डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

धर्मांतरातील अमानुषता दाखवायची होती...

विशेष ग्रंथ पुरस्कार : तांडव (कादंबरी)

माणसं आपला पूर्वीचा धर्म का बदलतात? ते नवा धर्म का स्वीकारतात? याची खूप कारणं आहेत. त्यापैकी आमिश आणि दडपशाही या दोन गोष्टींचा वापर करून गोव्याच्या हिंदू समाजाला ख्रिश्चन राज्यसत्तेने कसं बाटवलं याचा प्रत्ययकारी वृतांत ‘तांडव’मध्ये येतो. तो सांगताना श्री.महाबळेश्वर सैल यांनी इतिहास आणि धर्मशास्त्राचा अभ्यास करून पोर्तुगीज सत्ताधाऱ्यांचा उन्माद, धार्मिक कट्टरपणा आणि परंपराशरण हिंदू मानसिकतेवर नेमकं बोट ठेवलं आहे. धर्मांतरित समाजाचा बुळेपणा, लादलेल्या धर्मांतरणामुळे होणारी  व्यक्तींची आणि कुटुंबांची कुतरओढ, त्यांची आपसातली ताटातूट, गृहकलह आणि विरह या प्रखर भावनांचं मन विषण्ण करणारं दर्शन ‘तांडव’मध्ये घडतं. ते वाचताना मती गुंग होते आणि घशात हुंदका येतो.

बळजबरीच्या धर्मांतरणाने मानवी अस्तित्व कसं विदीर्ण होतं हे ‘तांडव’चं प्रमुख विधान आहे. या अर्थाने श्री.महाबळेश्वर सैल यांनी एक अस्सल अस्तित्त्ववादी कादंबरी लिहिली आहे असं म्हणता येतं. भारतीय सेनेत सैनिक म्हणून शूर कामगिरी करणाऱ्या सैल यांनी 1965 च्या भारत-पाक युद्धात भाग घेतला होता. खऱ्या अर्थाने सैल भारतमातेचे पुत्र आहेत. त्यांनी आधी युद्धभूमीवर पराक्रम केला, नंतर तीसेक वर्षे कोकणी साहित्याच्या भूमीवर लेखणीचा पराक्रम गाजवला. आता मराठी साहित्यात अविस्मरणीय ठरेल अशी ‘तांडव’ लिहून त्यांनी तिसऱ्या पराक्रमाची मुहूर्तवेढ रोवली आहे.

प्रश्न : गेल्या 40 वर्षांपासून तुम्ही मराठी आणि कोकणी अशा दोन्ही भाषांमधून सातत्याने ललितलेखन करीत आहात. तुमचा लेखन प्रवास सुरू होण्यापूर्वीची पार्श्वभूमी काय होती?

 -आमच्याकडे वडिलोपार्जित शेती होती. शेती हाच आमचा (माझा) सुरुवातीचा व्यवसाय होता. मी आठवीमध्ये शिकत असताना माझे वडील गेले. त्यामुळे मला शालेय शिक्षणाऐवजी शेतीतच मन वळवावं लागलं. मात्र, शेती करण्यात मी पूर्णत: रमलो नाही आणि मग अगदी दोन वर्षांत शेतीशिवाय आणखी काही तरी करण्याच्या इराद्याने माझा शोध सुरू झाला. माझ्या आयुष्यातील वय वर्षे 15 ते 30 या कालावधीत माझा प्रचंड प्रवास झाला. गाव-खेडी-शहर असा मी बराच फिरलो. असंख्य गोष्टी त्या काळात केल्या. वयाच्या 17 व्या वर्षी घरून पळून जाऊन सैन्यात भरती झालो.

सैन्यात नोकरी केली. मात्र, ती देखील मी पूर्ण केली नाही. अर्ध्यावर ती सोडल्यावर पुन्हा शोध सुरू झाला. मग मला पोस्टमास्तरची नोकरी मिळाली. या नोकरी आणि व्यवसायाच्या प्रवासात मी फार मोठ्या प्रमाणात भटकंती केली. या भटकंतीच्या मागे नियतीचा हात आहे, असंच मला वाटतं. कारण ललितलेखनाचा गाभा लेखकाच्या अनुभवावर उभा असतो आणि तोच मला नियतीनं भटकंतीच्या माध्यमातून दिला आहे. शेती, सैन्यातील नोकरी, पोस्टमास्तरची नोकरी अशा वेगवेगळ्या कारणांसाठी माझी जी भटकंती झाली, त्यामुळेच माझं मन अधिक समृद्ध होत गेलं. माझ्या लेखनातील वैविध्यामध्ये माझ्या भटकंतीचा मोठा वाटा आहे.

प्रश्न : आपल्या आयुष्याचा पहिला टप्पा ‘जय जवान जय किसान’ असा झालेला दिसतो. तुमच्या साहित्यकृतीवर सैनिकी क्षेत्रातील अनुभवाची छाप कशी आकार घेत गेली?

-मी आजवर जे लिहिलं, ते माझ्या अनुभवांशी निगडित आहे. केवळ कल्पकतेनं लिहिणं मला आवडत नाही आणि केवळ वास्तव सांगण्याच्या पद्धतीचं- देखील मी लिहीत नाही. माझी प्रतिभा, माझं निरीक्षण, माझी संवेदना माझ्या साहित्यकृतीवर प्रभाव टाकतेच आणि ते कुठल्याही चांगल्या ललितलेखनाचं वैशिष्ट्यच आहे, असं मला वाटतं. माझ्या अनुभवावर आधारित, परंतु अगदी जे आतून वाटतं, तेच मी लिहीत जातो. माझा स्वभाव सांगण्यापेक्षा लिहिण्यावर भर देणारा आहे.

तसेच सैनिकी क्षेत्रातील अनुभवाच्या बाबतीत त्या क्षेत्रातील अनुभवाचा प्रभाव माझ्या साहित्यावर आहे. माझ्या कथा-कादंबऱ्यांच्या पात्रांतून आणि परिसराच्या काही वर्णनांमध्ये तो आलेला आहे.

प्रश्न : तुमच्या कथालेखनाची नेमकी काय वैशिष्ट्ये आहेत? आणि एकूण कथालेखनप्रवास कसा झाला?

-माझे एकूण पाच कथासंग्रह प्रकाशित झालेले आहेत : ‘पलतडचे तारू’, ‘तरंगा’, ‘बायोनेट फाइटिंग’, ‘निमाणूं अश्वत्थामा’ इ. माझ्या कथालेखनाचा प्रवास बराच व्यामिश्र आणि थोडक्यात सांगणं अवघड आहे. त्यातच मी अगोदर म्हटल्याप्रमाणे त्यामध्ये एकच अशी वाट नाही. अतिशय आडवळणांनी झालेला हा प्रवास आहे. त्याची वैशिष्ट्ये मात्र निश्चितच सांगितली पाहिजेत.

मी सर्वसामान्यपणे वावरताना साधा माणूस असतो. माझ्या कुठल्याच वागण्यात लेखक नसतो. मात्र, मी लिहायला बसतो, तेव्हा पूर्णपणे तंद्रीत असतो. एका बैठकीत माझी कुठलीच गोष्ट लिहून होत नाही. पुष्कळवेळा एका गोष्टीत भर टाकत राहतो. लिहिताना ज्या तंद्रीत मी असेन त्याचा मनावर कधी कधी ताण येतो. तो ताण इतका भयानक असतो की, मी त्याने थकून जातो. विशेषत: मानवी जीवनसंघर्षाच्या गोष्टींचा फारच ताण लिहिताना जाणवतो.

मला मुळात गरिबीची एक प्रकारची चीड आहे. गरिबीच्या कारणामुळे संवेदना सहन कराव्या लागणाऱ्या माणसाची मला जास्त कणव आहे. माझ्या लेखनात मी नसतो; परंतु दारिद्र्याचं वास्तव मांडताना मला माझी संवेदना त्यात आणावीच लागते. लोक असं मानतात की, लेखकाने अलिप्त राहून लिहिलं पाहिजे. मला असं वाटतं की, तटस्थ राहणं वेगळं आणि अलिप्त राहणं वेगळं. लेखकाचा स्वभाव बाजूलाच राहिला पाहिजे; परंतु सामान्यपणे जे आतून वाटतं, ते संवेदना बाजूला ठेवून लिहिण्याला फारसा अर्थ आहे, असं मला वाटत नाही.

माझ्या आजवर जवळपास 160 कथा वेगवेगळ्या माध्यमांतून प्रकाशित झाल्या आहेत. त्या सर्वच कथांची वैशिष्ट्ये आणि आशय थोडक्यात सांगणं अवघड आहे. मात्र, माझ्या ‘अदृष्ट’ आणि ‘अरण्यकांड’ या दोन कथांविषयी सांगतो.

‘अदृष्ट’ ही साधारण 70 पानांची कथा आहे. या कथेवर आधारीत एक चित्रपटदेखील प्रदर्शित झालेला आहे. त्याचप्रमाणे ‘अरण्यकांड’ ही कथा तर ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसकडून इंग्रजी अनुवाद करून छापण्यात आलेली आहे. ‘अदृष्ट’ या कथेतून मी स्त्रीच्या शरीरमनाचा ठाव घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. (स्त्री-पुरुष यांच्यातील मनोवस्थेचे पैलू सांगण्याचा प्रयत्न मी वेगवेगळ्या ललित साहित्यातून करत आलो आहे.) मी ज्या वाड्यात लहानपणी वाढलो, तिथे जे मी स्त्रियांचं जीवन पाहिलं-अनुभवलं; त्यातून ज्या गोष्टी मला दिसल्या, त्याच ‘अदृष्ट’ या कथेतून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. विशेषत: स्त्रीची वेदना सांगताना तिची कष्ट उपसण्याची क्षमता सांगण्याचा प्रयत्न केला आहे. स्त्रीच्या मानसिक जीवनाचा तात्त्विक संदर्भ तिच्या जिद्दीच्या आणि संघर्षाच्या मुळात असतो, हे त्यातून मला सांगायचं होतं. त्या कथेतील पात्रं नेमकी कशी आकार घेत गेली, हे आता मला सांगता येणार नाही; परंतु त्या-त्या वेळी जवळून पाहिलेल्या-अनुभवलेल्या गोष्टी कलात्मकतेची भर टाकून उभ्या केलेल्या आहेत.

‘अदृष्ट’प्रमाणेच ‘अरण्यकांड’ हीदेखील अशीच संघर्ष करणाऱ्यांची कथा आहे. रानात वाट हरवलेल्या   मजुरांच्या व्याकूळ जीवनाची कथा आहे. दुष्काळासारख्या कारणांमुळे अपरिचित ठिकाणी जाऊन जीवन जगणाऱ्यांची ती कथा आहे. माझ्या भोवताली त्या वेळी अशी माणसं होती, ज्यांनी अतिशय अन्याय सहन करत-करत आपलं नवं आयुष्य उभं केलं होतं. अगदी लहानपणापासून अन्याय सहन करणाऱ्यांचा संघर्ष मी पाहिला, तो त्यात आलेला आहे. मी जवळून ज्यांचं दु:ख पाहिलं, त्यात माझी संवेदना कलात्मक पद्धतीने वापरून ‘अरण्यकांड’ लिहिली आहे.

‘अरण्यकांड’ ही कथा फार लोकांच्या मनाला भावलेली आहे. त्या कथेवर आलेल्या प्रतिक्रिया अतिशय भावनिक स्वरूपाच्या आहेत. त्यातच ती इंग्रजीत अनुवादित झाल्याने तिला व्यापक स्तरावरचा वाचक भेटला आहे. माझ्या लेखनात अनुभवाच्या वैविध्यांबरोबर विषयांचंदेखील वैविध्य राहिलेलं आहे, असं अनेक मान्यवरांनी नोंदवलेलं आहे.

या वैविध्याचा भाग म्हणून पाहायचं झालं, तर माझ्या ‘तरंगा’ या कथासंग्रहातील ‘तरंगा’ या कथेचं उदाहरण पाहता येईल. ‘तरंगा’ या कथेत गोवा आणि कारवार या दोन प्रांतांच्या सामाजिक-सांस्कृतिक वारश्याची समांतर रेषा मला दाखवून द्यायची होती. कारण हे दोन्ही प्रांत राजकीय कारणांमुळे वेगळे झालेले आहेत. मात्र, या दोन्ही प्रांतांचं ऐतिहासिक नातं आहे. दोन्ही भागांच्या परंपरा सारख्याच आहेत. कुठे तरी राजकीय कारणांमुळे सांस्कृतिक ऐक्य दुभंगलं जातं, हेच मला त्यातून सांगायचं होतं.

संस्कृतीच्या ऐक्याचा वारसा पुढे घेऊन जाताना साहित्यिकाने पालखीचं काम करायचं असतं. कुठल्याही परंपरा- या खांद्यावरून त्या खांद्यावर देताना त्यांतल्या चांगल्या गोष्टी अधोरेखित होतील, अशा पद्धतीने सांगितल्या पाहिजेत. त्याच हेतूनं ‘तरंगा’ कथा लिहिली गेली. अर्थात, लेखकाच्या आणि साहित्यिकाच्या जबाबदारीचं काम मी ‘तरंगा’ या कथेच्या माध्यमातून केलेलं आहे, असं मला मनापासून वाटतं आणि एक़ूण कथांमधूनदेखील असेच प्रयत्न वेगवेगळ्या पद्धतीने केलेले आहेत.

प्रश्न : तुम्ही एकूण पाच कांदबऱ्या लिहिल्यात. अजूनही लिहीत आहात. तुमच्या सर्वच कादंबऱ्या अतिशय महत्त्वाच्या आणि तितक्याच दर्जेदार आहेत. त्यात कुठलीही एक कमी-जास्त श्रेष्ठ असं ठरवणं अवघड आहे. हे असं साहित्यिकांच्या बाबतीत फार क्वचित घडतं. काय वैशिष्ट्यं आहेत?

-माझ्या कादंबरीलेखनाची आणि कथालेखनाची तशी काही वेगवेगळी वैशिष्ट्ये नाहीत. मुळात हे दोन्ही साहित्यप्रकार वेगवेगळे असले, तरी त्यांचा गाभा मानवी जीवन हाच आहे; परंतु कादंबरीत लेखकाला माणसांसह निसर्गाची सविस्तर मांडणी करता येते. लेखकाने माणसं त्या-त्या परिसरासह पाहिलेली असतात. त्यामुळेच ‘काळी गंगा’ या कादंबरीत मी लहानपणापासून पाहिलेल्या नदीचं वर्णन आहे. त्या भोवतालच्या निसर्गाचं वर्णन आहे. ही कादंबरी वाचणाऱ्याला, त्या माणसांच्या परिसराचं दर्शन घडवण्याचा प्रयत्न मी केलेला आहे.

खरं तर काळी गंगाचा परिसर म्हणजे माझ्या अतिशय आवडत्या माणसांचा परिसर... माझे मामा, आई आणि पत्नीदेखील त्याच परिसरातील आहेत. त्यामुळे हा परिसर माझ्या जडण-घडणीतील सततच्या सहवासातला आहे. मी त्या नदीतून बोटीने अनेकदा प्रवास केलेला आहे. त्या परिसरातील बागा, शेतं मी जवळून न्याहाळलेली होती. त्यामुळे त्या परिसराचं वर्णन चपखलपणे करता आलं. तो परिसर माझ्या अतिशय आत्मीयतेचा असल्याने माझं मन त्याच्याशी जोडलेलं होतं. आणि म्हणून मी तो निवडला होता.

त्या कादंबरीतील पात्रं मी माझ्या कल्पकतेने उभी केलेली आहेत. त्या पात्रांचं जीवन भलेही तिथल्या वास्तविक माणसांपेक्षा वेगळं वाटत असेल. परंतु त्या पात्रांना त्या परिसरापासून दूर करता येणार नाही. एक प्रकारे परीसराशी आणि एकूण निसर्गाशी माणूस किती घट्ट जोडलेला असतो, हेच त्यातून दाखविण्याचा माझा प्रयत्न आहे. माझ्या कादंबरीलेखनात आणि एकूण साहित्यप्रकारांत गावभाग, पिळवणूक, गुलामगिरी, संघर्ष अशा गोष्टींना प्राधान्य आहे. त्याचबरोबर या सर्व गोष्टीत, माणसाचं माणसाशी असलेलं नातंदेखील मी उलगडण्याचा प्रयत्न केलेला आहे. अगदी माणूस आणि प्राणी यांच्यातलं नातंदेखील काही साहित्यकृतींतून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे.

इतिहासातील माणसांच्या संघर्षाच्या कथांनादेखील आखीव-रेखीवपणे पुढे आणण्याचा प्रयत्न करतो. मी तसा बाहेरून शांत वाटतो; परंतु लिहिताना माझी ऊर्मी अधिक आवेगात येते. लिहिताना माझ्या प्रवासातल्या गोष्टी मला आपोआप आठवतात आणि त्यात कलात्मकतादेखील तशीच घडत जाते. काही ठिकाणी भाषेच्या बाबतीतदेखील भोवतालचे प्रभाव पडतात. उदाहरण म्हणून सांगायचं तर मी फारसं शालेय शिक्षण घेतलेलं नसताना इंग्रजी प्रभावाची झलक येते; तो पोस्टातल्या माझ्या नोकरीचा आणि अनुभवाचा परिपाक आहे.

प्रश्न : ‘तांडव’ या कादंबरीनं तुम्हाला अधिक प्रकाशझोतात आणलं... तुमच्या या कादंबरी विषयी काय सांगाल?

 -‘तांडव’ ही माझी बहुचर्चित कादंबरी आहे. पोर्तुगीजांनी धर्मांतरासाठी जे काही केलं, त्याचा बराच अभ्यास ती कादंबरी लिहिण्यापूर्वी मी केला. धर्मांतर हा अतिशय नाजूक विषय असल्याने या विषयावर लिहावं की नाही, या संभ्रमावस्थेत मी होतो. मात्र याच विषयावर 15-20 वर्षांपूर्वी उदय भेंबरे यांनी लिहिलेला एक लेख वाचल्यापासून मला सतत वाटत होतं की, यावर आपण काही तरी केलं पाहिजे. धर्मांतराचा विषय अतिशय ऐतिहासिक असल्याने त्यावर ललित अंगाने लिहिण्यापूर्वी आपण अधिक अभ्यास केला पाहिजे, या हेतूने मी त्यावर अभ्यास केला. बराच अभ्यास झाल्यानंतर आपण लिहिलंच पाहिजे, असं ठरवून ‘तांडव’ कादंबरी लिहिली.

धर्मांतर हा या कादंबरीच्या गाभ्याचा विषय आहे. मात्र, इतिहासातील अतिशय महत्त्वाच्या विषयावर लिहिलेली ही कादंबरी आहे. या कादंबरीतून हाताळलेल्या विषयाचा संदर्भ वरवर माझा अनुभव आणि अभ्यासाच्या मर्यादेतील आहे; मात्र त्याच्या आशयाच्या संदर्भाने त्या विषयाने जगातील एकूण धर्मांतराशी नातं जोडलेलं आहे.

तांडव कादंबरी अतिशय तटस्थपणे लिहिता आली याचं कारण, माझा स्वत:चा असा कुठलाच धर्म नाही. कुठल्याही एका धर्माबद्दल माझं स्वत:चं सकारात्मक किंवा नकारात्मक मत नाही. धर्मांतर ह्या प्रक्रियेत माणसाचं काय झालं आणि ते घडवून आणताना झालेल्या पिळवणुकीच्या मागे काय हेतू होता, माणसांना त्यामुळे करावा लागलेला संघर्ष, त्यातून वाट्याला आलेली वेदना कोणत्या अन्‌ कोणाच्या हिताची फलनिष्पत्ती होती- हेच मला सांगायचे होते. माझा हेतू म्हणाल, तर एकच होता. तो असा... हे धर्मांतर माणसाला काय करायला भाग पाडतंय? आणि माणसं स्वेच्छेने धर्मांतर करतात हे खोटं आहे, हे वास्तवदेखील मला सांगायचं होतं. धर्माच्या प्रभावाखाली माणसांना नेण्यासाठी माणुसकी धर्माला एक प्रकारे काळिमा फासला जातोय हे मला सांगायचं होतं... मला स्वत:ला धर्मद्वेष किंवा विशिष्ट धर्मप्रेम नसल्याने कुठल्याही धर्मप्रेमीच्या रोषाला सामोरे जावे लागले नाही. विशेषत: ज्या ख्रिश्चन धर्मवाढीसाठी झालेल्या अमानुष गोष्टीविषयी मी लिहिलंय. त्या ख्रिश्चन धर्माच्या पुरस्कर्त्या अभ्यासकांनीदेखील माझ्या कादंबरीचं कौतुक करतांना हे सर्व खरंच आहे आणि जे झालं ते वाईटच होतं असं म्हटलेलं आहे.

तांडव कादंबरीत धर्मांतराच्या प्रक्रियेला जास्त महत्त्व देताना मानवी जीवनातील प्रेम, कारुण्यदेखील दाखवण्याचा प्रयत्न मी केलेला आहे. प्रत्येक क्षेत्रात चांगली माणसं असतात. प्रत्येक भांडणात एक तरी चांगला माणूस असतो, हेदेखील सांगण्याचा प्रयत्न त्यातून केलेला आहे. येशूच्या खऱ्या मार्गाने जाणारा एक तरी असतो, ही भावनादेखील त्यातून वठवलेली आहे. माणसे आपापल्या चौकटीतील अस्तित्वासाठी धर्मांची शिकार करत आहेत आणि शतकानुशतकं धर्म पाळणारी माणसं स्वेच्छेने दुसरा धर्म स्वीकारू शकत नाहीत, हे वास्तव सांगण्याचा माझा प्रयत्न होता.

प्रश्न : धर्मांतराला जबाबदार कोण? कर्मठ हिंदू की ख्रिश्चन पाद्री? की, धर्मांतराचा दोष दोन्हींना जातो?

 -गोव्यातील अनुभवापुरते बोलायचे झाले तर, याचा दोष ख्रिश्चन पाद्रींना जाईल. कारण त्या वेळी माणसं पापभीरू होती, संघटित नव्हती. तेव्हा आणि आजही तसा गोवा सुशेगादच आहे. त्या तुलनेत धर्मांतर घडवून आणणारे ख्रिश्चन पाद्री धाडसी होते. हिंसा त्यांच्या रक्तात होती. अतिशय आक्रमकपणे आणि खुनशीपणे ते माणसांना वेठीस धरत होते. वेगवेगळे मार्ग अवलंबून त्यांना एकच गोष्ट घडवायची होती, ते ती घडवत होते. बाकीचे सहन करत होते. काही स्थलांतर करत होते. जीवाच्या आणि धर्मांतराच्या भीतीने सैरावैरा पळत होते. असं ते अतिशय अमानुषपणे चाललेलं काम मी ‘तांडव’च्या निमित्ताने मांडलं आहे.

‘तांडव’च्या प्रकाशनची गंमत सांगितलीच पाहिजे. ‘तांडव’ मराठीत लिहिल्यावर दोन वर्षे एका प्रकाशकाने पुढचे वायदे देत तशीच ठेवली... मग एकदा ती विश्वास पाटलांकडे वाचायला पाठवली. त्यांना ती आवडली. त्यांनी दिलीप माजगावकरांना पाठवून परस्पर विनंती केली. ती माजगावकरांना इतकी आवडली की, ते थेट मला भेटायला गोव्याला स्वत:हून आले अन्‌ म्हणाले की, ‘‘एवढी चांगली कादंबरी लिहिणारा माणूस दिसतो कसा, हे पाहायला आलो.’’

प्रश्न : तुम्ही मराठीत आणि कोकणीत अशा दोन्ही भाषेत लिहिता. दोन भाषांत एकच साहित्यकृती लिहिणारे अपवाद तुम्ही आहात; त्याविषयी काय सांगाल?

-माझी मातृभाषा कोकणी आहे. माझी अतिशय आवडती भाषा मराठीच आहे. मी मराठीतच सुरुवात केली. त्यानंतर मी कोकणी भाषेत लिहायला सुरुवात केली. माझी ‘कोंडमारा’ ही पहिली कथा 1972 मध्ये आचार्य अत्रे यांच्या ‘नवयुग’मध्ये छापून आलेली आहे. आचार्य अत्रे कथा स्पर्धा घ्यायचे. त्या स्पर्धेला चांगल्या हजारेक कथा यायच्या, त्यांतून निवडलेल्या 40 कथांमध्ये माझ्या कथेची निवड झाली. त्यामुळे माझ्या लेखनाची प्रेरणा सर्वप्रथम अत्रेंपासून झाली. आपल्याला लिहिणं जमेल, ही स्वत:ला तपासण्याची संधीच मला अत्रेंच्या स्पर्धेने दिली.

त्यानंतर पुण्यात असताना मराठीत लिहीत होतो; परंतु दरम्यानच्या काळात कोकणी अस्मितेची चळवळ सुरू झाल्यावर मला मनापासून वाटलं की, आपण कोकणीसाठी काही तरी केलं पाहिजे. मग मी एकाच वेळी कोकणी आणि मराठीत लिहायला लागलो. बऱ्याच जणांना माझ्या कलाकृती अनुवादित वाटतात. परंतु दोन्ही भाषांत लिहिण्याचा मी आनंद घेतो. दोन्ही भाषांमध्ये लिहीत असल्याने सुवर्णमध्य साधण्याचा वेगळाच आनंद मिळतो. मराठी साहित्यातील माणसांनी मला कोकणी म्हणून वेगळं मानलेलं नाही. आणि कोकणी भाषकांनी माझ्या मराठी प्रेमाचं कौतुकच केलेलं असल्याने या आनंदात भरच पडते.

मुलाखत:  विश्राम गुप्ते

(शब्दांकन : किशोर रक्ताटे)

Tags: मुलाखत हावठण लखोलखोल मुळां युगसांवार अरण्यकांड अदृष्ट काळी गंगा विश्राम गुप्ते महाबळेश्वर सैल तांडव विशेष ग्रंथ पुरस्कार महाराष्ट्र फ़ौंडेशन पुरस्कार 2014 interview mulakhat havthan lakholkhol mula yugsanvar aranykand adusth kali ganga vishram gupte mahabaleshvar sail tandav vishesh granth purskar Maharashtra foundation awards 2014 Maharashtra foundation purskar 2014 weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

महाबळेश्वर सैल

 गोव्यात स्थायिक असलेले एक माजी सैनिक तसेच कोकणी, मराठी कथालेखक, निबंधलेखक व कादंबरीकार आहेत.१९६५च्या भारत-पाक युद्धात त्यांचा सहभाग होता. १९६३-६४ मध्ये इस्रायल-इजिप्त सीमेवर युनोतर्फे शांतिसैनिक म्हणूनही ते गेले होते.


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके