डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

‘डॉन किहोते...’ या कादंबरीचा मराठी अनुवाद मी प्रथम वाचला तो 1968 मध्ये. गेल्या पन्नास वर्षांत मी पुन:पुन्हा अनेक वेळा या कादंबरीकडे  वळत राहिलो आहे. तिचे संक्षिप्त इंग्रजी भाषांतर वाचले, नंतर Samuel Putnam  ने केलेले सुमारे एक हजार पृष्ठांचे मूळ भाषांतरही मिळवून वाचले. या कादंबरीचा जगातील महत्त्वाच्या लेखकांवर परिणाम झालेला आहे असे वाचनात आल्यावर त्यापैकी काही लेखक व त्यांच्या संबंधित कलाकृती वाचल्या. त्या संदर्भात मी माझ्या ‘मृगजळाची तळी’ मॅजेस्टिक प्रकाशन - 2000 या पुस्तकात सविस्तर चर्चा केली आहे. मात्र ‘डॉन किहोते..’  हा एक असा ग्रंथ आहे की वाचकाला त्याच्याकडे पुन:पुन्हा वळावे वाटते आणि प्रत्येक वेळी काहीतरी नवे त्याला सापडते. मधल्या काळात या कादंबरीने एवढे झपाटून टाकले होते की मी माझ्या लेटरहेडवरदेखील डॉन आणि सांचोचे चित्र टाकले. 

भ्रम आणि भ्रमनिरास ही कलेच्या क्षेत्रातील एक शाश्वत आणि महत्त्वपूर्ण थीम आहे.

जग जसे आहे तसे आपण पाहत नाही, आपण जसे आहो तसे जग पाहतो. हे पाहणे आणि त्यानुसार होणारे जगाचे आकलन हेदेखील वारंवार बदलत असते. बदल हाच नियम असलेल्या जगात न बदलणारे असे काहीच नसते. म्हणून आपल्याला काल आवडणाऱ्या गोष्टी आज आवडत नाहीत, कालची श्रद्धास्थाने आज ओसाड पडून जातात, कालचा खळाळता ओढा आज कोरडा पडलेला असतो. तर कधी कालच्या वाळलेल्या तरूला आज नवी पालवी फुटलेली असते. जगाचे रूप जर असे क्षणोक्षणी बदलणारे असेल तर कोणते रूप सत्य मानावयाचे? सत्य कोणते आणि कल्पित कोणते? भ्रम कोणता आणि वास्तव कोणते? कोणत्या रूपावर विश्वास ठेवायचा? असे प्रश्न विचार करणाऱ्या माणसाला सतत छळत असतात. पण काही माणसे अशी असतात की ज्यांचा स्वत:वर ठाम विश्वास असतो, त्यांना हे प्रश्न छळत नाहीत. विश्वासाचे चिलखत घालून जे लढतात त्यांना हारजीतचीदेखील तमा नसते.

असा विश्वास असलेल्या माणसांना कधीकधी ‘वेडे’ असेही म्हटले जाते. अशा वेड्या माणसांच्या यादीत सर्वांतीसच्या डॉन किहोतेचे नाव शिरोभागी लिहिले पाहिजे. हा फाकडा शिलेदार एका मरतुकड्या घोड्यावर स्वार होऊन दुर्जनांचा संहार करण्यास, दीनदुबळ्यांना अभय देण्यास व सौंदर्याचे रक्षण करण्यास कटिबद्ध होऊन भरधाव निघाला होता. त्याच्याबरोबर होती फक्त त्याची स्वप्ने. ही स्वप्ने हीच त्याची ताकद होती. पण ज्या वेळी डोळ्यांतली सारी स्वप्ने मावळून गेली तेव्हा मात्र सायंकाळी मृगजळ दिसेनासे व्हावे तसा त्याचा भ्रम नाहीसा झाला. तो जगाच्या दृष्टीने शहाणा बनला, मरून गेला.

मुग्युएल डी सर्वान्तीस या स्पॅनिश कादंबरीकाराच्या ‘द इंजिनियस जंटलमन डॉन किहोते द ला मांचा’ या कादंबरीतील डॉन या अफलातून व्यक्तिमत्त्वाचा आणि त्याच्याबरोबर त्याचा विश्वासू सेवक सांचो पांझा याचा प्रभाव गेली चारशे वर्षे वाचकांवर तर टिकून आहेच. पण श्रेष्ठ लेखकांवर, तत्त्वचिंतकांवर व टीकाकारांवरदेखील त्याचा जबरदस्त प्रभाव पडला आहे. या महाकाय कादंबरीचे सुरुवातीला वाचकांना जाणवलेले रूप खळखळून हसविणाऱ्या मजेदार कहाणीचे होते. डॉन किहोते हा कल्पनारम्य कादंबऱ्या वाचून स्वत:ला शिलेदार knight समजणारा एक मध्यमवयीन चक्रम वाचक आणि सांचो हा त्याचा दीड-चक्रम सेवक यांच्या ‘चित्त-चक्षू-चमत्कारिक’ कारनाम्यांची विनोदी कहाणी म्हणून या पुस्तकाकडे पाहिले गेले. मात्र एकोणिसाव्या शतकापासून तिच्याकडे पाहण्याच्या वाचकांच्या दृष्टीत बराच फरक पडला. याला कारणीभूत मुख्यत: डॉनचा प्रभाव पडलेले लेखक, कलावंत होते. त्यांची जीवनदृष्टी शोकात्मिकेला जवळ करणारी होती. आधुनिक मानवाच्या शोकात्म जीवनाची पाळेमुळे त्यांनी डॉनमध्ये शोधली. दोस्तोव्हस्कीची ‘द इडीयट’, फ्लोबेरची ‘मादाम बोव्हारी’ या डॉनचा प्रभाव असणाऱ्या काही महत्त्वाच्या कादंबऱ्या. चेकॉव्हच्या कथा व पिरांदेलोची नाटके यांवरही डॉनचा  प्रभाव जाणवतो. मार्शल प्रूस्त, पी.जी. वुडहाउस, मार्क ट्वेन, बिमल मित्र, जी.ए. कुलकर्णी अशा वेगवेगळ्या प्रकृतींच्या लेखकांवर आणि ऑर्सन वेल्स, ग्रिगोरी कोझीन्स्तेव अशा चित्रपट दिग्दर्शकांवर डॉनने मोहिनी घातली आहे. या कादंबरीतील जीवनदर्शनाचे स्वरूपच एवढे विशाल आहे की जीवनाला खऱ्या अर्थाने भिडू पाहणाऱ्या प्रत्येक कलावंताला त्याच्या प्रवासात डॉन आणि सांचो कुठेतरी भेटतातच. पिकासो आणि साल्वाडोर दाली हे श्रेष्ठ आधुनिक चित्रकार. त्यांनाही या अजरामर जोडगोळीने प्रभावित केले आहे.

सर्वान्तीस हा सोळाव्या शतकातील श्रेष्ठ स्पॅनिश लेखक. त्याचा जन्म स्पेनमधील माद्रिद या शहराजवळ 1547मध्ये झाला. त्याने शालेय शिक्षण घेतले होते किंवा नाही याबद्दल तज्ज्ञांत एकमत नाही, मात्र जगाच्या शाळेत तो खूप काही शिकला. जगण्यासाठी त्याने अनेक व्यवसाय केले. पण बहुतेक ठिकाणी त्याला अपयशच आले. लहानपणापासून त्याला वाचनाची प्रचंड आवड होती. त्याच्या प्रचंड वाचनाच्या खुणा त्याच्या कादंबरीत स्पष्ट दिसतात. तरुणपणी त्याने विविध प्रकारचे लेखन केले. पण या क्षेत्रातही त्याला फारसे यश मिळाले नाही.

वयाची साठी जवळ आल्यावर त्याच्यावर आणखी एक संकट आले. सरकारी रकमेत अफरातफर केल्याच्या आरोपावरून त्याला तुरुंगवास भोगावा लागला. या तुरुंगवासातच त्याने त्याची बहुचर्चित ‘डॉन किहोते द ला मांचा’ ही कादंबरी लिहावयास सुरुवात केली. या कादंबरीचा नायक अलोन्सो किहाना हा पन्नाशीला आलेला एक प्रौढ गृहस्थ आहे. सरळ, साध्या, मनमिळावू अशा अलोन्सोला प्राचीन काळी होऊन गेलेल्या शिलेदारांच्या पराक्रमांच्या कथा वाचण्याचे प्रचंड वेड आहे. या पुस्तकांनी त्याला एवढे झपाटून टाकले की त्यातील घटना व पात्रे कल्पित नसून खरीच आहेत असे त्याला वाटू लागले. एवढेच नव्हे तर शिलेदारीची खंडित झालेली परंपरा पुनरुज्जीवित करणे हे आपले जीवितकार्य होय अशी त्याची मनोमन खात्री पटली. या पुस्तकात दाखविल्याप्रमाणे संकटात सापडलेले दुबळे जीव व सुंदर रमणी यांच्या रक्षणाची जबाबदारी आपलीच आहे असेही त्याने स्वत:च ठरविले. हे खूळ त्याच्या डोक्यात एवढे भरले की त्याने आपले नाव बदलून डॉन किहोते असे भारदस्त नाव घेतले, रोसिनान्ते नावाचा एक मरतुकडा घोडा, एक जुने चिलखत व भाला घेऊन तो ह्या मोहिमेवर निघाला.

यानंतर डॉनने केलेली विलक्षण आश्चर्यजनक, चमत्कारिक साहसे म्हणजेच या कादंबरीची कहाणी आहे. साहसाचे  सदैव डोक्यात वेड असल्यामुळे, पवनचक्क्या त्याला महाकाय राक्षसासारख्या वाटू लागल्या, खानावळवाला किल्लेदार वाटू लागला व नोकर स्त्रिया राजकन्या भासू लागल्या. काही काळानंतर या भ्रमंतीत त्याला सांचो पांझा नावाचा साथीदार मिळाला. हा माणूसही त्याच्या मालकासारखाच जागतिक साहित्यात अजरामर होऊन गेला आहे. अर्धशिक्षित, स्वत:ला व्यवहारी म्हणविणारा, पण थोडा मूर्ख; सदैव जमिनीवर पाय असणारा आणि स्वप्नांची टर उडविणारा हा माणूस डॉनच्या अगदी विरुद्ध टोकाचा आहे. तो पावलोपावली डॉनची खिल्ली उडवितो. आपल्या मतांच्या समर्थनार्थ इरसाल म्हणींची भेंडोळी सारखी तोंडातून काढत राहतो. तो डॉनला विरोध करतो. पण दोघांच्या संध्याकाळच्या भाकरीची व्यवस्थाही करतो. या दोघांना घेऊन सर्वान्तीसने अफलातून साहसांची, विलक्षण प्रसंगांची मालिकाच सादर केली आहे.

‘डॉन किहोते...’ या महाकादंबरीतील ‘डॉन आणि पवनचक्क्या’ हा अत्यंत गाजलेला प्रसंग आहे. डॉन व त्याचा सेवक सांचो मोहिमेवर निघाले असताना डॉनच्या मनात सतत नव्या साहसाचे विचार येत असतात. आपण एखादा मोठा पराक्रम केव्हा करतो असे त्याला झालेले असते. अशा वेळी काही अंतरावर त्याला एका टेकडीवर असलेल्या तीस-चाळीस पवनचक्क्या दिसल्या. डॉन आनंदाने संचोला म्हणाला, ‘‘मित्रा, अनपेक्षितपणे आपल्या नशिबाने आपल्यासमोर केवढी उत्तम संधी आणून ठेवली आहे! किमान तीस संतप्त राक्षस तेथे दिसत आहेत. त्यांचे हात पाहा, किती लांब आहेत! त्यांचा नाश करणे, ही दुष्ट जमात पृथ्वीवरून नामशेष करणे ही ईश्वराची खरी सेवा ठरेल. शिवाय त्यांनी पळवून, लपवून ठेवलेली संपत्तीदेखील आपल्याला आयतीच मिळेल.’’

यावर सांचो हसून म्हणाला, ‘‘महाराज, त्या पवनचक्क्या आहेत, ते राक्षस नाहीत. ज्यांना तुम्ही हात म्हणता ते त्यांचे पंख आहेत. वाऱ्याने ते फिरतात व गिरणी चालू होते.’’

डॉनला वाटले की सांचो राक्षसांना घाबरतो आहे, म्हणून तो म्हणाला, ‘‘तुला भीती वाटत असेल तर तू येथेच थांब. मी एकटा त्या दुष्टांचे निर्दालन करू शकतो.’’

तेवढ्यात जोराचा वारा सुटला व पवनचक्क्यांचे पंख अधिक जोराने फिरू लागले. ते पाहून डॉनला वाटले की समोरचे राक्षस हल्ल्याची तयारी करीत आहेत. तो जोराने ओरडून म्हणाला, ‘‘थांबा दुष्टांनो, तुम्हांला या अपराधाचे प्रायश्चित्त भोगावे लागेल.’’ त्याने आपल्या घोड्याला टाच मारली  व आपला भाला उगारून जवळ असलेल्या एका चक्कीवर चाल केली. पाठीमागून सांचो ‘नको, नको’ असे ओरडत होता. पण डॉनने त्याच्याकडे मुळीच लक्ष दिले नाही. त्याने आपला भाला त्वेषाने पवनचक्कीच्या एका पंखात रुतविला, परंतु वारा जोराने वाहत असल्यामुळे पंखात अडकून त्या भाल्याचेच तुकडे झाले व डॉन आणि त्याचा घोडा दूरवर फेकले गेले. सांचो जेव्हा त्याच्या मदतीस धावून गेला तेव्हा जमिनीवर पडलेला डॉन वेदनांनी कळवळताना त्याला दिसला. सांचो म्हणाला, ‘‘महाराज, मी म्हटले नव्हते का, ते राक्षस नाहीत म्हणून.’’

यावर त्याला वेड्यात काढीत डॉन उत्तरला, ‘‘अरे, ते राक्षसच आहेत. पण माझा शत्रू फ्रेस्तन याने जादूने त्यांचे रूपांतर पवनचक्क्यांत केले.’’

 मार लागून सारे अंग ठणकत असतानादेखील डॉन आपल्या मनातील कल्पनांचा त्याग करायला तयार नव्हता.

डॉन आणि पवनचक्क्या यांच्यातील हा प्रसंग कादंबरीची पुढली दिशा स्पष्ट करणारा कळीचा प्रसंग तर आहेच. पण वाचकांना सर्वाधिक आवडलेला असाही तो आहे. माणसाला आपल्या समोर दिसणारे शत्रू हे अनेक वेळा खरे शत्रू नसतातच. माणूस मनानेच एक शत्रू-प्रतिमा निर्माण करतो आणि त्या भ्रामक शत्रूंवर हल्ला करण्याचा प्रयत्न करतो. या लढ्यात अपयश जरी आले तरी ते मानण्याची त्याची तयारी नसते. उलट आपल्या पराभवाची कारणे शोधून त्यामागे एखादी मोठी गूढ शक्ती आहे असे तो मानू लागतो. ‘दिसते तसे नसते’ हे त्याला माहीत नसते. एखाद्याला माहीत असले तरी त्याला ते पटत नाही. उलट आपल्याला जे दिसते तेच सत्य अशी त्याची धारणा असते.

भ्रम आणि भ्रमनिरास यांतील द्वंद्व हे या कादंबरीचे  महत्त्वाचे आशयसूत्र आहे. त्याचबरोबर वास्तव आणि कल्पित यांतील धूसर सीमारेषा, श्रद्धा व अश्रद्धेची  मनातील लढाई, वेडेपणा आणि शहाणपणा यांतील भेद, उघड्या डोळ्यांनी स्वप्ने पाहाणारा सौंदर्यवाद आणि कठोर सत्ये सांगणारी वास्तववादी दृष्टी यांचा संघर्ष ही या कादंबरीची आणखी काही प्रमुख  आशयसूत्रे आहेत.

डॉनला होणाऱ्या भ्रमाबद्दल बरेच काही लिहिले गेले आहे. पण खरा प्रश्न हा आहे की भ्रमाशिवाय माणूस जगू शकतो का? भ्रम हे त्याचे बळ आहे. भ्रम हा जगाच्या प्रगतीसाठी हवा असतोच. भ्रमाला श्रद्धेची बैठक असली की तो अधिक कणखर बनतो. डॉनवर आजूबाजूच्या वास्तव जगाचा काहीच परिणाम होत नाही. लढाईतील पराभव, कुचेष्टा, काहीही त्याला त्याच्या मार्गापासून दूर करू शकत नाही. जर अशा स्वप्ने पाहणाऱ्याला वेडा म्हणायचे तर ती मुळीच न पाहणाऱ्याला शहाणा म्हणायचे का? आयुष्य जसे आहे तसे दिसणे, पाहणे हाच वेडेपणा आहे असे सर्वान्तीसचे मत होते. उनामुनो या स्पॅनिश विचारवंताने 'Tragic sense of Life' या ग्रंथात लिहिले आहे, ‘‘डॉनच्या लढाईचे युद्धक्षेत्र त्याचा आत्मा आहे हे ध्यानात घ्या, मग मला सांगा की ह्या लढ्यात हसण्यासारखे काय आहे? त्याच्या आत्म्याच्या गरजा फार मोठ्या आहेत.’’

या महाकादंबरीच्या वाचनानंतर एकदा मला जाणवले की डॉन व सांचो मिळून आपणच तर तयार होतो आहो! हे दोघे जण बाहेर कुठे नसून आपल्या आतच आहेत. आपली सारी स्वप्ने, आपले भ्रम, आपली सुस्थिर जीवनाची ओढ, ऐहिक सुखाची आशा हे सारे इथे प्रतिबिंबित झाले आहे. सर्वान्तीस आपल्याला आपल्या स्वप्नांची नवी ओळख करून देतो. आपल्या मर्यादांचीही. इथून आपल्याही दृष्टीत परिवर्तन घडते. समोरची जोडगोळी आता विनोदी राहत नाही, त्यांना हसणारी मंडळीच हास्यास्पद बनतात. ही  कादंबरी वाचण्यापूर्वीचे आपण कादंबरी वाचल्यानंतर राहत नाही.

 डॉन, सांचो आणि पवनचक्क्या यांची मोहिनी सामान्य माणसालाही पडली आहे आणि ती आजवर टिकून आहे. स्पेनमध्ये काही पवनचक्क्या नव्याने बांधल्या असून एका चक्कीच्या आवारात डॉन व सांचोची पोलादाची शिल्पे उभारण्यात आली आहेत. या तिघांचे साहचर्य जनमानसानेही मान्य केले आहे.

‘डॉन किहोते...’ या कादंबरीचा मराठी अनुवाद मी प्रथम वाचला तो 1968 मध्ये. गेल्या पन्नास वर्षांत मी पुन:पुन्हा अनेक वेळा या कादंबरीकडे  वळत राहिलो आहे. तिचे संक्षिप्त इंग्रजी भाषांतर वाचले, नंतर Samuel Putnam ने केलेले सुमारे एक हजार पृष्ठांचे मूळ भाषांतरही मिळवून वाचले. या कादंबरीचा जगातील महत्त्वाच्या लेखकांवर परिणाम झालेला आहे असे वाचनात आल्यावर त्यापैकी काही लेखक व त्यांच्या संबंधित कलाकृती वाचल्या. त्या संदर्भात मी माझ्या ‘मृगजळाची तळी’ मॅजेस्टिक प्रकाशन - 2000 या पुस्तकात सविस्तर चर्चा केली आहे. मात्र ‘डॉन किहोते..’ हा एक असा ग्रंथ आहे की वाचकाला त्याच्याकडे पुन:पुन्हा वळावे वाटते आणि प्रत्येक वेळी काहीतरी नवे त्याला सापडते. मधल्या काळात या कादंबरीने एवढे झपाटून टाकले होते की मी माझ्या लेटरहेडवरदेखील डॉन आणि सांचोचे चित्र टाकले.

डॉन आणि सांचो जर या आधुनिक काळात येतील तर त्यांचे रूप कसे असेल हे दोन वर्षांपूर्वी प्रकाशित झालेली माझी कादंबरी ‘कवीची मस्ती’चे एक महत्त्वाचे आशयसूत्र आहे. ती लिहीत असताना ज्या वेळी मी पुन्हा सर्वान्तीसची महाकादंबरी वाचली तेव्हा ‘मृगजळाची तळी’ लिहिताना जी सोय मला उपलब्ध नव्हती ती झाली होती. नेटवर सर्वान्तीस, डॉन, सांचो यांच्या संदर्भातील माहितीचा फार मोठा खजिना मला उपलब्ध झाला होता. तो धुंडाळताना अचानक मला डॉन व सांचो या पात्रांना केंद्रस्थानी ठेवून अनेक व्यंगचित्रकारांनी काढलेली व्यंगचित्रे सापडली. माझा या विषयातील रस पाहून प्रख्यात व्यंगचित्रकार वसंत सरवटे यांनी मला काही व्यंगचित्रे पाठविली. ती पाहताना माझ्या ध्यानात आले की सर्वान्तीसने आपल्या पात्रांकडे व्यंगचित्रकाराच्या नजरेनेच पाहिले आहे. आणि या लेखाचे बीज मनात पडले.

व्यंगचित्रकार समोरच्या जगातील विसंगती टिपत असतो. विसंगती टिपण्याची जन्मजात दृष्टी असल्याशिवाय कुणीही व्यंगचित्रकार बनू शकत नाही. शोधक नजरेने तो हे आजूबाजूचे जग धुंडाळत असतो. त्यातला विनोद त्याला दिसतो आणि तो रेषांतून मांडण्याचा त्याचा प्रयत्न असतो. प्रभाकर ठोकळांनी म्हटले आहे, ‘‘थट्टा ही माणसाची नैसर्गिक प्रेरणा आहे. त्या प्रेरणेचे दृश्य स्वरूप म्हणजे व्यंगचित्र. व्यंगचित्रात हास्य असते, मात्र केवळ हसविणे हेच व्यंगचित्रकाराचे एकमेव उद्दिष्ट नसते. वाचकांनीही व्यंगचित्रकाराकडून केवळ हसविण्याची अपेक्षा करू नये ते यासाठीच. मानवी जीवनाविषयी सर्वच कलावंतांप्रमाणे त्यालाही काही निश्चित भाष्य करायचे असते. त्यासाठी तो कधी उपहासाचा, कधी अतिशयोक्तीचा, कधी fantasy चा  आश्रय घेताना दिसतो. अर्थात श्रेष्ठ कलावंतांप्रमाणे त्याच्याजवळ मनुष्यप्राण्याविषयी आस्था आणि करुणा असणे अत्यंत आवश्यक असते. ती नसेल तर त्याची चित्रे ही तर्ककठोर ठरतील, एकांगी ठरतील. परंतु हेही खरे की व्यंगचित्रामागचा विचार किंवा चिंतन व त्यांतील गंमत यांचा तोल सांभाळला गेला पाहिजे. केवळ विचार हावी व्हायला नको.’’

विसंगती टिपण्याची अस्सल व्यंगचित्रकाराची ही नजर सर्वान्तीसजवळ आहे. त्याची पात्रे ही शब्दांतून रेखाटलेली व्यंगचित्रेच आहेत. तोही त्यांचे चित्रण करताना उपहासाचा, अतिशयोक्तीचा व fantasy चा सढळ वापर करतो. मानवी मनोव्यापारांची त्याची जाण अजोड आहे. आणि त्याच्या मनात मानवाविषयी करुणाही आहे. मधुकर धर्मापुरीकरांनी एकदा एक कोटेशन सांगितले होते- "A poet represents a guilt of the age; a cartoonist represents conscious of the age." सर्वान्तीस हा असाच त्याच्या काळाच्या conscious चे प्रतिनिधित्व करणारा आहे. या साऱ्या गोष्टींमुळे व्यंगचित्रकारांनादेखील तो जवळचा वाटत असला पाहिजे.

या लेखात आपण डॉन, सांचो आणि पवनचक्क्या यांच्या संदर्भातील काही व्यंगचित्रे पाहणार आहो-

चित्र क्रमांक 1 डॉन आणि पवनचक्क्या यांच्यातील समर प्रसंगाच्या आधीचा क्षण चित्रकाराने येथे चित्रित केला आहे. डॉनचे सारे लक्ष पवनचक्क्यांवर केंद्रित झाले आहे. मात्र सांचोचे ‘लक्ष’ दुसरीकडेच आहे. त्याची बहुतेक जेवायची वेळ झाली आहे. तो म्हणतो, ‘‘महाराज, जरा किती वाजले ते पाहाल का? मला आता निघाले पाहिजे. तुम्हांला या प्रकरणात यश मिळो ही सदिच्छा.’’

आपला धनी अव्यवहारी आहे हे सांचोला माहीत आहे. मात्र इतक्या दिवसांच्या अनुभवाने ‘वेळ’ झाली की पोटाची सोय आपल्यालाच करावी लागेल हेदेखील त्याला ठाऊक आहे. त्यामुळे तो चक्क साहसाकडे पाठ फिरवून घड्याळात पाहत परत निघाला आहे.

डॉनला पवनचक्क्या राक्षसासारख्या दिसतात हे आपल्याला ठाऊक आहे. मात्र या चित्रात चित्रकार डॉनसमोरील चक्कीची बैठक पुस्तकेच आहेत अशी कल्पना मांडतो. डॉनच्या वेडाचे मूळ पुस्तकांत आहे ही लेखकाची संकल्पना  किती प्रभावीपणे चित्रांतून मांडली गेली आहे!

ग्रंथ आणि डॉन यांच्या साहचर्याची हीच कल्पना क्रमांक 3 च्या चित्रात चित्रकाराने रेखाटली आहे. पवनचक्क्यांशी लढा देऊन डॉन परत आला आहे. आपला शत्रू असलेल्या जादूगाराने राक्षसांना पवनचक्क्याचे रूप देऊन आपल्याला फसविले हे त्याच्या पक्के मनात बसले आहे. पण तो असा हार खाणारा नाही. नवीन लढ्याची तो तयारी करतो आहे. आता ‘पवनचक्की’ या विषयावर मिळतील तेवढी पुस्तके त्याने गोळा केली आहेत. त्यांचा तो अभ्यास करतो आहे. आणि अर्थातच त्याला खात्री आहे की हा अभ्यास झाल्यावर त्याला त्यांचे खरे रूप समजेल व तो पुन्हा त्यांच्यावर हल्ला करून त्यांचा नाश करेल. जगण्याच्या लढाईत पुस्तके हेच त्याचे महत्त्वाचे ‘पाठबळ’ आहे हे स्पष्ट होते. 

चित्र क्रमांक 4 मध्ये एक काल्पनिक प्रसंग चित्रकाराने रेखाटला आहे. डॉन नव्या मोहिमेसाठी समुद्रावर सफर करतो आहे. त्याची बोट एका बेटाच्या किनाऱ्यावर आपटून तिचे तुकडे होतात. आता या बेटावर राहण्यासाठी निवारा करणे तर आवश्यक आहे. डॉन बोटीच्या तुटलेल्या लाकडातून एक झोपडी तयार करण्याचा प्रयत्न करतो आहे. पण त्याचे मन ‘पवनचक्की’ या विषयाने इतके झपाटून गेले आहे की त्याच्या नकळत तो एक ‘पवनचक्की’सारखेच घर बांधतो आहे. शत्रू असला तरी तो मनात पक्का घुसून बसला आहे, काय करणार?

क्रमांक 5 च्या चित्रात डॉन भाला उगारून त्वेषाने पवनचक्कीवर हल्ला करण्यासाठी धावून येत आहे. मात्र या वेळी त्याच्या एकंदर आविर्भावाने ती पवनचक्कीच घाबरली आहे, आणि त्याच्यापासून सुटका करून घेण्यासाठी पळत आहे, की ती पळते आहे असा भ्रम डॉनला होतो आहे?

चित्र क्रमांक 6 मध्ये पवनचक्क्यांच्या मनातील भावनांची हीच कल्पना एका वेगळ्या कोनातून दाखविली आहे. डॉनचे आपल्या अंगावर धावून येणे आणि आपण त्याच्यापासून दूर पळणे ही बाब आता पवनचक्क्यांच्या अंगवळणी पडली आहे. तो नेहमीचाच भाग बनला आहे. पण या वेळी मात्र एका पवनचक्कीला त्याची दया आलेली दिसते. दुरून डॉन येताना दिसल्यावर ती दुसरीला म्हणते, ‘‘या वेळी त्याला आपण आपल्याला पकडू द्यायचे का?’’ अर्थात दया येऊन ती असे म्हणते का हेही निश्चित सांगता येत नाही. डॉन अंगावर धावून आला की आपल्या पंखांपुढे त्याचे काही चालणार नाही, उलट त्यालाच चांगली अद्दल घडेल; तेव्हा ती मजा पाहावी असा तर या चक्कीचा उद्देश नसेल? अनेक अर्थ सूचित करणाऱ्या कादंबरीवर आधारित व्यंगचित्रांनीही अनेक अर्थांचे मुखवटे घालावेत हे समर्पकच आहे.

चित्र क्रमांक 7 मधील पवनचक्क्यांनी मात्र वेगळीच शक्कल लढविलेली दिसते. आता डॉन आपल्याला शत्रू समजतो हे साऱ्या चक्क्यांना माहीत झाले आहे. उगीच त्याच्याशी लढा का घ्या? मग त्यांनी त्यांच्याकडे येणाऱ्या प्रत्येक रस्त्यावर No Entry ची पाटी लावून टाकली आहे. डॉनच्या स्वभावातील एका वैशिष्ट्याचा चित्रकाराने उत्तम उपयोग करून घेतला आहे. या कादंबरीतील डॉन हा अत्यंत सभ्य व शिष्टाचार मानणारा आहे. समाजाचे नीतिनियम तो काटेकोरपणे पाळतो. त्यांचा आदर करतो. त्याचा हा गुण  जगजाहीर झालेला आहे. त्यामुळे एकदा No Entry ची पाटी रस्त्यावर लावली की अशी पाटी असलेल्या रस्त्यावर तो आपले पाऊल कदापि टाकणार नाही, आणि परिणामी आपण सुरक्षित राहू याची त्या चक्क्यांना खात्री आहे. तो बिचारा मात्र आता कोठे जावे या विचारात पडला आहे.

चित्र क्रमांक 8 

मात्र अशाच दुसऱ्या एका पाटीने डॉनची फार पंचाईत करून टाकली आहे. डॉन ज्या शहराकडे निघाला आहे त्या शहरानेदेखील त्याच्याकडे येणाऱ्या रस्त्यावर ‘डॉनला प्रवेश नसल्या’ची पाटी लावली आहे. सर्वसाधारणपणे माणसांचे जग हे असेच असते. तिथे ‘छापाचे गणपती’ चालतात, ‘काही वेगळा विचार करणाऱ्या डॉनला’ मज्जावच असतो. आता डॉनने कोठे जावे? साहसाचा रस्ता तर बंद झाला आहे. व्यवहाराचा रस्ताही बंद झाला तर? पुढे काय?

‘डॉन किहोते-’ या कादंबरीच्या शेवटी असंख्य साहसांत भाग घेऊन, संकटांचा सामना करीत, पराभूत होत डॉन आणि सांचो परत आपल्या गावात येतात. येथे आल्यावर डॉनला साक्षात्कार होतो की त्याचे आजवरचे जीवन हा एक शुद्ध मूर्खपणा होता. शिलेदारीचे वेड त्याच्या डोक्यातून निघून जाते. डॉन व सांचो ही परस्पर विरोधी टोकावर असणारी माणसे असली तरी जसजशी कादंबरी पुढे सरकते तसतसा डॉन सांचोकडे व सांचो डॉनच्या दिशेने सरकत जातात. यालाच एका समीक्षकाने "Quixotification of Sancho and Sanchification of Quixote" असे म्हटले आहे. सांचोला स्वप्नांचे महत्त्व समजू लागते व डॉनचे पाय जमिनीवर स्थिरावण्याचा प्रयत्न करू लागतात.

‘डॉन किहोते-’ या कादंबरीच्या शेवटावर आधारित ‘यात्रिक’ या नावाची कथा जी.ए. कुलकर्णी यांनी लिहिली आहे. सत्यकथा ऑगस्ट 1975 मध्ये. या कथेच्या शेवटी डॉन संचोला म्हणतो की, मी किती मूर्ख होतो हे आता मला स्वच्छ समजले... वीतभर कुवतीचा मी एक सामान्य माणूस, मला कसला भ्रम झाला कुणास ठाऊक, अगदी वाहवत गेलो मी. पण आता मात्र ती भूतबाधा साफ उतरली बघ. आता माझ्यासाठी कुठेतरी एक लहान जागा शोधून ठेव. मला थोडे बरे वाटल्यावर मी गहू आणि जळाऊ लाकडाचे दुकान टाकणार आहे. भव्य स्वप्ने पाहणाऱ्या डॉनचे असे जमिनीवर उतरणे मनाला चटका लावून जाते.

अशीच काहीशी कल्पना चित्र क्रमांक 9 मध्ये व्यंगचित्रकाराने केली आहे. डॉन आता ‘बरा’ झाला आहे. संसारी बनला आहे. आता पवनचक्कीला तो राक्षस समजत नाही. म्हणूनच दळण दळण्यासाठी आपले धान्याचे पोते घेऊन तो चक्कीमध्ये दाखल झाला आहे. बारकाईने हे व्यंगचित्र पाहताना दिसते की डॉनने आत जाण्यापूर्वी आपला भाला आणि ढाल बाहेर काढून ठेवली आहे. जणू शस्त्रास्त्रांचा त्याग करून तो पवनचक्कीला शरण गेला आहे.

आपलेही असेच होत असते. एके काळी स्वप्नांची ओझी आनंदाने वाहणारे आपण, काळ जसजसा पुढे सरकत जातो तसतसे त्या स्वप्नांचे ‘ओझे जड’ वाटू लागते. आपल्या मर्यादा आपल्याला कळू लागतात. शस्त्रे उतरवून ठेवावीत तशी ती स्वप्ने आपण दाराबाहेर उतरवून ठेवतो. वास्तवाची मीठ-भाकर आता आपल्याला जवळची वाटू लागलेली असते. डॉन आणि सांचो मिळून आपण तयार झालेलो असतो हे खरेच आहे. पण या जगाचा आपला अनुभव आपल्यातील ‘डॉनचे’ प्रमाण हळूहळू कमी करीत जातो आणि शेवटी आपल्यात कधी काळी एक डॉन वस्तीला होता हेही आपण विसरून जातो.

‘मरणांती वैराणि’ अशी आपल्याकडे संकल्पना आहे. माणूस मरण पावला की वैर आपोआप संपते. जगात अनेक संस्कृतींत ही धारणा मानली जाते. चित्र क्रमांक 10 मध्ये चित्रकाराने याच संकल्पनेचा उपयोग केलेला आहे. डॉन किहोते मरण पावल्यानंतरची घटना त्याने या चित्रात रेखाटली आहे. डॉन मरण पावल्याचे समजल्यावर त्याच्या अंत्ययात्रेसाठी आल्या आहेत त्या सगळ्या पवनचक्क्या. या माणसाने आयुष्यभर आपल्याला शत्रू समजले, आपल्याशी उभा दावा धरला हे त्यांना ठाऊक आहे, तरी त्या आलेल्या आहेत, स्वप्न पाहण्याच्या त्याच्या जिद्दीला सलाम करण्यासाठी. कॉनराड रिक्टरची 'The Awakening Land' या नावाची एक अप्रतिम कादंबरी आहे. दाट जंगलात राहणारी त्या कादंबरीची नायिका सेर्ड आयुष्यभर अजस्र झाडांशी वैर धरते, त्यांचा नाश करू पाहते, पण शेवटचे दिवस नजरेसमोर दिसू लागले की तिला आपल्या खिडकीसमोर झाडे असावी वाटतात. दीर्घ सहवासाने द्वेषांतूनही प्रेम निर्माण होऊ शकते. या व्यंगचित्रातील पवनचक्क्या हेच सांगून जातात. सर्वान्तीसची कादंबरी ही आपल्याला हसता हसता गंभीर बनविते. हे व्यंगचित्र म्हणजे चित्रकाराने त्या लेखकाच्या कलेला केलेला सलामच आहे. या अंत्ययात्रेत एकही माणूस सामील झालेला दिसत नाही हा विरोधाभास देखील कादंबरीच्या आशयाशी अतिशय जवळचे नाते सांगणारा आहे!

(‘डॉन आणि सांचो ही जशी जागतिक कलाविश्वात गाजलेली जोडगोळी आहे तशीच डॉन आणि पवनचक्क्या हीदेखील विविध क्षेत्रांतील कलावंतांना कायम आकर्षित करून घेणारी जोडी आहे. या जोडीला मध्यवर्ती ठेवून विविध व्यंगचित्रकारांनी केलेल्या विलक्षण कल्पनाविलासाची आणि त्यांनी निर्मिलेल्या अफलातून विश्वाची ही मनोहर सफर. साहित्यातील एखाद्या पात्रावर इतक्या कलाकारांनी व्यंगचित्रे काढल्याचे दुसरे उदाहरण नाही.’)

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

विजय पाडळकर,  पुणे
vvpadalkar@gmail.com

जन्म : 04-10-1948 (बीड, महाराष्ट्र) 
महाराष्ट्र बँकेत 30 वर्षे नोकरीनंतर पूर्णवेळ लेखनासाठी स्वेच्छानिवृत्ती : 01-02-2001 
एकंदर 35 पुस्तके प्रकाशित. 
प्रामुख्याने आस्वादक साहित्य समीक्षा, व चित्रपट आस्वाद-अभ्यास या विषयांवर विपुल लेखन केले आहे. 

website : www.vijaypadalkar.com


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके