डिजिटल अर्काईव्ह (2009-2020)

अमर्त्य सेन : एक आर्ग्युमेंटेटिव्ह इंडियन

माध्यमांनी निर्माण केलेल्या सध्याच्या मोदी मॅनियाच्या पार्श्वभूमीवर, धर्मातीत राजकारण आणि विकासाचे मॉडेल चर्चेच्या केंद्रस्थानी आणून अमर्त्य सेन ‘भारतरत्न’ असल्याप्रमाणेच वागले आहेत. अमर्त्य सेन यांची त्या दोन्ही मुद्‌द्यांसंदर्भातील भूमिका मात्र या गदारोळात फारशी पुढे आलेली नाही. ‘‘अशा प्रकारचे प्रश्न उपस्थित करणे हा माझा मूलभूत अधिकार तर आहेच, पण ते कर्तव्यही आहे... अमेरिकेत मी अल्पसंख्याक समाजात आहे आणि भारतात मात्र बहुसंख्याक समाजात आहे. अमेरिकेत अल्पसंख्याकांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी बहुसंख्याक लोक धडपडतात, हे मी तिथे पाहतो आहे. त्यामुळे भारतात आल्यावर मीपण अल्पसंख्याकांच्या हिताचे बोलले पाहिजे...’’ हे आहे सेन यांचे स्पष्टीकरण. 

1998 मध्ये अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक मिळाल्यावर अमर्त्य सेन भारतातील सर्वसामान्य जनतेलाही माहीत झाले. अर्थशास्त्रात नोबेल मिळवणारी आशिया खंडातील पहिली व्यक्ती आणि रवींद्रनाथ टागोरांच्या नंतर नोबेल मिळालेली दुसरी बंगाली व्यक्ती म्हणून त्यांची ओळख झाली. शिवाय, त्यांचा जन्मच शांतिनिकेतनमध्ये झालेला असल्याने आणि त्यांचे ‘अमर्त्य’ हे नाव साक्षात रवींद्रनाथांनी ठेवलेले असल्याने त्यांच्या नावाचे ग्लॅमर काही पटींनी वाढले. 1990 नंतर भारतात आर्थिक उदारीकरण पर्व अवतरले असल्याने, अर्थशास्त्रातील नोबेल भारतीय जनतेच्या दृष्टीने विशेष दखलपात्र ठरले. आणि म्हणूनच 1999 मध्ये अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील भाजप आघाडी सरकारने अमर्त्य सेन यांना भारतरत्न देऊन गौरविले.

त्यानंतरच्या 15 वर्षांत अमर्त्य सेन हे भारतातील तरुण वर्गात, बौद्धिक वर्तुळात आणि राजकीय-सामाजिक स्तरांवरही एक आयकॉन म्हणून वावरत आहेत. विशेष म्हणजे अर्थशास्त्रीय संशोधन करीत असतानाही त्यांनी लिहिलेली पुस्तके ‘जनरल’ वाचकांध्ये मोठ्या प्रमाणात वाचली गेली, ‘बेस्ट सेलर’ ठरली. ‘डेव्हलपमेंट ॲज फ्रीडम’, ‘द आयडिया ऑफ जस्टीस’, ‘रॅशनॅलिटी ॲन्ड फ्रीडम’, ‘आयडेंटिटी ॲन्ड व्हायोलन्स’, ‘ऑन एथीक्स ॲन्ड इकॉनॉमिक्स’ ही त्यांच्या पुस्तकांची नावेच इतकी बोलकी आहेत की, त्यातून त्यांच्या विचारांची दिशा सूचित होते. त्यांचे ‘द आर्ग्युमेंटेटिव्ह इंडियन’ हे पुस्तक तर त्यांना अर्थशास्त्राच्या पलीकडे घेऊन गेले आहे. त्यामुळे भारताच्या लोकशाही व्यवस्थेवरील एक भाष्यकार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाऊ लागले आहे.

प्राचीन भारतीय संस्कृतीतून आलेला बौद्धिक व राजकीय वारसा आणि वादसंवादाची परंपरा फार देदीप्यमान आहे आणि विद्यमान भारतातील लोकशाही व धर्मातीत राजकारण यासाठी त्यांचे खूप महत्त्व आहे, हा त्या पुस्तकातील मध्यवर्ती आशय आहे.

गेल्या आठवड्यात अमर्त्य सेन यांनी नरेंद्र मोदींच्या संदर्भात केलेल्या विधानामुळे आणि  नंतर त्यावर आलेल्या टोकाच्या अनुकूल व टोकाच्या प्रतिकूल प्रतिक्रियांमुळे देशभर जो वादसंवाद घडून आला, तो खूपच महत्त्वाचा ठरत आहे. खरे तर मोदींच्या संदर्भातील विधान अमर्त्य सेन यांनी स्वत:हून केलेले नाही, त्यांना विचारल्या गेलेल्या प्रश्नाला दिलेले ते केवळ उत्तर होते. ‘नरेंद्र मोदी पंतप्रधान व्हावेत, असे तुम्हाला वाटते का?’ या साध्या प्रश्नाचे उत्तर सेन यांनी दिले- ‘नाही, देशातील अल्पसंख्याकांच्या मनात ज्याच्याविषयी भीती आहे, अशी व्यक्ती पंतप्रधानपदावर येऊ नये.’ नोबेल सेन यांच्या या उत्तराला देशभर प्रसिद्धी मिळणे स्वाभाविक होते. पण अन्य अनेकांप्रमाणे सेन यांचेही ते मत आहे, असे समजून ही चर्चा कदाचित पुढे फार चालली नसती.

मात्र भाजपचे प्रवक्ते चंदन मित्रा यांनी ‘अमर्त्य सेन हे काँग्रेसचे प्रवक्ते असल्याप्रमाणे बोलत असून, भाजप सत्तेवर आल्यास त्यांचे ‘भारतरत्न’ काढून घेण्याचा विचार करू’ असे आडदांड विधान केल्यामुळे आणि ‘अटलबिहारी वाजपेयी यांनी सांगितले तर मी भारतरत्न परत करीनही’ असे उत्तर सेन यांनी दिल्यामुळे भाजपची ‘गोची’ झाली आहे. चंदन मित्रा यांचे ते विधान वैयक्तिक आहे, असे म्हणणे भाजपला भाग पडले. नंतर मित्रा यांनीही माफी मागितली आणि मी जरा जास्तच बोललो अशी कबुली दिली. पण त्याच वेळी ‘सेन यांनी फक्त अर्थकारणाविषयी बोलावे, राजकारणाविषयी बोलू नये’ असा अनाहूत सल्ला देणारे चुकीचे वक्तव्य केले. अमर्त्य सेन यांनी मात्र आपले मोदींच्या संदर्भातील विधान मागे घेण्यास नकार दिला आहे आणि त्याहीपुढे जाऊन मोदींच्या विकासाच्या मॉडेलच्या दिशेने ती चर्चा सरकवली आहे.

माध्यमांनी निर्माण केलेल्या सध्याच्या मोदी मॅनियाच्या पार्श्वभूमीवर, धर्मातीत राजकारण आणि विकासाचे मॉडेल चर्चेच्या केंद्रस्थानी आणून अमर्त्य सेन ‘भारतरत्न’ असल्याप्रमाणेच वागले आहेत. अमर्त्य सेन यांची त्या दोन्ही मुद्‌द्यांसंदर्भातील भूमिका मात्र या गदारोळात फारशी पुढे आलेली नाही. ‘‘अशा प्रकारचे प्रश्न उपस्थित करणे हा माझा मूलभूत अधिकार तर आहेच, पण ते कर्तव्यही आहे... अमेरिकेत मी अल्पसंख्याक समाजात आहे आणि भारतात मात्र बहुसंख्याक समाजात आहे. अमेरिकेत अल्पसंख्याकांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी बहुसंख्याक लोक धडपडतात, हे मी तिथे पाहतो आहे. त्यामुळे भारतात आल्यावर मीपण अल्पसंख्याकांच्या हिताचे बोलले पाहिजे...’’ हे आहे सेन यांचे स्पष्टीकरण.

‘ऑन लिबर्टी’ या ग्रंथामुळे जगभर माहीत असलेल्या जॉन स्टुअर्ट मिल यांचे ‘अल्पसंख्याकांची सुरक्षितता ही बहुसंख्याकांवर अवलंबून असते’ हे विधानही सेन यांनी उद्‌धृत केले आहे आणि अशा वादसंवादामुळे जे काही नुकसान होईल, ती किंमत आपण मोजली पाहिजे, असेही त्यांचे म्हणणे आहे.

अमर्त्य सेन यांचे An Uncertain Glory : India and its contradictions हे नवे पुस्तक (सहलेखक Jean Dreze) आले आहे. त्यात त्यांनी भारतासाठी विकासाचे मॉडेल कोणते असावे याची चर्चा केली आहे. तळागाळातील समूह आणि स्त्रिया यांचा सहभाग भारतातील विकासाच्या प्रक्रियेत कमी आहे, त्यांना विकासाचे फायदे मिळालेले नाहीत, अशी मध्यवर्ती मांडणी त्या पुस्तकात आहे. शिवाय, आरोग्य, पाणी, ऊर्जा यांच्यावर भर देण्याची आवश्यकता त्यात ठोसपणे मांडली आहे. पायाभूत सुविधा व उद्योग-व्यापार या क्षेत्रांत झाला, हे मान्य करून शिक्षण व सार्वजनिक आरोग्य या क्षेत्रांत गुजरातचा विकास मोदी राजवटीत झालेला नाही, हे सेन यांनी अधोरेखित केले आहे.

उदारीकरण पर्वातील 22 वे वर्ष संपत असताना विकासाची चर्चा अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर आली आहे. 1998 मध्ये अर्थशास्त्रातील नोबेलसाठी ज्यांचे नाव स्पर्धेत होते, त्या जगदीश भगवती यांनी विकासाच्या गुजरात मॉडेलचे कौतुक केले आहे. त्यामुळे उच्च बौद्धिक वर्तुळात अमर्त्य सेन यांचे मॉडेल आणि भगवती यांचे मॉडेल अशी चर्चा रंगली आहे. अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी भारतासाठी दोन्ही मॉडेल आवश्यक असून दोन्हींचा संयोग घडवून आणण्याची गरज असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे भगवती व सेन यांच्या विकासाच्या मॉडेल्सची चर्चा आता पुढे सरकायला हवी.

Tags: अमर्त्य सेन विनोद शिरसाठ लास्ट पेज Vinod Shirsath Amartya Sen Last Page weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

विनोद शिरसाठ,  पुणे
vinod.shirsath@gmail.com

संपादक, साधना साप्ताहिक


Comments

  1. Manoj khairnar- 03 Nov 2020

    छान अभ्यास पुर्ण लेख!!!

    save

प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात