डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

चेतन भगतला आजच्या तरुणपिढीचा प्रतिनिधी म्हणून ओळखले जाते. तो आयआयटी आणि आयआयएम या नामांकित संस्थांतून पासआऊट झाला असून, काही काळ सिंगापूर इथे इनव्हेस्टमेंट बँकर होता. त्याची आतापर्यंत चार पुस्तके प्रकाशित झाली असून, आजही सर्वांतजास्त खपणाऱ्या पुस्तकांत ती आघाडीवर आहेत. अलीकडेच तो नोकरी सोडून भारतात परतआला असून पूर्ण वेळ लिखाणास देत आहे. त्याच्या Five point someone या पुस्तकावर आधारित कथा असलेला ‘थ्री इडियट्‌स’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे.

हाय चेतन!  

खरे तर, तुला पत्र लिहिणार नव्हतोच.  तुझे पुस्तक आवडले असे सांगणारे एखादे ट्वीट टाकणार होतो. तेवढे बास झाले असते. पण मला जे बोलायचं आहे ते 140 अक्षरांमध्ये मावणार नाही, म्हणून हा पत्रप्रपंच. खरे तर बरोबर दोन वर्षांपूर्वी एका लेखातून तुझी मला ओळख झाली, आणि तेव्हापासून आजपर्यंत मी तुझा फॅन होतो, आहे; कदाचित राहीनही! आणि अर्थातच, तुझी सगळी पुस्तकेही वाचलेली आहेत. त्या अनुषंगानेच आज तुझ्याशी बोलणार आहे.

सांगायची गोष्ट अशी, की नुकतेच तुझे चौथे पुस्तक ‘2 States’ वाचले. लग्नाची गोष्ट तू छान सांगितली आहेस. त्यात, स्वत:चीच कहाणी असल्याने नीट एक्सप्रेस झाली आहे. लोकांना ही कहाणी आवडणार हे नक्की, त्याबद्दल तुझे आधीच अभिनंदन! पण, खरे सांगू, एक पुस्तक म्हणून मला ते अजिबातच आवडले नाही. तुझे हे पुस्तक म्हणजे एका चित्रपटाची पटकथा आहे फक्त! आणि ते बाड तू डायरेक्टरला द्यायच्या आधी आमच्या तोंडावर मारलेले आहेस, इतकेच!  अर्थात, त्यावर चित्रपट निघेलच! पण मित्रा, पुस्तकावर चित्रपट निघणे वेगळे आणि चित्रपटाची स्टोरी पुस्तक म्हणून विकणे वेगळे. अगदी प्रसंग, पात्र रचनाही तशीच आहे रे, चित्रपटासारखी... तुला हे माहीत असेलच, की अशा love story कोपऱ्या कोपऱ्यावर घडतात.  पडद्यावर त्या Time Pass म्हणून तीन तास बघणे वेगळे;  पण वेळ काढून पुस्तकातही तेच वाचण्यात काय अर्थ आहे? चार चित्रपट एकत्र केले, की झाले तुझे पुस्तक. मी अशी स्टोरी लिहिण्याबद्दल म्हणत नाही आहे, ती लिहावीच. पण ती ज्या प्रकारे लिहिलेली आहे, त्यात ज्या प्रकारचा मसाला जाणूनबुजून भरला आहे, ते मला खटकले.

खरेतर, तू आम्हा तरुणाईला आवडलेलास, आवडतोस ते तुझ्या गोष्ट सांगायच्या कौशल्याने; साध्या आणि fuck, suck वाल्या तरुणाईच्या भाषेने, विषयातल्या वेगळेपणामुळे! गेल्या तीन पुस्तकांत तू एकच गोष्ट सांगितलीस. तीन मित्र, एखादा बाबा-बुवा व घडणारा प्रसंग.  अगदी ‘फाईव्ह पॉइंट समवन’मधला Rhyn असो, कॉल सेंटरच्या स्टोरीमधले लोक असोत; किंवा मग गोविंदची कहाणी. तेच घडले ना तिन्ही कथेत? सगळे जगावेगळे करायला गेले, पण त्यांना जमेना. मग कधी देव आला तर कधी आपलाच आतला आवाज. मग ते सुधारले आणि मग नेहमीप्रमाणे Happy Ending. एखादी लवस्टोरी, एखादा अँडल्ट परिच्छेद. असो. पण आम्ही ती पुस्तके वाचली, डोक्यावर घेतली, आजही ती तिन्ही पुस्तके बेस्टसेलरच्या यादीतून खाली आलेली नाहीत. असे झाले, कारण तू कथेच्या पार्श्वभूमी बदलल्यास; थोडेफार नवे विश्व उलगडवलेस, आम्हांला गुंतवलेस. ते आम्हांला आवडले. पण, खरे सांगू, दर पुस्तकामध्ये तुझी लिखाणाची पातळी घसरत गेली. आता त्या C- Word, F-words वाल्या भाषेचेही काही नावीन्य उरलेले नाही. नवीनता हरवली आहे आणि तुझ्या कहाण्यांत जो बदल व्हायला हवा, तोही दिसत नाही. चौथ्या पुस्तकात तर तू फक्त चार चित्रपटांच्या पटकथा एकत्र केल्या आहेस. खरेतर एक Message  द्यायचा तू थोडाफार प्रयत्न केला आहेस; पण तो मेसेज अजून तुलाच समजलेला नाही,  हे लगेच कळते. मग कशाला हा अट्टहास? चेतन, हे असे का?

यावर तुझं MBA style उत्तर मला मिळेल. ‘‘मी लोकांना जे आवडेल ते देतो. वाचकांची पातळी घसरली, म्हणून मग मीही घसरलो.’’ बरोबर आहे, रसिकतेचे अवमूल्यन तर सगळीकडेच झाले आहे. पण चेतन, त्याला बदलायची ताकद तुझ्यात आहे रे. आज ‘चेतन भगत’ हा एक ब्रँड झाला आहे. मी हे पत्र अरविंद अडिगाला का लिहिले नाही? नाही लिहिणार, कारण अभिरुची बदलायची ताकद तुझ्यात आहे, त्याच्यात नाही! आज ‘चेतनचे पुस्तक’ लोक आतले मटेरियल न बघता विकत घेतात. एवढा लोकांचा विश्वास तुझ्यावर आहे. मग तू लोकांना बदलवू शकत नाहीस का? तू म्हणतोस, ‘मला नव्या भारताचा घटक बनायचे आहे, तो घडवायचा आहे.’  मग आपली कथा सांगायची ताकद तू त्यासाठी का वापरत नाहीस? अशाच एखाद्या कहाणीतून तू तुला समजलेला, भावलेला आणि तरुण जनतेला उपमुक्त विचार- भावना लोकांच्या गळी उतरवू शकत नाहीस का? तसा प्रयत्न तू केलास थोडासा.  पण त्यातून message तर गेला नाहीच; पण कथाच कोसळली. तू एखादी चिरंतन कथा सांगू  शकशील का रे? आज आम्ही तुझ्या गोष्टी वाचतो; पण आठवडाभराने त्यातली पात्रेही लक्षात राहत नाहीत. तरुणांना आवडणारे लिखाण म्हणजे ‘बुक व्हॅल्यू नसलेले, चार दिवसांत विसरले जाणारे लिखाण’, असा समज यामधून होणार नाही का रे? मग तुझी ती स्टोरी आठवायला पुन्हा चित्रपटाला जायचे. (थ्री इडियटस, हॅलो.) आम्ही तुझ्याकडून जरा चांगल्या, मनाच्या कोपऱ्यात कायम टिकून राहील अशा लिखाणाची अपेक्षाच ठेवायची नाही का? एकदा सांग बाबा या प्रश्नाचे उत्तर...

तू चित्रपट लिही रे, जरूर लिही.  200 रुपयांचे तिकीट काढून आम्ही ते पाहू की!  पण मनोरंजनाला जीवनात दुय्मम स्थान आहे. ते साधन आहे साध्य नव्हे! तुझ्या स्वत:च्या शैलीत तू या आयुष्यातल्या ध्येयासंबंधी, ते पूर्ण करतानाच्या थराराविषयी, जीवनातल्या निखळ आनंदाविषयी कधी लिहिणार? कॉल सेंटर्सचे कृत्रिम जग किंवा अकल्पित घटनांनी भरलेली ‘लव्ह स्टोरी’ असेच काहीसे तुझे पुढचे लेखन असणार का? आम्हांला तुझ्याकडून नवे, चांगले वाचायचेय. आजचा तरुण ध्येयहीन झाला आहे. त्याला कसलीच इच्छा नाही. प्रयत्नातला आनंदच तो विसरला आहे. त्यांना हे सगळे कळले पाहिजे आणि ते फक्त तूच सांगू शकतोस! भारतीय राज्यकर्त्यांनी देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी ज्या संस्था काढल्या, त्या दोन्ही संस्थांचा तू प्रतिनिधी आहेस. तुला स्वत:ला व्यक्त करायची ताकद आहे, ती इथे वापर ना! पोटापाण्यासाठी चित्रपट लिहिणे वेगळे आणि आपली लेखणी त्यासाठी खर्ची घालवणे वेगळे. या चित्रपटांतून बाहेर ये, काहीतरी Quality Classic दे! आम्हांला नवी उमेद दे.  सांग आम्हांला काहीतरी आणि हे तूच सांगू शकतोस. अगदी साधीसाधी गोष्ट तू आमच्या मनात बिंबवू शकतोस, कारण...Young India loves to hear you.

मी तुझा ट्वीटरवरचा फॉलोअर आहे. तुला माहिती नसेलही; पण तुझे ट्वीट आठवणीने वाचतो. पण MNSवर केलेलेsucks, fucks सारखे ट्वीटस्‌ वाचून हळहळतो रे! आमचा हिरो वैचारिकरित्या इतका अस्थिर, अनस्टेबल आहे का? तुझ्या चार पुस्तकांत एक बऱ्यापैकी सारखेपण आहे, ते म्हणजे तुझे सगळे नायक सिस्टीमच्या विरोधात जातात! बरोबर आहे, हा विचार तू देऊ इच्छितोस; पण प्रत्येक जण त्यात हरतो आणि कोणती तरी तिसरी व्यक्ती त्याला मदत करते. आजची पिढी अशी आहे का रे? हे असे चित्र का रंगवायचे? आणि असेल तर बदलायला नको का? तुझे सारे Tweet आणि TOI मधला लेखही भाषिक अस्मितेच्या वादात नव्या पुस्तकाची पोळी भाजून घ्यायचा प्रकार तर नाही? हा पण IIT चा भाग तर नाही ना?

मी खूप बोलतोय, मला माहीत आहे, यातले बरेचसे चुकीचेही असेल! कारण, माझी कुवत कमी असायचीही शक्यता आहे. खरे तर हे सगळे माझ्या अपेक्षाभंगातून आलेले आहे. पत्र लिहिण्याइतकी आत्मियताही कुठून आली ते माहीत नाही. कदाचित मी पण IIT त जायचे स्वप्न पाहतोय, म्हणून आली असेल. मी पण गोंधळलेलो आहे. तुझ्याकडून अशी अपेक्षा ठेवावी की नाही, माझ्या हिरोला मी असे खडे बोल सुनवावेत का? नाहीतर, अशा Movie Style पुस्तकात message शोधत बसावे का? नाहीतर ‘असा मेसेज वगैरे काही नसतो, असा दिशा देणारा कोण नसतो, लिखाण फक्त मनोरंजनासाठी असते, निदान तुझे तरी तसे आहे’ असे समजायचे का? सांग रे, यंग इंडिया जाऊ देत, निदान I want to hear from my Idol. असो,जास्त बोलत नाही. फक्त एवढेच की,

I am waiting…

तुझा फॅन,

विनायक पाचलग

 

(दहावीला 96 टक्के गुण मिळविणारा विनायक पाचलग, कोल्हापूर येथील विवेकानंद महाविद्यालयात 12वी सायन्सची परीक्षा देणार असून,आय.आय.टी.ला जाण्याचे स्वप्न उराशी बाळगून आहे.)

Tags: चाहता वाचक.  नापसंती चित्रपट पटकथा टू स्टेटस टिप्पणी तरूण लेखक लेखक अपेक्षाभंग टीका चेतन भगत विनायक पाचलग No Messge 2 States Young Author Book Writer critic on chetan bhagat Criticism chetan Bhagat Vinayak Pachlag weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

विनायक पाचलग
vinayakpachalag@gmailcom


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके