डिजिटल अर्काईव्ह

समाजातील जातीयता, क्रांतीयता, भेदाभेद, संकुचितता नाहीशी करण्यासाठी गुरुजी आमरण झटले. गुरुजींची काव्यस्फूर्ती मर्यादित न राहता सामुदायिक झालेली होती. हिंदू-मुस्लिमांच्या झगड्यांनी त्यांना कमालीचे क्लेश होत. भारतीय संस्कृतीबद्दल त्यांना अपार आदर. त्यांच्या शब्दाशब्दातून तो आदर ओसंडतो आहे. किती सुंदर शब्दामध्ये वर्णीले आहे या संस्कृतीचे महत्व त्यांनी भारतीय संस्कृती सर्वांना सामावून घेते.

1945 च्या सुमारास गुरुजी फलटणला आले होते. ती माझी विद्यार्थीदशा! एका सकाळी गुरुजींची खाली मान घालून बसलेली ती सोज्वळ मूर्ती पाहिली मात्र मनात विचार आला, हेच तर ते गुरुजी! नंतर संध्याकाळी गुरुजींचे व्याख्यान ऐकले. त्या वेळीही चक्रावून गेलो. तो आवेश, ती कळकळ, हृदयालाच हात घालणारा तो शब्दांचा धबधबा. गुरुजीएकी एक आगळीच आत्मीयता वाटू लागली. त्यांची सर्वच पुस्तके नंतरच्या काळात भराभर वाचून काढली. गुरुजी प्रभावी प्रतिभाशाली लेखक होते का नव्हते याचा शाब्दिक काव्याकूट करणाऱ्या विद्वान पंडितांना गुरुजी समजलेच कुठे? नाशिकला एकदा जवाहरलालजी आले असताना गुरुजींचा साहित्य संग्रह पाहून त्यांनी आश्चर्योग्दार प्रकट केले, तर महाराष्ट्राचे वाग्वीर आचार्य अत्रे यांनी त्यांना मातृहृदयाचा महाकवी म्हणून संबोधले. गुरुजींचे आपल्या मातेवर अपरिमित प्रेम. हेच प्रेम त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांना दिले. त्यांच्यासारखा शिक्षक पुनः होणे नाही. स्वातंत्र्याच्या आंदोलनात गुरुजींचाही मोठा भाग. गुरुजींच्या महानतेला अवलोकण्याचा या लेखाच्या निमित्ताने हा अल्पसा प्रयत्न!

गुरुजींच्या संकोच वृत्तीने दुसऱ्याला संकोच वाटे. त्यांच्या अबोल्याने बोलणारा ओशाळून स्वस्थ बसत असे. डोळ्यांतून अश्रूंना वाट करून देणे ही त्यांची भाषा. तेच त्यांचे बोलणे. प्रत्यक्षापेक्षा ते पत्रातून अधिक बोलत. त्यांची लेखणी जास्त बोलकी होती, परंतु अबोल व मलूल वाटणारे गुरुजी जेव्हा व्यासपीठावर चढत, तेव्हा त्यांचा दिमाख काही ओर व आगळाच असे. त्यांच्या सिंहगर्जनेने सारे व्यासपीठच गदगदा हलू लागे. सामान्य माणसापेक्षा गुरुजींचे तंत्र फार वेगळे होते. गुरुजी कोण होते हे तसे सांगणेही फार कठीण, त्यांचे जीवन, हे अनेकांच्या दृष्टीने एक कोडे झाले आहे! त्यांच्या मृत्यूने तर सर्वांना संभ्रमावस्थेत टाकले. गुरुजींच्या भाषणात व लेखनात त्यांच्या अंतःकरणाचे स्वच्छ प्रतिबिंब पहावयास मिळते. गुरुजी मातृहृदयाचे कवी होते. शब्दांचा केवळ फुलोरा निर्माण करणारे कवी ते नव्हते. काव्य जगणारे जिवंत प्रतिभेचे ते कवी होते. ते जगाकडे आईच्या दृष्टीने पहात व आईच्या अंतःकरणाने प्रेम करीत. देशामध्ये राहणाऱ्या कोणत्याही लोकांमध्ये त्यांना भेदाभेद दिसला नाही. समाजातील अनाथाला आश्रय द्यावा, दलितांची दुःख अमोल अश्रूंनी धुवावीत असे त्यांना वाटे. लहान बालकावर गुरुजींचे अपार प्रेम. मुलांच्या सहवासात ते रमून जात. महाराष्ट्रातील शेकडो मुलांशी त्यांची मैत्री. गुरुजींच्या अंतःकरणात मातेचे वात्सल्य होते, उदात्त विचाराचा आणि उदार भावनाचा समाजामध्ये वर्षाव व्हावा असे त्यांना वाटे. नवसमाजाची निर्मिती हे त्यांचे स्वप्न होते. इतर कवी आपल्या संकुचित जगामध्ये वावरत होते तर जनतेचे प्रतिनिधी होऊन गुरुजी तिच्या उद्धारासाठी अप्रतिहत संचार करीत.

गुरुजींचे सर्व सामर्थ्य त्यांच्या अश्रूत होते. त्यांच्या सहानुभूतीत होते. शेकडो वर्षे अस्पृश्यांना बंद असलेली पंढरपूरच्या मंदिराची दारे गुरुजींच्या अश्रूच्या महापूरात विरघळून गेली. अश्रूंचे ओजस्वी स्तोत्र गुरुजींनी भारताला देऊन ठेवले त्यांच्या सर्व वाग्डमयात शुद्धता, पवित्रता व निर्मळता यांचा आढळ होती. गुरुजी सौंदर्याचे महान उपासक होते. गुरुजी जनतेचे महान कवी होते. त्यांच्या साऱ्या वाग्डमयातून त्यांना जनकल्याणाचा ध्यास लागलेला दिसून येतो. गरीब व श्रमजीवी जनतेची दुःखे दूरवीत, ही त्यांची तळमळ होती. ‘माझ्या वाग्डमयाला हात लावाल तर माझ्या हृदयाला हात लावाल!’ असे ते म्हणत. आचार्य अत्र्यांच्या शब्दात सांगावयाचे तर समाजातील याची, भेदाची आणि सुडाची भावना नष्ट व्हावी आणि परस्परात ‘जीवाचे मंत्र जडावे,’ स्नेहभाव उत्पन्न व्हावा, निर्भयता आणि स्वाभिमान निर्माण व्हावा या एकाच ध्येयाने प्रेरित होऊन गुरुजींनी आपल्या वाणीची पेरणी केली. जगताच्या सुखासाठी सर्वस्वाचा त्याग करणे यात जीवनाची पूर्तता आहे, त्यांचा विश्वास होता. मरण ही जीवनाची परीक्षा आहे असे त्यांचे म्हणणे. जी महान ध्येयासाठी हसत हसत मृत्यूला कवटाळतो तो भारतीय संस्कृतीचा उपासक. मूत्यूवर शब्दांच्या फुलोऱ्यांची कवने रचणारे अनेक कवी झाले पण मरणाचे चुंबन घेणारे साने गुरुजी हे शतकाशतकातून निर्माण होतात.

समाजातील जातीयता, क्रांतीयता, भेदाभेद, संकुचितता नाहीशी करण्यासाठी गुरुजी आमरण झटले. गुरुजींची काव्यस्फूर्ती मर्यादित न राहता सामुदायिक झालेली होती. हिंदू-मुस्लिमांच्या झगड्यांनी त्यांना कमालीचे क्लेश होत. भारतीय संस्कृतीबद्दल त्यांना अपार आदर. त्यांच्या शब्दाशब्दातून तो आदर ओसंडतो आहे. किती सुंदर शब्दामध्ये वर्णीले आहे या संस्कृतीचे महत्व त्यांनी भारतीय संस्कृती सर्वांना सामावून घेते. मानव जातींच्या महामंगलतेचे स्वप्न पाहणारी थोर संस्कृती. व्यापकता, विशालता, मध्यता म्हणजे आमची संस्कृति. या थोर संस्कृतीचे आम्ही उपासक. जगात जे भव्य, जे जे सुंदर त्याच्या ध्यास या संस्कृतीला जगातील सर्व धर्मसंस्थापकांना ही संस्कृती प्रणाम करते. या उच्चतम संस्कृतीचे अर्थाने उपासक बनू या. केवळ प्रतीकांचा गोंधळ व कृताचा खडखडाट यांचा त्याग करू या. प्रेम, विवेक व ज्ञान यांची कास धरू या. गुरुजींची छोटी वाक्ये जीवनाचे महान तत्त्वज्ञान कथन करतात. मुले त्यांच्या पुस्तकांची पारायणे करतात, रंगून जातात. चिरंतन, अक्षर असे हे लेखन! त्याच्या स्मरणानेही मन हेलावून जावे! 

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक




साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 1300, 2500, 3600 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख 2008-2025

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1948-2007

सर्व पहा

जाहिरात

देणगी