत्तीमतालामधील वृक्षांखालीच घेत असत. आजही शांतिनिकेतनातले वर्ग त्या वृक्षांखालीच होत असतात. त्या जागेत एक ‘उपासनागृह’देखील बांधण्यात आलेले आहे. रंगीबेरंगी काचांचे सुरेख छत, चारही बाजूंना संगमरवरी पायऱ्या असलेल्या या उपासनागृहात दररोजची सायंकालीन प्रार्थना होत असते. विश्वभारती विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात पदवी घेणाऱ्या छात्रांना पदवीसोबत या सप्तपर्णी वृक्षांचीच रोपे दिली जातात. कलाभवन नावाची मातीत बांधलेली, काळ्या रंगाची एक निवासी इमारत तिथे आहे.

या कलाभवनच्या भिंतींवर बाहेरच्या बाजूने सुरेख भित्तिचित्रे कोरलेली आहेत. प्रत्येक इमारतीला तिचा स्वत:चा एक वैशिष्ट्यपूर्ण इतिहास आहे. तिथल्या विश्वभारती विद्यापीठात विविध भाषा, कला, इतिहास, संगीत, संस्कृती, तत्त्वज्ञान इत्यादी मानवी शास्त्रांचे अध्यापन-अध्ययन होत असते. शांतिनिकेतनचा संपूर्ण परिसर विविध प्रकारची चित्रे, शिल्पे आणि भित्तिशिल्पे यांनी व्यापलेला आहे. इथल्या सुंदर हिरव्यागार प्रांगणाला कुंपणाची भिंत हेतुपुरस्सर बांधलेली नव्हती. कारण गुरुदेव टागोर यांना वाटत असे की, ह्या परिसराभोवतीच्या सर्व जनसमूहांशी आणि त्यांतील स्त्री-पुरुषांशी विद्यार्थ्यांचे भावनिक व वैचारिक नाते जोडले जायला हवे. त्या परिसराला लागून संथाळ जमातीच्या अनेक वस्त्या आहेत. त्या आदिवासींच्या जगण्याच्या पद्धती, साधने, भाव-भावना यांची ओळख विद्यार्थ्यांना व्हावी या हेतूनेच त्यांनी शांतिनिकेतन, श्रीनिकेतन, विश्वभारती या संस्था कुंपण-विरहित ठेवलेल्या होत्या. याच जागेत उत्तर दिशेला रवींद्रनाथांनीच उभे केलेले एक उत्तरायण संकुल आहे. तिथे उदयन, श्यामली, कोणार्क, उडिची आणि पुनश्च ही पाच घरे आहेत. त्यातील श्यामली आणि कोणार्क या मातीच्या घरांवर शांतिनिकेतनमधील विद्यार्थ्यांनी कोरलेली सुरेख भित्तिचित्रे आहेत. ही सर्व घरे बंगालमधील ऐतिहासिक बोरोबुदूर या वास्तुशैलीत बांधली गेली आहेत.

गुरुवर्य रवींद्रनाथ टागोर यांचे निधन 1941 मध्ये ऑगस्ट महिन्यात झाले. त्यानंतर त्यांच्या स्मरणार्थ विश्वभारती विद्यापीठात रवींद्र-भवन नावाची एक मोठी इमारत उभी केली गेली. तिथे रवींद्रनाथांनी लिहिलेल्या सर्व कविता, कथा, लेख, ग्रंथ, पत्रे आणि त्यांची चित्रे यांच्या मूळ प्रती व हस्तलिखिते ठेवलेली आहेत. त्याशिवाय गुरुदेवांनी संग्रहित केलेले सुमारे चाळीस हजार ग्रंथ आणि बारा हजार नियतकालिकेही तिथे सुरक्षित ठेवलेली आहेत. त्यामुळे या रवींद्र-भवनात देशोदेशीचे अनेक अभ्यासक नेहमी गर्दी करून असतात. औपचारिक शिक्षणासोबत लोकसंवाद, लोकसंस्कृती, निसर्गप्रेम, मानवतावाद आणि विश्वशांती यांची बीजे रुजवू पाहणाऱ्या रवींद्रनाथांचे तत्त्वज्ञान तेथील काही धर्मवादी संघटना आणि व्यक्तींना मान्य नव्हते. त्या संघटना, व्यक्ती यांच्या दबावाखाली विश्वभारती विद्यापीठाच्या सध्याच्या कुलगुरूंनी वसंत-उत्सव आणि पौष-मेळा हे दोन उत्सव बंद करण्याचा निर्णय घेतला. या अनिष्ट निर्णयांमुळे शताब्दीच्या उंबरठ्यावर असणाऱ्या या विद्यापीठाच्या उद्दिष्टांनाच ग्रहण लागले आहे. विशेष म्हणजे, हे उत्सव रद्द करण्याचा हा जो निर्णय विद्यापीठाचे कुलगुरू आणि त्यांच्या कार्यकारिणीने घेतला, त्याची पुसटशी कल्पनाही शांतिनिकेतनच्या न्यास-मंडळाला दिली नव्हती. 

सुमारे सव्वाशे वर्षांपूर्वी सुरू केलेले हे उत्सव आर्थिक अडचणीमुळे आणि विद्यापीठावर पडणाऱ्या कामाच्या जादा बोजामुळे रद्द केले, असे कुलगुरू म्हणतात. पण ते रद्द करण्याऐवजी खर्च आणि काम यांचे समसमान वाटप शांतिनिकेतन न्यास, प.बंगाल राज्य सरकार व विश्वभारती विद्यापीठ यांमध्ये व्हावे आणि हे उत्सव सुरू ठेवले जावेत, अशा सूचना अनेकांनी केल्या. परंतु त्यांची दखल न घेता कुलगुरूंनी ते उत्सव रद्द करून विद्यापीठ प्रांगणाभोवती भिंत बांधण्याचे काम सुरू केले. ते पाहून बोलपूरमधील काही संतप्त नागरिकांनी आणि विद्यार्थ्यांनी जाऊन भिंतीचे ते बांधकाम तोडून टाकले. त्यानंतर तिथे दंगल माजली, त्यामुळे सध्या गुरुदेव रवींद्रनाथांचे हे विश्वभारती विद्यापीठ अनिश्चित काळासाठी बंद करावे लागले आहे. हा सगळा प्रकार मोठा दुर्दैवी होय. गुरुदेव रवींद्रनाथ टागोरांच्या तत्त्वज्ञानाला विरोध करणे, त्यांनी  सुरू केलेले वसंत-उत्सव व पौष-मेळा हे उत्सव रद्द करणे, विद्यापीठाभोवती मोठी भिंत बांधून जनसंपर्काची व जनसंवादाची संस्थेची परंपरा मोडीत काढणे आणि विद्यापीठीय आधुनिकीकरणासाठी आर्थिक साह्य मिळवण्यासाठी कॉर्पोरेट क्षेत्राला शांतिनिकेतनात आमंत्रित करणे- या गोष्टींमुळे या आगळ्या-वेगळ्या संस्कारकेंद्राचा आत्माच काढून घेतला जाणार आहे. शैक्षणिक, सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रांतील तज्ज्ञांनी याची दखल घेणे आवश्यक आहे.
 

Tags: विजय दिवाण गीतांजली शांतिनिकेतन विश्वभारती विद्यापीठ रवींद्रनाथ टागोर vijay diwan ravindranath tagore weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

विजय दिवाण

सामाजिक कार्यकर्ता

 


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके