डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

‘‘तीन दिवस तीन रात्री इतक्या वेळेत ‘हिंदू’ ही कादंबरी मी वाचली तेव्हा माझ्या तीन प्रतिक्रिया होत्या. माझी पहिली प्रतिक्रिया (पहिली तीनशे पाने वाचल्यानंतरची) ही होती की, हे एक ग्रँड नॅरेटिव्ह (एक महाकथन) आहे. माझी दुसरी प्रतिक्रिया (त्यापुढील शंभर-दीडशे पाने वाचल्यानंतरची) अशी होती की, औरंगाबादविषयीची ही पाने कंटाळवाणी आहेत, आणि माझी तिसरी प्रतिक्रिया (संपूर्ण कादंबरी वाचून झाल्यानंतरची) अशी होती की, या कादंबरीतील नायक (खंडेराव) जे तत्त्वज्ञान मांडतोय किंवा मानवी संस्कृतीच्या इतिहासाकडे ज्या पद्धतीने पाहतोय ते तत्त्वज्ञान आणि ती पद्धत मला अजिबात मान्य नाही.’’

अनेक वर्षे सगळ्यांचा (अगदी प्रतीक्षेचा) अंत पाहिल्यावर भालचंद्र नेमाडे यांच्या ‘हिंदू’ या कादंबरीचा पहिला सहाशे पानांचा भाग वाचकांच्या हातात पडला ही एक अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. नेमाड्यांनी स्वत: असं सांगितलंय की, ते कादंबरी एका बैठकीत वाचतात, कितीही मोठी असली तरी. ही कादंबरी जरी मला एका बैठकीत वाचता आली नाही तरी कमीत कमी वेळात म्हणजे तीन दिवस आणि तीन रात्री एवढ्या वेळात वाचून काढली. हा पहिला भाग सहाशे पानांचा आहे आणि पुढील भाग या आकारात असतील तर ही एक मराठीतली आणि आतापर्यंतच्या भारतीय कादंबरी वाङ्मयातील आणि जागतिक कादंबरी वाङ्‌मयातलीसुद्धा एक महाकादंबरी ठरेल याच्याबद्दल माझ्या मनात शंका नाही.

दुसरं असं आहे, मी हे जे बोलतोय ती या कादंबरीची समीक्षा नव्हे, या कादंबरीची-चर्चा आहे. ज्या वेळेला एक मोठा प्रकल्प वाङ्‌मयात येतो, त्या वेळेला रूढ समीक्षेच्या पद्धती थिट्या पडतात, हा आतापर्यंतचा सगळ्यांचा अनुभव आहे आणि माझ्यासकट मी हे विधान करतोय की, नेमाड्यांनी मराठीमध्ये जो पट मांडलेला आहे, तो समजावून घेऊन कादंबरीची चर्चा करू शकेल असा समीक्षक मला तरी दिसत नाही. त्यामुळे माझं म्हणणं असं आहे की, या कादंबरीवर, ती श्रेष्ठ-कनिष्ठ ठरवण्यापेक्षा खूप बोललं गेलं पाहिजे आणि नेमाडे काय करू इच्छित आहेत, ते त्यांना कसं जमतंय, कसं साधतंय, 35 वर्षं या कादंबरीवर काम चाललं होतं, त्यामधून नेमाड्यांचा लेखक म्हणून किती विकास झाला, किती वाढ झाली या सगळ्यांबद्दल विधानं न करता या सगळ्या विषयाची चर्चा व्हायला हवी, बोललं जायला पाहिजे.

तीन दिवस तीन रात्री असं मी म्हणालो, तर माझ्या तीन प्रतिक्रिया होत्या. माझी पहिली प्रतिक्रिया तीनशे पानं वाचल्यावरची (आणि या सगळ्या प्रतिक्रिया मी तुमच्यासारख्या मित्रांना कळवत होतो.) अशी होती की, हे टोलेजंग नॅरॅटिव्ह आहे. मी त्याला ‘ग्रँड नॅरॅटिव्हहिंदू’ असं म्हटलं होतं आणि खरोखरच या पहिल्या भागाच्या पहिल्या 400 पानांत ‘ग्रँड’ हा शब्दसुद्धा काही वेळेला थोडासा थिटा पडावा एवढा मोठा पट उभा करण्यात नेमाडे यशस्वी झालेले आहेत आणि त्यांनी तो अतिशय जिव्हाळ्याने उभा केला आहे. नेमाडे आपल्या लेखनविषयात जिव्हाळ्याने इन्व्हॉल्व होऊन लिहिताहेत असं क्वचित घडतं, नाहीतर एरवी अत्यंत उपरोधिक आणि थोडंसं टिंगलवजा लिहिण्यासाठी नेमाडे प्रसिद्ध आहेत. परंतु ही पहिली 400 पानं हे एक टोलेजंग कथन (‘नॅरॅटिव्ह’ याचा मराठी अर्थ मी ‘कथन’ असा करतो.) एक महाकथन चालू आहे, असं माझ्या लक्षात आलं. ती माझी पहिली प्रतिक्रिया होती.

दुसरी प्रतिक्रिया मी त्यापुढील शंभर-दीडशे पानं वाचल्यानंतरची होती. औरंगाबादविषयीची ही पानं कंटाळवाणी आहेत; कादंबरीत निदान इथे नको होती. कदाचित ही दोन-अडीच हजार पानांची कादंबरी व्हायची आहे, त्यामुळे ती दुसरीकडे आली असती तर बरं झालं असतं. कदाचित अजिबात आली नसती तरी अधिक बरं झालं असतं. म्हणजे माझी दुसरी प्रतिक्रिया अशी होती की, कादंबरीचं लेखन अतिशय चमकदार आहे, परंतु ही औरंगाबादविषयीची पानं कंटाळवाणी होतात. त्याचं एक कारण असं की ‘झूल’ या कादंबरीमध्ये या पानांमधला बराचसा भाग सूचकपणे येऊन गेलेला आहे.

आणि संपूर्ण कादंबरी वाचल्यावर माझी तिसरी प्रतिक्रिया अशी होती की, ही एक महान कादंबरी आहे, परंतु या कादंबरीच्या शेवटी हा नेमाड्यांचा तिसरा नायक (पहिला नायक पांडुरंग सांगवीकर, दुसरा नायक- चांगदेव पाटील) खंडेराव, जे तत्त्वज्ञान मांडतोय किंवा संपूर्ण मानवी उत्क्रांतीकडे, मानवी संस्कृतीच्या इतिहासाकडे ज्या पद्धतीने पाहतोय ते तत्त्वज्ञान आणि ती पद्धत मला अजिबात मान्य नाही. या माझ्या तीन प्रतिक्रिया आहेत, त्याविषयी कुणाला असं वाटेल, पहिली प्रतिक्रिया भाबडेपणाची होती, दुसरी सावधपणाची होती आणि तिसरीमध्ये मी काहीतरी निर्णायक विधान करतोय; तर तसं मला म्हणायचं नाही. परंतु कादंबरीची पहिली 400 पानं आणि शेवटची 200 पानं यात (नेमाड्यांचा शब्द वापरायचा झाला तर कादंबरीच्या द्रव्यामध्ये) जो फरक पडतोय आणि त्यामुळे शैलीमध्ये जो फरक पडतोय त्यातून हे सगळे प्रश्न निर्माण होतात.

माझ्या मनात आणखी एक उपमा आली. सामन नावाचे मासे असतात. (आणि हे मी कादंबरी वाचत असताना नेमाड्यांना फोन केला होता, त्यावेळी त्यांनाही सांगितलं होतं.) हे सामन मासे ज्या नदीमध्ये असतात त्या नदीच्या उगमापासून मुखापर्यंत आणि परत मुखापासून उगमापर्यंत असा सतत प्रवास करत असतात. त्यांच्या प्रजननाशी त्याचा काहीतरी संबंध असतो. तसं काहीतरी ‘हिंदू’मध्ये चाललेलं आहे. एकाच वेळेला मोहेंजोदोडोपासून ते विसाव्या शतकाच्या शेवटच्या दशकापर्यंत अशा खंडेरावाच्या येरझारा चाललेल्या आहेत.

याला जशी एक पुरातत्त्व बाजू, (खंडेराव त्या शास्त्रातलाच असल्यामुळे आहे,) तशीच एक तत्त्वज्ञानात्मक बाजूही आहे. सर्व तत्त्वज्ञानांना पडलेला मूलभूत प्रश्न, माणूस जन्माला का येतो आणि माणसाच्या जन्माचं फलित कशात आहे? या प्रश्नाला सामोरं जाण्याची, एकीकडे पुरातत्त्वशास्त्राची पातळी आणि दुसरीकडे तत्त्वज्ञानाची पातळी... मला असं वाटलं होतं की, पांडुरंग सांगवीकर ते खंडेराव याच्यामध्ये पुन्हा काही विकासक्रम असेल, पण आता त्याच्याबद्दल माझ्या मनात (विशेषत: त्याचं शेवटचं प्रेझेंटेशन वाचल्यानंतर) शंका निर्माण झालेली आहे.

काही चांगल्या गोष्टी या कादंबरीच्या निमित्ताने घडल्या आहेत, त्यांचाही उल्लेख करायला पाहिजे. मराठीत दोन प्रकारचे कादंबरीकार आहेत. पहिला- अभ्यास करून लिहिणारे आणि दुसरा- अभ्यास न करता लिहिणारे. नेमाडे अर्थातच पहिल्या वर्गात आहेत. (पहिल्यापासूनच आहेत.) पहिल्या प्रकारात पुन्हा दोन प्रकार असतात. अभ्यास करून वाचनीय कादंबरी लिहिणारे आणि अभ्यास करून टाकाऊ कादंबरी लिहिणारे. त्यातही नेमाडे पहिल्या प्रकारात आहेत, हे मुद्दाम नमूद केलं पाहिजे. कुणी एखाद्या विषयाची खूप तयारी केली, त्यासाठी खूप वाचन केलं, खूप प्रवास केला, खूप लोकांच्या भेटी घेतल्या, खूप टिपणं काढली, खूप चर्चा केल्या, खूप फोटोग्राफ्स काढले आणि अगदी त्या विषयाचा ध्यास धरला तरीसुद्धा उत्तम कलाकृती निर्माण होईल असं नाही. किंबहुना ही रिस्क असते, म्हणून कदाचित लोक अभ्यास करतच नाहीत. इतकं करून कलाकृती निर्माण होत नसेल तर न केलेला बरा, आपल्याला साधारण जी शैली अवगत आहे आणि जे वरवरचं ज्ञान आहे त्याच्यावर आपली कादंबरी धकवावी, असं बहुतेक 99 टक्के कादंबरीकार मानतात. लोकप्रिय कादंबरीकार तर असं लिहितातच, पण महत्त्वाचे समजले जातात तेही बहुतेक सगळे असंच लिहितात.

नेमाड्यांच्या आसपास आज जी कादंबरीकारांची गर्दी आहे, त्यातलेही 90 टक्के असेच आहेत. त्यामुळे नेमाड्यांनी एक मोठा आदर्श या कादंबरीच्या निमित्ताने कादंबरीकारांसमोर ठेवलेला आहे; अभ्यासही मोठा आहे, कादंबरीही मोठी आहे. ही कादंबरी चिरकाल टिकेल की नाही, हा आत्ता बोलण्याचा विषय नाही. 100 वर्षांनंतर जे लोक असतील ‘हिंदू’ वाचणारे, त्यांनी बोलायचा विषय आहे, त्यामुळे मी त्यात पडणार नाही. ‘हिंदू’मध्ये अभ्यासाचे पुरावे जागोजाग आहेत याबद्दल काही शंका नाही.

दुसरं असं आहे, ‘हिंदू’ हा शब्द मुळात भारतीय नाही, संस्कृत शब्द नाही. तो धर्मवाचक शब्द नाही, तो वंशवाचक शब्द आहे. अफगाणिस्तानपासून ब्रह्मपुत्रेपर्यंत सलग आणि समृद्ध असा जमिनीचा विस्तीर्ण तुकडा आहे. त्यातील सर्वांत महत्त्वाची नदी सिंधू. आणि तिच्या अल्याडपल्याड राहणारे लोक हिंदू, असा या भागात राहणाऱ्या लोकांना, त्या वंशाच्या लोकांना ‘हिंदू’ हा शब्द लागू पडतो. हे इतिहासातसुद्धा अजून मान्य झालेलं नाही, म्हणजे ते खरं असलं तरीसुद्धा ते मान्य करणं सोयीचं वाटत नाही, ते नेमाड्यांनी ललित वाङ्मयात फार ठासून सांगितलं हे उत्तम झालं. आणि कादंबरीच्या पहिल्या काही पानांतच, नेमाड्यांनी एक पाकिस्तानी पात्र दाखवलं आहे. तो मुसलमानाच्या जागी हिंदू म्हणतो, हिंदूंच्या जागी मुसलमान म्हणतो, भारताच्या जागी पाकिस्तान म्हणतो, पाकिस्तानच्या जागी भारत म्हणतो. यातली कारागिरी उघड आहे, क्लृप्ती उघड आहे, पण तरीसुद्धा पाकिस्तानी हिंदू व पाकिस्तानी मुसलमान किंवा भारतीय हिंदू वा भारतीय मुसलमान हे सगळे मिळून वंश एक आहे, हे अनेकांनी नाइलाजाने मान्य केलं होतं, हे नेमाड्यांनी अतिशय मनापासून मान्य केलं आणि ते मराठी कादंबरीत आणलं, हे मोठे उपकारच नेमाड्यांनी मराठी कादंबरीवर केले असं म्हणायला पाहिजे.

दुसरी गोष्ट अशी की, नेमाड्यांचे आतापर्यंतचे जे दोन नायक आहेत, (पांडुरंग सांगवीकर आणि चांगदेव पाटील) कुटुंबव्यवस्थे- विषयी साशंक आहेत आणि कुटुंबव्यवस्थेशी फटकून राहणारे आहेत. पांडुरंग सांगवीकर वडिलांना सांगतो की, अशीच मुलगी पाहा (माझं लग्न ठरवणार असाल तर) जिला मूल होणार नाही. म्हणजे वंशवृद्धी हा मानवी जीवनाचा प्रमुख उद्देश आणि तो सहज साध्य करणारी व्यवस्था म्हणजे कुटुंबव्यवस्था, त्यालाच पांडुरंग सांगवीकरचा पूर्ण विरोध आहे. चांगदेव पाटील हा त्या कुटुंबव्यवस्थेच्या समांतर चालत राहतो. त्यामुळे ‘झूल’ कादंबरीत नामदेव भोळे या त्याच्या मित्राचं कुटुंब त्याच्या शेजारीच दिसतं  आणि ‘जरीला’मध्ये चांगदेवच्या आसपास कुटुंबं आहेत, त्यांच्याबद्दल त्याला राग नाही, पण आपण यांच्यापैकी नाही ही जाणीव मात्र चांगदेवच्या मनात पूर्णपणाने दिसते. यामुळे नेमाड्यांच्या कादंबऱ्यांवर एक मर्यादा आली. ती मर्यादा त्यांनी ‘हिंदू’मध्ये फार चांगल्या पद्धतीने ओलांडलेली आहे असं म्हणायला पाहिजे.

कुटुंबव्यवस्था हे भारतीय समाजाचं एक बेसिक युनिट आहे. त्याच्यावर हा समाज टिकून आहे. आता मी जेव्हा ‘भारतीय’ हा शब्द वापरतो, तेव्हा नेमाड्यांनी वापरलेला ‘हिंदू’ हा शब्द मनात ठेवायचा. (मला माझ्या पूर्व आयुष्यामुळे ‘हिंदू’ शब्द वापरायचा कंटाळा आलाय, म्हणून मी ‘भारतीय’ हा शब्द वापरतोय, असं आपण धरू.) त्या कुटुंबव्यवस्थेचं बलस्थान त्या कुटुंबातल्या स्त्रिया आहेत. पुरुष अकाली गेला तर कुटुंबावर संकट येतं, पण ते उद्‌ध्वस्त होत नाही. याच्याउलट कुटुंबातली स्त्री जर अकाली गेली तर ते कुटुंबच पूर्णपणे उद्‌ध्वस्त होतं. अगदी महाभारतापासून पाहिलं... त्यात पंडू मेला तरी पांडवांचं कुटुंब शिल्लक राहिलं आणि दुसरीकडे धृतराष्ट्र, दुर्योधन हे सगळे कौरव हयात असूनही कुटुंब उद्‌ध्वस्त होतं. यादवांचंसुद्धा कुटुंब उद्‌ध्वस्त का झालं किंवा समाज उद्‌ध्वस्त का झाला तर त्यात कुठेही कर्तृत्ववान स्त्रिया नाहीत. आता त्या पूर्वेतिहासात जायला नको, पण नेमाड्यांचे नायक हे कुटुंबव्यवस्थेलाच दुरावलेले असल्यामुळे नेमाड्यांच्या कादंबऱ्यांत स्त्रिया नव्हत्या.

नेमाड्यांची आणि माझी मैत्री आहे. ‘झूल’ वाचल्यावर मी त्यांना विचारलं होतं, ‘काय रे बाबा, तुझ्या या चांगदेव पाटलाचं लग्न होणार की नाही, त्याला काही पोरंबाळं व्हायची की नाही? त्याची काही व्यवस्था तू करतोस की नाही? कारण आता तो पूर्णपणे तुझ्या हातात आहे. त्यामुळे त्याला स्थळ आणणं, ते पसंत-नापसंत करणं हे तुझ्या हातात आहे.’ त्यावर नेमाड्यांनी मला उत्तर असं दिलं. ‘दोन-चार बायका इकडे-तिकडे टाकलेल्या आहेत.’ (नेमाडेसुद्धा कादंबरीविषयी जेव्हा गप्पा मारतात तेव्हा किती मोकळे असतात!) ‘झूल’ जेव्हा मी वाचली तेव्हा त्या दोन-चार इकडे-तिकडे टाकलेल्या बायका तिथेच पडलेल्या होत्या. स्त्रिया म्हणजे पन्नास टक्के मानवजात. हे सगळ्यांना मान्य आहे. मग जो कादंबरीकार या पन्नास टक्के लोकांकडे पूर्णपणे दुर्लक्षच करतो, (उपेक्षा करतो असं मला म्हणायचं नाही.) त्या कादंबरीकाराला मानवी जीवनाचं तरी परिपूर्ण ज्ञान झालं असेल का, असा मोठा प्रश्न आहे.

नेमाडे आणि साने गुरुजी यांच्यामध्ये इथे मला सांधा दिसतो. स्त्रियांबद्दल पूर्ण अनुकंपा बाळगून साने गुरुजींनी स्त्रीप्रधान वाङ्‌मय जास्त लिहिलं. पण तशीच अनुकंपा बाळगूनही नेमाड्यांनी पुरुषप्रधान वाङ्‌मय जास्त लिहिलंय, हे लक्षात घेतलं तर नेमाड्यांना साने गुरुजी का महत्त्वाचे लेखक वाटतात हा जो अनेकांना पडलेला प्रश्न आहे त्याचा काही उलगडा होऊ शकतो. नेमाड्यांच्या कांदबऱ्यांमध्ये स्त्रीचा आई म्हणून उल्लेख आहे, बहीण म्हणून उल्लेख आहे. त्यानंतर मैत्रीण म्हणून पुसट उल्लेख आहे, पण पुरुष आणि स्त्रीचं नर आणि मादी हे जे नातं आहे... आता पुन्हा मी जे विधान करतोय ते इतकं गंमतीदार आहे, साने गुरुजी, नेमाडे आणि मर्ढेकर तिघांचं ते महत्त्वाचं साम्य आहे. नर आणि मादी हे स्त्रीपुरुषांमधलं प्रधान नातं त्यांच्यासमोर आलं की, हे तिघे गोंधळून जातात. साने गुरुजींनी ते पूर्णपणे टाळलेलं आहे, नेमाडे त्याला बगल देतात आणि मर्ढेकर त्याचा धिक्कार करतात!

स्त्री-पुरुष संबंध हे केवळ प्रजननासाठी की केवळ आनंदासाठी की केवळ सहजीवनासाठी, हे समाजाचंच मुळातलं कोडं आहे. लोक ज्या पद्धतीने जगतात त्यात या तिन्ही गोष्टी घडत असतात. पण ज्या वेळेला तुम्ही या तिन्ही गोष्टी वेगवेगळ्या करता, त्या वेळेला अनेक समस्या निर्माण होतात. नेमाड्यांच्या कादंबऱ्यांमध्ये स्त्रिया नव्हत्या. मला ‘हिंदू’ची जी पहिली 400 पानं आवडलेली आहेत, त्यात सगळ्या स्त्रियाच आहेत आणि ज्या वेळेला औरंगाबादला खंडेराव आणि ही कादंबरी येते, त्या वेळेला पुन्हा कोऱ्या लोकांचं पुरुषप्रधान, नेमाड्यांचं लाडकं जग तिथं येतं आणि त्यामुळे मला ती कंटाळवाणी वाटायला लागते. पुन्हा सेमिनारच्या निमित्ताने मंडी वगैरेच्या निमित्ताने स्त्रिया तिथे आल्या की ती कादंबरी पुन्हा जिवंत होते.

मानवी जीवनाचं अर्धांग असलेल्या स्त्रिया आणि त्या सर्व प्रकारच्या स्त्रिया... म्हणजे आनंदी स्त्री, दु:खी स्त्री, नंतर समाजाच्या दृष्टीने गौरवास्पद जीवन जगणारी स्त्री इथपासून गणिकावृत्ती धारण करणारी, स्वत:च्या नवऱ्याचा खून करून माहेरी पळून येणारी, नवऱ्याच्या सर्व प्रकारच्या वेड्यावाकड्या इच्छांना शरण जाणारी, मजुरी करणारी किंवा घराच्या चार भिंतींच्या बाहेर कधीच न पडलेली, पूर्णपणे अशिक्षित पण सुसंस्कृत, पूर्णपणे सुशिक्षित पण संस्कृतीच्या बाबतीत एकारलेली असे सगळ्या स्त्रीजीवनाचे नमुने ‘हिंदू’च्या पहिल्या 400 पानांत आलेले आहेत. खरं म्हणजे नेमाड्यांवर खटला भरला पाहिजे, हे सगळं तुमच्याकडे होतं तर तुम्ही हे याच्या आधी का लिहिलं नाही? कारण हे 400 पानांतलं कथन अतिशय जिवंत आहे, टवटवीत आहे.

बालवयामध्ये आणि तरुण वयामध्ये नेमाड्यांनी कितीतरी बारकाईने ग्रामीण भागातलं स्त्रीजीवन पाहिलेलं आहे! नेमाडे अशा याद्या देतात धडाडा की, बाईला घरात किती कामं असतात! त्या याद्या वाचून पाहण्यासारख्या आहेत. किंवा एखादा प्रसंग. घरात एखादं कार्य असेल तर किती प्रकारचे स्वयंपाकाचे पदार्थ करावे लागतात! हे जसं अभ्यासातून आलेलं आहे, तसं हे चित्रण जिवंत का झालं? कारण ते कुठल्या संदर्भग्रंथातून उलचून नाही घेतलेलं...

लग्न म्हटल्यावर एवढे विधी असतात, मृत्यू म्हटल्यावर एवढ्या गोष्टी असतात, अमुक समारंभाचं जेवण म्हटल्यावर एवढे पदार्थ असतात, हे या कादंबरीकाराने त्याच्या घडणीच्या काळामध्ये अतिशय बारकाईने पाहिलेलं आहे आणि त्याला ते आवडलेलं आहे. पण कादंबरीकार म्हणून तो इतके दिवस हे सगळं मला नको किंवा माझ्या नायकाला नको, अशी भूमिका घेऊन बसल्यामुळे टाळत होता. ही जी आपली, विशेषत: ग्रामीण जीवनाची सांस्कृतिक श्रीमंती आहे, ती नेमाड्यांच्या कादंबरीमध्ये पहिल्यांदा आली. ‘कोसला’मध्ये जे ग्रामीण जीवनाचे उल्लेख आहेत, त्यांतले काही चावट आहेत किंवा काही बदमाशीचे आहेत. म्हणजे शेतातलं इंजिन चोरून नेणारा चोरच चार दिवसांनी पुन्हा येऊन म्हणतो, तुम्हाला अर्ध्या किंमतीत इंजिन हवं का? तेव्हा सांगवीकरचे वडील त्याला सांगतात, तसं काही करू नको. आता आम्ही नवीन इंजिन आणलेलं आहे, (ते आता चोरून नेऊ नको म्हणजे झालं.)

अगदी तसाच प्रसंग. कापसाची मजुरी वाढवा, असं मजूर म्हणतात. भावडू म्हणजे खंडेरावाचा भाऊ ती वाढवत नाही. बरोबर त्याच रात्री त्यांच्या शेतातून कापसाची चोरी होते. ग्रामीण जीवनाचं चित्रण तिथपासून इथंपर्यंत. पण ‘कोसला’मध्ये त्यात तुच्छता होती, तिरस्कार होता, इथं मात्र ते चित्रण अतिशय जिव्हाळ्यानं आलेलं आहे. गावाच्या आतलं म्हणजे वेशीतल्या लोकांचं आलंय, वेशीबाहेरच्या लोकांचं आलंय, त्याचे तपशील कितीही देता येतील. ते सगळं मुळातून वाचून पाहण्यासारखं आहे. एक मात्र जाता जाता सांगण्यासारखं आहे. या कादंबरीतले काही भाग आधी प्रकाशित करण्यात आले. ते मात्र नीट निवडलेले नव्हते. त्यामुळे माझीही समजूत अशी झाली होती की, त्रिं.ना.अत्रे यांचं जे पुस्तक आहे ‘गावगाडा’ नावाचं, ते उतरून घेऊन, त्याच्या नोटस्‌ काढून ही कादंबरी तयार केली की काय!

या कादंबरीत मला दोन महत्त्वाच्या गोष्टी दिसतात. एक- निसर्गात संतुलन असतं आणि दुसरी- निसर्गाच्या सान्निध्यात राहून जे जगत असतात, त्यांच्यात संतुलन असतं. त्यामुळे नैसर्गिक संतुलन शहरी जीवनशैलीपेक्षा ग्रामीण जीवनशैलीमध्ये केव्हाही जास्त आहे. त्याचे जे काही आयाम आहेत, ते नेमाड्यांच्या ‘हिंदू’च्या पहिल्या 400 पानांत अतिशय चांगले आलेले आहेत.

अजून एक अतिशय महत्त्वाची गोष्ट, नेमाड्यांनी जो प्रदेश निवडलाय, तो नेमका भारताच्या मध्यावर येणारा आहे. आपण किती म्हटलं तरी नेमाड्यांची ही कादंबरी जागतिक स्तरावर जाईल (आणि जावो अशी माझीसुद्धा इच्छा आहे.) तरीसुद्धा कादंबरीचा जो पोत असतो, तो देशीच राहणार आहे. हे मी देशीवादी म्हणून म्हणत नाही तर वाङ्‌मयातलं एक वास्तव म्हणून म्हणतो. त्यामुळे नेमाडे शेवटी कादंबरी लिहिणार म्हणजे ती मराठीत लिहिणार. इथं नेमाडे सत्यजित रायच्या जवळ आहेत. राय यांनीसुद्धा एकच चित्रपट बिगरबंगाली भाषेत काढला, ‘शतरंज के खिलाडी’. नाहीतर सगळे चित्रपट बंगालीतच काढले. तसं नेमाडे मराठीतच लिहिणार. पण ते लिहीत असताना त्यांनी दोन गोष्टी केल्या. एक पुरातत्त्वशास्त्रातला नायक घेतला. त्यामुळे प्रचंड सांस्कृतिक पट त्यांना साहजिकच मिळाला आणि दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजे उत्तर आणि दक्षिण भारतातली सीमारेषा किंवा आर्य आणि द्रविड संस्कृतीची जी सीमारेषा आहे, नर्मदा आणि तापी नद्यांची जी खोरी आहेत, त्यांतला खानदेश हा त्यांनी निवडला.

मला वाटतं, खानदेशचं जातीय-आर्थिक समीकरणसुद्धा पश्चिम महाराष्ट्र व विदर्भापेक्षा वेगळं असेल. मराठी, गुजराती आणि हिंदी या तीन भाषांचा जिथे समन्वय होतो, अशा प्रकारचा हा प्रदेश आहे. योगायोगाने नेमाडे त्याच भागातले आहेत. ‘मोरगाव’ जे त्यांनी तयार केलेलं आहे, ते त्या प्रदेशाचे खूप ऐतिहासिक तपशील... उदा. उत्तर-दक्षिण फौजांची ये-जा असायची तो सबंध भिल्लांचा प्रदेश होता. या येणाऱ्या-जाणाऱ्या फौजांना लुटणं किंवा त्यांना संरक्षण देऊन या प्रदेशातून येऊ-जाऊ देणं. त्यामुळे प्रचंड मानवी जीवनाला हात घालताना एक व्यक्ती, एक कुटुंब, एका व्यक्तीची एक पत्नी, एका पत्नीची शिरजोर पोरं असं किरकोळ द्रव्य द्यायचं आणि ते कोरत बसायचं. आणि शेवटी म्हणायचं की, त्याने मानवी जीवनाच्या अंतिम जाणिवांना हात घातलाय, असली भंकस न करता नेमाड्यांनी आपल्या कादंबरीचा आवाका ठरवलाय, त्याला शोभेल असा, कादंबरीचा मूळ बिंदू (मला इथं न्यूक्लियस म्हणायचंय) समूहाचा घेतला. हे सुद्धा पुन्हा नेमाड्यांच्या आधीच्या कादंबऱ्यांपेक्षा वेगळं आहे.

मराठीमध्ये पुन्हा समूह जीवनावरच्या कादंबऱ्यांची वाणवा आहे. जागतिक वाङ्‌मयातसुद्धा आहे, पण मराठीमध्ये फारच आहे. मराठीमध्ये जे कादंबरी वाङ्‌मय आलं, ते व्यक्तिवाद महाराष्ट्राला नुकताच सापडला होता, त्या काळात निर्माण झालं. परंतु ‘बनगरवाडी’ ही समूहाची दीर्घकथा आहे. (मी तिला कादंबरी म्हणत नाही.) ‘टारफुला’ ही माझ्या मते समूहाची पण अपूर्ण राहिलेली कादंबरी आहे. राजन गवस यांची ‘तणकट’ हीसुद्धा एका छोट्या समूहाची पण अपूर्ण राहिलेली कादंबरी आहे. नुकतीच आलेली आणि जे नेमाड्यांचे फार जहरी टीकाकार आहेत त्या आनंद पाटलांची ‘इच्छामरण’ हीही एका व्यक्तीभोवती गुंफलेली पण समूहाची कादंबरी आहे. अरुण साधू यांची ‘मुंबई दिनांक’, गंगाधर गाडगीळ यांची ‘प्रारंभ’, मीना देशपांडे यांची नुकतीच आलेली ‘हुतात्मा’ याही समूहाच्या कादंबऱ्या आहेत.  

समूहाच्या कादंबरीला ‘हिंदू’मुळे फार मोठं बळ मिळणार आहे, हीही एक उल्लेखनीय अशा प्रकारची गोष्ट आहे. पहिली 400 पानं वाचनीय होण्याचं आणखी एक कारण असं की, नेमाड्यांनी पारंपरिक निवेदनशैली स्वीकारलेली आहे. पारंपरिक शैली म्हणजे मी फडके-खांडेकर पद्धतीची शैली म्हणत नाही. कादंबरी हे एक मोठं काहीतरी कथन असतं आणि ते व्यक्त करण्यासाठी सर्व शैली वापराव्या लागतात, या अर्थानं मी म्हणतोय. उदा. या कादंबरीत कधीकधी स्वगतं येतात, कधी कधी व्यवस्थित निवेदन येतं, कधी संवाद येतात, कधी फ्लॅशबॅकस्‌ येतात. त्यानंतर समूह जीवनाचे मोठे कॅनव्हॉस घेऊन वर्णनं येतात. लोकगीतं तर भरपूर आलेली आहेत. काही काव्यात्मक अशा पद्धतीचं लिहिणं येतं.

माझं म्हणणं असं असतं की, कादंबरीला यांतलं काहीही वर्ज्य नाही. शास्त्रीय संगीताचं उदाहरण द्यायचं झालं तर ‘ख्याल’ हा त्यातला प्रकार आहे. त्याच्यासारखी कादंबरी असते (किंवा ‘ख्याल’ कादंबरीसारखा असतो) इतर ज्या सगळ्या शैली आहेत, सगळे अलंकार आहेत, सगळी तंत्रं आहेत ती सामावून घेऊन अजून काहीतरी कादंबरी म्हणून शिल्लक राहतं.

दुसरं म्हणजे नेमाड्यांची दोन प्रकारची विनोदशैली आहे. एक अतिशय निरागस आणि दुसरी अतिशय धारदार. काही वेळेला अधिक्षेप करणारी आहे. उदा. पांडुरंग सांगवीकर म्हणतो, ‘पहिल्या बंगल्यासमोर नावाची पाटी होती, म्हणून नाव कळलं. दुसऱ्यावर पाटी होती. तिसऱ्यावर पाटीच नव्हती, त्यामुळे त्या बंगल्यात कोण राहतं ते कळलं नाही. किंवा मी प्रवासाला निघालो, गाडी गावाबाहेर पडली अन्‌ निसर्ग दिसायला लागला. ही त्यांच्या निरागस विनोद शैलीची उदाहरणं.

पण मोठा मेंदू लहान असलेला आणि लहान मेंदू मोठा असलेला, हा कारण नसताना क्रौर्याकडे झुकणारा विनोद असं म्हणावं लागेल. हे ‘झूल’मधलं वाक्य मला त्यावेळीही आवडलं नव्हतं. पण मला माझ्यासारख्या दुसरा एकही वाचक मिळाला नाही, जो म्हणेल की हे वाक्य चांगलं नाही. लेखकाने ही काळजी घ्यायची असते. काही वेळेला लेखक क्रौर्यसुद्धा साधून जातो. काही वेळेला लेखक विटंबनासुद्धा आकर्षकपणे करू शकतो, करतो. पण ज्याला मानवी जीवनाविषयी लिहायचं आहे, त्या लेखकाने शक्य तो ती करायची नसते. त्याला जीवनाचं शुद्ध स्वरूप आणि विडंबन झालेलं स्वरूप या दोन्हींबद्दल सारखाच जिव्हाळा असला पाहिजे.

तीन-चार वाक्ये ‘हिंदू’तली मला सहज आठवतात म्हणून सांगतो. उदा. मुंबईच्या लोकांचं हिंदी. ‘सुमारे अकरा माणसं गटांगळ्या खाकर बुडून मरे’ हे वाक्य वाचल्यावर मला इतक्या जोरात हसू आलं की, आसपासची माणसं माझ्याकडे बघायला लागली. दुसरं, खंडेरावच्या डोळ्याला मार लागतो आणि त्याच्यावरून गावात संध्याकाळची शहाण्यांची बैठक भरते. त्यावेळेला येणारे निरनिराळे सल्ले. त्यात एक सल्ला असाही असतो ‘डॉक्टरकडे कशाला जाता? उरलेला डोळाही जाईल. एका डोळ्यावर माणसाला काही काम चालवता येत नाही का?’

तिसरं उदाहरण, ‘फैजपूरला काँग्रेसचं अधिवेशन झालं आणि तिथं गुन्हेगारी पार्श्वभूमीची माणसं स्वयंपाकघरात घुसली. त्यांनी अनेकांचे कपडे पळवले. अनेक मोठमोठ्या लोकांचे कपडे चोरीला गेले. फक्त गांधींचे गेले नाहीत.’ या वाक्यात परत फार छान निरागसपणा आहे.

चौथं असंच उदाहरण, ते कदाचित्‌ सुधारक मंडळींना धक्कादायक असेल. एक देशमुख म्हणतो, ‘शेतकऱ्याचा आसूड’ पुस्तक कशाला वाचायला लावलं मला? एक डोक्याला ताप झाला आणि पुन्हा बारा आणे माझे वाया गेले! अशी उदाहरणं या कादंबरीत कितीतरी पडलेली आहेत. याच्यामध्ये जीवनाविषयीचं कुतूहल तर आहेच, पण मानवी स्वभावाचे वेगवेगळे विभ्रम आहेत. ते परस्परविरोधीसुद्धा असू शकतात आणि धक्कादायकसुद्धा असू शकतात.

एका व्यक्तीत ते अंतर्विरोधीही असू शकतात. हे सगळं पहिल्या 400 पानांत नेमाडे अत्यंत सहजगत्या चित्रित करत गेलेले आहेत. मात्र औरंगाबादला आले आणि ते पुन्हा आपल्या जुन्या शैलीच्या मोहात सापडले. साधारणपणे ओळखू येतील अशा प्रकारच्या व्यक्तिरेखा आणि त्यांचं औरंगाबादमधलं तेव्हाचं आयुष्य आणि कादंबरीतलं आयुष्य म्हटलं तर ते अगदी सारखं असणार नाही, नाव सारखं असणार नाही, पण कोणाबद्दल लिहिलंय हे कळेल, या पद्धतीने सांगताना नेमाडे पुन्हा जुन्या शैलीच्या प्रेमात पडतात. इथं पुन्हा मर्ढेकर आणि नेमाड्यांच्यामध्ये साम्य आहे. मर्ढेकरांना जेव्हा सहज कविता सुचायला लागल्या, त्यावेळी त्यांना आपली क्लिष्ट शैली आपल्याला सोडून गेली म्हणून दु:ख झालं. नेमाड्यांचं तसं काही होत असेल तर त्यांनी काळजी घ्यावी. त्यांचं बरोबर चाललेलं आहे, असा दिलासा मी त्यांना देऊ इच्छितो. 

ग्रामीण जीवनाचं चित्रण जे नेमाडे दाखवतात ते भाबडेपणाचं नाही. आणि हे पुन्हा मराठी कादंबरीमध्ये दुर्मिळ आहे. ग्रामीण जीवन हे साने गुरुजी किंवा गो.नी.दांडेकर लिहितात तितकं भाबडंही नसतं. खानोलकर, पेंडसे, दळवी लिहितात इतकं करप्टही नसतं. शंकर पाटील आणि त्या पद्धतीचे जे लोक लिहितात तसं एकीकडे प्रचंड हास्यास्पद आणि दुसरीकडे प्रचंड क्रूर असंही नसतं. या संतुलनामध्ये अनेक असंतुलनं दडलेली असतात. ती नेमाड्यांना व्यवस्थित दिसतात, याचा मला आवर्जून उल्लेख केला पाहिजे.

उदा. नेमाड्यांनी शेतकरी किती काटकसरीने जगत असतो याचं छान वर्णन केलंय. तो मध्यम शेतकरी (आणि जाता जाता सांगायला हरकत नाही) हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे. जो अल्पभूधारक शेतकरी आणि शेतमजूर आहे, त्याची लोकसंख्या कमी आहे आणि जो प्रचंड जमीन असलेला शेतकरी आहे, त्याची लोकसंख्याही कमी आहे. त्यामुळे प्रचंड जमीन असलेल्या श्रीमंत शेतकऱ्यांकडून जमीन घेऊन ती अल्पभूधारकांना वाटायची आणि मध्यम शेतकऱ्याकडे पूर्ण दुर्लक्ष करायचं. अशा धोरणांची दिवाळखोरी सध्या आपण अनुभवतोच आहोत. मध्यम शेतकरी पुन्हा कुठल्याही वाङ्‌मयाचा नायक झालेला नाही. त्या मध्यम शेतकऱ्याचं जीवन ‘हिंदू’च्या निमित्तानं इतक्या प्रकर्षानं लिहिलं जातंय, ही अत्यंत स्वागतार्ह गोष्ट आहे. हा शेतकरी काहीही वाया जाऊ देत नाही. शेतकरी संघटनेच्या बरोबर काम करत असताना याचा मला चांगला अनुभव आला आहे. हे शेतकरी जेवताना पानामध्ये इतकं टाकायचे की... अन्‌ मी तर कारकुनी घरात वाढलेला, पानात पडेल ते खायचं आणि तेवढंच खायचं. पानात टाकलं तर अन्नाचा अवमान वगैरे असं त्याचं उदात्तीकरण करायचं. पदार्थ चांगला झाला की वाईट याला महत्त्व नाही. (कारकुनी घरात पदार्थ किती चांगले होणार याला अंगभूत मर्यादा असणार.) माझ्या या प्रतिक्रियेवर आमच्या एका कार्यकर्त्या मित्राने मला दाखवलं की, हे जे पानात टाकलेलं असतं ते नंतर वेगळं काढलं जातं. ताटं खळबळून ते पाणी एका वेगळ्या घमेल्यात काढलं जातं. त्यात संध्याकाळी जनावरांची चंदी भिजवली जाते वगैरे वगैरे...

कुठलीही गोष्ट वाया जाऊ देणं, ही पुन्हा ग्रामीण जीवनाची एक संतुलित शैली आहे. हे नेमाड्यांनी अतिशय रसरसून लिहिलंय. तिथे नेमाडे लगेच म्हणतात, आता दुसरी बाजू बघू या. ही दुसरी बाजू दिसणं आणि ती लिहिणं हा प्रामाणिकपणा. हा शेतकरी घरात शक्यतो काटकसर करतोच, पण ती बाहेरही करायला जातो. उदा. लाकडाची मोळी विकत घ्यायचीय. सकाळपासून मोळीवाले बाजारात आलेले आहेत. पण संध्याकाळचे पाच वाजल्याशिवाय मोळी मागायची नाही. हे पुन्हा त्या ग्रामीण जीवनाच्या आर्थिक संतुलनाचं क्रूर चित्रण आहे. म्हणजे मोळी विकून त्या दिवसाचं तेल, मीठ, घेऊन घरी जाण्याची त्या बाईला घाई असणार. त्यामुळे तिने भाव पाडेपर्यंत ती घ्यायला जायचं नाही.

एकीकडे सबंध ग्रामीण जीवनातले भावबंध आणि त्यांचं परस्परांशी जोडलेलं असणं हे चित्रण यशस्वीपणे केलेलं आहे, मात्र ‘अहाहा! माझं खेडं किती सुंदर’ या पद्धतीने नाही केलं. ग्रामीण जीवनाच्या संतुलनाच्या मर्यादा आहेत. पहिली मर्यादा ‘कुटुंब’ आहे, दुसरी मर्यादा ‘जात’ आहे आणि तिसरी संतुलनाची मर्यादा आपलं ‘गाव’ ही आहे. त्याच्याबाहेर ते जात नाही. मोळी विकायला येणारे लोक हे गावाबाहेरचे आहेत, त्यामुळे गावकऱ्यांना त्यांची लूट मान्य आहे. त्यांना अगतिक करून सौदे करणं हे मान्य आहे, पण गावाची एकी मोडता कामा नये, हेही मान्य आहे. अशा या दोन्ही बाजू आहेत. खरं म्हणजे निसर्गातही असंच आहे. एकाच वेळेला निसर्गामध्ये निर्मिती आणि संहार किंवा संवर्धन आणि संहार या प्रक्रिया चालू असतात. त्यामुळे हा भाबडेपणा नाही. ‘हिंदू’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या जनसमूहाची ग्रामीण शैली त्याला जीवनदान देणारी असेल तर तिच्यामधलं अंतर्गत संतुलन, अंतर्गत नियंत्रणाच्या तिच्यामधल्या सगळ्या यंत्रणा, समजावून घेऊन नेमाडे लिहितात.

दुसरं म्हणजे, एवढा प्रचंड इतिहास असलेला समाज आहे कुठला, याचाही उल्लेख पहिल्या 30-40 पानांत आलेला आहे. 5 ते 10 हजार वर्षांचा इतिहास कुणाकडे आहे? कारण मोहेंजोदोडो हे संपन्न शहर असेल तर ते तयार व्हायलाही 1000 ते 1500 वर्षे लागली असतील आणि नवीन जे संशोधन आहे (खगोलशास्त्रीय आणि भूशास्त्रीय) त्यावरून ऋग्वेदाचा काळ 9000 ते 10000 वर्षं इतका मागे नेता येतो. हा इतिहास ओझं केव्हा ठरतो आणि सामर्थ्य केव्हा ठरतो, हे ज्याला कळेल त्याला भारतीय समाज कळेल, त्याला ‘हिंदू’ नावाचा समाज कळेल. त्यामुळे मोरगावमध्ये ज्या ज्या वेळेला पेचप्रसंग येतो, त्या त्या वेळेला बाहेरचा कुणी घटक नको आत यायला ही काळजी घेतली जाते. आपल्या गावाची एकी टिकली पाहिजे. त्यात कुणाच्या हातून अपराध घडला असेल, प्रमाद घडला असेल त्याला शिक्षा करून तो प्रसंग मिटवला जातो.

थोडक्यात, ग्रामीण जीवनातील साधक आणि बाधक (साधक खूप लोकांनी लिहिलंय. सगळ्या दलित लेखकांनी लिहिलंय ते बाधक आहे. कारण आंबेडकरांचंच म्हणणं होतं की, खेडी हे विषमतेचं आगर आहे, त्यामुळे ‘शिका, नोकऱ्या करा आणि शहरात या’ असं ते म्हणत, कारण जोपर्यंत दलित खेड्यात आहेत तोपर्यंत त्यांच्यावरचा शिक्का जाणार नाही.) नेमाड्यांना बऱ्यापैकी कळलेलं आहे. परंतु दलितांचा आणि आंबेडकरवाद्यांचा जो मुद्दा आहे, तो या कादंबरीत तरी आलेला नाही. औरंगाबादची जी पानं आहेत, त्यात एक दलित सुशिक्षित आणि एक दलित प्राध्यापक येतात, ते  ‘झूल’मध्येही होते. अस्पृश्यांचा प्रत्येक गावामध्ये एक मोठा वर्ग होता, त्याची काय अस्मिता होती? एवढा एक भाग सोडला तर बाकीचे गावातले ब्राह्मणांपासून शूद्रांपर्यंतचे वर्ग (मी फुल्यांच्या अर्थाने म्हणतो ‘अस्पृश्य’ या अर्थाने म्हणत नाही.) कष्टकरी, मजूर यांच्या जीवनाचे साधक-बाधक पैलू ‘हिंदू’मध्ये वाचायला मिळतात.

शेवटची जी औरंगाबादची पाने आहेत. तिथे मला नेमाड्यांना मित्र म्हणून एक सल्ला द्यायचा आहे की, ‘बाबा रे हे बंद कर. आपल्याला भेटलेला प्रत्येक माणूस हा कशाचा तरी घाट असतो. (वाङ्‌मयीन अर्थानं) ते घाट जसेच्या तसे वाङ्‌मयात उतरवता आले पाहिजेत, हे नेमाड्यांचं ‘बिढार’च्या पहिल्या भागापासूनचं गिमिक आहे. नेमाडे लिहायला बसतात तेव्हा ते भेटलेल्या व्यक्तिविशेषाचे समूहविशेष करायला जातात. आणि मग त्या समूहाचे सगळे गुणदोष त्या एका व्यक्तीत आणायला जातात. तिथे नेमाड्यांचा क्रूर विनोद जागा होतो. त्यामुळे त्या वाङ्‌मयीन व्यक्ती राहत नाहीत, तर ती जिवंत व्यक्तींची क्रूर विडंबनं होतात. असे उल्लेख नेमाड्यांच्या सगळ्या कादंबऱ्यात विखरून पडलेले आहेत. जशा स्त्रिया नाहीत हा मोठा अवकाश नेमाड्यांनी ‘हिंदू’त भरून काढला, तशी ही विडंबनशैलीही नेमाड्यांनी सोडली असं पहिल्या चारशे पानांत दिसत होतं. सिंदबादचा कुबडा म्हातारा त्याच्या मानगुटीवर बसून राहिला, तशी नेमाड्यांची शैली त्यांना सोडत नाही.

त्यामुळे माझी मनापासून नेमाड्यांना कळकळीची विनंती आहे की, तुम्हाला मराठी वाङ्‌मयामध्ये फार मोठं स्थान आहे, तुम्ही करता ती गोष्ट लोक प्रमाण मानतात, तुमचं दैवतीकरण करणारी जवळपास एक पिढी आहे. त्यांच्यासमोर हे उदाहरण नको. कादंबरीकार म्हणून नेमाड्यांना एवढी मोठी पोझिशन आज मराठी वाङ्‌मयामध्ये आहे. त्यांनी अशी थिल्लर, पोरकट आणि काही वेळेला आचरट अशा पद्धतीची गिमिक्स वापरायची गरज नाही. हे ते जेवढ्या लवकर थांबवतील तेवढे आम्ही त्यांचे आभारी असू, कृतज्ञ असू.’ यात अजून एक गोष्ट सांगायला पाहिजे. ते म्हणजे कादंबरीकाराचा मानवी आयुष्याबद्दलचा जो दृष्टिकोन आहे, तो कसा असावा? मी आधी म्हटलं नेमाड्यांचा कादंबरीकार म्हणून किती विकास झालेला आहे?

नेमाड्यांचे काही आग्रहाचे दुराग्रह आहेत. उदा. त्यांचं मलिक अंबर प्रेम. नेमाडे म्हणतात, ‘मलिक अंबरने महाराष्ट्राला गनिमी कावा शिकवला.’ गनिमी कावा कुणी कुणाला शिकवत नाही, एवढंही अभ्यासू लेखकाला कळू नये? एका विशिष्ट भौगोलिक परिस्थितीत किंवा विशिष्ट संकटाच्या परिस्थितीत जो भूगोल आपल्या वाट्याला आला आहे, त्याचा वापर करून लढण्याची एक शैली तयार होते, त्याला गनिमी कावा म्हणतात! रात्री येणाऱ्या शत्रूला गनीम म्हणायची पद्धत आहे. त्यामुळे आश्चर्यकारक पद्धतीने हल्ला करणारा.

आपल्याला शिवाजी महाराजांच्या इतिहासामुळे वाटतं की, गनिमी काव्यासाठी जंगलच आवश्यक असतं, भुयारंच आवश्यक असतात, खरं म्हणजे तसं काही नाही. ज्या ताकदीविरुद्ध संघर्ष करायचा ती ताकद मोठी आणि आपली शक्ती लहान असते, त्या वेळेला शत्रूशी संघर्ष करायचा नाही; आपल्या वाट्याला जो निसर्ग आलेला आहे, त्याचा वापर करायचा, यासाठी मलिक अंबरचीच काय कोणाचीच गरज नाही. माओची गरज नाही, शिवाजीची गरज नाही, चे गेव्हेराची गरज नाही आणि आणखी जे कुणी असतील त्यांपैकी कुणाचीच गरज नाही. ही मानवी सहज प्रवृत्ती आहे.

उदा. वाळवंटातले लोक काय करतात? सैनिक स्वत:ला वाळूत पुरून घेतात आणि एक गवताची काडी, ज्यातून त्याला श्वासोच्छवास करता येईल ती वाळूच्या वर ठेवतात. शिवाजीच्या पद्धतीने तिथे कुणाला गनिमी कावा सुचणारच नाही. कारण मराठ्यांचा गनिमी कावा म्हणजे जंगले आणि डोंगरदऱ्या पाहिजेत. त्या वाळवंटात कुठून आणायच्या? किंवा दुसरं उदाहरण- आपल्याला जे सबंध इंग्रजी शिक्षण मिळालं, त्याला दोन-चार लाथा झाडणं, (बायरन आणि शेक्सपिअर वाचत बसतो. त्याच्याऐवजी आपलंच आपण का वाचत नाही?) जाता जाता संस्कृत वाङ्‌मयाला शिव्या देणं, त्यानंतर जे जे ब्राह्मणी आहे, जे जे शहरी आहे आणि जे जे पाश्चात्त्य आहे त्याच्या नावाने बोटं मोडणं ही सध्याची पॉप्युलर फॅशन आहे, त्याला नेमाडे बळी पडतात की काय असं काही वेळा वाटतं.

अजून एक शैलीविषयक मुद्दा. थोडीशी नेमाड्यांच्या मनात धास्ती आहे. आपण जे करतोय ते लोकांना समजेल की नाही? त्यामुळे त्यांच्यात थोडे खांडेकर आणि साने गुरुजी डोकवायला लागले आहेत. (हा दोष त्यांच्या आधीच्या कादंबऱ्यांत मला दिसला नव्हता.) मध्ये मध्ये नेमाडे स्वत:ची कादंबरी समजावून देतात. उदा. खंडेरावला तार येते की, तुझे वडील सीरिअस आहेत. त्या वेळेला खंडेरावचे जे उद्‌गार आहेत ते वाचून बघावेत. ते टिपिकल खांडेकरी उद्‌गार आहेत. एखाद्या घटनेवरून तिचं प्रतीक बनवायचं ही खांडेकरी शैली आहे. त्याही वेळेला निरोपाचा क्षण होता, याही वेळेला निरोपाचा क्षण आहे वगैरे.... खांडेकरांची पद्धत अशी होती की, ‘खंडेरावच्या मनात आले की, जीवन हे असेच नसते काय?’ एवढं बाकी नेमाड्यांनी लिहिलं नाही, बाकी तसंच लिहिलं. असं बऱ्याच ठिकाणी आहे. उदा. ‘एवढा मोठा इतिहास कुणाला असतो?’ हे नेमाड्यांच्या नायकानं स्वत: म्हणण्याची गरज नाही. तुमची कादंबरी वाचल्यानंतर ती वाचकांची प्रतिक्रिया असायला पाहिजे. पण इतकं मोठं आपण काहीतरी करायला घेतलंय म्हटल्यावर मनात जी धाकधूक असते, ती हा आमचा मराठी वाङ्‌मयाचा खंदा शिलेदार त्याच्याही मनात आहे की काय असं मला थोडंसं जाणवून गेलं.

अजून एक. नेमाड्यांनीच स्वत: मला असं सांगितलं की, या कादंबरीची पहिली पानं वाचायला तुला जरा अवघड गेली असतील. जाता जाता हेही सांगतो की, ती पहिली पानंच नेमाडे अनेक वर्षं लिहीत होते, हेही त्यांनी मला सांगितलेलं आहे.

एकदा मी त्यांना विचारलं होतं की, ‘केव्हा येणार?’

तेव्हा ते म्हणाले होते की, सुरुवात अजून माझ्या मनासारखी झालेली नाही. माझ्या मते ही सुरुवात इतकी भिकार आहे की, त्याच्यामध्ये अकारण काही जोडाक्षरं आलीत, त्याची काही गरज नव्हती. भाषेचं जे साधारण स्वरूप आहे त्याच्यामध्ये आणि विशेषत: जानपदांच्या भाषेत जोडाक्षरं कमीच असणार! मग ही ग्रांथिक शैली नेमाडे भाषेत कृत्रिम साधन म्हणून आणतात ती का?

नेमाड्यांच्याच भाषेत सांगायचं तर इथं ते रीतिप्रधान झाले. हे त्यांच्या सगळ्या कादंबऱ्यांमध्ये आहे. सुरुवातीचे सात-आठ परिच्छेद आणि शेवटचे सात-आठ परिच्छेद यात एकदम भाषाशैली बदलून टाकायची. माझं म्हणणं असं, नेमाड्यांनी कुठल्याही क्लृप्त्या वापरायची गरज नाही. भाषेची मूलभूत शिस्त आहे, कर्ता, कर्म, क्रियापद. नेमाड्यांना हे ब्राह्मणी म्हणून त्याज्य असेल. पण संतसुद्धा इतकं कॉम्प्लिकेटेड लिहीत नाहीत. तसं लिहीत नव्हते म्हणून ते संत झाले, हेही नेमाड्यांना मान्य व्हावं.

महानुभवांचीसुद्धा अशी शैली नाही. त्यांची तर अजून छोटी- छोटी वाक्यं असतात. (जरी माझं ‘महानुभवांची शैली ही मराठीची मूळ शैली नाही’ असं मत असलं तरी) ही गिमिक्स वापरायची नेमाड्यांना गरज नाही. ‘बसोनि निवांत, शुद्ध करी चित्त, तया सुखा अंतपार नाही,’ असं म्हणणारा तुकाराम तरी नेमाड्यांना मान्य होईल. कोणाचाही राग न करता, कोणाचाही पर्दाफाश न करता अशी उदार वृत्ती धरून नेमाड्यांनी त्यांच्या मनातला हा जो प्रचंड व्यूह आहे तो आमच्यासमोर उलगडावा, अशी माझी त्यांना कळकळीची विनंती आहे.

आता शेवटचा भाग : या कादंबरीतून जे तत्त्वज्ञान सूचित होत आहे, त्याबद्दल मात्र मी साशंक आहे. खंडेरावच्या शेवटच्या डेक्कन कॉलेजमधल्या सादरीकरणात ज्या पद्धतीनं जे तत्त्वज्ञान आलेलं आहे ते तर मला पूर्णपणे अमान्य आहे. इथे मला अजूनही नेमाड्यांच्या मनातले पांडुरंग सांगवीकर, चांगदेव पाटील हे पूर्णपणे गेले आहेत असं वाटत नाहीत. ते जोपर्यंत जात नाहीत, तोपर्यंत नेमाड्यांचा कादंबरीकार म्हणून, विचारवंत म्हणून, (महत्त्वाची कादंबरी आणि तत्त्वज्ञान यांचा संबंध असतोच, त्यामुळे) तत्त्वज्ञ म्हणून विकास होणार नाही. हा माणूस जसा पुन्हा पुन्हा आपल्या जुन्या शैलीच्याच सापळ्यात सापडतोय, तसा ‘कोसला’पासून ते ‘झूल’पर्यंत रसरशीत जीवनाला एक नकार जो आहे आणि ते फक्त आपण लांबून पाहायचं आणि त्याच्यापासून दूर राहण्यामध्ये, ‘बाई हा अवघा डोंगर पोकळ असे, कोणीही तिथे निघणे नेणे-जाणे ना’, ‘जरिला’च्या सुरुवातीला आहे. त्यामुळे हा पोकळ डोंगर आहे, आपण त्यात शिरायचं नाही, म्हणून नेमाड्यांचा नायक आजपर्यंत विवाहित नव्हता.

आता खंडेराव तरी त्याच्या आयुष्याची कहाणी 600 पानांत आपल्याला सांगतोय, त्यात शेवटच्या 200 पानांत त्याच्या लग्नाचा विषय सारखा येतोय. अजूनही त्याचं लग्न झालेलं नाहीच, पण ते अजूनही वाचकाला स्पष्टपणे कळायची सोय नाही. एक गंमतीदार धागा नेमाड्यांनी सोडून दिलाय. खंडेरावचा जो ट्रकवाला मित्र आहे, तो पुण्याला येतो, तो खंडेरावचं सादरीकरण पाहून खूष होतो. त्याला त्यातलं काही कळलं नाही तरी. खंडेराव फाडफाड इंग्रजी बोलला. (आता ही जाणीव ग्रामीण नाही, ती शहरीसुद्धा आहे.) तो म्हणतो, तुझ्या घरून सारखे निरोप आहेत. तुझे वडील नुकतेच गेलेले आहेत (आणि त्यानंतरचं ते ग्रामीण जीवनाचं पारंपरिक, दहा दिवसांचा शोकाचार म्हणू या आपण, त्याचं जे चित्रण आहे ते अप्रतिम आहे.) त्यामुळे लग्न एक वर्षाच्या आत करायला पाहिजे. पण खंडेरावना माहीत आहे, एक वर्षं जर होऊ दिलं नाही तर पुढे तीन वर्षं काही प्रॉब्लेम नाही. तेवढ्या वेळात कदाचित आपली पीएच.डी. होऊन जाईल.

नेमाडे फार बारकाईने लिहितात हेही सांगायला पाहिजे, त्यामुळे काही लूज धागे त्यांनी जाणीवपूर्वक सोडलेले असतात. तो सहज म्हणतो, मी आईला सांगतो, मुली बघायला हरकत नाही, असा शेवट आहे. शेवटून दुसऱ्या पानामध्ये हे सगळं आहे. लग्नाला एवढं महत्त्व का आहे? तर तुम्ही जीवनाचा स्वीकार करता, याचा तो पुरावा असतो. ‘कोसला’मध्येच असं म्हटलेलं आहे की, तुमच्या एका अवयवाला अलंकार नाही. त्याला अलंकार दुसऱ्या अवयवाचाच आहे! ‘कोसला’ येऊन आता 40-45 वर्षं झाली. अजूनही मानवी जीवनाचं आणि त्याच्या संवर्धनाचं हे जे बेसिक मेकॅनिझम आहे, ते नेमाडे स्वीकारत का नाहीत हा यक्षप्रश्न कायम आहे.

वैयक्तिक आयुष्यात नेमाड्यांनी ते स्वीकारलेलं आहे. अत्यंत उत्कटतेनं आणि प्रेमानं त्यांनी आपलं कुटुंब सांभाळलेलं आहे. नेमाड्यांच्या नावावर एकही लफडं नाही, नेमाड्यांनी कुणाचा एक रुपया बुडवला असं मला माहिती नाही, त्यामुळे वैयक्तिक आयुष्य अत्यंत सकारात्मक आहे, होकारात्मक आहे, अत्यंत स्वच्छ आहे. आता नेमाड्यांचा जो मोठा पंथ तयार झाला आहे, तो स्वत: नेमाड्यांनी तयार केला असं मला म्हणता येणारच नाही. त्यांच्याभोवती तो गोळा झालेला आहे. नेमाडे जसे त्यांच्या शैलीच्या सापळ्यात अडकलेले आहेत, तसे या पंथाच्या सापळ्यातही अडकलेले आहेत.

मग या माणसाच्या कादंबरीमध्ये पुन्हा पुन्हा जीवनाला जो नकार दिलेला आहे त्याचं रहस्य काय असावं? हा प्रश्न माझ्या मनात परत परत येतो. त्याची दोन उत्तरं असतील. एक म्हणजे फॅशनेबल नकार असतो. म्हणजे चारचौघांत जरी आपण ते तुच्छ लेखत नसलो तरी वाङ्‌मयामध्ये अशी एक पोझ घ्यायची. म्हणजे अगदी बेताचं जगून उदात्त पोझ जशी घेता येते, तशीच अगदी चांगलं जगून नकारात्मक पोझ घेता येते. याची उदाहरणं मी सांगायला नकोत. इतकी मराठी आणि सगळ्याच वाङ्‌मयात आहेत.

नेमाड्यांच्या एकूण जीवनक्रमात पोझेस खूप आहेत. पण त्या नाटकीपणाने घेतलेल्या वाटत नाहीत. मग हा नकार नेमका येतो कुठून? हे काही मला समजत नाही. उदा. खंडेरावचं शेवटचं सादरीकरण आहे. त्याचा एकूण सूर असा आहे जोपर्यंत मनुष्य आडवा होता आणि त्याला शेपूट होतं, तो चतुष्पाद होता तोपर्यंत त्याची सगळी महत्त्वाची इंद्रियं हल्ला करायला गैरसोयीची होती. शेपूट हेसुद्धा संरक्षण होतं आणि बाकी सगळी इंद्रियं चतुष्पादांच्या आत असल्यामुळे हल्ला करायला गैरसोयीची होती.

मनुष्य उठून उभा राहिला आणि तेव्हापासून तो असुरक्षित झाला. कारण त्याचे डोळे फोडणं सहज शक्य व्हायला लागलं, त्याचं मुंडकं उडवणं सहज शक्य व्हायला लागलं, त्याच्या हृदयाचा वेध घेणं सहज शक्य व्हायला लागलं. हे सगळे सूचक उल्लेख त्यात आहेत. त्यामुळे उत्क्रांतीच्या पहिल्या टप्प्यातच माणूस असुरक्षित झाला आणि त्या असुरक्षितपणामधून तो क्रूर झाला, अशा पद्धतीची मांडणी आहे. आतापर्यंतचं या विषयावरचं जे चिंतन आहे. त्यात सगळे धर्म, सगळ्या उपासना पद्धती, सगळी तत्त्वज्ञानं यांनी माणूस तयार होणं हा नैसर्गिक प्रक्रियेचा एक पराक्रम, निसर्गाच्या उत्क्रांतीतून तयार झालेलं एक सुंदर शिल्प असंच सगळ्यांनी माणसाकडे पाहिलेलं आहे. मात्र हा माणूस क्रूर का होतो, या प्रश्नाचं निर्णायक उत्तर कुणालाही सापडलेलं नाही, सापडेल असं वाटत नाही, मात्र उत्क्रांतीचं महत्त्व कोणीच नाकारलेलं नाही. मग खंडेरावाचं हे नकारात्मक प्रेझेंटेशन कशासाठी? आणि तेही आधी सर्वसामान्य मानव जीवनाच्या ‘समृद्ध अडगळीचं’ अत्यंत रसरशीत चित्र केल्यावर?

पण अजूनही मी अशा सोडलेली नाही. मला वाटतं जी खंडेरावची भूमिका आहे ती नेमाड्यांची नसेल. ज्या ज्या व्यवस्थांमधून आपण जगतो आहोत या सगळ्या उत्क्रांतीमधून निर्माण झालेल्या आहेत आणि त्याशिवाय आपल्याला जगता येत नाही. त्यांच्याबद्दल खंडेराव सूचित करतो, या असुरक्षिततेची भरपाई करायला उत्क्रांतीच्या क्रमातच माणूस जास्त जास्त क्रूर होत चाललेला आहे. आणि तो आता इतर माणसांना तर नष्ट करतोच, इतर जीवनपद्धती तर नष्ट करतोच आहे, परंतु तो संबंध निसर्गालाही नष्ट करायला निघालेला आहे. असा पुन्हा सध्याचा जो फॅशनेबल पर्यावरणवाद आहे तो नेमाड्यांना मांडायचाय का, तो खंडेरावला मांडायचाय का? असाही एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न माझ्या मनात आल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे पेशवाईचा धिक्कार करणं, आंबेडकरवाद्यांचा धिक्कार करणं वा त्यांची टिंगल करणं वा त्यांना अनुल्लेखानं मारणं या सगळ्यांमधून काही साधत नाही.

मुख्य प्रश्न असा आहे की, तुमची जीवनविषयक भूमिका काय? माणसांचा विकास दु:खांवर मात करत करत सुखाच्या दिशेने चाललाय की विनाशाच्या दिशेने चाललाय? माझ्या मते कादंबरीकाराची वृत्ती निराशावादी नसावी, नकारात्मक नसावी. म्हणून मंडी आहे ना ‘हिंदू’तली, तिच्याकडून मी मोठी आशा बाळगून आहे. कदाचित ‘हिंदू’च्या पुढच्या भागात मंडी खंडेरावला योग्य रस्त्यावर आणेल. त्यामुळे खंडेरावचा जीवनविषयक दृष्टिकोन काय आणि तो सकारात्मक आहे की नाही? याचंसुद्धा मला ‘हिंदू’च्या शेवटच्या भागात पुरेसं स्पष्ट उत्तर मिळत नाही. माझं तिकडं लक्ष लागलेलं आहे.

(शब्दांकन : राम जगताप)

Tags: भालचंद्र नेमाडे विनय हर्डीकर राम जगताप हिंदू झूल बिढार कोसला Vinay Hardikar Ram Jagatap Hindu Kosala Bhalchandra Nemade vinay hardikar on hindu vinay hardikar on bhalchandra nemade विनय हर्डीकर हिंदू भालचंद्र नेमाडे weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

विनय हर्डीकर,  पुणे
vinay.freedom@gmail.com

पत्रकार, समीक्षक, प्राध्यापक, शास्त्रीय संगीताचे जाणकार, मर्ढेकर-शेक्स्पिअर यांचे अभ्यासक, सामाजिक कार्यकर्ते, गिर्यारोहक आणि वक्ते


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके