डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

चळवळी, आंदोलने करून सुधारणा होतात. पण शास्त्रीय शोधाने होणाऱ्या सुधारणा जास्त वेगाने होतात. स्वयंपाकघरातील मिक्सर, कुकर, गॅस यांमुळे स्त्रियांचे कष्ट कमी झाले, तेवढे स्त्री-मुक्ती चळवळींमुळे नाही झाले. रेल्वे आणि मोटारगाडया आल्यावर शेजारी कोण बसलंय, हे विचारायची सोयच राहिली नाही. जाती-तोड आंदोलनापेक्षा हे जास्त परिणामकारक ठरलं.

आकाश - विवेक 

"विवेक, त्या माशेलकरांना 'जागतिक आरोग्य संघटने’नं कुठल्यातरी आयोगाचं उपाध्यक्षपद दिलंय."

"हा 'सन्मान' आहे. त्यांचा आणि भारताचाही! 'बौद्धिक संपदा हक्क' त्यांच्यामुळेच सर्वसामान्य भारतीयांना माहीत झालाय."

"पण मला वाटतं, हळदीचं पेटंट मिळवण्यासाठी त्यांनी आंतरराष्ट्रीय न्यायालयात जी लढाई केली, त्याची पावती आहे ही."

"हे एवढंच पुरेसं ठरलं नसावं. चार वर्षांपूर्वी पुण्यात सायन्स काँग्रेस भरली होती. त्यावेळी अध्यक्षीय भाषणातून त्यांनी नव्या भारतासाठी 'पंचशील' तत्त्व दिलं. ते पंचशील माशेलकरांच्या आतला विचारवंत दाखवतं."

"हैदराबादला जागतिक मराठी परिषद झाली होती, त्यावेळचं अध्यक्षीय भाषणही त्यांचा व्यापक दृष्टिकोन दाखवतं, पण..."

"आजची बातमी वाचलीस का? 2004 हे वैज्ञानिकता जागरूकता वर्ष म्हणून घोषित झालंय आणि त्यासाठीच्या समितीचं अध्यक्षपद गोवारीकरांकडे आलंय."

"पण अशा आयोगावर, समितीवर काम करून ते आपला अमूल्य वेळ वाया घालवताहेत, असं नाही वाटत?"

"छे, छे! जबरदस्त क्षमता असणारी माणसं आहेत ही! त्यांचं संशोधन महत्त्वाचं आहेच, पण मला वाटतं, समाजात विज्ञानविषयक जागृती करण्यासाठी ते जे योगदान देतात, ते अधिक मोलाचं आहे."

"आता ते कलाम बघ ना! जातील तिथं लहान मुलांशी संवाद साधतात. यातून काय साध्य होणार आहे?"

"मुलांना ह्या भेटी अविस्मरणीय वाटत असणार. त्यातले सर्वच 'वैज्ञानिक' होतील असं नाही. पण अनेक मुलांना प्रेरणा मिळते, तेही कमी नाही."

"सी. व्ही. रमण यांनाही नेहरूंनी उपराष्ट्रपती पदासाठी विचारलं होतं, असं ऐकलंय मी."

"खरं आहे ते! पण हा ज्याच्या त्याच्या आवडीचा, स्वभावाचा भाग आहे. शिवाय त्या काळात भारतात संशोधन करणं अधिक महत्त्वाचं होतं. आज विज्ञानाचा प्रचार करणं जास्त महत्त्वाचं आहे. म्हणून मला वाटतं, त्या वेळी रमण यांनी उपराष्ट्रपती पद नाकारलं, हे योग्य केलं; आणि आता कलाम यांनी राष्ट्रपती पद स्वीकारलं हेही योग्य केलं."

---

आकाश - आनंद

"आकाश, युरेका युरेका!" 

"आनंद, एखादं गहन सत्य सापडलं की काय?"

"गहन सत्य नाही, पण 'टाइम' मासिकाचा जुना अंक सापडला. 'मॅन ऑफ द सेंच्युरी' म्हणून आइन्स्टाइनची निवड झाली. गांधीबाबापेक्षा जास्त मतं मिळाली त्या आइन्स्टाइनला."

"तो माणूस होताच तेवढ्या तोलामोलाचा. त्याच्या सापेक्षतावादाने, मानवाची विचार करण्याची दिशाच बदलली. 

"अरे, तो अंक वाचला... शॉक बसला मला! सापेक्षतावादाचा सिद्धांत त्याने मांडला, तेव्हा त्याचं वय किती होतं? अवघं सव्वीस वर्षे. म्हणजे आपल्याच वयाचा की रे!"

"आणि आपल्याला अजून तो सिद्धांतही नीट कळत नाही. 1905 साली आइन्स्टाइनने तो सिद्धांत मांडला. तू 2005 पर्यंत तरी समजून घे!"

"का टिंगल करतोयस?"

"टिंगल नाही बाबा! त्या सापेक्षतावादाने खूप त्रास दिलाय मला. अनेक पुस्तकं धुंडाळली तरी तो कळत नव्हता. 'सापेक्षतावाद म्हणजे काय?’ अशा नावाची एक पुस्तिका वाचून तो थोडाफार कळला; पण त्याची व्याख्या करता येईना."

"त्यावेळी तरी कुठे कळला होता अनेक शास्त्रज्ञांना? 1905 चा सिद्धांत सर्वमान्य व्हायला 1925 साल उजाडावं लागलं."

"तेही खरंच आहे म्हणा. नोबेल पारितोषिक समितीही गोंधळली होती. शेवटी आइन्स्टाइनला नोबेल मिळालं पण सापेक्षतावादासाठी नाही, तर फोटोइलेक्ट्रिक इफेक्टसाठी!"

"पण आपल्या सर्व मित्रांपर्यंत सापेक्षतावाद पोहोचला, त्याचं श्रेय तुलाच बरं का!"

"खरं तर तो सिद्धांत नीट पोहोचलाय असं मला वाटत नाही आणि मलाही पूर्ण समजलाय की नाही, याबद्दल शंकाच आहे."

“विद्यार्थिदशेतच सापेक्षतावाद कळला, तर जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो, हा माझा अनुभव आहे."

---

आकाश - संग्राम 

"मी काय म्हणतो, विज्ञान व अध्यात्माची सांगड घातली पाहिजे. तरच मानवजातीला भवितव्य आहे!" 

"संग्राम, सध्याच्या सभासमारंभातून फेकला जाणारा हा पॉप्युलर डायलॉग आहे."

"मग, तुला काय म्हणायचंय, विज्ञानामुळे सर्वच प्रश्न सुटतात?" 

"विज्ञान असा दावा कधीच करीत नाही. आम्हाला ‘अंतिम सत्य' सापडलं, असं कोणताही 'सच्चा वैज्ञानिक' म्हणणार नाही. विज्ञान आणि वैज्ञानिक नम्र असतात."

'अध्यात्म उद्धट असतं का?" 

"पण व्यक्तिगत अनुभवांवरून 'वैश्विक सिद्धांत' मांडण्याचा प्रकार विज्ञानात होत नाही." 

"आकाश, 'साधना आणि अनुभव' हा अध्यात्माचा प्राण आहे.'

'निरीक्षण, प्रयोग, अनुमान या सर्वांच्या जोडीला तर्कशास्त्र हे विज्ञानाचं सूत्र आहे."

"तू फक्त विज्ञानावर बोलतोयस!" 

"हो, कारण 'विज्ञान' ही संकल्पना सुस्पष्ट आहे. अध्यात्माच्या संकल्पना व्यक्तीनुसार बदलतात."

"हे बघ, विज्ञान जिथे संपतं तिथून पुढे अध्यात्माचा प्रांत सुरू होतो!" 

"विज्ञानाला सीमारेषा नाहीत. सतत विकसित होणारं ते 'शास्त्र' आहे. हजारो वर्षांपासून विज्ञानाचा प्रवास चालू आहे."

"तरीही कित्येक प्रश्न अनुत्तरित आहेत.”

"हो! पण गूढ म्हणवली गेलेली कित्येक कोडी सुटली आहेत. अनेक चमत्कारांमागचं रहस्य उकललं आहे."

"सत्यसाईबाबासारख्या विभूतीकडे अनेक वैज्ञानिकही जातात."

"वैज्ञानिक जातात, मुख्यमंत्री जातात आणि पंतप्रधानही! पण, 'श्रद्धा-अंधश्रद्धा' हा एक मोठा विषय आहे. त्यावर आपण नंतर कधीतरी चर्चा करू."

"विज्ञानाने आकाशात भराऱ्या मारल्या, सागराचा तळ गाठला. पण समोरच्या माणसाच्या मनाचा थांगपत्ता लागत नाही, त्याचं काय?"

"ह्या अफाट विश्वाचं गूढ थोडंबहुत उकलण्याचं काम मानवी मेंदूनेच केलंय. म्हणजे माणसाच्या मेंदूची क्षमता किती आहे? अशा मेंदूचं कार्य समजून घेण्यासाठी त्यापेक्षा अधिक शक्तिशाली असं काहीतरी पाहिजे ना! शिवाय मेंदूवर प्रयोग करण्यात अनंत अडचणी आहेत. अनेक वैज्ञानिकांचं तर म्हणणं आहे, की मानवी मेंदूचं पूर्ण आकलन झालं, तर विज्ञानाचा तो सर्वांत मोठा शोध असेल!"

"पण विज्ञानाचे अनेक सिद्धांत कालांतराने चुकीचे ठरतात."

"विज्ञान चुका करीतच पुढे जात असतं. नवीन संशोधनाने काही त्रुटी दाखवल्या तर 'कटू सत्य' समजून, त्या स्वीकारल्या जातात. न्यूटनच्या सिद्धांतातील त्रुटी आइन्स्टाइनने दाखवल्या आणि आइन्स्टाइनच्या स्टीफन हॉकिंग्ज यांनी दाखवल्या. डार्विन, अॅरिस्टॉटल यांचेही सिद्धांत चूक ठरले. पण म्हणून त्यांचं महत्त्व जराही कमी होत नाही."

---

आकाश - सागर

"आकाश, कधी कधी मला वाटतं हे वैज्ञानिकच खरे 'सुधारक' आहेत!" 

"अरे बाबा, 'सुधारक' नाही, मानवजातीचे 'उद्धारक' आहेत."

"ते तर आहेच, पण मी जरा वेगळ्या अँगलने पाहतोय... चळवळी, आंदोलने करून सुधारणा होतात. पण शास्त्रीय शोधाने होणाऱ्या सुधारणा जास्त वेगाने होतात. स्वयंपाकघरातील मिक्सर, कुकर, गॅस यांमुळे स्त्रियांचे कष्ट कमी झाले, तेवढे स्त्री-मुक्ती चळवळींमुळे नाही झाले. रेल्वे आणि मोटारगाडया आल्यावर शेजारी कोण बसलंय, हे विचारायची सोयच राहिली नाही. जाती-तोड आंदोलनापेक्षा हे जास्त परिणामकारक ठरलं. वाफेच्या इंजिनाचा शोध लावणारा जेम्स वॅट मोठाच समाजसुधारक वाटतोय मला!"

"पण तुला माहीत आहे का, हजारांहून अधिक यंत्र उपकरणं बनवणारा एडिसन म्हणाला होता, मी संशोधक नाही. न्यूटनसारख्यांचं काम कित्येक पटींनी मोठं आहे. आर्किमिडीज, पायथॅगोरस यांच्यासारखा एखादा सिद्धांत माझ्या नावावर लागला असता, तर मला अधिक आनंद वाटला असता.”

"मूलभूत विज्ञान आणि उपयोजित विज्ञान अशा दोन शाखा आहेत. त्यातल्या सीमारेषा अस्पष्ट आहेत. पण ते जाऊ दे. मला सांगायचंय ते वेगळंच. आपल्या समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवला पाहिजे. मग बरेच प्रश्न निकालात निघतील."

"मला वाटतं, साहित्यिक, शिक्षक, पत्रकार हे लोक वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्याचं काम चांगलं करू शकतील.”

"आकाश, त्या साहित्यिकांचं नको सांगू काही. मराठी साहित्यिकांनी विज्ञानाचा अभ्यास कधी केलाच नाही. तो जर केला असता तर वैज्ञानिक दृष्टिकोन समाजात रुजला असता, साहित्य सकस झालं असतं आणि मराठी भाषेची चिंताही करावी लागली नसती."

"मराठीत विज्ञानविषयक साहित्य आलंच नाही का?"

"दोन सन्माननीय अपवाद होते. श्री. म. माटे आणि पु. ग. सहस्रबुद्धे. माटेमास्तरांनी 'विज्ञानबोधाची प्रस्तावना' हे सुंदर पुस्तक लिहिलं होतं आणि पु.गं.नी 'विज्ञानप्रणीत समाजरचना' हा अभ्यासपूर्ण प्रबंध लिहिला होता. सत्तर वर्षांपूर्वी ह्या दोघांनी चांगली सुरुवात केली होती. पण त्यांचा वारसा चालवणारं पुढे कोणी झालंच नाही."

"माटे मास्तरांचे ‘प्रयोगशाळेला शरण जा' आणि 'देशोदेशीचे ज्ञानेश्वर' हे दोन लेख मलाही आवडले होते."

"अलीकडच्या काळात विज्ञानाचा अभ्यास असणारा मराठी साहित्यिक दिसतच नाही. त्याचा परिणाम म्हणून नारळीकर, आपटे, फोंडके अशा वैज्ञानिकांना लिहावं लागतंय.”

"सागर, तसं पाहिलं तर विज्ञान फारच मनोरंजक आहे. पण आपल्या शाळांतून फारच कठीण पद्धतीने ते शिकवलं जातं. मूलभूत संकल्पना शाळेत नीट समजत नाहीत आणि मग तो विषय नावडता होतो."

"अलीकडे पुणे विद्यापीठात अरविंद गुप्ता नावाचा एक अवलिया आलाय. त्याने त्याचं आयुष्य वैज्ञानिक खेळणी, पुस्तकं व उपक्रम यासाठी खर्च केलंय. लहान मुलांतच रमतो, प्रयोग करून दाखवतो."

"मी पण ऐकलंय त्याच्याबद्दल. बरं झालं, नारळीकरांनी आयुका सोडल्यानंतर विद्यार्थ्यांना आकर्षित करणारं कोणीतरी विद्यापीठात आहे."

"स्वाक्षरीच्या निमित्ताने का होईना, पण हजारो मुलांनी पत्र पाठवून नारळीकरांना प्रश्न विचारले आणि दोन दोन ओळींची का होईना, त्या सर्व पत्रांना नारळीकरांनी उत्तरं दिली. नारळीकरांना सलाम केला पाहिजे.”

---

आकाश - प्रकाश

“आकाशराव, मला सांगा आकाश निळं का असतं?" 

"प्रकाशराव, आकाश निळं का दिसतं, असं विचारा!"

"हो, तेच ते भाषाशास्त्राचं ज्ञान नका दाखवू इथे! हा विज्ञानाचा प्रश्न आहे."

"नाही सांगता येणार मला! पण असाच प्रश्न फार पूर्वी एका युरोपियन शास्त्रज्ञाला पडला होता, असं आठवतंय थोडंसं."

"युरोपियन नाही, भारतीय शास्त्रज्ञालाच पडला होता. 1921 साली, जहाजातून प्रवास करताना.”

"बरं, मग पुढे काय झालं?"

"नंतर त्याने संशोधन करून सिद्ध केलं, प्रकाशातील सात रंगांपैकी निळा रंगच आपल्या डोळ्यांपर्यंत पोहोचतो. म्हणून आकाश निळं दिसतं. हाच तो ‘Scattering of Light’ सिद्धांत. यालाच 'रमण इफेक्ट' म्हणतात आणि सी. व्ही रमण यांना ह्या शोधासाठीच नोबेल मिळालं.”

“28 फेब्रुवारी 1928 रोजी हा शोध लागला, म्हणून 28 फेब्रुवारीला ‘राष्ट्रीय विज्ञान दिन' साजरा केला जातो.”

"प्रकाशराव, बरं झालं आमच्या ज्ञानात भर टाकली. ज्ञानात नाही, माहितीत भर टाकली असं म्हणा! विज्ञानशाखेचे विद्यार्थी आहात, पण एवढी साधी गोष्ट माहीत नाही तुम्हाला आणि वरून आम्हाला शिव्या देता!”

"शिव्या... आणि तुला?"

"हो, हो! काल तू मला चारचौघांत शिव्या दिल्यास!"

"छे, छे! काहीतरी गैरसमज होतोय तुझा! तुला तर सोड, पण गेल्या काही वर्षांत मी कोणालाच शिवी दिल्याचं आठवत नाही मला.” 

"मला आनंदने सांगितलं. काल कड्यावर गप्पा मारताना तू म्हणालास, पक्याचं 'तर्कशास्त्र' कच्चं आहे. पक्याकडे वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अभाव आहे.”

"ह्या शिव्या आहेत?"

"होय! फार मोठ्या शिव्या आहेत!"

"वा! प्रकाश, तुला खरंच या शिव्या वाटत असतील तर मला आनंद वाटेल!"

Tags: सी व्ही रमण श्री म माटे दृष्टिकोन संशोधन विज्ञान c v raman s m mate scientific approach research science weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

विनोद शिरसाठ,  पुणे
vinod.shirsath@gmail.com

मागील दीड दशकापासून साधना साप्ताहिकात कार्यरत असलेले विनोद शिरसाठ हे साधना साप्ताहिक, साधना प्रकाशन व कर्तव्य साधना (डिजिटल पोर्टल) यांचे संपादक आहेत.


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके