डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

ह्या बाबतीत आपला नाना पाटेकर बरा. तो म्हणतोय, ‘प्रत्येकाला आपल्या पायाला हात लावता आला पाहिजे. माणसाच्या लवचिकतेची ती परीक्षा असते. माझे शरीर चांगले वाकते, पण कुठल्याही राजकीय पक्षात जाण्याइतके ते वाकत नाही!’

आकाश-विवेक

“ही मोठी माणसं स्वतःची फजिती का करून घेताहेत, तेच कळत नाही!”

“अरे आकाश, झालं तरी काय?” 

“मला सांग, अरुण भाटिया, मेधा पाटकर आणि ते यू.आर. अनंतमूर्ती, ह्या लोकांना निवडणुकीच्या गदारोळात उतरण्याची दुर्बुद्धी का व्हावी?” 

“चांगली माणसं राजकारणात यायलाच पाहिजेत!”

"अरे पण, कलमाडी-रावत यांच्यापुढे भाटियांचा निभाव कसा लागणार? राजापूरमधून सुरेश प्रभूंच्या विरोधात मेधाताई निवडून येण्याची शक्यता किती आहे? आणि ते अनंतमूर्ती बंगलोरमधून उभे राहताहेत, अनंतकुमार यांच्या विरोधात. अनंतकुमार आहेत कर्नाटकात भाजपाचे प्रदेशाध्यक्ष.” 

“मेधाताई आणि अनंतमूर्ती हे दोघेही नियोजन करून उतरताहेत असं दिसतंय. त्यामुळे धक्कादायक निकाल लागू शकतात.”

“शक्यच नाही! निवडणुकीचं तंत्र वेगळं असतं. फक्त उमेदवार मोठा असून चालत नाही. निवडणुका जिंकायच्या असतील तर कार्यकर्ते असावे लागतात... स्थानिक कार्यकर्ते.”

“मग काय ह्या लोकांनी निवडणूक लढवायचीच नाही?”

“तसं नाही रे! ही माणसं निवडून यावीत असं मलाही वाटतंय. पण शक्यता फारच कमी असेल तर त्यांनी आटापिटा करू नये, इतकंच मला म्हणायचंय!”

“पण तूच म्हणत असतोस ना, ‘तत्त्वासाठी लढलं पाहिजे. वेळ आली तर यशापयशाचा विचार न करता, एकाकी झुंज दिली पाहिजे!”

“हो, पण ही माणसं आता अशा टप्प्यावर उभी आहेत, की त्यांचा पराभव त्यांच्या समर्थकांना नाउमेद करणारा ठरू शकतो. शिवाय जनतेत संदेश जातो तो वेगळाच... ‘बघा ही भली भली माणसं निवडून येत नाहीत, मग आपला निभाव कसा लागणार?’ असं म्हणून अनेक लोक निवडणुकीपासून दूर राहतात, काही लोक सामान्य जनतेला शिव्या देऊन मोकळे होतात आणि काही महाभाग तर लोकशाही व्यवस्थेला जबाबदार धरतात.”

“भारतीय लोकशाही आता संक्रमण अवस्थेतून जात आहे. त्यामुळे असे तोटे होणारच, पण फायदे बघ ना... चांगली माणसं 'राजकारणात येत नाहीत, ही ओरड कमी होईल. उमेदवार लायक ‘नाहीत’ ह्या सबबीखाली मतदानाला न जाणारांची तोंडे बंद होतील.”

आकाश-आनंद

“आनंदी-आनंद गडे, जिकडे तिकडे चोहीकडे, वरती खाली...”

“आनंद, फारच आनंदी मूडमध्ये दिसतोयस आज?”

“दुःख करावं असं आज आहेच काय? तुम्ही माना अथवा नका मानू, पण देशात ‘फील गुड’चं वातारण आहे!"

“फील गुड आहे, पण फक्त मध्यमवर्गापुरतं, आणि हा वर्ग आहे पंचवीस-तीस टक्के. उरलेल्या सत्तर टक्क्यांचं काय?”

“तेच सांगतोय आम्ही! आज तीस टक्के लोक ‘फील गुड’ अनुभवताहेत, याचं कारण मागील पाच वर्षांची कारकीर्द. हेच प्रमाण चाळीस, पन्नास, साठ, सत्तर टक्के करायचं असेल तर अटलजींचं सरकार पुन्हा यायला पाहिजे.”

“युक्तिवाद बिनतोड करतोस! प्रमोद महाजनांना गुरू केलंस की काय?”

“महाजनांना आपल्या पिढीची नस सापडलीय. भाजपाची रणनीती ठरविणारांत ते प्रमुख आहेत.”

“पण असंही म्हटलं जातं, की ते भाजपच्या जाहिरात विभागाचे प्रमुख आहेत.” 

“जाहिरात हा आता नव्या युगाचा मूलमंत्र झाला आहे. तुम्ही चांगले असणं पुरेसं नाही, तसा प्रचार करणंही तितकंच महत्त्वाचं आहे. बघ ना, जाहिराती आल्यानंतरच लोकांना आपण ‘फील गुड’ अवस्थेत आहोत याची जाणीव झाली.”

“पण काय रे, राजकीय पुढाऱ्यांचं ‘ग्लॅमर’ कमी झालंय म्हणून चित्रपट क्षेत्रातील लोकांची मदत घेतली जातेय. ही गोष्ट लाजीरवाणी नाही वाटतं?”

“राजकीय पुढाऱ्यांचं ‘ग्लॅमर’ कमी झालंय, ही नाण्याची एक बाजू. ह्या ‘फिल्मी’ लोकांचंही ‘ग्लॅमर’ कमी झालंय ही दुसरी बाजू. बहराचा काळ ओसरला की यांना कोणी विचारीत नाही. क्रिकेटपटूंचंही तसंच, ‘आजी’चा ‘माजी’ झाला की संपलं याचं ग्लॅमर.”

“म्हणजे, एकमेका साह्य करू... असा प्रकार चाललाय तर...”

“हो, पण हे फार काळ चालणार नाही! सामान्य जनतेशी अजिबात संपर्क नसणाऱ्या ह्या ताऱ्यांना, तारकांना राजकीय पुढारी वापरून घेतील, आणि नंतर फेकून देतील.”

“ह्या बाबतीत आपला नाना पाटेकर बरा. तो म्हणतोय, ‘प्रत्येकाला आपल्या पायाला हात लावता आला पाहिजे. माणसाच्या लवचीकतेची ती परीक्षा असते. माझे शरीर चांगले वाकते पण कुठल्याही राजकीय पक्षात जाण्याइतके ते वाकत नाही!”

आकाश-संग्राम

“संग्राम, निवडणुकीसाठी उमेदवारी देताना पक्षाने पहिला निकष कोणता लावला पाहिजे?”

“निवडून येण्याची शक्यता आणि निवडणूक लढविण्याची क्षमता!” 

“जर चार-पाच लाख लोकांचा प्रतिनिधी म्हणून तो माणूस निवडून जाणार असेल तर त्याची त्या पदासाठीची लायकी हा पहिला निकष का नसावा?”

“तू म्हणतोस ते बोलायला-लिहायला सोपं आहे. पण प्रत्यक्षात आणायला... अरे निवडणुका लढवणं म्हणजे रणांगणात उतरण्यापेक्षा कठीण आहे. लाखो-करोडो रुपये खर्चावे लागतात. शेकडो कार्यकर्ते सांभाळावे लागतात. किती तऱ्हेची माणसं... किती तऱ्हेचे प्रश्न... आखाड्यातले डावपेच आणि काय काय! तत्त्व, विचार हे सर्व घरात रस्त्यावर लोकांना तोंड देताना वास्तव वेगळंच असतं.”

“म्हणजे मोठ्या भ्रष्टाचाराची बीजं निवडणुकीतच रुजत असतात.” 

“डोळे दिपवून टाकणारं असं काही भव्यदिव्य केल्याशिवाय, लोक त्या उमेदवाराला मोठं मानायलाच तयार नसतात. त्यासाठी लाखो रुपयांचा चुराडा करावा लागतो. निवडणूक संपल्यावर हे पैसे वसूल करण्याच्या मागे ते उमेदवार लागतात. त्यातूनच भ्रष्टाचाराची प्रकरणं घडतात. व्यापारी, उद्योगपती पक्षांना उमेदवारांना मोठ-मोठ्या देणग्या देतात. ते काय वेडे असतात?”

“म्हणजे हा सावळा गोंधळ असाच चालू राहणार...”

“आणखी काही वर्षे तो वाढत जाणार. लोकशाही व्यवस्थेत हा टप्पा अपरिहार्य मानला जातो. समाजातील सर्व घटक जागे होत आहेत. जात, धर्म, भाषा, ह्या अस्मिता जाग्या होत आहेत. उपेक्षित राहिलेले लोकही सत्तेत वाटा मागत आहेत. अनेकजण आपले उपद्रव-मूल्य वसूल करत आहेत. पूर्वी ठराविक वर्गालाच भ्रष्टाचाराची संधी मिळत होती. आता ती संधी अनेकांना मिळू लागली आहे. एकंदर समाजच ढवळून निघत आहे.”

“पण त्यानंतरची परिस्थिती बरी असेल. भल्या भल्यांचे मुखवटे गळून पडतील. अस्सल असतील ते टिकतील. नक्कल करणारे बाजूला फेकले जातील. राजकीय पक्षांचे विभाजनही सरळ तीन गटात होईल- डावे, उजवे आणि मध्यमवर्गीय. प्रादेशिक पक्षांचा प्रभाव कमी होईल.”

“आजचा तुझा सूर नेहमीपेक्षा वेगळा वाटतोय. ‘How to think Positive’ वाचलंस, की भारावून टाकणारं एखादं भाषण ऐकलंस?”

“अधून-मधून समजूतदारपणाच्या गप्पा मारायला बरं वाटतं.”

आकाश-सागर

“आकाश, ‘राजकारणात कोणीच कोणाचा कायमचा मित्र वा शत्रू नसतो’ हे म्हणणं आता शब्दशः खरं ठरतंय!”

“पण मला वाटतं, ह्या उक्तीमध्ये थोडा बदल करावा. यातला ‘कायमचा’ शब्द ड्रॉप करावा. मग हे वाक्य असं होईल... ‘राजकारणात कोणीच कोणाचा ‘मित्र’ वा ‘शत्रू’ नसतो!”

“वा! फारच छान निरीक्षण आहे तुझं! खरंच आजच्या भारतीय राजकारणात कोणीच कोणाचे मित्र नाहीत आणि शत्रूही नाहीत. सगळेच मतलबी आणि संधीसाधू!”

“भूतकाळ पटकन् विसरणारे आणि भविष्यकाळाचा विचार न करणारे, असं वर्णन आजच्या आपल्या पुढाऱ्यांचे करता येईल. ‘तत्त्वनिष्ठा’ तर सोडा, पण ‘पक्षनिष्ठा’सुद्धा राहिली नाही!”

“गांधीजींनी जीवनातील ‘सात पापकर्म’ सांगितली होती; त्यातलं पहिलं आहे, ‘पॉलिटिक्स विदाऊट प्रिन्सिपल्स’. त्या अर्थाने विचार केला तर सर्वाधिक पापी लोक आजच्या राजकारणात आहेत.” 

“आणि ह्या लोकांना फार जवळून पाहिल्यामुळेच कदाचित लिंगडोह यांना ‘कॅन्सर’ची उपमा सुचली असावी.” 

“नाही, ‘कॅन्सर’ वगैरे म्हणणं जरा अतीच होतंय. पण जे चाललंय ते पाहून सामान्य लोकांचा पुढाऱ्यांवर विश्वास राहिलेला नाही हे खरं.”

“आता बघ ना, राजीवजींच्या मारेकऱ्यांना साथ देणारा पक्ष द्रमुक असं काँग्रेसवाले म्हणत होते. त्यांच्या दोन मंत्र्यांना वगळण्याची मागणी मान्य केली नाही, म्हणून सोनियांच्या पक्षाचे त्या वेळचे अध्यक्ष केसरी यांनी गुजराल यांचं सरकार पाडलं होतं. आता सोनियांनी त्याच ‘द्रमुक’शी युती केलीय... जयललितांनी भाजपाच्या नेत्यांना अक्षरशः नाचवलं, एकदा सरकारही पाडलं पण आज पुन्हा जयललितांशी युती करायला भाजप तयार... सहा वर्षांपूर्वी कम्युनिस्टांशी असलेली युती तोडून थेट दुसऱ्या टोकाच्या भाजपाला सामील होताना चंद्राबाबूंना काहीच अडचण आली नाही...”

“ ‘विदेशी’च्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना शरद पवारांनी केली, पण पक्षाच्या घटनेत विदेशीचा मुद्दाच नाही. जातीयवादी शक्तींच्या विरोधात लढण्याची भाषा बोलणारे पवार ‘कुठलाच राजकीय पक्ष अस्पृश्य नाही, सर्व पर्याय खुले आहेत’ असे म्हणाले. याचा अर्थ काय होतो? ‘पॉलिटिक्स विदाऊट प्रिन्सिपल...’ असाच ना?”

“सागर, एक गंमतीदार निरीक्षण सांगतो. बारा वर्षांपूर्वीची गोष्ट... तेव्हा मी नुकताच ‘वृत्तपत्रं’ वाचायला लागलो होतो. त्यावेळी ‘लोकसत्ता’च्या पहिल्या पानावर एक ‘चौकट’ प्रसिद्ध व्हायची.... ‘हे वृत्तपत्र सर्व विचारधारांना खुलं राहील. संपादकीय धोरण ‘निःपक्ष व उदारमतवादाचा पुरस्कार करणारे असेल’.”

“निःपक्ष... उदारमतवाद...”

“हो! पुढे तर ऐक!... आणि मी वृत्तपत्रातून थोडं-फार लिहायला लागलो तेव्हा, म्हणजे गेल्या वर्षी... ‘लोकमत’च्या संपादकीय पानावर एक ‘चौकट’ येत होती... ‘हे वृत्तपत्र समाजात ‘सहिष्णुता व उदारमतवाद’ रुजविण्यास प्रयत्नशील राहील.”

“सहिष्णुता... आणि उदारमतवाद?” 

“खरी गंमत तर पुढे आहे... बारा वर्षांपूर्वीचे ‘लोकसत्ता’चे संपादक आणि गेल्या वर्षीचे ‘लोकमत’चे संपादक एकच होते.”

“डॉ. अरुण टिकेकर ना?” 

“होय! दोन्ही वेळा ते नव्यानेच संपादक झाले होते.” 

“बरं... मग?”

“तर मी विचारात पडलो... शब्दांचा काटेकोर वापर करणाऱ्या टिकेकरांनी ‘उदारमतवाद’ कायम ठेवला, पण ‘निःपक्ष’ शब्द का काढला आणि ‘सहिष्णुता’ शब्द का आणला?”

“आता निःपक्ष राहता येणं शक्य नसेल किंवा सहिष्णुतेची गरज जास्त वाटली असेल.”

“तुझं अर्धं उत्तर बरोबर आहे... ‘सहिष्णुतेची गरज जास्त वाटली असेल.’ पण निःपक्ष शब्दाची गडबड वेगळीच आहे... गेल्या दहा-बारा वर्षात पक्षापक्षांतील वैचारिक भेद दाखविणाऱ्या रेषा अस्पष्ट झाल्या आहेत. कोणत्याही दोन पक्षांची युती किंवा आघाडी झाली तरी आता आश्चर्य वाटत नाही. तत्त्वनिष्ठ समजले जाणारे पुढारी अचानक पक्ष बदलून, नको त्या तडजोडी करताना पाहून धक्का बसत नाही. म्हणजे ‘निःपक्ष’ ह्या शब्दाला अर्थच राहिला नाही.”

“बरोबर आहे तुझं म्हणणं, पण काही अपवाद दाखवता येतील!”

“अर्थात! काही अपवाद आहेत आणि म्हणून आशेला वाव आहे!”

आकाश-प्रकाश

“आकाश, तुला एक प्रश्न विचारतोय! गोल-गोल बोलायचं नाही; उत्तर टाळायचं नाही. तर प्रश्न असा आहे. विद्यार्थ्यांनी राजकारणात पडावं की पडू नये?”

“It depends on...” 

“मला उत्तर हवंय... निःसंदिग्ध आणि स्पष्ट शब्दांत!”

“अरे, राजकारणात पडावं की पडू नये, हा काय प्रश्न झाला? मी म्हणतो ‘पडू’ नये, ‘उडी’ घ्यावी!”

“आकाशराव, कॉपी करू नका. पंच्याहत्तर वर्षांपूर्वी, श्रीधर महादेव जोशी नावाच्या तरुणाने जाहीर सभेत दिलेलं हे उत्तर आहे. मला तुमचं उत्तर हवंय!”

“अरे वा! तू पण बराच पुढे गेलास की!”

“आम्ही पण अधून-मधून पुस्तकं वाचत असतो. ‘राजकारणात राहूनही राजकारण न करणारा माणूस’ अशी एसेमची ओळख करून दिली जाते. जन्मशताब्दीच्या निमित्ताने त्यांची ‘आत्मकथा’ वाचतोय, म्हणून तुमची कॉपी पकडली. नाहीतर तुम्ही काय हाती लागता, आमच्या! असो. तर एसेमचं उत्तर, हेच तुझं उत्तर समजायचं का?”

“जरा विचार करावा लागेल. काळ फार बदललाय. आजच्या काळात एसेम जसेच्या तसे स्वीकारून चालणार नाहीत. त्यांना नवीन ‘फॉर्म’मध्ये आणावं लागेल.”

“पुन्हा एकदा कॉपी. ‘सत्याग्रही विचारधारा’च्या एसेम विशेषांकाचं प्रकाशन करताना भालचंद्र मुणगेकर असंच म्हणाले होते.”

“प्रकाशराव, कॉपी हा आपल्या जीवनाचा ‘स्थायीभाव’ झाला आहे.. निवांत विचार करायला आता कोणाकडे वेळ आहे? आपली पिढी तर रेडिमेड कपडे, रेडिमेड उत्तरं (गाईड) आणि रेडिमेड विचारावरच पोसली आहे!”

“हरकत नाही! मुळात अस्सल असं असतं तरी काय? सर्वजण कॉपी करत असतात. चांगली कॉपी करता येणं, यालाच कौशल्य मानलं जातं. पण ते असू दे, आपला मूळ प्रश्न...”

“विद्यार्थ्यांनी राजकारणात पडायलाच पाहिजे, किंबहुना त्यासाठी ‘नेतृत्वाचं प्रशिक्षण देणाऱ्या संस्था’ स्थापन केल्या पाहिजेत!”

“नेतृत्वाचं प्रशिक्षण... आय थिंक... टिकेकरांच्या ‘सारांश’ पुस्तकातील पहिलं प्रकरण... करेक्ट?”

“प्रकाश आज आमचे फासे उलटे पडताहेत!”

“नाही! आज आमचे फासे सुलटे पडताहेत, म्हणून तुम्हांला तसं वाटतंय!” 

“हे बघ, पांढरं निशाण. आता तू बोल, मी ऐकतो.”

“ऐक तर... विद्यार्थ्यांनी राजकारणात पडण्याची अजिबात आवश्यकता नाही! पण राजकारणाबाबत तुच्छता किंवा उदासीनता असू नये. सभोवताली घडणाऱ्या घटनांकडे डोळसपणाने पहावं. राजकारणातील वेगवेगळे प्रवाह समजून घ्यावेत. चळवळी-आंदोलनं यात शक्य तेवढा सहभाग घ्यावा. निवडणुकीच्या प्रचारसभांतील भाषणं ऐकावीत... आणि भविष्यकाळात गरज पडली तर राजकारणात उडी घेण्याची तयारी ठेवावी. उडी घेताना पडण्याची शक्यता गृहीत धरावी.... येणारा काळ कठीण आहे. कदाचित तिसरं स्वातंत्र्ययुद्ध लढावं लागेल, कदाचित क्रांतियुद्धाचा भडका उडेल.” 

“प्रकाश, तू भीती दाखवतोयस, चित्रं अवास्तव रंगवतोस!”

“नाही! स्वतःला ह्या देशाचे जबाबदार नागरिक म्हणवून घेणाऱ्यांना हा सावधगिरीचा इशारा आहे.”

Tags:   प्रमोद महाजन फील गुड लोकशाही राजकारण   अरुण टिकेकर नाना पाटेकर weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

विनोद शिरसाठ,  पुणे
vinod.shirsath@gmail.com

मागील दीड दशकापासून साधना साप्ताहिकात कार्यरत असलेले विनोद शिरसाठ हे साधना साप्ताहिक, साधना प्रकाशन व कर्तव्य साधना (डिजिटल पोर्टल) यांचे संपादक आहेत.


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके