डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

हिंदी सिनेमाच्या रूपात अनेक वेळा बदल झाले, अनेक स्थित्यंतरे आली. ठराविक अंतराने हिंदी सिनेात बदलाचे वारे वाहू लागतात. साठच्या दशकात मृणाल सेन यांचा ‘भुवन शो’, मणी कौलचा ‘उसकी रोटी’ हे चित्रपट आले आणि ‘नव्या सिनेमा’ची मुहूर्तमेढ रोवली गेली. सत्तरच्या दशकात ‘दीवार’ व ‘शोले’ हे चित्रपट आले व पुन्हा सिनेमाचा चेहरामोहरा बदलला. कलेच्या नवनवोन्मेष शालिनी रूपाची ही खूणच आहे. जुने मागे पडत असले तरी त्यातले काही टिकून राहते, नवे त्यात मिसळत जाते व एक नवेच संयुग तयार होऊन कलेचा प्रवाह अविरत चालू राहतो. अंदाज, बरसात आणि महल या तीन चित्रपटांमुळे 1949 हे वर्ष असेच पहिले मन्वंतर वर्ष म्हणून सिनेइतिहासात कायम नोंदवले गेले आहे.  

1947 साली भारताला स्वातंत्र्य मिळाले आणि एका नव्या युगाचा प्रारंभ झाला. आपल्या देशाच्या इतिहासातील ही अत्यंत महत्त्वाची घटना होती व तिचे परिणाम समाजाच्या साऱ्याच अंगांवर होणे स्वाभाविक होते. केवळ एक राजवट संपली व दुसरी सुरू झाली एवढ्यापुरते हे संक्रमण मर्यादित नव्हते. जीवनाची दिशा बदलली होती, उद्दिष्टे बदलली होती, स्वप्ने बदलली होती, मार्गही बदलले होते. स्वातंत्र्य मिळाले ही आनंदाची गोष्ट होतीच, पण आपली जबाबदारीदेखील वाढली होती. आजवर इंग्रजांनी दाखविलेल्या मार्गावरून आपण निमूटपणे चालत होतो, आता आपला मार्ग आपल्याला ठरवावा लागणार होता. योग्य, अयोग्य, चांगले-वाईट यांचे निकष बदलले होते. नवे निकषही आपल्याला ठरवायचे होते. आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रांत या काळात मोठे बदल होण्यास सुरुवात झाली, त्याचप्रमाणे कलेच्या क्षेत्रातही ह्या बदलाच्या पाऊलखुणा दिसू लागल्या.

हिंदी चित्रपटाचे विश्वही याला अपवाद कसे असेल? सिनेमा बोलका होऊन सोळा वर्षे झाली होती. प्रादेशिक भाषांत जरी उत्तम चित्रपटनिर्मिती होत होती तरी प्रामुख्याने हिंदी सिनेमा हाच खऱ्या अर्थाने भारतीय चित्रपटसृष्टीचे प्रतिनिधित्व करीत होता. भारताच्या एकात्मतेत हिंदी सिनेमाचे स्थान दुर्लक्षिले गेले असले तरी त्याचा वाटा नाकारता येणार नाही. आसेतुहिमाचल हा भारत देश जोडण्याच्या प्रक्रियेतील खारीचा वाटा हिंदी सिनेाने उचलला होता हे मान्य करावे लागते. महाराष्ट्रात निर्माण होणारा चित्रपट बंगालमध्ये आवडीने पाहिला जात होता व बंगालमधील चित्रपटाला येथे दाद दिली जात होती. विशेष म्हणजे हा एका प्रदेशाचा सिनेमा नसून तो भारतीय सिनेमा आहे ही भावनाही निर्माण होऊ लागली होती. या पोर्शभूीवर भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर हिंदी सिनेाच्या एकंदर रूपात जे बदल झाले त्यांची नोंद घेणे ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचे आहे.

1947 च्या ऑगस्ट महिन्यात आपल्याला स्वातंत्र्य मिळाले. त्यानंतरचा एक दीड वर्षाचा काळ मोठा धामधुमीचा होता. 1949 साली हिंदीत तीन अभिजात चित्रपट प्रदर्शित झाले आणि त्यांनी सिनेमाचा चेहरामोहरा तर बदललाच पण भावी सिनेमवरदेखील त्यांचा फार मोठा परिणाम झाला. पण या सिनेमांच्या तपशिलात जाण्यापूर्वी स्वातंत्र्यपूर्व काळातील हिंदी सिनेाचे स्वरूप पाहिले पाहिजे. 1931 साली ‘आलम आरा’ प्रदर्शित झाला व मूकपट बोलू लागले. तंत्रातल्या ह्या क्रांतीमुळे सिनेमाच्या मूलभूत स्वरूपात आमूलाग्र बदल झाले. ज्या भावना केवळ भाषेतूनच व्यक्त होऊ शकतात त्यांना आता मुक्त अभिव्यक्ती मिळाली. मात्र मूकपटाकडून बोलपटाकडे झालेला हा प्रवास ही प्रगती नसून अधोगती आहे, असे मतही त्या काळी काहीजणांनी व्यक्त केले होते. परंतु जनसामान्याला हा बदल भावला, आवडला.

बोलपटांची लोकप्रियता एवढी वाढली की दोन तीन वर्षांतच मूकपटांची निर्मिती बंद झाली. सिनेा बोलू लागल्यामुळे आणखी एक गोष्ट झाली. सिनेाची भाषावार विभागणी झाली. अनेक प्रादेशिक भाषांत चित्रपट तयार होऊ लागले. मात्र त्यामुळे चित्रपटावर बंधनेही आली. एका भाषेतला चित्रपट दुसऱ्या भाषिक प्रेक्षकाला समजणे कठीण जाऊ लागले. येथेच हिंदी सिनेमा बाजी मारून गेला. काही अपवाद वगळता हिंदी भारतभर समजत होती. त्यामुळे लवकरच हिंदी सिनेाची भारतीय सिनेा अशी ओळख निर्माण झाली. सुरुवातीला सिनेा निखळ रंजनवादी होता. ऐतिहासिक किंवा पौराणिक अथवा काल्पनिक कथानके, ट्रिक सीन आणि भरपूर गाणी असे सिनेाचे सर्वसाधारण स्वरूप होते. या चाकोरीतून बाहेर पडणारे ‘देवदास’, ‘आदमी’, ‘दुनिया न माने’, ‘मुक्ती’ असे काही उत्तम चित्रपट प्रदर्शित झाले खरे पण त्यांचे प्रमाण अल्प होते. 1940 नंतर तर अशा आशयघन चित्रपटांची संख्या अधिकच रोडावली.

याच सुमारास युरोपात दुसरे महायुध्द झाले व भारताचा त्यात प्रत्यक्ष सहभाग नसला तरी त्याचे परिणाम भारतीय जनतेलाही भोगावे लागलेच. काळा पैसा आणि त्याचे भीषण रूप प्रथमच जाणवू लागले होते. या पैशाला भुलून केवळ पैसा कमावणे हेच ज्यांचे उद्दिष्ट होते अशी अनेक धंदेवाईक माणसे सिनेात घुसली. त्यामुळे स्टुडिओ सिस्टीम मोडकळीला आली. सिनेव्यवसायातील शिस्त व सुसंस्कृतपणा यांना सुरुंग लागला. ‘प्रभात’ बंद पडली, ‘बॉम्बे टॉकीज’ बंद पडली. या सुारासच संगीताचे सिनेमातील महत्त्व बेसुार वाढले, परिणामी कथा व सादरीकरणाकडे मोठ्या प्रमाणावर दुर्लक्षच झाले. कसेही करून सिनेाला लोकप्रिय बनवायचे एवढेच उद्दिष्ट बहुतेक निर्मात्यांचे होते.

या काळात तुरळक चांगले प्रयत्न झाले नाहीत असे नाही (उदाहरणार्थ चेतन आनंदचा ‘नीचा नगर’ किंवा शांतारामबापूचा ‘डॉक्टर कोटणीस की अमर कहाणी’), पण सिनेजगतावर दीर्घकालीन छाप पाडण्यात ते यशस्वी ठरले नाहीत. या पोर्श्वभूीवर 1949 साली मेहबूब खान यांचा ‘अंदाज’, कमाल अमरोहींचा ‘महल’ व राज कपूरचा ‘बरसात’ हे तीन चित्रपट प्रदर्शित झाले व त्यांनी आपला केवळ ठसाच उमटविला असे नव्हे तर वेगवेगळ्या, स्वतंत्र वाटांनी हिंदी सिनेमाची पालखी पुढे नेली. या प्रत्येक चित्रपटापासून एक नवी परंपरा निर्माण झाली. गंतीची गोष्ट म्हणजे 1949 साली सर्वांत जास्त व्यवसाय करणारे चित्रपट क्रमाने, ‘बरसात’, ‘अंदाज’ व ‘महल’ हेच होते. तसे पाहू जाता 1949 साली प्रदर्शित झालेले बहुसंख्य चित्रपटही संगीतप्रधानच होते. ‘नमुना’, ‘दुलारी’, ‘एक थी लडकी’, ‘लाहोर’, ‘बडी बहन’ हे चित्रपट संगीतामुळेच गाजले. आणि संगीताव्यतिरिक्त त्यांत इतर काहीच नव्हते. वर उल्लेखिलेल्या तीनही चित्रपटांचे संगीत अतिशय गाजले, गाणी लोकप्रिय बनली. पण त्यांचे तेवढेच एक वैशिष्ट्य नव्हते. प्रत्येकाची काही खास बलस्थाने होती, वेगळेपण होते. नंतर आलेल्या अनेक दिग्दर्शकांनी त्यांचीच वाट पुसत आपला मार्ग शोधला, अनेकांनी तर त्यांचे अंधानुकरणही केले. नव्या वाटेने पाऊल टाकण्याचा पहिला यशस्वी प्रयत्न मेहबूब खान यांच्या ‘अंदाज’मध्ये दिसून आला.

1 –  

 ‘अंदाज’ची निर्मिती व दिग्दर्शन मेहबूब खान यांचे होते. 1909 साली एका गरीब घरात जन्मलेल्या रमझान खान या  नावाच्या, फारसे शालेय शिक्षण न मिळालेल्या मुलाने जिद्द व  परिश्रम आणि कल्पनाशक्ती यांच्या जोरावर एक विश्व कसे निर्माण केले याची कहाणी एखाद्या लोकप्रिय हिंदी सिनेमात शोभेल अशीच आहे. मुंबईला आल्यावर रमझानने मेहबूब खान हे नाव घेतले व तो चित्रपटात लहानसहान भूमिका करू लागला. हे करताना चित्रपट निर्मितीचे अनेक बारकावे त्याने शिकून घेतले. सागर मूव्हीटोनने मेहबूबना प्रथम दिग्दर्शनाची संधी दिली. ‘जजमेंट ऑफ अल्लाह’ हा त्यांचा पहिला सिनेमा. या सिनेमापासूनच कॅमेरामन फरदून ईराणी व मेहबूब खान ही जोडी जमली. यानंतर मेहबूब यांनी स्वत:ची ‘मेहबूब प्रोडक्शन्स’ ही संस्था काढून ‘औरत’, ‘रोटी’, ‘एक ही रास्ता’, अशा प्रभावी सिनेमांची निर्मिती केली. ‘औरत’चा रीमेक त्यानी 1957 साली ‘मदर इंडिया’ या नावाने केला. ‘अंदाज’ हा हिंदी चित्रपटसृष्टीतील आद्य प्रे-त्रिकोण म्हणून ओळखला जातो. यापूर्वी प्रेमाचे त्रिकोण पडद्यावर आले नाहीत असे नाही, पण या चित्रपटात प्रथमच दोन व्यक्तींवरील प्रेमात एका व्यक्तीची झालेली ओढाताण अत्यंत प्रभावीपणे मांडली होती. नीता (नर्गिस) ही धनाढ्य बापाची एकुलती एक मुलगी. वडिलांनी तिला धाकात न ठेवता मोकळेपणी जगू दिले, पण तिने त्याचा कधी गैरफायदा घेतला नाही. मात्र त्या काळच्या तुलनेत आधुनिक विचाराचे तिला अधिक आकर्षण होते. तरुण स्त्रीपुरुषांनी एकत्र येणे, क्लबमध्ये नृत्य करणे, एकमेकांशी मैत्री करणे तिला वावगे वाटत नाही. अशा वागण्याने समाज नावे ठेवील असे वडिलांचे म्हणणे असते, तर समाजापेक्षा आपल्या मनाचा कौल महत्त्वाचा अशी नीताची धारणा असते.

सिनेमाच्या सुरुवातीसच नीता आधुनिक पोशाखात घोड्यावरून रपेट मारण्यास सज्ज झालेली दिसते. अचानक तिचा घोडा उधळतो व दरीच्या दिशेने धावू लागतो. दिलीप (दिलीपकुमार) नावाचा तरुण तिला वाचवितो व या निमित्ताने त्यांची ओळख होते. भेटीगाठी सुरू होतात. नीताचा निरागस स्वभाव, तिचे मोहक लावण्य व वागण्यातील अवखळपणा याकडे आकर्षित होऊन दिलीप तिच्या प्रेमात पडतो. ती जरी त्याला प्रोत्साहन देत नसली तरी विरोधही करीत नाही. त्याची मैत्री, त्याचा सहवास तिला हवाहवासा वाटतो. नीताच्या वडिलांना तिचे हे वागणे पसंत नाही. ते आपली नाराजी स्पष्टपणे व्यक्त करतात. त्यांनी आतापर्यंत तिला तिच्या मनाप्रमाणे वागण्याचे स्वातंत्र्य दिले होते. आता त्यांना प्रश्न पडतो की आपण केले ते बरोबर केले का? त्यांचे समाधान कसे करावे हे नीताला कळत नाही पण ती त्यांना वचन देते, ‘तुच्या इभ्रतीला धक्का बसेल असे काही मी करणार नाही’.

एकदा नीताची मैत्रीण शीला हिच्याकडे पार्टी चालू असते. त्या प्रसंगी संधी साधून दिलीप आपल्या मनातील प्रेमभावना नीताला सांगू पाहतो, पण नेमका त्याच वेळी नीताच्या वडिलांना ह्रदयविकाराचा झटका आल्याचा फोन येतो. त्याच्या मनातल्या भावना मनातच राहतात. दिलीप व नीता घरी येऊन पाहतात तो नीताच्या वडिलांचे निधन झालेले असते. त्यांच्या पश्चात एवढा मोठा कारोबार सांभाळण्यासाठी नीता दिलीपची मदत घेते, त्याला इस्टेटीतील अर्धा भागीदारही बनविते. इथपर्यंत कथा संथ गतीने, नौशादच्या सुरेल संगीताच्या लयीत पुढे सरकत असते, ती आता अचानक एका वेगळ्या वळणावर येऊन ठेपते.

एके दिवशी लंडनहून राजन (राजकपूर) नावाचा तरुण परत येतो व दिलीपला (आणि प्रेक्षकांना) कळते की, हा नीताचा प्रियकर असून त्या दोघांचे पूर्वीच लग्न ठरले आहे. दिलीपच्या मनावर फार मोठा आघात होतो. दिग्दर्शक मेहबूब यांनी राजनला ज्या प्रकारे, मध्यंतराच्या जवळ, कथानकात आणले आहे, त्यातून त्यांचे रचनेतले कौशल्य दिसून येते. हे केवळ धक्कातंत्र नाही. प्रेक्षकांना प्रश्न पडतो की जर नीताचे राजनशी लग्न ठरले होते तर ती दिलीपशी प्रेमाचे नाटक करीत होती का? की हे तिच्यासाठी दोन घडीचे मनोरंजन होते?  मग प्रेक्षक  पुन्हा एकदा नीता व दिलीप यांच्यातील प्रसंग आठवू पाहतो, तेव्हा  त्याच्या लक्षात येते की नीताने दिलीपला कधीच उत्तेजन दिले नाही. कथा पुढे सरकताना प्रेक्षकाला मागचा विचार करायला लावणे हे दिग्दर्शकाचे कौशल्य. विशेष म्हणजे दिलीपलाही हेच प्रश्न पडतात व आता प्रेक्षक दिलीपच्या नजरेने पाहू लागतो.

दिलीपला हळूहळू सत्य कळू लागते, पण ते पचविणे त्याला जड जाते. नीताचे राजनशी लग्न ठरलेले आहे ही गोष्ट दिग्दर्शकाने आधीच सांगून टाकली असती तर नीताच्या वागण्याला फ्लर्टिंगचा- उथळ, सवंग प्रणयचेष्टांचावास लागला असता, शिवाय जिचे लग्न एकाशी ठरले आहे, तिने दुसऱ्याशी सलगी करणे भारतीय प्रेक्षकालाही पटले नसते. नीताच्या मनात दिलीपबद्दल प्रेम नाही, पण ती त्याला तोडूनही टाकू शकत नाही. ती त्याच्याशी मैत्रीच्या हळुवार बंधनाने जोडली गेली आहे. (दुर्दैवाने चित्रपटाच्या शेवटी ‘भारतीय प्राचीन परंपरेवर  आणि मूल्यांवर’ नको तेवढा जोर दिला गेल्याने ही कल्पना दबून  गेली) दिलीपला नीता आपली केवळ मित्र आहे हे पटत नाही. तसेच  राजनलाही, कारण तोही याच परंपरेत वाढला आहे. आपल्या  गैरहजेरीत नीताने कुणा दुसऱ्या तरुणाशी घनिष्ट मैत्री करावी व ही  बाब आपल्याला सांगूही नये हे त्याच्या मनाला झोंबत राहते. दोघांचे  लग्न झाले तरी त्यांच्यात दिलीप नावाची भिंत उभी असतेच.

अजूनही नीताला दिलीपबद्दल आपुलकी का वाटावी हे राजनला  कळत नाही, मात्र त्यापेक्षाही ही आपुलकी की आकर्षण हे कोडे  त्याला सुटत नाही. परिस्थिती अशी काही वळणे घेते की शोकांतिका  अपरिहार्य बनते.  मेहबूबनी उत्तरार्धात अतिशय प्रभावीपणे हा ताण वाढवीत  नेला आहे. ह्या तीन व्यक्तिरेखांचा त्यांनी जो विकास केला आहे  त्यातून त्यांचे मानसशास्त्राचे उत्तम आकलन दिसून येते. या तीनही व्यक्तिरेखा निरागस आहेत. दिलीपला आपल्या प्रेभंगाचे दु:ख आहे, तर राजनला विश्वासघाताचे. दोघेही आपल्यामुळे उद्‌ध्वस्त  होत आहेत हे नीताला कळते, पण ती असहाय आहे. आपण  दिलीपला वेळीच सारे का सांगितले नाही हा प्रश्न तिला छळतो. या लेखाच्या निमित्ताने ‘अंदाज’ पुन्हा पाहताना मला अल्बेर कामूच्या  Cross Purpose या नाटकाची आठवण झाली. ‘आपण आपली खरी ओळख दडवून ठेवतो व यातच शोकांतिकेची बीजे असतात’ हे त्या नाटकाचे मध्यवर्ती सूत्र आहे. ‘अंदाज’मध्ये नायिकेनेही ‘लग्न ठरलेली तरुणी’ ही आपली ओळख दडवून ठेवली नसती तर पुढला अनर्थ टळला असता. या त्रिकोणाला आणखी एक चौथा कोन आहे.

नीताची मैत्रीण शीलाही दिलीपवर प्रेमा करते, पण दिलीप मनाने नीतात एवढा गुंतलेला असतो की तो तिला प्रतिसाद देत नाही. मात्र शीलाच्या मनोव्यथेकडे दिग्दर्शकाने फारसे लक्ष दिले नाही. एकदा राजन व दिलीप यांचे कडाक्याचे भांडण होते. दिलीप बोलताबोलता म्हणून जातो. ‘तू तुझ्या पत्नीला ओळखत नाहीस.’ राजन याचा अर्थ वेगळाच घेतो, म्हणतो, ‘बरोबर आहे, तूच तिला जास्त ओळखतोस.’ शब्दाने शब्द वाढतो. राजन हातातील टेनिस रॅकेटने दिलीपवर वार करतो. दिलीप याचा बदला घेण्यासाठी नीताकडे येतो तेव्हा नीताच्या हातून त्याचा खून होतो. कोर्टात तिच्यावर खटला उभा राहतो. नीताला आपण आजवर चूक समजत होतो हे आता राजनला कळते, पण आता उशीर झालेला असतो. नीताला शिक्षा होते. चित्रपटाच्या शेवटी राजन आपल्या मुलीला घेऊन नीताला भेटण्यास तुरुंगात येतो. त्या वेळी ती म्हणते, ‘मला वडिलांनी नको तेवढे स्वातंत्र्य दिले. तू तरी तशी चूक करू नकोस. पाश्चात्त्य विचारांचा तिच्यावर प्रभाव पडू देऊ नकोस.’ भारतीय प्रेक्षकांना रुचावा असा शेवट मेहबूबनी केला आहे.

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर दोन वेगवेगळे मतप्रवाह हिरिरीने मांडले जाऊ लागले होते. पाश्चिमात्त्य देशातील प्रगत जीवनपध्दती आपण स्वीकारली पाहिजे असे एका गटाचे म्हणणे होते, तर भारतीय संस्कृतीच श्रेष्ठ आहे, तिचा त्याग करायला नको असे दुसरा गट आग्रहाने मांडत होता. आधुनिक विचारधारा व परंपरा यांत मेहबूब खान परंपरेला अधिकच झुकते माप देतात. खटकणारा हा शेवट सोडल्यास चित्रपट आजही अतिशय ताजा वाटतो तो त्याच्या हाताळणीमुळे व ताणाच्या मानसशास्त्रीय विश्लेषणामुळे. ‘अंदाज’च्या लोकप्रियतेत नौशाद यांच्या संगीताचा फार मोठा वाटा होता. ‘अंदाज’मध्ये लता मंगेशकरांची अप्रतिम चार गाणी होती. (‘कोई मेरे दिल मे’, ‘उठाये जा उन के सितम’, ‘तोड दिया दिल मेरा’ आणि ‘कोरस बरोबरचे ‘मेरी लाडली रे मेरी लाडली’) ही चारी गाणी गाजली.

रफी व शमशाद यांच्या वाट्याला अर्धेअर्धेच गाणे होते. पण ‘अंदाज’चे नाव घेताच आठवतात ती मुकेशची अजरामर गाणी! (‘हम आज कही दिल खो बैठे’, ‘टूटे ना दिल टूटे ना’, ‘तू कहे अगर’ व ‘झूझू के नाचो आज’) या गाण्यांनी मुकेशला सहगलचा वारसदार म्हणून स्थापित केले. ‘झू झू के’ या गाण्याच्या प्रसंगी दिलीपला कळलेले असते की नीता व राजनचे लग्न होणार आहे. तरी तो आपल्या मनातील वेदना लपवून ‘गाओ खुशी के गीत’ असे गाणे म्हणतो. हा प्रसंग व हे गाणे- प्रेमभंग झालेल्या तिसऱ्या व्यक्तीने दु;ख लपवून हसण्याचा प्रयत्न करणे- यांची नक्कल पुढे हिंदी सिनेात वारंवार झाली. मोठी हवेली, तिच्यात असलेला पियानो व त्यासमोर बसून गाणारा नायक ही सिच्युएशनदेखील असंख्य वेळा पुनरावृत्त झाली. पुढे ‘राजकपूरचा आवाज’ म्हणून मान्यता पावलेल्या मुकेशचा आवाज या सिनेात दिलीपकुमारसाठी वापरला होता. यानंतर मुकेशला दिलीपसाठी गाण्याची संधी तुरळकच मिळाली. नौशाद यांनीही या चित्रपटानंतर रफीची साथ धरली व मुकेश त्यांच्या संगीतातून जवळजवळ हद्दपारच झाला.

हीच गोष्ट मजरूह सुलतानपुरीच्या संदर्भात घडली. मजरूहनी ‘अंदाज’साठी उत्तम गाणी लिहिली, पण नंतर नौशादनी शकील बदायुनीशी आपली जोडी जमविली. मात्र ‘अंदाज’चे सर्वांत मोठे बलस्थान व आकर्षण त्यातील प्रमुख अभिनेत्यांचा अभिनय हे होते. राज-नर्गिस-दिलीप हे त्रिकूट या सिनेात प्रथमच (व शेवटचे) एकत्र आले होते. राज व दिलीपही समोरासमोर यानंतर कधीच आले नाहीत. दिलीपकुमारने दिलीपची भूमिका संयतपणे, अंडरप्लेचा उपयोग करीत प्रभावीपणे वठविली. पुढे ढीरसशवू घळपस म्हणून नावारूपास आलेल्या दिलीपकुमारची चुणूक या चित्रपटातही दिसली. याउलट राज कपूरची (राजनची) भूमिका अधिक कंगोरे असणारी, अभिनयाच्या विविध छटा दर्शविणारी होती. पत्नीविषयीचे प्रेम तिरस्कार, संशय, मत्सर,  उपरोध व वाणीतील विखार या भावना उत्कटतेने व्यक्त करताना त्याने काही प्रसंग नर्मविनोदाने झकास खुलविले होते.

या दोघांच्या अभिनयाविषयी लिहिताना Clash of the Titans असे शब्द वापरले जातात. पण हा चित्रपट करताना दोघेही आपले स्थान बळकट करण्यासाठी धडपडणारे नवे अभिनेते होते हे ध्यानात घेतले पाहिजे. (दिलीपकुमारचा पहिला चित्रपट ‘ज्वार भाटा’ हा 1944 चा, तर राज कपूरचा पहिला ‘नील कमल’ हा 1947चा.) पुढे हे दोघे हिंदी सिनेमातील आघाडीचे नायक बनले व त्यांनी आपापले साम्राज्य स्थापन केले. मात्र ‘अंदाज’मध्ये खरी बाजी मारून गेली होती ती नर्गिस. अल्लड तरुणीच्या रूपात ती जशी सहजतेने वावरली, तितक्याच सहजतेने मित्र आणि नवरा ही दोन नाती जपताना होणारी स्त्रीची तगमगही तिने प्रभावीपणे व्यक्त केली. तिच्या चेहऱ्यावरील झरझर बदलत जाणारे भाव पाहण्यासारखे होते. नर्गिसही या काळात आपले स्थान निर्माण करण्यासाठी धडपडत होती. ‘अंदाज’मध्ये प्रथम तिला तिच्या अभिनयगुणांना वाव असणारी भूमिका मिळाली. ह्या चित्रपटानंतर ती हिंदीतील प्रथम श्रेणीची नायिका म्हणून गणली जाऊ लागली.

शीलाची भूमिका करणाऱ्या कक्कूचाही आवर्जून उल्लेख करायला हवा. तिची भूमिका पुरेशी विकसित झाली नाही, पण या तीन कलावंतांसमोर ती कोठेही कमी वाटली नाही. आज ‘अंदाज’ पाहताना त्यामागील वैचारिक भूमिकेचे ‘जुनेपण’ जाणवते, पण तो प्रदर्शित झाला त्या काळात तो एकदम ताजा वाटला होता. अभिनय, सादरीकरण, व मनोविश्लेषण या अंगाने तो त्याच्या समकालीन चित्रपटांपेक्षा खूपच पुढे होता. कलादिग्दर्शक केशव मिस्त्री यांनी या चित्रपटासाठी मांडलेले सेट भव्य व उच्च अभिरुची दर्शविणारे होते. फरदून इरानीचे अप्रतिम छायाचित्रण, प्रभावी प्रकाशयोजना, कॅमेऱ्याचे कोन, समीपदृश्ये हे सारे सिनेमातील नाट्य अधिक प्रभावी करण्यासाठी उपयोगी ठरले आहे. एम.अली रझा यांचे संवाद अर्थपूर्ण होते, विशेषत: वरवर साध्या वाटणाऱ्या बोलण्याला आतून एक निराळा अर्थ असू शकतो हे त्यांनी खुबीने दाखविले आहे. ‘अंदाज’मध्ये प्रथमच स्त्री-पुरुषांच्या मैत्रीबद्दल विचार मांडण्यात आला. ‘दिलीप माझा मित्र आहे’ असे नीता म्हणते व ते खरेही असते.

एखाद्या ‘पर’पुरुषाला स्त्रीने मित्र मानणे ही कल्पनाही हिंदी सिनेात ‘अंदाज’मध्येच प्रथम मांडली गेली. दोन पुरुष व एक  स्त्री किंवा दोन स्त्रिया व एक पुरुष यांच्या नात्याचा ‘त्रिकोण’ही या  चित्रपटात प्रथम प्रभावीपणे चित्रित केला गेला. यानंतर हा हिंदीतील  एक महत्त्वाचा फॉर्म्युला बनून गेला. ‘अंदाज’ने खरा बदल घडवून  आणला तो अभिनयाच्या क्षेत्रात. या चित्रपटानंतर अभिनेत्यांची एक  नवी पिढी उदयाला आली व जुने सारे नायक हळूहळू बाद झाले.  एकटा अशोककुमार या स्पर्धेत टिकून राहिला.

 2 –

 

हिंदी सिनेाच्या इतिहासात ‘महल’ या चित्रपटाचे फार महत्त्वाचे स्थान आहे. ‘महल’ हा पहिला लक्षणीय गूढ-रहस्यपट मानला जातो. गूढपटांच्या महालाचे काळोखे दालनच या चित्रपटाने उघडून दिले व नंतर अनेकांनी तेथे मुक्त संचार केला. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर हिंदी चित्रपटसृष्टीनेही कात टाकावयास सुरुवात केली होती. नवीन दिग्दर्शक, नायक नायिका, गीतकार, संगीतकार व नवे तंत्रज्ञ यांची ताज्या दमाची कुमक सिनेक्षेत्रात आली होती. ‘महल’चे दिग्दर्शक कमाल अमरोही हे होते. त्यांचा जन्म उत्तर प्रदेशातील अमरोहा या गावी 1918 साली झाला. त्यांना मुंबईस आणण्याचे श्रेय कुंदनलाल सहगलला दिले जाते.

1938 मध्ये अमरोही ‘मिनर्वा मूव्हीटोन’मध्ये लेखक म्हणून दाखल झाले. 1948 साली ‘महल’ची कथा घेऊन अमरोही त्यांचे मित्र अशोककुमारकडे गेले. अशोककुमार हे त्या वेळी "Bombay

Talkies' या निर्मितिसंस्थेचे भागीदार होते. त्यांना ती कथा पसंत पडली. अमरोहींची इच्छा ही कहाणी आपणच दिग्दर्शित करावी अशी होती. त्यांनी ज्या पध्दतीने कथा सांगितली, त्यावरून अशोककुमारना विश्वास वाटला की ते दिग्दर्शन करू शकतील, आणि अशा तऱ्हेने कमाल अमरोहींना दिग्दर्शनाची पहिली संधी मिळाली. "Bombay Talkies'' या निर्मितिसंस्थेने भारतीय सिनेइतिहासात मोलाची कामगिरी बजावली आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात या संस्थेने ‘अछूत कन्या’, ‘कंगन’, ‘बंधन’ असे वैशिष्ट्यपूर्ण चित्रपट निर्माण करून या व्यवसायाचा पाया रचण्यास मोठाच हातभार लावला.

हिमांशू राय व देविका राणी यांनी ही संस्था स्थापन केली व नंतर अशोककुमार त्यांना येऊन मिळाले. "Bombay Talkies''ने जर्मनीहून तंत्रज्ञ आणले होते, त्यामुळे त्यांनी निर्माण केलेले चित्रपट तंत्रदृष्ट्या प्रगत तर झालेच, पण चित्रपटसृष्टीलाही त्याचा फायदा झाला. अनेक कलावंतांमधील गुणवत्ता हेरून त्यांना पुढे आणण्याचे मोलाचे कार्य या संस्थेने केले. अशोककुमारचा पहिला चित्रपट ‘जीवन नैया’ हा, तसेच दिलीपकुमारचा पहिला ‘ज्वारभाटा’ हे या संस्थेचेच. किशोरकुमारलाही पहिली पोर्शगायनाची संधी याच संस्थेच्या ‘जिद्दी’मध्ये मिळाली. ‘महल’ची कथा तत्कालीन चित्रपट कथांपेक्षा खूपच वेगळी होती. शंकर (अशोककुमार) हा तरुण एक हवेली विकत घेतो. या हवेलीत गेल्यावर त्याला वेगवेगळे भास होऊ लागतात. ते भास आहेत की सत्य हेही त्याला समजत नाही.

हवेलीच्या एका दालनात कुणीतरी काढलेले त्याचे स्वत:चे चित्र त्याला दिसते. येथे तो पूर्वी कधी आलेलाच नव्हता, मग हे चित्र येथे कसे आले? रहस्याची सुरुवात झाली आहे, हळूहळू ते अधिक गडद बनत जाते. या हवेलीत त्याला एक सुंदर तरुणी रात्रीच्या वेळी एकटीच गाणे म्हणत हिंडताना दिसते. ती कधी दिसते, कधी अदृश्य होते. ही कामिनी (मधुबाला) त्याला सांगते की ती त्याची पूर्वजन्मीची प्रेयसी आहे. त्याचा मित्र शिवनाथ- (कनू राय) या विचित्र भ्रमातून त्याची सुटका करण्याचा प्रयत्न करतो, पण शंकरवरील कामिनीचा प्रभाव जात नाही. अशाच एका गूढ रात्री कामिनी त्याला सांगते की, ‘त्या दोघांचे मीलन होऊ शकेल, पण त्यापूर्वी शंकरने हवेलीतील माळ्याच्या मुलीचा खून केला पाहिजे, म्हणजे तिच्या शरीरात कामिनीचा आत्मा प्रवेश करील.’ शंकर हे करण्यास तयार होतो पण त्यापूर्वीच एका अपघातात तो जबर जखमी होतो.

त्याचे वडील त्याला अलाहाबादला घेऊन जातात व तेथे त्याचे लग्न रंजनाशी- (विजयालक्ष्मी) लावून देतात. मात्र लग्नानंतरही शंकरच्या मनातील कामिनीचे भूत जात नाही. कामिनीविषयी त्याला वाटणाऱ्या आकर्षणाचा पत्ता लागल्यावर रंजना चिडते. मात्र तरीही शंकर कामिनीचा नाद सोदण्यास तयार होत नाही, तेव्हा ती आत्महत्या करते व खुनाचा आळ शंकरवर येईल अशी व्यवस्था करते. शंकरवर कोर्टात खटला चालविला जातो. तेथे अनेक रहस्ये उलगडण्यास सुरुवात होते. खटल्यादरम्यान कळते की माळ्याची मुलगी दुसरी कुणी नसून भूत असल्याची बतावणी करणारी कामिनीच आहे. शंकरवर रंजनाचा खून केल्याचा आरोप सिध्द होतो. त्याला फाशीची सजा होते. तो आपल्या मित्राला कामिनीशी लग्न करण्याची विनंती करतो. पण फाशी अंलात आणण्यापूर्वीच रंजनाने लिहिलेले एक पत्र उपलब्ध होते, ज्यात तिने आत्महत्या करीत असल्याचे कबूल केलेले असते. शंकरची सुटका होते मात्र दरम्यान शिवनाथचे कामिनीशी लग्न झालेले असते. भूत, आत्मा अशा अतींद्रिय शक्तीचा रहस्य वाढविण्यासाठी केलेला हा हिंदी चित्रपटातील पहिला लक्षणीय प्रयोग होता. मात्र या  कथेत अनेक कच्चे दुवे होते, योगायोग होते. चित्रपटाचा पूर्वार्ध तसा  वेगवान घटनांनी, रहस्यामुळे व गूढामुळे जलद बनविला होता पण मध्यंतरानंतर मात्र तो रेंगाळतो.

रहस्याची उकलही समाधानकारक वाटत नाही. रंजना जर शंकरला अडकविण्याचा प्रयत्न करीत होती तर तिने आपल्या आत्महत्येच्या संकल्पाविषयी पत्र का लिहिले याचा उलगडा होत नाही. शेवटचे पत्रच डेड लेटर ऑफिसला का गेले ह्याचेही काही स्पष्टीकरण नाही. कथेत अनेक योगायोगही आहेत ज्यांना गृहीत धरावे लागते. मात्र कथेतील कच्च्या दुव्यांकडे प्रेक्षकांचे (चित्रपट पाहताना तरी) दुर्लक्ष व्हावे एवढी प्रभावी कामगिरी सिनेातील छायाचित्रण, संगीत व अभिनय ह्या तीन घटकांनी केली होती. ह्या सगळ्या घटकांना खुबीने एकत्र करून त्या प्रत्येकाच्या वैशिष्ट्यात भर टाकण्याचे, व सिनेाला एकसंध, प्रभावी रूप देण्याचे कौशल्यपूर्ण काम कमाल अमरोहीनी केले होते.

सुमारे 35 वर्षांच्या आपल्या प्रदीर्घ कारकीर्दीत अमरोहींनी फक्त 4 चित्रपट दिग्दर्शित केले. (‘महल’, ‘दायरा’, ‘पाकीझा’ व ‘रझिया सुलतान.’) पण त्यांच्या कामाचा ठसा सिनेजगतावर उमटलेला आहे. ‘महल’चे कृष्णधवल छायाचित्रण जोसेफ विर्शिंग यांचे होते. विलक्षण प्रभावी वातावरणनिर्मिती करणारे हे चित्रण त्या काळी खूपच गाजले व पुढे त्याचे अनेकांकडून अनुकरणही झाले. अंधार व उजेड यांच्या सरमिसळीमधून त्यांनी गूढाची उत्तम निर्मिती केली होती. काळोखी दालने, फडफडणारे पांढरे पडदे, मेणबत्त्यांचा अंधुक प्रकाश, भिंतीवरल्या सावल्या या साऱ्यांतून तयार होणारे वातावरण प्रेक्षकाला खिळवून ठेवणारे होते. ‘आयेगा आनेवाला’ या गाण्याच्या वेळचे चित्रण हा तर अशा पध्दतीच्या चित्रीकरणाचा आदर्श नमुना होता. विर्शिंग यांच्यावर जर्मन एक्स्प्रेशनिस्ट शैलीचा प्रभाव होता. सुरुवातीला त्यांनी रात्रीची दृश्ये अधिकच काळोखी चित्रित केली होती, पण नंतर भारतीय प्रेक्षकांचा विचार करून त्यांनी प्रकाशाचे प्रमाण थोडेसे वाढविले.

वास्तववादी प्रकाशरचनेपेक्षा मूड  निर्माण करणारी प्रकाशयोजना त्यांनी केली. हा त्या वेळी एक नवा  प्रयोग होता. महालातून फिरणाऱ्या मधुबालाचे चित्रण करताना  अनेकदा डीप फोकस फोटोग्राफीचा त्यांनी उत्तम उपयोग केला. त्यांच्या कौशल्यामुळे कथेतील गूढता तर वाढलीच पण मधुबालाचे  लावण्यही अधिक खुलले.  ‘महल’मधील खेचंद्र प्रकाश यांच्या अप्रतिम संगीतरचनांनी  त्यांना व या सिनेमालाही अमर बनविले आहे. खेचंद प्रकाश यांचा  जन्म 1907 सालचा. वडिलांकडून त्यांनी शास्त्रीय संगीताचे व  कथक नृत्याचे धडे घेतले. राजस्थानी व मारवाडी लोकसंगीताचाही  त्यांचा अभ्यास होता. प्रख्यात संगीतकार तिमिर बरन यांचे सहायक  म्हणून काही काळ त्यानी काम केले. त्यांनी स्वतंत्रपणे दिलेल्या ‘तानसेन’ (1943) या चित्रपटाचे संगीत प्रचंड गाजले. एका चित्रपटात त्यांना लता मंगेशकर यांचा आवाज वापरायचा होता, पण निर्मात्याला ते मान्य नव्हते. खेचंद त्याला म्हणाले, ‘हा आवाज  एके दिवशी संपूर्ण देशावर राज्य करेल.’ त्यांची भविष्यवाणी तंतोतंत  खरी ठरली.

‘महल’मधील लताच्या ‘आयेगा, आनेवाला’ या गीताने तर इतिहासच घडविला. या गाण्याच्या रेकॉर्डिंगच्या वेळची  एक आठवण सांगण्यासारखी आहे. या गाण्यात नायिकेचा आवाज  दूरवरून ऐकू येत हळूहळू जवळ येतो असा प्रसंग आहे. त्या काळी  रेकॉर्डिंगचे तंत्र आजच्या इतके प्रगत नव्हते. खेचंद प्रकाश यांनी  नेका परिणाम साधण्यासाठी एक युक्ती केली. त्यांनी माईक  हॉलच्या मध्यभागी ठेवला व लताला दूरच्या कोपऱ्यात उभे राहून  गाण्याची ओळ म्हणत माईकजवळ येण्यास सांगितले. मूळ मुखडा सुरू होण्याआधी एक-दोन ओळी म्हणण्याची पध्दत याच गाण्यामुळे लोकप्रिय बनली. हे गीत नक्षब या गीतकाराने लिहिले होते, पण सुरुवातीच्या ओळी स्वत: कमाल अमरोही यांनी लिहिल्या होत्या.

भुताचे गाणे, गूढ वातावरण, सुंदर तरुणी व लताचा आवाज ही जोडणी प्रेक्षकांना इतकी आवडली की पुढे तिला अनुसरून अनेक  गाणी तयार केली गेली. ‘पछाडणारे गाणे’ (Haunting song) हा  एक नवाच गीतप्रकार तयार झाला व ते लतानेच म्हणावे असा  प्रघातही पडला. ‘आजा रे परदेसी’ (मधुती), ‘नैना बरसे रिमझिम  रिमझिम’ (वह कौन थी), ‘कहीं दीप जले कहीं दिल’ (बीस साल बाद) आणि अगदी ‘यारा सिली सिली’ (लेकिन) पर्यंत हा सिलसिला चालूच आहे. ‘दिल ने फिर याद किया’ आणि ‘मुश्किल है बहोत मुश्किल’ ही लताची आणखी दोन अवीट गोडीची गाणी या  चित्रपटात होती. राजकुमारी या गायिकेच्या कारकिर्दीतही ‘महल’च्या गाण्यांचे विशेष महत्त्व आहे. ती गायिका-अभिनेत्री बनण्यासाठी सिनेात आली, पण तिचे शरीर स्थूल असल्यामुळे तिने गाण्यावर लक्ष केंद्रित केले. मात्र तिच्या आवाजाला अनेक मर्यादा असल्यामुळे तिला फारसे यश मिळाले नाही.

‘महल’मध्ये  खेचंद्र प्रकाश यांनी तिच्याकडून तीन सोलो व एक  जोहराबाईबरोबरचे व्दंव्दगीत अशी चार गाणी गाऊन घेतली. ही गाणी लोकप्रिय बनली, पण तिला एवढी संधीही पुढे कधीच मिळाली नाही. अनेक वर्षांनी गुलजार यांच्या ‘किताब’मध्ये ‘हरी दिन तो बीता’ या गाण्यात तिचा आवाज ऐकू आला. ‘महल’ तयार होत असताना स्टुडिओधील अनेकांना त्याचे संगीत आवडले नव्हते. ‘महल’च्या गीतांना अफाट लोकप्रियता मिळाली. दुर्दैवाने यानंतर एक वर्षाने खेचंदजीचे अकाली निधन  झाले. नौशाद त्यांना आपले गुरू मानत. त्यांच्या निधनाने सिनेसंगीताची फार मोठी हानी झाली. अशोककुमार हा सुरुवातीच्या काळात अतिशय शामळू नट वाटत असे. मात्र ‘महल’मध्ये त्याला आपले व्यक्तिमत्त्व सापडले. एक नवाच अशोककुमार या चित्रपटात दिसला. त्याची थोडी चुणूक ‘किस्मत’मध्ये दिसली होती. भूमिकेची जाण असणारा व उत्तम नैसर्गिक अभिनय करणारा कलावंत ही त्याची प्रतिमा ‘महल’मधील भूमिकेमुळे तयार झाली व ती उत्तरोत्तर दृढ होत गेली.

आपल्या  सदाबहार अभिनयाने त्याने पुढील 30-35 वर्षे गाजविली. ‘महल’ बनताना मधुबाला केवळ 17 वर्षांची होती. तिचे सौंदर्य व तिचा अभिनय यांनी प्रेक्षकांवर अशी काही मोहिनी घातली की आघाडीच्या नायिकांत तिची गणना होऊ लागली. गूढ, रहस्यमय, लावण्यवती नायिका तिने कमालीच्या प्रभावीपणे साकारली. तिचे हास्य मोनालिसाची आठवण करून देणारे होते. गंतीची गोष्ट म्हणजे या भूमिकेसाठी प्रथम सुरय्याचा विचार केला गेला होता. आज मधुबालाशिवाय ‘महल’ ही कल्पनाच सहन होत नाही. ‘महल’ने अनेक नवे पायंडे पाडले. ‘भूत-प्रेत-आत्मा’ यांची कथेत गुंफण करून यानंतर अनेक सिनेमे तयार झाले. ‘महल’ची कथा, त्यातील सेट, काळोखे वातावरण, अंधारी दालने, जिने, गूढ संगीत इतकेच नव्हे तर हातात दिवा घेऊन फिरणारी सुंदर तरुणी या साऱ्यांच्या नकला झाल्या.

एक गाणे तुकड्यातुकड्याने अनेकदा वाजविणे हा प्रकारही ‘महल’ने रूढ केला. बिमल राय हे ‘महल’चे संकलक होते. त्यांच्या ‘मधुती’ची सुरुवातीची काही दृष्ये, त्यातील गीताचा वापर यावर ‘महल’चा प्रभाव जाणवतो. मात्र लोक समजतात तसा ‘मधुती’ हा ‘महल’चा रिमेक नाही. ‘महल’मधून काही कल्पना बिमलदांनी घेतल्या खऱ्या, पण ‘मधुती’ आपल्या स्वतंत्र मार्गाने जात असामान्य कलाकृती बनला. तांत्रिकदृष्ट्याही ‘महल’ अतिशय प्रगत होता. त्याच्या संगीतातील orchestration काळाच्या फार पुढे होते. ‘महल’च्या प्रभावातून आजचा भयपटही मुक्त झालेला नाही.

 3 - 1949 सालचा तिसरा लक्षणीय व महत्त्वाचा चित्रपट राज कपूर निर्मित- दिग्दर्शित ‘बरसात’ हा होता. 1948 साली राज कपूरने आर. के. फिल्म्स ची स्थापना केली व ‘आग’ या चित्रपटाची निर्मिती केली. मात्र हा चित्रपट आर्थिकदृष्ट्या अयशस्वी ठरला. या अपयशामुळे निराश न होता राजने लगेच ‘बरसात’ या महत्त्वाकांक्षी चित्रपटाच्या निर्मितीस सुरुवात केली. ‘आग’चे संगीत राम गांगुली यांनी दिले होते. पहिला चित्रपट पडल्यावरही राजने एक धाडसी निर्णय घेऊन शंकर-जयकिशन ह्या नव्या संगीतकार जोडीला ‘बरसात’च्या संगीतासाठी पाचारण केले. सोबतीला हसरत जयपुरी व शैलेंद्र ही गीतकारांची नवी जोडी घेतली आणि एका नव्या स्वप्नाचे बांधकाम करण्यास सुरुवात केली. ‘बरसात’मध्ये सुरेल संगीताच्या तालावर राजने दोन वेगवेगळ्या प्रेमकहाण्यांची गुंफण केली होती आणि प्रेमाच्या विविध छटांना पडद्यावर उतरविले होते.

चित्रपटाच्या सुरुवातीला प्राण (राजकपूर) व गोपाल (प्रेनाथ) हे दोन श्रीमंत तरुण आलिशान कार घेऊन काश्मीरला निघालेले दिसतात. वाटेत त्यांना एक वनकन्या मुक्तपणे गाताना दिसते, पहिल्या दृश्यातच दिग्दर्शक राज कपूर चित्रपटाचा मूड व त्याची दिशा स्पष्ट करतो. सुंदर तरुणी दिसताच गोपाल तिच्यावर जाळे टाकण्याचा खेळ सुरू करतो, पण ती बापाला बोलाविते व त्याला पळ काढावा लागतो. गोपाल दिसेल त्या मुलीच्या मागे लागणारा, औटघटकेच्या करमणुकीतच आनंद मानणारा आहे. प्राण त्याला म्हणतो. ‘हे बरे नव्हे’, तेव्हा गोपाळ त्यालाच उलट विचारतो, काय चांगले काय वाईट हे कोण ठरविणार? त्याचे काही निकष आहेत का? यावर प्राण उत्तर देतो, होय.

कोणाचे हृदय दुखवू नये, हा सर्वांत महत्त्वाचा निकष आहे. गोपाळ नेहमीप्रमाणे त्याला हसून उडवून लावतो. दोन अत्यंत परस्परविरोधी विचारांच्या मित्रांची कहाणी आता आपण पाहणार आहोत याचे सूतोवाच होते. पुढे एका ठिकाणी ते दोघे डाकबंगल्यात थांबतात. गेल्या वर्षी जेव्हा ते काश्मीरला आले होते, तेव्हा याच डाक बंगल्यात उतरले होते. येथल्या नीला (निम्मी) नावाच्या मुलीबरोबर गोपालने प्रेमाचे नाटक केले होते. ती मात्र त्याला सर्वस्व अर्पून देव मानीत असते. मी पुन्हा येईन असे त्याने जे खोटे वचन दिले असते, त्यावर विश्वास ठेवून ती त्याची वाट पाहत असते. तो तिला भेटतो, पण काही घटका मजेत घालाविण्यासाठीच. पुढील पावसाळ्यात पुन्हा भेटण्याचे वचन नीलाला देऊन गोपाल प्राणबरोबर पुढे प्रवासाला निघतो.

काश्मीरच्या नयनरम्य पोर्शभूीवर आता दुसरी एक प्रेकहाणी फुलू लागते. प्राण रेश्मा (नर्गिस) नावाच्या एका सुंदर तरुणीला पाण्यात बुडताना वाचवितो आणि तिच्या प्रेमात पडतो. मात्र रेश्माच्या बापाला या शहरी तरुणांचा भरवसा नसतो. तो प्राण रेश्माच्या लग्नाला विरोध करतो. प्राण व रेश्माच्या मनस्वी प्रेमाचे दिग्दर्शक राज कपूरने केलेले उत्कट चित्रण हे ‘बरसात’चे मोठेच बलस्थान होते. एका संस्मरणीय दृश्यात प्राण भान विसरून आर्तपणे व्हायोलीन वाजवीत असतो आणि रेश्मा जणू प्रेमाच्या अदृश्य धाग्याने ओढली जात त्याच्या बाहूवर येऊन कोसळते. व्हायोलीनचे सूर हे प्रेमाच्या हाकेचे प्रतीक बनून जातात. प्रेमभावनेचा इतका उत्कट आविष्कार हिंदी पडद्यावर प्रथमच प्रकट झाला होता. ह्या प्रसंगाचे एक शिल्प उभारून राजने ते आपल्या स्टुडिओच्या प्रवेशव्दारापाशी लावले. आर.के. फिल्म्सचा सिंबॉल म्हणूनही हे दृश्य पुढे राजने वापरले.

या चित्रपटापूर्वी नर्गिसने अनेक नायकांबरोबर व राज कपूरने अनेक नायिकांबरोबर काम केले होते. पण या चित्रपटानंतर ही जोडी Made for each other आहे, ही गोष्ट सर्वमान्य झाली. या जोडीने 16 चित्रपटांत एकत्र काम केले. राजच्या बाजूने तर हे नाते एवढे दृढ होते की 1951 ते 1956 या वर्षांत त्याने इतर कोणत्याही अभिनेत्रीबरोबर काम केले नाही. आजही नर्गिस-राजकपूर ही हिंदी सिनेमातील सर्वश्रेष्ठ जोडी मानली जाते.

वडिलांच्या विरोधामुळे रेश्मा पूर आलेल्या नदीत उडी टाकते. प्राणला ती मरण पावली असावी अशी शंका येते. पण एक भला माणूस तिला वाचवितो. रेश्माच्या गावाजवळ प्राणच्या कारला अपघात होतो. रेश्मा त्याची शुश्रूषा करते. तिला खात्री असते की प्राण वाचेल. तिचे प्रेम व तिचा विश्वास पाहून गोपालचे डोळे उघडतात. प्रेमाची ताकद त्याला कळते. तो नीलाकडे जाण्यास निघतो. पण रेश्मा व गोपालच्या नात्याचा चुकीचा अर्थ नीला लावते. सैरभैर होऊन ती आत्महत्या करते. गोपाल तिच्या शवाला अग्नी देत असताना आकाशात ढग दाटून येतात. गोपालच्या मनात अचानक, फिल्मी रीतीने परिवर्तन होत नाही. हळूहळू त्याच्या स्वभावात होणारा बदल दिग्दर्शक राज कपूरने  कौशल्याने चित्रित केला आहे.

मुझे किसी की जरूरत नही म्हणणारा गोपाल ‘मेरा भी तुम्हारी तरह तडपने को जी करता है’ असे म्हणू लागतो. प्राण व गोपाल या दोन व्यक्ती आहेत. पण एकाच व्यक्तिमत्त्वाची ती दोन रूपेही असू शकतात असेही राजने सूचित केले आहे. प्राण म्हणतो, इन्सान के अंदर हमेशा दो शक्सियत एक दूसरे से अलग दिशामे काम करती है. कभी कभी मै तुम्हे देखकर सोचता हूँ के तु मेरा ही हिस्सा हो. प्रेमकहाणीला गंभीर मानसशास्त्रीय बैठक देण्याचा असा प्रयत्न हिंदी सिनेमाला नवाच होता. पहाडातील तरुणी व शहरातील तरुण यांचे प्रेम रंगविणाऱ्या अनेक चित्रपटांनी पुढे ‘बरसात’ची नक्कल करण्याचा प्रयत्न केला, पण ते कुणालाच जमले नही.

राजकपूर, नर्गिस, प्रेनाथ व निम्मी या साऱ्यांची कामे उत्तम झाली होती. निम्मीचा हा पहिलाच चित्रपट होता. जाल मिस्त्रीचे छायाचित्रण दृश्यांतील सौंदर्य खुलविणारे व मूड निर्माण करणारे होते. ‘बरसात’ची हिंदी सिनेसृष्टीला सर्वांत मोठी देणगी शंकर- जयकिशन ही संगीतकारांची जोडी आणि शैलेंद्र व हसरत जयपुरी हे गीतकार. शैलेंद्रचे पूर्ण नाव शंकरदास कासरीलाल शैलेंद्र. रेल्वेतील नोकरी त्याला मुंबईला घेऊन आली. येथे त्याची भेट साहित्यक्षेत्रात नाव मिळविण्यासाठी धडपडणाऱ्या समविचारी मित्रांशी झाली. एके दिवशी तो काव्यगायन करीत असता राज कपूरने त्याची ‘जलता है पंजाब’ ही कविता ऐकली व तो फार प्रभावित झाला. राज त्या वेळी ‘आग’ बनवीत होता. त्याने शैलेंद्रला आपल्या सिनेमासाठी गाणी लिहिण्याची विनंती केली. पण शैलेंद्रला सिनेासाठी गाणी लिहिणे कमी दर्जाचे वाटत होते. त्याने राजला नकार दिला. मात्र पुढे परिस्थिती अशी निर्माण झाली की पैशांची निकड भागविण्यासाठी शैलेंद्र स्वत: राजकडे गेला. राजने त्याला 500 रुपये दिले व त्या बदल्यात शैलेंद्रने ‘बरसात’साठी ‘बरसात मे, हम से मिले तु’ आणि ‘पतली कमर है’ ही गाणी लिहून दिली. इथून शैलेंद्रहसरत- शंकर-जयकिशन या चौकडीचे जे अधिराज्य सुरू झाले ते पुढे जवळजवळ वीस वर्षे अबाधित राहिले.

शैलेंद्रने चित्रपट गीतांची  परिभाषाच बदलून टाकली. सरळ साधे, ऐकणाऱ्याच्या मनाचा ठाव  घेणारे शब्द आणि सोप्या शब्दांत मांडलेले जीवनाचे तत्त्वज्ञान हे  शैलेंद्रच्या गीतांचे वैशिष्ट्य होते. उर्दू शायरीमधील त्याच त्या  कल्पनांनी जखडलेल्या गाण्यांत शैलेंद्रने ताजेपणा आणला. ‘आ जा  रे परदेसी’ किंवा ‘ओ सजना, बरखा बहार आई’सारखी हळुवार  प्रेाची गाणी असोत, किंवा ‘आज फिर जीने की तमन्ना है’ आणि ‘वहा कौन है तेरा, मुसाफिर जायेगा कहा’सारखी आयुष्याचे मर्म  स्पष्ट करणारी गीते असोत, किंवा ‘मंझिल वोही है प्यार की,  राही  बदल गये’सारखे प्रेमाच्या सातत्याचे गुणगान करणारे गीत असो, शैलेंद्रने साऱ्या भावनांचे सोने केले. त्याच्या अकाली मृत्यूपर्यंत शैलेंद्र हिंदी सिनेसंगीताचा अनभिषिक्त राजा बनून राहिला. हसरत जयपुरी यांच्या नावाची शिफारस स्वत: पृथ्वीराज कपूर यांनी राजकडे केली होती.

हसरत जयपुरींनी सिनेमासाठी लिहिलेले पहिले गीत ‘जिया बेकरार है’ हे होते. ‘बरसात’साठी हसरतनी सहा गाणी लिहिली. (उरलेली दोन गाणी, ‘मुझे किसीसे  प्यार हो गया’ हे जलाल मलिहाबादी यांनी व ‘हवा मे उडता जाये’ हे रमेश शास्त्री यांनी लिहिली होती.) पुढे हसरत हे हिंदीतील  महत्त्वाचे गीतकार बनले. ‘बरसात’ने हिंदी सिनेाला दिलेली दुसरी अमूल्य देणगी  म्हणजे शंकर-जयकिशन ही संगीतकार जोडी. शंकर रामसिंग रघुवंशी यांचा जन्म मध्यप्रदेशात झाला, पण ते वाढले आंध्रप्रदेशात. ते उत्तम तबलावादक होते व नृत्यातही त्यांना गती होती. जयकिशन  पांचाल यांचा जन्म बलसाडमध्ये झाला. ते कीबोर्ड अप्रतिम वाजवीत. त्यांचे हे कौशल्य पाहून शंकरनी त्यांना मुंबईला आणले.  शंकर त्या वेळी ‘पृथ्वी थिएटर’मध्ये नोकरीस होते. या दोघांचे  तेथील काम पाहून राजकपूरने त्यांना ‘बरसात’मध्ये संधी दिली. ‘बरसात’चे संगीत तुफान लोकप्रिय ठरले.

या चित्रपटात 10 गाणी  होती,  ती सर्वच्या सर्व हिट बनली. पदार्पणातच एवढे यश यापूर्वी  कोणत्याही संगीतकाराला मिळाले नव्हते, त्यानंतरही मिळाले नाही. (अपवाद काहीसा ‘पारसमणी’चा. पण ‘बरसात’च्या तुलनेत ‘पारसमणी’ सामान्यच वाटतो.) ‘बरसात’च्या 10 गाण्यांना  "Perfect Ten' ची उपमा दिली जाते. राकेश बुधू या संगीत  समीक्षकाने लिहिले आहे "Barsaat is ideally one of Hindi cinema’s best

soundtracks, a point of reference with the launching of the cinema’s best female vocalistever and a golden gem of some of the industry’s

priceless and popular tunes. Rain is often forgot ten once it stops, and perhaps that is why the title, Barsaat has been so frequently used thereafter. But

this monsoon shower has proven that golden droplets are always going to shine years, over fifty in fact, and counting and will probably always remain for the many "Barsaat’ titles that we may endure in the years to come.'

पहिल्याच चित्रपटात शंकर-जयकिशननी  आपले अष्टपैलूत्व सिद्ध केले. ‘बरसात’च्या प्रदर्शनानंतर शंकर- जयकिशन हे नाव ज्याच्या-त्याच्या तोंडी घोळू लागले व एक-दोन वर्षांतच ते आघाडीचे संगीतकार बनले. लोकांच्या तोंडी चटकन बसतील अशा चाली, कौशल्याने वापरलेला मोठा वाद्यवृंद आणि  चित्रपटाच्या दृश्य अंगाला साथ देईल, त्याचे सौंदर्य वाढवील अशी  सहेतुक संगीतरचना ही या जोडीच्या संगीताची प्रमुख वैशिष्ट्ये  होती. हिंदी सिनेसंगीतात एक नवे युग आणणारे संगीतकार म्हणून  त्यांचा रास्त गौरव केला जातो. या संदर्भातील एक किस्सा  सांगण्यासारखा आहे. ज्यामुळे त्या काळाच्या कलावंतांच्या मानसिकतेवरही प्रकाश पडतो. एकदा संगीतकार नौशाद मेहबूब  खान यांच्याकडे गेले होते. बोलण्याच्या ओघात आपल्या ‘अंदाज’चे संगीत भारतभर कसे गुणगुणले जात आहे याची बढाई  नौशाद मारू लागले. बाहेर पाऊस पडत होता. खिडकीतून तो  न्याहाळीत मेहबूब खान म्हणाले, ‘लेकिन आपके गानों को तो बरसात ने धो डाला’.  मात्र ‘बरसात’चीच नव्हे तर 1949 सालाची हिंदी सिनेाला  सर्वाधिक महत्त्वाची देणगी लता मंगेशकर ही होती.

1947 सालाने  हिंदी सिनेसंगीताला दोन जबरदस्त धक्के दिले. 18 जानेवारी 1947 रोजी कुंदनलाल सहगल या अमर आवाजाने चिरविश्रांती घेतली. दुसरे म्हणजे भारताची फाळणी झाल्यावर नूरजहाँ पाकिस्तानात निघून गेली. फाळणी झाल्यावर पाकिस्तानात मुसलमानांसाठी स्वर्ग  अवतरेल या वेड्या आशेने खुर्शीद, रेहाना, मुताज शांती, मीना  शौरीसारख्या नट्या, नूर मोहम्मदसारखे गायक, गुलाम हैदर, फेरोज निजामी, नाशाद यांसारखे संगीतकार व बेहजाद लखनवी, झिया  सरहद्दी, जोश वगैरे गीतकार तिकडे निघून गेले. साहिरही हाही काळ पाकिस्तानात गेला होता, पण लवकरच त्याचा भ्रनिरास होऊन तो परत आला. नूरजहाँच्या जाण्यामुळे जी पोकळी निर्माण झाली होती ती लताबार्इंनी भरून काढली. एवढेच नव्हे तर पार्श्वगायनाला अभूतपूर्व अशा उंचीवर नेऊन ठेवले. संगीतकाराची कुठलीही, कितीही अवघड रचना गळ्यातून काढण्यास सक्षम असा आवाज  त्यांना लताबार्इंच्या रूपाने सापडला. हिंदी सिनेसंगीताचा चेहरामोहराच बदलला.

1949 मध्ये वर उल्लेखिलेल्या तीन चित्रपटांतील गाण्यांशिवाय ‘साजन की गलियां’ (बाजार), ‘चले जाना नही’ (बडी बहन), ‘हाय चंदा गये परदेस’ (चकोरी), ‘ए दिल तुझे कसम है’ (दुलारी), ‘लारा लप्पा, लारा लप्पा’ (रफी व दुराणी बरोबर चित्रपट ‘एक थी लडकी’), ‘तुम्हारे बुलाने को जी चाहता है’ (लाडली), ‘बहारे फिर भी आयेंगी’ (लाहोर), ‘दिल से भुला दो तुहमे’ (पतंगा.) अशी अवीट गोडीची गाणी लताबार्इंनी दिली व पाहता पाहता त्या प्रथम क्रमांकाच्या गायिका बनून गेल्या. लताबार्इंच्या आवाजाबद्दल, गायकीबद्दल विपुल लिहिले गेले आहे. त्याचा तपशील देण्याची आवश्यकता नाही. येथे एवढेच नोंदविणे पुरेसे आहे की लतापूर्व सिनेसंगीत लताच्या आगमनानंतर दोन-तीन वर्षांतच जुने वाटू लागले. एक नवे पर्व निर्माण झाले होते व पुढे किमान चार दशके हे लतापर्व असेच चालू राहिले.

संगीततज्ज्ञ अशोक दा.रानडे यांनी लिहिले आहे, ‘भारतीय संगीताचे एक महत्त्वाचे लक्षण हे, की मानवी जीवनाशी संलग्न दिवस-रात्र, ऋतुचक्र, व जन्म मृत्यू या तीन आवर्तनांतील प्रत्येक अवस्थांतराच्या प्रसंगी संगीत एक खूण म्हणून अवतरते. जीवनातील कोणत्याही महत्त्वाच्या प्रसंगास उद्देशून लताचे योग्य असे गाणे नाही असे होणे जवळजवळ अशक्य.’ लताबार्इंचा प्रभाव या दृष्टीनेही जाणवतो की, ‘अजाणता वा जाणीवपूर्वक त्यांच्यासारखे गाण्याचा प्रयत्न असंख्य गायिकांनी केला’. शेवटची पण महत्त्वाची नोंद- पूर्वी गाण्याच्या रेकॉर्डवर गायकाच्या नावाऐवजी सिनेमातील पात्राचे नाव लिहिलेले असे. लताबार्इंनी याविरूध्द आवाज उठविला आणि ‘बरसात’पासून गायकाचे नाव रेकॉर्डवर टाकण्याची पध्दत रूढ झाली. हिंदी सिनेाच्या रूपात अनेक वेळा बदल झाले, अनेक स्थित्यंतरे आली. ठराविक अंतराने हिंदी सिनेात बदलाचे वारे वाहू लागतात. साठच्या दशकात मृणाल सेन यांचा ‘भुवन शो’, मणी कौलचा ‘उसकी रोटी’ हे चित्रपट आले आणि ‘नव्या सिनेमा’ची मुहूर्तेढ रोवली गेली. सत्तरच्या दशकात ‘दीवार’ व ‘शोले’ हे चित्रपट आले व पुन्हा सिनेमाचा चेहरामोहरा बदलला. कलेच्या नवनवोन्मेष शालिनी रूपाची ही खूणच आहे. जुने मागे पडत असले तरी त्यातले काही टिकून राहते, नवे त्यात मिसळत जाते व एक नवेच संयुग तयार होऊन कलेचा प्रवाह अविरत चालू राहतो. 1949 हे वर्ष असेच पहिले मन्वंतर वर्ष म्हणून सिनेइतिहासात कायम नोंदवले गेले आहे.

Tags: शोले ‘दीवार काल्पनिक पौराणिक ऐतिहासिक हिंदी गाणे आशा भोसले लता मंगेशकर चित्रपट shole diwar kalpanik paouranik hindi gane asha bhosale lata mangeshkar chutrapat weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

विजय पाडळकर,  पुणे
vvpadalkar@gmail.com

जन्म : 04-10-1948 (बीड, महाराष्ट्र) 
महाराष्ट्र बँकेत 30 वर्षे नोकरीनंतर पूर्णवेळ लेखनासाठी स्वेच्छानिवृत्ती : 01-02-2001 
एकंदर 35 पुस्तके प्रकाशित. 
प्रामुख्याने आस्वादक साहित्य समीक्षा, व चित्रपट आस्वाद-अभ्यास या विषयांवर विपुल लेखन केले आहे. 

website : www.vijaypadalkar.com


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके