डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

आतला आवाज ऐकवणारं 'नाट्य-रूपक' ज्याचा त्याचा विठोबा!

आनंद जातेगावकरांचं 'लेखन', चंद्रकांत कुलकर्णीचं 'दिग्दर्शन' आणि सदाशिव अमरापूरकरांची 'भूमिका' असलेलं 'ज्यांचा त्याचा विठोबा' हे 'नाट्य-रूपक' रंगमंचावर आलं आहे. त्याविषयी थोडसं ...

व्यावसायिक हिंदी चित्रपटसृष्टीत रममाण होऊनही, ज्यांच्या सामाजिक जाणिवा बोथट झालेल्या नाहीत असे फार थोडे मराठी कलाकार आहेत; त्यातलंच एक प्रमुख नाव... सदाशिव अमरापूरकर. 'आपला जीवनविषयक दृष्टिकोन तयार करण्यात कुसुमाग्रज, डॉ. श्रीराम लागू आणि विजय तेंडुलकर यांचा महत्त्वाचा सहभाग राहिला,' असा कृतज्ञतापूर्वक उल्लेख ते नेहमीच करीत असतात. अलीकडच्या काळात तर ते म्हणतात, “अलीकडे मला बोलण्यापेक्षा ऐकायला जास्त आवडतं."

या सदाशिव अमरापूरकरांनी (यांना जवळचे लोक तात्या म्हणतात.) तब्बल सतरा वर्षांनंतर रंगभूमीवर पाऊल ठेवलं आहे. त्यांना रंगभूमीवर खेचून आणणाऱ्या नाटकाचं नाव आहे ‘ज्याचा त्याचा विठोबा!' या नाटकाचे लेखक आनंद जातेगावकर यांच्याशी तात्यांनी गेलं वर्ष-दीड वर्ष या विषयावर चर्चा केली आहे. नाटकाची संहिता लेखकाने तब्बल वीस वेळा लिहिली आहे आणि त्यातल्या दहा वेळा तात्यांनी ती वाचली आहे.

रंगमंचावर प्रयोग पाहणाऱ्यांना या नाटकात, कीर्तन, प्रवचन आणि एकपात्री प्रयोगाच्या छटा दिसतात. पण नाटक सुरू होण्यापूर्वीच्या निवेदनात सांगितलं जातं- 'हे कीर्तन नाही, प्रवचन नाही आणि एकपात्री प्रयोगही नाही!' मग हे आहे तरी काय? लेखक- दिग्दर्शक-कलाकार याला 'संगीत नृत्य नाट्य रूपक' म्हणतात.

हे 'नाट्य रूपक' लिहिणारे आनंद जातेगावकर 'मौज, सत्यकथा'चे जुने लेखक आहेत. अशा प्रकारचं लेखन त्यांनी पहिल्यांदाच केलं आहे. 'नाट्य-रूपक' लेखन प्रक्रियेचे सदाशिव अमरापूरकर साक्षीदार आहेत, पण दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णीकडे मात्र हे 'नाट्य रुपक' अवघ्या दोन महिन्यापूर्वी आलं. सामाजिक चळवळींशी पूर्वीपासून संबंध असलेल्या चंद्रकांत कुलकर्णींनी हे 'नाट्य रूपक' वाचल्यावर दिग्दर्शनासाठी तत्काळ होकार दिला. या नाट्य रुपकाचं सर्वांत मोठं वैशिष्ट्य हे आहे की यातील विचारांशी लेखक-दिग्दर्शक-कलाकार शंभर टक्के सहमत आहेत.

'नाट्य रुपक' चिंतनात्मक आहे. यातला विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्याची नितांत आवश्यकता आहे, हा त्या सर्वांचा विचारच या नाट्य रूपकाला रंगमंचावर घेऊन आला आहे. हे चिंतनात्मक 'नाट्य-रूपक' व्यावसायिक दृष्टीने यशस्वी होईल का, लोकांचा प्रतिसाद कितपत मिळेल, याची चिंता न करता हे लोकांपर्यंत पोहोचवलं पाहिजे' हा एकमेव 'प्रबोधन विचार' घेऊन त्यांनी ते रंगभूमीवर आणलं आहे आणि विशेष म्हणजे असाच विचार असणारा निर्माता त्यांना मिळाला आहे. गेल्या पाच-सात वर्षांत 'गांधी विरुद्ध गांधी', 'गांधी- आंबेडकर', 'सूर्य पाहिलेला माणूस', 'उजळल्या दिशा', 'आनंद-ओवरी’ यांसारखी वैचारिक नाटकं व्यावसायिक दृष्टीने तोट्याची ठरली आहेत; हे माहीत असूनही ‘ज्याचा त्याचा विठोबा’ च्या निर्मितीची जबाबदारी उचलणाऱ्या लता नार्वेकरांचे अभिनंदन केले पाहिजे, आभार मानले पाहिजेत.

आनंद जातेगावकरांच्या नाट्य रूपकाला भास्कर चंदावरकरांचं संगीत आणि झेलम परांजपेंचं नृत्य यांची जोड दिली गेली आणि मग रंगभूमीवर आलंय 'संगीत-नृत्य-नाट्य रूपक'. यातील संगीत व नृत्यामुळे ‘ज्याचा त्याचा विठोबा’ एकपात्री प्रयोग होता होता वाचलं आहे. 'यात संगीत किंवा नृत्याची गरज काय' किंवा 'संगीत-नृत्य' नसतं तर काय बिघडलं असतं', असा प्रश्न काहींच्या मनात येतो, पण यातील संवादाला 'अर्थपूर्णता' व चिंतनाला 'आशयगर्भता' आणण्याचं काम, हे 'संगीत' व 'नृत्य' करीत आहे. चिंतनात्मक भाग 'त्रिमिती’ च्या रूपात दाखविणारं नृत्य आणि विचारांचा भाग प्रेक्षकांच्या मनावर ठसविण्यासाठी संगीत फारच उपयुक्त ठरलं आहे. प्रेक्षकांच्या मेंदूला आणि प्रमुख भूमिकेत असणाऱ्या अमरापूरकरांना विश्रांती मिळावी हा दुय्यम हेतूही यामागे आहेच.

दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी म्हणतात... "हे नाट्य-रूपक रंगभूमीवर आणताना काय करायचं' यापेक्षा ‘काय करायचं नाही’ यावर जास्त विचार केला होता. थोडा जरी तोल ढळला असता तर हे 'नाट्य रूपक' न राहता 'कीर्तन', 'प्रवचन', 'एकपात्री प्रयोग' असं काहीतरी झालं असतं. "

दिग्दर्शकांच्या म्हणण्यात तथ्य आहे. सद्यःस्थितीतील राजकारण, समाजकारणावर भाष्य करून प्रबोधनाचा हेतू उघड असला तरी त्याला प्रचाराचं स्वरूप आलेलं नाही. त्यात 'अभिनिवेश' नाही, 'आक्रस्ताळेपणा' नाही आणि 'उपदेशाचे डोस’ पाजणंही नाही. हा 'तोल' साधता आल्यामुळेच, प्रेक्षकांना अंतर्मुख करायला लावण्याची क्षमता या नाट्य-रुपकात आली आहे. 'हे नाही, ते नाही, तेही नाही' असा पाढा वाचल्यानंतर मग प्रश्न उरतो- “या नाटय-रुपकात आहे तरी काय?"

तीनशे वर्षांपूर्वी तुकाराम नावाचा एक सामान्य माणूस होऊन गेला. आयुष्याच्या उत्तरार्धात त्याने आपला आतला आवाज ऐकला आणि नंतर त्याप्रमाणे जगला. त्यानंतर तीनशे वर्षे उलटली. असाच एक सामान्य माणूस आयुष्याच्या उत्तरार्धात हताश झाला आहे, बेचैन झाला आहे, त्याची झोप उडाली आहे. त्याचं कशातच लक्ष लागत नाहीये! आपण कोण, कुठून आलो आहोत, कुठे जाणार आहोत, आपल्याला काय व्हायचं होतं, आपण झालो काय, या प्रश्नांनी तो हैराण झाला आहे. या अस्वस्थ अवस्थेतच त्याच्या हातात तुकारामाची गाथा येते. एकेका अभंगावरून नजर फिरविताना त्याला त्या अभंगांचा वेगळाच अर्थ प्रतीत होऊ लागतो. आणखी पुढे जातो तेव्हा त्याच्या लक्षात येतं,”अरेच्या, एका टप्प्यावर तुकारामही आपल्यासारखाच वैतागलेला होता. हा सामान्य माणूस एकेक अभंग वाचतो आणि स्वतःच्या आयुष्याकडे, समाजाकडे तटस्थपणे पाहू लागतो आणि मग सुरू होतं मुक्त चिंतन…”

आम्ही वैकुंठवासी ।

आलो याचिं कारणाशी ॥

या अभंगावर हा एकविसाव्या शतकातला सामान्य माणूस थबकतो. 'वैकुंठ', 'कारण' या शब्दांच्या अर्थाशी झटापट करतो तेव्हा त्याच्या लक्षात येतं... 'आपण कशासाठी जगलो. आपल्या जगण्याला काही कारण होतं का, तर नव्हतं!' त्याला अनेक शास्त्रज्ञ, कलाकार, समाजसेवक आठवतात. संपत्तीचं पाठबळ नसताना, समाजाचा विरोध असतानाही काही सामान्य लोकांनी 'असामान्य’ काम केलं, पण मग आपल्याला का नाही जमलं? याचं कारण आपल्या जगण्याला काही 'कारण 'च नव्हतं. त्याच वेळी त्याच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडतो... या सामान्यातील ‘असामान्य’ माणसांमध्ये आणि आपल्यामध्ये एक महत्त्वाचा फरक होता. या लोकांना जगण्यासाठी 'कारण' सापडलं आणि आपल्याला ते सापडलं नाही! म्हणजे एकदा जगायचं 'कारण' सापडलं की आयुष्य बनतं एक 'आनंदवनभुवन', तल्लीनतेनं भारलेलं, कंटाळ्याचा लवलेश नसलेलं. ज्यांना जगायचं 'कारण' सापडलं ती माणसं 'वैकुंठवासी' आणि त्यांचं जे काही 'कारण' असेल तो त्यांचा 'विठोबा.' ज्यांना 'विठोबा' सापडत नाही त्यांचं जीवन अर्थहीन आहे, असंच ह्या एकविसाव्या शतकातल्या सामान्य माणसाला वाटतंय.

हा विचार अमरापूरकरांनी इतका व्यवस्थित प्रेक्षकांच्या गळी उतरवला आहे की 'नाट्य-रूपक' प्रेक्षकांच्या मनाची पकड इथेच घेतं. त्यातच ‘आलो याचि कारणाशी' हे वाक्य पुन्हा पुन्हा अशा काही झोकात म्हटलं जातं की बस्स!

आयुष्याच्या पूर्वार्धात तुकोबा सर्वसामान्यांसारखाच कंटाळलेला, कासावीस झालेला होता पण ‘विठोबा' सापडल्यानंतरचा तुकोबा वेगळाच होता. मादाम क्युरीचं उदाहरण घेऊन हा मुद्दा अधिक स्पष्ट केला आहे. 'संशोधन' हा तिचा 'विठोबा' होता. कलाकार, समाजसेवक, वैज्ञानिक आणि एखाद्या क्षेत्राला वाहून घेणारा, तल्लीनतेने काम करणारा माणूस 'वैकुंठवासी’ च असतो.

आपल्याला 'विठोबा' सापडलाय का, असा प्रश्न प्रेक्षागृहातील प्रत्येक माणूस स्वतःलाच विचारायला लागतो. त्याचवेळी नाट्य रूपकातील दुसरा भाग पुढे येतो-

‘पूर आला आनंदाचा ।

लाटा उसळती प्रेमाच्या ॥'

हा तुकोबाचा अभंग घेऊन चिंतन पुढे सरकतं...

मनसोक्त आनंद भोगण्याची शक्ती आपण गमावली आहे, कारण त्यात प्रत्येक वेळी काहीतरी न्यून दिसतं. निखळ आनंद देऊ शकणारे पूर आपल्या आयुष्यात अनेक येतात पण आपण त्यात झोकून देत नाही. त्यामुळे प्रेमरसाने न्हाऊन निघत नाही. हे 'रूपक' स्पष्ट करण्यासाठी, नदीला आलेल्या पुराचं दृश्य संगीत-नृत्याच्या साहाय्यानं निर्माण केलं आहे. या ठिकाणी तात्यांच्या अभिनयाने विशेष उंची गाठली आहे. लहान मुलं पुरात झोकून द्यायला तयार असतात. त्यात डुंबण्यास उत्सुक असतात, त्यातून त्यांना प्रचंड आनंद मिळत असतो, पण वडीलधारी माणसं त्या मुलांना तसं करू देत नाहीत. बालवयात या बेभान उड्या मारणारी मुलं, म्हणजेच प्रौढ वयात कशाचा तरी ध्यास घेणारी माणसं असा ध्यास त्या लोकांना लागतो कारण... उसळत्या लाटा, प्रेमाच्या ! मानवी मूल्यांना जोडणारा आदिबंध म्हणजे प्रेम. मनातील सारी किल्मिषं धुवून काढणाऱ्या प्रेमाच्या लाटा येतात तेव्हा 'घाला- उडी भाईनो' असं तुकोबा म्हणतात.

1942 ची चळवळ म्हणजे असाच पूर होता. तेव्हा गांधींनी असाच पुकारा केला होता- घाला उडी भाईंनो ! 'प्रत्येकाच्या आयुष्यात झोकून द्यावं, उडी घ्यावी असा महापूर येतो तसा तो माझ्याही आयुष्यात आला, पण मी झोकून देऊ शकलो नाही, प्रेमाच्या लाटांत न्हाऊन निघालो नाही. मनातली किल्मिषं धुवून काढली नाहीत, ही खंत व्यक्त केली आहे. घाला उडी भाईंनो असं खुणावणाऱ्या लाटांऐवजी 'माघारी व्हा' या हाकांनाच आपण प्रतिसाद दिला याचं त्याला शल्य आहे.

तुकोबांचा तिसरा अभंग आहे-

'तुम्हापाशी आम्ही येऊनिया काय ।

वृथा सीण आहे चालण्याचा।।'

या अभंगासोबत जोडल्या गेलेल्या शिवाजी तुकाराम भेटीच्या अख्यायिकेंचा संदर्भ देऊन हा सामान्य माणूस चिंतन करतोय अशा प्रकारचीच वैराग्य वृत्ती धारण केलेल्या माणसांबद्दल.

आगरकरांचं उदाहरण विस्तारानं दिलं आहे. सत्ता-संपत्ती, प्रसिद्धी यांचा विचार न करता आपल्या ध्येयाच्या मागे धाव घेणारी ही माणसं.

धरणात बुडणाऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी लढणारी सामाजिक कार्यकर्ती, आदिवासींसाठी काम करणारं दांपत्य, माणसांचा शोध घेणारा संवेदनशील लेखक, बुवा बाबांचे बुरखे फाडणारा तरुण ही समकालीनांची नावं प्रेक्षकांपर्यंत नेमकी पोहोचतात.

या माणसांना वाकवता येत नाही, ही माणसं प्रलोभनाला बळी पडत नाहीत; त्यांना खरेदी करता येत नाही. नाटकातील सामान्य माणसाला त्यांच्या या गुणांचं अप्रूप वाटतं, ही माणसं 'तुम्हापाशी येऊनिया' या प्रवृत्तीची वाटतात. या पार्श्वभूमीवर छोट्या छोटया प्रलोभनाला बळी पडत क्षुद्र गोष्टींसाठी तडजोडी करत आपण जगलो याचं मात्र वैषम्य वाटतं.

'सुख पाहता जवापाडे ।

दुःख पर्वताएवढे ॥'

या अभंगावर नजर जाते तेव्हा या सामान्य माणसाला यातला अर्थ लागतो. यातल्या 'पाहता' शब्दाचा नेमका अर्थबोध त्याला होतो. सुख- जवापाडे आणि दुःख पर्वताएवढे वाटणे हा सर्व दृष्टिकोनाचा भाग आहे. म्हणजे आपण जगाकडे कसे पाहतो यांवर सर्व अवलंबून आहे. संत लोक आपल्याला हे सांगून थकले; पण आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं. संत वचनातून नेमका अर्थ आपण घेतलाच नाही. त्यामुळे आपल्याला जीवनाचं नीट आकलन होतच नाही, बुद्ध, मार्क्स, फुले यांचे संदर्भ देऊन या अभंगाचं विवेचन केलं आहे.

थोडक्यात काय तर वरील चार अभंग घेऊन 'नाट्य-रूपक' गुंफलं आहे. हे चारही अभंग- कवितां खरवंडीकर आणि अस्ताद काळे यांनी आपल्या सुरेल आवाजात सादर केले आहेत. 'स्मितालय'च्या दहा कलाकारांनी सुरेख नृत्य सादर करून 'नाटय-रूपक' सोपं करण्यात हातभार लावला आहे.

हे नाटक आहे तरी काय ह्या प्रश्नाचं . उत्तर असं देता येईल…

एक टक्का माणसं प्रवाहाविरुद्ध पोहून समाजासाठी धडपड करतात, एखाद्या क्षेत्राला वाहून घेतात. उरलेल्या नव्व्याण्णव मधील एका माणसाला आयुष्याच्या उत्तरार्धात जाणीव होते, की आपण खऱ्या अर्थाने जगलोच नाही. प्रवाहाविरुद्ध पोहणारी ही एक टक्का माणसंच खरी जगली. त्याचं हे आकलन तो उरलेल्या अठ्ठयाण्णव टक्के लोकांसमोर उघडं करतोय ही या नाटकाची मध्यवर्ती कल्पना म्हणता येईल.

हे नाट्य-रूपक सर्वांनीच पाहिलं पाहिजे. अट्टयाण्णव टक्के लोकांना आपला आतला आवाज ऐकवण्याचं काम करतं, म्हणून त्यांनी तर पाहिलंच पाहिजे. पण ह्या नाट्य रूपकातील सामान्य माणसांसारखे उशीरा जाग आलेले एक टक्का आहेत, त्यांनी पाहिलं तर त्यांची अस्वस्थता कमी होईल. पण प्रवाहाविरुद्ध पोहणारे असामान्य समजले जातात, त्या एक टक्क्यांना या नाट्य रूपकात आव्हानात्मक, आतून-बाहेरून हलवून सोडणारं काहीच सापडणार नाही. कारण ध्येयवादाने झपाटून त्यांनी काम केलेलं असतं. पण अशा लोकांना 'Yes we are on the right direction' असं वाटून आत्मतृप्तीचं समाधान मात्र हे नाटक पाहिल्यावर निश्चित मिळेल.

नाट्यगृहातून बाहेर पडलेल्यांना 'आलो याचि कारणाशी' आणि 'घाला उडी भाईंनो!' ही दोन विधानं मात्र कायम स्मरणात राहतील, अधून-मधून अस्वस्थ करतील!

Tags: मादाम क्यूरी विठोबा आनंदवनभुवन तुकाराम झेलम परांजपे भास्कर चंदावरकर चंद्रकांत कुलकर्णीं सत्यकथा 'मौज 'नाट्य रुपक' आनंद जातेगावकर विजय तेंडुलकर डॉ. श्रीराम लागू कुसुमाग्रज सदाशिव अमरापूरकर Madam Querie Vithoba Anandvanbhuvan Tukaram Zelam Paranjape Bhaskar Chandavarkar Chandrakant Kulkarni Satykatha Mauj Natya Rupak Aanand Jategaonkar Vijay Tendulakr Dr. Shriram lagu Kusumagraj Sadashiv Amarapurkar weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

विनोद शिरसाठ,  पुणे
vinod.shirsath@gmail.com

मागील दीड दशकापासून साधना साप्ताहिकात कार्यरत असलेले विनोद शिरसाठ हे साधना साप्ताहिक, साधना प्रकाशन व कर्तव्य साधना (डिजिटल पोर्टल) यांचे संपादक आहेत.


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके