डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

ज्या शहरात शांततेचा संदेश देणारी भित्तीपत्रके, बॅनर्स लावली तर ती काटून, फाडून टाकली जातात व लावणाऱ्या संस्था संघटनांना धमक्या दिल्या जातात; शहरातील हिंसेचा निषेध करणाऱ्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्यांना सतत ‘खातमा कर देंगे’ 'तंगडी तोड देंगे'च्या वारंवार धमक्या दिल्या जातात - ज्यामुळे त्यांना वारंवार राहण्याची ठिकाणे बदलावी लागतात - अशा शहरात अशा स्वरूपाची बैठक होऊ देणे, हीच गोष्ट तेथील 'धर्मप्रेमी' मंडळींना खुपणारी होती. त्यामुळे बैठक सुरू होण्याच्या आधीपासूनच वातावरणातील ताण उघडपणे जाणवत होता.

7 एप्रिलची पहाट उगवली अहमदाबाद शहरात. मुंबईहून आम्ही जवळजवळ 10-15 जण अहमदाबाद येथे 'शांतता समिती’च्या बैठकीसाठी पोहोचलो होतो. जवळजवळ 3-4 वर्षांनी मी अहमदाबादला येत होते. स्टेशनवर सकाळी 7 वाजतासुद्धा तुरळक वर्दळ जाणवत होती.

'दर्पण अ‍ॅकेडमी’ने वाहनाची व्यवस्था केली होती. एक कामगार संघटनेचा नेता आम्हाला नेण्यासाठी स्टेशनवर आलेला होता. आमच्यामध्ये मी व सीमन्तीनी धुरू (नर्मदा बचाव आंदोलन) तसेच जतीन देसाई (मिड-डे मधील एक ज्येष्ठ पत्रकार व अनेक पुरोगामी चळवळींशी निगडित कार्यकर्ते) सह 'पाकिस्तान इंडिया पीपल्स फोरम फॉर प्लेस अ‍ॅन्ड डेमोक्रसी’चे प्रतिनिधित्व करीत होतो, ‘विद्रोही सांस्कृतिक चळवळ’, ‘युवा भारत’, ‘सिटिझन्स फॉर पीस अ‍ॅन्ड जस्टीस' इत्यादी संघटनांचे अन्य कार्यकर्ते आलेले होते. साबरमतीच्या तीरावरील 'दर्पण अॅकेडमी'. साराभाईंच्या कर्तृत्वाचे आणखी एक देखणे शिल्प. मुख्य रस्त्यावरून काहीशी आतल्या बाजूला गुजराती संस्कृतीतील सौंदर्याचा, देखणेपणाचा प्रत्यय सर्वत्र येतो. संस्थेच्या मागच्या बाजूला खुला रंगमंच. त्यामागे साबरमतीचे विस्तीर्ण पात्र. आश्चर्य म्हणजे पात्रात अधेमधे काळसर रंगाच्या पाण्याचे पुंजके होते. एरवी पाणीभरली साबरमती फक्त पावसाळ्यातच दिसते. सारा परिसर अत्यंत स्तब्ध-निःशब्द. झाडांची पानेही हलत नव्हती. मात्र नदीच्या पात्रात पक्ष्यांचे थवे इकडून तिकडे उडाल्यासारखे करीत होते. साऱ्या वातावरणात तेवढाच एक जिवंतपणा. एरवी या स्तब्धतेत स्वतःच विरघळून जायला झाले असते. आज मात्र त्यातील भीतीची जाणीव होत होती. तणावपूर्ण अस्वस्थतेचा प्रत्यय सर्वांनाच येत होता.

सकाळी स्टेशनवर घेतलेल्या 'टाइम्स ऑफ इंडिया'त पहिल्या पानावर मध्यभागी ‘शांतता बैठकी’च्या बदलत्या जागांबद्दल मोठी बातमी होती. तोवर आमचा समज की ही बैठक फक्त निमंत्रितांसाठी व त्याच्या जागेचाही अजिबात गाजावाजा न करता घेतली जाणार होती. परंतु या बाबतीत तर गांधी विद्यापीठ, झेविअर्स संस्था इत्यादी जागांसाठी झालेले प्रयत्न, त्यांच्या होकारानंतर त्यांना आलेल्या धमक्या, त्यामुळे त्यांना जागा न देण्याचे घ्यावे लागलेले निर्णय व शेवटी साबरमती आश्रमाने दिलेली परवानगी यांविषयीचे सविस्तर वृत्त दिले होते. दरम्यान बैठक आयोजित करणाऱ्यांपैकी एकजण आम्हाला भेटायला आले. त्यांच्या बोलण्यातून शहरातील दहशतपूर्ण वातावरणाची थोडीफार कल्पना येत गेली.

दहाच्या सुमारास आम्ही सर्व आश्रमात पोहोचलो. गांधी आश्रमात जाणे हा नेहमीच एक प्रसन्न, शांत अनुभव असतो. गांधीजींच्या जवळ जाण्याचा एक अनुभव येत राहतो. आज मात्र वातावरण वेगळे होते. आश्रमात एका बाजूला शहरातील गांधीवादी मंडळींची बैठक होती. झालेल्या गोष्टी समजावून घेणे व उपाययोजनांचा विचार करणे हा त्या बैठकीचा उद्देश होता. इकडेही मंडळींची जमवाजमव होत होती. मुंबई, पुणे, बडोदा, दिल्ली इत्यादी ठिकाणांहून कार्यकर्ते गोळा होत होते. 20 25 मंडळी मुस्लिम समाजातील विविध संस्थांचे प्रतिनिधित्व करणारी होती. त्यामध्ये निवृत्त आरोग्य संचालक होते. जम्मू-काश्मीर शासनाचे सल्लागार म्हणून काम केलेले निवृत्त शासकीय अधिकारी होते. मुंबईचे माजी शेरिफ श्री. फक्रुद्दीन खोराकिवाला मुद्दाम आलेले होते. सुरुवातीला श्रीमती मल्लिका साराभाई यांनी तयार केलेले एक पानी निवेदन वाचून दाखवले. त्यामधे या बैठकीचे उद्देश स्पष्ट करण्यात आले होते.

हिंसा व परस्पर तिरस्काराच्या सध्याच्या वातावरणात बदल व्हावा, या दृष्टीने दीर्घकालीन उपाययोजनांवर विचार करण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. सहजीवन, सहिष्णुता या मूल्यांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी कार्यक्रम हाती घेणे, त्याला पूरक धोरण ठरवणे ही काळाची गरज आहे. भारतीय समाजाच्या विविधतेने नटलेल्या वस्त्रातील ताणेबाणे पुन्हा एकदा घट्ट करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. एखाद्या घटनेमुळे वा व्यक्तिगत भांडणांमुळे विशिष्ट जाती-धर्माचे मोठे समूह एकमेकांविरुद्ध पेटून उठतात; घृणा, तिरस्कार व दहशतीचे वातावरण निर्माण करतात, तेव्हा अशा प्रवृत्तीविरुद्ध दीर्घकालीन उपाययोजना शोधण्याची गरज असते.

देशाच्या विविध भागातून आलेल्या विविध संस्था, संघटनांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सर्व प्रतिनिधींनी एकत्र येऊन एक मोठी चळवळ निर्माण करणे ही एक काळाची गरज आहे.

‘शांतता व सहजीवना’साठी दीर्घकालीन, सर्वंकष, सर्वसमावेशक उपाययोजनांचा विचार करणे हे या बैठकीचे उद्दिष्ट आहे. ज्या शहरात शांततेचा संदेश देणारी भित्तीपत्रके, बॅनर्स लावली तर ती काढून, फाडून टाकली जातात व लावणाऱ्या संस्था-संघटनांना धमक्या दिल्या जातात, शहरातील हिंसेचा निषेध करणाऱ्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्यांना ‘सतत खातमा कर देंगे', 'तंगडी तोड देंगे’च्या वारंवार धमक्या दिल्या जातात- ज्यामुळे त्यांना वारंवार राहण्याची ठिकाणे बदलावी लागतात- अशा शहरात अशा स्वरूपाची बैठक होऊ देणे हीच गोष्ट तेथील ‘धर्मप्रेमी' मंडळींना खुपणारी होती. त्यामुळे बैठक सुरू होण्याच्या आधीपासूनच वातावरणातील ताण उघडपणे जाणवत होता. बैठकीला जमलेल्या सुमारे 150-175 जणांनी आपापली व प्रतिनिधित्व करणाऱ्या संस्था-संघटनांची ओळख करून दिली. श्री.प्रकाशभाई शहा या ज्येष्ठ पत्रकाराच्या अध्यक्षतेखाली सुरू झालेल्या सभेत नेमके कोणते मुद्दे घ्यावेत यावर लोकांनी आपली मते मांडली व त्यानुसार दीर्घकालीन उपाययोजनांवर विचार करून सूचना मिळवण्याच्या दृष्टीने विविध गट करण्यात आले. राजकीय, कायदेशीर, शैक्षणिक सांस्कृतिक आरोग्य याप्रमाणे माणसे विभागली गेली. चर्चा सुरू झाल्या. घडलेल्या घटनांवर अजिबात चर्चा करायची नाही, कोण दोषी, कुणाची चूक यांविषयी बोलायचे नाही हे आधीच निश्चित करण्यात आले होते. तरीदेखील दुःखाचे अनुभव व रोज रोज बसणारे चटके यांचे उल्लेख अपरिहार्य होते. 'प्रतिष्ठित' मानल्या जाणाऱ्या इंग्रजी माध्यमांच्या शाळांमधूनसुद्धा अल्पसंख्यांकांना, मुलांना शाळेतून काढून घेण्याविषयी सांगण्यात आलेले आहे. केवळ "तुमच्याच मुलांच्या सुरक्षिततेचा हा प्रश्न नाही तर अन्य मुलांच्या सुरक्षिततेसाठी आम्हाला हे करावे लागत आहे", असा बचाव त्यात होता. स्वच्छता कामगारांना मुस्लिम मोहोल्ल्यात सफाई करायला न जाण्याच्या सूचना होत्या.

भाजीविक्रेते, छोटे दुकानदार, छोटे-मोठे व्यवसाय करून पोट भरणारे लोक भीतीपोटी व्यवसाय करू शकत नव्हते- हिंदूंना ‘मार्गदर्शन' करणाऱ्या विविध पत्रकांचा इंटरनेटवरसुद्धा सुळसुळाट झालेला होता. गल्लोगल्ली रोज नवी पत्रके वाटली जात होती- आहेत. अल्पसंख्याकांविरुद्ध "आर्थिक, सामाजिक बहिष्काराचे फतवे निघत होते- निघत आहेत- खुलेआम शस्त्र बाळगणारी टोळकी रस्त्यांवर हिंडत आहेत. कसे बदलायचे हे सारे? कधी सुबुद्ध होणार आम्ही? मेधा पाटकरवर झालेल्या हल्ल्याच्या हकीगती व तिला मिळालेल्या आमंत्रणाच्या प्रती एव्हाना वर्तमानपत्रे व अन्य माध्यमांमधून लोकांपर्यंत पोचल्या आहेत. स्वतः मेघा पाटकर मल्लिकाशी "थोड़े वातावरण निवळले की मी निघते, बैठक पुढे चालू ठेवा- बैठक मोडता कामा नये" हे बोलत असतानाच त्यांच्यावर कराटे पद्धतीने उड़ी मारून- लाथ घालून केलेला हल्ला व त्यानंतरच्या घटना सर्वांना माहीत आहेत. ज्याक्षणी हा तणाव व घोषणाबाजी वाढायला लागली त्याचवेळी सभेसाठी आलेल्या अल्पसंख्य मंडळींना व अनेक स्थानिक मंडळींना सुरक्षिततेसाठी अन्यत्र जावे लागले, ज्यासाठी दर्पण अ‍ॅकॅडमीनेच मदत केली. संस्था नष्ट करण्याच्या धमक्या, बाहेरून दगडफेक हे प्रकार साराभाईंच्या रिलिफ कॅम्पमधील कामामुळेसुद्धा घडताहेत.

मेधाताई गेल्यानंतर बैठकीचे कामकाज थंडावलेच- पण जे लोक उपस्थित होते त्यांनी घडलेल्या घटनेचा निषेध करणारा ठराव मंजूर केला. गटचर्चांच्या अहवालांचे पुढे काय- कसे- कधी- कोणी करावे यावर चर्चा झाली व 'हम होंगे कामयाब' आणि राष्ट्रगीत होऊन ही बैठक बरखास्त झाली. हे सर्व प्रकार घडत असताना, पत्रकारांना मारहाण होऊन त्यांतील एक बेशुद्ध पडलेला होता. गांधीवादी मंडळींची बैठक सुरूच होती. आश्रमातच नोकरी करणाऱ्या काही तरुण मंडळींनी 'गांधी सेना' स्थापन केली आहे. त्यांचा जुन्या गांधीवाद्यांवर (सर्वसाधारण वयोगट 65 ते 70 ) प्रचंड राग आहे. मल्लिका साराभाईने 'शांतता बैठकी’चे आमंत्रण त्यांना न दिल्याचाही त्यांना राग आलेला होता.

7 एप्रिलची बैठक ही गुजरातमधील दहशतीची झलक दाखविणारी एक घटना; पण अनेक प्रश्न आपल्यासमोर उभे करणारी. शांततेनं जगण्याच्या मुलभूत हक्कांवर होणारे रोजचे आक्रमण, अभावाच्या वातावरणात, अमानवी परिस्थितीत लाखो हजारो लोकांना जगण्याची सक्ती करणारे राज्यकर्ते- 'राजधर्म' विसरलेले शासनकर्ते, वेळप्रसंगी 'कायदा व सुव्यवस्था' राखण्याची जबाबदारी शासनकर्त्यांच्या अयोग्य आदेशांना झुगारूनही पाळण्याची ज्यांनी घ्यायला हवी त्या नोकरशाहीचे धर्मांध शासनकर्त्यापुढे झुकणे-आंधळे होणे- बहुसंख्य समाजाला चढलेला धर्माचा उन्माद, बेरोजगारी, दारिद्र्य या मानवनिर्मित प्रश्नांमध्ये भरडून निघणाऱ्या तरुण पिढीने 'धर्मा'च्या खोट्या कल्पनांमध्ये शोधलेली राष्ट्रभक्ती व स्वभाव...

हिटलरच्या जुलूमशाहीचीच ही पुनरावृत्ती!
म्हणून तर साबरमती काळवंडलेली – स्तब्ध.

Tags: हिटलर मेधा पाटकर श्री. फकृद्दीन खोराकीवाला मल्लिका साराभाई जतीन देसाई नर्मदा बचाव आंदोलन साबरमती विजया चौहान Mr. Fakruddin Khorakiwala Mallika Sarabhai Jatin Desai Narmada Rescue Movement Sabarmati Vijaya Chauhan weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

विजया चौहान
vijaya.chauhan@gmail.com


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके