डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

आज आपल्या सभोवताली पंचविशीच्या आत-बाहेरचे तरुण पहा. व्यक्तिगत व कौटुंबिक समस्यांनी हैराण झाले आहेत. सभोवताली चिंतामुक्त तरुण दिसणं दुर्मिळ झालं आहे. सर्वांत मोठी शोकांतिका तर ही आहे, की या समस्यांतून मार्ग कसा काढायचा हेच त्यांना कळत नाही. त्यांची वाढच 'शॉर्ट कट' संस्कृतीत झाली आहे. प्रोसेसने जाण्याची इच्छाशक्तीच त्यांच्याकडे नाही.

आकाश-विवेक 
“विवेक, मला सांग, ‘संस्कृती’
म्हणजे काय?”
“विनोबांनी, प्रकृती-विकृती-संस्कृती यांचं छान वर्गीकरण केलंय!”

“ते माहीत आहे मला...”
“इरावतीबाईंनी “संस्कृती’ नावाचं चांगलं पुस्तक लिहिलंय!”
“वाचलंय मी ते!”
“पु. ग. सहस्त्रबुद्धेनी ‘महाराष्ट्र संस्कृती’ आणि साने गुरुजींनी ‘भारतीय संस्कृती’ यांवर सुंदर ग्रंथ लिहिलेत...” “हे बघ, मला काहीही वाचायला सांगू नकोस, ‘संस्कृती’ या संकल्पनेबाबत तुला जे काही कळलं असेल ते सांग!”

“नेमकेपणाने सांगणं कठीण आहे. पण ढोबळ मानाने सांगायचं तर एखाद्या समाजाच्या जीवनपद्धतीचा जो काही गामा असेल, त्याला त्या समाजाची ‘संस्कृती’ ‘म्हणता येईल. 
“व्हेरी गुड, यू आर ऑन द राइट ट्रॅक! आता सांग... आपल्या आजच्या समाजाची जी काही ‘जीवनपद्धती’ आहे, तिचा ‘गाभा’ काय आहे?”
“नाही सांगता येणार....” “हरकत नाही! मी सांगू?... ‘शॉर्ट कट’ हा आपल्या आजच्या जीवनपद्धतीचा गाभा आहे!”

“म्हणजे आपण ‘शॉर्ट कट’ संस्कृतीचे ‘पाईक’ आहोत, असं म्हणाचंय तुला?” “होय! ‘शॉर्ट कट’ शोधणं हे
आपल्या जीवनपद्धतीचे ‘व्यवच्छेदक लक्षण’ झालं आहे!”
“आकाश, ‘व्यवच्छेदक लक्षण’ यासारखे बोजड शब्द वापरणं बरं नाही...”
“संस्कृती सारख्या गुंतागुंतीच्या

संकल्पनेबद्दल बोलताना असले ‘अवजड’ शब्द येणारच!”
“पण आपलं आजचं जीवन फारच ‘गतिमान’ झालं आहे...”
“तेच सांगतोय ना... जीवन इतकं गतिमान झालंय, तरीही ‘शॉर्ट कट शोधण्याची गरज आपल्या पिढीला का वाटावी?”
“मित्रा, ‘गतिमान’ जीवनातील स्पर्धा ‘जीवघेणी’ आहे. त्यात मागे पडू नये, म्हणून तर ‘शॉर्ट कट’चा अवलंब करावा लागतोय!” 

“स्पर्धा जीवघेणी आहे, हे खरं! पण जीवन गुंतागुंतीचंही आहे. मग ‘शॉर्ट कट’च्या नादी लागलो तर सापळ्यात अडकण्याची शक्यता जास्त असते, हे आपल्या युवा पिढीला कळायला नको?”
“त्या सापळ्यातून बाहेर पडण्यासाठीही शॉर्ट कट चे मार्ग आहेतच की!”

प्रकाश : “तुमची चर्चा अशीच चालू ठेवा... आज आम्ही वाद घालायला आलेलो नाही. पुढच्या आठवड्यात आकाश आपल्याला सोडून जाणार आहे, ही बातमी आमच्यापर्यंत आली आहे. यानंतर अशा निवांत भेटी आणि इतक्या ‘रटाळ’ व ‘रसाळ’ चर्चा होणार नाहीत. म्हणून आम्ही ठरवलंय, आज तुम्ही दोघांनीच बोलावं, आणि आम्ही चौघांनी ऐकावं...”

विवेक : आकाशने आज ‘शॉर्ट कट’ संस्कृती या विषयाला हात घातलाच आहे, तर मला वाटतं, त्याने एकट्यानेच बोलावं. मलाही तुमच्याप्रमाणेच ‘श्रोता’ व्हायला आवडेल!”
आकाश : मित्रांनो, त्या टिकेकरांनी ‘सारांश’ पुस्तकात समकालीन समाजाविषयी सात निबंध लिहिलेत. त्यातला संस्कृतीचा ‘अपकर्ष’ हा निबंध वाचल्यावर मी आपल्या युवा पिढीबद्दल विचार करू लागलो... सभोवतालच्या तरुण-तरुणींचे बारकाईने निरीक्षण करू लागलो. एक समान धागा मला सापडला, तो हाच की ‘शॉर्ट कट’ हा आपला ‘जीवनविशेष’ बनला आहे!

आपल्या घरातून आणि शाळा कॉलेजातूनच ‘शॉर्ट कट’ चे मार्ग दाखवले जातात. पाठ्यपुस्तकं वाचण्याऐवजी गाईड, अपेक्षित प्रश्नसंच, रेडिमेड नोट्स यांचा आग्रह, शाळा-कॉलेजांतून धरला जातो. ‘शॉर्ट कट’ प्रकारातील या अभ्यासालाच ‘कट’ मारायचा असेल, तर कॉपी करणं,

प्रश्नपत्रिका फोडणं, मार्क्स वाढवून आणणं हे पर्याय असतात. या मार्गानेही अपेक्षित यश मिळालं नाही, तर कोणाच्या तरी शिफारशी आणून, वशिलेबाजी करून पाहिजे त्या ठिकाणी प्रवेश मिळविता येतो. फार कशाला पीएचडी करण्यासाठीही अनेक ‘शॉर्ट कट’ आहेत. चार प्रबंध एकत्र करून पाचवा तयार करायचा, हा प्रकार सर्रास चालतो.

इतका जवळचा प्रवासही काहींना नको वाटतो, तेव्हा पीएचडी पदव्या अक्षरशः विकत घेतल्या जातात. संशोधन क्षेत्रातही असे ‘शॉर्ट कट’ शोधले जातात, तेव्हा अधोगती ती आणखी किती व्हायची राहिली? व्यक्तिमत्त्व विकासाचं ‘फॅड’ ही चांगलंच मूळ धरू लागलंय. त्यासाठीचे क्लास आणि पुस्तक यांचा सुळसुळाट झाला आहे. बालपणापासून शाळा, घर आणि सभोवतालची परिस्थिती आपलं व्यक्तिमत्त्व धडवीत असते, ते ‘व्यक्तिमत्त्व’ हे क्लासवाले कसं बदलवणार? अभ्यास नसेल तर आत्मविश्वास कसा वाढणार? पण तरीही ‘आत्मविश्वास कसा वाढवाल’, सारखी पुस्तकं प्रचंड खपतात. How to win Friends सारखी पुस्तकं तरुण-तरुणीच्या हातात पाहून तर भयानक संताप येतो. त्यातल्या ‘ट्रिक्स’ वापरून जी माणसं तुम्ही जोडणार आहात, त्यांना ‘मित्र’ कसं म्हणता येईल?

इंग्रजी भाषेचंही तसंच! फाडफाड ग्लिश, किंवा झटपट व्याकरण शिकवणारे क्लास व पुस्तकं म्हणजे शुद्ध फसवणूक आहे, हे कोणत्याही सामान्य बुद्धीच्या माणसाला कळायला हवं. पण तरीही त्याला बळी पडणारांचं प्रमाण वाढतच आहे. जन्माला आल्यापासून आपली मातृभाषा आपण बोलतो, वाचतो, लिहितो; तरीही त्यातले बारकावे कळत नाहीत. मग एखादी परकी भाषा अशा ‘शॉर्ट कट’ मार्गाने, इतक्या कमी वेळात कशी आत्मसात करता येईल? हा साधा प्रश्न यांच्या मनात येत नाही. ‘इंटरनेट’ ने माहितीचे ढीग घरात आणून टाकलेत पण त्यातली निवड करण्यासाठी ‘अक्कल’ विकत मिळत नाही, याचे यातील अनेकांना दुःख होतंय!

खरं तर या लोकांना आत्मविकास करून प्यायचा नसतो, व्यक्तिमत्त्वही घडवायचे नसतं. त्यांना व्यावहारिक यशाची तहान लागलेली असते, त्यासाठीचा हा खटाटोप असतो, वाट्टेल त्या मार्गाने, कोणतीही किंमत मोजून आर्थिक यश मिळवायचं असतं. नोकरीच्या ठिकाणीही असेच ‘शॉर्ट कट’ शोधले जातात. आपलं काम, आपलं वर्तन आपल्याला यश मिळवून देईल असं लोकांना वाटतच नाही. त्याऐवजी वरिष्ठांच्या पुढे-पुढे करणं हा ‘शॉर्ट कट’ च बरा बाटतो. नव्याने व्यवसाय करणाराही झटपट प्रगती कशी करून घेता येईल याचाच विचार करतो. आपली विश्वासार्हता, आपला दर्जा टिकवणं त्यांना महत्त्वाचे वाटत नाही.

‘एका रात्रीत स्टार व्हायचं’, ही प्रवृत्ती तर कित्येकांचा घात करीत आहे, अशा प्रयत्नात आपण बरंच काही गमावत असतो हे त्यांच्या ध्यानात येत नाही. संबंध प्रस्थापित करणे, घसट निर्माण करणं यासाठी किती आटा-पिटा केला जातो. पाटर्या देणं, पुन्हा पुन्हा फोन करणं. वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी चार ओळीचं पत्र पाठविण्यापेक्षा रेडिमेड मजकूर असलेली, भेटकार्ड पाठविली जातात. यातला कृत्रिमपणा, फोलपणा सर्वांनाच जाणवत. असतो, तरीही ‘ते चालू ठेवणं’ ही अपरिहार्यता आहे असं म्हणून जो-तो आपल्याच मनाची समजूत घालत असतो. काय करणार, आजच्या काळात करावे लागत हे’, असे चलाख उद्गार यांच्याकडून काढले जातात.

मनोरंजन करून घ्यायचं असेल तर तिथेही ‘शॉर्ट कट’ पाहिले जातात. डोक्याला त्रास न देता कोण आमचं मनोरंजन करील, सहजासहजी कोण हसवील, याचा शोध घेतला जातो. आमच्याकडून जास्त पैसे घ्या, पण आम्हांला पटकन आणि भरपूर हसवा, थोडा वेळ का होईना, पण चिंतामुक्त करा, दैनंदिन व्यथा-वेदनांचा विसर पाडा, अशी त्यांची मागणी असते.
मित्रांनो ही ‘शॉर्ट कट’ प्रवृत्ती दिसत नाही, असं एकही क्षेत्र आज शिल्लक नाही. नाटक-चित्रपटात पटकन वर जाण्यासाठी, किती गैरप्रकार चालतात हे काय सांगायला हवं? क्रिकेट आणि इतर खेळांतूनही ही प्रवृत्ती फोफावली आहे.

राजकारण याला अपवाद नाही. निवडणुकीच्या आधी ‘माफ आणि मोफत’ योजना सादर करून मतदारांना भुलविण्याचा प्रयत्न म्हणजे ‘शॉर्ट कट’ चाच मार्ग नाही का? मतदारही फार लांबचा विचार न करता, आपलं काम करणाराला, पैसे देणाराला मतदान करतात. ‘जो जिता वही सिकंदर’ हेच आपल्या समाजानं ब्रीदवाक्य केलं असल्याने, ‘शॉर्ट कट’ संस्कृती रुजली आहे.
तुम्ही म्हणाल पूर्वी हे सारं नव्हतं का? तर होतं! पूर्वीही ‘शॉर्ट कट’ शोधले जात होते. पण त्याचं प्रमाण फार कमी होते. आता ही प्रवृत्ती ‘कॉमन’ झालीय.
‘शॉर्ट कट’चा मार्ग अवलंबणं म्हणजे ‘प्रोसेस’ ने पाण्याची नाकारणं. जे ‘प्रोसेस’ ने होत नाही ते टिकाऊ नसतं, हा तर 
सर्वमान्य असा ‘सिद्धांत’ आहे.

या ‘शॉर्ट कट’ प्रवृत्तीमुळे होतंय काय? माणसं निरीक्षण, चिकित्सा करायला नको म्हणतात. विचार आणि विश्लेषण करण्याची शक्ती गमावून बसतात. रेडिमेड उत्तरं, रेडिमेड निष्कर्ष यांची त्यांना सवय लांगते. त्यामुळे आजच्या धकाधकीच्या, गुंतागुंतीच्या जीवनातील समस्यांना तोंड देतांना त्यांना अडचणी येतात. मग ती ‘एकांकी व ‘वैफल्यग्रस्त’ बनतात.

आज आपल्या सभोवताली पंचविशीच्या आत बाहेरचे तरुण पहा. व्यक्तिगत व कौटुंबिक समस्यांनी हैराण झाले आहेत. सभोवताली चिंतामुक्त तरुण दिसणं दुर्मिल झाले आहे. सर्वांत मोठी शोकांतिका तर ही आहे, की या समस्यांतून मार्ग कसा काळायचा हेच त्यांना कळत नाही. त्यांची वातच ‘शॉर्ट कट’ संस्कृतीत झाली आहे. प्रोसेसने जाण्याची इच्छाशक्तीच त्यांच्याकडे नाही. किंबहुना अशी काही ‘प्रोसेस’ असते हेच अनेकांना माहीत नाही. जो-तो सापळ्यात अडकला आहे आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी ‘शॉर्ट कट’ शोधतो आहे.

‘संस्कृतीचा उत्कर्ष’ होण्यासाठी काय करता येईल, असा प्रश्न काहीजण विचारण्याची शक्यता आहे, पण खरं सांगायचं तर ‘संस्कृतीचा अपकर्ष’ रोखणं हेच मोठे आव्हान आहे. ‘शॉर्ट कट’ पद्धतीतील धोके आणि दीर्घकालीन तोटे लक्षात आणून देण्यासाठी ‘नो, शॉर्ट कट, प्लीज' असा संदेश देण्याची व स्वतःसाठी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.
 

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

विनोद शिरसाठ,  पुणे
vinod.shirsath@gmail.com

मागील दीड दशकापासून साधना साप्ताहिकात कार्यरत असलेले विनोद शिरसाठ हे साधना साप्ताहिक, साधना प्रकाशन व कर्तव्य साधना (डिजिटल पोर्टल) यांचे संपादक आहेत.


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके