डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

चौथी औद्योगिक क्रांती : आव्हानांचा पूर्णपणे नव्याने विचार करण्याची गरज (पूर्वार्ध)

औद्योगिक क्रांतीच्या प्रत्येक टप्प्यावर तंत्रज्ञानात आमूलाग्र बदल झाले. उत्पादनाचा वेग वाढला. मालाचा दर्जा सुधारला. त्यातून संस्थात्मक आणि राजकीय बदल झाले. याचबरोबर विषमतेमध्ये वाढ होत गेली. सर्व औद्योगिक क्रांत्या या पाश्चिमात्य देशांत निर्माण होऊन तिथे रुजल्या. त्या देशांमध्ये मुबलक भांडवल, कमी लोकसंख्या, लोकसंख्यावाढीचा दर कमी असल्याने तंत्रज्ञानाच्या साह्याने कमी श्रमात भरघोस उत्पादन हा फायदेशीर मामला ठरला. उत्पादित माल लोकसंख्येच्या मागणीच्या प्रमाणापेक्षा खूप जास्त असल्याने नव्या बाजारपेठांचा शोध घेणे क्रमप्राप्त झाले. अगदी पहिल्या औद्योगिक क्रांतीपासून ही प्रक्रिया निरंतर सुरू आहे. साम्राज्यविस्तार ते जागतिकीकरण असा हा सलग आलेख आहे.

सध्या कोरोनाचा लॉकडाऊन काळ सुरू आहे. रोजगार देणारी शहरं सोडून हजार-पंधराशे किलोमीटरवरील आपल्या गावाच्या दिशेने लाखोंच्या संख्येने मजुरांचे तांडे निघाले आहेत. बिस्किटं आणि पाण्यावर गुजराण करत ही मंडळी मार्गक्रमण करत आहेत. रस्त्यात अपघात, उष्माघात आणि अन्न-पाण्याविना मुले, महिला, पुरुष मृत्युमुखी पडत आहेत तरीही मजुरांचे तांडे गावाच्या दिशेने जात आहेत. इथे शहरात रोजगार मिळतो, बंधुभाव नाही- हा प्रचंड असुरक्षिततेचा धक्का मिळाल्याचा परिणाम आहे. आपल्या गावच्या घरातील जगणं सुखकारक मुळीच नाही, याची पूर्ण कल्पना असूनही त्यांना काहीही करून घर गाठायचे आहे. रात्री-बेरात्री खिडकीबाहेर डोकावले तर नि:शब्दपणे मान खाली घालून परप्रांतीय मंडळींचा जथा हे शहर सोडून जाताना दिसतो. हे कोरोनाप्रकरण लवकर संपेल, असे दिसत नाही. काही महिन्यांनी सगळं सुरळीत झालं तरी लस येत नाही, तोपर्यंत आपण सर्व जण भयग्रस्त राहणार आहोत. सारखे हात धुणार आहोत, मास्क लावणार आहोत. परस्परांपासून अंतर राखण्याचा प्रयत्न करणार आहोत.

बाजारात मिळणाऱ्या वस्तू निर्जंतुक व अस्पर्शित आहेत ना, याची खात्री करणार आहोत. सध्या टीव्हीवर ‘आमच्या कारखान्यात सगळं कसं निर्जंतुक वातावरणात अंतर राखून काम केलं जातं,’ याच्या जाहिराती सुरू झालेल्या आहेत. काही अर्थतज्ज्ञ आणि तंत्रज्ञांच्या मते, पुढील पंधरा-वीस वर्षांनी येणारी चौथी औद्योगिक क्रांती उद्यापासून सुरू होऊ शकते. मोठ्या प्रमाणात स्थलांतर, कारखान्यात मनुष्यबळाचा अभाव, साथीची भीती या वातावरणात कारखाना चालवायचा असेल तर रोबोंशिवाय पर्याय नाही, असा सूर आळवला जात आहे. आपण एका विचित्र स्थितीत सापडलेले आहोत. बाजारात वस्तुमालाला उठाव नाही, कारण खर्च करायला ग्राहकाकडे पैसे नाहीत. दुसरीकडे ऑटोमेशनचा आग्रह आणि स्थलांतरामुळे मोडकळीस आलेल्या ग्रामीण अर्थव्यवस्थेवर स्थलांतरित मजुरांचा ताण पडलेला आहे. आपण सगळेच ही स्थिती विषण्णतेने हतबल होऊन बघ्याच्या भूमिकेतून पाहत आहोत.

चौथी औद्योगिक क्रांती किंवा आय.आर.फोर हे प्रथमच ऐकलं तेव्हा ‘असेल काही तरी परदेशी खूळ’ असं झटकन वाटलं. मात्र जसजशी माहिती मिळू लागली तशी ही मंडळी आपल्या उंबरठ्यावर उभी आहेत, असं जाणवलं. ‘वर्ल्ड  इकॉनॉमिक फोरम’ ही चौथ्या औद्योगिक क्रांतीची प्रणेती.  ‘चौथी औद्योगिक क्रांती’ हे नाव ठसविण्याचे काम वर्ल्ड  इकॉनॉमिक फोरमने केले. या फोरमच्या दिल्ली ऑफिसच्या उद्‌घाटनप्रसंगी आपले पंतप्रधान मोदी काय म्हणाले, ते समर्पक आहे. ते म्हणाले, ‘‘आय.आर. एक व दोनच्या वेळी आम्ही पारतंत्र्यात होतो. आय.आर. तीनच्या वेळी आम्ही समाजवादाच्या जोखडात होतो. आता आय.आर. फोरच्या काळात भारत जोमाने विकसित होत आहे.’’ म्हणजे, आपण चौथ्या औद्योगिक क्रांतीसाठी पायघड्या घालायचं काम करतोय.

चौथी औद्योगिक क्रांती असं म्हटलं की ‘पहिल्या तीन कोणत्या?’ असा प्रश्न येणं स्वाभाविक आहे. या तीनही क्रांत्या गेल्या अडीचशे वर्षांत झाल्या. पहिल्या औद्योगिक क्रांतीमध्ये 1784 च्या आसपास वाफेचे इंजिन आणि तंत्रज्ञान यांच्या वापरातून उत्पादनाला वेग मिळाला. विजेचा शोध लागल्यावर खूप बदल झाले. वेगाने वस्तू निर्माण करण्यासाठी उत्पादनसाखळ्या तयार झाल्या. ही दुसरी औद्योगिक क्रांती 1923 च्या आसपास घडली. कालांतराने यामध्ये सातत्याने विकास आणि सुधारणा होत गेल्या. तिसऱ्या औद्योगिक क्रांतीची सुरुवात साधारणपणे 1969 च्या आसपास झाली. यामध्ये संगणकाचा वापर सुरू होऊन क्रमाक्रमाने ती डिजिटलायझेशन आणि रोबोटिक्सपर्यंत येऊन ठेपली. वेगवान इंटरनेटने चौथ्या औद्योगिक क्रांतीची सुरुवात 2014 मध्ये झाली. त्या अनुषंगाने क्लाऊड तंत्रज्ञान, बिग डाटा ॲनालिटिक्स, ब्लॉक चेन तंत्रज्ञान यामध्ये प्रगती होत आहे. ॲप आणि वेबवर आधारित बाजार वाढत आहे, तर दुसरीकडे तंत्रज्ञानात प्रच्छन्नपणे प्रगती होईल, अशा शक्यता वर्तविल्या जात आहेत.

 तंत्रज्ञानाचा संबंध आपल्या दैनंदिन जीवनाशी निगडित असल्याने आय.आर. फोरमधील तंत्रज्ञानाचे प्रातिनिधिक रूप म्हणून सध्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स (ए.आय.) म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता, थ्री डी प्रिंटर आणि इंटरनेट ऑफ थिंग्ज (आय.ओ.टी.) हे आहेत. याबद्दल आपण थोडक्यात माहिती करून घेऊ म्हणजे पुढे काय काय होऊ शकते, याचा आपण विचार करू शकतो. कोणतेही यंत्र विचार करून निर्णय घेत असेल तर ते ए.आय. आहे. त्यांच्या आज्ञावलीत त्या प्रकारे सुधारणा करून निर्णय घेण्याची क्षमता निर्माण केली आहे. अगदी सोपं उदाहरण घेऊ. आपल्या घरात कचरा काढायला एक रोबो ठेवलाय. त्याची दोन कामं आहेत. एक आहे कचरा काढणे आणि दुसरे म्हणजे जो कचरा नाही, त्या वस्तू घरात परत ठेवून द्यायच्या. कचरा म्हणजे काय आणि वस्तू म्हणजे काय, याचा तपशील या रोबोच्या आज्ञावलीत आहे.

 एक दिवस कचरा काढताना अचानक एक घुबडाचे पिल्लू त्याच्यासमोर येऊन बसलं. अशा वेळी रोबो काय करेल? आपला तपशील तपासेल. दोन्ही याद्यांमध्ये घुबडाचा तपशील नाही. मग ही नवी वस्तू दोन्ही याद्यांतील कोणाशी मिळती-जुळती आहे का, ते रोबो तपासेल. मग त्याला वस्तूंच्या यादीतील लहान मूल आणि घुबडाचे पिल्लू यात साम्य आढळेल. मग तो रोबो ते घुबडाचे पिल्लू उचलून टेबलावर ठेवेल. त्याच वेळी आपल्या आज्ञावलीत बदल करून ती अद्ययावत करेल. म्हणजे जेवढी अधिक माहिती किंवा डाटा, तेवढे नंतर अद्ययावत. जसा आपला कचरा उचलणारा रोबो आहे, तसेच कारखान्यात रोबो स्वरूपातील ए.आय. काम करत असतात. येणाऱ्या अडचणीवर मात करून उत्पादन निरंतर ठेवू शकतात. पॅनासॉनिक कंपनीमध्ये दर महिन्याला वीस लाख प्लाझ्मा स्क्रीन तयार होतात. या कारखान्यात फक्त 15 कर्मचारी काम करतात. प्रोटिन फोल्डिंग प्रॉब्लेम या विषयावर आंतरराष्ट्रीय निबंध स्पर्धा झाली. जैवरसायनशास्त्रातला हा महत्त्वाचा विषय आहे. या स्पर्धेत बक्षीस मिळविले ते गुगलच्या डीप माइंड या ए.आय.ने!! भावी काळाच्या संकेताची ही दोन उदाहरणे आहेत.

आपण थ्रीडी. प्रिंटिंगबद्दल ऐकलेले असेल. युट्यूबवर त्याचे अनेक व्हिडिओ बघायला मिळतील. त्याचा आता औद्योगिक वापर होऊ लागला आहे. त्यामुळे कारखान्यातील उत्पादनसाखळीतील अनेक टप्पे गाळता येतात. कामगारांशिवाय उत्पादन वेगात होते. मोठ्या उद्योगाला लागणारे छोटे-छोटे साहित्य वेगवेगळ्या छोट्या-मध्यम किंवा असंघटित क्षेत्रातील कारखान्यातून तयार होते. या सर्वांच्या बदली ती कामे एक थ्रीडी प्रिंटर करू शकेल. जर्मनीच्या सिमेन्स कंपनीत कंबरेचे आणि गुडघ्याचे नकली सांधे बनवितात. प्रत्येक ग्राहकाचे माप वेगळे असते. म्हणजे हे व्यक्तिगत उत्पादनच म्हणू. प्रत्येक ग्राहकाच्या ऑर्डरप्रमाणे हे नकली सांधे बनवायला इंजिनिअर्सना पूर्वी काही दिवस लागायचे. आता थ्रीडी प्रिंटरला ग्राहकाचा तपशील पुरविला की, 3 ते 4 तासांत हे सांधे इंजिनिअरशिवाय उपलब्ध होतात.

इंटरनेट ऑफ थिंग्ज म्हणजे वस्तूंनी एकमेकाशी संपर्क करणे किंवा जोडून घेणे. उत्पादनसाखळीत एका माणसाकडून दुसऱ्या माणसाकडे माल जात असे. नंतर एका यंत्राकडून दुसऱ्या यंत्राकडे माल पोचविण्यासाठी माणसाची गरज होती. आता यंत्रांना आज्ञा द्यायला संगणक आहे. संगणक चालवायला माणसे आहेतच. आता ए.आय.मुळे माणूस गरजेचा राहिलेला नाही. सिनेमातील हीरो एका नंबरवर एसएमएस करतो की, मी घरी यायला निघालो आहे. घरातील एसी आपोआप सुरू होतो. कॉफीमेकरमधील पाणी उकळू लागतं. एक यंत्र दुसऱ्या यंत्राला कामाचा निरोप देते. दुसरे यंत्र कामाला सुरुवात करते. याच तत्त्वावर सगळ्या यंत्रांच्या कामाच्या आज्ञावलीसह ती कामे करताना निर्माण होणाऱ्या अडचणी आणि त्यावरील उपायांचा डाटा ए.आय.ला पुरविल्यास कारखान्यातील उत्पादनाच्या साखळीत एक मशीन दुसऱ्या मशीनला निरोप पोचवेल. कामाचे सातत्य राखायला ए.आय. असेल. रोबो निर्माण करणारी FANUC कंपनी दर दिवशी पन्नास रोबो तयार करते. हा कारखाना तीन शिफ्टमध्ये चालतो. मात्र या कारखान्यातील दिवे सहसा बंद असतात, कारण उत्पादनासाठी सजीवाची इथे गरज नाही.

औद्योगिक क्रांतीच्या प्रत्येक टप्प्यावर तंत्रज्ञानात आमूलाग्र बदल झाले. उत्पादनाचा वेग वाढला. मालाचा दर्जा सुधारला. त्यातून संस्थात्मक आणि राजकीय बदल झाले. याचबरोबर विषमतेमध्ये वाढ होत गेली. सर्व औद्योगिक क्रांत्या या पाश्चिमात्य देशांत निर्माण होऊन तिथे रुजल्या. त्या देशांमध्ये मुबलक भांडवल, कमी लोकसंख्या, लोकसंख्यावाढीचा दर कमी असल्याने तंत्रज्ञानाच्या साह्याने कमी श्रमात भरघोस उत्पादन हा फायदेशीर मामला ठरला. उत्पादित माल लोकसंख्येच्या मागणीच्या प्रमाणापेक्षा खूप जास्त असल्याने नव्या बाजारपेठांचा शोध घेणे क्रमप्राप्त झाले. अगदी पहिल्या औद्योगिक क्रांतीपासून ही प्रक्रिया निरंतर सुरू आहे. साम्राज्यविस्तार ते जागतिकीकरण असा हा सलग आलेख आहे.

या पृथ्वीतलावर आपण सृजनात्मक नवनिर्मिती करू शकतो, या भवतालातून काही तरी वेगळे निर्माण करण्यासाठी आपल्याला श्रम करायचे आहेत, निर्माण झालेल्या साधनांचा आपण आनंदाने उपभोग घ्यायचा आहे- या तीन महत्त्वाच्या भूमिकांतून मानवी समाजाचा भविष्यकाळ घडत गेला. पहिल्या तीन औद्योगिक क्रांत्यांमध्ये नवे तंत्रज्ञान आले आणि उत्पादनाचे तंत्र विकसित झाले. त्या प्रमाणात अनेकांचे रोजगार गेले. त्याचबरोबर नवे रोजगार निर्माण झाले. उदाहरणार्थ- विजेच्या शोधामुळे कमी मजुरांकडून अधिक उत्पादन करता येऊ लागले. त्याच वेळी वायरमन, इलेक्ट्रिशियन यांसारखे नवे रोजगार निर्माण होणार याचा अंदाज येऊ लागला. प्रशिक्षण देऊन नवे प्रशिक्षित मजूर तयार झाले. प्रत्येक वेळी नवे तंत्रज्ञान राबविण्यासाठी कशाची गरज लागणार याचा अंदाज येत गेला. त्याप्रमाणे प्रशिक्षण, नवे रोजगार असे सुरू राहिले. या तीनही औद्योगिक क्रांत्यांमध्ये विकसित झालेले तंत्रज्ञान क्रमाक्रमाने वेगवान, अधिक काटेकोर, बिनचूक आणि मानवी श्रमाची गरज कमी करणारे होते. मात्र या तंत्रज्ञानाचे नियंत्रण माणसाकडेच राहिले. हे तंत्रज्ञान वापरून निर्णय घेण्याचे कार्य माणूस करत होता. त्यामुळे तंत्रज्ञान कितीही विकसित झाले, तरीही मनुष्य सर्व भूमिका पार पाडत राहिला.

चौथ्या औद्योगिक क्रांतीमध्ये रोजगारासंदर्भात अडचण निर्माण झालेली आहे. तंत्रज्ञान अतिशय झपाट्याने विकसित होत असल्याने कोणते रोजगार कायमचे भूतकाळात जातील याची यादी मोठी आहे, मात्र नवे रोजगार कोणते निर्माण होतील हे खूपसे अंधुक आहे. मागील वर्षी ‘इकॉनॉमिक टाइम्स’तर्फे ‘टेक्नॉलॉजी टॅलेंट इक्विलिब्रियम’ या कार्यक्रमात नेक्स्टवेल्थ आंत्रप्रूनरचे संस्थापक, इंटेलचे भारतातील प्रमुख आणि विप्रोचे उपाध्यक्ष यांच्या चर्चेचे सार असे आहे की- ए.आय.मुळे 100 नोकऱ्या जातील आणि जेमतेम 10 नव्या नोकऱ्या निर्माण होतील आणि त्यासुद्धा तातडीच्या गरजेच्या नसतील. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचे अध्यक्ष क्लाऊज श्लोफ यांनी फोर्थ इंडस्ट्रियल रेव्होल्युशन या पुस्तकात मांडले आहे की, एकसारखे आणि साचेबद्ध काम असलेल्या 52 टक्के ते 69 टक्के नोकऱ्या जातील, 37 टक्के कामांमध्ये बदल होईल आणि 9 टक्के नव्या नोकऱ्या निर्माण होतील. ही आकडेवारी नेमकी आणि काटेकोर नाही असं जरी समजलो, तरीही बहुतांश कामे संपतील हा अंदाज आपल्याला येतोच. ज्यांच्या कामात बदल होईल, ती किती दिवस टिकतील? कारण तंत्रज्ञानात सतत प्रगती होत राहणार आहे.

एखादा शेतकरी थोडीशी कौशल्ये शिकून ट्रॅक्टर चालवू शकेल, उदरनिर्वाहासाठी अधिक कौशल्ये शिकून ट्रकही चालवायला शिकेल; मात्र कुठल्याही यंत्राचे अत्याधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करणे त्याच्या आवाक्याबाहेरचे असेल. थोडक्यात, उच्च तंत्रज्ञान न येणारा आणि त्यामुळे निरुपयोगी झालेला एक मोठा समूह अस्तित्वात येईल. प्रत्येक कारखान्यात किंवा कचेरीत तोचतोपणा आणि साचेबद्ध असलेली किती टक्के कामे असतात, हा प्रश्न स्वत:लाच विचारू या. यापुढे तोचतोपणा व साचेबद्ध असलेली कामे ए.आय. करेल. जेव्हा माणसे कामावर ठेवण्यापेक्षा ए.आय. किफायतशीर होईल, तेव्हा माणसाचे काम संपलेले असेल. नवनिर्मितीचा विचार करणारे, चौकटीबाहेरचा विचार करणारे विश्लेषक, इंजिनिअर्स आणि प्रोग्रामर्स यांचे महत्त्व वाढेल. एखाद्या विषयात स्पेशलायझेशन करण्यापेक्षा आंतरविद्या शाखांमध्ये रस असणाऱ्या मिश्र सांस्कृतिक क्षमतांना अधिक मागणी असेल. मात्र तंत्रज्ञानात सतत बदल होत असल्याने माणसाला स्वत:चे अस्तित्व टिकविण्यासाठी नवनवीन प्रशिक्षण सातत्याने घेऊन अद्ययावत राहणे गरजेचे बनेल आणि त्यातून प्रचंड मानसिक तणाव निरंतर राहील.

जेवढा वैविध्यपूर्ण माहितीचा साठा अधिक तेवढा ए.आय. प्रगत असेल. ए.आय.साठी वेगवेगळ्या प्रकारची अधिक माहिती उपयुक्त होत राहणारच. त्या माहितीचे विश्लेषण ए.आय. करेल. भावी काळात माहिती म्हणजे डाटाचे मोल सर्वाधिक राहील. डाटा हेच भांडवल ठरेल. म्हणूनच विविध प्रकारचा डाटा भरण्यासाठी स्पेशलायझेशनपेक्षा मिश्र सांस्कृतिक जाण असणे अधिक महत्त्वाचे ठरेल. या सगळ्यामध्ये महत्त्वाची आणि खरी मेख ही आहे की, अधिकाधिक डाटा भरणे म्हणजे पुढचे रोजगार बंद होणे होय. डाटा भरल्यावर मानवाचे काम संपेल. सुधारित प्रगत ए.आय.ते काम करू लागेल. निवृत्त झालेल्या माणसाच्या जागी ते काम करायला दुसरा माणूस नेमण्याची गरज राहणार नाही. तंत्रज्ञानाचा परिणाम फक्त उद्योगधंद्यावर होणार नाही, तर शेतीतही होणार आहे. अमेरिकेत आयारोनॉक्स नावाची कंपनी सेन्सर्स वापरून संपूर्ण शेती करते. त्यांना तीस पट अधिक फायदा मिळतो. अमेरिकेत 2 टक्के जनता शेतीवर अवलंबून आहे, तर भारतात 50 टक्क्यांपेक्षा जास्त लोक शेतीवर अवलंबून आहेत. खते, रसायने वापरून आपण शेती करत असलो तरी अशा प्रकारचे तंत्रज्ञान इथं नसल्याने भरपूर रोजगार देणारे हे क्षेत्र आहे. कापूस वेचायचे काम करणारे रोबो तयार करण्याचे काम सुरू आहे. किफायतशीर रोबो बाजारात उपलब्ध झाल्यावर कापूस वेचणी करणाऱ्या शेतमजुरांचे भवितव्य काय असेल याचा आपल्याला विचार करावा लागेल.

 पहिल्या तीन औद्योगिक क्रांत्यांमध्ये माणसापेक्षा वेगाने काम करणारी यंत्रे होती. संगणकासह विविध यंत्रे हे काम चोखपणे बजावत होती. आता ए.आय. माणसाच्या विविध कौशल्यांपेक्षा, निर्णयक्षमतेपेक्षा श्रेष्ठ ठरण्याची चिन्हे दिसत आहेत. माणसाच्या कार्यक्षमतेवर आधीच मात करून झाली होती, आता बुद्धीवरही मात होत आहे. निर्मिती, श्रम आणि उपभोग या मानवाच्या तीन भूमिकांवर स्वत:च्या तंत्रज्ञानाच्या साह्याने मानवानेच प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. यापुढे माणसाने काय करावे, हा प्रश्न आ वासून उभा राहणार आहे.

कामगारांची अकुशलता त्या-त्या काळातील तंत्रज्ञानानुसार ठरते. तंत्रज्ञानामुळे जे परिघाच्या बाहेर फेकले जातील, ते कितीही शिक्षित किंवा उच्चविद्याविभूषित असले तरी ते अकुशल कामगारच होणार. अस्तित्वातील बेरोजगार आणि अकुशल कामगार यांचे प्रश्न सोडविण्याचे काम चौथ्या औद्योगिक क्रांतीचे नाही. स्वयंचलित तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता इत्यादी आधुनिक तंत्रज्ञानाद्वारा बिनारोजगार उत्तम, सुबक, नेटकी व वेगवान वस्तुनिर्मिती आणि त्याच अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित विक्री व विपणन करणे हे आहे. फोर जी तंत्रज्ञानानंतर आता फाइव्ह जी तंत्रज्ञान येऊ घातले आहे. ॲपवर आधारित विक्री आणि सेवांचा विस्तार फोर जीच्या काळात झाला. फाइव्ह जीनंतर अजून मोठ्या प्रमाणावर बदल अपेक्षित आहेत. मात्र यासाठी निरंतर व मुबलक ऊर्जा आणि सक्षम-दणकट इंटरनेट गरजेचे होणार आहे. सध्या देशातील मोजकी शहरे सोडली तर लोडशेडिंग सर्वत्र आहे आणि ही स्थिती झटपट सुधारणे शक्य नाही. त्यामुळे समृद्धीची बेटे तयार होतील आणि त्या बेटांवर श्रीमंतीची अजून छोटी बेटे असतील. ही बेटे टिकविता यावीत म्हणून अख्खा देश राबेल. यातूनच पराकोटीची विषमता निर्माण होईल.

(उत्तरार्ध पुढील अंकात)

Tags: औद्योगिक क्रांती प्रदीप खेलूरकर विजय तांबे industrial revolution pradip khelurkar vijay tambe weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके