डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

वैचारिक नियतकालिकाचे संपादन करताना...

साधनाचा वाचक विविध क्षेत्रांतला, विविध स्तरांतला व राजकीय-सामाजिक दृष्टीने खूपच जास्त जागरूक असल्याने त्यांना विविध प्रसंगी साधनातून काही तरी मार्गदर्शन व्हावे असे वाटत असते. काही गदारोळाच्या व संभ्रमांच्या घटनाप्रसंगी तर साधनाची भूमिका काय आहे किंवा साधनाने काय भूमिका घेतली आहे, याकडे मुख्य प्रवाहातील माध्यमांचेही लक्ष असते. त्यामुळे साधना या वैचारिक नियतकालिकाचा प्राण राजकीय भूमिकेत आहे, असे म्हणता येईल.

‘एडिट मित्र’चा पहिला दिवाळी अंक ‘संपादन’ या विषयावर निघणार असून, त्यात ‘वैचारिक नियतकालिकाचे संपादन’ या विषयावर मी लिहावे, असा प्रस्ताव समोर आला; तेव्हा मागची-पुढची काहीही चौकशी न करता होकार दिला. याचे कारण, संपादक हा वाचक व लेखक यांच्यातील दुवा असतो हे खरे असले तरी, बहुतांश वाचक व लेखक यांना संपादन-प्रक्रियेविषयी फारशी माहिती नसते आणि वैचारिक नियतकालिकांची नेमकी भूमिका माहीत नसते असा माझा अनुभव आहे. म्हणजे या निमित्ताने आपल्या मनातील काही गोष्टी सांगता येतील, असा हेतू त्या तत्काळ होकारामागे होता. त्यानंतर लेखाच्या प्रारूपाचा विचार करू लागलो आणि लेखासाठीची शब्दमर्यादा (दोन हजार शब्द) समोर ठेवली, तेव्हा लक्षात आले की- या लेखात आपण साधना या वैचारिक नियतकालिकाचे संपादन करताना अत्यंत महत्त्वाचे ठरले असे काही गाभा घटकच तेवढे सांगू शकणार आहोत. (त्यात अंतर्गत ताणेबाणे बरेच आहेत; त्यांच्या तपशिलात जाता येणार नाही.)

भारतीय स्वातंत्र्याच्या पहिल्या वर्धापनदिनी म्हणजे १५ ऑगस्ट १९४८ रोजी साने गुरुजींनी साधना साप्ताहिक सुरू केले. दि. ११ जून १९५० रोजी गुरुजींचे निधन झाल्यावर आचार्य जावडेकर व रावसाहेब पटवर्धन सहा वर्षे, यदुनाथ थत्ते २५ वर्षे, वसंत बापट व ग.प्र.प्रधान १४ वर्षे आणि डॉ. नरेंद्र दाभोलकर १५ वर्षे अशी ध्येयवादी संपादकांची परंपरा साधनाला आहे. ‘विषमता व वैरभाव नष्ट करण्याची थोर साधना करण्याच्या ध्येयातून हे साप्ताहिक जन्म घेत आहे’ हे वाक्य साने गुरुजींच्या पहिल्या संपादकीय निवेदनात आहे आणि भारताच्या राज्यघटनेचे प्रतिबिंबही त्या संपादकीयात दिसते. त्यानंतर संपादक बदलल्यावर अंकांचे स्वरूप बदलत गेले, पण भारतीय राज्यघटना व त्यातून उद्‌घोषित केलेली मूल्ये हा साधनाचा गाभा कायम राहिला आहे. उलट्या बाजूने पाहिले तरी असेच दिसते की, असा गाभा कायम ठेवू शकणारे लोकच साधनाच्या संपादकपदावर आणले गेले आहेत. हा मुद्दा नीट लक्षात घेतला तर साधनाविषयीचे काही आक्षेप व काही अपेक्षा दूर होतील... आणि मग साधनात टोकाच्या डाव्या विचारांना व उजव्या विचारांच्या लेखनाला स्थान कधीच का मिळाले नाही, या प्रश्नाचे उत्तर सहज मिळू शकेल! अगदी स्पष्टच सांगायचे तर टोकाची डावी विचारसरणी व उजव्या विचारांची मांडणी ही भारतीय संविधानाच्या मूलभूत चौकटीला धक्का लावणारी आणि संविधानातील मूल्यांना मोडीत काढू पाहणारी आहे, म्हणून त्यांना साधनात विशेष स्थान मिळत नाही! हीच भूमिका साधनाचे संपादन करताना मी थोडी मोल्ड केली...

व्यवस्थेला ‘शत्रू’ मानणाऱ्या लेखनाला साधनात जागा द्यायची नाही. मात्र या व्यवस्थेत म्हणजे संसदीय लोकशाहीत अनेक दोष आहेत, ते घालवले पाहिजेत अशी भूमिका मांडणारे व त्यासाठी सनदशीर मार्गाने लढणारे यांच्यासाठी साधनाची पाने सदैव खुली ठेवली. यालाच पूरक अशी दुसरी एक गोष्ट केली, ती म्हणजे मुख्य प्रवाहातील गुंतागुंत व समस्या समजावून देणारे आणि त्यासाठी सामंजस्याची भूमिका मांडणारे लेखन यांचे प्रमाण वाढवले. म्हणजे मुख्य प्रवाहाचे गढुळलेपण कमी करण्याचा पुरस्कार करणाऱ्या आणि अन्य प्रवाहांना मुख्य प्रवाहाच्या जवळ आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या लेखनाला  साधनाची अधिक पाने खुली केली. म्हणजे बदल झाले नाहीत, होत नाहीत असा सूर असलेले लेखन शक्यतो टाळायचे... या संपादकीय भूमिकेचा सारांश सांगायचा तर वाचकांना अस्वस्थ करणाऱ्या लेखनाला साधनात भरपूर जागा द्यायची, पण वाचकांना फ्रस्ट्रेशन देणारे लेखन शक्यतो टाळायचे. कारण अस्वस्थतेतून बदलांसाठी उद्युक्त होता येते, फ्रस्ट्रेशनमधून मात्र नाउमेद तेवढी फैलावत राहते.

साधनाच्या सुरुवातीपासून आतापर्यंतच्या वाटचालीवर दृष्टिक्षेप टाकला तर लक्षात येते- साधना हे मुख्यत: राजकीय, सामाजिक व सांस्कृतिक स्वरूपाचे लेखन प्रसिद्ध करणारे नियतकालिक राहिले आहे. (आर्थिक विषयांवरील लेखन साधनात सर्वच काळात कमी आले आहे.) यातील ‘सांस्कृतिक’ प्रकारच्या लेखनात जास्त करून साहित्य आणि काही अंशी कला-क्रीडा या विषयांवरील लेखन आहे. काही अपवाद वगळता, हे लेखन वादाचा विषय बनलेले नाही. याचे एक कारण, अशा लेखनात राजकीय- सामाजिक भूमिका तितक्या उघडपणे येत नाहीत आणि दुसरे कारण, असे लेखन निवडणारे साधनाचे संपादक बऱ्याच जास्त तयारीचे असतात. सामाजिक प्रकारचे लेखन निवडतानाही साधनाच्या संपादकांमध्ये कधी संभ्रम किंवा दुमत झाल्याचे दिसत नाही. उदाहरणार्थ, जाती-धर्माच्या बाबतीत साधनाच्या भूमिका कधीही स्थितिवादी तर राहिल्या नाहीतच; उलट कमजोर किंवा अल्पसंख्य व मागास समूहांना सतत झुकते माप देणाऱ्या राहिल्या आहेत. म्हणजे दलित-आदिवासी, मुस्लिम, स्त्रिया या घटकांना झुकते माप दिले गेले आहे. एवढेच नाही तर, कमजोर घटकांना झुकते माप देणे हे सामाजिक न्यायाचे व बलशाली राष्ट्राचे प्राणभूत तत्त्व आहे, अशीच साधनाची भूमिका राहिली आहे. महिलांना आरक्षण व जातीवर आधारित आरक्षण हे निर्णय राजकीय असले तरी ते प्रश्न/समस्या मात्र सामाजिक आहेत, असे आपण मानतो. त्यासंदर्भात, साधनाची भूमिका ठामपणे आरक्षणाच्या बाजूचीच राहिली आहे!

मला स्वत:लाही सामाजिक व सांस्कृतिक विषयांवरील लेखन प्रसिद्ध करताना कसोटीचे क्षण कधी वाट्याला आले नाहीत आणि तशा प्रकारची टीकाही फारशी झाली नाही. मात्र साधनाचे संपादन करताना सतत कसोटी लागते ती संपादकाच्या राजकीय भूमिकेची. संपादकीय लेखन तर सोडाच, पण इतरांच्या छोट्या-मोठ्या लेखावरून किंवा एखाद-दुसऱ्या राजकीय विधानावरूनही साधनाच्या संपादकाला धारेवर धरले जाते, त्याच्या वैचारिक भूमिकेविषयी संशय व्यक्त केले जातात. त्या वेळी जो-तो ‘पोलिटिकली करेक्ट’ असण्याबाबत बोलत असतो आणि काही वेळा तर हुशार, त्यागी, सचोटीचे लोकही इतक्या परस्परविरोधी भूमिका मांडत असतात की, तिथे ठोस राजकीय भूमिका घेऊनही, स्वत:ची व साधनाची सहीसलामत सुटका करून घेणे हे काम मोठ्याच जिकिरीचे असते. त्या बाबतीत साधनाचे संपादकपद म्हणजे ‘काटेरी मुकुट’ आहे, असे म्हणायला हरकत नसावी! त्यात सर्वांत मोठी अडचण अशी असते की, प्रचंड व्यामिश्र असलेल्या राजकीय क्षेत्राला अनेक आयाम असतात आणि ते सतत बदलत असतात. त्यामुळे राजकीय घटना-घडामोडींवर लेखन करताना डोके शांत ठेवून विवेचन-विश्लेषण करणे, वेगळे व मूलभूत काही तरी मांडण्याचा प्रयत्न करणे आणि तरीही ते वादग्रस्त ठरणार नाही याची काळजी घेणे- अशी तिहेरी कसरत करायची असते. आणि साधनाचा वाचक विविध क्षेत्रांतला, विविध स्तरांतला व राजकीय- सामाजिक दृष्टीने खूपच जास्त जागरूक असल्याने त्यांना विविध प्रसंगी साधनातून काही तरी मार्गदर्शन व्हावे असे वाटत असते. काही गदारोळाच्या व संभ्रमांच्या घटनाप्रसंगी तर साधनाची भूमिका काय आहे किंवा साधनाने काय भूमिका घेतली आहे, याकडे मुख्य प्रवाहातील माध्यमांचेही लक्ष असते. त्यामुळे साधना या वैचारिक नियतकालिकाचा प्राण राजकीय भूमिकेत आहे, असे म्हणता येईल.

साधनाचे संपादन करताना ज्या काही राजकीय भूमिका घेताना माझी कसोटी लागली आणि त्यातून मी सहीसलामत बाहेर आलो, अशा तीन भूमिकांविषयी थोडक्यात सांगतो.

1. गेल्या सात-आठ वर्षांत साधनाने सर्वांत चांगला हाताळलेला राजकीय विषय म्हणजे नक्षलवाद. या विषयावर साधनात जेवढे लेखन आले आहे तेवढे व त्या प्रकारचे लेखन मराठीतील एकाही दैनिकाने, साप्ताहिकाने, मासिकाने प्रसिद्ध केलेले नाही. डिसेंबर  मध्ये पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी, ‘या देशातील अंतर्गत सुरक्षेला सर्वांत मोठे आव्हान नक्षलवादापासून आहे’ असे २००६जाहीर विधान केले. त्यानंतरच्या काळातील नक्षलवादी कारवायांबाबत त्रोटक का होईना माहिती देशवासीयांना मिळत राहिली आहे. पण ‘नक्षलवाद’ या विषयावर एक विशेषांक, दोन वर्षे चाललेली देवेंद्र गावंडे यांची लेखमाला आणि अन्य काही लेख साधनाने प्रसिद्ध केले आहेत. या सर्व लेखनातून नक्षलवादी कारवाया, शासनाची दमनयंत्रणा  व प्रशासकीय बेपर्वाई हे तीनही प्रमुख आयाम चर्चेला  आणूनही, साधनाची भूमिका नक्षलवादाच्या विरोधात राहिली आहे! तिथे नक्षलवादाला विरोध म्हणजे सरकारचे किंवा विद्यमान व्यवस्थेचे साधना समर्थन करीत आहे की काय, असे चित्र काही लोकांना दिसू लागले. अर्थात, त्या लोकांचे नक्षलवादाला समर्थन होते असे नाही, पण गरिबांसाठी/शोषितांसाठी नक्षलवादी लढताहेत म्हणून त्यांच्याबाबत सहानुभूती होती. ‘वाट चुकलेले देशभक्त’ अशा स्वरूपाची मांडणीही काही लोकांकडून झाली. पण त्यासंदर्भात, साधनाला फार स्पष्ट व नेमकी भूमिका घेता आली, याचे मला विशेष समाधान आहे. नक्षलवाद्यांचे मार्ग तर चुकीचे आहेतच, पण त्यांचे ध्येयही चुकीचे आहे, हा आमच्या भूमिकेचा राहिला गाभा आहे. कारण नक्षलवाद्यांना या देशाची राज्यघटना मान्य नाही, संसदीय लोकशाही मान्य नाही आणि सनदशीर मार्गाने लढणेही मान्य नाही. त्यांना त्यांच्या स्वप्नातील जी काही व्यवस्था आणायची आहे ती, विद्यमान व्यवस्था पूर्णत: उखडून टाकल्याशिवाय आणता येणार नाही आणि तसे करण्याचा प्रयत्न म्हणजे अराजकाला आमंत्रण देणे आहे, म्हणून नक्षलवादाला आमचा विरोध आहे! विद्याचरण शुक्ल व इतर नेत्यांवर नक्षली हल्ला झाल्यावर या विषयाचा तुकडा पाडणारा ‘नक्षलवादाला सहानुभूती हा भाबडेपणाच ठरेल!’ या शीर्षकाचा संपादकीय लेख मी लिहिला, तेव्हा डॉ.दाभोलकर म्हणाले होते- ‘नक्षलवादाच्या संदर्भात यापेक्षा रॅशनल भूमिका असूच शकत नाही.’


2. गेल्या वर्षी ‘आम आदमी पार्टी’ची स्थापना झाली, तेव्हा मोठा कसोटीचा प्रसंग निर्माण झाला होता. कारण अण्णा हजारेप्रणीत दिल्लीतील आंदोलनातून उदयाला आलेला तो पक्ष होता. त्याची तुलना आणीबाणीनंतरच्या जनता पार्टीशी केली जात होती आणि देशभरातील विविध स्तरांतील, विविध वर्गांतील लोकांचा ‘आप’ला प्रचंड पाठिंबा आहे, असे चित्र निर्माण झाले होते. खरे तर त्या वेळी ‘आप’ला विरोध करण्याची भूमिका आम्ही घेतली नव्हती. पण ‘आप’ दाखवत असलेली स्वप्ने अवास्तव आहेत, त्यांच्यावर विश्वास ठेवू नका, अपेक्षाभंग वाट्याला येतील- असे आमचे म्हणणे होते. ‘संपूर्ण किंवा आमूलाग्र परिवर्तन करणार’ हा ‘आप’चा दावा रणनीतीचा भाग म्हणून एक वेळ समजून घेता येत होता. पण विद्यमान व्यवस्था सडलेली, किडलेली आहे आणि दुसरे स्वातंत्र्य आणायचे आहे अशी मांडणी करून, ‘सध्याच्या व्यवस्थेत तुम्हाला सद्‌वर्तन करताच येणार नाही’ अशी भूमिका ‘आप’ची होती. आणि जी काही नवी व्यवस्था आणण्याबाबत त्यांच्याकडून सांगितले जात होते, ती ‘रोगापेक्षा इलाज भयंकर’ अशा स्वरूपाची वाटत होती. त्या वेळी केजरीवालांचे ‘स्वराज’ नावाचे पुस्तक आले होते, ‘तोच आमचा जाहीरनामा आहे’ असे केजरीवाल सांगत होते. हा सर्वच प्रकार जनतेचा भ्रमनिरास करणारा ठरणार आहे, हे सांगणे तेव्हा मला संपादक म्हणून खूपच आवश्यक वाटत होते. एवढेच नाही तर, ‘तसे केले नाही तर आपण आपले कर्तव्य बजावण्यात कमी पडलो’ अशी मनोधारणा बळावत चालली होती. तसे स्पष्टपणे सांगणे म्हणजे अनेक थोरा-मोठ्यांचा रोष ओढवून घेणे, हेही मला माहीत होते. पण तरीही त्या प्रसंगी मोठ्या निर्धाराने, ‘‘आपकडून अपेक्षा बाळगू नका,’’ असे साधनाच्या संपादकीयातून सांगितले होते. त्या काळात ‘‘भारतीय राजकारणात ‘आप’चे भवितव्य?’’ या शीर्षकाचे संपादकीय लिहिले होते, त्यात (वाचकांना तेव्हा खूपच धाडसी वाटलेले) एक विधान केले होते, ‘‘...या सर्व शक्यता मोडीत काढून ‘आप’ यशस्वी झाला तर, ‘आमचे भाकीत चूक ठरले’ या शीर्षकाचे संपादकीय लिहायला आम्हाला संकोच वाटणार नाही.’’ ‘आप’विषयीची ती ठोस भूमिका त्या ऐन कसोटीच्या वेळी घेऊ शकलो, त्याचे मुख्य कारण ‘स्वराज’ हे पुस्तक होते. मला तेव्हाही आणि आजही खंत याची आहे की, ‘आप’च्या समर्थकांनी व विरोधकांनीही ‘स्वराज’ या पुस्तकाला गांभीर्याने घेतले नव्हते.

3. ‘नरेंद्र मोदी यांच्या कर्तबगारीकडे कसे पाहावे?’ या शीर्षकाचे संपादकीय मी २००९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी लिहिले होते, त्याचा समारोप ‘असा नेता राष्ट्रीय स्तरावर हवा म्हणणाऱ्यांच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते!’ या विधानाने केला होता. त्यानंतर भाजपने त्यांना २०१४ च्या लोकसभा निवडणुकीचे प्रचारप्रमुख केले, तेव्हा ‘विनाशकाले विपरीत बुद्धी’ या शीर्षकाचे संपादकीय लिहिले होते. आणि त्यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून घोषित केले तेव्हा ‘संघाचे दग्धभू धोरण?’ या शीर्षकाचे संपादकीय लिहिले होते. शिवाय, या लोकसभा निवडणुकीच्या आधी व नंतर याच विषयावर लिहिलेल्या संपादकीयांची संख्या आठ-दहा तरी आहे. सांगायचे काय तर, साधनाने मोदींना सातत्याने विरोध केला आहे. मोदींना भाजपकडून पुढे केले जाणार नाही अशी खात्री आम्ही सुरुवातीला व्यक्त करत होतो, नंतर मोदी पंतप्रधान होऊ शकणार नाहीत अशी शक्यता व्यक्त करत होतो; पण आमचे ते अंदाज साफ चुकले. म्हणजे काय होणार नाही असे वाटणे व काय होऊ नये असे वाटणे, यातली सीमारेषा अस्पष्ट झाली होती. अर्थात, त्यासंदर्भात देशभरातील भल्या-भल्या राजकीय तज्ज्ञांचे, विश्लेषकांचे अंदाज तर चुकलेच; पण भाजपला व स्वत: मोदींनाही इतके यश अपेक्षित नव्हते. त्या यशाची नंतर सर्वमान्य अशी कारणमीमांसा झालेली आहे. उदा.- काँग्रेसबद्दलची प्रचंड नाराजी, माध्यमांनी बजावलेली सक्रिय भूमिका, अण्णा- बाबा यांची आंदोलने, प्रचंड मोठी संख्या असलेल्या तरुणवर्गाला मोदींनी आकर्षित करणे, राहुल गांधी पूर्णत: निष्प्रभ ठरणे, कॉर्पोरेट क्षेत्राने मोदींना आणण्यासाठी चंग बांधणे, मोदींची धडाकेबाज प्रचारमोहीम, आंतरराष्ट्रीय परिस्थितीमुळे देशाची अर्थव्यवस्था ढासळणे इत्यादी कारणे मोदींच्या यशामागे आहेत. साधनाने मोदींना सातत्याने केलेल्या विरोधावर काही उदारमतवाद्यांकडूनही खूप टीका झाली, पण तरीही, ती भूमिका मला स्वत:ला आजही चुकीची वाटत नाही. मोदींच्या विजयानंतर ‘पराभूतांनी जेत्यांशी कसे वागावे?’ या शीर्षकाच्या संपादकीयाच्या शेवटी सिकंदर आणि पोरस यांच्यातील त्या ‘जगप्रसिद्ध’ संवादाचा उल्लेख केला होता. कारण साधनाची मोदींविरोधाची भूमिका केवळ गुजरात दंगल या कारणामुळे नाही तर, संघपरिवाराचा हिंदुत्वाचा अजेंडा राबवण्याच्या धोक्यातून आलेली आहे. आता मोदी या देशाचे पंतप्रधान आहेत, त्यामुळे पंतप्रधानपदाचे अवमूल्यन होणार नाही, अशा पद्धतीनेच टीका यापुढे करावी लागेल. पण संघाचा मूळ अजेंडा राबवण्याचा प्रयत्न जिथे जिथे होईल तिथे मात्र कठोर टीका होत राहील!

वरील तीन उदाहरणे राजकीय क्षेत्राच्या संदर्भात आहेत, याच प्रकारच्या भूमिका लहान घटना-प्रसंगीही निभवाव्या लागतात. गेल्या पाच-सहा वर्षांत आर्थिक विषयांवरील भूमिकांचे सूचन करतानाही काही ताणाचे प्रसंग निर्माण झाले आहेत. त्याचे मुख्य कारण १९९१ मध्ये देशात अवतरलेल्या उदारीकरणाकडे कसे पाहावे, हेच राहिले आहे. ते पर्व अवतरले त्याला आता पाव शतक होत आले आहे आणि या संपूर्ण काळात कोणत्याही केंद्र व राज्य सरकारने हे धोरण उलट्या दिशेने फिरवण्याचा प्रयत्न केलेला नाही. (गती कमी-अधिक असेल, एवढाच काय तो फरक). या पार्श्वभूमीवर, माझी भूमिका हळूहळू निश्चित होत गेली आहे. आरक्षण व उदारीकरण परस्परांना पूरक ठरले, आर्थिक सुधारणा व कल्याणकारी योजना परस्परविरोधी नाहीत, एका मर्यादेनंतर अभ्यासापेक्षा दृष्टिकोन महत्त्वाचा ठरतो; या (आधी ‘लोकसत्ता’तून व नंतर ‘साधना’तून प्रसिद्ध झालेल्या) तीन लेखांतून गेल्या वर्षी मी उदारीकरणाच्या संदर्भात माझे आकलन मांडले होते. त्याला विविध क्षेत्रांतील लोकांकडून मिळालेली पावती लक्षात घेता, पुढील काळात आर्थिक विषयांवर निश्चित व निर्णयात्मक भूमिका घेता येईन, असा विश्वास मला वाटू लागला आहे.

वरीलपैकी ‘आप’च्या संदर्भातील भूमिका व उदारीकरणाच्या संदर्भातील भूमिका मांडण्याची सुरुवात डॉ.दाभोलकर असतानाच झाली होती. पण डॉक्टरांच्या हत्येनंतर त्या दोनही विषयांवर ठोसपणे लिहिणे म्हणजे अनेकांची नाराजी ओढवून घेणे ठरणार आहे, असे काही लोकांनी सुचवले होते. पण तरीही विचारपूर्वक तयार झालेल्या भूमिका मांडणे आवश्यक आहे, असे मला वाटत होते. शिवाय, तसे न करणे म्हणजे साधनाच्या संपादकालाही आपली भूमिका मांडण्याचे स्वातंत्र्य नाही, असा अर्थ निघत होता... आणि असे होणे साने गुरुजींपासून डॉ.दाभोलकर यांच्यापर्यंतच्या कोणत्याही संपादकाला आवडले नसते, असा माझ्या मनाचा कौल होता. असो. यापुढील काळात काय, असा प्रश्न काही लोकांच्या मनात येईल. त्यासंदर्भात एक महत्त्वाची गोष्ट सांगू इच्छितो. ती म्हणजे अर्थकारण व आंतरराष्ट्रीय राजकारण हे दोन विषय असे आहेत, ज्यांच्या संदर्भात साधनाला ठोस भूमिका घ्याव्या लागतील. त्या विषयांवर अभ्यास करण्यासाठी वेळ मिळावा म्हणून तर डॉक्टर दाभोलकर संपादक व मी कार्यकारी संपादक अशी रचना मला आणखी तीन वर्षे हवी होती. पण डॉक्टरांच्या हत्येनंतर माझे प्राधान्यक्रम बदलले आहेत, समीकरणच बदलून गेले आहे...

‘एडिट मित्र’ या संस्थेच्या ‘शब्दस्पर्श’ दिवाळी अंकात (२०१४) प्रसिद्ध झालेला हा लेख तीन कारणांमुळे साधनात पुनर्मुद्रित केला आहे. : साधना वाचकांशी संबंध असलेले संदर्भ, ६ जानेवारी या मराठी पत्रकार दिनाचे निमित्त आणि नव्या वर्षातील पहिला अंक… 

Tags: शब्दस्पर्श संपादन एडिट मित्र संपादकीय विनोद शिरसाठ editing skill edite mitra editorial vinod shirsath weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

विनोद शिरसाठ,  पुणे
vinod.shirsath@gmail.com

संपादक, साधना साप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके