डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

नाटकाच्या क्षेत्रातला 'ऋषी' अल्काझी

9 डिसेंबर 2004 रोजी 'आधुनिक भारतीय रंगभूमी'चे जनक इब्राहीम अल्काझी यांना 'रूपवेध प्रतिष्ठान'चा पहिला 'तन्वीर सन्मान' प्रदान करण्यात आला. त्या कार्यक्रमाला प्रत्यक्ष उपस्थित राहून लिहिलेला हा वृत्तांत…

साधारणतः महिन्याभरापूर्वी एक बातमी कानावर आली... "डॉ. श्रीराम लागू यांनी 'रूपवेध' प्रतिष्ठानची स्थापना केली आहे... या प्रतिष्ठानमार्फत दरवर्षी एक लाख रुपयांचा पुरस्कार देण्यात येणार आहे... नाट्यक्षेत्रात अखिल भारतीय स्तरावर विशेष कामगिरी केली आहे, अशा व्यक्तीला हा पुरस्कार दिला जाणार आहे."

'हिंदी चित्रपट पैशांसाठी; मराठी चित्रपट प्रेक्षकांसाठी; पण नाटकं मात्र स्वतःसाठी केली' असं सांगणारे आणि 'माझं हिंदी चित्रपटातलं योगदान शून्य आहे' असं कळवून हिंदी चित्रपटांसाठीचा 'जीवनगौरव' पुरस्कार नाकारणारे डॉ. श्रीराम लागू दरवर्षी एका 'रंगधर्मी’ला सन्मानित करणार, हा जाणकारांमध्ये चर्चेचा विषय झाला. (होय, 'रंगकर्मी 'ऐवजी 'रंगधर्मी' हा शब्द मराठी भाषेत रुजवण्याचं काम डॉक्टर गेली काही वर्षे सातत्याने करीत आहेत.) 'नाटक हा गंभीर कला-प्रकार आहे आणि 'अॅन अॅक्टर शुड बी अॅथलिट फिलॉसॉफर' असा आग्रह धरणारे डॉ. लागू 'रूपवेध'च्या पहिल्या सन्मानासाठी कोणाची निवड करतील याचं अनेकांना कुतूहल वाटू लागलं. प्रत्येक मुलाखतीतून सामान्य नाट्यरसिकांना अजिबात माहीत नसलेल्या बऱ्याच अमराठी रंगधर्मींविषयी डॉक्टर आपल्या खास आवाजात, आश्चर्य-मिश्रित कौतुकानं बोलत असतात. त्यापैकी एखादं नाव त्यांनी फार पूर्वीच निश्चित केलंही असेल, असं जाणकारांना वाटत होतं... आणि झालंही तसंच!

2 डिसेंबरच्या वृत्तपत्रांतून बातमी झळकली... "रूपवेध प्रतिष्ठानचा पहिला सन्मान इब्राहीम अल्काझी यांना जाहीर.... पुण्यातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात विजयाबाई मेहतांच्या हस्ते तन्वीर सन्मान प्रदान करण्यात येईल... प्रमुख वक्ते असतील गिरीश कार्नाड, महेश एलकुंचवार आणि नसिरुद्दीन शाह."

बातमी वाचल्यावर अनेकजण विचारू लागले... 'कोण हे अल्काझी?'... 'काय यांचं विशेष कर्तृत्व?' लगेचच आलेल्या रविवारी 'सकाळ' व 'लोकसत्ता' दैनिकांच्या पुरवण्यांतून ज्योती सुभाष व सुहास जोशी या त्यांच्या विद्यार्थिनींचे लेख आले... थोडसं कुतूहल शमलं. 'नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा' (एन.एस.डी.) उभारली, चालवली आणि आशिया खंडातील महत्त्वाची संस्था म्हणून नावारूपास आणली, तेच हे अल्काझी! ज्योती सुभाष यांनी तर स्पष्टच लिहिलं... "अल्काझींची 'जीवनशैली' व 'कार्यशैली' यांचं दर्शन घडवणं हे एकट्याचं काम नाही. किमान शंभर जणांनी त्यांच्यावर पीएच.डी. करायला हवी तर थोडंफार हाती लागेल!"

सतत काहीतरी नावीन्याच्या शोधात असणाऱ्या पुणेकरांना एका आठवडयातच 'अल्काझी' हे नाव परिचयाचं वाटू लागलं. अल्काझी हा माणूस 'अफाट' असणार आणि त्यांना पुरस्कार देण्याचा कार्यक्रम 'आखीव-रेखीव' होणार; हे गृहीत धरणाऱ्यांनी प्रवेशिका मिळविण्यासाठी धडपड सुरू केली. हजार-बाराशे प्रवेशिका हातोहात संपल्या...

9 डिसेंबरच्या संध्याकाळी यशवंतराव चव्हाण नाट्यगृह गर्दीने फुलून आलं. साहित्य, कला व सांस्कृतिक क्षेत्रातील नामवंतांची उपस्थिती ठळकपणे जाणवत होती. सर्वच वयोगटातील लोकांची उपस्थिती पुण्यातील फारच कमी कार्यक्रमांना मिळते. या कार्यक्रमाला ती होती.

बरोबर साडेसात वाजता पडदा उघडला... एका बाजूला महेश एलकुंचवार, विजया मेहता; दुसऱ्या बाजूला गिरीश कर्नाड, नसिरुद्दीन शाह आणि मधोमध बसले होते, इब्राहीम अल्काझी...

डॉ. लागू म्हणाले;- " आजच्या कार्यक्रमाचं 'सूत्रसंचालन' मी करणार आहे... माझा आणि दीपाचा मुलगा 'तन्वीर' काही वर्षांपूर्वी अपघातात गेला... 'तन्वीर' हा फारसी शब्द... त्याचा अर्थ - 'आकाशातला दिव्य प्रकाश'... आज तन्वीरचा वाढदिवस... त्याच्या 'स्मृतिप्रित्यर्थ' दरवर्षी 9 डिसेंबरला 'तन्वीर सन्मान... अखिल भारतीय स्तरावर असामान्य कामगिरी करणाऱ्या रंगधर्मीला प्रदान केला जाईल.

पण 'तन्वीर 'ची स्मृती हा एकमेव हेतू यामागे नाही... पडद्याआड नाही, पण प्रकाशाआड गेलेल्या रंगधर्मीची नव्या पिढीला ओळख करून द्यावी, त्यांच्याविषयीची कृतज्ञता व्यक्त करावी हा उद्देशही यामागे आहे...

पहिला पुरस्कार आम्ही इब्राहीम अल्काझी यांना देत आहोत. सामान्य जनांना आणि नाट्यक्षेत्रातील नव्या पिढीलाही अल्काझींबद्दल काहीच माहीत नाही... 'अल्काझी म्हणजे काय' असं विचारणारे काही लोक मला भेटले.. 'अल्काझी म्हणजे कोण' असंसुद्धा नाही, तर अल्काझी म्हणजे काय?.... अल्काझींबरोबर काम केलेले त्यांचे काही विद्यार्थी येथे आहेत... ते विद्यार्थीच त्यांच्याबद्दल बोलतील... मी बोलणार नाही. फक्त क्रम सांगतो... गिरीश कार्नाड, महेश एलकुंचवार, नसिरुद्दीन शाह बोलतील; त्यानंतर अल्काझी 'मनोगत' व्यक्त करतील आणि शेवटी विजयाबाई अध्यक्षीय समारोप करतील."

साहित्यासाठी 'ज्ञानपीठ' पुरस्कार मिळालाय, अनेक चित्रपटांतून संस्मरणीय भूमिका केल्यात आणि ज्यांचं 'तुघलक' हे नाटक अल्काझींनी दिग्दर्शित केलं होतं, ते गिरीश कार्नाड म्हणाले, "मी कर्नाटकात कॉलेजचा विद्यार्थी होतो तेव्हा मुंबईत येऊन अल्काझींनी दिग्दर्शित केलेलं एक नाटक पाहिलं... त्या नाटकाने मला अक्षरशः आंतरबाह्य पिळवटून टाकलं. लेखनातील ताकद मला पहिल्यांदा कळली... अल्काझींनी 'नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा’मध्ये काय केलं? विद्यार्थी तयार केले; दिग्दर्शक घडवले आणि मुख्य म्हणजे चळवळी माणसं बनवली. पूर्वी कर्नाटकात नाटकं व्हायची; पण नाटकाला 'दिग्दर्शक' असावा लागतो, याची लोकांना जाणीवच नव्हती. एन. एस. डी. मधील अल्काझींचे विद्यार्थी आले, नाटकं बसवू लागले, तेव्हा लोकांना ही जाणीव झाली.

अल्काझींनी मला काय दिलं? दोन गोष्टी दिल्या... निखळ मैत्री आणि नाटकाकडे पाहण्याची दृष्टी! त्यांनी भारतीय रंगभूमीला काय दिलं? साठच्या दशकात त्यांनी अनेक भारतीय व पाश्चिमात्य रंगभूमी वरील नाटकं केली. 'लिव्हिंग रूम' परंपरेत अडकलेलं आधुनिक भारतीय नाटक त्यांनी बाहेर काढलं. परंपरेकडे, पुराण-कथांकडे व्यापक दृष्टिकोनातून पहायला शिकवलं. नाट्यसृष्टीला भारतीयत्वाची जाणीव त्यांनीच सर्वप्रथम करून दिली. अल्काझींचं हे कार्य सर्वांत महत्त्वाचं आहे."

भगवा 'कुर्ता-पायजमा' वेषातील गिरीश कर्नाड यांचं इंग्रजीतून झालेलं दहा मिनिटांचं भाषण संपलं. आणि मग पांढरा 'कुर्ता-पायजमा वेषातील महेश एलकुंचवार भाषण करायला पुढे आले. त्यांचं 'वाडा चिरेबंदी' हे नाटक अल्काझींनी दिग्दर्शित केलं होतं.

शांत लयीत, स्वच्छ मराठीत महेश एलकुंचवार बोलू लागले- "काही दिवसांपूर्वी डॉ. लागू माझ्याकडे आले.... 'रूपवेध प्रतिष्ठान' आणि 'तन्वीर सन्मान संबंधी बोलू लागले... पहिला सन्मान कोणाला द्यायचा असा प्रश्न आला आणि अगदी उत्स्फूर्तपणे, एकाच वेळी आम्हा दोघांच्याही तोंडून एकच नाव आलं... 'अल्काझी? याहून अधिक बोलकी गोष्ट कोणती?

आता नाटक म्हटलं की 'मराठी नाटक' असा विचार आमच्या मनात येत नाही... 'नाटक' म्हटलं की समोर येत... 'भारतीय नाटक...' याला कारणीभूत आहेत- 'अल्काझी!' भारतीय नाटक बहुमुखी झालं.... अल्काझींमुळे! आणि हे 'अल्काझी' नाव लोकांना माहीत नसेल तर.... ते कळायला पाहिजे. अल्काझी हे आधुनिक भारतीय रंगभूमी'चे जनक आहेत. त्यांच्यापासून वेगवेगळे प्रवाह सुरू होतात. नटांच्या-दिग्दर्शकांच्या तीन पिढया त्यांनी घडवल्या... भारतीय रंगभूमीवरील महत्त्वाची म्हणता येतील अशी दोन-तृतीयांश माणसं अल्काझींकडे शिकलेली आहेत.

भारतीय रंगभूमीची परंपरा अधिक विस्तृत, अधिक सखोल करण्याचं काम अल्काझींनी केलं. भारताबाहेरचा फक्त इब्सेन आम्हांला माहीत होता... ग्रीक, रोमन, रशियन, युरोपियन रंगभूमीचे दरवाजे अल्काझींनी आमच्यासाठी उघडले. परंपरा तेव्हाच समृद्ध होते जेव्हा ती 'सर्वसमावेशक' होते. चांगलं-वाईट कळण्यासाठी एक प्रकारची 'साधना' करावी लागते अशी साधना अल्काझींनी केली. आपल्या परंपरेची वैशिष्ट्ये त्यांनी विशद केली. त्यांत 'आधुनिकता' आणली. आधुनिकतेचा आपण चुकीचा अर्थ लावतो... 'आधुनिकता' म्हणजे परंपरेशी फारकत नव्हे!

जिथे, जे काही चांगलं दिसलं, ते अल्काझींनी नाटकात आणलं. आज जे आम्ही सहज करून जातो, त्यामागे एका मोठ्या माणसाचं योगदान आहे अल्काझींचं! माझ्या दृष्टीनं अल्काझी हे एक 'अख्यायिका' आहेत. त्यांना पहिल्यांदा भेटलो तेव्हा मी 'स्पीचलेस' झालो होतो. काय बोलणार एवढ्या मोठ्या माणसापुढे? विजयाबाईंकडून अल्काझींबद्दल खूप खूप ऐकलं होतं....

माझ्या 'वाडा-चिरेबंदी'चे प्रयोग अल्काझी करताहेत, हे कळल्यावर श्री. पु. भागवतांचं मला पत्रं आलं होतं... त्यांनी लिहिलं होतं... 'ऋषी हा शब्द नाटकाच्या क्षेत्रात वापरता येईल असा एकच माणूस आहे अल्काझी!' तुम्हांला माहीतच आहे कोणाचीही तारीफ करण्यासाठी श्री. पु. प्रसिद्ध नाहीत.

माझं नाटक दिग्दर्शित करण्याच्या काळात तीन दिवस मी अल्काझींच्या सहवासात होतो. ते दिवस संस्मरणीय आहेत. नवीन लेखकांनाही ते प्रतिष्ठेनं वागवतात. कारण त्यांना दुसऱ्या पद्धतीने वागवताच येत नाही. कोणाला 'अभिजातता' बघायची असेल, तर 'एक दिवस' अल्काझींच्या सहवासात घालवायला हवा.

नवीन रंगधर्मीना मी आवाहन करतो- परंपरांशी वेडं भांडण करण्यात अर्थ नाही. परंपरेतील 'सत्त्व' घेऊनच पुढे जायला हवं. समृद्ध दृष्टीने चित्रं पहा, शिल्प पहा, फोटो पहा, संगीत ऐका, पुस्तकं वाचा... आत्म्याला या सर्वांची गरज वाटली पाहिजे. त्यातून येणारी समृद्धी कलेवर परिणाम करते. "

'महेश एलकुंचवारांच्या भाषणामुळे कार्यक्रम वेगळ्याच उंचीवर पोहोचला. डॉ. लागू म्हणाले, "महेशने आमच्या पिढीच्याच भावना व्यक्त केल्यात." त्यानंतर बोलायला उभे राहिले अल्काझींचे खास विद्यार्थी... नसिरुद्दीन शाह- "डॉ लागूंकडून मला कळलं... आम्ही तन्वीरच्या नावाचा पुरस्कार अल्काझींना देतोय, तेव्हा मी भावनिक झालो... दोन कारणांमुळे भावनिक झालो... डॉ. लागू आणि सत्यजित दुबे यांनी मला 'आधे-अधुरे' नाटकात घेतलं होतं. तेव्हा तन्वीर माझ्या मुलीचा चांगला मित्र झाला होता... दुसरं कारण अल्काझी! 1969 साली मी अल्काझींना पहिल्यांदा भेटलो. त्यानंतरचा काळ माझ्या नजरेसमोर आला. अल्काझींनी मला बोट धरून चालायला शिकवलं. 'लो अँगल शॉट' मधूनच मी त्यांच्याकडे पाहतो. मी त्यांच्याकडे सरळ पाहूच शकत नाही!

I was back-bencher, slow at under-standing... He taught me, how to walk... He altered my life. अल्काझींना एकदा भेटलेला माणूस भारावून जातो आणि मग त्यांच्याबद्दल भरभरून बोलल्याशिवाय राहूच शकत नाही!

एन. एस. डी. त प्रवेश घेताना त्यांनी मला विचारलं, "तुला अॅक्टर का व्हायचंय?" मी उत्तर दिलं, "मला वेगवेगळे 'रोल्स' करायचेत!" ते म्हणाले, "अॅक्टींग 'छाप' पाडण्यासाठी नसते; प्रेक्षकांशी 'संवाद' साधण्यासाठी असते!"

शेवटच्या वर्षी 'व्हायवा तील एका प्रश्नाला उत्तर देताना मी म्हणालो, "अॅक्टींग कुड बी लर्स्ट फ्रॉम बुक्स आय डोन्ट बिलिव्ह!" अॅक्टींगसाठी पुस्तकांचं वाचन किती महत्त्वाचं असतं हे मला उशीरा कळलं. 

'एन. एस. डी. 'मध्ये शेवटचं वर्ष दिग्दर्शनासाठी होतं. आम्ही अल्काझींचा रागराग करायचो. 'अॅक्टर' होणाऱ्या आम्हा विद्यार्थ्यांना दिग्दर्शनाचा अभ्यास कशाला ठेवलाय?... पण पंचवीस वर्षांनंतर त्याचं महत्त्व कळलं... बेटर लेट दॅन नेव्हर! अल्काझी म्हणाले, “रिस्पेक्ट स्क्रिप्ट, रिस्पेक्ट कॉस्च्युम, रिस्पेक्ट ऑब्जेक्ट अँड रिस्पेक्ट 'द स्टेज!" विद्यार्थीदशेत हे सर्व शिकायला आपण नाखूष असतो, मीसुद्धा होतो! आजही कधीतरी अडचणी निर्माण होतात, तेव्हा आठवतं 'अरे, हे तर
अल्काझींनी आपल्याला पूर्वीच सांगितलं होतं!" 

चॅर्ली चॅप्लीनबाबत म्हटलं जायचं तेच अल्काझींबाबत म्हणता येईल… 'अल्काझी हॅज बीन सेन्ट बाय गॉड!' 

धीरगंभीर आवाजात छोट्या-छोट्या वाक्यातील साधं-सोपं पण थेट हृदयाला भिडणारं इंग्रजीतलं नसिरचं भाषण संपलं... मग विजयाबाई मेहतांच्या हस्ते अल्काझींना 'तन्वीर सन्मान' प्रदान करण्यात आला तेव्हा संपूर्ण सभागृह उभं राहिलं. जवळपास दोन मिनिटं लोक उभे राहून शांतपणे टाळ्या वाजवत होते... 'स्मृतिचिन्ह' हातांत घेऊन अल्काझींनी प्रेक्षकांना 'अभिवादन' केलं, तेव्हा तर टाळ्यांचा गजर शिगेला पोहोचला... टाळ्या थांबल्या, प्रेक्षक खाली बसले आणि मग अल्काझी बोलू लागले... "लंडनच्या रॉयल अॅकॅडमीत मी शिक्षण घेतलं. त्यांनी मला काय शिकवलं?... रॉयल अॅकॅडमी टॉट मी, 'व्हॉट नॉट टू डू!'... मुंबईत थिएटर अॅकॅडमीत मी प्रयोग करू लागलो, तेव्हा मला सांस्कृतिक-मंत्रालयाकडून आमंत्रण आलं... 'नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा'चं संचालकपद स्वीकारण्याचं... मी नकार दिला, कारण मी तरुण होतो आणि एन. एस. डी. च्या संचालकाला तर खूप काही असावं लागणार होतं... नंतर मला सांगण्यात आलं, 'ही जबाबदारी तुम्ही स्वीकारली नाही तर, एन. एस. डी. चा प्रकल्पच रद्द होण्याची शक्यता आहे.' मला मुंबई सोडून दिल्लीला जावं लागणार होतं आणि सरकारशी एकनिष्ठ रहावं लागणार होतं... अवघड जबाबदारीची जाणीव झाली... मी द्विधा मनःस्थितीत होतो. तेव्हा प्रो. बॅनर्जी म्हणाले, “हीच योग्य वेळ आहे! तू जा!! हे काम आव्हानात्मक आहे!!!"

एन. एस. डी.ला जागा नव्हती... एका बंगल्याच्या आवारात काम सुरू केलं… दिल्लीतील सार्वजनिक जागा आणि ऐतिहासिक वास्तूंचा उपयोग करून प्रयोग करायला सुरुवात केली. 'फिरोजशाह कोटला' मैदानावर धर्मवीर भारतींच्या 'अंधायुग'चे प्रयोग केले तेव्हा जवाहरलाल नेहरू नाटक पाहायला आले होते. भारतींचं 'अंधायुग', मोहन राकेश यांच 'आषाढ का एक दिन' ही नाटकं करताच येणार नाहीत असं म्हटलं जात होतं, पण ती करून दाखविली. स्वतःला शिकवायचं आणि अनुभवातून शिकत जायचं, असं धोरण ठेवल्यामुळे हे करता आलं. थोडीशी 'कल्पकता' आणि थोडासा 'कॉमन सेन्स' असेल तर बरंच काही करता येतं....

आता तुम्हांला माहीत नसलेलं थोडं व्यक्तिगत सांगतो... माझा जन्म याच पुणे शहरात झाला आहे. लाल देवळाजवळ आमचं घर होतं. सेन्ट व्हिन्सेट शाळेत मी शिकलो. बालवयात माझ्या कानावर पोवाडे व लावण्या पडल्या आहेत. 'संत तुकाराम' हा सर्वांगसुंदर चित्रपट मी इथेच पाहिला आहे. त्या चित्रपटाने माझ्या जीवनावर फार परिणाम केला आहे. नैतिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक मूल्ये मी याच शहरातून घेतली आहेत. महाराष्ट्राने मला फार प्रेम आणि आदर दिला आहे. मामा वरेरकर, श्री. पु. भागवत, रामदास भटकळ, के. नारायण काळे, विजय तेंडुलकर, पु. ल. देशपांडे, जब्बार पटेल, इंटरनॅशनल दीक्षित या सर्वांशी माझे अतूट स्नेहबंध आहेत.

मी महाराष्ट्रीय अरब आहे. तब्बल पासष्ट वर्षानंतर मी पुण्यात आलो आहे. पण ससून हॉस्पिटल, मॅटर्निटी वॉर्ड, रुम नं. 10 मध्ये 18 नोव्हेंबर 1925 रोजी माझा जन्म झाला आहे. लोकमान्य टिळक मला माहीत आहेत. त्यांच्याच भाषेत सांगायचं तर मी म्हणेन... 'मला महाराष्ट्रीय म्हणून ओळखलं जावं. तो माझा 'जन्मसिद्ध हक्क आहे... आणि तो तुम्ही मला दिला आहे!"

कोणालाच माहीत नसलेलं गुपीत उलगडून ताड्ताड् पावलं टाकत ऐंशी वर्षांचे अल्काझी आपल्या जागेवर जाऊन बसले तेव्हा भारावलेल्या श्रोत्यांनी टाळ्यांचा गजर चालूच ठेवला.

डॉ. लागू म्हणाले, “मी अश्रद्ध माणूस आहे, पण आज 'तन्वीर'चं खरं श्राद्ध झालं आहे, असं मला वाटतंय. पुणेकर 'महाराष्ट्रीय अरबानं' त्याचं 'पौराहित्य' केलं आहे!"

विजया मेहता अध्यक्षीय समारोप करायला आल्या... "अल्काझींचं माझ्यावर असलेलं ऋण मला कधीही व्यक्त करता आलं नाही. त्यांनी मला काय दिलं, हे मला त्यांना कधीही सांगता आलं नाही. तुमच्या साक्षीने मी आज ते सांगणार आहे...

स्नेही-शिक्षक-गुरू यात फरक असतो. गुरू एकच असतो, तो काय करतो? तो मानसिक ब्लॉटिंग पेपर'चं काम करतो. टीपकागद असतो गुरू... तुम्ही काय घ्यावं, हे टिपण्याची क्षमता गुरूमध्ये असते. माझ्या बाबतीत हे काम अल्काझींनी केलं. त्यांच्याकडे शिस्तीच्या पलीकडे बरंच काही होतं... एक प्रकारचा 'धर्मभाव' होता. कलेविषयी जे करायचं त्याबद्दल 'आदरभाव' होता. त्यांनी दिलं ते 'शिक्षण' नव्हतं, 'अनुभव' होता. 'बाईंचं 'पेपरवर्क' अप्रतिम असतं,' असं लोक म्हणतात. त्याचं बीज अल्काझींनी पेरलं होतं. 'रंगायन'मध्ये मी जे काही प्रयोग केले, त्याचं बरंचसं श्रेय अल्काझींकडे जातं!"

समोराप करताना डॉ. लागू म्हणाले... "मला आनंद आणि स्वाभिमान वाटतोय, पुणेकर महर्षीना मी पुण्यात आणू शकलो. मलाही माहीत नव्हतं अल्काझी पुणेकर आहेत म्हणून! ह्या माणसाने मला फार छळलं आहे. 'तन्वीर सन्मान' स्वीकारण्याची विनंती करण्यासाठी फोन केला तेव्हा ते म्हणाले, 'मी येईन, सन्मान स्वीकारेन, पण पुरस्काराची रक्कम घेणार नाही! विमानाचा आणि तिथेच राहण्याचा माझा खर्च मीच करीन. 'मी याला तयार नव्हतो. मी पुन्हा सांगितलं, हा आमचा पहिलाच पुरस्कार आहे. त्यामुळे पुरस्काराची रक्कम तुम्ही स्वीकालीच पाहिजे. वाटल्यास ती रक्कम एखाद्या संस्थेला देणगी द्या!" त्यांनी संमती दिली. पण नंतर त्यांचं पत्र आलं, त्यासोबत दोन लाख रुपयांचा डी.डी. होता. पत्रात लिहिलं होतं "याला प्रसिद्धी मिळता कामा नये." मी म्हणालो, "का प्रसिद्ध करू नको? लोकांना कळलं पाहिजे, 'जगात अशीही माणसं असतात. हे सारं कळणं हा पुणेकरांचा हक्क आहे. म्हणून मी ते आत्ता जाहीर केलंय. आपण सर्वजण दोन मिनिटं उभं राहून या महर्षींना मानवंदना देऊ!"

[शब्दांकन: विनोद शिरसाठ]

Tags: नाटक. एन. एस. डी. इब्राहिम अल्काझी डॉ. लागू तन्वीर सन्मान Drama. N.S.D. Ibrahim Alkazi Dr Lagu Tanvir sanman weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

विनोद शिरसाठ,  पुणे
vinod.shirsath@gmail.com

मागील दीड दशकापासून साधना साप्ताहिकात कार्यरत असलेले विनोद शिरसाठ हे साधना साप्ताहिक, साधना प्रकाशन व कर्तव्य साधना (डिजिटल पोर्टल) यांचे संपादक आहेत.


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके