डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

र.धों.कर्वे यांच्यावर लिहिलेल्या पुस्तकात म्हटलंय, “कितीही मोठा माणूस असला, तरी तो काळाचा कैदी असतो. गजाआडून तो किती दूरवर न्याहाळतो हे महत्त्वाचे.”या अर्थाने य.दि.फडकेही काळाचे कैदी होते, पण गजाआडून त्यांनी विसाव्या शतकातील महाराष्ट्र जितका न्याहाळला, तितका न्याहाळणारा दुसरा विद्यमान माणूस महाराष्ट्रात तरी दिसत नाही. हा काळाचा कैदी आता कालवश झाला आहे... ते ‘साधना’चे नियमित वर्गणीदार होते. फडक्यांनी ‘साधना’त लेखनही केले होते आणि ‘साधना समकालीन : 2007’मध्ये ध्येयवादी पत्रकारिता ज्योतीचे प्रज्वलन विंदा करंदीकरांनी केले, तेव्हा ते प्रमुख साक्षीदार होते. त्यांना विनम्र अभिवादन.

“ठिकठिकाणी भ्रमंती करून अस्सल व अप्रकाशित कागदपत्रं जमविणे आणि राजकीय व सामाजिक चळवळीत सहभागी झालेल्या व्यक्तींच्या मुलाखती घेऊन मिळालेली माहिती पारखून घेणे, हे संशोधनाचे ‘तंत्र’मी 1966 पासून जवळजवळ 30 वर्षे वापरले आहे.”

“माझी बरीच पुस्तके समकालीन इतिहासाच्या संशोधनावर आधारलेली असल्यामुळे आणि प्रमाणे व पुरावे सादर केल्याशिवाय निष्कर्ष काढावयाचे नाहीत, ही ‘शिस्त’मी पाळत असल्यामुळे माझ्या बहुतेक पुस्तकांत अवतरणचिन्हांकित किंवा अन्य पुस्तकांतून उद्धृत केलेल्या मजकुराची रेलचेल असते.”

“कोणाचेही समर्थन वा निषेध करण्यापूर्वी त्या प्रश्नाची ‘गुंतागुंत’शांतपणे समजावून घेणे आवश्यक असते. हे लक्षात ठेवूनच माझ्या देशबांधवांनी ही पुस्तके वाचावीत, अशी माझी त्यांना नम्र विनंती आहे.”

य.दि.फडके यांच्या वरील तीन विधानांतून आणि त्यातल्याही ‘तंत्र’, ‘शिस्त’व ‘गुंतागुंत’या तीन शब्दांतून त्यांच्या संशोधनकार्याचे मर्म हाती लागते. म्हणजे तंत्रशुद्ध व शिस्तबद्ध पद्धतीने काम करून वेगवेगळ्या प्रश्नांतील गुंतागुंत उलगडून दाखवायची, हे त्यांच्या संशोधनाचे व्यवच्छेदक लक्षण होते. य.दि.फडके यांचे हे व्यवच्छेदक लक्षण जवळपास 50 वर्षे टिकून राहिले कसे आणि ते निर्माण झाले तरी कसे, हाच मोठ्या संशोधनाचा विषय आहे. पण त्यांच्या आयुष्यातील व कार्यातील काही तपशील नीट न्याहाळले, तर अस्पष्टसे का होईना, पण एक सूचक चित्र दिसू शकेल...

3 जानेवारी 1931 रोजी सोलापुरात जन्मलेल्या य.दि.फडके यांचे महाविद्यालयीन शिक्षण सुरू झाले, तेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळालेले होते. त्यांनी पुणे विद्यापीठातून राज्यशास्त्र विषयातील पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले, तेव्हा म्हणजे 1954च्या आसपास संयुक्त महाराष्ट्र चळवळ जेव्हा सुरू झाली होती. ही चळवळ महाराष्ट्राला उभे आडवे ढवळून काढत होती, तेव्हा य.दि.फडके हे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना राज्यशास्त्र व लोकप्रशासन या विषयांचे धडे देत होते. 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले, पण बेळगाव व निपाणी यांचासमावेश त्यात झाला नाही. सोलापुरात जन्मलेल्या व त्यामुळे बेळगाव-निपाणी परिसराशी ऋणानुबंध असलेल्या तसेच संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे एकूणच उद्दिष्ट न विसरणाऱ्या फडके यांना त्याचे शल्य बोचत असणार. म्हणजे एका बाजूला भावनिक गुंतवणूक व दुसऱ्या बाजूला वैचारिक गुंतवणूक अशी स्थिती प्रा.फडके यांची झाली. त्यातूनच त्यांनी पीएच्.डी.साठी “संयुक्त महाराष्ट्र चळवळ व काँग्रेस पक्ष”हा विषय निवडला.

भारताच्या प्रदीर्घ स्वातंत्र्यलढ्याचा जवळपास 60-70 वर्षांचा वारसा असणारा काँग्रेस पक्ष आणि अवघ्या 7-8 वर्षांत महाराष्ट्रभर पसरलेली संयुक्त महाराष्ट्र चळवळ यांचा तुलनात्मक अभ्यास करीत असतानाच फडके यांच्या भावी संशोधनाची बीजे त्यात रुजली गेली. एका बाजूला समकालीन प्रश्न आणि दुसऱ्या बाजूला त्या प्रश्नांतून गर्भित असलेला इतिहास असे दुहेरी संशोधन एकाच वेळी चालू ठेवण्याची सवयही त्यांना याच काळात लागली असावी. व्यापक अर्थाने बोलायचे, तर य.दि.फडके यांनी नंतरच्या काळात केलेले सर्व संशोधनपर ग्रंथ हे त्या प्रबंधाच्या ‘तळटीपा’आहेत. म्हणजे विद्यापीठाने प्रा.फडके यांचा ‘संयुक्त महाराष्ट्र चळवळ व काँग्रेस पक्ष’हा प्रबंध स्वीकृत करून त्यांना ‘डॉक्टरेट’बहाल केली, पण तेवढ्याने डॉ.फडके यांचे समाधान झाले नाही; त्या प्रबंधाच्या तळटीपा आणि त्यांच्याही तळटीपा असा शोध त्यांचा चालूच राहिला आणि त्यामुळेच महाराष्ट्राला राजवाडे, शेजवलकर, सरदेसाई, खरे, फाटक अशांच्या पंगतीत बसू शकणारा एक इतिहाससंशोधक लाभला.

इतिहासाचार्य वि.का.राजवाडे यांनी महाराष्ट्राच्या इतिहासलेखनाची चौफेर पायाभरणी केली, तितके मूलभूत काम य.दि.फडके यांच्याकडून झाले नसेल; पण महाराष्ट्राच्या व त्या अनुषंगाने भारताच्या आधुनिक राजकीय इतिहासातील अनेक गुंते त्यांनी उलगडून दाखवले. जवळपास 60 पुस्तके व कित्येक प्रकाशित लेख यांद्वारे हे काम त्यांनी केले आणि ‘विसाव्या शतकातील महाराष्ट्र’हा आठ खंडांचा संच तर त्यांच्या चिकाटीचा व दीर्घोद्योगी प्रवृत्तीचा निदर्शक आहे. सुरुवातीला टिळक-आगरकर-वादासंबंधी असलेल्या अनेक अनुत्तरित प्रश्नांचा छडा लावण्यासाठी त्यांनी शोध बाळ-गोपाळांचा’लिहिले ब्राह्मण व ब्राह्मणेतर चळवळीच्या संदर्भात म फुले, शाहू महाराज, जेधे, जवळकर यांचे कार्य पुढे आणले; सावरकरांची त्रिखंडात गाजलेली उडी आणि त्यांची मुक्तता सशर्त की बिनशर्त, असा वाद उभा राहिला; तेव्हा ‘शोध सावरकरांचा’लिहिले.लो.टिळक व सुभाषबाबू यांच्याबाबतच्या आख्यायिका उलगडून दाखविण्यासाठी त्यांनी लेखन केले. तसेच अरुण शौरींनी ‘वर्शिपिंग फॉल्स गॉड’लिहून इतिहासाचा विपर्यास करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा ‘आंबेडकरांचे मारेकरी’लिहिले. नथुराम गोडसे यांचे उदात्तीकरण करू पाहणारे नाटक आले, तेव्हा ‘नथुरामायण’लिहिले. हे सर्व करताना ‘अस्सल कागदपत्रे व ठोस पुरावे’हे तंत्र त्यांनी सोडले नाही. एकदम नवा विषय, नवा वाद उफाळून आला, सार्वत्रिक चर्चेला ऊत आला, तर डॉ.फडके नव्याने अभ्यास करून त्या विषयाची उकल करून दाखवत; मग तो समान नागरी कायद्याचा प्रश्न असो, सोनिया गांधींच्या परदेशी नागरिकत्वाचा मुद्दा असो किंवा राज्यघटनेतील दुरुस्ती-विधेयके असोत. ‘न्यायालयात मधु लिमये’या शीर्षकाचेही एक पुस्तक ते लिहू शकले. अशा या संशोधकाला खोडून काढणे सोपे नव्हते.

अर्थात, य.दि.फडके पुरावे व दस्तऐवज यांचे नको तितके स्तोम माजवतात, त्यांच्या मांडणीला शैली नाही, त्यांच्या लेखनात घटना वा व्यक्तीबद्दल जिव्हाळा नसतो, ते हातचे राखून विश्लेषण करतात, अनेक वेळा ते निष्कर्षाप्रत येत नाहीत, प्रस्थापित विचाराला मूलभूत कलाटणी दिली, असे त्यांच्या लेखनात फारसे आढळत नाही यांसारखे आक्षेप त्यांचे चाहतेही घेत राहिले. यातले बहुतांश आक्षेप त्यांना कमी-अधिक प्रमाणात मान्यही होते. पण या आपल्या मर्यादा आहेत, तसेच हीच आपली सामर्थ्येही आहेत, याची त्यांना जाणीव होती. ‘घटना बोलतात, मतप्रदर्शनाची फारशी गरज नाही,’या त्यांच्या सूत्राचा काही संशोधकांनी उपहास केला; पण केवळ वस्तुस्थिती पुराव्यानिशी पुढे आणून आणि कल्पना व वास्तव वेगळे करून त्यांनी महाराष्ट्राच्या आधुनिक इतिहासातील अनेक आख्यायिका उद्ध्वस्त केल्या, हेही अनेक संशोधक मान्य करतात.

संशोधन ही एक न संपणारी प्रक्रिया आहे, तिला तंत्र व शिस्तीची जोड हवी, सतत नवनवीन दस्तऐवज अथवा पुरावे पुढे येत असतात, त्यामुळे निष्कर्ष काढण्याची घाई नसावी, यावर त्यांचा ठाम विश्वास होता. त्यामुळेच त्यांच्या लेखनात मोठमोठी विशेषणे किंवा भारावलेपण यांचा अभाव असतो.त्यांच्या व्यक्तिमत्त्वातही तर्ककठोरपणा यातूनच आला असावा.आचार्य अत्रे जन्मशताब्दीच्या काळात एका कार्यक्रमात य.दि.फडक्यांच्या पुस्तकातील एका विधानाच्या आधारे एक वक्ते म्हणाले, ‘संयुक्त महाराष्ट्र मिळाला, त्यांचा सर्वांत मोठा वाटा अत्रे यांच्याकडे जातो. त्यावेळी व्यासपीठावरच असलेले य.दि.फडके ताबडतोब म्हणाले, ‘सर्वांत’हा शब्द मी वापरलेला नाही. ‘त्यांच्याच एका सत्कारसोहळ्यात ‘संशोधनाची शिस्त असलेले य.दि.’असा उल्लेख करणाऱ्या वक्त्याला मध्येच थांबवून ते म्हणाले, “संशोधनात ‘शिस्त’हा शब्द येऊन जातो, त्यामुळे ‘संशोधनाची वृत्ती असलेले य.दि.’असे म्हणा.”‘असा हा महाराष्ट्र’या पुस्तकाच्या प्रकाशनसमारंभात ‘के.सागर’चे संचालक म्हणाले, “प्रशासनात अधिकारी होणारे विद्यार्थी जेव्हा वेगवेगळ्या संदर्भग्रंथामुळे गोंधळून जातात, तेव्हा ते के.सागरला प्रमाण मानतात आणि के.सागर गोंधळून जातात, तेव्हा ते य.दि.फडक्यांना प्रमाण मानतात. पण य.दि. कोणाला प्रमाण मानतात, ते आम्हाला माहीत नाही.’आपल्या भाषणात य. दि. इतकेच म्हणाले, की ‘प्रमाण मानले जाते, त्यावर पुनर्विचार सुरू होतो, तेव्हा तो संशोधनाचा प्रारंभ असतो.’

य.दि.फडके यांच्याकडे हा वस्तुनिष्ठपणा, निःस्पृहपणा आणि ताठ बाणा त्यांचे दोन गुरू द.रा.बेंद्रे आणि न.र.फाटक यांच्याकडून आला. न.र.फाटक यांनी तर ‘रानडे, टिळक, गोखले, आगरकर’या चौकडीतील आगरकर यांचे पुस्तक आपल्या हातून पूर्ण होत नाही असे लक्षात आले, तेव्हा ते पुस्तक य.दि.फडक्यांनीच लिहावे, अशी इच्छा व्यक्त केली.आजही आगरकरांची, आळतेकर व य.दि.फडके यांनी लिहिलेली दोन पुस्तकेच ‘प्रमाण’मानली जातात. 1995 साली सेना-भाजप युतीचे सरकार स्थापन झाल्यावर पहिल्याच दिवशी य.दि.फडके यांनी साहित्य संस्कृती मंडळाच्या आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा पाठवला. कशासाठी? तर नवीन सरकारला आपल्या पसंतीची माणसं भरता यावीत म्हणून!

इ.स.2000 साली बेळगावला झालेल्या साहित्य संमेलनात सीमा प्रश्नावर लढण्यासाठी प्रयत्न करणार असे य.दि.फडके यांनी जाहीरपणे सांगितले, पण वर्षभरानंतरही काहीच घडले नाही म्हणून ‘दै. सकाळ’मध्ये लेख लिहून त्यांनी माफीही मागितली. एका बाजूला संशोधनातून येणारी तर्ककठोरता, तर दुसऱ्या बाजूला लोकशाही मूल्यांतून येणारी नम्रता यांतून यशवंत दिनकर फडके यांचे व्यक्तिमत्त्व घडलेले होते. त्यांनीच र.धों.कर्वे यांच्यावर लिहिलेल्या पुस्तकात म्हटलंय, “कितीही मोठा माणूस असला, तरीतो काळाचा कैदी असतो.गजाआडून तो किती दूरवर न्याहाळतो हे महत्त्वाचे.”या अर्थाने य.दि.फडके हे काळाचे कैदी होते, पण गजाआडून त्यांनी विसाव्या शतकातील महाराष्ट्र जितका न्याहाळला, तितका न्याहाळणारा दुसरा विद्यमान माणूस महाराष्ट्रात तरी दिसत नाही.हा काळाचा कैदी आता कालवश झाला आहे... ते ‘साधना’चे नियमित वर्गणीदार होते. फडक्यांनी ‘साधना’त लेखनही केले होते आणि साधना समकालीन : 2007’ मध्ये ध्येयवादी पत्रकारिता ज्योतीचे प्रज्वलन विंदा करंदीकरांनी केले, तेव्हा ते प्रमुख साक्षीदार होते. त्यांना विनम्र अभिवादन.

Tags: विंदा करंदीकर विनोद शिरसाठ य दि फडके स्मृतीलेख weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

विनोद शिरसाठ,  पुणे
vinod.shirsath@gmail.com

मागील दीड दशकापासून साधना साप्ताहिकात कार्यरत असलेले विनोद शिरसाठ हे साधना साप्ताहिक, साधना प्रकाशन व कर्तव्य साधना (डिजिटल पोर्टल) यांचे संपादक आहेत.


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके