डिजिटल अर्काईव्ह

आंतर भारती आणि बाल आनंद महोत्सव

आपण कॉमिक्स पहातो त्या गोष्टी- गोष्टीतून चित्ररूपाने सादर केलेल्या असतात. शब्द विभागात नेमकी ह्याच्या उलट दिशेने वाटचाल होते. म्हणजे मूल विविध प्रकारच्या मासिकां साप्ताहिकांतून अनेक चित्रे कापून ती विशिष्ट प्रकार मांडून गोष्ट तयार करून लिहिते त्याला आपण चित्र कथा म्हणू! हस्तलिखित वृत्तपत्र काढणे हे येथील काम एका समूहाचे गटाचे काम असते. शब्दांना फुलोरा देण्यासाठी चित्र-रंग-सजावट. कथाकथन विभाग: शब्दाचा पूर्ण वापर संवाद- भाषणात होतो, तसाच कथाकथनात होतो.

माणसा- माणसातील नाती माणूसपणाची रहावी. एका माणसाने दुसऱ्या माणसाला माणसासारखे वागवावे. धर्म, वर्ण, देश, भाषा या मुखवट्यांवरून माणसाची पारख करू नये असे विश्व निर्माण व्हावे ही रवींद्रनाथ ठाकूरांची प्रेरणा, त्यातून साऱ्या विश्वभराची एकता साधावी हे साध्य, असे एक स्वप्न विश्व भारतीच्या रूपात रवींद्रनाथांनी पाहिले. त्या स्वप्नाला वास्तवात आणण्याची धडपड साने गुरुजींनी सुरू केली. त्या त्याच्या कृतीतून आंतर भारतीची निर्मिती झाली. माणसा- माणसातील नात्यात बंड करणाऱ्या भिंती आहेत. हे सत्य. त्याची जाणीव झाली तर त्या मोडण्याची प्रेरणा होईल. या भिंती मोडण्यासाठी प्रयत्न करणारी ताकद म्हणजे आंतर भारती! 

आंतर भारतीचे संस्थापक साने गुरुजी आणि लहान मुले ह्यांचा घनिष्ठ संबंध आहे. साने गुरुजी म्हणत, “करी मनोरंजन जो मुलांचे, जडेल नाते प्रभूशी तयाचे” ती त्यांच्या आयुष्याची निष्ठा होती. मुलांबद्दल त्यांना अपरंपार आपुलकी होती. आपल्या जीवनातील सर्व सुकोमल भावनांना एकत्र करून त्यांनी मुलांकरिता साहित्य लिहिले तरीही ते म्हणत की- मी शब्दांच्या नव्हे झाडूच्या लालित्याचा उपासक आहे. आपले जीवन कृतिशील होण्याची प्रेरणा मुलांना मिळावी म्हणून ते तळमळत. बालकांच्या जीवनातील सुप्त कल्याणकारी गुण पूर्ण ताकदीने प्रगट व्हावेत, यासाठी साने गुरुजींनी आपले आयुष्य वेचले. त्यांच्या सहवासात मुळे स्वतःचे आकार, रंग आणि गंध घेऊन पूर्णपणे उमलत असत. असा मुक्तपणे उमलण्याचा अनुभव देण्याचा प्रयत्न म्हणजे आंतर भारती बाल आनंद महोत्सव. 

महोत्सवाचा दुहेरी हेतु
आंतर भारती बाल आनंद महोत्सवात दोन प्रधान हेतुंची गुंफण केली आहे. एक म्हणजे बालकांचे उन्मीलन होऊन आपल्या देशातील दूर भागातल्या दुसऱ्या बालकाशी ओळख होणे, आणि दुसरा म्हणजे औपचारिक स्वशिक्षण. त्यासाठी बाल आनंद महोत्सवाची प्रमुख दोन अंगे आहेत. एक अंग गावभर विखुरलेले! परगावाहून आलेली मुले स्थानिक गावातील वेगवेगळ्या परिवारांमध्ये रहातात. परिवाराकडून पाहुण्या-मुलाचे आपुलकीने स्वागत होते. पाहुण्याला घरी घेत असता जात, धर्म, भाषा, प्रांत, गरीब- श्रीमंत, ग्रामीण- नागरी, मुलगा मुलगी असे भेद बाळगले जात नाहीत. 8 ते 12 या वयोगटातील मुले सहसा एकटी अगर गटाने पालकांशिवाय बाहेरगावी जात नाहीत. त्यातून गेलोच तर ती अनोळखी भाषेच्या प्रदेशात, अनोळखी माणसांच्या घरात पाहुणी म्हणून जात नाहीत. परंतु बाल आनंद महोत्सवामुळे असे करण्यास त्याला संधी मिळते. अशा मुलांचे आतिथ्य करण्याची संधीही स्थानिक रहिवाशांना मिळते. त्यातून अनोळखी व्यक्तींची ओळख होते, स्नेह, जिव्हाळा, आपुलकी ह्यांच्या अदृश्य बंधनातून व्यक्तिव्यक्ती बांधल्या जातात. भावनिक एकतेची सुरुवात अशी होते! महोत्सवाचा हेतू म्हणजे भिन्न भाषा, राज्य, धर्म, जाती यातील माणसे एकत्र यावीत, त्यांनी आपापल्या संस्कृती, रोतींची ओळख सहज करून घ्यावी व त्यातून शिक्षण घ्यावे हा.

अशा व्यापक उद्देशाबरोबरच, वैयक्तिक पातळीवरही- बाल आनंद महोत्सवातून बालकाच्या भावजीवन, विचारजीवन तसेच कृतिशील जीवनाच्या विविध अंगांना स्पर्शून त्यांना चेतना देणे हा उद्देश आहे. नवीन गतिशील समाजात निर्मितीक्षम, चैतन्यदायी, भविष्याचे संतुलित वेध घेऊ शकेल असा माणूस बनण्याची प्रेरणा बालकांमध्ये निर्माण करण्याचा हा एक विनम्र प्रयत्न! एकात्म भारताचे स्वप्न तेव्हाच पूर्ण होईल जेव्हा आपुलकी, बंधुभाव, व राष्ट्रीय जाणीव ह्यांचा संस्कार लहानपणापासूनच मुलांवर होईल. 

मुक्त वातावरणात स्वशिक्षण
प्रचलित शिक्षणपद्धतीत असा संस्कार विद्यार्थ्यांना कितपत मिळतो? जडबंबाळ अभ्यासक्रम, एका शिक्षकामागे अनेक विद्यार्थी, वाढती स्पर्धा, अशा कारणामुळे विद्यार्थ्याला मिळते ते गोळीबंद शिक्षण, चमच्याने भरवल्यासारखे. हे शिक्षण विद्यार्थ्याला विशिष्ट कल्पनांचे, शब्दांचे गुलाम करून टाकते, त्याची स्वतःची कल्पनाशक्ती कुंठित करते. त्यातून बनतो- एक कळाहीन स्वतंत्र अभिव्यक्ती नसलेला मेणचट पुतळा आपला भावी नागरिक!- जो नवी आव्हाने पेलू शकत नाही, सुरम्य भविष्याची स्वप्ने बघू शकत नाही, कूपमंडूक वृत्ती धारण करतो. ही प्रवृत्ती असलेला माणूस स्वतःची उंची वाढवण्यासाठी दुसऱ्याची मुंडी तोडायला कमी करत नाही! आपल्याला आपणहून मोठं, स्वावलंबी व्हायला हवं, असा विचार मनातून येण्यासाठी हवी प्रेरणा स्वतःची सुप्त शक्ती जागविण्याची, स्वकर्तृत्वावर विश्वास असण्याची, स्वतःचे गुण सामर्थ्य अजमावण्याची संधी! अशी संधी धाकदपटशा असलेल्या भीतियुक्त चाकोरीतल्या वातावरणात मिळत नाही. बाल आनंद महोत्सवात निर्मितीला आवाहन करील असे वातावरण असते. त्याकरता मोकळ्या आवारात मंडप, शामियाने, तंबू, राहुट्यांचा उपयोग केला जातो, शक्य तेथे निसर्गदत्त झाडांच्या सावल्या, आडोशे यांचा उपयोग करून घेतला जातो.

पुरेसा उजेड, पुरेशी छाया, खेळती हवा, बोजड न वाटणारा निवारा, अशी सजावट. त्या आल्हाददायक वातावरणात महोत्सवातील बालक स्वतःच्या सुप्त गुणांचे प्रगटीकरण करतात. त्यासाठी संगीत, नृत्य, शिल्प, विज्ञान, खेळणी, कथाकथन, शब्द-अशी विविध माध्यमे पुरविली जातात. त्याचबरोबर मनोरंजन व ज्ञान संपादन यासाठी चित्रपट, नाटक, वाचनालय, कठपुतली, डमी बैंक, उद्योग उत्पादन, प्रदर्शनी असे विभाग बाल- महोत्सवात असतात. चित्र विभाग: भिंतीवर रेघोट्या ओढणारे मूल चित्रच काढते. त्यात पुढे सफाई, नेमकेपणा आला की आपण त्याला चित्र म्हणतो. त्रिकोणी डोंगर, उगवता सूर्य, चार चे पक्षी, नारळाचे झाड, वेडावाकडा ( पण इंग्रजी एस असा ) ओढा कागदावर पेन्सिलीने मुलाने काढला की शिक्षक-पालक सर्वांनाचा संतोष वाटतो! ह्यातूनच मूल कल्पनांचे गुलाम बनते! खरं तर प्रत्येक व्यक्तीनं केव्हाही, कुठेही. कसंही काढलेलं चित्र हे त्याचं स्वतःचं सर्जन असतं, असायला हवं. ही संधी बालमहोत्सवाच्या चित्र विभागात मिळते. तिथं विषय दिला जात नाही, स्पर्धा घेतली जात नाही, किंवा अमुकच कर आणि असंच कर असेही म्हटले जात नाही.

मुलाला आपण काय काढावे? असा विचार करावा लागतो. विचार आणि भोवतालचे वातावरण यातून मूल नवीन निर्मिती करते- आपल्या सृजनात्मक शक्तीची जाणीव स्वतःस करून देते. तेथील स्वयंसेवक माध्यमाच्या वापराबद्दल आवश्यक असेल तर सहाय्य करण्यास तत्पर असतातच, चित्र विभागात चारकोल, मेणाचे खडू, जलरंग, स्प्रेवर्क, दोरे-ठसे, पेस्टिग-कोलाज, खडू-फळा, रांगोळी, असे विविध प्रकार असतात. त्याचबरोबर 10-12 मुलामुलींच्या गटाला समूह-चित्र काढण्यासाठी मोठे कागदही दिले जातात.

शिल्प विभाग: चित्र विभागात मुलं-मुली एका सपाट पातळीवर आकृती रेखाटत- रंगवत असतात. शिल्प विभागात खोली किंवा उंचीची एक नवीन दिशा मिळते. त्यातून पुन्हा सृजनाला एक नवीन आवाहन मिळते. त्यासाठी चिकणमाती, शाडूमाती, कागदाचा लगदा, चिंध्या, रंगीबेरंगी कागद, कापूस अशा वस्तूंचा उपयोग केला जातो. प्लॅस्टर ऑफ पॅरिसचे तुकडे, खडूचे तुकडे, ह्यांच्यातील आकार आकृतींचा वेध घेऊन त्या प्रकट करणे, हेही सृजनशीलतेचे लक्षण आहे. माती, तार, कागद, फाईल्स, दगड-गोटे, बांबू, चट्टया, कामट्या अशा वस्तूंच्या वापरातून बनणारी शिल्पवस्तु भरीव किंवा पोकळ, चल किंवा अचल असू शकेल. 

संगीत विभाग: मुलाने काढलेले चित्र त्याचे स्वतःचे असतं, शिल्पही त्याचं स्वत:चं असतं! त्याचप्रमाणे प्रत्येकास स्वतःचे सूर, लय, ताल असतात. हे गृहीत धरून बाल महोत्सवातला संगीत विभाग सजवलेला असतो. लेबी पियानो, जल-तरंग, ढोलकं, खंजिरी, मंजिरी, डफ, हार्मोनियम, घुंगरूं, बुलबुलतरंग, बासरी अशा विविध वाद्यांचा गट. मुलां-मुलींच्या गटाने आपापली वाद्ये निवडली की कोणीतरी आपली लय तालबद्ध करतो, त्या लयीत, त्या तालात मग बाकीचे आपापल्या हातीच्या वाद्यांचे सूर घेऊन सामील होतात. सुरुवातीला गलबला वाटतो परंतु गटातील मुले आपापले वाद्य, सूर, तान यांच्या जागा हेरून त्यावेळी आवाज करून, संबद्ध असा संगीताचा एक ताफा पेश झालेला जाणवतो. आपल्याला काही जागा आहे. काही स्थान आहे, त्यातून एक एकसंघ परिणाम निर्माण करता येतो, ह्याची जाणीव संगीत विभागात होत जाते. अशा प्रकारच्या ऑर्केस्ट्राबरोबर कोणी गाणे म्हणू शकते. कोणी स्वतंत्रपणेही आपले संगीत पेश करू शकते. वर सांगितलेल्या वाद्यांबरोबरच सहज हाताळता येतील अशी इतर वाद्य संगीत विभागात असतात.

नृत्य विभाग: प्रत्येकाच्या शरीरात लय, ताल आणि शारिरीक हालचाल करण्याची कुवत आहे तोपर्यंत नृत्य हा शरीराचा एक अविभाज्य भाग बनून रहातो. एखादे गाणे ऐकल्यावर आपणही पायाने, मानेने वा हाताने ‘नृत्य’ करू लागतो. आपल्याकडे सुशिक्षित वर्गात नृत्य करणे हे अडाणीपणाचे लक्षण समजले जाते. क्वचित त्यामुळेच रोंबा सोंबा, टिवूस्ट, डिस्को हे नृत्य प्रकार एकदम उसळी मारून पुढे आल्यासारखे सध्या दिसतात. महाराष्ट्राचे लेझीम- नृत्य, गुजरातचा गरबा, पंजाबचा भांगडा हे लोकजीवनाचे अंग आहे. त्यातील आनंद उत्कंठा लयकारी समजून येण्यासाठी त्यात प्रत्यक्ष सहभाग हवा. तो बाल महोत्सवाच्या नृत्य विभागात मिळतो. या विभागात वैयक्तिक नर्तनासही पूर्ण वाव दिला जातो. सामूहिक नृत्यातून समूहाची जाण व्हायला सहाय्य व्हावे ही आशा. नाट्य विभाग: लहान मुलांच्या नकलांमधून त्यांच्यतले नाट्य दिसते. एखाद्या प्रसंगाचे निरीक्षण, वाचन-मनन आणि एक्सप्रेशन यातून दुसऱ्याच्या जागी स्वतःला कल्पून तो अनुभव घेऊ शकतो. 

शब्द विभाग: या विभागाचे माध्यम शब्द! शब्द वापरातून निर्माण झालेली कुठलीही गोष्ट ही ह्या विभागातील कलाकृती मग ती कथा- कविता असो की संवाद अगर विनोद असो, व्यंगचित्रांना शब्दांची जोड देऊनही येथे कलाकृती निर्माण करता येते. येथे निर्माणाचे माध्यम शब्द, त्यामुळे प्रेरणा चित्रासारख्या माध्यमाद्वारे दिल्या जातात. आपण कॉमिक्स पहातो त्या गोष्टी- गोष्टीतून चित्ररूपाने सादर केलेल्या असतात. शब्द विभागात नेमकी ह्याच्या उलट दिशेने वाटचाल होते. म्हणजे मूल विविध प्रकारच्या मासिकां साप्ताहिकांतून अनेक चित्रे कापून ती विशिष्ट प्रकार मांडून गोष्ट तयार करून लिहिते त्याला आपण चित्र कथा म्हणू! हस्तलिखित वृत्तपत्र काढणे हे येथील काम एका समूहाचे गटाचे काम असते. शब्दांना फुलोरा देण्यासाठी चित्र-रंग-सजावट. कथाकथन विभाग: शब्दाचा पूर्ण वापर संवाद- भाषणात होतो, तसाच कथाकथनात होतो. कथा- गोष्ट- घटना सांगत असताना आपण नाटक-भाषण-संवाद-शारिरीक हालचाली अशा गोष्टींचा अंतर्भाव करतो. म्हणजे कथाकथन हा एकपात्री नाटकाचा प्रयोग आहे. असे म्हणता येईल. ह्या विभागाला भाषेची मर्यादा पडते. कथा सांगणारा व ऐकणारे ह्यांची भाषा एक असावी लागते. मुलं येथे कथा सांगूही शकतात तसेच ऐकूही शकतात. गोष्टी ऐकायला तर सर्वांनाच आवडतात!

वाचनालय: सुप्त शक्तींचे प्रकटीकरण व्हावे, तसेच या शक्तींच्या प्रगटीकरणाला सामर्थ्य देण्यासाठी नवीन अनुभव घेण्याचीही पात्रता बालकांच्या अंगी यावी असाही हेतू आहे म्हणून वाचनालय! बाल महोत्सवात भिन्न भाषी मुले-मुली असतात, त्या सर्वांसाठी वाचनालय कक्ष विविध प्रकारच्या पुस्तकांनी परिपूर्ण केला जातो. त्यात कथा कादंबरी, कॉमिक्स, चरित्रे, अशी असंख्य पुस्तके असतात. सर्वसाधारणपणे ह्या कक्षात एकूण संख्येच्या 12 ते 15 टक्के मुले-मुली एकावेळी असतात! 

चित्रपट: पुस्तकाच्या वाचनातून मिळणारा एकट्यापुरता मानसिक अनुभव येथे सामूहिक केला जातो. स्थलकालाचा कशाही प्रकारे संकोच करू शकणारे असे हे प्रभावी दृक्क- श्राव्य माध्यम! बाल महोत्सवात मुलांना मुलांसाठी बनविलेले पूर्ण लांबीचे चित्रपट व दर्जेदार शॉर्ट फिल्म्स् दाखविल्या जातात ज्या बाहेर सहसा पहावयास मिळत नाहीत. चित्रपट हे एक शिक्षणाचे माध्यमच आहे.

स्लाइड शो: हेही चित्रपटासारखेच सामूहिक अनुभव देणारे माध्यम. ह्यातील चित्र तेच ठेऊन सांगण्याची पद्धत अगर भाषा उपस्थित प्रेक्षकानुरूप बदलता येते. चंचलिका चित्रपट स्लाइड शोसारखेच अजून एक दृक- श्राव्य माध्यम म्हणजे चंचलिका किंवा कठपुतळी! सपाट पडद्यावरची हालणारी किंवा स्थिर चित्रे याचा दृक प्रत्यय येथे हालणाऱ्या निर्जीव बाहुल्यांमधून दिसतो. सोबत निवेदक कथा सांगतो, गाणी म्हणतो, संगीत वाजवतो. ज्ञान व मनोरंजनाचा मिलाफ करणारे हे एक माध्यम बाल महोत्सवात कठपुतळीचा खेळ पाहून मुलांनी समाधान मानावे एवढ्यावरच ह्या कक्षाचे काम संपत नाही, तर मुलांनी कठपुतळ्या बनवाव्यात, नाचवाव्यात, हातमोजाच्या कठपुतलीचे खेळ वाटावेत, आपल्या स्वतःच्या नवीन कथा बनवाव्यात, गाणी जमवावी, वाद्ये वाजवावी व कलानंद लुटावा, ही देखील अपेक्षा आहे. 

विज्ञान कक्ष: काय? कोठे? केव्हा? कसे? का? ह्या प्रश्नांची एखाद्या संदर्भात उत्तरे मिळवणे म्हणजे विज्ञान. विज्ञानाची निर्मिती भोवतालच्या परिसरातूनच झाली. ती निर्मितीची प्रक्रिया बाल महोत्सवातील विज्ञान विभागात मुलांच्या अनुभवास येईल अशी विज्ञान-कक्षाची मांडणी. स्वतःहून करून पहाण्याच्या प्रयोगांबरोबरच, काही बवण्याचे प्रयोग, तसेच चल व अचल मॉडेल्स येथे असतात.

खेळविभाग: कल्पना, विचार, नवनिर्मिती ह्या सर्वांना संधी मिळणाऱ्या इतर विभागांत जाऊन शिणवटा आल्यावर तो घालवून मनाला विरंगुळा वाटावा, सामूहिक जाणीव निर्माण व्हावी म्हणून बाल महोत्सवात मुलामुलींना विविध प्रकारच्या खेळांची साधने पुरवली जातात. मुलांना काही नवीन खेळ शिकायला मिळतात. खेळाचे दोन प्रकार पाडले जातात घरगुती व मैदानी. 

खेळणी: बाळ महोत्सवात, 8 ते 12 ह्या वयोगटातील मुला मुलींच्या हालचालींना, बुद्धीला आवाहन करतील अशी खेळणी येथे ठेवली जातात. काही यांत्रिक तर काही स्थिर! काही वैयक्तिक खेळायची, तर काही गटागटाने!

टेन्ट ऑफ नॉनसेन्स: ह्या विभागात काहीही ‘नॉनसेन्स’ करायला पूर्ण मुभा असते. अनुभव असा आहे की ‘नॉनसेन्स’ करता करता मुलं थकून ‘सेन्स’च करतात! ह्याशिवाय स्थानिक सोयींनुसार, गरजेनुसार फनी गेम्स, कचऱ्यातून कला, डमी बँक, उद्योग उत्पादन कक्ष, विविध प्रदर्शनी ओरीगामी, खटपटवर, डमी पोस्ट, स्टेज ॲक्टिव्हिटी असे अन्य उपक्रमही असतात. बाल आनंद महोत्सवात भाग घेतलेले मूल स्वतःची जाणीव होऊन बाहेर पडते, स्वतःबरोबर इतरांचाही विचार करायला लागते, भोवतालच्या घटनांकडे जागरूकतेने पहाते, तसेच या कार्यक्रमातून आपले नवीन मित्र-नाती निर्माण करते!

Tags: Sane guruji Ravindranathji Chitr Vibhag Shilp Vibhag Sangeet Vibhag Naty Vibhag Shabd Vibhag Kathakathan Vibhag Vachnalay Chitrapat Slide Show Vidnyan Kaksha Khel Vibhag Khelni Tent Of Nonsense Baal Anand Mohotsv साने गुरुजी रविंद्रनाथजी चित्र विभाग शिल्प विभाग संगीत विभाग नाट्य विभाग शब्द विभाग कथाकथन विभाग वाचनालय चित्रपट स्लाइड शो विज्ञान कक्ष खेळविभाग खेळणी टेन्ट ऑफ नॉनसेन्स बाल आनंद महोत्सव weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक




साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 1300, 2500, 3600 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख 2008-2025

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1948-2007

सर्व पहा

जाहिरात

देणगी