डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2025)

गेल्या वर्षी ‘मला प्रभावित करून गेलेला सिनेमा’ या विषयावर ‘साधना’चा विशेषांक काढण्याची कल्पना सुचली तेव्हा, मी त्या अंकात ‘सामना’वर लिहिणार हे उघडच होते. त्यासाठी पुन्हा एकदा सिनेमा पाहण्याची गरज वाटली नाही. पण अलीकडच्या नऊ वर्षांत पाहिलेला नाही, म्हणून त्या वातावरणात पुन्हा घुसता यावे यासाठी ‘सामना’च्या काही क्लिप्स इंटरनेटवर असतील तर नजर टाकू या, असा विचार मनात आला. इंटरनेटवर गेलो तर संपूर्ण सिनेमाच उपलब्ध! सहज क्लिक केले. सिनेमा सुरू झाला. दोन-चार मिनिटे गेली नाहीत तोच, सिनेमाच्या दृश्य चौकटींचे एडिटिंग प्रकर्षाने जाणवले. आणि सर्रकन मनात विचार चमकून गेला, ‘अरे, आपल्यातील संपादकावरही ‘सामना’चा प्रभाव आहे की काय?’

1996 च्या सुरुवातीला केव्हा तरी एका दुपारी, पुण्यातील लक्ष्मी रोडवरील ‘विजय’ चित्रपटगृहाजवळून चाललो होतो. बाहेरच्या बाजूने भले मोठे पोस्टर- ब्लॅक ॲन्ड व्हाईट- एका काठीवर गांधीटोपी टांगलेली आणि वरच्या बाजूला एक वाक्य : ‘या टोपीखाली दडलंय काय?’ ते पोस्टर पाहून ‘विजय’च्या आतल्या बाजूला गेलो. आतमध्ये त्याहून मोठे पोस्टर. निळू फुले व श्रीराम लागू यांचे चेहरे आणि खाली मोठ्या अक्षरांत ‘सामना’. काही तरी वेगळं आहे असं वाटलं, सिनेमा पाहायचं ठरवलं. तेव्हा मी बारावीनंतरच्या शिक्षणासाठी पुण्यात येऊन काहीच महिने झाले होते. त्याआधी पाचवी ते बारावीपर्यंत अहमदनगर शहरात राहिलो होतो. पण मुळात सिनेमा पाहायला सुरुवात मी दहावीत गेल्यावर केली होती आणि नंतरच्या तीन वर्षांत शंभराहून अधिक हिंदी सिनेमे पाहिले होते. त्या सर्व सिनेमांचे वर्गीकरण दोन गटांत करता येऊ शकेल, असे वाटू लागले होते.

एका गटाचे नाव ‘प्रेम’ आणि दुसऱ्या गटाचे नाव ‘बदला’ या पार्श्वभूमीवर मी ‘विजय’मध्ये घुसलो होतो. ‘सामना’ पाहून बाहेर आलो, तेव्हा मी प्रचंड भारावून गेलो होतो. खूपच दालनं खुली झाल्यासारखं वाटत होतं. अनेक वाटा-वळणं दिसू लागली होती. मागच्या तीन वर्षांत असा सिनेमा पाहायलाच मिळाला नाही, अशी जाणीव तीव्रतेने झाली होती. होस्टेलवर आलो. सिनेमाच्या प्रभावातून बाहेर आलो नव्हतो. रात्री काही मित्र आले, ‘सिनेमा पाहायला येतो का’ म्हणाले. दुपारीच एक भन्नाट सिनेमा पाहिल्याचे सांगितले. ‘मग पुन्हा एकदा चल’ म्हणाले. गेलो. पहिल्यापेक्षा जास्त आवडला. दुसऱ्या दिवशी काही मित्रांना त्या सिनेमाविषयी बरेच काही सांगितले. ‘मग आणखी एकदा चल’ म्हणाले. आढेवेढे न घेता गेलो. आता तो सिनेमा जास्त कळला. दोन दिवसांत तीन वेळा ‘सामना’ पाहिला. या भारावून जाण्याची पार्श्वभूमी काय होती? 1996 च्या लोकसभा निवडणुकांचे पडघम वाजू लागले होते. मी पहिल्यांदाच मतदान करणार होतो. ‘मतदारयादीत नाव आले’ या जाणिवेने ‘दोन्ही अर्थाने आपण मोठे झालो’ असे वाटू लागले होते.

आपण ‘नागरिक’ झालो, या जाणिवेने ‘स्व’च्या बाहेर डोकवायला सुरुवात झाली होती. पुस्तके अजून वाचायला लागलो नव्हतो, पण वर्तमानपत्रांचे वाचन बरेच चांगले होते. त्यामुळे लोकशाही, निवडणुका, राज्यपद्धती, नागरिक, प्रतिनिधी, हक्क, कर्तव्ये ही परिभाषा परिचयाची झाली होती. त्यानंतरच्या आठ-नऊ वर्षांत मी दर वर्षी दोन वेळा ‘सामना’ पाहिला. विजय, प्रभात, अलका या सिनेमागृहांत वर्षातून एकदा तरी तो लागायचा आणि एखाद्या चित्रपट महोत्सवातही. त्या काळात असा एकही जवळचा मित्र नसेल, ज्याला मी ‘सामना’ पाहायला घेऊन गेलो नाही. प्रत्येक वेळी दोन-चार जण. पण तेवढ्याने समाधान होत नव्हते. ‘सामना’ची व्हिडिओ कॅसेट कुठे मिळेल, जिकडे-तिकडे विचारले. भिडस्तपणा बाजूला ठेवून तेंडुलकर, जब्बार, निळू फुले, डॉ.लागू आणि रामदास फुटाणे यांनाही विचारून झाले. सर्वत्र नकार. उपलब्धच नाही, तर कुठून मिळेल? दरम्यानच्या काळात पुस्तके वाचनाचा झपाटा सुरू झाला होता. मग ‘सामना’चे स्क्रिप्ट असलेले पुस्तक कुठे मिळेल याचा शोध घेतला, पण व्यर्थ. अखेर शोध थांबवला आणि ध्यानी-मनी नसताना टिळक रोडवरच्या नीळकंठ प्रकाशनात ते मिळाले, ज्याच्या शेजारी आम्ही रोज चहाला जात असू. असो, ज्या मित्रांनी ‘सामना’ पाहिला, त्या सर्वांना तो आवडला. पण एक-दोन अपवाद वगळता त्यावर फारशी चर्चा कोणी केली नाही. कोणी भारावून गेलेत, असेही झाले नाही. पुन:पुन्हा बघावा, असेही त्यांना वाटले नाही. त्यामुळे ‘सामना’ माझ्या मनातच चालू राहिला. 

सामना हा बराच जुना म्हणजे 1975 मध्ये प्रदर्शित झालेला सिनेमा. (तेव्हा माझा जन्मही झालेला नव्हता). जब्बार पटेल यांनी दिग्दर्शित केलेला पहिला सिनेमा. विजय तेंडुलकर यांची पटकथा व संवाद असलेला. (तेंडुलकरांना स्वत:चा सर्वांत जास्त आवडलेला सिनेमा.) भास्कर चंदावरकर यांचे संगीत. श्रीराम लागू व निळू फुले यांच्या प्रमुख भूमिका. चित्रपटातील एकही दृश्य- एकही संवाद- अनावश्यक तर सोडाच, पण ‘सहज’ म्हणूनही आलेले नाही. सर्व काही अगदी काटेकोर, मोजून-मापून! (अर्थात, त्यामुळे काहींना तो तांत्रिक दृष्टीने सदोष वाटला, काहींना तो नाटकासारखा वाटला.) चित्रपटाची सुरुवात आणि शेवटही ‘कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे’ या गाण्याने. गावात एक खादीधारी येतो आणि गावातले हिंदुराव धोंडेपाटील यांचे छोटे साम्राज्य विस्कटून परत जातो, या दरम्यानचा हा सिनेमा. निळू फुले यांनी हिंदुराव पाटलांची भूमिका केली आहे आणि श्रीराम लागूंची भूमिका एका खादीधारी गांधीवाद्याची. खादीधारी मास्तर आणि हिंदुराव पाटील पहिल्याच भेटीत एकमेकांची ओळख करून घेतात.

हिंदुराव म्हणतात, ‘‘या भागाची सर्व प्रगती आमच्यामुळे झाली. पूर्वी कुत्री आणि माणसं भांडत होती एकाच भाकरीच्या तुकड्यासाठी. आम्ही ते बदलून टाकलं आणि उभं केलं एक छोटंसं राज्य. रक्त आणि घाम गाळून उभं केलंय. त्यामुळे आम्हाला गावात दुही नाही पाहिजेलाय!’’ मास्तर सांगतात, ‘‘आम्ही स्वातंत्र्यपूर्व काळातून आलो आणि साक्षात काळाकडे चाललोय, तूर्त प्रवासात आहोत. ब्रिटिशांच्या साम्राज्यावर सूर्य कधीही मावळत नाही, ते कसं याचा शोध घेण्यासाठी उभं आयुष्य पणाला लावलं आणि कळलं की, मावळतो. ब्रिटिशांच्या साम्राज्यावरही सूर्य मावळतो.’’ परस्परांच्या अशा ओळखीनंतर सुरू होतो सामना. मास्तर व हिंदुराव पाटील यांच्यातील सामना शेवटपर्यंत रंगत जातो, उत्कंठा ताणत राहतो.  मास्तर आणि हिंदुराव या केवळ व्यक्ती नाहीत, दोन प्रवृत्ती आहेत. या दोनही प्रवृत्ती सामान्य नाहीत, बलाढ्य आहेत. एक प्रवृत्ती व्यवहारवादी, दुसरी प्रवृत्ती ध्येयवादी. एक प्रवृत्ती सत्ताकांक्षी, दुसरी सत्तेपासून पूर्णत: अलिप्त. एका प्रवृत्तीची जनमानसावर प्रचंड हुकूमत, दुसऱ्या प्रवृत्तीची जबरदस्त नैतिक ताकद. 

व्यवहारवादी प्रवृत्तीला अनेक अडचणींचा सामना करीत, प्राप्त परिस्थितीत व उपलब्ध साधनसंपत्तीत काही तरी उभे करून दाखवायचे असते; टिकवायचे असते. त्यासाठी सांभाळून घेणे ते निपटून काढणे, कदर करणे ते निर्दय होणे असा चौफेर संचार करावा लागतो. त्यामुळे नको त्या तडजोडी आणि गैरप्रकारांकडे कानाडोळा करणे भागच असते. त्या प्रवासात वाटा-वळणे व खाच-खळगे येतात. काही वेळा वाट चुकते, पण तेव्हा मागे वळता येत नाही. काट्यांतून का होईना, पुढेच जावे लागते. साखर कारखाना, दूध डेअरी, पोल्ट्री, वाईनरी यांचे चालक-मालक असलेल्या चेअरमन हिंदुराव पाटलांचे असेच होते. दुसऱ्या बाजूला ध्येयवादी प्रवृत्ती. देशासाठी, समाजासाठी पेटून उठणारी. आयुष्य झोकून देणारी, बेभान होऊन वाटचाल करणारी. प्रस्थापित व्यवस्था उलथवून टाकण्यासाठी हे ध्येयवादी लोक धडपडतात, पडतात, उठतात, पुन्हा धावतात. काही समकालीनांच्या दृष्टीने कर्मठ, तर काहींच्या दृष्टीने स्वप्ने विकणारे भाबडे. पण त्यांची नैतिक ताकद एवढी असते की, ते भल्या-भल्यांच्या पायांखालची वाळू सरकवतात. अपयशी ठरले तर समाज त्यांना वेडे पीर ठरवतो आणि यशस्वी झाले तर दैवताचे स्थान बहाल करतो. पण काही वेळा ते वैफल्यग्रस्त होतात आणि भ्रमनिरासात भस्मसातही होतात.

‘सामना’तील मास्तर या ध्येयवादी प्रवृत्तीचा प्रतिनिधी आहे. हिंदुराव हा अतिशय हुशार, चाणाक्ष, चतुर, व्यवहारकुशल लोकनेता; पण एका चुकीमुळे कायद्याच्या कचाट्यात अडकतो. मास्तर हा अतिशय बुद्धिमान, कल्पक व धाडसी; पण रस्ता हरवल्याने भ्रमनिरासात अडकलेला. मागे-पुढे कोणी राहिले नाही म्हणून मास्तर एकाकी आणि सभोवतालच्या गर्दीत राहूनही हिंदुराव एकाकी. पण खरी गंमत वेगळीच आहे. या दोन्ही प्रवृत्तींना आपापल्या मर्यादा आणि परस्परांचे महत्त्व कळलेले असते. त्यामुळे परस्परांविषयी त्यांना एक प्रकारचा आदरही असतो. म्हणून तर ‘सामना’तील हिंदुराव म्हणतात, ‘‘मास्तर, तुम्ही आम्हाला घाबरत नाही म्हणून तुम्ही आमचे मित्र तरी व्हाल किंवा शत्रू तरी.’’ आणि हिंदुरावांचे साम्राज्य उद्‌ध्वस्त केल्यानंतर मास्तर म्हणतात, ‘‘हिंदुराव, या मास्तरचा इंगा माहीत नाही तुम्हाला. मी जिवंत राहिलो ना, तर परत घेऊन जाईन तुम्हाला, तुमच्या राज्यात’’ 

हा सिनेमा प्रदर्शित झाला आणि काहीच दिवसांनी देशात आणीबाणी लागू झाली. त्यामुळे सिनेमातील मास्तर व हिंदुराव यांच्यातील सामन्यात लोकांना ‘जयप्रकाश नारायण व इंदिरा गांधी’ यांच्यातील संघर्ष दिसू लागला आणि जवळपास ‘पडलेला’ सिनेमा जोरात चालू लागला. नंतर तो ‘बर्लिन’च्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात दाखल झाला, वगैरे बराच इतिहास आहे. अर्थात, तो मला नंतर माहीत झाला. असो. तर, हा चित्रपट मी पुन:पुन्हा पाहत होतो आणि प्रत्येक वेळी नवे अर्थ लागत होते, काही गोष्टी नव्याने उलगडत होत्या. मी सतत ध्येयवाद्यांच्याच बाजूने राहिलो, पण त्यांच्या मर्यादा व त्रुटी सातत्याने उकलत राहिल्या. व्यवहारवाद्यांचे आकर्षण मला कधीही वाटले नाही; पण त्यांच्याविषयी तुच्छताही कधीच वाटली नाही. उलट, त्यांचे महत्त्व दिवसेंदिवस अधिकाधिक पटत गेले. ध्येयवाद्यांकडे काय नाही, याची जाणीव अधून-मधून उदास करून गेली; पण त्यांच्याशिवाय समाजजीवनाचा गाडा सुरळीत चालणार नाही, ही जाणीवही कधीच कमी झाली नाही. त्यामुळे आदर्श आणि वास्तव यातील अंतर कसे कमी होईल, हा प्रश्न प्रत्येक विषयाचा-समस्येचा विचार करताना मनात येऊ लागला.

आदर्शाचा पाठपुरावा करायचा, पण त्याच वेळी वास्तवाच्या जवळ राहण्याचा प्रयत्न करायचा- असा दुहेरी संघर्ष चालूच राहिला. मागे वळून पाहताना वाटते, त्याची सुरुवात ‘सामना’ने करून दिली असावी. असो. तर, मी पहिल्यांदा ‘सामना’ पाहिला त्याला आता अठरा वर्षे झाली. त्यातील पहिल्या नऊ वर्षांत मी सतरा- अठरा वेळा तरी ‘सामना’ पाहिला असावा. नंतर त्याची डीव्हीडी उपलब्ध झाली, तेव्हा मी त्याची शिफारस अनेकांकडे करू लागलो. पण गंमत म्हणजे, त्यानंतरच्या नऊ वर्षांत तो सिनेमा मी एकदाही पाहिला नाही. आणि याच नऊ वर्षांत लेखनाचे प्राथमिक धडे गिरवणे ते संपादक होणे- हा वेगवान प्रवास झाला. गेल्या वर्षी ‘मला प्रभावित करून गेलेला सिनेमा’ या विषयावर ‘साधना’चा विशेषांक काढण्याची कल्पना सुचली तेव्हा, मी त्या अंकात ‘सामना’वर लिहिणार हे उघडच होते. त्यासाठी पुन्हा एकदा सिनेमा पाहण्याची गरज वाटली नाही. पण अलीकडच्या नऊ वर्षांत पाहिलेला नाही, म्हणून त्या वातावरणात पुन्हा घुसता यावे यासाठी ‘सामना’च्या काही क्लिप्स इंटरनेटवर असतील तर नजर टाकू या, असा विचार मनात आला. इंटरनेटवर गेलो तर संपूर्ण सिनेमाच उपलब्ध! सहज क्लिक केले. सिनेमा सुरू झाला. दोन-चार मिनिटे गेली नाहीत तोच, सिनेमाच्या दृश्य चौकटींचे एडिटिंग प्रकर्षाने जाणवले. आणि सर्रकन मनात विचार चमकून गेला, ‘अरे, आपल्यातील संपादकावरही ‘सामना’चा प्रभाव आहे की काय?’ 

‘मला प्रभावित करून गेलेला सिनेमा’ या साधना विशेषांकाला पुस्तकरूप देताना त्यात आणखी पाच नवीन लेखांची भर टाकली आहे, त्यापैकी हा एक... 

Tags: ध्येयवाद व्यवहारवाद रामदास फुटाणे डॉ.श्रीराम लागू निळू फुले जब्बार पटेल विजय तेंडुलकर सामना विनोद शिरसाठ मला प्रभावित करून गेलेला सिनेमा Dhyeyvaad Vyavaharvaad Ramdas Futane Dr. Shriram Lagu Nilu Phule Jabbar Patel Samana Vijay Tendulkar Vinod Shirsath Mala Prbhavit Karun Gelala Cinema weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

विनोद शिरसाठ,  पुणे ( 101 लेख )
vinod.shirsath@gmail.com

मागील दोन दशकापासून साधना साप्ताहिकात कार्यरत असलेले विनोद शिरसाठ हे साधना साप्ताहिक, साधना प्रकाशन व कर्तव्य साधना (डिजिटल पोर्टल) यांचे संपादक आहेत.




साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 1300, 2500, 3600 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख 2008-2025

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1948-2007

सर्व पहा

जाहिरात

देणगी

साधना प्रकाशनाची पुस्तके