डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

आमच्या गावात आम्हीच सरकार - नक्षलवादी चळवळीला पर्याय?

आमची दुःखं, प्रश्न, अडचणी आम्हालाच कळतात. त्या आम्हीच सोडवणार. दुसऱ्या कोणी सोडवण्यावर आमचा विश्वास नाही. तसा अनुभवही नाही... गडचिरोली जिल्ह्यातील मेंढालेखा या आदिवासी गावात गेली वीस वर्षे ग्रामसभेचे राज्य आहे. येथील एकही प्रकरण पोलिसस्टेशन... कोर्टकचेरीत गेलेले नाही. प्रत्यक्ष पाहणीतून केलेले अनुभवकथन... येणाऱ्या 26 जानेवारीच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त तर हा अनुभव सर्वच परिवर्तनवाद्यांना अधिकच प्रेरणादायी आहे. परंतु दुसरी बाजूही लक्षात घ्यावयास हवी. प्रत्यक्षात आज याच भागात शासनाच्या निष्क्रियतेमुळे बालमृत्युंचे प्रमाण वाढत आहे. शासनाला जागे करून कुपोषणाने होणारे बालमृत्यू थांबवणे गरजेचे आहे. आदिवासी भागात काम करणाऱ्या ‘सर्च’ संस्थेच्या डॉ. अभय आणि राणी बंग यांनी शासन व स्वयंसेवी संस्थांनी एकत्र काम करण्याचा उपाय सुचवला आहे.

संयुक्त वनव्यवस्थापन वा आमच्या गावात आम्हीच सरकार या दोन संकल्पना अत्यंत यशस्वीपणे गडचिरोली जिल्ह्यातील मेंढालेखा गावच्या गोंड आदिवासींनी राबविल्या असल्याचे समजल्यावरून ह्या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन पाहण्याचा योग कोकण विकास समन्वय व्यासपीठाच्या माध्यमातून नुकताच मिळाला. 

कोकणामध्ये विविध प्रश्नांवर व त्यातल्या त्यात जंगलाच्या प्रश्नावर काम करणाऱ्या काही संस्था, संघटनांनी मिळून कोकण विकास समन्वय व्यासपीठ उभे केले आहे. या व्यासपीठाला मुंबईमधील विकास सहयोग प्रतिष्ठान व आर एस.सी.डी. या स्वयंसेवी संस्थांचा मोठा आधार आहे.

ठाणे जिल्ह्यातील जव्हारमधील कुपोषित आदिवासी बालकांच्या प्रश्नांवर कार्य करणारी ‘नवदृष्टी’ संस्था, मुरबाड, शहापूर, उल्हासनगरमध्ये कार्यरत ‘वननिकेतन’ ग्रामीण विकास प्रकल्प मोरवाड्यातील सुविधा सामाजिक सेवा संस्था, तर रायगड जिल्ह्यातील कर्जत, खालापूर, पनवेलमध्ये कार्यरत ‘दिशा केंद्र’ जांभूळपाडा विभागात टाटा सामाजिक विज्ञान संस्थेमार्फत कार्य करणारी आदिवासी विकास संघटनांच्या सुमारे ४० कार्यकर्त्यांच्या गटाने 22 डिसेंबर ते 26 डिसेंबर या काळात गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यात अभ्यासदौरा आयोजित केला होता. मेंढालेखा प्रकल्पाव्यतिरिक्त ‘सायगाटा’ (ता. ब्रह्मपुरी) प्रकल्प, सातरा तुकूम (जि. चंद्रपूर) प्रकल्प पाहण्यात आले.

मेंढालेखा या गावात गोंड आदिवासींची वस्ती असून म्हणजे सर्वजण एकाच समाजातील असून एकसंघ आहेत. गावात एकीची भावना असून फूट नाही. कोणत्याही राजकीय पक्षाला येथे थारा नाही की पक्षीय पुढाऱ्यांचा आधार नाही. पण येथील लोकांचे राजकीय विचार मात्र पक्के आहेत.

‘...आमची दुःखं, आमचे प्रश्न, आमच्या अडचणी' आम्हाला कळतात. त्या आम्हालाच सोडाव्या लागतील. त्या आम्हीच सोडवणार, त्या दुसरे कोणी सोडवणार, यावर आमचा विश्वास नाही. तसा आमचा अनुभव नाही. पक्ष, पुढारी निवडणुकीच्या काळातच येतात. बोंबलत फिरतात व तडमडत निघून जातात. मुंबई, दिल्ली येथे सरकार स्थापन होतं खरं, ते आमचे सरकार असलं तरी आम्ही त्यामध्ये नेमके कोठे आहोत? आमच्या गावात मात्र आम्हीच सरकार आहोत. आमचे निर्णय आम्ही घेतो. गेल्या 20 वर्षात आमच्या ग्रामसभा राज्यात एकही प्रकरण पोलिस स्टेशन, कोर्ट-कचेरीला गेलेले नाही. आम्ही माणसे आहोत. आमच्यातही भांडणे होतात, मारामाऱ्या होतात पण आम्हीच एकत्र येऊन निर्णय करतो. जोपर्यंत गुन्हेगार गुन्हा कबूल करीत नाही तोपर्यंत गावचे कोर्ट/सभा उठत नाही सर्वानुमते घडलेल्या चुकीचे/अपराधाचे परिमार्जन होऊन कोणत्याही विषयावर एकमत (बहुमत नव्हे) होत नाही. तोपर्यंत आमची चर्चा, वादविवाद सुरूच राहतो. एखाद्या विषयावर किंवा सार्वमतैक्य होईपर्यंत अंतिम निर्णय होत नाही. 

बहुमताच्या संकल्पनेवर आमचा विश्वास नाही. आम्हाला विरोध करणान्यांना आम्ही आमचे खरे मित्र मानतो. कारण त्यांच्यामुळेच आमची निर्णयप्रक्रिया बळकट होऊन निर्णय बिनचूक व परिपक्व होतात. विरोध नसतील तर सम्यक् नर्णय होऊ शकणार नाही. अंतिम निर्णय होतो तेव्हा विरोधक विरोधक राहिलेला नसतो; तर त्याचे रूपांतर समर्थकात झालेले दिसते त्यामुळे निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी सर्वजण आपली ताकद पणाला लावतात, घेतलेले निर्णय, केलेले ठराव यांची खऱ्या अर्थाने अंमलबजावणी होते.

आमचा ‘गोटूल’ परंपरेने चालत आलेला महान सांस्कृतिक वारसा, अप्रतिम संस्कारकेंद्र, माणसाच्या उभ्या आयुष्यात समर्थपणे व परमोच्च आनंदाने सामोरे जाण्यासाठी भक्कम पाया ज्या आमच्या गोटूलात निर्माण व्हायचा तेच गोटूल इतिहासजमा होऊ लागल्याचे आमच्या जेव्हा लक्षात आले तेव्हा आम्ही ते नव्याने उभारण्याचा दृढ संकल्प केला. ज्या ठिकाणी आम्ही पूर्वी जमायचो तेच ठिकाण उद्ध्वस्त होताना आम्ही कसे काय पाहणार ? या विषयावर आमची ३ दिवस ग्रामसभा चालली. गोटूल नव्याने बांधण्याचा निर्णय झाला. सागाच्या झाडाच्या लाकडांनी आम्ही ते लगेच उभे केले. सागाचे लाकूड वापरले (आमच्याच जंगलातील) म्हणून वनाचे खाकी रखवाले(?) पुढे सरसावले. त्यांनी ते गोटूल निर्दयपणे जमीनदोस्त केले. आता तर आम्ही आणखी चिडलो , बारा गावच्या ग्रामसभात निर्णय झाले. एकाच रात्री एकाच वेळी बारा ठिकाणी बारा गोटूल उभी राहिली . ती सगळी सागवान लाकडांचीच. बुद्धिमान वन अधिकाऱ्यांनी विचार केला. गोटूल तोडले तर गोंड आदिवासींनी 12 उभी केली. 12 तोडली तर 144 उभी राहतील... त्यांनी एकसंघ आदिवासी समाजाकडे याबाबतीत लक्ष न द्यायचे शहाणपणाचे धोरण ठरवले. 

आमच्या निर्णयप्रक्रियेत महिला आघाडीवर असतात. दर पौर्णिमेच्या दिवशी आमची ग्रामसभा भरते. त्यामध्ये सर्वजण सामील होतात… आजूबाजूचे रक्षण केलेले, राखलेले घनदाट मनोहारी विलोभनीय अतिशय सुंदर असे प्राकृतिक जंगल, गावातील आदिवासींची भक्कम घरे, कुपोषणमुक्त वाळसेदार बालक, सुंदर पायरस्ते, कोणत्याही मदतीशिवाय उभारलेले छोटे छोटे मृद्संधारण प्रकल्प, वनौषधींचा खजिना, शेतीविकासासाठी आधुनिक तंत्राची व तंत्रज्ञानाची जोड, शिक्षणाची चांगली सोय, सुरेख निर्मळ लोभस जीवन गावचे स्वयंप्रेरित कार्यकर्ते देवाजी तोफा नेमके काय सांगून राहिले होते याची पारदर्शक साक्ष देत होते. 

ब्रह्मपुरी तालुक्यातला सायगाटा प्रकल्प तर आदर्शाचा नमुनाच. शेकडो एकर उजाड झालेल्या जमिनीवर नव्याने उभारू लागलेले अप्रतिम जंगल मानवी जिद्दीची यथार्थ- चुणूक दाखवीत होते. वनतलावावर पाणी प्यायला आलेली दोन रानडुकरे मनुष्य-प्राणी जीवनाचे अद्भुत मीलन दाखवीत होती. गावाशेजारीच उभे राहत असलेले जंगल आजूबाजूच्या गावकऱ्यांच्या हल्ल्यापासून कसे रक्षित केले जात आहे, याचे रसभरीत वर्णन सूर्यभान काका खोब्रागडे सांगत होते आणि ही कमाल गावामध्ये निरनिराळ्या प्रकारच्या आठ जातीचे लोक एकत्र नांदून करत होते हे पाहिल्यावर तर आपण काय पाहून राहिलो आहोत असे आश्चर्य वाटले. जातीय विषमतेच्या ग्रामीण जीवनातही सायगाटा गाव एक मोठे आश्चर्य आहे. गोंड आदिवासी, मराठा, बौद्ध, तेली, ब्राह्मण, इत्यादी आठ विविध जातींचे लोक एकाच - वनसंरक्षणाच्या विचारांनी प्रेरलेले - मी अन्य ठिकाणी कोठे पाहिले नाही, ऐकले नाही, वाचले नाही. कदाचित हा ‘हिरव्या’ देवाचाच चमत्कार असावा ! 

तेथून निघालो थेट चंद्रपूर जिल्ह्यात सातरा तुकूम या आदिवासी गावात. वरील दोन्ही प्रकल्प लोकांनी स्वतःहून सुरू केलेले तर तुकूम प्रकल्प शासनाच्या माध्यमातून सुरू झालेला. गावात वनसंरक्षण समितीने बांधलेले सुंदर समाजमंदिर सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. येथील लोकांनी आजूबाजूच्या परिसरातील प्राकृतिक जंगलाची अतिशय सुंदर पद्धतीने निगा राखली होती. सरकारी अनुदानातून मिळणारा पैसा संपूर्ण तुकूम गाव (96 आदिवासी घरांचे) स्वयंपूर्ण होण्यासाठी मोठ्या कौशल्याने वापरला जात आहे. नव्याने वृक्षारोपणही करण्यात येऊन त्यातील 20% वृक्ष जगलेले आहेत. येथल्या प्रयोगास एकाच वर्षापूर्वी सुरुवात झाली असली तरी प्रगती फारच मोठी दिसते, याचे सर्व श्रेय गावकऱ्यांबरोबरच या भागातील विभागीय वनअधिकारी श्री. चाफेकर यांना जाते. 

श्री. चाफेकर म्हणतात... शासन म्हणजे कोण? गावकरीच ना? शासन त्यांचेच आहे. मी सनदी नोकर आहे, मी आज येथे आहे, उद्या येथे नसेन. लोकांनी जंगल राखले, बाढवले तर त्याचा त्यांनाच फायदा होणार आहे. सर्व काही ते येथील आदिवासींचेच आहे, ही जाणीव मी त्यांना करून देतो. ग्रामवनसंरक्षणाचा 1992 चा अध्यादेश काय आहे, त्यात काय लिहिलेय हे मी आजपर्यंत या गावात कधी वाचून दाखवलेले नाही. यामागची जी भूमिका आहे ती मी पटवून देतो. जंगल तुमचे आहे. ते तुम्ही नाही राखणार तर कोण राखणार?... माझ्या या भूमिकेला लोकांनी प्रचंड पाठिंबा दिला आहे. आता तर येथील लोक वृक्षलागवड संवर्धनासाठी जैविक खते तयार करू लागले आहेत. मी नेहमी सांगतो की, तुमच्यासाठी मी कधी निर्णय घेणार नाही. तुम्ही ग्रामसभेत निर्णय घ्या. मी त्याला सरकारी चौकटीत बसवतो. मग माझ्यावर कोणी ‘ठपका’ ठेवला तरी हरकत नाही. 

लोकांना मी विचारले... ही समिती नियमाप्रमाणे १० वर्षांसाठी असणार आहे. मग त्यानंतर या जंगलांचे काय? तुमच्या सहभागाचे काय? अधिकारांचे काय? समजा सरकार बदलले, धोरण बदलले, अध्यादेश बदलला, पुढे जाऊन म्हटले की जंगलात तुमचा सहभाग नको, तुम्ही बाजूला व्हा, जंगल सरकारचे, सरकार त्याचे काहीही करेल. मग तुम्ही काय करणार?

लोक म्हणतात, सरकार बदलले, सत्ता बदलली , धोरण बदलले तरी पण आम्ही बदलणार नाही. जंगल आमचेच होते, आमचेच आहे आणि आमचेच राहणार. आम्ही आमचा हक्क, अधिकार सोडणार नाही. सरकारला सांगू जंगलचे 7/12 उतारे तुमचे पण जंगल आमचे. जंगल आम्ही ठेवतो. 7/12 उतारे तुम्ही घेऊन जा. गडचिरोली, चंद्रपूर जिल्हे नक्षलग्रस्त आहेत. नक्षलवाध्यांचा तुम्हाला कितपत त्रास होतो असे आम्ही विचारताच देवाजी तोफा म्हणाले, ‘आमच्या भागात नक्षलवाद्यांना थारा नाही. कारण आमच्या गावात आम्ही सरकार आहोत. पोलिस, महसूल, वनअधिकारी यांचे आमच्या ग्रामसभेपुढे काही चालत नाही. मालगुजारी कधीच आम्ही संपवली आहे. कोणताही अधिकारी आम्हा गावकऱ्यांना छळण्याचे धाडस करीत नाही. कोर्ट-कचेऱ्यांशी आमचा संबंध येत नाही. ‘गोटूल’ चे आम्ही पुनरुञ्जीवन केले आहे. आम्ही निःशस्त्र आहोत. हिंसेवर आमचा विश्वास नाही. ग्रामसभा ही आमची ताकद आहे . नक्षलवादी किंवा सरकार ती कोणी मोडू शकणार नाही . गोंडी भाषा ही आमची अस्मिता आहे. आमच्या गावात नक्षलवाद्यांनी शिरण्याचा प्रयत्न केला होता, पण आमच्या शोषणमुक्त, स्वयंपूर्ण जीवनामुळे त्यांनी तो नाद सोडून दिला.’ 

या भागातून परतत असताना नक्षलवादी चळवळीला समर्थ पर्याय उभे राहत आहेत या जाणिवेने मन उल्हसित होत होते. घटनाकारांनी ‘प्रजासत्ताक’ राज्याची जी संकल्पना पुढे ठेवली आहे त्याची चुणूक मेंढालेखा, सायगारा, तुकूम प्रकल्पांमध्ये पावलोपावली प्रत्येक पायरीवर खऱ्या अर्थाने जाणवत होती.

Tags: मलेरिया कुपोषण बालमृत्यू गडचिरोली सर्च गोटुळ तुकूम गोंड आदिवासी ग्रामसभा मेंढालेखा विजय साठे Malaria Malnutrition Child Mortality Gadchiroli Search Gotul Tukum Gond Tribe Gramsabha Mendhalekha Vijay Sathe weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके