डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

जनरेशन गॅप : आमच्या पिढीचा तिढा

गद्धेपंचविशीच्या आत-बाहेर उभ्या असणाऱ्या आजच्या तरुणाईमध्ये जनरेशन गॅपचं स्वरूप कसं आहे? ही 'जनरेशन गॅप' का निर्माण होते, त्याचे 'बरे वाईट' असे काय परिणाम होतात आणि त्यातून काही अनिष्ट घडू नये यासाठी काय करता येईल, याबद्दल प्रत्येक पिढीतील समाजधुरिणांनी पुरेशा तपशीलाने लिहून ठेवलंय. 

आजच्या घडीला या देशात सर्वांत जास्त भांबावलेला आणि तणावाखाली जगत असणारा वर्ग कोणता, असा प्रश्न कोणी विचारला तर मी उत्तर देईन 'आमचा.' म्हणजे गद्धेपंचविशीच्या आत-बाहेर उभे असणाऱ्यांचा! नेमकं सांगायचं ठरलं तर बावीस ते अठ्ठावीस या वयोगटातील तरुणांचा!

जीवघेण्या स्पर्धेचा सामना करावा लागतोय. मिळालं ते शिक्षण पूर्ण केलंय, पण नोकरीची शाश्वती नाही. व्यवसाय करायचा ठरवलं तर 'ते' शिक्षण कुचकामी ठरतंय. काल परवापर्यंत मोठी स्वप्नं पाहिली. आज मात्र कठोर वास्तवाला सामोरं जावं लागतंय. जगाच्या रहाटगाड्यात टिकून राहण्यासाठी भलत्याच गोष्टी कराव्या लागतात, हे कळू लागल्यावर गोंधळून गेलो आहोत. भवितव्य अनिश्चित आणि त्यातच कौटुंबिक जबाबदारीचं ओझं वाहावं लागतंय. हे सर्व कमी म्हणून की काय, वृत्तपत्रं आणि दूरचित्रवाणी वाहिन्या, रोजच आंतरबाह्य हादरे देणाऱ्या बातम्यांचा मारा करताहेत. त्याखाली जीव गुदमरून जातोय. अनेक प्रश्न सतावत राहतात, पण समाधानकारक उत्तरं मिळत नाहीत!

आम्ही जन्माला आलो 1975 ते 1980 या कालखंडात. भारताच्या स्वातंत्र्योत्तर इतिहासातील हे महत्त्वाचं 'पंचक.' म्हणजे 'लोकशाही' आणि 'हुकूमशाही' परस्परांवर कुरघोडी करत होत्या. त्या काळात माझ्या पिढीने जन्म घेतला आणि विसाव्या शतकाच्या शेवटच्या पंचकात, आम्ही या देशाचे नागरिक झालो.

सभोवतालच्या राजकीय-सामाजिक परिस्थितीची छाप, त्या-त्या पिढीच्या आचार-विचारांवर उमटत असते. यातूनच प्रत्येक पिढीची आपली अशी काही 'गुणवैशिष्ट्यं' सांगता येतात. ही गुणवैशिष्ट्यं, आधीच्या व नंतरच्या पिढीपेक्षा काही बाबतीत भिन्न असतात. या भिन्नत्वालाच आपण 'जनरेशन गॅप' म्हणतो, आणि या 'गॅप’वरूनच एखाद्या पिढीची उन्नती अथवा अवनती मोजत असतो. 

ही 'जनरेशन गॅप' का निर्माण होते, त्याचे 'बरे वाईट' असे काय परिणाम होतात आणि त्यातून काही अनिष्ट घडू नये यासाठी काय करता येईल, याबद्दल प्रत्येक पिढीतील समाजधुरिणांनी पुरेशा तपशीलाने लिहून ठेवलंय. सुधारकाग्रणी गोपाळ गणेश आगरकरांनी 'तरुण सुशिशिक्षतांस विज्ञापना' या निबंधात नेमकेपणाने 'जनरेशन गॅप'वर 'टिप्पणी' केली आहे. एकशे दहा वर्षांपूर्वीची ती 'टिप्पणी' आजच्या समाजालाही 'तंतोतंत लागू पडते!

'जनरेशन गॅप'चं टोक 'बाप आणि मुलगा यांच्या संबंधात पाहावयास मिळतं. या संदर्भात ऐंशीच्या दशकातील एक विचारवंत नरहर कुरुंदकर यांनी ‘व्यक्तिपूजा एक चिकित्सा’ या लेखात फार मार्मिकपणे लिहिलं आहे. सारासार विचार करू शकणारा, कोणताही माणूस या दोघांच्या विश्लेषणांशी सहमत होईल!

म्हणजे, एकूण 'जनरेशन गॅप’बाबत नव्याने सांगावं असं काही नाही. कळीचा मुद्दा एकच आहे- 'जनरेशन गॅप’चं आजचं स्वरूप कसं आहे. ते तसं का आहे आणि त्यामुळे समाजमनावर होणारे प्रतिकूल परिणाम टाळण्यासाठी काय करता येईल? आज 20 ते 30 वयोगटात असलेल्या युवा पिढीबाबत सर्वसमावेशक अशी काही निरीक्षण मांडता येतील का, तर नाही! ही पिढी अनेक स्तरांत विभागली गेली आहे. पण ढोबळ मानाने विभाजन करायचं ठरलं, तर तीन गट करता येतील.

शिक्षणाचा गंध नसलेला, आर्थिक दारिद्र्यात पिचत असलेला, सामाजिक दृष्टीनेही मागास समजला जाणारा, पहिला गट. या गटाला रोजी-रोटीसाठीच कडवा संघर्ष करावा लागतोय! दुसरा गट आहे, उच्चभ्रू समाजातील तरुणांचा. सर्व भौतिक सुखं कसलेही कष्ट न करता यांच्या पायाशी लोळण घेत आहेत. यांना थोडा-फार संघर्ष करावा लागतोय, तो सामाजिक प्रतिष्ठेसाठी!
या दोनही गटातील तरुणांना 'जनरेशन गॅप’मधून येणाऱ्या ताण तणावांचा सामना करावा लागत असणारच! पण त्यात वेगळेपण काही नसणार!' 'जनरेशन गॅपचा पारंपरिक अर्थ, या गटातील तरुणांचे 'विश्लेषण करण्यास पुरेसा आहे. आता राहिला प्रश्न तिसऱ्या गटाचा मध्यम वर्गातून आलेल्या या गटाला कशा प्रकारच्या 'जनरेशन गॅप'ला सामोरं जावं लागत आहे, हे सांगण्यासाठीच या लेखाचा खटाटोप...

पण पुन्हा एक प्रश्न उभा राहतोय, हा 'मध्यमवर्ग' तरी एकसंध आहे का? नाही! याच्यातही 'कनिष्ठ मध्यम', 'मध्यम मध्यम' आणि 'उच्च मध्यम’अशी वर्गवारी करावी लागते. यातील एक चांगली गोष्ट ही आहे, आर्थिक बाब वगळली तर या तीनही वर्गात बरंचसं 'साम्य' आहे; आणि शिक्षण व व्यवसायातील प्रगतीमुळे यांच्यातला 'वर्गबदल' सहजा सहजी आणि पटकन होतो.

पूर्वी, 'मध्यम वर्ग' आकाराने फारच थोडा आणि बराचसा एकसंध होता. प्रत्येक कुटुंबात मुलगा-बाप आजोबा, अशा तीन पिढ्या नांदत होत्या. म्हणजे 'पिढी' या संकल्पनेत पंचवीस वर्षांचा कालावधी गृहीत धरला जात होता. सामाजिक व आर्थिक बदल, एकाच पिढीत मोठ्या प्रमाणावर होत नसत. त्यामुळे त्यांच्या आचार-विचारांतील 'गॅप' कमी होती.

आत्ताची परिस्थिती वेगळी आहे. मध्यम वर्ग वेगाने फुगत चाललाय. सभोवतालची सामाजिक व आर्थिक परिस्थिती झपाट्याने बदलतेय. शिक्षण आणि विज्ञान तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे कुटुंबाची परिस्थिती पाच-दहा वर्षांत पालटू शकते.

म्हणजे, पूर्वी पंचवीस वर्षांत जे बदल होत असतील, त्यापेक्षा कित्येक पटीने अधिक बदल आत्ताच्या दहा वर्षात होतात. याचाच अर्थ, 'पिढी' संकल्पनेत आता दहा वर्षांचाच कालावधी धरावा लागतोय! आजच्या ‘वीस ते तीस’ वयोगटातील तरुण पिढीची ‘बाप पिढी’ आहे, ‘पन्नास ते साठ’ वयोगटातील. दोहोंच्यामध्ये 'तीस ते चाळीस' आणि 'चाळीस ते पन्नास' या वयोगटातील दोन पिढ्या आहेत. पूर्वीच्या हिशेबाने विचार करायचा झाला तर त्यावेळी 'पणतू आणि पणजोबा' यांच्यात जेवढी 'जनरेशन गॅप' होती तेवढी आजच्या मध्यमवर्गातील 'बाप-मुलां’मध्येही आहे. आम्हाला सामोरं जावं लागतंय, त्या 'जनरेशन गॅप'चं सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य हे आहे!

ही 'गॅप' इतकी वाढण्याचं कारण काय? या प्रश्नाचं उत्तर शोधायचं ठरलं तर आमची जडण-घडण झाली तो गेल्या दहा-बारा वर्षांचा काळ नजरेसमोर आणावा लागेल. देशात आणि राज्यांत अस्थिर आघाडी सरकारे, प्रादेशिक पक्षांची बजबजपुरी आणि 'विधिनिषेधशून्य' राजकारण. समाजकारणात काही दीपस्तंभ आहेत; पण प्रत्येकाने आपला सवता सुभा निर्माण केलाय. सांस्कृतिक क्षेत्रात सुमारांची गर्दी वाढली. नवं आर्थिक धोरण आणि त्यातूनच आलेलं जागतिकीकरण.

'माहिती तंत्रज्ञान' आणि 'जागतिकीकरण' इतक्या वेगाने आमच्या डोक्यावर आदळतंय, की अद्यापही आम्हाला कळत नाही, हे बरं झालं की वाईट? नाकारण्याचा पर्यायच नव्हता; त्यामुळे जे काही परिणाम होतील ते भोगणं, एवढंच आमच्या हातांत आहे. आंतरराष्ट्रीय स्तरांवर, सोव्हिएत युनियनचं विघटन झाल्यावर अमेरिका एकमेव 'महासत्ता' उरली आणि जगाच्या केंद्रस्थानी आली.

या सर्वांचा परिणाम असा झाला, एका 'फ्रेम मधून’आम्ही जगाकडे पाहायला लागलो. आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या घडामोडी आमच्या दैनंदिन जीवनावर परिणाम करू शकतात, याचं भान आलं. पूर्वीच्या पिढ्यांना ही सोय नव्हती आणि अशी आव्हानंही! आता हेच बघा ना... दहा बारा वर्षांपूर्वी 'दूरदर्शनचं' प्रक्षेपण काही तास व्हायचं; आता शंभर 'चॅनल्स' दिवसरात्र बरसताहेत. त्यावेळी बाहेरगावाला फोन करायचा असेल तर किती अडचणी, आता या देशातील एक कोटी लोकांच्या खिशात 'मोबाईल' आहेत. वाहतुकीच्या साधनांमुळे हजारो किलोमीटरची अंतरं काही तासांच्या टप्प्यात आली आणि इंटरनेटने तर कमालच केली. या झटपट बदलांमुळे 'ग्लोबल व्हिलेज' ही संकल्पना उदयास आली. जग जवळ आलं, पण दुसऱ्या बाजूला माणसा-माणसांतील अंतर वाढत गेलं. संवाद कमी झाला. आमच्या 'जनरेशन गॅप'चं दुसरं वैशिष्ट्य हे आहे!

संवादाची जागा मनोरंजनाची साधनं आणि प्रसारमाध्यमं यांनी घेतली. व्यावसायिक दृष्टिकोनाला नको तितकं महत्त्व प्राप्त झालं, आर्थिक यश हा एकमेव निकष कर्तृत्व मोजताना वापरला जाऊ लागलाय. कोरडा आणि रुक्ष व्यवहार आमच्या पिढीचा जीवनविशेष बनलाय. भावनिक बंध जुळविण्याची किंवा टिकवून ठेवण्याची गरजच वाटेनाशी झालीय. या सर्वांचा परिणाम गाव, नातलग आणि कुटुंब या सर्वच घटकांपासून आम्ही क्रमाक्रमाने दुरावत चाललो आहोत. म्हणजे रक्ताची (भावनेची) नाती तुटत चाललीत हे आमच्या 'जनरेशन गॅप'चं तिसरं वैशिष्ट्य!

आमची पिढी समूहापासून तुटून गर्दीत मिसळत आहे. पण, या गर्दीत आपण एकाकी आहोत, ही जाणीव आम्हाला अस्वस्थ करीत आहे. 'आपलं म्हणावं असं इथे कोण आहे', हा प्रश्न आमच्यापैकी बहुतेकांना अस्वस्थ करतोय. एक 'अनामिक पोकळी' निर्माण झाल्याचं जाणवतंय! आणि सर्वांत मोठी शोकांतिका तर वेगळीच आहे... आमच्यापुढे माहितीचे ढीग उभे केले जात आहेत. 'रेडिमेड निष्कर्ष' आमच्या माथी मारले जात आहेत. स्वतंत्र बुद्धीने 'विचार' आणि विश्लेषण करण्याची शक्ती मारली जात आहे!

थोडक्यात काय, तर मागच्या पिढीपासून आम्ही खूप अंतरावर उभे आहोत, त्यामुळे त्यांच्याशी संवाद नाही आणि म्हणूनच रक्ताची (भावनेची) नाती तुटलीत. आता आमच्यापुढचं आव्हान कठीण आहे... येणाऱ्या नव्या पिढीशी 'संवाद' साधणं आणि विचारांची नाती निर्माण करणं! यासाठी गरज आहे, ती 'विवेकनिष्ठ' जीवनशैलीची! हे आव्हान पेलवलं नाही, तर आजची तरुणाई आतून आणि बाहेरूनही कोसळणार! मग तिला सावरून धरायला पुढे कोण येणार?
 

Tags: जीवघेण्या स्पर्धेचा सामना जनरेशन गॅप विनोद शिरसाठ आमच्या पिढीचा तिढा Employment Competition Globalisation Education Generation Gap Young Generation weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

विनोद शिरसाठ,  पुणे
vinod.shirsath@gmail.com

मागील दीड दशकापासून साधना साप्ताहिकात कार्यरत असलेले विनोद शिरसाठ हे साधना साप्ताहिक, साधना प्रकाशन व कर्तव्य साधना (डिजिटल पोर्टल) यांचे संपादक आहेत.


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके