डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

सदा डुम्बरे यांना ग्रामीण जीवनातले गुंतागुंतीचे प्रश्न जितके जिव्हाळ्याचे आहेत, तितकीच पुण्यनगरीदेखील आंतरिक जिव्हाळ्याची आहे. कारण पुण्याला फार मोठा सांस्कृतिक वारसा आहे. त्या वारशावरच घाला घातला जातो, तेव्हा लेखक आपल्या संयमित पण धारदार लेखणीने या अनास्थेची दखल घेतो. याचं उत्कृष्ट उदाहरण म्हणजे ‘सांस्कृतिक रस्ते : ज्ञानदेव-तुकाराम चालले!’ सांस्कृतिक जीवनाची ही पडझड आणि त्याकडे होणारी डोळेझाक या लेखात मांडताना (कै.) दि. बा. मोकाशी यांच्या ‘देव चालले’ या कादंबरीतला अखेरचा हृद्य प्रसंग डुम्बरे उद्‌धृत करतात. ‘पुणे : सांस्कृतिक राजधानी’ या लेखातूनही पुण्याच्या वैचारिक-सांस्कृतिक धुरिणत्वाचा परामर्श ते घेतात, काळ बदलल्यावर आपण कोणतं ध्येय ठेवलं पाहिजे, याचा विचार मांडतात. 

‘सदा सर्वदा’ हा लेखसंग्रह नामवंत संपादक सदा डुम्बरे यांचा आहे. आपल्या पत्रकारिता-संपादकीय कारकिर्दीत आपल्या अवतीभवती, देशात, जगात काय-काय घडतंय, याचा डोळस वेध डुम्बरे सतत घेत होते, त्या-त्या ठिकाणी जातही होते; त्यात अजूनही खंड पडलेला नाही. त्यातले जे वेगवेगळे विषय, पैलू त्यांनी पाहिले-अनुभवले, ते त्यांनी त्या-त्या वेळी लेखरूपाने मांडले. या संग्रहातील लेख हे 1979 ते 2017 अशा अडतीस वर्षांच्या दीर्घ कालावधीतले आहेत. लेखनाला उद्युक्त करणाऱ्या वेगवेगळ्या घटना-प्रसंगांतून ते लिहिले गेलेले आहेत. त्यामुळे अर्थातच लेखांची लांबी कमी-जास्त आहे. विषयानुरूप असे होणे साहजिकच आहे. एकूण लेखसंख्या 38 आहे.

या पुस्तकाला श्री. भानू काळे (संपादक, ‘अंतर्नाद’) यांची प्रस्तावना लाभलेली आहे. या दीर्घ प्रस्तावनेत काळे यांनी योग्य पारख करणाऱ्या नजरेने प्रस्तुत लेखनाची मीमांसा अत्यंत सौहार्दाने केली आहे. ही प्रस्तावना हीदेखील या पुस्तकाची जमेची बाजू आहे. लेखक डुम्बरे आणि त्यांचे वैचारिक गद्य यांचे आकलन वाचकाची जाण समृद्ध करते. स्वत: लेखकानेही मनोगत मांडले आहे, त्यात आपली भूमिका त्याने स्पष्ट केली आहे.

डुम्बरे यांचे हे जीवनस्पर्शी लेखन वाचकाने नुसते वाचले आणि सोडून दिले, असे होत नाही; ते विचारप्रवृत्त करणारे आहे. उदाहरणार्थ- ‘मिलेनियम धमाका’ हा लेख (सहस्रकाचा किंवा उज्ज्वल भविष्यकाळाचा उत्सवी जागर) किंवा ‘अभयारण्य : लोक विरुद्ध प्राणी?’ या शीर्षकाच्या प्रश्नचिन्हातच एक गर्भितार्थ आहे. लोकविन्मुख कारभार आणि जंगल विरुद्ध माणूस असे चित्र उभे राहणे यामागची वस्तुस्थिती लेखक यात सांगतो. प्रश्न उपस्थित करून आपल्या विचारांना चालना देण्याचे काम लेखक करतो. उदाहरणार्थ- ‘पर्यावरण : वैश्विक भान’ या लेखाचा शेवटच ‘अणुऊर्जा प्रकल्पांबाबत आपण कोणाला दोष देऊ शकतो?’ असा आहे.

‘सदा सर्वदा’ हे या पुस्तकाचे शीर्षक अतिशय अन्वर्थक आहे. स्वत:चे नाव लेखकाने या मथळ्यात गोवले आहेच आणि आपल्या अवतीभोवती सदोदित जे घडत असतं, त्याचा परामर्श घेणारे हे लेखन आहे. एरवी आपल्याला त्या भवतालचे कप्पे पाडता येत नाहीत; पण एकेका गोष्टीवर विचार करताना त्याची आपोआपच विभागणी होते- सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक- अशी. असा सर्व काळ जीवन व्यापून राहणाऱ्या वास्तवाची दखल हा अर्थ या शीर्षकातून चांगला व्यक्त होतो. त्यामुळे हे श्रुतयोजन समर्पक ठरते. (श्रुतयोजन म्हणजे आपल्या वाङ्‌मयातल्या एखाद्या सुपरिचित उक्तीचा वापर नंतरच्या लेखकाने आपल्या लेखनात केलेला असतो. ‘सदा सर्वदा योग तुझा घडावा’ हा रामदासांचा श्लोक आपल्या तोंडी असतोच. त्याचं उपयोजन इथे केलेलं आहे.)

प्रत्येक लेखाच्या सुरुवातीला, त्या लेखातील मध्यवर्ती विषयाची कल्पना देणारा एक पाच-सहा ओळींचा परिच्छेद आहे. तो लेखाचे विचारसूत्र मांडतो.

या संग्रहात जे विविध लेख आहेत, त्यांतील विषय स्थूलमानाने आपण पाहू- म्हणजे त्याची व्याप्ती लक्षात येईल. डुम्बरे जागरूक पत्रकार असल्यामुळे आणि त्यांचे सामाजिक भान प्रखर असल्याने विषयांचा आवाकाही खूप मोठा आहे. या संग्रहात सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, पर्यावरण-निसर्गविषयक, भाषिक-साहित्यिक, नागरी जीवनाशी निगडित असे बहुविध विषय आहेत. शिवाय वेगवेगळ्या चळवळी-आंदोलने, धरणग्रस्त, जनसंज्ञापन माध्यमे यांचाही परामर्श ते अभ्यासू वृत्तीने घेतात. मुख्य म्हणजे त्या-त्या घटिताचे सरळसोट ‘रिपोर्ताज’- वृत्तांकन न करता, ते त्यातली गुंतागुंत लक्षात घेतात. समाजात उपस्थित होणारा कोणताही विषय किंवा घडलेली घटना ते नुसती तटस्थपणे मांडत नाहीत, तर त्याच्या सर्व बाजू ते विचारात घेतात. त्यावर अभ्यास करतात, मागचे-पुढचे संदर्भ, त्यात गुंतलेले प्रश्न-उपप्रश्न यांची ते दखल घेतात. उदाहरणार्थ- ‘बागलकोट : जुनं वाचवायचं की...?’ हा लेख. धरणप्रकल्प, त्यापायी शहर पाण्याखाली जाणं आणि पुनर्वसन, त्यातून निर्माण होणारा लोक व सरकार यांच्यातला संघर्ष- हा विषय. त्याचा अत्यंत अभ्यासपूर्ण वेध लेखकाने घेतला आहे. किंवा ‘मुली!’ हा लेख अत्यंत कळवळ्याने लिहिलेला आणि तितकेच साधार विवेचन असलेला आहे. सौंदर्यदृष्टी आणि अभ्यासपूर्ण शास्त्रीय दृष्टी यांचा उत्कृष्ट संगम असलेला लेख पाहायचा असेल, तर ‘अशोकाची नाममुद्रा’ वाचावा.

या लेखात महत्त्वाचा वाटा आहे तो, डुम्बरे यांच्या भाषेचा. या लेखनाच्या भाषेबद्दल थोडक्यात असं सांगता येईल की, वैचारिक साहित्याची भाषा कशी असावी याचा वस्तुपाठ म्हणजे हे लेखन आहे. नेमकी शब्दयोजना (विषयानुरूप आणि अनौपचारिकतेकडे कल असला, तरी सहजपणे इंग्रजी शब्द सामावून घेणं.) विषयाला न्याय देते. वाचकाला विषयात गुंतवून ठेवण्यासाठी ते अगदी सहजपणे वेधक वाक्यप्रयोग करतात. त्याचं एक मनोज्ञ उदाहरण म्हणजे, ‘पुणे शहराच्या संस्कृतीचा देव्हारा’ असलेल्या फर्ग्युसन कॉलेज रोड (146); ‘शैव म्हणजे अभेदभावी’ (109), ‘हा रस्ता टे्रंडसेटर होता’ (147). इंग्रजी शब्द, क्वचित एखादे इंग्रजी वाक्य येते. (उदाहरणार्थ- ‘युरोप वॉज द ड्रायव्हिंग फोर्स’) पण ते त्या ठिकाणी कमी शब्दांत मोठा आशय सांगून जाते. इंग्रजी टाळायचे, या सोवळेपणापेक्षा हा समावेशकपणा विषयाला अधिक न्याय देतो. शिवाय त्या वेळी तो लेख लिहिणं, लगेच प्रसिद्ध होणं या रेट्यात ते अपरिहार्यही असतं. मात्र, एक सांगितलं पाहिजे की- शब्दाच्या वापराबाबत, अर्थाबाबत डुम्बरे अतिशय जागरूक, दक्ष असतात.

‘करमणुकीचं राजकारण आणि राजकारणाची करमणूक’ (47) हा नुसता शब्दखेळ नाही, तर त्यात गांभीर्यही आहे. डुम्बरे यांच्या चित्रमय शैलीचं एकच उदाहरण इथे देते : ‘गेल्या वर्षी पहिल्यांदाच पाणी आलं. पहिल्याच वर्षी सातशे रुपयांचा कांदा, हजार रुपयांचा वाल आणि तीनशे रुपयांची मिरची या बहादूर शेतकऱ्यानं काढली होती. अजून पायात जोडा नव्हता, पैरण फाटलेली होती. मुंडाशाचा रंग उडालेला होता, पण मनात मात्र आनंदाचे कारंजे सुरू होते.’ (191) एखाद्या चित्रकाराला किंवा चित्रपटकर्त्याला मोह व्हावा निर्मितीचा, इतकं हे शब्दचित्र जिवंत आहे. निसर्गाविषयी लेखकाच्या मनात सौंदर्यवेधी कोमलता आहे, ती भाषेत कशी व्यक्त होते ते पाहा अशोकवृक्षाच्या फुलांच्या वर्णनात (31). व्यक्तीची अचूक पारख करावी, तीही डुम्बरे यांनीच. शरद पवारांविषयी ते म्हणतात, ‘बदल हा त्यांच्या राजकीय स्थैर्याचा स्थायिभाव आहे’ (170) आणि ते किती सत्य आहे, त्याचा पडताळा आपण घेत आहोतच.

आवश्यक तिथे सडेतोड, परखड भाषा- कुठलाही संदेह राहणार नाही अशी रोखठोक भाषा, काळजाला भिडणारा प्रश्न मांडताना वाचकाचे संवेदन जागे करणारी भाषा आपल्याला विषयाच्या गाभ्यापर्यंत नेते. बऱ्याचदा विषय मांडून लेखक थांबत नाही, तर त्यावर उपायही सुचवतो, हे त्यांच्या विचारातले ‘कर्ते’पण! उदाहरणार्थ- ‘अभयारण्य : लोक विरुद्ध प्राणी?’ (186) या लेखात आदिवासींच्या निर्वाहाचे पर्यायी मार्ग ते सुचवतात. एखादा विषय मेहनतीनं समजून घ्यायचा आणि ते आकलन वाचकांपर्यंत नेमक्या भाषेत, सुस्पष्टपणे पोचवायचे याची साक्ष देणारे लेख या संग्रहात आहेत. एकच उदाहरण देते, ‘नेमेचि येतो मग पावसाळा...’ (175-180) हे विषय तसे साधे-सरळ नसतात, आव्हानात्मक असतात. पण अभ्यासान्ती या विषयांना भिडल्यामुळे अनेक वर्षांपूर्वी लिहिलेले हे लेख आजही प्रस्तुत ठरतात, मार्गदर्शक ठरतात.

डुम्बरे यांची दृष्टी फक्त प्रदेश-देश यांच्यापुरती सीमित नाही, जागतिक प्रश्नही त्यांच्या विचारविमर्शाचा भाग आहेत. त्यामुळे अमेरिका, चीन या संबंधातले विषयही त्यांनी हाताळले आहेत. जगाकडे पाहण्याचा डुम्बरे यांचा परिघ खरोखरच फार विस्तृत आहे. एवढेच नव्हे, तर विहंग दृष्टीने (बर्ड्‌स आय व्ह्यू) ते या जगाकडे पाहतात, म्हणून त्यांना तो आवाका समदर्शीपणे पेलता येतो.

या संग्रहातला वेगळ्या धर्तीचा आणि अतिशय रोचक असा एक लेख म्हणजे, ‘वाचकपत्रे : वृत्तपत्रांचा अलंकार’. वाचकांच्या प्रतिसादाशिवाय वृत्तपत्रे अपुरीच असतात. कारण वृत्तपत्रे ज्या समाजासाठी असतात, त्या ‘जनमनाचा कानोसा’ या वाचकपत्रांतून घेता येतो. ‘दैनिक सकाळ’च्या सुवर्णमहोत्सवी अंकात (1 जानेवारी 1982) अर्धशतकातील वाचकपत्रांचा आढावा घेतला गेला. समाज कसा बदलत जातो, किती विषयांवर वाचक मुखर होत असतात, राहणीतल्या बारीकसारीक गोष्टींपासून आंतरराष्ट्रीय राजकारणापर्यंत काय-काय मते मांडतात, याचा आरसा म्हणजे ही पत्रे होत. म्हणून लेखक या पत्रांना वृत्तपत्रांचा अलंकार म्हणतो, हे यथार्थच आहे. ही पत्रे हा एका मोठ्या संशोधन-अभ्यासाचा विषयही होऊ शकतो.

असे पुस्तक प्रथम आले ते ‘लंडन टाइम्स’च्या ‘द फर्स्ट कुकू’च्या रूपाने. आता याचे नाव ‘द फर्स्ट कुकू’ का, तर इंग्लंडमधला बर्फगार हिवाळा संपता-संपता वसंताची चाहूल लागली की, कोकिळस्वर ऐकू येतो आणि तो प्रथम ऐकलेली व्यक्ती ताबडतोब ‘आज कोकिळकूजन ऐकल्या’चे ‘लंडन टाइम्स’ला कळवते. ते पत्र वृत्तपत्रात प्रसिद्ध होते. म्हणून या संग्रहाचे नाव ‘द फर्स्ट कुकू’ अशी ही कहाणी. अर्थात सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, जागतिक घडामोडींवरून वाचकमनात उमटणारे सर्वच तरंग पत्रांतून व्यक्त होतात. त्यांचा समावेश त्या 75 वर्षांच्या संकलनात आहेच.

सदा डुम्बरे यांना ग्रामीण जीवनातले गुंतागुंतीचे प्रश्न जितके जिव्हाळ्याचे आहेत, तितकीच पुण्यनगरीदेखील आंतरिक जिव्हाळ्याची आहे. कारण पुण्याला फार मोठा सांस्कृतिक वारसा आहे. पण त्या वारशावरच घाला घातला जातो, तेव्हा लेखक आपल्या संयमित पण धारदार लेखणीने या अनास्थेची दखल घेतो. याचं उत्कृष्ट उदाहरण म्हणजे ‘सांस्कृतिक रस्ते : ज्ञानदेव-तुकाराम चालले!’ सांस्कृतिक जीवनाची ही पडझड आणि त्याकडे होणारी डोळेझाक या लेखात मांडताना (कै.) दि. बा. मोकाशी यांच्या ‘देव चालले’ या कादंबरीतला अखेरचा हृद्य प्रसंग डुम्बरे उद्‌धृत करतात. फर्ग्युसन रोडवरच्या ‘देव रस्त्या’च्या निमित्ताने भारतीय संस्कृतीवरच ते विषण्ण भाष्य करतात.

‘पुणे : सांस्कृतिक राजधानी’ या दीर्घ लेखातूनही पुण्याच्या वैचारिक-सांस्कृतिक धुरिणत्वाचा परामर्श ते घेतात आणि आता काळ बदलल्यावर आपण कोणतं ध्येय ठेवलं पाहिजे, याचा विचार मांडतात. ऐतिहासिक परंपरांचं भान राखून विकासाचं नवं प्रारूप सिद्ध करण्याचं आव्हान- ‘महाराष्ट्र धर्म’ रुजवण्याचं आव्हान पेलण्याची ते हाक देतात.

वाचनीयतेच्या दृष्टीने या पुस्तकाची मांडणी देखणी आणि सुबक झालेली आहे. त्याला दर्जेदार निर्मितिमूल्य आहे. मुखपृष्ठावरची काळ्या पार्श्वभूमीवरची मांडणी, रंगसंगती आणि अक्षरवळण वेधक आहे. त्याची आवर्जून दखल घेतली पाहिजे. ‘सदा सर्वदा’ हे शीर्षक आणि सदा डुम्बरे हे लेखकनाम यांची अक्षरे क्लासिकल देवनागरीमध्ये आहेत. त्याला एक रेखीव अभिजात सौंदर्य आहे. लेखकाची वैचारिक मांडणी, भूमिका स्पष्ट-थेट आहे, नि:संदिग्ध आहे; त्याला साजेसे हे अक्षरवळण आहे. अनलंकृत असे.

शीर्षकात आणि लेखकनामात गमतीशीर साधर्म्य जुळून आले आहे. त्यातील कल्पकतेला न्याय देणारे डिझाइन मुखपृष्ठावर काळ्या पार्श्वभूमीवर पाच चौकोनांत रेखाटलेले आहे. (कारण शीर्षक व लेखकनाम यांत पाच-पाच अक्षरे आहेत.) पाच झरोके, त्यांचे वेगवेगळे रंग आणि त्यातून दिसणारे जग. जगाचा रंग एक- पिवळा, त्याची पार्श्वभूमी वेगवेगळ्या रंगांची. आपल्या जागीच राहून आपल्या परिप्रेक्ष्यातून भवतालाकडे पाहताना काय-काय दिसतं, कसं दिसतं ते सर्व लेखनातून आपल्यापर्यंत पोचते. त्याची प्रतीकात्मक झलक मुखपृष्ठावरून दिसते. श्याम देशपांडे यांच्या कल्पकतेला दाद द्यायलाच हवी.

या संग्रहातील लेख पूर्वी केव्हा, कुठे प्रसिद्ध झाले याची सूची पुस्तकाच्या शेवटी पृष्ठ 270-271 वर आहे. ज्या क्रमाने ते प्रसिद्ध झाले, त्या कालक्रमाने ते इथे पुस्तकात नाहीत. कोणत्याही लेखाला तात्कालिक निमित्त, संदर्भ असले तरी त्या अर्थाने कोणताच लेख कालबाह्य ठरत नाही. आज वाचतानाही त्यातला ताजेपणा जाणवतो, इतकंच नव्हे तर (काही ठिकाणी- दुर्दैवाने समाजाची मानसिकता तीच राहिल्यामुळे) तो आजही लागू पडतो. पुस्तकात मुद्रणदोष अगदी किरकोळ प्रमाणात आहेत, पण एकंदरीने सुखद अनुभव येतो. महत्त्वाचे म्हणजे, हे लेखन क्रमश: वाचत गेले पाहिजे, असे नाही. आपल्या रुचीनुसार कोणताही लेख केव्हाही वाचावा असा आहे.

आपल्या लेखांसाठी पुरेसे संदर्भ, जरूर तेथे आकडेवारी दिलेली असल्यामुळे या संग्रहाचे संदर्भमूल्य वाढले आहे. शिवाय एखाद्या विषयाच्या संदर्भात लेखकाने केलेला युक्तिवाद किंवा मीमांसा जाणकार वाचकाइतकीच अभ्यासकालाही उपयुक्त आहे. उदाहरणार्थ- ‘साहित्य संमेलन : तेच ते’ या लेखात इंग्रजी अंगीकारणे का योग्य आहे, याची मीमांसा डुम्बरे करतात. ‘... जगण्याची किंमत देऊन भाषा नको, असे म्हणणारा एक मोठा वर्ग इथं आहे आणि त्याने आधीच भरपूर किंमत चुकवली आहे, याचं भानही ठेवलं पाहिजे.’ (210)

संदर्भासाठी ठोस आकडेवारी हेही या लेखांचे वैशिष्ट्य. ‘लोकसंख्या’ या विषयावरील तीन लेखांमध्ये विवेचन पाहता येईल, अशी आकडेवारी आहे. मात्र संख्या-आकडेवारी यात संवेदनशीलता हरवून जात नाही, उलट ती अधिक जाणवते, हे विशेष.

शेवटी या पुस्तकाबद्दल साररूपानं सांगायचं, तर त्यासाठी ‘स्वस्तिक’ हे रूपक मला योजावंसं वाटतं. स्वस्तिकाचा केंद्रबिंदू एक, पण त्याचा विस्तार असतो अष्टदिशांना. एकमेकांपासून वेगळ्या पण केंद्रस्थानी जोडलेल्या छेदरेषा आणि या रेषांचा विस्तार अमर्याद, असीम. तसंच या पुस्तकातल्या लेखांचं आहे. त्यांच्या केंद्रस्थानी आहे सदा डुम्बरे यांचं व्यक्तिमत्त्व. त्यांनी भोवतालच्या जीवनाच्या वेगवेगळ्या पैलूंचा घेतलेला वेध हा त्याचा विस्तार. सामाजिक प्रश्नांबद्दल कळवळा, राजकीय वास्तवाचं भान, भाषिक प्रश्न, डोळस आणि अभ्यासपूर्ण निसर्गप्रेम, बदलत्या जीवनाचे पैलू हे त्याला फुटलेले धुमारे.
म्हणून हा ठेवा सदा सर्वदा जपावा असा आहे.

सदा सर्वदा
लेखक : सदा डुम्बरे
गोल्डन पेज पब्लिकेशन, पुणे
पृष्ठे : 271
मूल्य : रुपये 375/-

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके