आणीबाणी संपली, नंतर जनता राजवटही कोसळली त्या पार्श्वभूमीवर एका युवकाचं भारतीय लोकशाहीविषयीचं चिंतन, हा या लेखाचा विषय आहे. अठ्ठावीस वर्षांच्या तरुणाचं 'लोकशाही'बाबतचं 'आकलन' व 'चिंतन' इतकं प्रगल्भ असू शकतं,यावर नवीन वाचकांचा विश्वासच बसणार नाही, असा हा लेख आहे. पण ज्यांनी 'श्रद्धांजली' व 'जनांचा प्रवाहो...' वाचलं आहे त्यांच्या लक्षात येतं, याचं श्रेय हर्डीकरांनी त्यांच्या शाळेतील पायगावकर सर आणि कॉलेजातील प्रधान सर यांना दिलं आहे. लोकशाही संकल्पनेबाबत 'आंधळं प्रेम' किंवा 'आंधळा द्वेष' असणाऱ्यांच्या डोळ्यांत झणझणीत अंजन घालणारा हा लेख आहे. लोकशाहीत अनेक दोष आहेत, लोकशाहीला अनेक मर्यादा आहेत; पण तरीही तोच सर्वोत्तम पर्याय आहे, हा मुद्दा फारच प्रभावीपणे मांडलाय.
वाचनाच्या एकेक अवस्था पार करत विशिष्ट टप्प्यांवर आल्यावर लक्षात येतं, 'मराठीत लिहिणाऱ्या लेखकांच्या अनुभवविश्वाला व विचारविश्वाला फार मर्यादा आहेत.' इंग्रजीतील अभिजात पुस्तकांची चव चाखली आहे, अशा वाचकाला हे गुपित फारच लवकर कळतं. एखाद्याकडे 'जरा हटके, जरा खुलके' विचार व विश्लेषण करण्याची क्षमता असते, पण ते सर्व शब्दबद्ध करण्याची तयारी नसते, त्यामुळे दरवर्षी मराठीत हजार-बाराशे पुस्तकं प्रसिद्ध होतात, पण त्यांतील दहा-बारा पुस्तकंच लक्षवेधी ठरतात. 2005 या वर्षात लक्षवेधी ठरू शकेल आणि त्यातही आपलं वेगळेपण सांगू शकेल, असं एक मराठी पुस्तक जानेवारीत प्रसिद्ध झालंय. 'विठोबाची आंगी'. लेखक आहेत विनय हर्डीकर. या पुस्तकाची सवाँत मोठी अडचण ही आहे की, 'विनय हर्डीकर' या व्यक्तिमत्त्वाचा परिचय असल्याशिवाय या पुस्तकाची खुमारी कळणार नाही. दुसरी मोठी अडचण म्हणजे पुस्तकातील अनेक मुद्यांचे संदर्भ हर्डीकरांच्याच 'जनांचा प्रवाहो चालिला' आणि 'श्रद्धांजली'या दोन पुस्तकांत दडलेले आहेत. तिसरी अडचण दोन-तीन बैठकांत हे पुस्तक वाचून संपवता येणार नाही. 'विठोबाची आंगी' वाचताना वाचकाने सतत ध्यानात ठेवले पाहिजे, 'विनय हर्डीकरांनी आपल्या व्यक्तित्त्वाचा शोध घेण्याच्या प्रक्रियेतून वेळोवेळी जे लेख लिहिले, त्या लेखांचा हा संग्रह आहे.'
एखादा विषय अनेक दिवस (कधी-कधी महिने आणि वर्षही) मनात घोळल्याशिवाय कागदावर उतरवायचा नाही, किरकोळ अपवाद वगळता पुनर्लेखन करायचं नाही आणि लेखात काटछाट करायला संपादकांना परवानगी द्यायची नाही, हा या लेखकाचा बाणा आहे. आयुष्याच्या सुरुवातीची चौदा वर्ष राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कार्यकर्ता आणि नंतरची बावीस वर्ष शरद जोशीप्रणीत शेतकरी संघटनेचा कार्यकर्ता ही ओळख एका बाजूला; आणि शिक्षक, पत्रकार, प्रकाशन संस्थेचा संपादक ही ओळख दुसऱ्या बाजूला, असं हर्डीकरांचं व्यक्तिमत्त्व आहे. या दोहोंच्यामध्ये आणखी बरंच काही म्हणजे अभिजात शास्त्रीय संगीत, सत्यजित रे यांचे चित्रपट, शेक्सपिअरची नाटकं वगैरे वगैरे... 1979 ते 2004 या पंचवीस वर्षांत प्रसिद्ध झालेले निवडक अकरा लेख 'विठोबाची आंगी' पुस्तकात आहेत. माणूस, कालनिर्णय, अनुभव, महाराष्ट्र साहित्य पत्रिका, समाजप्रबोधन पत्रिका, महाराष्ट्र टाइम्स या नामवंत नियतकालिकांतून प्रसिद्ध झालेले हे लेख आहेत. या सर्वच लेखांचा 'फॉर्म ही वेगवेगळा आहे. यात मुलाखत आहे, रिपोर्ताज आहे, आत्मकथन आहे, व्यक्तिचित्र आहे; व वैचारिक निबंध आहेत आणि कविताही! 'लोकशाहीकडून प्रजाप्रभुत्वाकडे' हा या पुस्तकातील तब्बल बावन्न पानांचा लेख साप्ताहिक 'माणूस'च्या दिवाळी अंकात 1979 साली प्रसिद्ध झाला, तेव्हा विनय हर्डीकरांचं वय होतं- अठ्ठावीस वर्ष. हा लेख पूर्ण करीत असतानाच जयप्रकाश नारायण यांचं निधन झालं, म्हणून हा लेख त्यांना वाहिलेली श्रद्धांजली आहे.
आणीबाणी संपली, नंतर जनता राजवटही कोसळली त्या पार्श्वभूमीवर एका युवकाचं भारतीय लोकशाहीविषयीचं चिंतन, हा या लेखाचा विषय आहे. अठ्ठावीस वर्षांच्या तरुणाचं 'लोकशाही'बाबतचं 'आकलन' व 'चिंतन' इतकं प्रगल्भ असू शकतं,यावर नवीन वाचकांचा विश्वासच बसणार नाही, असा हा लेख आहे. पण ज्यांनी 'श्रद्धांजली' व 'जनांचा प्रवाहो...' वाचलं आहे त्यांच्या लक्षात येतं, याचं श्रेय हर्डीकरांनी त्यांच्या शाळेतील पायगावकर सर आणि कॉलेजातील प्रधान सर यांना दिलं आहे. लोकशाही संकल्पनेबाबत 'आंधळं प्रेम' किंवा 'आंधळा द्वेष' असणाऱ्यांच्या डोळ्यांत झणझणीत अंजन घालणारा हा लेख आहे. लोकशाहीत अनेक दोष आहेत, लोकशाहीला अनेक मर्यादा आहेत; पण तरीही तोच सर्वोत्तम पर्याय आहे, हा मुद्दा फारच प्रभावीपणे मांडलाय. वास्तवाचं यथा योग्य भान आणून देणाऱ्या, या लेखातील एक विसंगती मात्र खटकते. समाजवादी व संघ परिवार यांचं सामर्थ्य व मर्यादास्थळं इतकी व्यवस्थित दाखवलीत की 'हे दोन ध्रुव आहेत', हे वाचकांच्या मनावर पुरेपूर ठसतं; पण लेखाच्या शेवटी 'किमान समान कार्यक्रम' राबविण्यासाठी समाजवादी व संघ परिवाराने एकत्र आलं पाहिजे असं म्हटलंय. या ठिकाणी मनात प्रश्न येतो, हे दोन ध्रुव एकत्र येणं अशक्य आहे, हे याच लेखातील विवेचन सांगतंय. मग ही अवास्तव अपेक्षा का? पण हर्डीकरांचं हे मत अद्यापही बदललेलं नाही, हे या पुस्तकातलाच शेवटचा लेख वाचताना लक्षात येतं.
'लोकशाहीकडून प्रजाप्रभुत्वाकडे' या लेखानंतर तब्बल पंचवीस वर्षानंतरचा (2004चा) लेख आहे- 'सुमारांची सद्दी'. एका पुस्तकाचा आशय एकाच लेखात कौशल्याने बसवलाय, असं मराठी लेखकांच्या बाबतीत क्वचितच घडतं. 'सुमारांची सद्दी' याच प्रकारचा लेख आहे. स्वातंत्र्यानंतर सर्वच क्षेत्रांत सुमार दर्जाच्या लोकांचा सुळसुळाट झाला, याचं कारण समाजधुरीणांनी 'ज्ञानमार्ग' तुच्छ लेखला; त्या मार्गाने जाणाऱ्यांची हेटाळणी केली, हा गाभा असणाऱ्या या लेखात गांधी, सावरकर, यांच्यावर केलेली टीका टिप्पणी या महनीय व्यक्तींच्या कट्टर समर्थकांनाही अमान्य करता येणार नाही. पण हा लेख वाचताना काही ठिकाणी वाचकांना आपल्या सोयीचा अर्थ लावायला किंवा गैरसमज करून घ्यायला वाव आहे. काही विधानांचं, अधिक स्पष्टीकरण यायला पाहिजे होतं, असं वाटतं. शिवाय हर्डीकर जरा या नेत्यांकडून जास्तच अपेक्षा बाळगतात असंही दोन-तीन ठिकाणी वाटून जातं. "गांधीजींनी सेवामार्गाचा आग्रह धरल्याने ज्ञानमार्गाने जाऊ इच्छिणाऱ्यांना अपराधीपणाने पछाडलं. गांधीजींच्या या आग्रहाचा फार मोठा बळी म्हणजे साने गुरुजी. एम.ए.च्या परीक्षेत सुवर्णपदक मिळूनसुद्धा गुरुजी ज्ञानमार्गाने न जाता सेवामार्गाने गेले. यात समाजाचं तत्कालिक भलं झालंही असेल पण ज्ञानक्षेत्राचं दीर्घकालीन नुकसानच झालं."
हर्डीकरांचं हे चिंतन तत्त्वतः बरोबरच आहे, पण तो काळ, ती परिस्थिती ध्यानात घेतली तर या 'जरतर'ला अर्थ नाही. असे काही किरकोळ 'लूप होल्स' सोडले तर 'सुमारांची सद्दी' लेख वाचणं एक श्रीमंत अनुभव आहे. हर्डीकरांची पंचवीशी उलटल्यानंतरचा 'लोकशाहीकडून प्रजाप्रभुत्वाकडे' आणि पन्नाशी पार केल्यानंतरचा 'सुमारांची सद्दी' हे दोन लेख तुलनात्मक अभ्यास करण्यालायक आहेत. पहिल्या लेखातून आशावाद आणि 'समजून घ्या' असा भाव तर दुसऱ्या लेखातून निराशा व 'उद्विग्नता' व्यक्त होते. याच प्रकारचा तिसरा वैचारिक निबंध आहे. 'आमच्या देशाची स्थिती'. विष्णुशास्त्री चिपळूणकरांनी सव्वाशे वर्षांपूर्वी, याच शीर्षकाचा निबंध लिहिला होता. त्यांतल्याच एका अवतरणाने सुरुवात करून बाबरी मशीद उद्ध्वस्त केल्यानंतर हा लेख लिहिला आहे. 'बाबरी मशिदीचा विध्वंस मी निषेधार्ह पण क्षम्य मानतो; अनुकरणीय वा स्वागतार्ह मानत नाही,' अशी सुरुवात वाचल्यावर वाटतं, 'हा वैचारिक भोंगळपणा आहे.' पण संपूर्ण लेख वाचल्यावर लक्षात येतं ज्या पद्धतीने हे प्रकरण सर्वच राजकीय पक्षांनी हाताळलं ते पाहता शेवट असाच होणार होता. म्हणजे राजकीय पुढारी व समाजधुरिणांच्या विरोधातला हा सूर आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला पंचाहत्तर वर्षे पूर्ण झाली, त्या निमित्ताने लिहिलेल्या लेखाचं 'शीर्षक'च त्या लेखांचा 'सारांश' सांगून जातं 'उपहास सरस्वतीचा, उपेक्षा लक्ष्मीची, उठाठेव शक्तीची.'
याच लेखाचा समारोप करताना, 'संघाने आता देशभक्तीच्या शाळकरी व्याख्येतून बाहेर पडावे,' असं भेदक भाष्य केलं आहे. आयुष्यातील अतिशय महत्त्वाची सुरुवातीची चौदा वर्षे संघात घालवली आणि नंतरची तीस वर्षे संघाकडे चिकित्सक दृष्टीने पाहिल्याने या लेखाची धार फारच तिखट आहे. 'फारसं काही कळत नव्हतं तोवर माझं ठीक चाललं होतं.' हे एका लेखाचं शीर्षकही फारच बोलकं आहे. त्यात सर्वच क्षेत्रातील अधोगती, चुकीची धोरणं यांची चिरफाड केली आहे. 'पूर्णता की खोज में आणि 'जग बदल घालूनी घाव' हे दोन लेख सर्वांत अलीकडचे आणि हर्डीकरांच्या व्यक्तिगत जीवनाला स्पर्श करणारे. 'इंडियन एक्स्प्रेस 'मध्ये 'विशेष प्रतिनिधी' म्हणून काम करतानाचे अनुभव 'पूर्णता की खोज में 'मध्ये आले आहेत. 'जग बदल घालूनी घाव 'मध्ये 'शेतकरी संघटना, शरद जोशी आणि मी' असा विषय हाताळला आहे. या लेखाची मोठी गंमत ही आहे की, हर्डीकर एक कार्यकर्ता म्हणून शेतकरी संघटनेची ओळख करून देतात, शरद जोशींची विचारप्रक्रिया कशी चालते आणि एक माणूस म्हणून ते कसे आहेत,हे अतिशय समरसून सांगतात. पण मधून मधून आतला 'विनय हर्डीकर नावाचा माणूस' उसळी मारून वर येतो आणि शेतकरी संघटना व शरद जोशी यांचे लोकांना माहीत नसलेले दोषही सांगून जातो.
विनय हर्डीकरांसारखं व्यक्तिमत्त्व शेतकरी संघटनेत बावीस वर्षे कसं राहिलं याचं अनेकांना आश्चर्य वाटतं हा लेख वाचल्यावर लक्षात येतं; शेतकरी संघटनेची आंदोलनं, बदललेल्या भूमिका यात नाट्य होत, काव्य होतं, आव्हानं होती आणि सतत नावीन्य होतं. म्हणजे हर्डीकरांच्या मूळ प्रवृत्तीला मानवणारं वातावरण तिथं होतं, म्हणूनच ते बावीस वर्षे शेतकरी संघटनेत राहू शकले. या पुस्तकातील 'एक लेखक घडत जातो' ही आनंद यादवांनी घेतलेली मुलाखत महाराष्ट्र साहित्य पत्रिकेत 1980 साली प्रसिद्ध झाली, तेव्हा हर्डीकरांची तिशी उलटायची होती आणि नावावर एकच पुस्तक होतं. पण ही मुलाखत सडेतोडपणाचा अफलातून नमुना आहे. 'कोणते मराठी लेखक आवडले', या प्रश्नावर हा युवा लेखक म्हणतोय, "कोणते लेखक आवडले नाहीत ते आधी सांगतो." (ही यादी पुस्तकातच वाचा!) मुलाखतकारालाच 'हा भाबडा प्रश्न आहे' किंवा 'आपण आता खोल पाण्यात चाललो आहोत' असं हा लेखक सुनावतो तेव्हा गंमत वाटते. प्रयोग परिवारचे श्री. अ.दाभोळकर यांचं व्यक्तिचित्र रेखाटणारा 'अचानक संपलेला महोत्सव' हा लेख मनाला चटका लावून जातो. तर 'चेहरे बोलतात, डोळे बोलतात' या लेखाचा फॉर्म कोणता हे शेवटपर्यंत कळत नाही; प्रवासातल्या सात कवितांचा एक स्वतंत्र विभागही पुस्तकात आहे. पुस्तकाचं प्रत्येक प्रकरण सुरू होण्यापूर्वी एक 'चित्र' आहे आणि एक 'अवतरण' आहे.
आतल्याच बारा चित्रांपासून मुखपृष्ठ तयार केलंय. चिपळूणकर, आंबेडकर, कुरुंदकर या मराठी माणसांची आणि जॉर्ज ऑरवेल आणि 'ट्रान्सफॉर्मिंग इंडिया'चे लेखक फ्रँकेल यांची दीर्घ अवतरणं तर एकेका लेखाच्या दर्जाची आहेत. नामदेवाचा अभंग व न्या.रानडेंच्या अवतरणाने पुस्तकाची सुरुवात केली आहे. 'विठोबाची आंगी' हे पुस्तकाचं नाव नामदेवांच्या अभंगातूनच घेतले आहे. पुस्तकाची अर्पणपत्रिका आहे. 'माझा स्वतंत्र बाणा ओळखून जोपासणारे आणि विरोध करून तो धारदार बनविणारे या सर्वांना.' दहा ओळींच्या प्रास्ताविक टिप्पणीत हर्डीकरांनी लिहिलंय, 'या संग्रहातल्या प्रत्येक लेखाने माझा घाम काढला आहे.' या पुस्तकाशी समरस होऊन वाचणारा प्रगल्भ वाचकसुद्धा म्हणेल, 'या पुस्तकाने माझा घाम काढला आहे.' म्हणून बौद्धिक झटापट करायची इच्छा आणि कुवत असणाऱ्याने 'जनांचा प्रवाहो' आणि 'श्रद्धांजली' वाचूनच 'विठोबाची आंगी'ला भिडावे. काही पुस्तकांचं 'परीक्षण' करणं तर सोडाच, पण 'परिचय' करून देणंही फार फार कठीण असतं. 'विठोबाची आंगी' त्याच प्रकारचं पुस्तक आहे.
Tags: शेतकरी चळवळ महाराष्ट्र साहित्य पत्रिका नरहर कुरुंदकर बाबासाहेब आंबेडकर जॉर्ज ऑरवेल मराठी पुस्तक विनोद शिरसाठ विनय हर्डीकर Farmers Movement Maharashtra Literature Magazine Narhar Kurundkar Babasaheb Ambedkar George Orwell Marathi book Vinod Shirsath Vinay Hardikar weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
वर्गणी..
चौकशी
देणगी
अभिप्राय
जाहिरात
प्रतिक्रिया द्या