डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

‘देखणी ती जीवने तृप्तीची तीर्थोदके चांदणे ज्यातून वाहे शुभ्र पाऱ्यासारिखे' असं कविवर्य बा. भ. बोरकर यांनी म्हटलं आहे, तसंच डॉ. यू. आर. अनंतमूर्ती यांचं व्यक्तिमत्त्व आहे. हा माणूस अंतर्बाह्य देखणा आणि डौलदार आहे. त्यांचं बोलणं, वागणं, साहित्य आणि जीवन यांत विलोभनीय संगती आहे. अध्यापन, लेखन, प्रशासन आणि समाजकारण हे चारही आयाम ते सहजसुंदरपणे पेलतात. डॉ. राममनोहर लोहियांशी त्यांची उत्कट तरीही चिकित्सक जवळीक आहे. ‘साधना’ दिवाळी अंकासाठी त्यांच्याशी बोलणंही असंच आनंदाने भरलेलं होतं...
 

: माणूस : 

विनय :- सुरुवातीला आपण यू.आर.अनंतमूर्ती ही व्यक्ती जाणून घेणार आहोत. सर, तुम्ही खूप समृद्ध आणि बहुआयामी आयुष्य जगलात. अनेक हृदयस्पर्शी प्रसंग, आठवणी, व्यक्ती तुमच्या जीवनात येऊन गेल्या. त्यामागे तुमची काही निश्चित योजना होती की, ते सहजपणे घडत गेलं?

अनंतमूर्ती :- मला अजूनही असं वाटतं, माझं बालपणच अधिक समृद्ध, श्रीमंत होतं... आता माझ्याकडे असलेली कसलीही श्रीमंती तेव्हा मला लाभली नव्हती; तरीही. दाट जंगलात, एकांतात आमचं घर होतं. रहदारीच्या कुठल्याही रस्त्यापर्यंत पोहोचायला माझ्या आजोबांना जंगलातूनच काही अंतर पायी जावं लागे. मीही त्याच्या पाठंगुळी बसून जंगलातून जात असे. वाघाची डरकाळी ऐकू आली की, माझी आजी मागील दारी जाऊन, गोठ्याचं दार बंद करत असे आणि मी आजोबांच्या शेजारी बसून (वाघाचं संकट टळावं म्हणून) अर्जुन: फाल्गुनो भीष्मः किरीटी श्वेतवाहनः हा श्लोक पुटपुटत असे. ते आयुष्य खरंच श्रीमंत होतं. तेव्हा खूप थोडी माणसं भेटायची; पण ती सगळी मला अजून आठवतात आणि आता काल भेटलेल्या माणसाची ओळख मी विसरतो! आमची सुपारीची बाग होती. सुपारी विकत घ्यायला मूळचे केरळातले पण नंतर उडपी-मंगलोर भागात स्थायिक झालेले मुसलमान व्यापारी यायचे. आमच्याकडून सुपारी विकत घेऊन दुसरीकडे जाऊन विकायचे. मला त्यांचं खूप कौतुक वाटायचं- विशेषतः त्यांच्या चपलांचं– या व्यापार्यांना आम्ही 'बॅरी' म्हणायचो. माझ्यासाठी पण तशा चपला आणायला मी त्यांना सांगत असे; ते घेऊन येत. मला खांद्यावर घेऊन जंगलातून फिरवून आणत. खडीसाखरेचा खाऊ देत. ती खडीसाखर थोर होती. आत्ताचा कोणताही गोड जिन्नस तितका गोड लागत नाही. मी वर्षभर त्या बॅरींची वाट बघायचो. माझ्यामते ते समृद्ध आयुष्य होतं. त्यात निरागसता होती. मायेची ऊब होती. पहिल्यांदा माझे केस कापले, तो दिवस अजूनही मला आठवतो. घरात मुलगी नसल्यामुळे माझे केस वाढू दिले होते. आई मला मुलीसारखे कपडेही घालीत असे. रंजाची फुलं गोळा करून मी घरी आणत असे. त्यांच्या माळा करत असे- काही देवासाठी तर काही घरातल्या इतर बायकांसाठी. ते खरचं सुंदर आयुष्य होतं. मी लेखक म्हणून पुन्हा पुन्हा तिकडे वळत असतो.

नंतर अनेक गोष्टी घडल्या, त्या तुमच्याही आयुष्यात घडल्या असतील. मी हायस्कूलमध्ये आलो; आणि एकाएकी मला जाणवलं की, मी दोन, पूर्णपणे वेगळ्या जगात जगत होतो- करिकोप्पा या माझ्या छोट्याशा गावातलं जग आणि हायस्कूलमधलं जग- या नव्या जगात मी डार्विनचं नाव ऐकलं. त्याचा उत्क्रांतिवादाचा सिद्धांतही ऐकला. आणि उत्क्रांतीचा माझा सिद्धांत तर अगदी वेगळा, पुराणकालीन होता. मी बुचकळ्यात पडलो. पारंपरिक आणि आधुनिक दृष्टिकोनातला ताण तेव्हा पहिल्यांदा जाणवला. बरं, डार्विनचा सिद्धांत खोटा नव्हता. पण मग माझ्या सिद्धांताचं काय? या विषयावर मी मित्रांशी न संपणार्या चर्चा करत असे. काही वर्षांतच मी शहरात, कॉलेजात गेलो आणि नंतर तर परदेशातही. वाघाचं डुरकणं ऐकत झोपण्याचं बालपण ते पाश्चात्य जग- एवढा दीर्घ प्रवास माझ्या अर्ध्या आयुष्यात पूर्ण झाला. हे भाग्य केवळ भारतातल्या (आशियातल्या) मुलांच्या वाट्याला येतं. एकाच आयुष्यात आपण अनेक युगं पार करतो. युरोपातल्या मुलाचं बालपण जीवन, आसमंत आणि तरुणपणचं, यांत काहीच फरक पडत नाही. भारतामध्ये मात्र बालपण एका शतकात जातं; तर तारुण्य दुसर्या. वेगवेगळी युगं भारतात एकाच वेळी नांदत असतात. भारतीय जीवनाची काही समृद्धी त्यामधूनही येत असावी. 

विनय :- तुमचं हे बालपण 'घटश्राद्ध' या तुमच्या कथेमधल्या ‘नाणी’ या छोट्या मुलाच्या व्यक्तिरेखेमध्ये बरचसं उतरलेलं दिसतं.
अनंतमूर्ती :- अगदी खरं आहे. माझ्या कथांतली अनेक मुलं त्या दिवसांच्या आठवणीतलीच आहेत.

विनय :- निसर्गाचा सहवास तुम्हांला मिळाला. अगदी प्राथमिक अवस्थेतलं साधं-सुधं जीवन तुम्ही आसपास पाहिलंत. मात्र तुमच्यावर घरातनं खूपच कर्मठ धार्मिक संस्कार झाले होते!
अनंतमूर्ती :- हो, खूपच कर्मठ संस्कार झाले.

विनय :- त्यामुळे काही विचित्र परिस्थिती निर्माण झाली का? 
अनंतमूर्ती :- तेव्हाचा माझा दिनक्रमच सांगतो. (हे थोडं पुढचं आहे. माझ्या मूळ गावतलं, अगदी लहानपणचं नाही.) आता मी वडिलांकडे राहतो आहे. माझे वडील अधिकारपदावर होते, शानभाग झाले होते. त्यामुळे आम्ही आणखी मोठ्या वस्तीमध्ये- अग्रहारात- राहत होतो. पहाटे उठून तुंगा नदीत स्नान करायचं. मुंज झाल्यानंतर एकशे आठ वेळा गायत्री जप करायचा. हे करीत असतानाच आई आणि आजी ताक घुसळता घुसळता भूपाळ्या म्हणायच्या- सर्वच घरांतनं हीच पद्धत होती. ‘उठा नारायणा, उठा लक्ष्मीदेवी, उठा रघुनंदना’ अशा त्या सकाळच्या रागातल्या भूपाळ्या. पुढे मोठा झाल्यावर मी 'अमर भूपाळी’ पाहिला होता. ते ‘घन:श्याम सुंदरा’ गाणं ऐकताना इतका आनंद झाला; ते गाणं मला माझ्या बालपणात घेऊन गेलं.

हो, माझ्यावरचे संस्कार सनातनीच होते. आसपासच्या मठातून तत्वचर्चाही ऐकायला मिळत असे. जवळच्याच थोड्या मोठ्या गावातून एखादा आर्यसमाजी पंडित यायचा. तो नवमतवादी असल्यामुळे, पृथ्वी गोल आहे असा सिद्धांत मांडत असे. त्याला पुराणमताचा अभिमानी संस्कृत सनातनी पंडित ‘नाही, पृथ्वी सपाट आहे आणि सूर्य-चंद्र पृथ्वीभोवती फिरतात, असं ठासून उत्तर देत असे. मी दोन्ही बाजू ऐकून घेत होतो. यावरूनच मी नंतर कुठेतरी म्हणलं की 'मी गॅलिलिओच्या काळातही जगत होतो.’ वातावरण सनातनी होतंच; पण त्याला जाणि माझ्या मनालाही आतून धक्के बसायला, आव्हान मिळायलाही सुरुवात झाली होती. गांधीयुगाची सुरुवात झाली होती. तो काळ खूपच विलक्षण होता. अर्थात नंतरच्या काळात मी स्वत:चा विकास करून घेण्यासाठी, कर्मठपणाला विरोध केलाच.

विनय :- इतके सनातनी कर्मठ पुराणमतवादी संस्कार तुमच्यावर झाले; तरीही तुम्ही उदारमतवादी घडलात हे कसं काय? त्याची सुरुवात कशी झाली? पहिली ठिणगी कुठे पडली?
अनंतमूर्ती :- माझ्यावर दूरगामी परिणाम केलेला एक अनुभव संगतो, मी तेव्हा हायस्कूलमध्ये होतो. आमच्या अग्रहारातून शाळेत जाऊन यायचं म्हणजे दहा किलोमीटरची रोजची चाल होती. गावात प्लेग पसरला. शाळा बंद होती. डॉक्टर आले आणि त्यांनी सर्वांना प्लेगप्रतिबंधक लस टोचली. मात्र दलितांना टोचली नाही. कारण ते अस्पृश्य होते. त्यामुळे गावातले दलित मृत्युमुखी पडू लागले, दुसरं काय होणार? आणि तेव्हा गावातले काही मूर्ख कर्मठ ब्राह्मण म्हणत होते, ‘हे असे मरणारच; कारण त्यांच्यावर दैवी कोप झाला आहे. गांधी नावाचा कली त्यांच्यात शिरला आहे. त्याच्या नादी लागून यांनी देवळात घुसून देव बाटवला; म्हणून त्यांना शाप मिळाला आहे.’ तेव्हाही माझ्या मनात प्रश्न उभा राहिला की, कुठल्या तरी दूरच्या गावातल्या दलितांनी मंदिरात प्रवेश केला, त्याची शिक्षा म्हणून माझ्या गावचे दलित कसे मरतील? आणि त्यांना लस टोचलेली नाही हे तर मला माहीतच होतं. त्यांच्या मृत्यूचं कारण स्पष्ट होतं. 

याच काळात इतर गोष्टीही घडत होत्या. मी नेहमीच असं म्हणत आलोय की, लेखकाला वस्तुस्थितीचं ज्ञान दोन (परस्परविरुद्ध तरीही परस्परपूरक) बाजूंनी होतं. म्हणून तो लेखक असतो. मी त्यासाठी नेहमी एक उदाहरण देतो, कुठल्याही जुन्या पद्धतीच्या भारतीय घराला एक पुढचं अंगण आणि पुढच्या सोप्यातली बैठक असते. आणि तसंच मागचं अंगण आणि मागच्या पडवीतली बैठक असते. तुमचे वडील पुढील दारी बसतात, त्यांना भेटायला गावातली उच्च जातीय पुरुष मंडळी पुढील दारी येतात. काही निखळ कठोर सत्य पुढील दारी ऐकायला मिळतं. पुढील दारी चर्चा असते ती एकूण विश्वाची, तत्त्वज्ञानाची, पुराणांची, इतिहासाची! मागच्या दारी नेमकं उलट दृश्य असतं, तिथं माय-माऊल्या येतात. विहिरीचं पाणी काढताना एकमेकींचं दुखलं-खुपलं विचारतात, सांगतात, आणि इतरही गोष्टी बोलतात.

विनय :- कुणाला घरात कसं वागवलं जातं, कुणाला काय जाच होतो...
अनंतमूर्ती :- आणि हल्ली कुणाचं कुणाशी ‘जुळलंय’ हे सुद्धा मागील दारी खूप कुजबूज ऐकायला मिळते. मी एक पाहिलं की, माझी आई कर्मठच होती; तरीही त्या परजातीच्या बायांशी तिची जास्त मैत्री होती. त्या बायकांना तिच्याजवळ तोंड मोकळं करता यायचं. आपली सुख-दुःखं त्या तिला सांगायच्या; आणि तीही ऐकून घ्यायची. या मागील दाराच्या गप्पा मी ऐकल्या नसत्या तर मी कधीच लिहू शकलो नसतो. मी नेहमी म्हणतो की, भारतीय लेखक परसदारीच जन्माला येतात. फक्त पुढील दारचं बोलणं ऐकलं तर तुम्ही उगीच नटवे लेखक व्हाल; आणि फक्त खोटं लिहाल.

हा मागल्या- पुढल्या दारचा दृष्टांत इतर गोष्टींनाही लागू पडतो. पुढील दारी संस्कृतची, अभिजात वाङ्मयाची, लब्ध प्रतिष्ठितांची चर्चा चालते. पुढील दारी इंग्रजीचा बोलबाला असतो. मात्र मराठी, कन्नड, तेलगु, तमिळ आणि इतर सगळ्या बोली मागील दारी बोलल्या जातात. पुढील दारी अभिजात वाङ्मय असतं तर मागील दारी लोकवाङ्मय असतं, या दोन्ही परंपरा आपल्या वाङ्मयाचं संवर्धन करतात. पुढील दारच्या कालिदासापासून ते मागील दारच्या गप्पावजा संभाषणापर्यंत सर्व खाद्य आपलं वाङ्मय समृद्ध करतं. पुढील दारचे कालिदास, शेक्सपिअर, मागील दारच्या छोट्याछोट्या लोककथा आणि बायकांच्या गप्पा- जिथं सगळं मोकळं-ढाकळं असतं- पुढील दाराप्रमाणे, सभ्यतेचा, प्रतिष्ठेचा धाक नसतो. म्हणून जीवनातली काही तथ्यं मोकळेपणाने मांडली जातात. मागील दारी प्रश्न विचारले जातात. शंका विचारल्या जातात; पेचप्रसंग उपस्थित होतात- सनातन धर्माबद्दलचे, राजकारणाबद्दलचे. फक्त पुढील दाराशी संपर्क असणाऱ्यांना प्रश्न पडतच नाहीत. या दोन्हींचा एकत्रित संस्कार होऊनच लेखक जन्माला येतो. माझी खात्री आहे की आपल्या सर्व संतकवींना पुढील दाराइतकीच मागील दारची संस्कृतीही समजली होती. आपले सगळे आचार्य-शंकराचार्य, मध्वाचार्य, रामानुजाचार्य- पुढील दारचे! पण पुरंदरदास, तुकाराम, कबीर हे मागील दारचे. आपलं सर्व श्रेष्ठ काव्य मागील दारचंच आहे.

विनय :- या मागील दारच्या आणि पुढील दारच्या समृद्ध अनुभवातून तुम्हांला लेखनासाठी आणि चिंतनासाठी खूप कच्चा माल मिळाला तरीही लिखित शब्द हे सशक्त माध्यम आहे आणि ते आपल्याला हाताळता येईल, ही जाणीव नेमकी कधी झाली?
अनंतमूर्ती :- मी ज्या भागातून आलो तिथून अनेक फार मोठे लेखक कानडीला मिळाले आहेत. उदा. कुवेम्पु, त्यांचं गाव माझ्या गावाजवळच होतं. आमच्या गावांमधून तुंगा नदी वाहते आणि तिचं अरुंद पात्र ओलांडता यावं म्हणून एका जागी पात्रात दगड टाकलेले असायचे. मी अनेक वेळा त्या दगडांवरून येत-जात असे; ते सवयीचंच झालं होतं. नंतर कुवेम्पूंच्या एका कादंबरीतली दोन पात्रं तुंगा नदी त्याच दगडांवरून ओलांडतात असं वाचलं आणि माझ्यासाठी तुंगा नदी पूर्वीची उरलीच नाही. ही लिखित शब्दाची ताकद. ही कथा वाचल्यानंतर प्रत्येक खेपेला नदी ओलांडताना ती कुवेम्पूंची दोन पात्रं माझ्याबरोबर असायचीच- माझ्या कल्पनेच्या विश्वात...! अशा तर्हेने आपलं नेहमीचं जग लिखित शब्दांतून भेटतं, ते प्रत्यक्ष आणि कल्पनारम्य असं दोन्ही पातळ्यांवर. कन्नड कवी बेंद्रे यांचंच उदाहरण घेऊ, त्यांची मातृभाषा मराठी होती- ते घरी मराठीत बोलायचे- त्यांची उषःकालाचं- दिवस कसा फुटतो त्याचं- वर्णन करणारी एक अप्रतिम कविता आहे. तिचा कधीच अनुवाद करता येणार नाही. ती कविता वाचल्यानंतर माझा सूर्योदयाचा प्रत्येक अनुभव त्या कवितेला घेऊनच येतो. माझ्या बाह्य डोळ्यांना प्रत्यक्ष सकाळ तीच दिसत असली तरी माझ्या आतल्या डोळ्यांना वेगळीच सकाळ दिसते.


विनय :- वर्डस्वर्थने 'माय इनवर्ड आय' असं म्हटलं आहे. 
अनंतमूर्ती :- हो तसंच, अगदी साध्या शब्दयोजनेतूनही ही लिखित शब्दाची वेगळी ताकद आपल्याला जाणवते. मला कादंबऱ्या वाचतानाही हाच अनुभव येत असे. त्या काळात मी पुष्कळ बंगाली कादंबऱ्यांची भाषांतरं वाचली- शरदबाबू वाचले. मला वाटतं त्या काळात शरश्चंद्र चटर्जी हा बहुधा एकमेव अखिल भारतीय लेखक असावा. आता मला ते जरा सेन्टिमेन्टल वाटतात, पण तेव्हा त्यांचा माझ्यावर खूप प्रभाव पडला. गलगनाथ या कानडी भाषांतरकाराने अनेक मराठी कादंबर्या कानडीत आणल्या होत्या, त्याही मी वाचल्या. 'देवी चौधुराणी' हे एक नाव आत्ता लगेच आठवतं. त्यात प्राचीन संस्कृतीचं पुनरुज्जीवन झालं पाहिजे अशा धारणेचेही लेखक होते. या सर्वांमधून माझ्या कल्पनाशक्तीला चालना मिळत होती. पण माझ्यावर सर्वात जास्त प्रभाव पडला तो (के. शिवराम) कारंथ यांचा. विशेषतः त्यांच्या 'चोमाना दुडी' या कादंबरीचा. ही एक महान कादंबरी आहे. या कादंबरीचा नायक एक दलित आहे; तो आपल्या अंतर्मनातली सगळी सुख-दुःखं त्याची दिमडी वाजवून- बडवून सांगत असतो. ते वाचताना लिखित शब्दाची ताकद पुन्हा लक्षात आली. 'चोमाना दुडी" वाचण्यापूर्वी रोज खाली माझ्या घरी गोठा झाडायला येणारा दलित माणूस मी पहातच होतो पण कादंबरी वाचल्यावर मला वाटायला लागलं, हाही चोमासारखाच असेल का? याचंही एक अंतर्विश्व, भावविश्व असेल का? स्वतःप्रमाणे दुसऱ्यालाही भावविश्व असतं, हे कळलं की तुमची माणसाकडे पाहण्याची दृष्टीच बदलून जाते. हे कळलं नाही तोपर्यंत नोकराशी, गुलामाशी, दलिताशी वाईट वागणं शक्यच असतं, कारण भावविश्व मला आहे. त्याला नाही असं तुम्हांला वाटत असतं. त्याचं भावविश्व दिसायला लागलं की नातं बदलून जातं! म्हणूनच आल्बर्ट कामूनं असं म्हटलंय, "मारणार्याला वाटतं फक्त मलाच भावना आहेत, मात्र मार खाणार्याला वाटतं की माझ्याप्रमाणेच त्यालाही भावना असताना तो मला मारू कसा काय शकतो? त्यामुळे 'तुम्ही मला मारता कामा नये' म्हणणाऱ्या पण तरीही मार खाणाऱ्याची माणुसकीची जाणीव ही दुप्पट असते. मालकाचं आणि स्वतःचंही माणूसपण तो ओळखतो." हा अनुभव जबरदस्त होता. माझा सगळा उदारमतवादी राजकीय, सामाजिक विचार या अनुभवातून जन्माला आला, की दुसर्यालाही माझ्याप्रमाणेच अंतर्विश्व आहे; भावभावना आहेत. माझ्यासारखंच या गोठा झाडणार्यालाही मन असेल, त्यालाही एखादी मुलगी असेल, ती त्याची अत्यंत लाडकी असेल. त्याचेही हाल होत असतील. त्यालाही लैंगिक भूक असेल, म्हणजे तो माझ्यासारखाच आहे. हे आपल्याला महान वाङ्मयातूनच कळतं, फक्त तत्त्वचर्चेतून नाही. निदान भारतात तरी. 

विनय :- तुमच्या मुलाचं नाव शरद आहे ते शरदबाबूंवरून? 
अनंतमूर्ती :- हो. शिवाय त्याचा जन्मही शरद (आश्विन) मासातलाच आहे.

विनय :- त्या काळात तुमचं अंतर्विश्व कसं होतं? 
अनंतमूर्ती :- माझं अंतर्विश्व? त्यात अनेक गोष्टी चालू होत्या. मी हायस्कूलमध्ये असताना द्वैत-अद्वैत यावर खूप विचार करायचो. माझ्या गावी दोन मठ होते. एक अद्वैतवादी आणि एक द्वैतवादी. मी अनेक पंडितांच्या चर्चा ऐकल्या. परमेश्वरी तत्त्व आणि माणसांतलं आत्मतत्त्व ही एकच आहेत की भिन्न- आत्मतत्त्व हे ईश्वरी तत्त्वाचंच सूक्ष्मरूप आहे की वेगळं काही? यावर त्या चर्चा असत. शंकराचार्यांनाही हेच प्रश्न पडले होते. या चर्चा माझ्यावर खूप परिणाम करून गेल्या. अजूनही तो परिणाम कमी झालेला नाही. मी या प्रश्नांचा अजूनही खूप विचार करतो. परमेश्वराला सामान्य माणसापासून पूर्णपणे वेगळं मानणार्या ख्रिश्चन, इस्लाम या धर्मांचं मला खूप आकर्षण वाटतं, कारण त्या धर्मात माणूस ईश्वराला पूर्णपणे शरण जाऊ शकतो. द्वैत मतामध्येही ते शक्य आहे. अद्वैत मत एकीकडे गोंधळात पाडणारं आहे; तर दुसरीकडे स्वातंत्र्य देणारंही आहे. अद्वैत मतात निराशा येतच नाही, कारण स्वतःपासून वेगळी अशी ईश्वरी शक्ती आहे आणि ती सर्व बर्या-वाईट गोष्टी घडवत असते, असं तुम्ही मानतच नाही. दोन्ही तत्त्वज्ञानांतल्या आध्यात्मिक शक्यता मात्र प्रचंड आहेत, त्यामुळे मला दोन्हीचं आकर्षण आहे. आणि यानंतर भारताच्या राजकारणात गांधीयुग सुरू झालं. माझे वडील 'हरिजन' घेत असत. वडिलांचाही माझ्यावर खूप प्रभाव होता. स्वतःचं शिक्षण त्यांनी स्वतःच केलं होतं. त्यांना 'ऑटोडायडॅक्ट' म्हटलं तरी चालेल. त्या काळात पारंपरिक वातावरणात देवळात राहून स्वतः अभ्यास करून कुणालाही कळू न देता ते लंडन मॅट्रिक्युलेशन उत्तीर्ण झाले होते, म्हणजे पहा! अशा तऱ्हेनं आधुनिक जगही आमच्या घरात शिरलं होतं. माझ्या वडिलांच्या जुन्या आणि नव्या जगामध्ये सतत येरझाऱ्या चालू असायच्या. ते केस कापायचे पण शेंडीही ठेवायचे. त्या त्या वेळच्या मूडप्रमाणे, कधी शेंडी मोठी असायची तर कधी कापून राखलेले केस. म्हणून मला नेहमीच वाटतं की, आपल्याला सगळ्यांनाच आपण केस राखले तरी शेंडी असतेच.


विनय :- आणि तुम्ही त्यात दाढीही राखलीय? 
अनंतमूर्ती :- (हसत) हो- हा संघर्ष कर्मठपणा आणि आधुनिकता यांच्यामधला सुरू झालेला होताच. याचाच एक लाभ असा झाला की तेव्हापासून आजपर्यंत कोणताही प्रश्न दोन परस्परविरोधी भूमिकांच्यामध्ये वेगळा तोलून मी पाहू शकतो; आणि माझ्या अनुभवावरून त्याचा निर्णय करतो. अनुभवाची कसोटी फार महत्त्वाची आहे. ती बाजूला ठेवून केलेली चर्चा म्हणजे निव्वळ बकवास, जो आपल्या आसपास पुष्कळ चालू असतो. म्हणून माझी सगळी मतं, माझ्या मनातले प्रश्न, माझे सगळे वैचारिक संघर्ष यांच्याकडे आयुष्यभर मी अत्यंत खुलेपणाने पहात आलो आहे. हे करता करताच मी कॉलेजात आलो आणि साधारण 1950 च्या दशकाच्या सुरुवातीला डॉ. राममनोहर लोहिया यांच्या प्रभावाखालीही आलो. माझ्या वडिलांना 'हरिजन' साप्ताहिकाच्या माध्यमातून लोहिया माहीत होते; आणि गांधींना अडचणीत आणणारे प्रश्न विचारणारा माणूस म्हणजे लोहिया, हेही त्यांना माहीत होतं. 

विनय :- गांधींनाच काय- लोहिया सर्वांनाच अडचणीत आणणारे प्रश्न विचारत असत...
अनंतमूर्ती :- असे लोहिया शेतकऱ्यांच्या एका लढ्याचं नेतृत्व करण्यासाठी कर्नाटकात आले. मी त्यांची भाषणे ऐकली. त्यांच्याशी माझा परिचयही झाला, मला भेटलेल्या काही अत्यंत महान विचारवंतांमध्ये लोहिया होते. त्यांची बुद्धिमत्ता धारदार होती आणि तात्त्विक उंची मोठी होती. तात्त्विक पातळीवर विचार करताना सत्याला अनेक पैलू असतात, याचं भान त्यांना होतं. मात्र ते क्रियाशील विचारवंत असल्याने, सत्याच्या अनेक पैलूंपैकी एकच महत्त्वाचा पैलू निवडून त्यावर कार्यक्रमाची उभारणी केली पाहिजे हेदेखील त्यांना कळत होतं. आणि त्यासाठी तो भाग सोपा करून कधी अतिशयोक्त भाषेत मांडावा लागेल हेही ओळखत होते. "असं करून प्रत्यक्ष कृती केल्याशिवाय आपल्यासारख्या देशात जीवन पुढे सरकत नाही, गतिमान होत नाही. या दोन्हीची सांगड कशी घालायची? लोकनेता म्हणून मला काही गोष्टी एकांगी करून भडक स्वरूपात मांडाव्याच लागतात. पण त्यावेळी मी मांडतोय ते पूर्ण सत्य नाही, हेही मला जाणवत असतं." असं ते एकदा म्हणाले आहेत. लोकांना कार्यक्रम द्यायचा तर टोकाची भूमिका घ्यावीच लागते. इंग्लिश कवी विल्यम ब्लेक म्हणाला होता. "टोकाची भूमिका घेतल्यावरच स्वर्गाची दारं उघडतात." काही वेळा तुम्हांला टोकाची भूमिका घ्यावीच लागते. त्यामुळे सत्य सांगणार्याला टोकालाही जावं लागतं आणि टोकाला जाताना संपूर्ण सत्य मागे राहातं याचंही भान ठेवावं लागतं. या दोन्ही गोष्टी एकाच वेळी कशा सांभाळायच्या? तुम्ही सत्यच नाकारलंत तर अवसरवादी, संधिसाधू होता. कुठल्याही गोष्टीतून मिळेल तेवढा फायदा लाटता आणि असे लोक वाटेल तेवढे भेटतात. पण तुम्ही सत्याचा केवळ एकच पैलू धरून बसलात आणि इतर नाकारलेत तर पुन्हा कर्मठ, माठाड, मूलतत्त्ववादी होता. इतरांना काहीच सत्य सापडलेलं नाही, अशी तुमची मानसिकता होते. सत्याच्या व्यापकतेचं भान तुम्हांला उरत नाही.

मला असं वाटतं, डॉ. लोहियांच्याकडे तत्त्वज्ञान आणि कृती यांच्यातला हा समतोल सांभाळण्याची क्षमता होती; ही तारेवरची कसरत त्यांना जमत होती. मृत्यूपूर्वी त्यांनी लिहिलेले दोन लेख मला फार महत्त्वाचे वाटतात. 'शंभर वर्षांत समाजवाद' या नावाचं पुस्तक त्यांनी लिहिलं. समाजवादी समाजरचना साकार व्हायला शंभर वर्षाइतका दीर्घकाळ लागेल. त्याआधी निराश वगैरे व्हायला जागाच नाही असं ते सुचवत होते. 'निराशा के कर्तव्य' हा त्यांचा दुसरा शेवटचा लेख थोडासा भगवद्गीतेसारखा, निराशा वाट्याला आली तरी तुम्ही तुमचं कर्तव्य केलंच पाहिजे, याचा आग्रह धरणारा. मला तर वाटते की, लोहियांच्या नंतर तात्त्विक भूमिका असलेला, चिंतनशील, कृतिशूर राजकारणी आपल्याकडे झालेलाच नाही. दोन्हीपैकी एक गुण असणारे भेटतात पण दुसरा गुण सहसा नसतो. 

विनय :- तुमच्या बालपणातला पारंपरिक भाग, तुमची बौद्धिक जडणघडण तुम्ही सांगितलीत, आता तुमच्या भावनिक विकासाबद्दल बोलू या. कारण तुमच्या लिखाणात आणि वागण्यात भावनोत्कटता आणि कमालीचा गोडवा आहे. 
अनंतमूर्ती :- तो माझा स्वभावच आहे- ते सहजगत्या आलं नसतं, तर सतत तशी बतावणी करणं तर फारच कष्टाचं झालं असतं. थॉमस हार्डीची एक मस्त कविता आठवते. एका तरुणाला एका पाद्र्याविषयी खूप आदर वाटत असतो; कारण त्या पाद्र्याची प्रवचनं अतिशय प्रभावी असतात. म्हणून हा तरुण एक दिवस त्या पाद्र्याचा माग काढत जातो, तर त्याला काय दिसतं? तो पाद्री स्वतःच्या खोलीत आरशासमोर उभा राहून प्रवचन तोंडपाठ करून घटवत असतो! हा तरुण खलास होतो. हे सगळं सहज घडलं तरच मजा असते- त्याची स्वतःला जाणीवसुद्धा होता कामा नये. म्हणून मला इंग्रजी काव्यातली एक ओळ सर्वाधिक आवडते. 'द लीटल अनरिमेंबर्ड अॅक्टस ऑव्ह काइन्डनेस अँड लव्ह' (सहज प्रेमातून, करुणेमधून घडलेल्या लहान-सहान कृती)- ही वर्डस्वर्थची ओळ मला एक थेट विधान वाटते- त्यात काही उपमा अलंकार नाहीत. जीवनातला बराचसा आनंद अशा कृतींमधून निर्माण होतो. ते तुमच्या स्वभावात असतं किंवा नसतं! (बाहेरून निर्माण करता येत नाही.) असलं तर तुम्ही पुढे जात राहता- न त्रासता, न थकता!

विनय :- मी जरा गद्य प्रश्न विचारत होतो- तुमचे मित्र कोण असत, तुम्ही कोणते चित्रपट, नाटकं पाहिलीत. वाचनाबद्दल तुम्ही सांगितलं पण वाचनाबाहेर पुष्कळच आयुष्य आपण जगत असतो....

अनंतमूर्ती :- हो, निश्चितच! कर्नाटकातल्या लहानशा खेड्यातून आल्यामुळे मी यक्षगान आणि हरिकथा (कीर्तन) खूपच ऐकली. मला गाण्याची ओळखच हरिकथेमधून झाली. नंतर मी संगीताकडे आकृष्ट झालो- खूप (कर्नाटक) शास्त्रीय संगीत ऐकलं. त्यानंतर सिनेसंगीतही. आपणा सर्व भारतीयांना गाणं यायला लागतं ते सिनेमातूनच. शिवाय शास्त्रीय संगीत आणि सिनेसंगीत यांत फार अंतर नसतं- निदान माझ्या काळात तरी नव्हतं. आता कदाचित त्यांची ताटातूट झाली असेल; पण तेव्हा तरी झाली नव्हती. नाटकंही खूप पाहिली.

त्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या काळात राजकीय नेत्यांची भाषणं ऐकणं हासुद्धा एक नाट्यमय अनुभव असे- भाषण ऐकून परत येताना आपल्या अंतर्मनाला वेगळीच जाग आली आहे, असं वाटायचं. जयप्रकाश नारायण, राममनोहर लोहिया यांची जशी व्याख्यानं ऐकली. तसेच जवाहरलाल नेहरू, डॉ. राधाकृष्णन् हेही ऐकले. त्यांचे आवाज अजूनही माझ्या कानात साठून आहेत. आणि चांगले शिक्षक त्यांचं तर जीवनप्रवास आनंददायी करण्यात खूपच मोठे स्थान असायचं. माझ्या तरुणपणी एखाद्या छोट्या-मोठ्या समाजवादी गटाचा सदस्य असणं म्हणजे एका मोठ्या कुटुंबाचा घटक असण्यासारखं होतं. तिथे कोणी तुमची जात विचारत नव्हतं. तुम्ही समाजात किती प्रतिष्ठित आहात याला महत्त्व नव्हतं. पन्नास वर्षांपूर्वी असे छोटे-छोटे समूह असायचे. आता अस्तित्वात असतील असं वाटत नाही- असलेच तरी अगदी मोजके! मात्र अशा छोट्या-मोठ्या संघटनांमधून मला खूप मित्र मिळाले, तुझी माझी ओळखही तशीच झाली.

विनय :- 1978 साली उज्जिरे गावी. इंदिरा गांधी चिकमगळूरमधून उभ्या होत्या. आपण दोघेही जनता पक्षाचा प्रचार करत होतो. तेथील सभेत प्रा.समरेंद्र कुंडू यांच्या इंग्रजी भाषणाचा तुम्ही कन्नड अनुवाद करत होता- यंदा आपल्या परिचयाचं रौप्यमहोत्सवी वर्ष आहे.
अनंतमूर्ती :- हो- उज्जिरे... आठवतं.

विनय :- तुम्ही स्वतः समोर कुणाची रोल मॉडेल्स ठेवली होती? कारण इतक्या निरनिराळ्या क्षेत्रांतल्या ख्यातनाम लोकांशी तुमचा संबंध येत होता...
अनंतमूर्ती :- होते ना, काही महान कन्नड लेखक माझ्यासमोर रोल मॉडेल्स म्हणून होते. उदा. के. शिवराम कारंथ माझं एक मोठं रोल मॉडेल- कारण ते लेखक होते, शिवाय कार्यकर्ते, समाजसुधारकही होते. (त्या काळात) त्यांनी जातीबाहेर लग्न केलं होतं, त्यामुळे खळबळ माजली होती. त्यांना संगीतात, नाटकात रस होता. अनेक सामाजिक समस्यांसाठी त्यांनी संघर्ष केले. पर्यावरणासाठी (आयुष्याच्या अखेरच्या काळात) लढा दिला- हा माणूस मोठाच होता! नंतर कन्नड कवी अडिगा यांचाही अशा रोल मॉडेल्समध्ये समावेश झाला. मी इंग्रजी वाङ्मयाचा विद्यार्थी असल्यामुळे अनेक महान लेखक वाचताना मी भारावून गेलो, त्यांच्या प्रेमातच पडलो. इंग्रजी अनुवादित स्वरूपात अनेक रशियन लेखक वाचले. या सर्वांचाच प्रभाव पडला माझ्यावर! खूप गहिरा!

विनय :- काही सामाजिक, राजकीय क्षेत्रातील...? 
अनंतमूर्ती :- अर्थातच लोहिया आणि जयप्रकाश... अगदी नंतरच्या काळात आणीबाणी लागू असतानासुद्धा जेपींची भाषणं ऐकली. थकले होते, आजारी होते, त्यांना खुर्चीतून उचलून व्यासपीठावर आणलं जायचं आणि जेपी शांतपणाने एखाद्या हाडाच्या शिक्षकाच्या ठाम बांधिलकीमधून हजारोंशी संवाद करायचे- ते काही मोठं वक्ता नव्हते- त्यांच्या भाषणात अभिनिवेश नव्हता, हातवारे नव्हते पण जेपींचा अर्धवट उचललेला हात नुसता आडवा इकडून तिकडे हलला तरी समोरच्या हजारोंचे डोळे त्या मागोमाग फिरायचे असं त्यांचं स्वतःचं प्रभावक्षेत्र होतं- लोहचुंबकासारखं! असाच एक दिल्लीचा मेळावा. जिथे मी जगजीवनबाबू आणि जेपींची भाषणं ऐकली. तो मेळावा फसावा म्हणून त्याचवेळी संजय गांधींनी टीव्हीवर 'बॉबी' सिनेमा दाखवायची शक्कल लढवली होती तरी समोर हजारो श्रोते होतेच. तिथे जेपी अत्यंत प्रांजळपणे लोकांना सांगत होते, 'सैनिक आणि पोलीस यांनी त्यांच्या मनाला न पटणाऱ्या आज्ञांचं पालन करू नये, असं आवाहन करण्यात माझं काही चुकलं का, हे मी न्या.तारकुंड्यांना विचारलं; आणि त्यांनी माझं म्हणणं बरोबर आहे असं सांगितलं." असे होते जेपी. समोर हजारो श्रोते जिवाचे कान करून त्यांचे भाषण ऐकायला जमले होते आणि जेपी त्या गर्दीसमोर न्या. तारकुंड्यांचा हवाला देत होते. (हसतात). जेपी हा माणूस फार फार वेगळा होता. आता तसा कुणी सापडणार नाही... विलक्षण माणूस!

विनय :- तुम्ही विद्यार्थी असताना ज्या उत्तर हिंदुस्थानी वक्त्यांची भाषणं ऐकलीत ते कोणत्या भाषेत बोलायचे?
अनंतमूर्ती :- हे हिंदीत बोलायचे- कारण कर्नाटकात स्थायिक झालेल्या उत्तर भारतातल्या व्यापार्यांची, दुकानदारांची संख्या खूप मोठी आहे- हे दुकानदार कानडी शिकलेच पण त्यांच्यामुळे कर्नाटकात हिंदीचाही पुष्कळच वापर होत असे-

विनय :- म्हणजे कर्नाटकात भाषावाद फारसा प्रबळ नव्हता- की अस्तित्वातच नव्हता?
अनंतमूर्ती :- कर्नाटकातला भाषावाद तसा नेहमीच सौम्य होता; स्वातंत्र्यापूर्वी तर प्रबळ नव्हताच. मात्र आता परिस्थिती बदलते आहे. काही गट जाणीवपूर्वक भाषावादावर भर देतात, त्यांना कधी यश मिळू नये, असंच मला वाटतं. 

विनय :- तुम्ही संशोधन करण्यासाठी बर्मिंगहॅमला गेलात, तुमची पीएचडी तिथलीच आहे- तेथील काही रोल मॉडेल्स...? 
अनंतमूर्ती :- नाहीत... (हसत) तोपर्यंत मी मोठा झालो होतो- माझे सगळे रोल मॉडेल्स भारतातच होते- हां, एकोणिसाव्या शतकातल्या युरोपमध्ये मला काही रोल मॉडेल्स भेटले, पण विसाव्या शतकात कुणीही नाही. पण माझी इंग्लंडमधली वर्ष चांगली गेली. त्याच काळात चीनमध्ये सांस्कृतिक क्रांती झाली. व्हिएतनाममध्ये संघर्ष आणि युद्ध झालं. एक नवी संस्कृती उदय पावते आहे असा आशावाद तेव्हा निर्माण झाला होता. पण त्यात फारसा अर्थ नाही हे समजणाऱ्या थोड्या माणसांत मीही होतो. इंग्लंडमध्ये मी चिनी विद्यार्थ्यांना इंग्रजी शिकवीत असे. मी त्यांना 'माओबद्दल तुम्हांला काय वाटतं' असं विचारायचो- ते बोलायचे नाहीत. त्यांना चीनबद्दल काही विचारलं, तरीही बोलायचे नाहीत. मग मी त्यांना सांगायचो, “तुम्ही मला नेहरूंबद्दल काहीही विचारू शकता. मी म्हणेन 'नेहरू खड्यात गेले’ पण तरी माझ्या देशभक्तीत उणेपणा आला असं वाटणार नाही. तुम्हांला तुमच्या समाजाला, देशाला झालंय तरी काय?" मला याचा फार त्रास व्हायचा. म्हणून माझ्या अनेक कम्युनिस्ट मित्रांप्रमाणे मी कधीच चीनची बाजू घेतली नाही. बोलायला परवानगी नाही, विचारांची, अनुभवांची देवाण-घेवाण नाही असा बंदिस्त समाज ही कल्पनाच मला सहन होत नसे. 

विनय :- आपण लेखक आणि शिक्षकही होणार आहोत हे तुम्ही केव्हा ओळखलं?
अनंतमूर्ती :- खूपच लवकर ओळखलं! शालान्त परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर प्रत्येक उन्हाळ्याच्या सुट्टीत मी साक्षरता प्रसार मोहिमेत भाग घेत असे. माझ्या गावी जाऊन लिहिता- वाचता न येणाऱ्यांना गोळा करून त्यांना शिकवण्याचं काम मी बरेच दिवस केलं. पदवीचा अभ्यास चालू असताना पैसे मिळविण्यासाठी काही शिकवण्याही करत असे. त्यामुळे शिक्षक होण्याचा ध्यास माझ्या मनात तरुण वयापासूनच निर्माण झाला होता.

विनय :- मात्र तुम्ही खूपच वेगवेगळ्या पातळीवरच्या विद्यार्थ्यांना शिकवलेलं आहे...
अनंतमूर्ती :- तेही खरं आहे. हायस्कूलमध्ये शिकवलं- इंग्लंडमध्ये. मैसूरच्या प्रादेशिक शिक्षण महाविद्यालयात असताना शिक्षक बनू पाहणाऱ्यांना शिकवलं- त्यांना मी नमुनेदार पाठ दाखवायला इतर शाळांमध्येही घेऊन जात असे. त्यानंतर पदवीच्या विद्यार्थ्यांना, त्यानंतर परदेशात विद्यापीठातही अध्यापन केलं. अध्यापन हा माझ्या आवडीचा विषय आहे- मी विविध पातळ्यांवर शिकवलं आहे- याचा मला फार अभिमान वाटतो. परफॉर्मर असण्यापेक्षा शिक्षक असण्यातून जास्त समाधान मिळतं असं मला वाटतं. आपल्या विद्यार्थ्यांचा विकास होताना पाहणं- तुम्हांला येत असतं, तिथपर्यंतचा विकास आणि नंतर त्यांचा तुमच्याही पुढे जाताना होणारा विकास- हा अनुभव विलक्षण असतो. शिकवणं संपतं पण शिकणं संपत नाही हेही खरं असतं. संगीत कला क्षेत्रातल्या शिक्षकांनादेखील असाच अनुभव येत असेल. पण संगीत- वाद्य कलाक्षेत्राकडे विद्या येतात, ते स्वतःची आवड म्हणून. आपल्या इतर कॉलेजांमध्ये त्या भूमिकेतून येत नाहीत. त्यांना तिथे पालकांनी धाडलेलं असतं.

विनय :- अध्यापनाबरोबरच तुम्ही संस्थाप्रमुख, प्रशासक म्हणूनही काम केलं आहे. तुम्ही कुलगुरुपदावर होता, साहित्य अकादमीचे अध्यक्ष होता- नॅशनल बुक ट्रस्टमध्येही...
अनंतमूर्ती :- आणि इतरही अनेक संस्था, समित्यांवर.... 

विनय :- या भूमिका बजावताना आनंद, उत्साह टिकवून कसा धरलात?

अनंतमूर्ती :- एक तर ती पदं मी स्वतः मागून घेतलेली नसतात आणि मी केव्हाही त्या पदांचा त्याग करायला तयार असतो- कधी मुद्दाम कुणाची बाजू घेत नाही. केरळमधल्या महात्मा गांधी विद्यापीठाचा मी कुलगुरू झालो तोही असाच- इ.एम.एस. नंबुद्रिपाद यांच्याकडून मला विचारण्यात आलं होतं- मी एक दिवस विचार करण्यासाठी मागून घेतला आणि नंतर ते स्वीकारलं. 

विनय :- तुम्ही स्वतःसाठी कधी काही मागितलं असेल, असं वाटत नाही. 
अनंतमूर्ती :- पण माझी पहिली लेक्चररची नोकरी- ते पद मी मागून घेतलं होतं- शिक्षण संपलं होतं, पैशाची निकड होती.

विनय :- म्हणजे फक्त सुरुवातीपुरतंच....
अनंतमूर्ती :- हो, फक्त तेव्हा एकदाच- नोकरीची गरजच तशी होती. (हसत) आणि भारतात केवळ गुणवत्तेवर काही मिळत नाही- गुणवत्ता आणि वशिलाही लागतोच. तर केरळमधल्या कुलगुरुपदाबद्दल सांगतो- (त्यांनी त्या विद्यापीठाचं नाव 'गांधीजी विद्यापीठ' ठेवलं होतं- ते मी बदलून 'महात्मा गांधी विद्यापीठ' केलं. गांधी या व्यक्तीला गांधीजी म्हणता येईल, संस्थेला कसं काय म्हणणार?) केरळमध्ये तेव्हा कम्युनिस्ट सरकार होतं तरी मी माझं स्वातंत्र्य टिकवून होतोच. त्याच काळात मला चीनला जायचा योग आला आणि मी चीनमध्ये पाऊल टाकलं त्याच दिवशी तेन-आन-मन चौकातला प्रकार घडला. (लोकशाहीसाठी निदर्शनं करणाऱ्या विद्यार्थ्यांचं आंदोलन चिरडून टाकण्यात आलं). मला तीव्र संताप आला. भारतात परत आल्यावर मी या घटनेचा निषेध करणारी एक लेखमाला 'इंडियन एक्स्प्रेस'मध्ये लिहिली, आणि केरळ कम्युनिस्ट पक्षातल्या तरुणांचा रोष ओढवून घेतला. 'आम्ही तुम्हांला व्हीसी केलं आणि तुम्ही चीनवर टीका करता', असं त्यांचं म्हणणं होतं. मी म्हणालो, 'माझा नाइलाज आहे, मला सत्य सांगितलंच पाहिजे आणि ते मी सांगणार'. एवढं झालं तरी माझ्या कुलगुरुपदाच्या कामावर परिणाम झाला नाही आणि मी माझं स्वातंत्र्य कधीच गमावलं नाही; पण हे सगळं करताना खूप तोल सांभाळून करावं लागतं, एकदम टोकाची भूमिका घेऊन चालत नाही, कारण तुम्ही एका सार्वजनिक जबाबदारीच्या अधिकारपदावर काम करीत असता. पण काही बाबतीत मी कधीच तडजोड केली नाही- उदाहरणार्थ, शिक्षकांच्या नेमणुका करताना चांगलेच शिक्षक नेमले- त्यानं विद्यापीठाचं भलंच झालं.

इतर संस्थांच्यामध्ये- उदा. साहित्य अकादमी- फारशी अडचण येत नाही. मात्र तुम्ही साहित्यात राजकारण आणता कामा नये. कुणाला पुढे सरकावण्याची खटपट करू नये- या साहित्यिक संस्थांना त्यांचे निर्णय घेऊ द्यावेत. मुख्य म्हणजे अधिकाराचा वापर स्वतःच्या लिखाणाच्या भलावणीसाठी कधीही करू नये; ते फार वाईट. तसं केलं तर तुमच्या लेखनावर वाईट मत द्यायला कुणी धजावणारच नाही, आणि त्या पदावरून तुम्ही दूर झालात की सगळेजण तुमचं लिखाण वाईट ठरवतील.

अगदी कॉलेजात प्रोफेसर असाल, तरी हेच घडतं. म्हणून (अशा संस्थांमध्ये काम करताना) स्वतःवर टीका करण्याचं स्वातंत्र्य इतर सर्वांना दिलं पाहिजे- कधीकधी त्या टीकेमुळे वेदना होतील, तरीही! पुढेपुढे तर मी वाईट वाटून न घेणंही शिकून घेतलं कारण एकदा तुम्ही लिहून छापलंत की तो मजकूर तुमचा राहतच नाही- तो संपूर्णपणे वाचकांच्या मालकीचा असतो. ते कधी त्याला बरं म्हणतील कधी वाईट म्हणतील. ते सार्वजनिक झालेलं असतं. लोकांच्या अधिकारक्षेत्रात त्याचा समावेश होतो. आणखी असं पाहा, प्राचीन काळी कुमार व्यास, पंपा यांच्यासारखे महान लेखक झाले, तेव्हा तर कॉपीराईट्सही नव्हते. त्यांच्या रचना ऐकून लक्षात ठेवणारांच्या किंवा लिहून ठेवणारांच्या मालकीच्या झाल्या, पण रचनाकार म्हणून नावं मूळ लेखकांचीच राहिली. मला कधीकधी या जुन्या लेखकांनी वापरलेली 'मेमॉरिक डिव्हायसेस (स्मरणोपयोगी तंत्रे) पाहून विस्मय वाटतो. त्यामुळे पाठांतर सोपं होत असे. अनुप्रास, ध्वनी, यमक अशी तंत्र त्यांनी वापरली. पाठांतर सोपं झालं की एखादी रचना पाठ केल्यावर ती पाठ करणाराचीच होते. आपले वेद असेच (सार्वजनिक) स्मरणातून टिकून राहिले; आपलं संगीतही तसंच टिकलं- बसबाबांच्या रचनाही- कॉपीराईटसूच नव्हते आणि रचना थेट लोकांपर्यंत जाऊन भिडत असे. जे पाठ करण्याच्या लायकीचं नव्हतं त्याकडे लोकांनी दुर्लक्षच केलं- त्यामुळे वेगळी टीका करण्याची गरजच राहिली नाही. ते आपल्या मरणाने मेलं. 

आता नव्या इलेक्ट्रॉनिक्समुळेही कॉपीराईटस् निरर्थक ठरत आहेत- त्यामुळे एक वर्तुळ पूर्ण करून आपण पुन्हा प्राचीन काळातच पोचलो आहोत असं वाटतं- पूर्वीही ते तसं निरर्थकच होतं. सर्वांना आपलं लेखन उपलब्ध असावं म्हणून हल्ली आपण ते इंटरनेटवर टाकतो. कुमार व्यास, कबीर यांनीही एक वेगळ्या प्रकारचं इंटरनेटच वापरलं होतं- लोकांच्या स्मरणशक्तीचं. हे इंटरनेट एकेकाळी इतकं प्रभावी होतं की हजार वर्षांपूर्वी काश्मीरमध्ये 'ध्वन्यालोक' लिहिला गेला. त्यावर लगेचच 'ध्वनिअलंकार दर्शन' नावाच्या कानडी ग्रंथात टिप्पणी करण्यात आली होती. ध्वनी हा केवळ आणखी एक अलंकार आहे, त्यासाठी वेगळ्या सिद्धांताची गरज नाही असं सुचवलं होतं. आज आपण युरोपात कुणी काही म्हटलं तर त्याची समीक्षा करतो पण पंजाबात काही म्हटलं तर त्यावर महाराष्ट्रात प्रतिक्रिया उमटत नाही- कर्नाटकात काही घडलं तर बंगालमध्ये त्याची चर्चा होत नाही. आपलं प्राचीन इंटरनेट आपण गमावलं आहे आणि आपण युरोपशी इंटरनेटिंग करण्यात धन्यता मानतो. आधुनिक भारतामधली ही एक समस्याच आहे. 
थोडं विषयांतर झालं- परंतु लिहून झालं की ते लोकांच्या स्वाधीन करावं हे सर्वांत उत्तम- आपण दूर व्हावं. 

विनय :- शेवटचा व्यक्तिगत प्रश्न विचारतो- तुम्ही कारंथांच्या आंतरजातीय विवाहाचा उल्लेख केलात. मी असं ऐकलं आहे की तुमच्या लग्नामुळेही चांगलीच खळबळ उडाली होती- फारसा त्रास होणार नसेल तर त्यांबद्दल थोडं...
अनंतमूर्ती :- (हसत) छे छे! त्रास कसला- मी आजही माझ्या पत्नीबरोबरच राहतो आहे- मी एका ख्रिश्चन
मुलीशी लग्न केलं.... 

विनय :- मग तर अग्रहारात स्फोटच झाला असेल? 
अनंतमूर्ती :- झाला....न्....थोडाफार... माझ्या वडिलांनी माझ्याशी बोलणं टाकलं. त्यांनी फारसे पैसे नसताना मला अतिशय स्वाभिमानानं वाढवलं होतं तरी मी त्यांना पैसे पाठवत असे (फार मोठी रक्कम नव्हती- माझ्या 250 रुपये मासिक पगारातले 50 रुपये) ते घ्यायचं बंद केलं, पण आई जास्त व्यवहारी होती, ती ते पैसे घेत असे. पण गंमत बघा- आम्हांला मुलगा झाला तेव्हा माझ्या वडिलांनी स्वतः नातवाची जन्मपत्रिका तयार केली- मी ओळखल की आता ते निवळले- त्यांनी मला परत स्वीकारलं- त्यांचं असं, तर माझ्या आईला माझे पैसे चालत होते. मात्र माझ्या बायकोनं स्वैपाकघरात शिवाशिव केलेली खपत नसे. आपला भारतीय समाज असा मजेशीर आहे. 

विनय :- पण सौ. अनंतमूर्ती तुम्हाला भेटल्या कुठे, कशा...? 
अनंतमूर्ती :- ती माझी विद्यार्थिनी होती (हसत), शिक्षक असताना एवढा एक बेकायदेशीर उद्योग मी करत होतो- मी हासनमध्ये लेक्चरर होतो, माझे विद्यार्थी भिंतीवर लिहून ठेवायचे 'यू आर ए + एस्थर- दोन-तीन वर्षांनी मी लिहिलं 'यू. आर. ए + एस्थर = मुलगा.’ हे झालं आणि सगळं कायद्यात बसलं.

विनय :- तरी हे सारं इतक्या सहज घडलं नसणारच...! 
अनंतमूर्ती :- एक तर एस्थर माझी विद्यार्थिनी होती- दुसरं म्हणजे माझी बहीण लग्नाची होती- त्यामुळे काही काळ थांबावं लागलं. नंतर मात्र आम्ही अगदी साधेपणाने सबरजिस्टारच्या ऑफिसात जाऊन नोंदणीपद्धतीने लग्न केलं. आई-वडिलांना आमचं लग्न झाल्याचं कळवून टाकलं. 


विनय :- एस्थरच्या आई-वडिलांची हरकत नव्हती?
अनंतमूर्ती :- थोडीशी होती कारण मी ख्रिश्चन व्हायला नकार दिला होता. 'मी माझा धर्म बदलणार नाही' असं सांगूनच टाकलं होतं- ते त्यांना जरा जड गेलं. शिवाय त्यांच्या मनात हिंदूंबद्दल थोडीशी भीतीही होती- आपल्या मुलीला जादूटोणा, मंत्रतंत्र यांचा त्रास होईल, अशी त्यांना धास्ती वाटत होती. कारण हिंदूंमध्ये दुसऱ्याला अदृश्यपणे छळण्याच्या अनेक युक्त्या आहेतच- तांत्रिक उपासना म्हणजे दुसरं काय असतं? आजही या अदृश्य उपायांच आकर्षण कमी झालेलं नाही. सगळ्या आचार्यांनी- शंकर, रामानुज, मध्व, सगळ्या संतांनी तांत्रिकांवर कठोर प्रहार करूनही ते वाढतं आहे. मी तर असं ऐकतो की हल्ली राजकारणातसुद्धा तांत्रिक मार्गांचा वापर करण्याचं प्रमाण वाढतं आहे- प्रतिस्पर्ध्याला निवडणुकीत पराभूत करण्यासाठी वगैरे. तांत्रिक उपासना गर्हणीय आहे; कारण ती धर्माचा वापर केवळ सत्तेसाठी, इतरांवर निष्ठुर स्वामित्व गाजवण्यासाठी करते. आता भारतात संत उरलेलेच नाहीत- सगळे गुरू, बाबा, तांत्रिकांपैकीच आहेत आणि शिकलेले, पैसेवाले लोक त्यांच्या नादी लागतात- 'धर्माचं युग संपलं, आता आध्यात्मिकतेचं युग सुरू झालं आहे,' असं विनोबाजी म्हणाले होते; ते फार महत्त्वाचं होतं. गांधी, रमणमहर्षी यांच्या काळात ते शक्यही होतं, हिंदू, ख्रिस्ती, पारशी असे कोणीही त्यांचे शिष्य असत, कारण धर्माच्या पलीकडे गेल्यावरच अध्यात्माचा प्रदेश सुरू होतो. पण आपण उलटे फिरून अध्यात्माकडून तांत्रिक उपासनेकडे परत पोचलो आहोत. आता लोक तुकारामाकडे जायचे नाहीत. एखाद्या तांत्रिकाकडे जातील- हे फार चिंताजनक वाटतं.... तुझ्या प्रश्नाचं उत्तर देतो- एस्थरच्या माहेरच्यांना सुरुवातीला वाटत असलेली भीती कालांतराने अर्थातच पूर्णपणे नष्ट झाली.

: साहित्यिक :

विनय :- लेखक म्हणून तुमचा प्रवास प्रदीर्घ आहे, कविता, कथा, कादंबऱ्या, समीक्षा आणि एक(च) नाटकही तुम्ही लिहिलं आहे...
अनंतमूर्ती :- हो, एकच.

विनय :- काही प्रवासवर्णने...
अनंतमूर्ती :- क्वचित् कधी.

विनय :- याशिवाय राजकारण आणि साहित्य, साहित्यिक यांच्या परस्परसंबंधांवरही तुम्ही पुष्कळच लिहिलं आहे. 
अनंतमूर्ती :- हो, बरंच लिहिलं आहे.

विनय :- या प्रवासाची सुरुवात कोणत्या साहित्यप्रकाराने झाली?
अनंतमूर्ती :- अर्थातच कवितेनं- कवी असणं म्हणजे कुणीतरी मोठं असणं, असं सगळ्यांना वाटतंच. पण नंतर मी लघुकथा लिहू लागलो. माझ्या काही कथांवरून एकांकिका/ नाटकंही इतरांनी लिहिली. माझ्या मते लघुकथेतच एक कविताही असते आणि नाटकही असतंच - कथेत हे सामर्थ्य सुप्तावस्थेतच असतं. हे तिन्ही प्रकार एकत्र आणता येतात. 

विनय :- तुमच्या सुरुवातीच्या कविता कशा प्रकारच्या होत्या? 
अनंतमूर्ती :- त्या सगळ्या 'पुरोगामी, प्रागतिक' कविता होत्या. आपण सगळेच सुरुवातीला लिहितो तशा- (हसत) ढोंगीपणा, अप्रामाणिकपणा, भ्रष्टाचार यांचा धिक्कार करणाऱ्या... तो काळ महान आदर्शवादी डाव्या धारणांचाच होता- अगदी साध्या साध्या गोष्टींनी भारून जायला व्हायचं. एका किसान सभेच्या कार्यक्रमासाठी श्री. रामनंदन मिश्रा बिहारमधून माझ्या छोट्या गावी आले होते. मला त्यांचं भाषण अजूनही आठवतं! माझ्या वयाचा मुलगा. साहजिकच भारून जावा अशी त्यांची समाजवादाची आध्यात्मिक मांडणी होती! ते म्हणाले, 'परमेश्वराने दिलेला सूर्यप्रकाश, हवा, पाणी यांचा आपण विभागून खरेदी-विक्री करून उपभोग घेतो का? ते तर आपण भागीदारीत वापरतो- मग त्यानेच दिलेल्या जमिनीच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार आपण कसे काय करतो?" माझ्यावर त्यांच्या भाषणाचा खूप प्रभाव पडला- कारण माझं बालपण धार्मिक आध्यात्मिक वातावरणातच गेलं होतं. आजही मला वाटतं की बहुतेक भारतीयांना अशी मांडणीच आवडेल- व्यासंग, युक्तिवाद यांच्यावर आधारलेल्या राजकीय विचारापेक्षा! माझ्या कविताही तशाच होत्या- तशा सोप्यासाध्या कविता लिहिल्याचा मला खेद वाटत नाही, पण आता मी त्या काळाकडे, तशा मानसिकतेकडे परत जाऊ
शकणार नाही- ते लेखन मार्ग पडलं. 

विनय :- अशा लिखाणात एक जपून ठेवण्यासारखा भाबडेपणा असतो-
अनंतमूर्ती :- हो- भाबडेपणाच... पण नक्कीच हवाहवासा, जपून ठेवण्यासारखा आणि आपल्या समूहमनाचाच तो एक भाग असतो. मी नेहमीच म्हणतो की लेखकानं या समूहमनाशी सतत नाळ जोडली पाहिजे- एरवी तो कितीही झकपक झाला असला तरी! ही नाळ त्या त्या प्रदेशाच्या भाषेमधून जुळत असते. कारण भारतीय भाषा या सर्वसामान्य भारतीयांमुळे जिवंत राहिल्या आहेत- पुढे जाऊन मी असंही म्हणेन की निरक्षरतेमुळेच या भाषा (विशुद्ध लोकभाषा म्हणून) जिवंत राहिल्या! वाईटातून चांगलं घडतं ते असं. सगळे भारतीय शिक्षित, साक्षर उच्चवर्णीय असते तर सगळ्यांची भाषा एकच- संस्कृत झाली असती; किंवा पर्शियन, आता इंग्रजी. प्रादेशिक भाषांचं काय झालं असतं? मराठी, कन्नड या भाषांना जगवलं कुणी? भारतातल्या महान शूद्रांनी! शेतात घाम गाळणार्यांनी! या निरक्षर श्रमिकांच्या स्मरणातूनच आपले संतकवीही टिकून राहिले- जर्मनीमध्ये एका सेमिनारमध्ये बोलताना मी सरळ सांगितलं, 'आमचं मागासलेपण, आमची लोकसंख्या यामुळेच युरोपला भारतावर संपूर्ण कब्जा करता आला नाही. अनेक भाषांमुळे भारताच्या अनेक भागांत त्यांना घुसताच आलं नाही... (हसत) आणि आपली लोकसंख्या तर नेहमीच दणदणीत होती! 

म्हणून माझ्या मते इंग्रजी न येणं, युरोपची माहितीच नसणं, त्या संस्कृतीमध्ये सामील झालेलं नसणं ही अजूनही आपली बलस्थानं ठरू शकतात. पाश्चात्त्य प्रभावाखाली आलेल्या भारतीयांमध्ये आपण विसाव्या शतकाकडून 21व्या शतकाकडे गेलो अशा जाणिवा असतात- निरक्षर भारतीयांना याची चाहूलही लागत नसते- माझ्या आईला नसायची! सर्वसामान्य भारतीय मनाने कुंभमेळ्याच्या काळातच (सध्या 21 व्या शतक चालू झालं असलं तरी) जगत असतो.

विनय :- एका क्षणात तीन हजार वर्षे मागे वा पुढे? 
अनंतमूर्ती :- हो, त्याची काळाची संकल्पनाच वेगळी आहे. म्हणून माझ्या मते भारतीयांचे दोन प्रकार पडतात. पहिला नेहरूयुगात जडणघडण झालेल्यांचा- त्यांना वाटतं युरोप एकविसाव्या शतकात पोहोचला त्या मानाने भारत खूपच मागे पडला आहे म्हणून (खास काहीतरी) प्रयत्न करून युरोपला गाठलं पाहिजे- दुसऱ्या प्रकारचा भारतीय म्हणतो, 'युरोप कुठे पोचला आहे, त्याच्याशी आम्हांला काही देणं- घेणं नाही- ते आम्हांला सांगूच नका. आमच्या वेगळ्या वास्तवात आम्ही जगतो आहोत. जीवघेण्या वेगाने स्वतःलाच संपवायला निघालेल्या खरेदी-विक्रीत अडकलेल्या आजच्या पाश्चात्य जगाच्या तुलनेत (एरवी मर्यादा वाटली तरी) या भारतीय जाणिवेमुळेच दिलासा वाटू शकेल कदाचित! इथे दोन प्रकारची मानसिकता आढळते- हे थोडं-अधिक गुंतागुंतीचंही आहे- कारण ज्यांना आधुनिक जगात राहायचं आहे, त्यांना या दुसऱ्या धारणेच्या भारताबद्दल भावनिक जिव्हाळा असू शकतो आणि त्याउलट प्राचीन धारणेमध्ये जगणार्यांना या आधुनिक जागतिकीकरण होणाऱ्या भारताच्या झगमगाटाचं आकर्षण वाटू शकतं.

भारतातल्याच या दोन समूहांत एक तणाव आहे आणि तो दीर्घकाळ टिकून राहणार आहे. हे आपल्यातल्या प्रतिभावंतांसाठी मोठं आव्हान आहे आणि खूप विस्तीर्ण क्रीडांगणही! या प्रश्नाकडे एककल्ली एकांगी भूमिकेतून पाहणं बरोबर होणार नाही. माझंच पाहाना-एकेकाळी मी आधुनिकतेचा पुरस्कर्ता होतो. पारंपरिक ते सगळं वाईटच समजत होतो. आता मला तितकी खात्री वाटत नाही; कारण परंपरेमुळेच समूह म्हणून आपल्या अनेक आठवणी जिवंत राहतात. उदा. संगीत-नृत्य या कलांमधील गुरु-शिष्य परंपरा. बायका लोणची घालतात ती मिठामुळे टिकतात, तसंच सामूहिक स्मरणाच्या मिठातून अनेक चांगल्या गोष्टी परंपरेमुळे जपल्या जातात. आधुनिकतेच्याविषयी मी पूर्वीइतका आता निःशंक नाही; कारण युरोप सुखात आहे अशी मला खात्री वाटत नाही- युरोपमध्ये आता महान कलाकृती निर्माण करण्याची क्षमता उरली आहे असं वाटत नाही- ज्या मध्ययुगीन युरोपमध्ये ती क्षमता होती तो पुष्कळसा आजच्या भारतासारखाच होता. दोन्हीत खूप साम्य आहे. या (आधुनिक परंपरांमधल्या) चर्चेचे आयाम सारखे बदलत असतात. म्हणून माझ्यापुरतं मी ठरवलं, की मी क्रिटिकल इनसायडर असेन. मी परंपरा टाकाऊ ठरवणार नाहीच पण तिची समीक्षाही करतच राहीन-

विनय :- तुमच्या लघुकथा मी (मुख्यतः भाषांतरातूनच) वाचल्या आहेत- त्यात तुमच्या मालनाडच्या (शिमोगा, चिकमगळूर हासन, कूर्ग या जिल्ह्यांचा निसर्गरम्य प्रदेश) निसर्गाचं वैशिष्ट्यपूर्ण चित्रण येतं, त्याचं काही खास प्रयोजन?

अनंतमूर्ती :- फार चांगला प्रश्न विचारलास. महाराष्ट्रात हे प्रादेशिकतेचं प्रस्थ फार आहे- मी त्यावर नेहमीच टीका करतो. तुमच्याकडे काही वाङ्मय प्रादेशिक ठरवण्यात येतं. जणू काही प्रादेशिक आणि वैश्विक (साहित्य) वेगवेगळं असतंच. प्रदेश हेच विश्व असतं. भारताचा प्रत्येक विभाग हाच संपूर्ण भारत देश असतो- प्रत्येक लहानसं खेडंही राष्ट्रच असतं.

भारत हा बहुकेंद्री देश असल्यामुळे भारतात कुठेही असलं तरी ते संपूर्ण भारतीयच असतं. मी एखाद्या गावाचं वर्णन केलं, ते जर प्रादेशिक मानलं तर थॉमस हार्डी (सारखा मोठा कादंबरीकार) प्रादेशिक ठरेल, जागतिक वाङ्मयातलं सर्वोत्कृष्ट लेखनही प्रादेशिक ठरेल- डिकन्स आणि डोस्टोव्हस्की एवढे दोनच लेखक नागर (जाणिवा मांडणारं लिहिणारे) आहेत- मग टॉलस्टॉयदेखील प्रादेशिकच ठरेल. असे भेद करूच नयेत. कर्नाटकात (कानडी वाङ्मयचर्चेत) आम्ही ते टाळलं. नाहीतर कानडी कादंबऱ्या, अगदी कारंत, कुवेम्पू यांच्या कादंबऱ्या- प्रादेशिक ठरल्या असत्या. त्यामुळे कर्नाटकात मला या प्रादेशिकतेबद्दल (फारसं बोलण्याचा) प्रश्नच आला नाही- या विषयावर माझ्या मराठी मित्रांशी चर्चा करण्याची माझी इच्छा आहे. काही कादंबऱ्यांवर प्रादेशिक असा शिक्का मारू नका. उदाहरणार्थ भारतीय सिनेमा कोणाला म्हणायचं? तर मराठी सिनेमा म्हणजे भारतीय सिनेमा! केवळ हिंदी सिनेमा म्हणजे भारतीय सिनेमा नव्हे- कन्नड सिनेमाही भारतीय सिनेमाच असतो. तसंच मराठी साहित्य, कन्नड साहित्य म्हणजे भारतीय साहित्य! महाराष्ट्रातल्या एखाद्या छोट्या खेड्यावरची कादंबरीदेखील मराठी कादंबरी आणि भारतीय कादंबरीही असते. पुढच्या टप्प्यावर भारतीय सिनेमा (साहित्य) हा आशियाई सिनेमा ठरतो. त्यांची ओळख व्यापक होत जाते. कारण आशियाचं एक अनुभवविश्व असतं त्यात आपण सगळे वाढत असतो- म्हणून आम्ही सगळे आशियाई लेखक आहोत. आपली युरोपकेंद्री मानसिकतेतून सुटका व्हावी म्हणून मी इतकं पुढं जायला तयार आहे- नेहरूंच्या काळापासून आपण मनाने फारच युरोपधार्जिणे झालो. गांधीजींनी आपल्याला आशियाकडे म्हणजेच (आपल्या) विश्वाकडे वळवण्याची धडपड केली होती.

विनय :- अलीकडेच प्रभावी झालेल्या देशीयतावादी साहित्य विचाराबद्दलचं तुमचं मत... 
अनंतमूर्ती :- देशीवाद स्वीकारणं म्हणजे आपला पराभव मान्य करणं. कारण देशी असतं तेच वैश्विक असतं; (अशी माझी भूमिका आहे) खरोखरच असतं! 


विनय :- कानडी कादंबऱ्यांच्या मानाने तुमच्या कादंबऱ्यांची पृष्ठसंख्या खूप कमी असते?
अनंतमूर्ती :- हो... माझ्या कादंबऱ्या लहानच असतात. 

विनय :- आणि कानडीत तर प्रदीर्घ कादंबऱ्यांची मोठी परंपराच दिसून येते-
अनंतमूर्ती :- याबद्दल माझ्यावर टीकाही झालेली आहे- त्याचं काय आहे, माझ्या कादंबऱ्या मी काव्यमय शैलीत लिहितो, त्यामुळे त्यांच्या प्रभावीपणात भर पडली तरी लांबी-रुंदीत त्या कमी पडतात. आणि (माझ्या मते) कादंबरी सर्वसमावेशक करायला गेलं तर ती होल्डॉल सारखी होते. आपण प्रवासाला जाताना लागणारं सगळं कोंबण्याची एक वस्तू! अशी कादंबरी लिहिण्यातही एक मजा असते, हे मी अमान्य करत नाही; पण मी तसा कादंबरीकार नाही.

विनय :- ज्ञानपीठ पुरस्कार विजेते पहिले मराठी लेखक वि.स.खांडेकर! कुसुमावती देशपांडे यांनी त्यांच्या कादंबऱ्यांना 'होल्डॉल' म्हटलं, तेव्हा त्यांनी 'माझ्या कादंबऱ्यांचं स्वरूप होल्डॉलसारखं असायला माझी काही हरकत नाही; कारण आधुनिक (जीवन) प्रवासात होन्डॉल ही एक उपयुक्त वस्तू आहे!' असं म्हटलं होतं-
अनंतमूर्ती :- (हसत) अरे वा! झकास! मी जेव्हा माझ्या लघुकादंबर्या लिहू लागलो तेव्हा जगातलं सर्वोत्कृष्ट साहित्य त्या फॉर्ममध्येच लिहिलं गेलं आहे असं माझं मत झालं- अजूनही माझं तेच मत आहे. 'डेथ ऑफ आयव्हन इलिच' ही टॉलस्टॉयची लघुकादंबरी एक महान साहित्यकृती आहे. इतरही आठवतात. अशा लिखाणामधून मला (तरी) जास्त प्रेरणा मिळते. दुसरं म्हणजे (कन्नड) संत कवी- बसवेश्वर, पुरंदर हे माझे आवडते कवी होते- त्यांचं म्हणणं ते थोडक्यात आणि चटकन मांडतात. कन्नड (साहित्य) परंपरेतच या दीर्घ आणि लघु परंपरा तुला दिसतील आणि दोन्ही परंपरांमध्ये भरपूर निर्मितीही झालेली दिसेल.

विनय :- पण तुम्ही कादंबर्यांतून जे विषय हाताळता, ते सर्वसाधारणपणे कवितेचे विषय मानले जात नाहीत, ते तात्त्विक सामाजिक विषय असतात- पारंपरिक पण परंपरेची समीक्षा करणारेही असतात- अशा विषयांची मांडणी करायला व्यापक अवकाश आणि पृष्ठसंख्या लागते ती दीर्घ कादंबरीने पुरवली असती असं नाही वाटत?
अनंतमूर्ती :- हो, पण मला मुख्यत्वेकरून जे म्हणायचं असतं त्याच्यासाठी फार पानं लागतात असं मला नाही वाटत- माझ्या लिखाणात एक काव्यमयतेचा सशक्त धागा आहे तसाच बुद्धिवादाचाही सशक्त प्रवाह आहे. हे प्रवाह परस्परविरोधी वाटतील पण मला तसंच लिहावंसं वाटतं. वेगळ्या शब्दांत असं सांगतो की काव्यबाह्य समजल्या जाणाऱ्या विषयात अवगाहन करून काव्यमयतेला अधिक वाव मिळवून द्यायचा, ते प्रदेश पुन्हा काव्याच्या अखत्यारीत आणायची माझी धडपड असते.

विनय :- कदाचित यामुळेही कन्नड समीक्षकांनी तुमचं कन्नड लघुकथेतलं योगदान अधिक महत्त्वाचं मानलं असावं? 
अनंतमूर्ती :- तसही असेल- कदाचित माझ्या लघुकथा जास्त विशुद्ध वाटत असतील- काव्यमय रचनातत्त्वाच्या संदर्भात. पण माझ्या कादंबऱ्या लिहिताना 'मी आता कादंबरी लिहणार आहे असं ठरवून लिहीत नव्हतो. मी कथा लिहितो आहे असंच सुरुवातीला वाटायचं आणि मग ती कथा लांबत जायची. मग मला ते पूर्ण करावं लागायचं. खरं म्हणजे मी एकच कथानक पुन्हा पुन्हा लिहितो (असं मला वाटतं). त्याची तपासणी, उजळणी करतो, पुनर्मांडणी करतो. पूर्वीच्या मांडणीबद्दल (स्वतःलाच) प्रश्न विचारतो. ही माझी मर्यादा असेल किंवा तेच माझं योगदान! 

विनय :- एक नाटक लिहिल्यावर पुन्हा नाटक लिहावं असं नाही वाटलं?
अनंतमूर्ती :- नाटककार म्हणून मी अयशस्वी ठरलो, पण माझ्या कथांवरून इतरांनी लिहिलेली नाटकं प्रत्यक्ष रंगमंचावर फार यशस्वी ठरली.

विनय :- तुमच्यातला प्रतिभावान लेखक आणि तुमच्यातला शिक्षक आणि समीक्षक यांचं एकमेकांशी कितपत जमतं?
अनंतमूर्ती :- मी मुळात शिक्षकच आहे- लेखकही आहे. पण माझी मनोवृत्ती शिक्षकाचीच. लिहिणं हे अप्रत्यक्षपणे शिकवणंच असतं असं मला वाटतं लिहिण्यातून आपण इतरांपेक्षा स्वतःलाच अधिक शिकवत असतो. 

विनय :- तुम्ही नेहमीच कन्नडभाषिक चळवळीपासून स्वतःला दूर ठेवलं आहे.
अनंतमूर्ती :- नुसतं दूर ठेवलेलं नाही, त्यामुळे अडचणीतही सापडलो आहे. कारण कर्नाटक हे भारताचंच एक छोटं रूप आहे असं मी मानतो. भारतीयांनी आपली विविधता जपली पाहिजे, मराठी भाषिक, कन्नड भाषिक, तुळू भाषिक, तमिळ आणि उर्दू भाषिक या सर्वांची विविधता. या भाषिक गटात भारतात कुठेही कोणत्याही कारणासाठी संघर्ष होता, घडवता कामा नये. भारताची रचनाच अशी असायला हवी की जिथे विविध भाषा, धर्म आणि संस्कृती टिकून राहतील. निरनिराळे वैचारिक पंथ टिकून राहतील- त्यासाठी प्रत्येक राज्यातच अशी उदार वृत्ती आपण विकसित केली पाहिजे. मी तमिळविरोधी असेन तर मला भारत सरकारने आपणा सर्वांना समान वागणूक दिली पाहिजे, अशी अपेक्षा करताच येणार नाही. राष्ट्रभावना निर्माण होण्यासाठी आपापल्या राज्यातही राष्ट्राची योग्य प्रतिमा जोपासली पाहिजे. आपल्यापैकी अनेकजण यात अपयशी ठरले आहेत. एकीकडे भारतासाठी आपल्याला बहुकेंद्री संघराज्याची रचना हवी असते. पण आपापल्या राज्यात मात्र आपण तसे वागत नसतो.

मी तुमकूरच्या कन्नड साहित्य संमेलनाचा अध्यक्ष झालो तेव्हा सुचवलं होतं. एका निवडक कानडी साहित्य संग्रहाचा मराठीत अनुवाद करावा; आणि तशाच मराठी संग्रहाचा कानडीत अनुवाद करून दोन्ही प्रकाशित करावेत. त्यामुळे साहित्यसंमेलन खर्या अर्थाने साजरं होईल’ पण माझ्या सूचनेकडे कुणी लक्ष दिलं नाही- मला फार वाईट वाटलं. आपले बहुभाषिक- विशेषतः द्विभाषिक प्रदेश म्हणजे परमेश्वरी वरदान आहे. या प्रदेशांमधून (भांडणांऐवजी) साहित्यनिर्मिती झाली पाहिजे. साहित्याचा तुलनात्मक अभ्यास झाला पाहिजे..

विनय :- हे प्रदेश तसे बहुभाषिक आहेतच.
अनंतमूर्ती :- माझा एक सिद्धांत आहे- कै. मधु लिमये यांच्या स्मृत्यर्थ दिलेल्या व्याख्यानात मी म्हटलं होतं, 'भारतात मातृभाषा हा शब्दच वापरू नका. तो शब्द युरोपात ठीक आहे. तिथं एक भाषा, एक वंश, एक धर्म अशी रचना आहे. भारतात मातृभाषा नसते. आपल्याकडे 'मने मातु" (घरची भाषा) असते, रस्त्यावरची भाषा असते, शिवाय (घरातल्या) वरच्या मजल्यावरची (वेगळी) भाषाही असते. रामानुजम एका कवितेत म्हणतो, 'मी स्वैपाकघरात तमिळ बोलतो, रस्त्यात कन्नड आणि वरच्या मजल्यावर इंग्रजी!' रामानुजमच्या वडलांच्या त्याच्याकडून फार मोठ्या अपेक्षा होत्या- त्यांच्याशी तो इंग्रजी बोलत असे- भूक लागली की तमिळ! रस्त्यावर आला की कन्नड. आपणा सर्व भारतीयांना नेहमीच अशा तीन भाषा बोलाव्या लागल्या- अजूनही बोलाव्या लागतात. घरातली भाषा आपली तात्पुरती घरगुती गरज भागवते, मी तमिळ भाषिक असून कर्नाटकात राहत असलो तर माझ्या मुलीला तमिळ यावं असं मला वाटतं कारण तिला तमिळ नवरा मिळाला पाहिजे. मुसलमान असलो, तर तिला उर्दू यायला हवं म्हणजे तिला हैदराबादचं स्थळ मिळू शकेल. पाश्चात्त्य देशातच फक्त वरच्या मजल्यावरची भाषाच असते- भारतीयांनी तसं करण्याची मुळीच गरज नाही.

माझ्या या मांडणीला त्या व्याख्यानाच्या विद्वान मराठी अध्यक्षांनी दुजोराच दिला होता. कन्नड कवी बेंद्रे यांचं उदाहरण घ्या. मी एकदा त्यांना विचारलं, 'तुम्ही किती वर्षे दोन भाषा बोलता आहात?" तर ते म्हणाले, 'बारा/तेरा वर्षाचा होईपर्यंत आपण दोन भाषा (मराठी व कानडी ) बोलतो हे मला जाणवलंही नव्हतं' आमची ही चर्चा चालू असताना त्यांची मुलगी तिथे आली, तिच्याशी ते मराठी बोलले, माझ्याशी संभाषण कानडीत (चालू होतं). त्या क्षणीही आपण दोन भाषा बोलतो आहोत याची बेंद्रे यांना जाणीवच नव्हती. (हसतात) हे विलक्षण आहे- अतिशय महत्त्वाचं आहे. घरातली भाषा आलीच पाहिजे- मी पुण्यात राहिलो तर माझी मुलं मराठी शिकतील, पण घरात कानडी बोलतील तसंच तुम्ही बंगलोरमध्ये राहिलात तर कानडी शिकतानाही घरात मराठी जपावंच लागेल. म्हणजे रस्त्याची भाषाही आलीच पाहिजे- हे भारतात घडलं आहे. निर्मितीला चालना देऊ शकणारी ही आपली बहुभाषिकता आहे. रस्त्यावरची भाषा सामर्थ्यवान कशी झाली? आपल्या संतकवींनी परमेश्वराशी रस्त्यावरच्या भाषेतून भांडायचं, स्वयंपाकघरातल्या भाषेत त्याच्याशी प्रेमसंवाद करायचं ठरवलं आणि या भाषांना सामर्थ्य प्राप्त झालं. कबीर, तुकाराम, बसवेश्वर देवाशी (सर्वसामान्यांच्या) रस्त्यावरच्या भाषेतच भांडतात. तिला बळ देतात. आज हीच देवाशी बोलण्याची सशक्त भाषा आपण राजकीय सत्तेशी बोलण्यासाठी वापरली पाहिजे. रस्त्यावरची ही भाषा बलवान व्हायलाच हवी- मात्र तिने घरातल्या भाषेचा दुःस्वास करता कामा नये.

विनय :- पण एकदा लोकशाही स्वीकारली की जनता तिच्या सोयीच्या मार्गाने (भाषिक, धार्मिक, प्रादेशिक भावनेमधून) संघटित होणार हे गृहीतच आहे. या संदर्भात तुमची मांडणी काहीशी आदर्शवादी होते आहे, असं नाही वाटत?
अनंतमूर्ती :- मुळीच नाही. कारण मला भारतामध्ये याहून अधिक विकसित लोकशाही अभिप्रेत आहे. सध्या भारतात लहानसा भाषिक/सांस्कृतिक 'इंडिया' पण निर्माण झाला आहे. शहरांमध्ये तो मोठा असला तरी अगदी खेड्यापाड्यांतसुद्धा काही थोडेसे लोक आपल्या घरातल्या भाषेपासून जाणीवपूर्वक दूर जाताना दिसतात- इंग्रजीत बोलतात. असे दोन देश (भारत आणि इंडिया) निर्माण होऊ देणं हेच मला लोकशाही विरोधी वाटतं. 

विनय :- पण इतक्या भाषांना मान्यता दिल्यावर दोनऐवजी अनेक भारत निर्माण होतील.
अनंतमूर्ती :- नेमकं उलटं घडेल. या सगळ्या भाषांना मान्यता, प्रतिष्ठा दिली नाही तरच भारताचं (भाषिक) विभक्तीकरण होईल. जरुरीपेक्षा जास्त केंद्रीकरण केलं तर विभाजन होणारच. नक्की होणार! इंदिरा गांधींनी तसं केलं- प्रत्येक प्रदेशाचा मुख्यमंत्री कोण होणार हे ठरवायचे अधिकार स्वतःकडे घेतले- घडलं काय? आसाम, पंजाब यांना फुटावंसं वाटलं, देशभर फुटीरतावादी चळवळी सुरू झाल्या. भारतात अतिरिक्त केंद्रीकरण केलं तर विभाजनच होणार- विकेंद्रीकरणातूनच एकीकरण होऊ शकेल. हा देश बहुकेंद्री आहे. अनेक (छोटे-छोटे) भारत होतील म्हणून घाबरायचं कारण नाही- पूर्वी आपल्याला वाटायचं की भारतात प्रबळ केंद्रशासन नसेल तर देशाचे तुकडे होतील; पण आताचा काळ पहा- आता पंतप्रधान कोण होणार हे राज्यांचे मुख्यमंत्री ठरवतात. इंदिरा गांधींच्या नेमकं उलट. आणि (असं असूनही) भारत भक्कम आहे, एकसंध आहे; कोणताही धोका नाही त्याला!

आमचे कर्नाटकातले देवेगौडा पंतप्रधान झाले. तेव्हा सगळ्यांना वाटलं, 'आता भारताचं कसं होणार!’ (हसत) खरं म्हणजे देवेगौडांनी बऱ्यापैकी कारभार करून दाखवला. (या घटनेमुळे) माझा भारतीय लोकशाहीवरचा विश्वास वाढला. आता पंतप्रधान होण्यासाठी करिष्माच असला पाहिजे असं नाही- चिंतेचा विषय दुसरा आहे 'विविधतेतून एकता' हे शब्द नेहरूंनीही वापरले होते- पण अनुभव असा आहे की एकतेवर अनावश्यक भर दिला की लगेच विभक्ततेची गरज वाटू लागते- आणि विविधता, वेगळेपणा फार बोकाळले की एकतेची. मी आसामी, मराठी आहे. मला वेगळं व्हायचं आहे, अशी भाषा बळावली की वाटतं- आपला देश एकच नाही का? उपनिषदांच्या काळापासून आपल्या जंगलात राहणाऱ्या पूर्वजांनी हेच शिकवलं नाही का? भारत हे राष्ट्र शहरातल्या लोकांनी निर्माण केलेलं नाही- ते जन्माला घातलं या रानावनात राहणाऱ्या ऋषिमुनींनी! आणि आम्ही वेगळे आहोत म्हणजे काय? खरं तर आपल्यात साधर्म्यच जास्त आहे, असं आपण म्हणतो.

पण जर कोणी दिल्लीत बसून म्हणायला लागला की आपण एक आहोत- म्हणून एक धर्म मानला पाहिजे, एकच भाषा बोलली पाहिजे, तर आपण म्हणू, 'नाही आम्ही वेगळे आहोत- मी मराठी, कन्नड आहे' वगैरे. तेव्हा भारतात एकात्मता आणि विविधता या दोन्हींवर अनावश्यक भर देऊन चालत नाही- त्यामुळे नेमकं उलट घडतं- या शहाणपणावरच हा देश टिकून आहे.

एक काळ असा होता की, टिळकांना कुणी महाराष्ट्राचा नेता मानत नव्हतं आणि गांधींना गुजराती. गांधींचंच पहा- जेव्हा बहुतेक सगळे राष्ट्रीय नेते मराठी, बंगाली, पंजाबी असत तेव्हा एक किरकोळ बांध्याचा गुजराती पुढे येतो- बरं या माणसाचं दर्शनही अगदी साधं होतं- त्याच्याकडे प्रभावी व्यक्तिमत्त्वही नव्हतं. हा गुजराती, बनिया- तोच महात्मा झाला. आजच्या भारतातही हे शक्य आहे. आपल्या संतकवींनी भारताला खरी आध्यात्मिकता शिकवली- त्यातूनच हे शक्य होतं. त्यांनी धर्म, जात यांच्या कर्मठपणाला आव्हान दिलं. जातपात मानणं चुकीचं आहे, हे आम्हाला आमच्या संतकवींनीच शिकवलं होतं. युरोपियन इथे येण्याच्या आधीच! युरोपातलं प्रबोधन पाच-सहा शतकांपूर्वीचं- पण भारतातलं प्रबोधन बुद्धाने केलं- कितीतरी आधी- त्याने वेदप्रामाण्यालाच आव्हान दिलं म्हणून मला फक्त एकता किंवा फक्त विविधता नकोशी वाटते. दोन्ही प्रवृत्ती हव्यात.

विनय :- या तुमच्या मांडणीला साहित्य अकादमी, नॅशनल बुक ट्रस्ट सारख्या विद्वत सभांमधल्या काही जणांनी तरी पाठिंबा दिला का?
अनंतमूर्ती :- मी साहित्य अकादमीचा अध्यक्ष होतो तेव्हा अनेक आदिवासी भाषांना अधिकृत मान्यता मिळावी अशी मागणी पुढे आली होती. एकदम माझ्या लक्षात आलं की साहित्य अकादमीचं कार्य वाङ्मयाला प्रतिष्ठा मिळवून देण्याचं आहे, भाषांना मान्यता देण्याचं नाही. कोणत्याही (आदिवासी) भाषेमधल्या चांगल्या वाङ्मयाची बूज राखली गेलीच पाहिजे. त्यासाठी मी एक समिती नेमली. आदिवासी भाषांचे संशोधक अभ्यासक प्रा.गणेश देवी यांनाही मी. सांगितलं की, 'एखाद्या भाषेत चांगलं साहित्य असलं तर मला जरूर सांगा, त्याचा सन्मान केला जाईल. माझी अढळ श्रद्धा आहे की भाषांना भाषा म्हणून वेगळी मान्यता नव्हती, त्यांची लिपीदेखील तयार झाली नव्हती, तेव्हा फार श्रेष्ठ काव्यं लिहिणारे कवी झाले. होमर, वाल्मिकी, वेदव्यास- आपल्या आजच्या परिभाषेत बोलायचं तर त्यांच्या काळी भाषा मागासलेल्या प्राथमिक अवस्थेत होत्या. पण काव्य तेव्हाच जन्माला येतं. चांगल्या गद्याचा जन्म मात्र आधुनिक काळात भाषेला शिस्त, वळण लागल्यानंतर होत असतो. ज्या भाषेने विल्यम् ब्लेक दिला ती भाषा बरट्रांड रसेल मात्र देऊ शकणार नाही. अनेक भारतीय भाषा ब्लेकसारखे कवी देऊ शकतील, पण रसेलसारखे निबंधकार देऊ शकणार नाहीत- त्यासाठी भाषा खूपच व्याकरणशुद्ध, शिस्तबद्ध व्हावी लागते. ब्लेक, होमर, वाल्मिकी निर्माण होण्याच्या शक्यता आदिवासी भाषांमध्येही मला त्यामुळेच दिसतात.

म्हणून फक्त लिखित भाषेचा जयजयकार करू नका, काही भाषा खरोखरच महान आहेत, त्यांच्यात लेखी साहित्याचा खजिना आहे हे तर खरंच; पण भारतीय साहित्याचा विचार करताना आपण मौखिक परंपरेचाही त्यात समावेश केला पाहिजे. अनेक (आदिवासी व इतर ) भाषा अशा स्मरणाने टिकून राहिलेल्या मौखिक परंपरेने समृद्ध आहेत. तेही साहित्यच आहे.

विनय :- मात्र या साहित्याला मान्यता मिळवून देण्यासाठी ते छापावं लागेल आणि एकदा छापलं की ते मौखिक राहणार नाही...
अनंतमूर्ती :- खरं आहे; पण नाही तर ते सगळं नष्ट होण्याचा धोकाही आहे. पूर्वी जे पाठांतरामधून टिकलं ते आता छपाईमधून टिकवावं लागेल- हा बदलत्या काळाचा महिमा आहे. त्यामुळे मला फार आनंद होतो असं नाही; पण दुसरा मार्गच नाही.

विनय :- सगळ्या संस्कृतींनाच हा प्रवास करावा लागतो. 
अनंतमूर्ती :- हो. एकेकाळी हे मौखिक साहित्य हा कानाने घेण्याचा अनुभव होता. आता (वाचनामधून घेतल्याने) तो बौद्धिक अनुभव होईल. 

विनय :- पी.एच.डी पदवीसाठी राजकारण आणि साहित्य हा विषय तुम्ही कसा काय निवडलात? 
अनंतमूर्ती :- इंग्लंड आणि युरोपमधलं 1930 ते 40 हे दशक खूप आव्हान देणारं आणि आकर्षक होतं- भारतातही आपण तशाच काळामधून जात होतो. त्या काळच्या युरोपियन लेखकांप्रमाणे आपल्यालाही अनेकदा वाटतं की हे आसपासचं दैन्य, दुःख, अन्याय यांवर नुसतं लिहिणं पुरेसं नाही, त्याच्या विरोधात कृती केली पाहिजे. लिहिण्याची गरजही नाही; लिहिणं (आणि तो विषय आपल्यापुरता संपवणं) शक्यही नाही. अशा काळाचा ताणच एवढा जबरदस्त असतो की लिहिण्यापेक्षा कृती करणंच महत्त्वाचं वाटतं. 1936 - 38 मधल्या स्पॅनिश यादवी युद्धामुळे असं (कृतिप्रवण) लेखकमन युरोपात तयार झालं होतं; आणि त्याचा वेध घ्यावा असं मला वाटलं. लेखकानं इतर काही करण्यापेक्षा लिहिणंच जास्त महत्त्वाचं आहे हा विचार पारंपरिक वाटला. कारण ज्यांनी स्पॅनिश यादवी युद्धात सैनिक म्हणून (लोकशाहीच्या बाजूने) भाग घेतला त्यांचंही

साहित्यावर उत्कट प्रेम होतं, साहित्याचं महत्त्व त्यांना पटलेलं होतं; आणि तरीही त्यांनी प्रत्यक्ष कृती करणं महत्त्वाचं मानलं. ही त्यांची मानसिकता फार महत्त्वाची मला वाटली. म्हणून मी त्यांचा अभ्यास करायचं ठरवलं. या तरुणांनी जे लिहिलं, ते साहित्यच महत्त्वाचं असतं असं मानणाऱ्या लेखकांच्या लिखाणापेक्षा मला जास्त महत्त्वाचं वाटलं.

विनय :- तुम्ही एडवर्ड अपवर्ड आणि ख्रिस्टोफर इशरवुड हे दोन लेखक अभ्यासासाठी निवडलेत, त्यापैकी इशरवुड हा कार्यकर्ता नव्हता... 
अनंतमूर्ती :- का? इशरवुड हाही कार्यकर्ता होताच.

विनय :- पण अपवर्ड ज्या अर्थाने (पक्ष) कार्यकर्ता होता, त्या अर्थाने नव्हे. 
अनंतमूर्ती :- ते बरोबर आहे. पण इशरवुड त्या काळाचे ताण तणाव आपल्या लेखनातून दाखवतो, या अर्थाने तो कार्यकर्ता(च) होता.

: चिकित्सक लोहियावादी

विनय :- तुम्ही विद्यार्थी असताना राजकारणात भाग घेतला? 
अनंतमूर्ती :- हो, मी समाजवादी चळवळीत होतोच!

विनय :- तसं नाही, विद्यार्थ्यांचे प्रश्न, विद्यापीठ परिसर यामधलं राजकारण.
अनंतमूर्ती :- नाही.

विनय :- आणि निवडणुकीच्या राजकारणात तुम्ही भाग घेतला.. 
अनंतमूर्ती :- घेतला की....

विनय :- पक्षकार्यकर्ता म्हणून नव्हे, उमेदवार म्हणून.
अनंतमूर्ती :- एकेकाळी मला निवडणूक लढवायला आवडलं असतं.

विनय :- साधारण केव्हा?
अनंतमूर्ती :- 1970 च्या दशकात- 1980 च्या दशकाच्या सुरुवातीच्या वर्षांत तेव्हा मला तशी ऊर्मीही आली होती. पण आता निवडणूक हे प्रकरण महागाईचं झालं आहे. निवडणुकीसाठी भरपूर पैसा लागतो; आणि बराचसा भष्टाचार या निवडणुकीसाठी लागणार्या बेसुमार पैशासाठीच केला जातो. त्यामुळे निवडणूक लढवण्याचं आकर्षण आता उरलेलं नाही. हे विकृतीकरण दुरुस्त कसं करायचं याचाही विचार केला पाहिजे; कारण केवळ भ्रष्टाचारावर हल्ले चढवून भागणार नाही. भ्रष्टाचाराचं मूळ शोधून तेच उखडलं पाहिजे- निवडणुकीसाठी लागणारा अमाप पैसा हेच ते मूळ कारण.
लोकशाहीमध्ये दोष अनेक आहेत- हे दोष घालवण्याचा एक मार्ग म्हणजे अल्पसंख्यांकांच्या मताचा आदर करणं. लोकशाहीत अल्पसंख्य म्हणून जगणं शक्य असतं म्हणून मला ती व्यवस्था मोलाची वाटते. दुसऱ्या कोणत्याही व्यवस्थेत अल्पसंख् चिरडले जातात, म्हणून लोकशाही रचनेमध्येच आत्मटीकेला भरपूर वाव दिला पाहिजे- आज तसा वाव फारसा उरलेला नाही. ती शक्यता खूपच कमी झाली आहे. कारण प्रसारमाध्यमांनी वाईट राजकारणाला उचलून धरलं आहे.

विनय :- लोहियांच्या विचारांच्या ओढीनं तुम्ही राजकीय क्षेत्राकडे ओढले गेलात, त्याविषयी आता तुम्हांला काय वाटतं? 
अनंतमूर्ती :- मी काहीसा निराश आहे- सांगतो..

विनय :- लोहियांच्या बाबतीत की त्यांच्या राजकीय विचारांच्या बाबतीत? 
अनंतमूर्ती :- तत्त्वज्ञानाच्या बाबतीतदेखील त्यांच्या काही भूमिकांचा मी पुनर्विचार करतो आहे. डॉ. लोहिया म्हणत की, 'ब्राह्मणेतर हा भारत देश एकात्म करतील आणि भारतीय राजकारणामध्ये (नवीन) चेतना आणतील, मूल्यव्यवस्था बदलतील. (नव्या व्यवस्थेत) बुद्धीच्या ब्राह्मणी व्याख्येला महत्त्व उरणार नाही; श्रमिकांच्या शरीरात भिनलेल्या बुद्धिमत्तेचा, स्वतः हातांनी वस्तूंची निर्मिती करणाऱ्या लोहार, सोनार यांसारख्या कारागिरांच्या बुद्धिमत्तेचा सन्मान होईल. विणकर, नावाडी, मासे मारणारे - या साऱ्या श्रमिक वर्गांकडे प्रचंड ज्ञानाचा साठा असतो. (त्यांच्या कष्टांमध्ये) खूप सौंदर्यही असतं. हे सगळे ब्राह्मणेतर (कष्टकरी) एकत्र येतील असं लोहियांना वाटत होतं- पण ते घडलं नाही. समाजाची ब्राह्मण-ब्राह्मणेतर (बुद्धिजीवी श्रमजीवी) विभागणी ही फक्त आवेशपूर्ण भाषणांतच राहिली. उत्तर प्रदेशमध्ये मायावती काय करतात? भाषणात मनुवाद्यांची निर्भर्त्सना करतात, पण दुसरीकडे भाजपाच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्रीही बनतात. (हसतात.)

आता खरा संघर्ष चालू आहे तो मधल्या जाती (कर्नाटकातील वोक्कलिंग, लिंगायत) इतर मागास जाती आणि हरिजन यांच्यामध्ये. या सर्वांना एकत्र आणण्याचं लोहियांचं स्वप्न प्रत्यक्षात उतरलं नाही. बिहारमध्ये कर्पूरी ठाकूर यांनी कूर्मींना जवळ केलं तर हरिजन दूर जायचे. हरिजनांना जवळ केलं तर कूर्मीच्या विरोधाला तोंड द्यावं लागायचं. (हसत) मात्र कर्नाटकात देवराज अर्स यांनी सगळ्या जातींना वापरून घेतलं- अर्थात भरपूर पैसा वापरून, भ्रष्टाचाराला मुक्त वाव देऊनच.


विनय :- तुमच्या मते हे मध्यम जातींचं राजकारण अयशस्वी का होतं- त्यांची संख्या प्रचंड आहे म्हणून? साधारण 3500 च्या आसपास.

अनंतमूर्ती :- नाही नाही- मी मध्यम जाती म्हणजे स्वतःची शेतजमीन असलेल्या जाती म्हणतो आहे- त्यांची संख्या इतकी अमाप नाही. इतर मागास जाती (ओबीसी) संख्येने प्रचंड आहेत आणि त्यांचं कधीच ऐक्य होणार नाही. शिवाय असं व्यापक सूत्र मांडताना काळजीपूर्वक मांडलं पाहिजे. उदा. राखीव जागांचा प्रश्न- या संदर्भातले आपले विचार बहुशः शरमेवर आधारलेले असतात. अस्पृश्यता ही शरमेची गोष्ट होती. त्यामुळे (तसं होतं). पण आता आधुनिक काळाचा प्रभाव पहा- अनेक उद्योग जे आपले लोक हातांनी करत होते ते नष्ट झाले, ती कौशल्ये नष्ट झाली. विणकरांची- मागावर कापड विणणारांची कौशल्ये नष्ट झाली. हे भारतीय कारागीर अत्यंत बुद्धिमान होते. त्यांच्याकडे विकसित तंत्रज्ञानही होतं.

साड्या विणणारे, फर्निचर बनवणारे- त्यांचं कसब आता नष्ट झालं. ही आत्महत्येसारखीच तंत्र (ज्ञान) हत्याच म्हणायला हवी. म्हणून नवा विचार करताना आपण केवळ लाजेखातर राखीव जागा ठेवण्यासारखा (नकारात्मक) विचार न करता, या अस्पृश्य आणि कारागीर जातींची अंगभूत कौशल्ये टिकतील अशी व्यवस्था करायला हवी होती. समजा, आज कुणी इन्स्टिट्यूट ऑफ लेदर टेक्नॉलॉजी नावाची संस्था काढली तर तिथे ज्यांनी लेदर टेक्नॉलॉजी भारतात निर्माण केली, (चर्मकार) दलितांना प्रवेश घेता येणार नाही. तिथे इंग्रजीमधून यशस्वीपणे लेखी परीक्षा देणारे (उच्च जातीय) विद्यार्थीच घुसतील. त्यामुळे आपल्याकडल्या अनेक (पारंपरिक) तंत्रविद्या आज मृत्युपंथाला लागल्या आहेत. त्यांना वाचवण्याची व्यवस्था केली पाहिजे. त्यांना न्याय दिला पाहिजे. 

भारताने या जाती आणि त्यांच्या अंगच्या उत्पादक कला यांचा व्यापक आणि महत्त्वाकांक्षी पातळीवर विचार करायला हवा होता. लोहियांच्या ब्राह्मणेतर सिद्धांतात मी या जाणिवेची भर घालू इच्छितो. आधुनिकीकरण होत असतानाच या जातींना विशेष संरक्षण देण्याची. (असा सकारात्मक विचार राखीव जागा ठेवताना व्हायला हवा) लोहियांचा सिद्धांत खूपच ऐसपैस आहे- त्यात यामुळे नेमकेपणा येतो (असं मला वाटतं.) या जातींची कौशल्ये ओळखून त्यांचं मापन करण्याच्या कसोट्याही विकसित केल्या पाहिजेत, आज त्या नाहीत. शिकागोमध्ये मला एक युवक भेटला- ‘भारतीय लोक सॉफ्टवेअरमध्ये पुढे जातात पण त्या मानाने हार्डवेअरमध्ये मागे का राहतात?’ या विषयावर तो संशोधन करीत होता. कारण सोपं आहे, सॉफ्टवेअरसाठी भाषा, गणित या विषयांत गती असावी लागते. ती उच्चवर्णीय भारतीयांकडे असतेच.

त्यामुळे तेच सॉफ्टवेअरकडे जातात. मात्र स्वतःच्या हातांनी काही करणारे भारतीय प्रवेश परीक्षेतच नापास होतात- त्यांचं ज्ञान डोक्यात नसतं, त्यांच्या हातात असतं! पण हातांत कौशल्य असणारांची बौद्धिक क्षमता मोजण्याच्या कसोट्याच आपण तयार केल्या नाहीत. नेहमीच्या प्रवेश परीक्षेला ते बसले तर नापासच होणार! म्हणून जपानी वा कोरियन लोकांनी हार्डवेअरमध्ये जसं यश मिळवलं, तसं आपण मिळवू शकलेलो नाही. 

म्हणून जातीनिर्मूलनाच्या क्रांतीच्या विचारातच बुद्धी आणि कौशल्ये यांच्या आंतरिक संबंधांचाही पुनर्विचार झाला पाहिजे; आणि त्याची कसून तपासणी केली पाहिजे. कुंभार, चांगला सुतार हे काय बुद्धिमान नसतात? असतातच. मात्र त्यांच्या बुद्धीला मान्यता देणारी व्यवस्थाच आपल्याकडे नाही. आलं लक्षात? त्यामुळे लोहियांचं हे ब्राह्मणेतर ऐक्याचं राजकारण यशस्वी झालं नाही. आणि लोहियावादाच्या विकृतीकरणामधून एक प्रकारच्या (सवंग) लोकप्रियतेचा, लोकानुनयाचा जन्म झाला. हे दोन यादवच पाहा- मुलायमसिंग आणि लालूप्रसाद- मी या दोघांच्याही बाबतीत समाधानी नाही-

विनय :- मुलायमसिंग कै मधु लिमयांना गुरू मानतात तर लालूप्रसाद स्वतःला जेपींचा शिष्य म्हणवतात.
अनंतमूर्ती :- असा गैरवापर अनेक गोष्टींचा करता येतो. मात्र लोहियांच्या मांडणीत इतर अनेक विचार आहेत की ज्यांची पुन्हा तपासणी करून ते दुरुस्त करण्याची गरज आहे. उदाहरणार्थ, त्यांचा बिगर काँग्रेसवाद. काँग्रेसशिवाय इतर राजकीय पक्षही भारताचा राज्यकारभार करू शकतील, हे सिद्ध होण्याचा प्रश्न असेल तर बिगर काँग्रेसवाद योग्यच होता; पण कालांतराने बिगर-काँग्रेसवादाचं मूळ स्वरूप शिल्लक राहिलं नाही हे आपण पाहतो.

इतरही काही गोष्टी आहेत. गेल्या 25-30 वर्षांत अनेक मोठमोठ्या घोषणा झाल्या पण 'गरीबी हटाव' एवढी एकच घोषणा यशस्वी ठरली. या घोषणेमुळे प्रत्यक्षात गरीबी मुळीच हटली नाही मात्र गरिबांना अजूनही असंच वाटतं की काँग्रेसच गरीबी हटवू शकते. कारण त्या घोषणेनं लोकांची मनं जिंकली होती- ती त्यांच्या मनात खोल रुतून बसली होती. इतर घोषणांचा- हिंदुत्व वगैरे- फारसा प्रभाव पडला नाही. त्यांनी भारतीय जनमानसात नवचैतन्य आणलं नाही. (असं असेल तर) आपण पुन्हा 'गरीबी हटाव' या घोषणेकडे जाऊ शकू का? मात्र इंदिरा गांधी पद्धतीच्या राजकारणाकडे परत न जाता!
कारण, भारतातली गरीबी हटवण्याची आणि गरीब जनतेकडे लक्ष देण्याची अत्यंत निकडीची गरज आहेच. म्हणून लोहियांच्या काही राजकीय सूत्रांचा पुनर्विचार करावा लागेल.

मात्र त्यांच्या तत्त्वविचाराबद्दल तसं म्हणता येणार नाही- पर्यायी तंत्रज्ञानावर त्यांची श्रद्धा होती, जो आजही अतिशय महत्त्वाचा विचार आहे. त्यांनी सप्तक्रांतीचा सिद्धांत मांडला, त्यातल्या काही आजही अर्थपूर्ण आहेत. स्त्रियांच्या विषयी त्यांनी मांडलेले विचारही तसेच आहेत. त्यांचे सौंदर्यविषयक विचारही! आणि लोहियांनी व्यक्तींसाठी खाजगी जीवनाच्या आवश्यकतेचीही चर्चा केली होती तिचं आज विशेष महत्त्व आहे, कारण आधुनिक जीवनपद्धतीमध्ये व्यक्तीच्या एकांतावर सतत हल्ले होत असतात- आधुनिक जीवनातल्या या ताणतणावांचा लोहियांना अंदाज आलेला होता-लोहियांनी मार्क्सवादी धाटणीच्या (कडव्या) डावेपणाशी झुंज दिली होती- आपण तिकडे फारसं लक्ष दिलं नाही. मात्र युरोपमधले अनेक नव-कम्युनिस्ट (मार्क्सवादी राज्यव्यवस्था कोलमडून पडल्यावर) आज जे बोलताहेत ते डॉ. लोहियांनी 40 वर्षांपूर्वीच म्हणून ठेवलं होतं. 'लोकशाही केंद्रीकरण' आणि 'कामगार वर्गाकडेच क्रांतीचा अग्रदूत बनण्याची क्षमता असते’, या लेनिनने मांडलेल्या दोन भूमिकांना कुणीतरी हटकण्याची गरज होती; कारण क्रांतीनंतर या अग्रदूतांचाच एक हितसंबंधी वर्ग तयार झाला; आणि लोकशाही केंद्रीकरणामधून खूप ढोंगीपणा आणि भ्रष्टाचार जन्माला आला.
खरं म्हणजे डाव्या मंडळींनी पुष्कळच गंभीर, कठोर विचारमंथन करण्याची निकड आहे! मी असं म्हणतो कारण मी स्वतःला अजूनही 'डावा'च म्हणवतो.

विनय :- स्वतःचं वर्णन तुम्ही शब्दप्रामाण्य, पोथीनिष्ठा न मानणारा डावा असं कराल?
अनंतमूर्ती :- तसाच माणूस खरा 'डावा' तो- डावा असणं म्हणजेच शब्दप्रामाण्य, पोथीनिष्ठा न मानणं.

विनय :- हे समजणारे 'डावे' फार थोडे आहेत. 
अनंतमूर्ती :- हो. आपण पुन्हा एकदा मुळांपर्यंत जाऊन विचार करायला पाहिजे- समाजाला केंद्रस्थानी ठेवून आपल्या भारतीय विचारात हा भाग होताच, त्यात नवीन असं काही नाही. पण आधुनिकता आणि (आपण ज्याला प्रगती म्हणतो) विकास यांच्या नादात अनेक (भारतीय विचारातल्या चांगल्या) गोष्टींचा नाश झाला.

विनय :- यापूर्वी तुम्ही ‘साधने’ च्या (10,000 वर्गणीदार झाल्यावरच्या) मेळाव्यात बोलताना समाजवाद्यांवर काही टीका केली होती- विशेषतः अंतर्गत मतभेद व त्यातून उद्भवणाऱ्या वादावादीबद्दल- त्याविषयीही काही-
अनंतमूर्ती :- हो- मी म्हटलं होतं- उजव्यांच्यात कधीच फाटाफूट होत नाही, तर डावे नेहमीच विखरून पडलेले
दिसतात. उजव्या गटात कधीच फूट पडत नाही कारण त्यांची उद्दिष्टे चटकन् कळण्यासारखी असतात. उद्याच काही मिळण्यासारखं असेल तर आज फूट पडतच नाही. पण डाव्यांची उद्दिष्टे इतकी दूरची, दीर्घमुदतीची असतात की तोपर्यंतच्या प्रवासात फाटाफुटीचे सर्व प्रकार घडू शकतात. 

विनय :- ही काही टीका म्हणता येणार नाही- याला डाव्या हाताचा सलाम म्हणावं का?
अनंतमूर्ती :- (हसत) नाही, नाही- मी मनातला खेद व्यक्त करतो आहे; आम्ही एकत्र राहिलो असतो तर काय काय करू शकलो असतो..)

विनय :- पण डाव्या चळवळीमधील ही फुटण्याची, विखरून पडण्याची प्रवृत्ती पूर्वीपासून आजपर्यंत टिकून आहे, तिच्यावर काय उपाय असू शकतो?

अनंतमूर्ती :- डावी चळवळही राष्ट्रीयीकरण, सरकारीकरण यात अडकून पडल्याने कुंठित झाली आहे, हे आपल्याला कळलं आहे. सरकार सर्व उद्योग चालवील हे धोरण. उदा. हॉटेल्स- सरकारने कशाला चालवावीत? तसेच इतर अनेक उद्योग व्यवसाय आहेत ते समाजाने का चालवू नयेत? त्या व्यवसायात रस, गती असणारांनी का चालवू नयेत? आम्ही या सर्व संकल्पनांच्या नव्या व्याख्या करायला हव्या होत्या. पण रशियन मॉडेलमध्ये आम्ही फार अडकून पडलो व डावी विचारसरणी कालबाह्य ठरत गेली. आपण प्रत्यक्ष पाहतो आहोत की सरकारने हाती घेतलेले उद्योग कार्यक्षमतेने चालत नाहीत- तोट्यात जातात. खाजगी उद्योग व्यवस्थित चालतात. म्हणून आपण उद्योजक व्यक्ती आर्थिक शोषण न करता फायद्यात चालवू शकतील अशा उद्योगांसाठी (नियोजनात) भरपूर वाव ठेवायला हवा होता.

रशियाने सरकारी मालकी रद्द करून लोकांना (उद्योग व्यवसाय करण्याचं) स्वातंत्र्य दिलं आणि एकदम माझ्या लक्षात आलं- भारताकडे पाहा- थोडेफार पैसे हाती आलेला माणूस आपल्याकडे छोटंसं दुकान टाकतो, आणि दुकान कसं चालवायचं हे (उपजत) कळणारे गुजराथी अमेरिकेत जाऊन ती सगळी हॉटेल्स (त्यांच्या शब्दात मॉटेल्स) चालवू शकतील! आपल्या जनतेकडे अशा संपत्ती निर्माण करण्याच्या अनेक क्षमता आणि ज्ञान आहे. अशा संपत्ती, मालमत्ता निर्माण करू शकणारांचं स्वातंत्र्य काढून घेणं म्हणजे निव्वळ गुन्हाच आहे. म्हणून आम्ही पोथीनिष्ठा नाकारणारी आणि उद्योजकतेला संरक्षण देणारी समाजवादी रचना विकसित करायला हवी होती. रशियन रचनेत हे नव्हतंच- त्यामुळे (साम्यवादी रचना जाऊन) स्वातंत्र्य मिळाल्यावर त्या स्वातंत्र्याचं काय करायचं हे रशियनांना कळेचना. व्यवसाय कसा करावा, दुकान कसं चालवावं हे त्यांना माहीतच नव्हतं- भारतातले दुकानदार त्यांची सगळी दुकानं, बाजारपेठा ताब्यात घेऊ शकतील. मल्याळी हे कुठेही करू शकतात- दोन-चार केळ्यांचे घड, सटरफटर वस्तू विकायचं त्यांचं किरकोळच दुकान असेल पण मूळ दुकानदार गावाकडे गेला तर लगेच त्याचा भाचा, पुतण्या गल्ल्यावर बसतो (धंदा बंद पडत नाही) सगळं कुटुंब उद्योगात असतं- हे फार सुंदर आहे- समाजवादाच्या नावाने लोकांचं हे स्वातंत्र्य काढून घेता कामा नये.

विनय :- म्हणजे देशांतर्गत वैयक्तिक उद्योजकतेला वाव आणि संरक्षण देणारं (समाजवादी) नियोजन असलं पाहिजे?
अनंतमूर्ती :- नक्कीच. माझ्या उडुपी समाजाचं तुम्हांला माहीतच आहे- त्या लहानशा तालुक्यात वाढत्या लोकसंख्येचं भागेना तेव्हा हा समाज बाहेर पडला आणि सगळीकडे उडपी हॉटेल्स काढली- विलक्षण यशस्वी करून दाखवली. एक जुना विनोद सांगतो- तेनसिंग एव्हरेस्टवर पोचला तेव्हा तिथे पोचणारा तो पहिलाच माणूस असं त्याला वाटत होतं. पण तसं नव्हतं- एव्हरेस्टवरही एक उडुपी ब्राह्मण हॉटेल वाटून बसलेलाच होता. (माझ्या मते) अशी उद्योजकता हे भारताचं मोठं सामर्थ्य आहे. 

विनय :- भारतानं असं करायला हवं होतं, तसा विचार करायला हवा होता असं आपण बराच वेळा म्हणतो, यातला 'भारत' म्हणजे नेमके कोण? तुमच्या डोळ्यांपुढे असं म्हणताना कोण येतं? 
अनंतमूर्ती :- राज्यकर्ता वर्ग- असा एक वर्ग आता तयार झालेला आहे. 

विनय :- राज्यकर्ता वर्ग की बुद्धिजीवी वर्गही?
अनंतमूर्ती :- मुख्यतः राज्यकर्ता वर्ग- जनतेची मतं मिळवून ते सत्तेवर येतात- आपले लोक बिचारे इतके सोशिक आहेत. एक अयशस्वी ठरला तर दुसर्याला निवडून देतात, त्याच्याच्याने काही घडलं नाही तर अजून तिसऱ्याला (निवडून देतात). भारतीय जनतेचा अजून (लोकशाहीवरचा) विश्वास उडालेला नाही- मतदार प्रयोग करून पाहायला तयार आहेत- केरळमध्ये तर सगळे प्रयोग त्यांनी करून पाहिले आहेत- म्हणून राज्यकर्त्या वर्गाने मतदारांना आज आहेत त्याहून जास्त उत्तरदायी असलं पाहिजे- आणि विरोधामधून, टीका करून त्यांना अधिक उत्तरदायी बनवता येईल अशी सर्वसामान्य जनतेला, आपल्याला आशा असते.
पण कधीकधी निराशा वाटते. कारण एकेकाळी लज्जा नावाची गोष्ट (समाजजीवनात) टिकून होती. लोकांना संकोच वाटायचा, भीड, लाज वाटायची. आज अशी लाजच उरलेली नाही. एखाद्याचा भ्रष्टपणा सिद्ध करा, त्याच्या तोंडावर पुरावे फेका, त्याला अवघडल्यासारखं देखील वाटत नाही- एवढच नाही तर त्यातूनही तो परत वर येतोच. लाज वाटणं हा फार मोठा (नैतिक) गुण आपण गमावून बसलो आहोत. हे नुकसान फार मोठं आहे. लाज, भीड विसरण्याची सुरुवात राजकीय प्रवासाच्या अगदी सुरुवातीलाच व्हायला लागते. एखाद्याला विद्यार्थी- नेता बनायचं असतं- तो पहिलं काम करतो ते लाज, संकोच विसरण्याचं- मग तो बटबटीत अक्षरात भिंती रंगवू लागतो, आरडाओरडा करण्याला घोषणा देणं म्हणतो, रस्त्यात धुडगूस घालतो, स्वतःचा गाजावाजा करतो. एरवी तरुण माणसं संकोची असतातही; पण राजकारणात पडायचं असेल सर्वप्रथम तर लाज सोडली पाहिजे- लंबीचवडी भाषणं ठोकली पाहिजेत, इतरांवर हल्ले केले पाहिजेत- समाजामधून लाजेची भावना निघून जाते आहे. खरं म्हणजे लाज सोडणार्यांना आयुष्यात काहीच मिळवता येत नाही- म्हणून काही संकोच, लज्जा टिकवून धरली पाहिजे- तरुण मंडळीत तरी.

विनय :- या गुणांमधूनच सुसंस्कृत समाज निर्माण होतो. 
अनंतमूर्ती :- हो- एकेकाळी फार मोठी माणसं समाजात होऊन गेली. स्वतः नेहरू आणि इतर अनेक. त्यांच्यात (ही सुसंस्कृत) लज्जा होती- आताच्या आपल्या नेत्यांत तिचा मागमूस आढळत नाही. व्ही. पी. सिंग यांना मी प्रथम भेटलो तेव्हा जाणवलं की ते जरा संकोची आहेत- त्यासाठी मला ते आवडले.

विनय :- आजही तसंच वाटतं? कारण त्यांनी घेतलेले काही निर्णय अत्यंत धाडसी होते...
अनंतमूर्ती :- मी एकदा त्यांना विचारलं, मंडल आयोग लागू करण्याचा निर्णय तुम्ही राजकीय सोयीसाठी घेतलात का? ते, 'नाही' म्हणाले. पुढे ते असंही म्हणाले की मी तो निर्णय घेतला कारण येणाऱ्या दिवसांत प्रत्येक राजकीय पक्षाचं मंडलीकरण निश्चितपणे होणार आहे आजचा युगधर्मच तो आहे.' त्यांचं म्हणणं खरं होतं- कोणताही राजकीय पक्ष या वस्तुस्थितीकडे दुर्लक्ष करू शकत नाही- (अन्य मागासवर्गीय) लोकांच्या आकांक्षा वाढताहेत आणि त्यांना या व्यवस्थेमध्ये स्थान द्यावंच लागेल. त्यामुळे एका अर्थी व्ही. पी. सिंगांनी नवीन कालप्रवाहाच्या कालव्याचं काम केलं असं वाटतं.

विनय :- आता शेवटून दुसरा प्रश्न विचारतो... मी विचारायला हवं होतं पण विचारलं नाही असं काही असेल तर... 
अनंतमूर्ती :- छे मुळीच नाही. तू मला दमवलंस. 

विनय :- तुम्हाला समारोपादाखल काही म्हणायचं असेल, एखादी अत्यंत अभिमानास्पद आठवण....?
अनंतमूर्ती :- मला 40-50 वर्षांपूर्वीच्या काळात होती तशी हा देश माझा आहे आणि मी या देशाचा ही भावना तुमच्यासारख्या मित्रमंडळींच्या स्नेहातून निर्माण व्हायला हवी आहे, या स्नेहाला अखिल भारतीय स्वरूप यावं- भारतामधल्या सर्व भाषांत आणि त्या बोलणारांत असा गाढ स्नेह असावा.

विनय :- आंतरभारतीप्रमाणे...? 
अनंतमूर्ती :- हो, आंतरभारतीप्रमाणेच. साधनेप्रमाणे..... महाराष्ट्रात असा अनुभव यायचा. मी पहिल्या वेळी साधनेत आलो- तेव्हा यदुनाथ थत्ते इथे होते- त्यांचा सहवासच असा होता की मीही मराठी भाषेचा (संस्कृतीचा) घटक आहे असं मला वाटलं. भारतभर असं घडलं, घडवलं तर ते फार मोठं कार्य होईल. आणि हे गैरसरकारी पद्धतीने झालं पाहिजे, उत्स्फूर्त प्रयत्नांमधून. दुसरं असं की यापुढच्या काळात आम्ही लेखकांनी संगीत, चित्रकला, चित्रपट या क्षेत्रांतल्या कलावंतांशी अधिक संवाद साधला पाहिजे. आज याची कमतरता आहे- महाराष्ट्रात असा संवाद चालू आहे?

विनय :- थोडाफार....?
अनंतमूर्ती :- पण हे घडायला हवं....

विनय :- निर्मितीच्या सर्व प्रवाहांची देवाणघेवाण व्हायला हवी... 
अनंतमूर्ती :- निश्चितच. कारण निर्मितीक्षमतेचं संगोपन शांत आणि अलिप्त वातावरणातही करावं लागतं. (असं असलं तरी) मात्र तिचा प्रभाव ती समाजापुढे आल्यावरच जाणवतो. म्हणून सृजनासाठी एकांतही हवा आणि समाजही. म्हणून आपल्याला अशी छोटी छोटी बेटे हवीत, की जिथे सर्जनशीलता जोपासली जाईल; आणि मग तो कलाकार त्याची निर्मिती घेऊन समाजापुढे येईल- यासाठी आपण अधिक खुला अवकाश निर्माण करायला हवा. संपूर्ण देशात हे काम करू या. एकमेकांशी बोलू या, एकमेकांच्या (साहित्यिक, कलात्मक) उपलब्धींची माहिती करून घेऊ या, एकमेकांशी जोडून घेऊ या. 

आपण सध्याची अतियुरोपकेंद्री मानसिकता सोडली आणि भारतकेंद्री झालो की हे नक्की घडेल. आपल्याकडे युरोपियन साहित्याचे विद्वान अभ्यासक असतात पण शिवराम कारंतांच्या साहित्याचा जाणकार उत्तर प्रदेशात सापडणार नाही- युरोपात मात्र शेजारच्या देशातल्या वाङ्मयाचा जाणकार प्रत्येक देशात सापडतो- जर्मनीत जेम्स जॉईस (ब्रिटिश कादंबरीकार) वर काम केलेली अधिकारी व्यक्ती असतेच. आपल्याला युरोपीय साहित्याची माहिती असते; पण महाराष्ट्रामध्ये कन्नड कवी बेंद्रे यांचा अभ्यास होत नाही. आणि उलटही कर्नाटकात तेच मराठीबद्दल! विद्यापीठांच्या अभ्यासक्रमातही याकडे फारसं लक्ष दिलं जात नाही.

स्वातंत्र्य मिळाल्यावर हे घडायला हवं होतं- भाषिक साहित्याच्या परस्पर अभ्यासामधून देश जोडला जायला हवा होता- एकमेकांच्या भाषा आणि साहित्य परंपरांची माहिती करून घ्यायला हवी- कर्नाटकातल्या 'यक्षगान' परंपरेचा विद्वान अभ्यासक महाराष्ट्रात असायला पाहिजे. काही क्षेत्रांत हे घडतं आहे- नाट्यक्षेत्रात. नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामुळे मराठी नाटकाची माहिती आता कर्नाटकात व्हायला लागली आहे. पण साहित्याच्या क्षेत्रात हे अजून घडत नाही. एकेकाळी असं नव्हतं- भारतीय लेखकांना अन्य भारतीय भाषांतल्या साहित्याची आजच्यापेक्षा अधिक जाण होती, आस्था होती. आज पुन्हा तसं घडावं अशी माझा इच्छा आहे. मग खऱ्या अर्थाने 'आपण भारतीय आहोत’, याची जाणीव होईल. हे घडवू या.
 

Tags: कर्नाटक साधना साप्ताहिक आंतरभारती लेनिन विल्यम् ब्लेक संजय गांधी जगजीवनबाबू के. शिवराम कारंथ इंदिरा गांधी जवाहरलाल नेहरू जयप्रकाश नारायण वर्डस्वर्थ थॉमस हार्डी विल्यम ब्लेक महात्मा गांधी हरिजन डॉ. राममनोहर लोहिया विनय हर्डीकर यू.आर.अनंतमूर्ती Karnataka Sadhana Weekly Antarbharati Lenin Sanjay Gandhi Jagjivanbabu K. Shivram Karantha Indira Gandhi Jawaharlal Nehru Jayaprakash Narayan Wordsworth Thomas Hardy William Blake Mahatma Gandhi Harijan Dr. Rammanohar Lohia Vinay Hardikar UR Ananthamurthy weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

विनय हर्डीकर,  पुणे
vinay.freedom@gmail.com

पत्रकार, समीक्षक, प्राध्यापक, शास्त्रीय संगीताचे जाणकार, मर्ढेकर-शेक्स्पिअर यांचे अभ्यासक, सामाजिक कार्यकर्ते, गिर्यारोहक आणि वक्ते


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके