डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

फार पूर्वी म्हणजे ब्रिटिशांच्या काळात, खेळांचं दोन गटात विभाजन केलं जायचं- ‘मेजर गेम्स’ आणि ‘मायनर गेम्स’. टेबल टेनिस, फुटबॉल आणि अर्थात खेळांचा राजा क्रिकेट हे सर्व ‘मेजर गेम्स’; आणि कब्बडी, खो-खो, कुस्ती ह्या खेळांना ‘मायनर गेम्स’, तुझ्या भाषेत ‘चिल्लर खेळ’ म्हटले जायचे!

आकाश - विवेक 

“विवेक, बरं झालं अटलजींनी हिरवा कंदील दाखवला, पाकिस्तान दौऱ्याला.”

“ह्या निमित्ताने खेळलं गेलेलं राजकारण फारच खालच्या पातळीचं होतं. सगळेच पक्ष, पुढारी मतलबाने आंधळे झाले आहेत. देशाच्या भवितव्याशी खेळत आहेत. व्यापक विचार करायचं नाकारत आहेत.”

“पण त्यांच्या मुद्द्यांतही दम आहे ना? दोन देशांतच वैर असेल तर कशाला खेळायचं क्रिकेट?”

“पण ते वैर संपवलंच पाहिजे! ‘पाकिस्तान आपला शेजारी देश आहे आणि शेजाऱ्याशी शत्रुत्व ठेवून चालणार नाही, परवडणार नाही’, ही वस्तुस्थिती ते का नाकारत आहेत?”

“त्यांचं म्हणणं आहे- ‘कायमचे संबंध तोडून टाका किंवा बळाचा वापर करून प्रश्न निकालात काढा!’ ” 

“आजच्या काळात ते शक्य नाही. शेजारी देशांचं उपद्रवमूल्य जास्त असतं. इराक किंवा अफगाणिस्तान जर अमेरिकेचे शेजारी देश असते, तर अमेरिकेनेही एवढं धाडस केलं नसतं. त्या दोन्ही युद्धांची प्रत्यक्ष झळ, अमेरिकेला बसलीच नाही. शिवाय ते दोन्ही देश आणि अमेरिका, यांच्यातील लष्करी व आर्थिक ताकदीत जमीन-अस्मानाचं अंतर होतं.”

“पण क्रिकेट सामन्यांमुळे...”

“हे बघ, क्रिकेट सामन्यांमुळे दोन्ही देशांतील संबंध सुधारतील, ही अपेक्षाच चूक आहे. कला, क्रीडा, संस्कृती यांतील आदान-प्रदान झालं तर वातावरणनिर्मिती होण्यास मदत होते. सुसंवाद वाढीस लागतो, बस्स एवढेच!”

“भारत-पाक मैत्रीचा रस्ता क्रिकेटच्या मैदानातून जातो, असं समजायचं का?”

“नाही! खरं तर क्रिकेटला इतकं महत्त्व द्यायला नको आहे! पण आपल्या समाजाची मानसिकता...”

“चंदू बोर्डे म्हणतात, ‘क्रिकेट’ हा पाकिस्तानसाठी ‘धर्म’ आणि भारतासाठी ‘जीवनपद्धती’ आहे!”

“चंदू बोर्डेंनी हे विधान कितपत गांभीर्याने केलंय, माहीत नाही! पण खरं आहे ते!... तू ‘जीवनपद्धती’ म्हणालास म्हणून सांगतो. बरोबर पन्नास वर्षांपूर्वी पु. ग. सहस्रबुद्धे यांनी ‘भारतीय जीवनातील क्रिकेट व हॉकी’ असा एक निबंध लिहिला होता, जमलंच तर वाच!”

आकाश - आनंद

“आकाश, गेल्या वर्षी एक मार्चला झालेली भारत-पाक मॅच आठवतेय?” 

“हो, त्या दिवशी दिवसभर रस्ते सुनसान होते आणि रात्री मात्र गर्दीने फुलून गेले होते.”

“आणि फटाके, नाच, गाणी यांमुळे जल्लोष उडाला होता!”

“दिवाळी, अकाली आल्यासारखं वाटत होतं.”

“सचिनच्या पंचाहत्तर चेंडूतील अठ्ठ्याण्णव धावांनी करामत केली होती. पाकिस्तानला वर्ल्ड कपमधून बाहेर फेकलं होतं.”

“आणि दुसऱ्या दिवशीच्या वृत्तपत्रांतून ‘पाकिस्तानला लोळविले’, ‘पाकडे भुईसपाट’ असे मथळे झळकले होते.” 

“पाकला हरवणं हे ‘वर्ल्ड कप’ जिंकण्यासारखंच असतं आपल्यासाठी!” 

“म्हणून तर दालमियांनी तीन कोटींची बक्षीसं जाहीर केली होती, आणि जसवंतसिंहांनी खेळाडूंवरील ‘कर’ माफ केले होते!”

“अटलजी-अडवाणी दिवसभर टी. व्ही. समोर बसून होते त्या दिवशी...”

“लतादीदींनी ‘ओम नमः शिवाय’ मंत्राचा जप पंचवीस हजार वेळा केला होता. बाळासाहेबांनी साक्षात महादेवाला साकडं घातलं होतं!”

“ती मॅच तुला जरा जास्तच आठवतेय.”

“हो, पण एक प्रश्न मात्र तेव्हापासून सतावतोय!”

“असा कोणता प्रश्न आहे बुवा, जो तुला सतावतोय? आणि तोही तब्बल एक वर्षापासून!”

“समजा, ती मॅच पाकिस्तानने जिंकली असती, म्हणजे भारत हरला असता तर... लतादीदींनी ‘ओम नमः शिवाय’ मंत्राचं आणि बाळासाहेबांनी महादेवाला ‘साकडं’ घातल्याचं गुपित... फोडलं असतं? म्हणजे प्रसारमाध्यमांना सांगितलं असतं?”

“आक्याऽ तुला किती वेळा सांगितलं... विनाकारण डोक्याला त्रास देऊ नकोस! अरे बाबा, हा भावनेचा मुद्दा आहे. तुला कसा कळणार?” 

“आनंद, आमची माघार! भावनिक प्रश्नाला हात घालायचा नाही. पण मी म्हणतो, तुमच्या भावना इतक्या ‘लेच्यापेच्या’ आहेत का, की कोणी शंका उपस्थित केली तरी दुखावतात?” 

“विषय सोडून भरकटू नकोस! आणि नंतर बोलू.”

आकाश - संग्राम 

“बस्स! खूप झालं त्या क्रिकेटचं कौतुक! मी तर म्हणतो, हद्दपार केलं पाहिजे क्रिकेटला, ह्या देशातून!” 

“संग्राम, क्रिकेटचं कौतुक जास्तच होतंय हे खरं, पण ‘हद्दपार केल पाहिजे’ हे म्हणणं जरा अतिच होतंय असं नाही वाटत?”

“नाही! वाटल्यास ‘हुकूमशहा’ म्हणा मला! पण हद्दपार केलंच पाहिजे क्रिकेटला! माणसांना पागल करण्याचं काम चालवलंय ह्या लोकांनी. अरे! चीन, जपान, जर्मनी यांच्याशी स्पर्धा करायचीय ना? अपरिहार्यतेच्या नावाखाली आलेल्या जागतिकीकरणाच्या लाटेत, टिकून राहायचंय ना? 2020 सालापर्यंत ‘महासत्ता बनवण्याचं पहिलं पाऊल... बॅन ऑन क्रिकेट.”

“संग्राम, तू केलेलं निदान अचूक आहे. पण उपाय मात्र...” 

“अरे, दिवस कमी पडतो म्हणून रात्रीही सामने.. पाच-पाच दिवसांच्या कसोट्या... दोन-दोन महिन्यांचे दौरे... चार-चार वर्षांचे नियोजन... करोडो रुपयांची उधळपट्टी... जाहिरातींचा अतिरेक... कित्येक चॅनेलवर रोज एक तरी मॅच.... वृत्तपत्रांतून रकानेच्या रकाने बातम्या... हे सारं असह्य झालंय रे आता!”

“शाळेतल्या पोरांवर तर फारच परिणाम होतोय!”

“अरे, शहाणीसुरती माणसं ऑफिसला ‘रजा’ टाकून टीव्हीसमोर बसतात, मॅचसाठी. मग पोरांनी शाळेला ‘दांड्या’ मारल्या तर काय चुकलं? परीक्षांच्या काळात तरी निदान सामने ठेवू नका! पण ऐकतो कोण?”

“तो आनंद म्हणतोय, ‘कोणत्या ना कोणत्या’ परीक्षा असतातच वर्षभर, मग काय क्रिकेट खेळायचंच नाही का?”

“मोठा शहाणा आहे तो! उद्या म्हणायचा, ‘क्रिकेटचं वेळापत्रक पाहूनच उरलेल्या वेळात परीक्षा उरकून घ्या!’ खरं तर क्रिकेट खेळ चालू ठेवायला माझी हरकत नाही, पण निदान थेट प्रक्षेपणावर तरी बंदी आणली पाहिजे. खेळणारे ‘चिमूटभर’ आणि बघणारे ‘ढीगभर’ असा प्रकार चाललाय. प्रचंड जनशक्ती वाया जातेय!”

“तुझ्या म्हणण्याशी मी शंभर टक्के सहमत आहे. पण दुसरा उपाय नाही का? हे जरा लोकशाहीविरोधी होतंय!”

“आकाश, एकदा सांगितलं ना, दुसरा उपाय नाही. क्रिकेटच्या थेट प्रक्षेपणावर बंदी घाला आणि मग दहा वर्षानंतरच्या ‘ऑलिंपिक’चा ‘मेडल चार्ट बघा!”

आकाश - सागर 

“सागर, एक काळ असा होता की मॅच पाहण्यासाठी तू उन्हांत पावसात जायचास. रस्त्यावर उभा राहून पाहायचास, तहान-भूक विसरून! सगळ्या खेळाडूंचे रेकॉर्डस माहीत असायचे तुला. क्रिकेटचा ‘ज्ञानकोश’ मानले जायचं तुला. पण आता मात्र...”

“आकाश, तुला हसू येईल, पण मी आता ‘माजी क्रिकेटप्रेमी’ झालो आहे. आता मला मॅच होऊन गेल्यावरच पेपरमधून कळतं. फार वेळ वाया घालवला तेव्हा! अर्थात आनंदही खूप मिळाला. तुला आठवत असेल, बरोबर चौदा वर्षांपूर्वी भारताने पाकिस्तान दौरा केला होता. तेव्हा आपण क्रिकेट पहायला लागलो. त्या दौऱ्यातल्या खेळाडूंपैकी फक्त सचिनच आज खेळतोय. सचिनचा तो पहिलाच दौरा होता.”

“सचिनचा तू जबरदस्त फॅन होतास!”

“अद्यापही आहे! पण मीच कशाला? करोडो भारतीय त्याच्या खेळाचे आणि व्यक्तिमत्त्वाचेही चाहते आहेत. क्रिकेटमधील त्याच्या योगदानाबद्दल का आता सांगायला पाहिजे? आपल्या पिढीचा तो ‘रोल मॉडेल’ होता ना! ‘मॅच फिक्सिंग’च्या वादळात तो अडकला नाही, म्हणून आणखी मोठा!” 

“मॅच फिक्सिंगमुळे सुरुवातीला बराच परिणाम झाला. पण आता...”

“भारतीय क्रिकेटरसिकांची ‘स्मरणशक्ती’ फार कमी आहे. ज्ञान फारच तुटपुंजं आहे आणि खेळ तर भावनांच्या लाटा उसळविणारा. लाटा ओसरल्या की, परत जैसे थे! पण माझ्यासारखे काही लोक ‘मॅच फिक्सिंग’मुळे क्रिकेटपासून दुरावले ते कायमचेच! क्रोनिएसारखा माणूस ‘लाचखोरी’ करू शकतो, हे पचवणं फार अवघड गेलं खऱ्या क्रिकेटप्रेमींना. ‘मी अल्पसंख्यांक समाजातला असल्यामुळेच मला बदनाम केलं जातंय’ असं अझर म्हणाला, तेव्हा किती जिव्हारी लागलं भारतीय क्रिकेटप्रेमींना! नंतर त्याने ते विधान मागे घेतलं, पण बूंद से गई वो...”

“पण, Cricket is a game of glorious uncertainty! हे खरं आहे ना?”

“हो! पण आता त्यातला gloriousness कमी होत चाललाय आणि त्यातील uncertainity वाढत चाललीय! तो आता खेळ राहिला नाही. तो आता व्यवसाय झालाय, धंदा झालाय! त्याचा बाजार मांडलाय ह्या लोकांनी!”

“अलीकडे तर क्रिकेट अॅकॅडमीचं पेव फुटलंय. मध्यमवर्गातील आई-बापही आपल्या मुलांना त्या ‘अॅकॅडमी’त पाठवायला लागलेत.”

“त्यांना कोणीतरी सांगायला हवं. प्रत्येक घरात ‘सचिन तेंडुलकर’ जन्माला येत नसतो!”

आकाश - प्रकाश

“आकाश, परवा ते महावीर जोंधळे भेटले होते... म्हणजे मी त्यांना भेटायला गेलो होतो. त्यांनी एक किस्सा सांगितला... ते बँकॉकला गेले होते एकदा. तेथील एका पत्रकाराला त्यांनी विचारलं, ‘तुमच्याकडं क्रिकेट खेळताना कोणी दिसत नाही?’ तर तो म्हणाला, ‘आम्ही आमचे खेळ खेळतो, क्रिकेट आमचा खेळ नाही! मग यांनी विचारलं, ‘तुमचे खेळ कोणते आहेत?’ त्याने काय उत्तर दिलं असेल? जरा कल्पना कर ना!”

“नाही सांगता येत.”

“तो पत्रकार म्हणाला, ‘जे खेळ फक्त एक ते दीड तासात खेळून होतात, ते सर्व आमचे खेळ!”

“ये हुई ना बात! जोंधळे सरांचा त्रिफळा उडविला की त्याने!”

“यातला ‘बिटवीन द लाईन्स’ मजकूर वाचलास का?- दिवस-दिवस (आणि कधी-कधी पाच-पाच दिवस) खेळायला आमच्याकडे वेळ नसतो आणि तुमच्याकडे तो असतो!”

“याला क्रिकेटच्या परिभाषेत ‘क्लासिकल शॉट’ असंही म्हणता येईल.” 

“ब्रिटिशांनी ह्या क्रिकेटचं अवास्तव स्तोम माजवलं आणि आमचे देशी खेळ ‘चिल्लर’ ठरवले!”

“अगदी बरोबर बोललास! आपले खेळ चिल्लर ठरवले. विषय निघालाच आहे, तर एक गंमत सांगू का?” 

“सांग. कान उघडेच आहेत!”

“फार पूर्वी म्हणजे ब्रिटिशांच्या काळात, खेळांचं दोन गटात विभाजन केलं जायचं- ‘मेजर गेम्स’ आणि ‘मायनर गेम्स’. टेबल टेनिस, फुटबॉल आणि अर्थात खेळांचा राजा क्रिकेट हे सर्व ‘मेजर गेम्स’ आणि कब्बडी, खो खो. कुस्ती ह्या खेळांना ‘मायनर गेम्स’, तुझ्या भाषेत ‘चिल्लर खेळ’ म्हटले जायचे! तर... फर्ग्युसन कॉलेजच्या एका विद्यार्थ्याला हा ‘शब्दप्रयोग’ अपमानास्पद वाटला. म्हणून त्याने सत्याग्रहाचा इशारा दिला. गरज पडली तर उपोषणाला बसायची तयारी ठेवली. त्यानंतर वेगाने ‘सूत्रं’ हलली. कागदपत्रांत जिथं जिथं ‘मायनर गेम्स’ लिहिलं होतं, तिथ तिथ ‘नेटीव गेम्स’ असा बदल केला गेला. त्याचंच मराठी रूपांतर ‘देशी खेळ’ असं झालं.”

“वा! सलाम केला पाहिजे त्या विद्यार्थ्याला.”

“सलाम नको, स्मरण करा! तो विद्यार्थी म्हणजेच आपले, दत्तो वामन पोतदार.”

“कोण हे दत्तो वामन पोतदार?”

“प्रकाशराव, तुम्हांला ‘दत्तो वामन’ माहीत नाहीत? आता मात्र हद्द झाली!.... मग विचारा कोणाला तरी किंवा वाचा... पण इतक्या बारीक सारीक गोष्टी मी नाही सांगत बसणार!”

Tags: दत्तो वामन पोतदार देशी खेळ पाकिस्तान भारत क्रिकेट मायनर गेम्स मेजर गेम्स weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

विनोद शिरसाठ,  पुणे
vinod.shirsath@gmail.com

मागील दीड दशकापासून साधना साप्ताहिकात कार्यरत असलेले विनोद शिरसाठ हे साधना साप्ताहिक, साधना प्रकाशन व कर्तव्य साधना (डिजिटल पोर्टल) यांचे संपादक आहेत.


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके