डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

माझ्या तरुण मित्रांनो, 'प्रँक्टिकल’ ला 'लॉजिक'ची जोड द्यायलाच हवी! कोणतीही व्यक्तिगत वा सामाजिक कृती करण्यापूर्वी त्यामागे सुसंगत विचार असला पाहिजे. 'कृतीशिवाय केलेले विचार पांगळे असतात' हे आपण मोठ्या आवेशाने सांगत असतो, पण 'विचाराशिवाय केलेली कृती आंधळी असते', हा त्या सुविचाराचा पूर्वार्ध आपली 'लाइन ऑफ अ‍ॅक्शन' ठरवताना विसरायला नको।

तरुण मित्रांनो,

शुभेच्छा, अभिनंदन, आणि आभार! नवीन वर्षासाठी शुभेच्छा.... नवीन वर्षाच्या निमित्ताने काहीतरी नवीन करू इच्छिता, म्हणून अभिनंदन... आणि त्यात मला काही अंशाने का होईना, पण सामील करून घेतलंत यासाठी आभार!

पंचविशी-तिशीच्या आसपास वय असणारे तुम्ही दहा-बारा मित्र एकत्र आलात... स्वतःसाठी आणि समाजासाठी काहीतरी करावं असा तुमचा प्रयत्न आहे... त्यासाठी दर शनिवारी तुम्ही बैठक घेणार आहात... आणि मी मात्र दर पंधरा दिवसांनी तुमच्यात यावं, अर्धा तास बोलावं आणि लगेच निघून जावं, अशी तुमची सक्त ताकीद आहे.

तुमच्या या गटाला मी ‘सॅटर्डे क्लब’ असं नाव सुचवत होतं, पण ती सूचना तुम्ही धुडकावून लावलीत आणि ‘प्रँक्टिकल क्लब' असे नामकरण केलंत... तुमच्या या कल्पनेच मला कौतुक वाटतंय!

या क्षणी मला तीन वर्षापूर्वीचा एक गंमतीदार प्रसंग आठवतोय... मुकुंद टाकसाळे यांना ‘हास्यमुद्रा' पुस्तकासाठी 'जयवंत दळवी स्मृती पुरस्कार’ प्रदान करण्यासाठी मुंबईत एक समारंभ आयोजित केला होता. त्यावेळी प्रमुख पाहुणे असलेले अरुण टिकेकर म्हणाले होते, "टाकसाळे हे गंभीर विनोदी लेखनासाठी प्रसिद्ध आहेत. माझ्यासारख्या 'गंभीर' प्रवृत्तीच्या माणसाला या समारंभाला बोलावून त्यांनी 'गंभीर’ विनोद साधला आहे..."

मित्रांनो, हा किस्सा आठवण्याचे कारण- तुम्ही सर्वजण 'प्रॅक्टिकल आहात, माझ्यासारख्या 'थीअरॉटिकल’ माणसाला 'प्रॅक्टिकल क्लब’मध्ये आमंत्रित करून तुम्ही तुमच्या ‘प्रँक्टिकलनेस'ची झलक दाखवली आहे...

असो! तर गंमतीचा भाग बाजूला ठेवू! दर पंधरा दिवसांनी मी तुमच्यात यावं, जे काही 'विचारतरंग' आहेत ते मांडावेत आणि निघून जावं, अशी तुमची सूचना आहे.... तुमची ही कल्पना माझ्याही प्रकृतीला आणि प्रवृत्तीला मानवण्यासारखीच आहे. त्यामुळे मी येईन, मला जे काही वाटतं ते सांगेन. तुम्ही ज्याला 'विचारतरंग' म्हणता त्याला मी फक्त 'तरंग' म्हणतो... मी जे काही 'तरंग' मांडणार आहे, त्यावर तुम्ही विचार करावा, पटलं तर घ्यावं नाही तर सोडून द्यावं!

मी जे काही बोलणार आहे, त्यात तुम्हाला थोडंसं वेगळेपण दिसेल. या वेगळेपणाला तुम्ही 'अ‍ॅटिट्युड' म्हणाल पण मी त्याला 'थर्ड अँगल’ म्हणेन! तुम्ही विचाराल या दोन्हीत फरक काय? अगदी थोडासा फरक आहे... ‘अ‍ॅटिट्युड डिफाइन्स अवर पर्सनॅलिटी'... आणि 'अँगल डिफाइन्स अवर कॅटेगरी’.

मित्रांनो, या 'थर्ड अँगल'मधून मला काय....काय दिसलंय, दिसतंय: ते मी प्रत्येक भेटीत थोडं-थोडं सांगणार आहे. पण सुरुवातीला या 'थर्ड अँगल'बद्दलच थोडं सांगतो...

"भूमितीतली सर्वात महत्त्वाची आकृती कोणती असा प्रश्न कोणी विचारला तर तुम्ही काय उत्तर द्याल? खोलवर विचार केला तर उत्तर येईल- 'काटकोन त्रिकोण. या काटकोन- त्रिकोणातले दोन कोन लघु (90 अंशापेक्षा लहान) असतात आणि एक काटकोन (बरोबर 90 अंशाचा) असतो. काटकोनापेक्षा मोठा असलेल्या कोनाला 'विशाल कोन' म्हणतात”...

प्रॅक्टिकल मित्रांनो, माझा असा ‘अनुभव’ आहे की आपल्या सभोवतालची बहुतांश माणसं सभोवतालच्या जगाकडे आणि एकूणच जीवनाकडे 'लघु' कोनातून पाहतात; अगदी थोडी माणसं काटकोनातून पाहतात आणि फार म्हणजे फारच थोड़ी माणसं विशाल कोनातून पाहतात. तुमचा आवडता 'अॅटिट्युड' किंवा 'दृष्टिकोन' शब्द वापरून बोलायचं ठरलं तर लघुकोन म्हणजे 'संकुचित दृष्टिकोन', विशाल कोन म्हणजे व्यापक दृष्टिकोन आणि काटकोनाला व्यावहारिक दृष्टिकोन म्हणता येईल... यापेक्षा अधिक सोपं करून सांगायचं तर... विशाल कोनातून पाहणारे ते असामान्य, काटकोनातून पाहणारे ते सामान्य आणि लघुकोनातून पाहतात ते 'अतिसामान्य', 'अँगल'ची परिभाषा वापरली तर... असामान्यांचा तो 'फर्स्ट अँगल', अतिसामान्यांचा तो 'सेकंड अँगल' आणि सामान्यांचा तो 'थर्ड अँगल'. तर मित्रांनो, या लघुकोनातूनच पाहायची सवय असणाऱ्यांना काटकोनातून पाहायला लावणं, हे आपल्या समोरचं सर्वात मोठं आव्हान आहे!

काटकोनाला इंग्रजीत 'राईट अँगल' म्हणतात, पण म्हणून 'थर्ड अँगल इज राईट अँगल' असा दावा मी करणार नाही. तुमच्यापैकी ड्रॉइंगशी परिचित असणारे म्हणतील “कोणत्याही ऑब्जेक्टचा 'परस्पेक्टिव’ काढण्यासाठी एक सोपी पद्धत आहे, तिला 'थर्ड अँगल मेथड' म्हणतात, तुला तसं काही म्हणायचंय का?” पण माझा तसाही दावा नाही!

माझं इतकंच म्हणणं आहे- 'थर्ड अँगल'मधून सभोवतालच्या जगाकडे पाहणाऱ्यांच, त्यातून झालेल्या आकलनाप्रमाणे जगणारांच जीवन कमीत कमी दोषपूर्ण असतं.

मित्रांनो, पहिल्याच दिवशी हे असलं ‘भारूड' ऐकून तुमच्या मनात प्रश्न आला असेल, ‘गणिताचा आणि जगण्याचा नसलेला संबंध, हा माणूस कसा काय जोडतोय?' पण थोडा बारकाईने विचार केला तर लक्षात येतं... गणिताचा जीवनाशी फार जवळचा संबंध आहे, कारण गणिताचा गाभा आहे 'तर्कशास्त्र' आणि तर्कशास्त्र हे मानवी जीवनाचे अविभाज्य अंग आहे.

आपण दैनंदिन व्यवहारात तार्किक पद्धतीनेच विचार करत असतो.... तुम्ही म्हणाल तार्किक पद्धतीने विचार करून सर्वच प्रश्नांची उत्तरं मिळत नाहीत. अगदी बरोबर! पण यापेक्षा अधिक निर्दोष पद्धत कोणती आहे? मी तर त्याहीपुढे जाऊन म्हणेन, विचार करण्याची 'तार्किक' ही एकमेव पद्धत आहे! तुम्ही म्हणाल, काही तरीच काय बोलतोस. पण मला सांगा... 'तार्किक पद्धतीने विचार करणं म्हणजे तरी काय?' फारच सोप्या भाषेत सांगायचं तर 'सुसंगत विचार करणं..." आपल्या सभोवताली बघितलं तर लक्षात येतं, सुसंगत विचार करणारी माणसं फारच थोडी असतात... बहुतांश माणसांना सुसंगत विचार करता येत नाही. खरं तर हे म्हणणंही थोडं दुरुस्त करावं लागेल. कोणताही माणूस संपूर्णतः सुसंगत विचार करीत नाही आणि कोणताही माणूस पूर्णतः विसंगत विचार करीत नाही. जास्तीत जास्त सुसंगत विचार करणाराला आपण 'तर्कशुद्ध' माणूस म्हणत असतो. पण बघा ना, मोठी माणसं अनेक वेळा बोलताना, वागताना घसरतात, याचं कारण हेच की त्यावेळी, त्या प्रश्नांवर त्यांना सुसंगत विचार करता आलेला नसतो.

सर्वसामान्य माणसं आपल्या दैनंदिन जीवनात सुसंगत विचार करतात. आपल्याला अमुक काम करायचंय, यासाठी ही...ही... साधनं लागतील. इतका कालावधी लागेल, हे नाही झालं तर असं होईल, असं घडलं नाही तर तसं होईल. असा हिशोब ते क्षणाक्षणाला मांडत असतात, तो कशाच्या आधारावर? तर्काच्या आधारावरच ना? याचाच अर्थ आपण व्यावहारिक जगात वावरताना गणिती (तार्किक) पद्धतीनेच विचार करतो, त्यानुसारच वागतो, नियोजन करतो. पण यातली मुख्य अडचण आहे- तार्किक पद्धतीने आपण सर्वच बाबतीत विचार करत नाही. अनेक समस्यांना, प्रश्नांना सामोरं जाताना आपण विस्कळीत स्वरूपात विचार करतो. म्हणजे कसं?

काही सोपी गणितं आपण सोडवतो, कारण त्यातील बारकावे माहीत असतात, त्यासाठीची सूत्रं व नियमांचंही आकलन आपल्याला झालेलं असतं... पण काही अवघड गणितं सोडवता येत नाही, कारण ते सोडवण्यासाठी आवश्यक ती सूत्रं, तत्त्व आपल्याला माहीत नसतात... मग आपण ती गणित सोडवत तरी नाही किंवा कसंतरी उत्तर आणायचा प्रयत्न करतो. काही चलाख माणसं उत्तर पाहतात, त्यानुसार गणिताची मांडणी करतात. तर काही महाभाग काहीतरी वेगळंच उत्तर काढून तेच कसं बरोबर आहे. हे पटवण्याचा प्रयत्न करतात, खरं तर अशा गणितांना सामोरं जातांना शिस्तबद्ध विचार केला पाहिजे. पायऱ्या पायऱ्याने पुढे गेले पाहिजे. गणित सुटत नसेल तर थांबले पाहिजे. पुन्हा नव्याने अभ्यास करून कामाला लागलं पाहिजे.

तात्पर्य काय? सभोवतालची माणसं सुसंगत विचार करीत नाहीत, त्यांना तो करायला लावणं म्हणजे तार्किक पद्धतीने विचार करायला शिकवणं, याचाच अर्थ थर्ड अँगल 'मधून पाहायला शिकवणं हे अवघड काम आपल्याला करायचं आहे.

विशाल कोनातून पाहणारे तर्काच्या पलीकडे जाऊन एखाद्या समस्येचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करतात. लघुकोनातून पाहणारे अनेक वेळा चूक-बरोबर असा विचार न करता उत्तर काढतात. पण तार्किक पद्धतीने विचार करणारे म्हणजे काटकोनातून पाहणारे 'स्टेप बाय स्टेप' पुढे जातात.

विज्ञानाचा गाभा म्हणजे प्रयोग (प्रॅक्टिकल) आणि गणिताचा गाभा आहे तर्कशास्त्र (लॉजिक). गणित व विज्ञान यांचा संबंध तर जगजाहीर आहे. परस्परांपासून त्यांना अलग करताच येणार नाही. माझ्या तरुण मित्रांनो, 'प्रॅक्टिकल’ला 'लॉजिक’ची जोड द्यायलाच हवी! कोणतीही व्यक्तिगत वा सामाजिक कृती करण्यापूर्वी त्यामागे सुसंगत विचार असला पाहिजे. कृतीशिवाय केलेले विचार पांगळे असतात', हे आपण मोठ्या आवेशाने सांगत असतो, पण 'विचाराशिवाय केलेली कृती आंधळी असते', हा त्या सुविचाराचा पूर्वार्ध आपली 'लाइन ऑफ अ‍ॅक्शन' ठरवताना विसरायला नको!

Tags: मुकुंद टाकसाळे अरुण टिकेकर लाईन ऑफ अ‍ॅक्शन काटकोन गणित थर्ड अँगल विनोद शिरसाठ Mukund Taksale Aroon Tikekar Line Of Action Katokon Math Third Angle Vinod Shirsath weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

विनोद शिरसाठ,  पुणे
vinod.shirsath@gmail.com

मागील दीड दशकापासून साधना साप्ताहिकात कार्यरत असलेले विनोद शिरसाठ हे साधना साप्ताहिक, साधना प्रकाशन व कर्तव्य साधना (डिजिटल पोर्टल) यांचे संपादक आहेत.


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके