डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

गेल्या पावणेदोनशे वर्षांत प्रिंट मीडियाचा गाभा ध्येय, पेशा, व्यवसाय असा बदलत गेला आहे. पण हे बदल प्रिंट मीडियाने स्वत: केलेले नाहीत. काळ बदलला, परिस्थिती बदलली, समस्या बदलल्या आणि उत्तरेही.म्हणजे बाह्यबदलांमुळे पत्रकारितेच्या मूल्यव्यवस्थेचा गाभा बदलत गेला आहे आणि आता तो तिसऱ्या अवस्थेत आहे.आजही ध्येय किंवा पेशा म्हणून पत्रकारिता कोणी करत असेल तर ते निश्चितच कौतुकास्पद आहे, पण त्यांची पत्रकारिता यशस्वी आहे का, समाजपरिवर्तनाला हातभार लावते का हा विचार कठोरपणे केला पाहिजे. परिवर्तनाला हातभार लावत नसेल तर दिव्य वारसा सांगत राहून निष्प्रभ अवस्थेत पत्रकारिता करण्याला विशेष अर्थ नाही.

मित्रहो, एस.पी.कॉलेजच्या हिंदी विभागाने आयोजित केलेल्या या परिसंवादात मी मराठीतूनच बोलू शकणार आहे, याबद्दल आपणा सर्वांची क्षमा मागतो...

खरं तर पॉलिश्ड इंग्लिश बोलणाऱ्यांपेक्षा सफाईदार हिंदी बोलणाऱ्यांचं आकर्षण मला जास्त वाटत आलं आहे आणि आपलं हिंदीतील वाचन, मराठी तर सोडाच पण इंग्रजीच्याही तुलनेत खूपच कमी आहे याची खंतही वाटत आली आहे. ते आकर्षण आणि ती खंत यांची तीव्रता आज जास्तच जाणवत आहे. त्यामुळे हिंदी भाषेबाबतची माझी स्थिती यानंतर सुधारली तर त्याचं थोडंतरी श्रेय या परिसंवादासाठी मला बोलावणाऱ्या संयोजकांकडे जाईल... असो.

आज मला ‘समाजपरिवर्तनात प्रिंट मीडियाची (मुद्रित माध्यमांची) भूमिका’ या विषयावर बोलायला सांगितलं आहे.या भाषणात, प्रिंट मीडियाच्या इतिहासाची उजळणी किंवा त्यातील बदलांचा मागोवा घेण्याची आवश्यकता वाटत नाही. याचे कारण त्याबाबत तुम्ही बऱ्यापैकी परिचित असाल आणि जर कोणी नसतील तर, वाचन करून त्याबाबत ते खूप काही जाणून घेऊ शकतील. तर या भाषणात प्रिंट मीडिया व समाजपरिवर्तन या संदर्भातील काही गाभाघटकांवर दृष्टिक्षेप टाकणार आहे, त्याबाबत थोडे विवेचन करणार आहे आणि त्यासाठी अगदीच माफक उदाहरणे देणार आहे.

प्रिंट मीडिया या संज्ञेची व्याप्ती बरीच मोठी व ऐसपैस आहे, पण आज आपल्या मनात त्याचा अर्थ दैनिक वृत्तपत्रे आणि नियतकालिके (म्हणजे साप्ताहिके व मासिके) इतकाच आहे. तर समाजपरिवर्तनात काय भूमिका असते (किंवा असावी) प्रिंट मीडियाची? याचं उत्तर अगदीच थोडक्यात सांगायचं असेल तर ‘दर्पण’ आणि ‘दिग्दर्शन’ हे दोनच शब्द पुरेसे आहेत. काहींच्या लक्षात आले असेल, मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक असे संबोधले जाते त्या बाळशास्त्री जांभेकरांनी सुरू केलेल्या साप्ताहिक व मासिक वृत्तपत्रांची ही नावे आहेत.

गंमत म्हणजे बाळशास्त्री जांभेकर हे नाव उच्चारताक्षणीच आपल्या मनात एक आदरणीय व भारदस्त व्यक्तिमत्त्व उभे राहते. पण मुळात बाळशास्त्री जगले किती, तर फक्त 34 वर्षे. त्यांनी ‘दर्पण’ सुरू केले वयाच्या 20 व्या वर्षी आणि ‘दिग्दर्शन’ सुरू केले वयाच्या 28 व्या वर्षी. तर तुमच्यापेक्षा थोडेच जास्त वय असलेल्या बाळशास्त्री जांभेकर या तरुणाने 1832 मध्ये मराठीतील पहिले वृत्तपत्र सुरू केले, त्याचे नाव ठेवले ‘दर्पण’. (‘दर्पण’ हा हिंदी भाषेतील शब्द असावा. ‘मै वही, दर्पन वही...’ हे गाणं हिंदीतील आहे.) मात्र आज तरी मराठीत दर्पणपेक्षा आरसा हा शब्द प्रचलित आहे.

आरसा काय करतो? खरे रंग-रूप दाखवतो. सौंदर्य आणि कुरूपता दाखवतो. त्याहून महत्त्वाचे म्हणजे चेहऱ्यावरचे हावभावही. आरशात यांपैकी काहीही लपवता येत नाही. वृत्तपत्रांचे काम हेच आहे असे बाळशास्त्रींना जाणवले असावे, म्हणून त्यांनी ‘दर्पण’ हे नाव निवडले असावे. म्हणजे वृत्तपत्रं चालवणं याचा अर्थ वाचकांसमोर आरसा उभा करणं. समाजात अन्याय आणि शोषण असते, तसेच उदात्तता आणि ध्येयवादही असतो. क्षुद्रता असते, तशीच भव्यताही. म्हणजे समाजाची सद्य:स्थिती किंवा वस्तुस्थिती दाखवणं हे वृत्तपत्रांचं मुख्य काम आहे, हे बाळशास्त्रींनी ओळखलं.

पण हे कशासाठी करायचं? म्हणजे आरसा कशासाठी दाखवायचा तर बदलांसाठी- माणसांत बदल व्हावेत, समाजात बदल व्हावेत यासाठी. समाजात जे जे अनिष्ट आहे, अयोग्य आहे ते ते बदलावे आणि जे जे उल्लेखनीय व अनुकरणीय आहे ते ते पुढे घेऊन जावे. पण हे काम बरेच व्यामिश्र व गुंतागुंतीचे असते. काही वेळा समाजातील अनेक घटक गोंधळून गेलेले असतात, संभ्रमित झालेले असतात. तिथे समाजाला मार्गदर्शनाची वा दिशादर्शनाची गरज असते. म्हणून प्रिंट मीडियाचे दुसरे मुख्य काम दिग्दर्शन.

मित्रहो, ‘दर्पण’ व ‘दिग्दर्शन’ या दोन शब्दांचा कितीही विस्तार करता येईल, इतके ते शब्द मूलभूत आहेत आणि दिवसेंदिवस त्यांचे अर्थ अधिक व्यापक व अधिक गहन होत आहेत. थँक्स टु बाळशास्त्री जांभेकर!

भारतात प्रिंट मीडियाचे आगमन ब्रिटिशांची राजवट स्थिरावल्यानंतरचे. त्यामुळे भारतातील इंग्लिश वृत्तपत्रांचा इतिहास जेमतेम दोनशे वर्षांचा, तर हिंदी, बंगाली, मराठी व इतर वृत्तपत्रांचा इतिहास त्यापेक्षा थोड्या कमी काळाचा... या पावणेदोनशे वर्षांचे तीन प्रमुख कालखंड ढोबळमानाने सांगता येतील. पहिलास्वातंत्र्यापूर्वीचा जवळपास 120 वर्षांचा. दुसरा- स्वातंत्र्योत्तर 40 वर्षांचा आणि तिसरा 1991 नंतरच्या 20 वर्षांचा.

पहिल्या कालखंडात म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळात ‘पत्रकारिता’ हे ध्येय होते (मिशन). दुसऱ्या म्हणजे स्वातंत्र्योत्तर कालखंडात पत्रकारिता हा पेशा झाला (व्होकेशन) आणि तिसऱ्या म्हणजे आताच्या कालखंडात पत्रकारिता हा व्यवसाय झाला (प्रोफेशन). अर्थात, आज काही लोक म्हणतात की, पत्रकारिता हा आता धंदा (बिझिनेस) झालाय. पण मला तसं वाटत नाही, कारण तो मुख्य प्रवाह नाही आणि धंदा म्हणून वृत्तपत्र चालवणाऱ्यांना प्रतिष्ठा नाही. त्यांना जोपर्यंत समाजाकडून प्रतिष्ठा मिळत नाही तोपर्यंत मी तरी पत्रकारिता हा धंदा झालाय असं म्हणणार नाही.

हा मुद्दा जरा काळजीपूर्वक लक्षात घ्यावा अशी मी विनंती करीन. कारण या तीन कालखंडांत अनुक्रमे ध्येय, पेशा, व्यवसाय यांना प्रतिष्ठा राहिली आहे. पहिल्या कालखंडात पत्रकारितेकडे ‘पेशा’ वा ‘व्यवसाय’ म्हणून पाहणारे अजिबातच नव्हते असे नाही, पण त्यांना प्रतिष्ठा नव्हती. दुसऱ्या कालखंडात, पत्रकारिता हे ‘ध्येय’ वा ‘व्यवसाय’ म्हणून करणारे नव्हते असे नाही, पण त्यांना प्रतिष्ठा नव्हती. आणि आजच्या काळात ‘ध्येय’ वा ‘पेशा’ म्हणून पत्रकारिता करणारे अजिबातच नाहीत असे नाही, पण त्यांना प्रतिष्ठा नाही.

अर्थातच, हे मी मुख्य प्रवाहाकडून मिळणाऱ्या प्रतिष्ठेबद्दल बोलतोय आणि ‘समाज’ ही संज्ञा सर्वसाधारण अर्थाने वापरली जाते तेव्हा त्याचा अर्थ ‘मुख्य प्रवाह’ असाच असतो. स्वातंत्र्यपूर्व काळातील सर्व प्रमुख दैनिके, साप्ताहिके, मासिके यांची नावे, बोधचिन्हे व घोषवाक्ये पाहिली तरी पटकन त्यातून त्यांचा ‘ध्येयवाद’ दिसून येतो. एवढेच नाही तर त्या वेळच्या अगदी ‘करमणूक’ व ‘मनोरंजन’ या नावांच्या नियतकालिकांतही ध्येयवाद होताच होता.

आपला देश पारतंत्र्यात आहे, आपला समाज अज्ञान व रूढी-परंपरा यांच्यांत जखडला गेला आहे, त्यामुळे परकीय सत्तेपासून सुटका झाली पाहिजे आणि समाजाचे मागासलेपण हटवले पाहिजे ही जाणीव किंवा ध्येय त्या सर्वांच्या केंद्रस्थानी होते. त्या काळातील बहुतांश प्रिंट मीडिया कमी-अधिक फरकाने त्याच ध्येयाने झपाटलेला होता, मिशनरी वृत्तीने काम करीत होता.

स्वातंत्र्यानंतर लोकशाही पद्धतीने राज्यकारभार सुरू झाला. नवी राज्यघटना आली. स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्प केला गेला. स्वातंत्र्याबरोबर संधी येते आणि जबाबदारीही. (साने गुरुजींनी देशाला स्वातंत्र्य मिळाल्याबरोबर सुरू केलेल्या दैनिकाचे नाव ‘कर्तव्य’ ठेवले होते.)

त्यामुळे स्वातंत्र्यानंतर प्रिंट मीडियाची भूमिका पुढच्या टप्प्यावर आली. राजकीय सत्ता स्वकीयांची असल्यामुळे, सत्ताधारी हे शत्रू राहिले नाहीत. ते जनतेचे सेवक बनले. त्यामुळे त्यांचे काम व्यवस्थित होत आहे की नाही यावर वचक ठेवून त्यांना विधायक विरोध करणे आणि जनतेचे प्रबोधन करून राज्यकर्त्यांना अप्रत्यक्ष मदत करणे अशी दुहेरी भूमिका प्रिंट मीडियाच्या वाट्याला आली.

एडमंड बर्कने 1787 मध्ये वृत्तपत्रांसाठी ‘फोर्थ इस्टेट’ हा शब्दप्रयोग पहिल्यांदा केला, पण ही संकल्पना भारतात स्वातंत्र्यानंतर खऱ्या अर्थाने उदयाला आली. आता ती इतकी रुजली व गृहीत धरली गेली आहे की, जणू काही लोकशाहीत प्रिंट मीडियाला अधिकृतपणे चौथा स्तंभ म्हणून स्थान आहे. मात्र, भारताच्या राज्यघटनेत कुठेही ‘चौथा स्तंभ’ किंवा ‘फोर्थ इस्टेट’ असा शब्दप्रयोग नाही.

पारंपरिक अर्थाने कोणतेही स्ट्रक्चर स्थिर उभे राहायचे असेल तर चार स्तंभ असावे लागतात. त्या अर्थाने कायदेमंडळ, न्यायसंस्था व प्रशासन या तीन स्तंभांच्या जोडीला प्रिंट मीडिया हा लोकशाहीचा चौथा स्तंभ मानला गेला. अर्थात, राज्यघटनेत असा उल्लेख नसला तरी राज्यघटनेने बहाल केलेली मूलभूत स्वातंत्र्ये (विशेषत: अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य) आणि इतर अनेक तरतुदी या सर्वांचा विचार करता प्रिंट मीडियाला चौथा स्तंभ मानणे अगदीच रास्त आहे.

खरे तर भारताच्या लोकशाहीत आणखी एक म्हणजे पाचवा स्तंभ मानला पाहिजे. तो म्हणजे जनचळवळी व जनआंदालने. या देशातील अनेक व्यक्ती, संस्था, संघटना यांनी आपापल्या स्तरावर व आपापल्या कार्यक्षेत्रात जे लढे उभारले, आंदोलने केली त्यांचे योगदान लक्षात घेतले तर तो पाचवा स्तंभ म्हणावा लागेल.

ते योगदान इतके आहे की, छोट्या-मोठ्या चळवळी व आंदोलने सतत होत राहिली नसती तर वृत्तपत्रांना प्रभावी काम तर करता आले नसतेच, पण त्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा संकोच झाला असता. आणि जेव्हा जेव्हा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा संकोच करण्याचा प्रयत्न झाला तेव्हा तेव्हा, चळवळी वृत्तपत्रांच्या बाजूने उभ्या राहिल्या.

आणि उलटही खरे आहे. वृत्तपत्रे नसती तर चळवळी व आंदोलने यांना आवश्यक तितके बळ मिळाले नसते. म्हणजे चौथा व पाचवा हे दोन स्तंभ परस्परांना पूरक काम करीत राहिले, ऊर्वरित तीन स्तंभांवर दबाव ठेवत राहिले, त्यांच्याशी सहकार्य व संघर्ष करीत राहिले...

इतकी विविधता, विषमता व व्यामिश्रता असलेल्या देशात स्वातंत्र्योत्तर 60 वर्षांनंतर लोकशाही टिकून का राहिली आणि भारताच्या शेजारी देशांतील समाज बराच एकसंध असूनही तिथे लोकशाहीचा प्रवास अडखळत व ठेचकाळत का होत आहे? याचे एकच एक कारण सांगायचे असेल तर भारतात चौथा व पाचवा स्तंभ खूपच प्रभावी राहिले आणि शेजारी देशांत ते दोन स्तंभ नीट उभेच राहू शकले नाहीत. 

आता राहिला मुद्दा आजच्या काळात समाज परिवर्तनात प्रिंट मीडियाची भूमिका काय असली पाहिजे? मुळात आजचा काळ म्हटलं की 1991 नंतरचा असाच अर्थ प्रत्येक क्षेत्राबाबत घेतला जातो. 1991 मध्ये भारतात उदारीकरण पर्व अवतरले, आणि त्याचे चांगले व वाईट परिणाम प्रत्येक क्षेत्रात कमी-अधिक फरकाने झाले.

उदारीकरण पर्वात बरेच काय काय झाले, पण महत्त्वाचे म्हणजे वेगवान बदल होऊ लागले, स्पर्धा वाढली, संधी वाढली, स्पेशलायझेशनला गती मिळाली आणि त्याचा परिणाम म्हणून प्रोफेशनॅलिझम किंवा व्यावसायिकतेला अतोनात महत्त्व प्राप्त झाले. ते महत्त्व इतके आहे की, व्यावसायिकता नसेल तर तुमचे अस्तित्वच धोक्यात येणार. अर्थातच, याचा सर्वांत जास्त परिणाम माध्यमांवर झाला. कारण माध्यमांना रोजच्या बदलांना सामोरे जायचे असते. नवनवे बदल समजून घ्यायचे असतात, समजावून द्यायचे असतात. त्यामुळे त्यांच्यासमोरचे आव्हान दुहेरी असते.

पहिले आर्थिक स्थैर्य मिळवणे आणि दुसरे बदलांचा वेध घेणे. सुरुवातीला अशी भीती निर्माण झाली की दूरचित्रवाहिन्या आल्यावर प्रिंट मीडियाचे काही खरे नाही. पण ती भीती नुसतीच खोटी ठरली नाही तर, इलेक्ट्रॉनिक मीडिया आल्यामुळे प्रिंट मीडियाचा फायदाच झाला. नंतर इंटरनेटचा वेगवान प्रसार झाल्यावर पुन्हा तीच भीती प्रिंट मीडियासमोर दाखवली गेली, आणि आता तीही निराधार ठरत आहे. उलट, इंटरनेटमुळे प्रिंट मीडियाचे बरेच काम सोपे झाले आहे...

मात्र एक झाले आहे, माहिती व मनोरंजन यासाठी प्रिंट मीडियाची गरज तुलनेने कमी झाली आहे. पण प्रिंट मीडियात अशी अंगभूत ताकद आहे जी मानवी मनाला अधिक व्यापक, अधिक अर्थपूर्ण, अधिक सर्जनशील व अधिक विचारक्षम असे काही हवे असेल तर ते देऊ शकते. ही बलस्थाने लक्षात घेऊन यापुढील काळात प्रिंट मीडियाला आपली गुणवत्ता व विश्वासार्हता वाढवता आली पाहिजे आणि इतर माध्यमे देऊ शकत नाहीत ते देण्यासाठी स्वत:ला सक्षम केले पाहिजे.

या संदर्भात दोनच उदाहरणे देतो. मागील वर्षभर टीम अण्णाप्रणित आंदोलनाने देश हलवून सोडला आणि आता जनतेचा भ्रमनिरास झाला आहे. सरकारच्या विरोधातील रोष आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांनी केलेले ग्लोरिफिकेशन यामुळे त्या आंदोलनाला अतोनात प्रसिद्धी मिळत असताना, प्रिंट मीडियाकडून त्याचे विश्लेषण, चिकित्सा अधिक ठोसपणे करण्याची गरज होती. पण त्यात प्रिंट मीडिया फारच कमी पडला.

मराठीपुरतं सांगायचं तर लोकसत्ता हे एकमेव दैनिक असं होतं, ज्यांनी सुरुवातीपासून शेवटपर्यंत अधिक स्पष्टपणे व नेमकेपणाने त्या आंदोलनातील उथळपणा व फोलपणा मांडला. साधनाही त्याबाबत कमी पडली. आम्ही ‘अण्णा मोठे होत जातील, आंदोलन हरत जाईल’ या शीर्षकाचा अरुण टिकेकरांचा लेख गेल्या वर्षीच्या सप्टेंबरमध्ये म्हणजे ते आंदोलन सर्वोच्च शिखरावर असताना छापला, ही त्यातल्या त्यात समाधानाची बाब.

दुसरे उदाहरण... नक्षलवाद हे देशाच्या अंतर्गत सुरक्षिततेला सर्वांत मोठे आव्हान आहे, असे साक्षात पंतप्रधान डिसेंबर 2006 मध्ये म्हणाले. पण त्याबाबत पुरेशी जनजागृती करण्यात आणि सरकारला योग्य व ठोस पावले उचलायला भाग पाडण्यात प्रिंट मीडिया बराच कमी पडला.

मराठीपुरते बोलायचे तर साधनाने नक्षलवादाच्या विरोधात अतिशय स्पष्ट भूमिका सातत्याने मांडली आहे आणि आमच्या शक्तीनुसार ओपिनियन मेकर्स समजल्या जाणाऱ्या वर्गाचे मत घडविण्यास चांगला हातभार लावला आहे. असो.

अशी अनेक उदाहरणे देता येतील. सारांश, गेल्या पावणेदोनशे वर्षांत प्रिंट मीडियाचा गाभा ध्येय, पेशा, व्यवसाय असा बदलत गेला आहे. पण हे बदल प्रिंट मीडियाने स्वत: केलेले नाहीत. काळ बदलला, परिस्थिती बदलली, समस्या बदलल्या आणि उत्तरेही! म्हणजे बाह्य बदलांमुळे पत्रकारितेच्या मूल्यव्यवस्थेचा गाभा बदलत गेला आहे आणि आता तो तिसऱ्या अवस्थेत आहे.

आजही ध्येय किंवा पेशा म्हणून पत्रकारिता कोणी करत असेल तर ते निश्चितच कौतुकास्पद आहे, पण त्यांची पत्रकारिता यशस्वी आहे का, समाजपरिवर्तनाला हातभार लावते का, हा विचार कठोरपणे केला पाहिजे. परिवर्तनाला हातभार लावत नसेल तर दिव्य वारसा सांगत राहून निष्प्रभ अवस्थेत पत्रकारिता करण्याला विशेष अर्थ नाही.

आज प्रिंट मीडियाचा गाभा व्यावसायिकता हा आहे. पण व्यावसायिकता या शब्दाचा पारंपरिक अर्थ बाजूला केला पाहिजे. प्रोफेशनल नसणे हा आजच्या काळात अवगुण आहे, एवढेच नाही तर ते कोणाच्याच फायद्याचे नाही, ना समाजाच्या, ना प्रिंट मीडियाच्या! माझा स्वाभाविक कल ध्येय व पेशा याकडे आहे, पण तरीही वाटतं, आजच्या काळात व्यावसायिक पत्रकारिताच अधिक प्रभावी ठरू शकेल.

माझी व्यक्तिगत आवड साप्ताहिक, मासिके, नियतकालिके आहे, पण तरीही वाटतं- दैनिक वृत्तपत्रेच अधिक परिणामकारक ठरू शकतील. कारण नियतकालिके ही ‘क्लास’साठी तर वृत्तपत्रे ही ‘मास’साठी चालवली जावीत ही या काळाची मागणी आहे...

अर्थात, मागणी तसा पुरवठा हे बाजारवादाचे तत्त्व असते तर विश्वासार्ह व दर्जेदार उत्पादन, सुलभ व जलद वितरण आणि तरीही किंमत कमी हे व्यावसायिकतेचे सूत्र असते. याचे भान ठेवणाऱ्या प्रिंट मीडियाला, त्यांच्या ‘दर्पण’ व ‘दिग्दर्शन’ या भूमिकेला आणि अर्थातच सामाजिक परिवर्तनाला आताचा काळ पूर्वीपेक्षा जास्त अनुकूल आहे.

 (‘युजीसी’च्या उपक्रमाअंतर्गत, पुणे येथील एस.पी.कॉलेजने ‘समाजपरिवर्तनात माध्यमांची भूमिका’ या विषयावर एकदिवसीय चर्चासत्र 28 ऑगस्ट रोजी आयोजित केले होते. त्या चर्चासत्रातील तिसऱ्या सत्रात ‘समाजपरिवर्तनात प्रिंट मीडियाची भूमिका’ या विषयावर केलेले भाषण.)

Tags: सामाजिक परिवर्तन प्रिंट मीडिया दैनिक वृत्तपत्रे नियतकालिके साप्ताहिक Social Change Print Media Daily Newspapers Magazines Weekly weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

विनोद शिरसाठ,  पुणे
vinod.shirsath@gmail.com

मागील दीड दशकापासून साधना साप्ताहिकात कार्यरत असलेले विनोद शिरसाठ हे साधना साप्ताहिक, साधना प्रकाशन व कर्तव्य साधना (डिजिटल पोर्टल) यांचे संपादक आहेत.


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके