मला कोठेच कोणाच्या भावना भडकवायच्या नव्हत्या. मला चर्चेचा केंद्रबिंदू व्हायचं नव्हतं. फक्त जे वाचलंय, बघितलंय, जगलोय आणि अनुभवलंय त्याला योग्य शब्दांत न्याय मात्र नक्कीच द्यायचा होता. वास्तव सोप्या आणि प्रभावी शब्दांत, लोकांना रुचेल-पटेल अशा रीतीने मांडायचं होतं. परिस्थिती कोणाला व्हिलन बनवते, कोणाला हिरो. पण त्या दोहोंमधला उभा दावा न दाखवता मला परिस्थितीशी झगडण्याचा त्यांचा संघर्ष दाखवायचा होता. म्हणूनच मी कथा मुद्दाम तशी ठेवली आणि शिक्षण हाच केंद्रबिंदू ठेवला. बाकी कुठे कथा भरकटू दिली नाही. धर्म, जात असे कोणतेही भावना भडकावणारे विषय यात मी हाताळले नाहीत.
‘कस्तुरी’ नावाचा मुख्यतः हिंदी आणि अंशतः मराठी चित्रपट 8 डिसेंबर 2023 रोजी महाराष्ट्रात आणि भारतातही अन्य काही शहरांत प्रदर्शित झाला आहे. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी या गावात सिनेमाचे शूटिंग झाले आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक विनोद कांबळे यांच्याशी या चित्रपटाची निर्मिती, त्यामागील प्रेरणा, चित्रपटाची कथा या विषयांवर 2 डिसेंबर रोजी संवाद साधला. त्या गप्पांमधून या चित्रपटाच्या निर्मितीचा प्रवास उलगडण्याचा केलेला हा प्रयत्न आहे.
प्रश्न : तुमच्या या चित्रपटाविषयी कलाक्षेत्रातील वर्तुळात थोडंसं कुतूहलमिश्रित आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. चित्रपटक्षेत्राची कोणतीही पार्श्वभूमी नसताना, बार्शीसारख्या छोट्याशा गावातील आणि परिसरातील कलाकार घेऊन हा सिनेमा बनवलेला आहे. अतिशय कमी बजेटमध्ये बनवलेला सिनेमा आहे (सिनेमा पाहताना लक्षात येतं.) दोन कुमारवयातील मुलं केंद्रस्थानी आहेत. यातील एका मुलाची आई सोडली तर बाकी कोणी अभिनय क्षेत्राशी संबंधित नाही. तुम्ही स्वतःदेखील (फिल्म ॲप्रिसिएशनचा कोर्स वगळता) सिनेमक्षेत्राशी थेट निगडित नाही. अशा या 1 तास 40 मिनिटे म्हणजे पूर्ण लांबीच्या चित्रपटाची कथा आणि निर्मितीचं बीज नेमकं मनात केव्हा रुजलं आणि कसं?
- खरं तर, सिनेमा हा सिनेमा आहे. त्यात शहरी-ग्रामीण, स्पृश्य -अस्पृश्य असं काही नसतं. बाकीच्यांप्रमाणे मीही सिनेमा बघतच मोठा झालो. जेव्हा जेव्हा मी सिनेमा बघायचो, तेव्हा तेव्हा मला वाटायचं, की आपणही सिनेमा बनवावा, आणि बनवू शकू. पण नक्की कसं, ते काही माहीत नव्हतं. आता नवीन मुलं माझ्याकडे मार्गदर्शनाला येतात. सिनेमा बनवायची त्यांना इच्छा असते. आता लोकांना माहीत आहे की हा निर्माता आहे, दिग्दर्शक आहे, म्हणून ते येतात. पण मला माहीत नव्हतं की, नक्की कोणाकडे जायचं? कोण मदत करेल? परंतु इंजिनिअरींग कॉलेजमध्ये शेवटच्या वर्षाला असताना मी एफटीआयआयच्या (फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया) काही स्कॉलरशिप्स असतात का, त्यांचा कुठला कोर्स आपण करू शकतो का, अभ्यासक्रम काय असतो याविषयी माहिती मिळवायचो. त्यांची वेबसाईट चेक करायचो. तेव्हा तिथे जाऊन सिनेमाचं औपचारिक शिक्षण घेण्याची तीव्र इच्छा होती. सिनेमा बनवायचा आत्मविश्वास आल्यानंतर ठरवलं की, जे आपण बघतो त्यावरच आधारित सिनेमा काढायचा.आपल्याकडील अनुभवांची आणि आठवणींची शिदोरीच पडद्यावर आणायची. ज्याप्रमाणे एखादा कवी आपल्या आजूबाजूला जे घडतं, त्यावर कविता करतो वा लेखक पुस्तक लिहितो, त्याचप्रमाणे आपण आपल्या आसपास जे बघत आलो, जे जीवन जगलो त्यावरच काही बोललं पाहिजे. तेही लोकांना आपलंसं वाटेल अशा पद्धतीने. तेव्हाच सफाई कामगारांच्या जीवनावर आधारित आपण काही बनवू शकतो असं वाटलं होतं. याबाबतीत एक चांगली आणि वाईटही अशी आठवण सांगतो. मी दहावीत असताना माझ्या वडिलांनी मला सांगितलं, की तू आता शिक्षण थांबव आणि टेंडरमध्ये कामाला यायला लाग. कारण आजूबाजूची माझ्या वयाची मुलेही तिथे काम करू लागली होती. पण मी त्याला नकार देऊन शिक्षणाचाच मार्ग निवडला. शिक्षणाच्या ओढीने हा जो बदल माझ्या मनात झाला होता, तोच मला रुपेरी पडद्यावर आणायचा होता. आणि तिथूनच कस्तुरीच्या कथेचं बीज रुजलं.
माझे मित्र शिवाजी करडे यांना मी ती आयडिया पीच केली. त्यांनाही ती आवडली. कस्तुरी म्हणजेच शिक्षण हा विचार माझ्या मनात होता, आणि ती कथा कागदावर उतरली. सुरुवातीला तिची लांबी मोठी झाली, म्हणून त्याचंच छोटं व्हर्जन करायचं ठरलं, आणि ‘पोस्टमॉर्टम’ ही शॉर्टफिल्म आकाराला आली. सुरुवातीला मला शंका होती, की एका आठवीतील मुलाला पोस्टमॉर्टेम करताना बघणं प्रेक्षकांना कितपत रुचेल? ती फिल्म फेस्टिव्हलमध्येही फिरवण्यात आली, पण पुण्यात दाखवण्यात आली नाही. मला पुरस्कारही मिळाला. परंतु प्रेक्षकांना ती पाहता न आल्याने मी प्रचंड असमाधानी होतो, आणि संबंधितांना तसं बोलूनही दाखवलं. आयोजकांनी आणि ज्युरींनी मला सांगितलं की, ‘यात दाखवलेला आशय थोडा वादग्रस्त असू शकतो, त्यामुळे ही शॉर्टफिल्म आम्हाला दाखवता आली नाही.’ लोकांना सफाई कामगारांचं खरं आयुष्य जवळून दाखवण्याचा जो हेतू होता, तोच यामुळे सफल झाला नाही. परंतु पुढील वर्ष-दीड वर्ष ती फिल्म विविध फेस्टिव्हल्समध्ये फिरली, लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आणि जाणकारांनी कौतुकही केलं. तेव्हा वाटलं की, आता यावर पूर्ण लांबीची फिचर फिल्म बनवावी. मग शिवाजी करडे यांना पुन्हा भेटून या विषयावर पूर्ण लांबीचा चित्रपट काढायचं ठरवलं. सफाई कामगार असलेल्या एका कुमारवयीन मुलाच्या भावविश्वात हा सिनेमा डोकावतो. या कामालाच जी एक विशिष्ट दुर्गंधी आहे, त्याविषयीचा, त्या कामाचा न्यूनगंड त्या मुलाच्या मनात आहे. तो हुशार आहे, त्याचं हस्ताक्षर चांगलं आहे, परंतु आपल्या घरचा सफाई कामगाराचा पेशा त्याला डाचतोय. शाळेत किंवा इतर ठिकाणी थोडी दुय्यम वागणूक मिळत असल्याची बोच आहे. त्या मुलाच्या स्व-शोधाचा हा प्रवास आहे. तुमच्याकडून तुमची संपत्ती हिसकावली जाऊ शकते, पण शिक्षण नाही हाच दृष्टिकोन मला या चित्रपटातून मांडायचा आहे. बार्शी येथील सनी चव्हाण यांच्या सत्यकथेवर आधारित हा सिनेमा आहे.
प्रश्न : हे खरंच खूप महत्त्वाचं आहे. सफाई कामगारांचं आयुष्य तुम्ही जवळून पाहिलंत. जेव्हा सिनेमा करायचा असं ठरलं, त्याची एक झलक म्हणून तुम्ही आधी शॉर्टफिल्म केलीत, तिला पुरस्कार मिळाला. मात्र जे खरंच लोकांनी पाहायला हवं, किंवा जे अंगावर येणारं वास्तव आहे ते दाखवण्याची हिंमत वा मानसिकता सिनेमा क्षेत्रातल्या लोकांचीसुद्धा नाही, असं जाणवलं का? चित्रपटाचं कथानक नेमकं कसं आकाराला आलं?
- हो नक्कीच. मला आठवतं, आम्ही लहान असताना माझे वडील कामावरून आले की आम्हाला लाडाने उचलून घेत. प्रेमाने गाल वगैरे ओढताना त्यांच्या हाताला गटाराची दुर्गंधी यायची. आम्हाला तो वास इतका सवयीचा झाला होता की, तो आयुष्याचा एक भागच बनला होता. मी अकरावीत होतो, तेव्हा एक मित्र कुठूनतरी कस्तुरी घेऊन आला होता, आणि त्याने मला तिचा वास घेऊन बघायला दिला होता. जेव्हा सिनेमाविषयी शिकायला लागलो, तेव्हा या दोन्ही आठवणींचं माझ्या मनात मिश्रण झालं, त्यातच एक विरोधाभास मला सापडला. आणि एका सफाई कामगाराच्या मुलाला या दुर्गंधीपासून सुटका मिळवायची आहे, ही कल्पना सुचली. काळवीटाच्या नाभीतच कस्तुरी असूनही त्याच्या सुगंधाच्या शोधात ते मरेपर्यंत हिंडतं. माणूस म्हणून आपल्या बाबतीतही आयुष्यात हेच होतं अनेकदा. अशी वाट चुकलेली आणि ती पुन्हा सापडलेली अनेक माणसं आहेत. मी स्वतः त्यातलाच आहे. इंजिनीअरिंग केलं, एमपीएससी केलं आणि मग वाटलं, हा आपला मार्ग नाही, आपण चुकलो आहोत. पण मला अखेर माझी कस्तुरी सापडली, सिनेमा बनवायचं माझं ध्येय मला गवसलं. तसाच प्रवास त्या सिनेमातील मुलाचा होताना मला दाखवायचा होता. बुद्धविचार, अत्त दिपो भवः , अर्थात स्वयंप्रकाशित होणं मला यातून दाखवायचं होतं.
प्रश्न : सिनेमाच्या पटकथेचा विचार करता मेहतर समाजातून आलेला हा मुलगा आणि त्याचा मित्र, नातेवाईक या सर्वांच्या जोडीला मुस्लिम समाज प्रामुख्याने दिसून येतो. दोन पूर्णपणे भिन्न असलेले हे समाज जाणीवपूर्वक एकत्र आणण्यात आले होते की, ते कथाप्रवाहानुसार सहज घडत गेलं?
- मला वाटतं, की सिनेमा किंवा कोणतंही साहित्य हे आपल्याच जडण-घडणीचं प्रतिबिंब असतं. मी लिहायला बसलो, तेव्हा हे मी माझ्या आजूबाजूला जे पाहिलेलं होतं, त्यानुसारच सहज येत गेलं. ते माझ्या आयुष्याचा भागच होतं. माझे असे अनेक मुस्लिम मित्र होते, ज्यांच्याशी माझा खूप स्नेह होता. ते सहअस्तित्व तितक्याच नैसर्गिकपणे माझ्या कथेत आलं. ती गोष्ट कथेत मुद्दाम किंवा ओढून-ताणून आणलेली नाही. आदिमसारखे मित्र माझ्या आयुष्यात आधीही होते, आणि पुढेही राहतील. जातीपातीचा, धर्माचा आधी विचारसुद्धा मनात आला नाही.
प्रश्न : हे खूप इंटरेस्टिंग आहे. लेखक हमीद दलवार्इंनी आपल्या ‘दहा रुपयांची नोट’ या कथेत हिंदू-मुस्लिम यांचं शांततापूर्ण सहअस्तित्व दाखवलं आहे. त्याचप्रमाणे तुम्हा
ला दलित आणि मुस्लिम या समाजांचं एकत्र नांदणं, त्यांच्या चालीरीती, धर्मातील सुधारणा हे दाखवायचं होतं का, असा प्रश्न अनेकांना पडू शकेल. याविषयी काय सांगाल?
- हा विचार डोक्यात ठेवून कथा लिहिली गेली नाही, ते अतिशय नैसर्गिकपणे आणि ओघानेच आलं. त्याला असं वेगळं अधोरेखित करायची गरज मला तरी वाटली नाही. परंतु या दुर्लक्षित विषयांवर चर्चा होणं हेच अपेक्षित आहे.
प्रश्न : सिनेमाची साधारण दिशा आणि प्रारूप लक्षात आल्यानंतर सिनेमाच्या क्षेत्रातील नवीन लोकांना सिनेमाची निर्मिती कोण करणार ही समस्या भेडसावतेच. तुम्हालाही ती जाणवली का? आठ वेगवेगळ्या महिलांनी मिळून या सिनेमाची निर्मिती केली, त्यांच्याशी तुमचा संपर्क कसा आला? निर्मितीची प्रक्रिया काय होती?
- अशा वास्तववादी आशयाचा सिनेमा करणं, तोही आपला पहिला सिनेमा असणं हे आव्हानात्मक होतं. सिनेमा लिहून तयार झाल्यावर अजय डोके हे जे आमचे सिनेमाचे क्रिएटिव्ह डायरेक्टर आहेत, त्यांच्याशी माझी एफटीआयआयमध्ये गाठ पडली. त्यांना माझी शॉर्टफिल्म आवडली होतीच. त्यामुळे कस्तुरीची स्क्रिप्टही त्यांना ऐकवली, त्यांना ती पसंत पडली. ते सामाजिक कार्यही करत असल्यामुळे त्याही वर्तुळातील अनेक महिला-पुरुष त्यांच्या परिचयाचे होते. विविध क्षेत्रांतील आठ महिलांना एकत्र आणून त्यांनी काही निधी उभा केला आणि 8 मे 2018 रोजी त्यांनी मला प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्याची सूचना दिली.
प्रश्न : या सिनेमातील सर्वच पात्रं म्हणजे गोपी, आदिम, विकास, गोपीची आई आशा, ही सर्वच तशी महत्त्वाची आहेत. यातील गोपीची आई बघताना नुकत्याच आलेल्या ‘श्यामची आई’ सिनेमातील श्यामच्या आईची आठवण होते. तीही अशीच कणखर, बाणेदार तरीही सोशिक स्त्री आहे. काही मूल्ये किती सार्वकालीन असतात याची अशावेळी जाणीव होते. तुमच्या टीममधील कोणीच कसलेला किंवा अनुभवी कलाकार नाही. मग असं असताना या भूमिकांसाठी योग्य व्यक्तींची निवड तुम्ही कशी केलीत?
- सिनेमा लिहीत असतानाच कोणत्या पात्रासाठी कशी व्यक्ती आवश्यक आहे, हे कुठेतरी डोक्यात तयार होत असतं. ती दिसेल कशी, बोलेल कशी, वागेल कशी हे डोक्यात तयार असतं. त्याच्याशी मिळत्या-जुळत्या व्यक्ती भेटल्या, दिसल्या की आपसूकच पुढची प्रक्रिया घडत जाते. सर्वांत आधी निवड झाली, ती आदिम या पात्रासाठीच्या कलाकाराची. श्रवण उपळकर या मुलाशी माझी तशी ओळख होती, म्होरक्यामध्ये त्याने छोटी भूमिकाही केली होती. आदिमचं पात्र लिहीत असताना डोक्यात श्रवणच होता, कारण तो तसाच अल्लड, खट्याळ,नटखट आहे. असा एखादा मित्र आपल्यालाही असतोच. मात्र श्रवणला या भूमिकेसाठी वजन थोडं कमी करावं लागलं. त्याने नियमित व्यायामाच्या साहाय्याने ते केलं आणि मला अपेक्षित होता, तसाच आदिम पडद्यावर साकारला. गोपीचं पात्र जसं माझ्या डोक्यात होतं, तसा मुलगा मला तब्बल 500 ऑडिशन्समध्ये कुठेच मिळाला नाही. तेव्हा मला वाटलं, आता काही एवढ्यात आपल्याला योग्य व्यक्ती भेटणार नाही. पण सर्व ऑडिशन्स संपवून आम्ही बाहेर पडणार होतो तेव्हा समर्थ आला आणि ऑडिशन द्यायची इच्छा व्यक्त केली. त्याचा पहिला राउंड झाल्यानंतर या मुलात काहीतरी वेगळा स्पार्क नक्की आहे, असं जाणवलं. पाऊण तासाच्या ऑडिशननंतर त्याला घ्यायचं निश्चित झालं. गोपीसाठी ज्या ॲक्टिव्हिटीज मी डिझाईन केल्या होत्या, त्या सर्व त्याला करायला लावल्या. पण तेव्हा त्याला पुढील तीन महिने माहीतदेखील नव्हतं, की या भूमिकेसाठी त्याची निवड झाली आहे. समर्थ उजवा आहे. मात्र गोपीचं पात्र डावरं दाखवायचं होतं, ते नैसर्गिक वाटावं यासाठी समर्थला प्रत्येक काम जे तो नेहमी उजव्या हाताने करतो ते डाव्या हाताने करण्याचा सराव करायला लावला.
प्रश्न : गोपीचं पात्र लेफ्टी दाखवण्यामागे काय विचार होता?
- निखिल वागळे यांचा ‘आजचा सवाल’ हा कार्यक्रम मी नियमितपणे पाहायचो. त्यातील एका कार्यक्रमात एका सामाजिक कार्यकर्त्याची ते मुलाखत घेत होते. ते कार्यकर्ते मुलाखतीत म्हणाले की, ‘आपण अशा समाजरचनेत राहतो, जिथे सर्वांना सामान वागणूक मिळण्याची अपेक्षा असते. पण माणूस इतका खालच्या पातळीला गेलाय की, तो आपल्याच शरीराचा भाग असलेल्या डाव्या हाताला काहीशी दुय्यम वागणूक देतो. मग सर्वांना समान वागणूक देण्याचा प्रश्न तर दूरच.’ मला ते मनापासून पटलं. डाव्या हाताने प्रसाद घेऊ नये, शुभ कामं डाव्या हाताने करू नयेत या समजुती आजही घट्ट रुजलेल्या आहेतच. आणि म्हणूनच गोपीला लेफ्टी दाखवण्याचा विचार मनात आला, जेणेकरून तो डावऱ्या माणसांचं प्रतिनिधित्व करेल.
प्रश्न : वा! हे खरंच वेगळं वैशिष्ट्य. हा सिनेमा मी काल सकाळी पाहिला, पण माझ्याही हा मुद्दा लक्षात आला नव्हता की, हे जाणीवपूर्वक केलेलं आहे. मी समजून चाललो होतो की, समर्थ डावखुरा आहे. त्यामुळे गोपी डाव्या हाताने कामे करताना दिसतो. असो. तर या सिनेमातील गोपीची आई आणि कस्तुरी विकणाऱ्या विकासची निवड कशी करण्यात आली?
- पोस्टमॉर्टेम शॉर्टफिल्ममध्ये हेच पात्र साकारलेल्या वैशाली केंदळे मॅडमची निवड सिनेमासाठीही केली. एक कणखर, व्यवहारी बाई, जी संपूर्ण घर नेकीने चालवते अशी ही गोपीची आई दाखवायची होती. काटकसरीने संसार चालवणारी ही महिला, म्हणजे ‘आशा’ हे पात्र पडद्यावर साकारायचं होतं. आशा हे नाव देण्यामागेही प्रतिकूल परिस्थितीदेखील टिकून राहिलेला आशावाद दाखवायचा होता. गोपीला विरोध करत असली, त्याची पुस्तकं फाडून टाकून त्याला घरातली कामं करायला सांगत असली तरी ती कुठेही व्हिलन वाट
णार नाही, याची काळजी घेतली आहे. आजूबाजूची परिस्थितीच तिच्या तशा वागण्याला कारणीभूत होती, हेच सूचित करायचं होतं.
प्रश्न : सिनेमातील विकासचं पात्र साकारणाऱ्या कुणाल पवारला संवाद तसे फारच कमी आहेत. दर दहा-पंधरा मिनिटांनी दिसणारा, गोपीकडून पैसे उकळणारा, कस्तुरी विकणारा, प्रत्येक वेळी हिडीसफिडीस करणारा कुणाल तरीही लक्षात राहतो. मोजक्या संवादांतून तो साकारला जातो. ते कशामुळे?
- माझ्या आयुष्यात विकास नावाचा पारधी समाजातील मुलगा आधीपासूनच होता. त्यामुळे सहजपणे ते पात्र लिहिलं गेलं. ज्या भागात मी राहतो, तिथे काळवीटाची शिकार करणारी पारधी समाजातील माणसं आढळतात. याच समाजातील विकासचं पात्र दाखवायचं ठरवलं. यामुळे सांस्कृतिक विविधता आणि सर्वसमावेशकताही सिनेमात दिसून येते. हे पात्र थोडं ऑफबीट ठेवलं. मामी फेस्टिव्हललाही विकासच्या या भूमिकेचं कौतुक झालं. त्याची ओरिजिनॅलिटी भूमिकेला न्याय देण्यास उपयुक्त ठरली.
प्रश्न : सिनेमात अधूनमधून इम्रान आणि त्याची कबुतरं येत राहतात. विकास आणि त्याच्या कस्तुरीच्या मानाने या दोन्हींना वाव कमी आहे. परंतु या दोन गोष्टींचा परस्परसंबंध तुम्ही कसा जोडलात?
- मी लहानाचा मोठा झालो, त्या भागात काही निमित्त निघालं की, आम्हाला कबुतरं आणायला सांगितलं जाई. मग आम्ही लांब, उंच ठिकाणी जाऊन थांबायचो. कबुतरं पकडून नंतर हवेत सोडायचो. हा प्रसंग आठवला आणि एका वेगळ्या संदर्भाने तो सिनेमात घेता येईल असं वाटलं, म्हणून मग इम्रानचं पात्र निर्माण झालं . त्याच्यात माणुसकी आणि प्रेम हे दोन्ही आहे. ज्या पद्धतीने कबुतरं उडवली जातात, तो क्षण खूप इंटरेस्टिंग आहे. लोकांना सिनेमा बघितल्यावर त्याचा संदर्भ लक्षात येईलच. कबुतर हे प्रेमाचं प्रतीक म्हणूनच त्या ठिकाणी घेतलं आहे.
प्रश्न : सिनेमातील गोमूत्र आणि अत्तर विकणारे मुस्लिम मामू यांचं जे चित्रण केलेलं आहे, त्यातून तुम्हाला कोणता अर्थ अभिप्रेत आहे?
- आदिम आणि गोपी हे दोघेही कथेत येतात ते आपापली संस्कृती घेऊनच. अत्तर आदिमच्या, तर गोमूत्र हा गोपीच्या संस्कृती आणि वातावरणाचा भाग आहे. दोन्ही वस्तू या विशिष्ट वासाच्या असतात. वस्तूंना वा व्यक्तींना पवित्र करण्यासाठी वापरल्या जातात. दोघांच्याकडील या वस्तू एकमेकांच्या उपयोगाच्या आहेत. म्हणून त्यांच्यातील देवाणघेवाण, सहअस्तित्व या गोष्टी दाखवल्या.
प्रश्न : कस्तुरी हे शिक्षणाचं प्रतीक म्हणून तुम्ही सिनेमामध्ये वापरलं. सिनेमात शेवटी गोपीचा (कस्तुरी मिळत नसल्याने) भ्रमनिरास होतो. तेव्हा गोपी जे भाषण ऐकतो, त्या एका कार्यकर्त्याच्या भाषणातून आंबेडकरांचा विचार पुढे येतो. वाक्यं खूप कमी आहेत, पण आधीच्या पार्श्वभूमीला ती पूरक ठरतात. तेथे आणखीही काही चमकदार वाक्यं टाकता आली असती, पण तुम्ही ते केलं नाहीत. तरीही तो भाग प्रभावी ठरला आहे. तो मोह कसा टाळलात?
- ते पात्र मी लिहायला घेतलं तेव्हा असं वाटलं की प्रत्येकाच्या आयुष्यात कधीतरी असा एक माणूस येतो, ज्याचे विचार किंवा एखादं वाक्य आपल्या आयुष्याला कलाटणी देतं. माझ्याही बाबतीत हे घडलेलं आहे. त्या सामाजिक कार्यकर्त्याच्या रूपाने गोपीच्या बाबतीतही हेच घडतं. तो बौद्धधर्मीय आणि बुद्धविचार मानणारा सामाजिक कार्यकर्ता ‘शाळेत जा, शिक्षण घ्या,’ हाच उपदेश कळकळीने करतो. तिथे तो एकच गोष्ट बोलतो, पण ती योग्यप्रकारे गोपीच्या मनावर ठसते. त्याच्यासाठी ते एक दिशादर्शक असं पात्र होतं, त्यामुळे ते जितकं साधं, सहज ठेवता येईल तितकं बरं असं मला वाटलं. शिक्षण हाच तो मार्ग आहे जो तुम्हाला स्वतःकडे घेऊन जाईल हेच तो सांगतो. म्हणून कोणतंच सिम्बॉलिझम न वापरता, या पात्राचा वावर साधा, सहज ठेवला आहे. आणि मला वाटतं म्हणूनच तो कार्यकर्ता प्रेक्षकांना भावेल, त्याच्याशी त्यांचा सहज कनेक्ट होईल.
प्रश्न : एका गोष्टीची नोंद मला हा सिनेमा पाहिल्यावर अवश्य करावीशी वाटते, ती म्हणजे ‘कन्विन्सिंग पॉवर’, या प्रकारातील जे सिनेमे असतात, त्यापैकी एक हा नक्कीच आहे. या सिनेमात कुणीच खलनायक नाही. किमान व्यक्ती तरी खलनायक नाहीच. परिस्थिती किंवा समाजरचना ही खलनायक वाटू शकेल, पण काही प्रेक्षकांना तीही वाटणार नाही. कारण सिनेमातील प्रत्येकाला स्वतःची काही पार्श्वभूमी आहे, आणि ते पात्र तसं का वागत आहे, याची कारणेही आहेत.हे तुमच्या एकूण विचारप्रक्रियेचाच भाग आहे, की कलेच्या दृष्टीने हे असं दाखवणं अधिक हितकारक वाटलं, की लोकांपर्यंत हेतुतः असंच पोचवावंसं वाटलं?
- हो, हा मी हेतुपूर्वक घेतलेला निर्णय होता. खूप विचार करून मी ती पात्रं याप्रकारे दाखवायचं ठरवलं होतं. आजपर्यंत जे सिनेमे बघत आलो, त्यात एक हिरो आणि एक व्हिलन असायचाच. पण मला या सिनेमात ती संकल्पना ठेवायची नव्हती. मला कोठेच कोणाच्या भावना भडकवायच्या नव्हत्या. मला चर्चेचा केंद्रबिंदू व्हायचं नव्हतं. फक्त जे वाचलंय, बघितलंय, जगलोय आणि अनुभवलंय त्याला योग्य शब्दांत न्याय मात्र नक्कीच द्यायचा होता. वास्तव सोप्या आणि प्रभावी शब्दांत, रुचेल-पटेल अशा रीतीने लोकांना मांडायचं होतं. परिस्थिती कोणाला व्हिलन बनवते, कोणाला हिरो. पण त्या दोहोंमधला उभा दावा न दाखवता मला परिस्थितीशी झगडण्याचा त्यांचा संघर्ष दाखवायचा होता. म्हणूनच मी कथा मुद्दाम तशी ठेवली आणि शिक्षण हाच केंद्रबिंदू ठेवला. बाकी कुठे कथा भरकटू दिली नाही. धर्म, जात असे कोणतेही भावना भडकावणारे विषय यात मी हाताळले नाहीत. शिक्षण ही कस्तुरी कशी आहे आणि पिचलेल्या, हताश लोकांनाही ती कशी वर काढू शकते हेच मला दाखवायचं होतं. त्यामुळे तो विषय बोल्ड झाला नाही, भरकटला नाही असं मला वाटतं. समस्येकडे लोकांचं लक्ष वेधणं हा माझा उद्देश होता. माणूस म्हणून सर्वांना प्रेमाने आणि आदराने वागवलं गेलं पाहिजे, हाच संदेश मला पोचवायचा होता. संविधानाने आपल्याला प्रत्येकाला ताठ मानेने जगण्याचा, माणूस म्हणून जगण्याचा बहाल केलेला अधिकार आपण सर्वांनीच जपला पाहिजे. तोच
विचार मला जमेल तसा मांडण्याचा प्रयत्न केला. समाजात ‘समता’ ही अचानक येत नाही. त्यासाठी अशाच प्रकारची छोटी छोटी पावलं उचलावी लागतात असं मला वाटतं. आणि लोकांपर्यंत हे पोचतंय याचा आनंद वाटतो. एक अनुभव सांगतो. धरमशाला मधील एका फेस्टिव्हलदरम्यान या सिनेमाचं स्पेशल स्क्रीनिंग झालं. तिथे बरीच लहान मुले आली होती. तेथील कॉन्वेंट स्कुलमधली ती होती. साधारण पाचवी-सहावीतील ती मुले होती. प्रश्नोत्तरांदरम्यान एका मुलाने सांगितलं की, ‘आम्ही आमच्या इकडच्या सफाई कामगार असणाऱ्या मावशी, काकांसाठी वेगळं तांब्या-भांडं ठेवतो; पण आता ही पद्धत मी बंद करणार!’ त्या मुलाकडून आलेली ही प्रतिक्रिया पुरेशी बोलकी आहे असं मला वाटतं.
प्रश्न : 2019 ला सिनेमा तयार झाला मात्र करोनाकाळानंतर सिनेक्षेत्रातील बरीच समीकरणं बदलली. दरम्यानच्या काळात, दोन वर्षांमध्ये अनेक फिल्म फेस्टिव्हल्समध्ये तुमचा सिनेमा दाखवला गेला, त्यावर प्रतिक्रिया आल्या. या सर्व फेस्टिव्हल्सचा तुमचा अनुभव कसा होता आणि आता आपली मुलाखत पाहणाऱ्या, वाचणाऱ्या प्रेक्षकांनी हा सिनेमा का बघावा असं तुम्हाला वाटतं?
- फेस्टिव्हल्समध्ये फिरणं हा माझ्या आवडीचा भाग. कारण तेथील ज्यूरी आणि प्रेक्षकही ज्या पद्धतीने सिनेमावर प्रतिक्रिया देतात, व्यक्त होतात त्यातून खूप काही घेण्यासारखं असतं. सिनेमा आपण बनवतो तो अर्थात प्रेक्षकांसाठी. आपली कलाकृती प्रेक्षक आणि समीक्षकांच्या पसंतीस उतरल्यावर दिग्दर्शकाला होणारा आनंद म्हणजे शाळेत मुलाला बक्षीस मिळाल्यावर आईला होणाऱ्या आनंदासारखाच. लहान मुलांच्या मला येणाऱ्या प्रतिक्रिया फार बोलक्या आहेत. मला काय म्हणायचं आहे, ते नेमकेपणाने त्यांच्यापर्यंत पोचतं आहे, हे पाहून खूप आनंद वाटतो. सिनेमा क्रांती वगैरे करत नाही, पण असे छोटे छोटे बदल मनात, विचारप्रक्रियेत रुजून त्या बीजाचंच पुढे वृक्षात रूपांतर होऊ शकतं. दिल्लीच्या एका शाळेतून एका मुलाने हाताने लिहून एक अभिप्राय पाठवला. ‘तुम्ही मांडलेलं हे भयाण वास्तव अगदी खरं आहे. अशी वेळ कोणावरच न येवो. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा!’ ही माझ्यासाठी खूप मोठी पावती होती. माझा हेतूच हा होता की, प्रेक्षकांनी सिनेमा पाहून त्यावर विचार करावा, त्यांच्या विचारात परिवर्तन व्हावं आणि त्यांना योग्य वाटतील त्या गोष्टी त्यांनी आचरणात आणाव्या. मी प्रेक्षकांना सांगेन की तुमच्यातील कस्तुरी तुम्हाला सापडावी, यासाठी नक्कीच हा सिनेमा बघा. प्रत्येकाला आपली वाट सापडावी, आयुष्यात आपल्याला नेमकं काय करायचं आहे हे समजावं आणि त्यासाठी वणवण भटकावं लागू नये, असं मला मनापासून वाटतं. आपली कस्तुरी आपल्यापाशीच असते, फक्त तिचा गंध ओळखावा लागतो. आपण जिथे राहतो तो परिसर ज्यांच्यामुळे साफ राहतो, त्या लोकांचे कष्ट जाणून घेण्यासाठी आणि त्या लोकांप्रती आदर, प्रेम आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सिनेमा तुम्ही अवश्य पहा, अशी विनंती मी प्रेक्षकांना आवर्जून करेन. प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया, अभिप्राय, त्यांनी सुचवलेल्या सुधारणा आणि त्यांना खटकलेल्या गोष्टीही मला माझ्या पुढील कामात सुधारणा करण्यासाठी नक्कीच खूप दिशादर्शक ठरणार आहेत. धन्यवाद!
(शब्दांकन : तेजसी आगाशे)
संवादक : विनोद शिरसाठ
(या मुलाखतीचा 50 मिनिटांचा व्हिडिओ kartavyasadhana.in वर येथे क्लिक करून पाहता येईल.)
Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
वर्गणी..
चौकशी
देणगी
अभिप्राय
जाहिरात
प्रतिक्रिया द्या