डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

कोरडवाहू शेती हा प्रश्र फक्त त्या शेतकऱ्यांच्याच जगण्या-मरण्याशी संबंधित नाही; तो सगळ्या समाजाचा प्रश्न आहे. त्यामुळे कोरडवाहू शेतकऱ्यांपेक्षाही तो इतर समाजाला, धोरणकर्त्यांना जास्त तीव्रतेने समजला पाहिजे- समजून घेऊन तो सोडवण्यासाठीचा दबाव तयार व्हायला पाहिजे असा महत्त्वाचा दृष्टिकोन ही लेखमाला लिहिण्यामागे आहे. त्यामुळे निव्वळ कोरडवाहू शेतकरी एवढाच मर्यादित कॅनव्हास माझ्या डोळ्यांसमोर लेखन करताना असणार नाही. या प्रश्नांबद्दल इतर समाजाचेही भान जागे करण्याचा थोडा प्रयत्न व्हावा, अशी धडपड आहे.  

कोल्हापूर जिल्ह्यातील अल्पभूधारक शेतकऱ्यांचा मी मुलगा आहे. करवीर तालुक्यातील ‘आरे’ हे सुमारे तीन हजार लोकवस्तीचे माझे गाव. मी वाणिज्य शाखेचा पदवीधर व नंतर पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण घेऊन अपघातानेच पत्रकारितेत आलो. ‘बेळगाव तरुण भारत’च्या कोल्हापूर आवृत्तीत माझ्या पत्रकारितेचा श्रीगणेशा झाला. त्यानंतर चार-पाच वर्षांत लगेचच मी ‘सकाळ’मध्ये रुजू झालो. गेली अठरा वर्षे पत्रकारितेत आहे. दैनिक ‘ॲग्रोवन’चा पश्चिम महाराष्ट्र प्रतिनिधी म्हणून २००४ पासून काम केले. त्याशिवाय माझ्या पत्रकारितेच्या एकूण कारकिर्दीत शेती, शेतकऱ्यांचे प्रश्न, शेतीतील चांगले प्रयोग व त्यातील अर्थकारण, राजकारण हे विषय सातत्याने मांडत आलो. पदवीपर्यंतचे शिक्षण घेईपर्यंत स्वतःही शेती केली आहे. शेती व शेतकऱ्यांच्या प्रश्नांबद्दल मला उपजतच आस्था आहे.

मी कोल्हापूर जिल्ह्यातील म्हणजे शेतीच्या बागायत पट्‌ट्यातला. बारमाही सिंचनाची व्यवस्था असलेल्या भागातील. चांगली शेती, सहकारी साखर कारखानदारी, दूध उद्योगापासून ते महाराष्ट्राच्या राजकारणावर प्रभाव ठेवणाऱ्या पट्‌ट्यातला. त्यामुळे कोरडवाहू शेतीचे प्रश्न समजून घेण्याची व त्या शेतकऱ्यांच्या वेदना जाणून घेण्याची संधी म्हणूनही मी या अभ्यासवृत्तीचा विचार केला. फेलोशिपच्या कामासाठी द्यावा लागणारा वेळ, त्यासाठी घ्यावे लागणारे कष्ट करण्याची माझी तयारी होती. या सगळ्यांची दखल घेऊन या फेलोशिपसाठी माझी निवड करण्यात आली असावी. दि. ९ मे २०११ रोजी पुण्यातील शनिवार पेठेतील साधना मीडिया सेंटरमधील साने गुरुजी सभागृहात फेलोशिप प्रदान कार्यक्रम झाला. त्यास साधना ट्रस्टचे विश्वस्त व ज्येष्ठ समीक्षक रा.ग.जाधव व डॉ. द. ना. धनागरे हे उपस्थित होते. या फेलोशिपमध्ये मी नेमका काय अभ्यास करणार आहे, याची माहिती पाच मिनिटांत उपस्थित श्रोत्यांना दिली. त्याच दिवशी माझी डॉ. द. ना. धनागरे यांच्याशी प्राथमिक बैठक झाली व कामाचा प्राथमिक आराखडा निश्चित करण्यात आला.

त्यानंतर वेगवेगळ्या टप्प्यांवर डॉ. धनागरे, डॉ. नरेंद्र दाभोलकर, अर्थतज्ज्ञ प्रा. अभय टिळक व साधना साप्ताहिकाचे तत्कालीन कार्यकारी संपादक विनोद शिरसाठ यांच्या उपस्थितीत साधनाच्या कार्यालयात किमान चारपाच वेळा एकत्रित बैठका झाल्या. त्यानुसार फेलोशिपच्या अभ्यासाचे स्वरूप निश्चित झाले. कोरडवाहू शेतीतला शेतकरी स्वयंपूर्ण होऊ शकेल का, ही शेती किफायतशीर होऊ शकते का, ती तशी व्हावी म्हणून शेतकऱ्यांनी काही चांगले प्रयोग केले आहेत का, असे प्रयोग कुठे आहेत, त्यांचा अनुभव काय आहे व त्या प्रयोगांचे सार्वत्रिकीकरण करणे शक्य आहे का, याचा शोध घेतला जावा- अशी ढोबळमानाने रूपरेषा निश्चित झाली. त्याच्या जोडीला अल्पभूधारक, कोरडवाहू जमिनीतील कुटुंब स्वयंपूर्ण बनेल का याचाही अभ्यास केला जावा, असे निश्चित करण्यात आले.

अभ्यासाची रूपरेषा :

हा अभ्यास नेका कसा करावा, यासंबंधी तज्ज्ञांशी चर्चा केल्यानंतर त्याची रूपरेषा निश्चित करण्यात आली.  त्यानुसार कोरडवाहू शेती करताना शेतकऱ्यांना प्रत्यक्ष येणारे अनुभव, त्यांच्या अडचणी, या शेतीत गावपातळीवर सध्या सुरू असलेले प्रयत्न, या शेतीकडे पाहण्याचा राज्य शासनाचा व कृषी खात्याचा दृष्टिकोन, या खात्यातर्फे सुरू असलेले प्रयत्न व योजना त्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतात का, त्याचा त्यांना कितपत उपयोग होतो व त्यातील अडचणी कोणत्या, हे तपासण्याचे निश्चित झाले. त्याच्या जोडीला राज्यातील कृषी विद्यापीठांकडून कोरडवाहू शेतीच्या विकासासाठी काय प्रयत्न होतात, ही शेती सुलभ अथवा फायदेशीर व्हावी यासाठी त्यांचे काही संशोधन सुरू आहे का, या विद्यापीठांतून कोरडवाहू शेतीच्या प्रश्नांसंदर्भात काही नियमित मार्गदर्शन होते का, विद्यापीठ व कोरडवाहू शेतकरी यांच्यात काही समन्वय आहे का- हे तपासून पाहण्याचे ठरविण्यात आले.

राज्य शासन, कृषी खाते व विद्यापीठांच्या जोडीला स्वतः तो शेतकरी या शेतीत काही चांगले करायला तयार आहे का, त्यासाठी त्यास कशाची मदत हवी, ही शेती करण्याबाबतचा आत्मविश्वास त्याच्यात आहे का, समाज या शेतीकडे व त्यातील प्रश्नांकडे कसे पाहतो, शेतकरी आंदोलनांच्या अजेंड्यावर कोरडवाहू शेतीचा प्रश्न आहे का, असेल तर तो कितव्या क्रमांकावर आहे व नसेल तर तो का नाही- यासंबंधीचाही शोध घेणे हा अभ्यासाचा भाग राहील, असे निश्चित करण्यात आले. त्यानुसार या अभ्यासासाठी सांगली, सोलापूर, बीड, वर्धा, यवतमाळ आणि अकोला या सहा जिल्ह्यांची निवड केली.

शेतावर जाऊन शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेण्याचे निश्चित केले. त्यांच्याशी बोलून त्यांच्या अडी-अडचणी आणि या शेतीबद्दलचा त्यांचा अनुभव समजून घेण्याचे नक्की केले. त्याच्या जोडीला कोरडवाहू शेतीशी संबंधित तज्ज्ञांची मते काय आहेत, हेदेखील जाणून घेतले जावे, असे ठरले. शेतीसाठी पतपुरवठ्याची सोय काय आहे, तो नियमित होतो का, जिल्हा मध्यवर्ती बँका किंवा राष्ट्रीयीकृत बँकांच्या ताळेबंदांध्ये या शेतकऱ्याला कुठे स्थान आहे का याचा शोध घेतला जावा. एवढेच नाही तर कोरडवाहू शेतीची सद्य:स्थिती मांडताना या शेतीला पूरक ठरेल असे काही उत्तम शेतीचे प्रयोग कुठे झाले आहेत, त्यांना भेट देऊन त्यांची माहिती घेणे व ते विस्ताराने मांडून त्याचे सार्वत्रिकीकरण करणे शक्य आहे का याचाही या अभ्यासात अंतर्भाव करण्यात आला.  

अभ्यासाची दिशा :

या अभ्यासासाठी शेतकऱ्यांच्या मुलाखती घेण्यासाठी प्रश्नावली तयार करण्यात आली. ती त्या शेतकऱ्यांशी बोलून भरून घेण्यात यावी. त्यांच्या शेतीला प्रत्यक्ष भेट देण्यात यावी. कोरडवाहू शेतीसंबंधित आवश्यक माहिती विद्यापीठे, बँका व कृषी आयुक्त कार्यालयाकडून माहितीचा अधिकार वापरून मिळवण्याचे निश्चित केले. त्याशिवाय या विद्यापीठांचे कुलगुरू, संशोधन संचालक अथवा विस्तार संचालक यांच्याशी बोलून कोरडवाहू शेतीच्या विकासासाठी ही विद्यापीठे काय करतात याचा शोध घेतला जावा. त्याशिवाय या अभ्यासाचाच भाग म्हणून देशातील पहिल्या व शंभर वर्षांपूर्वी इंग्रजांच्या काळात सुरू झालेल्या सोलापुरातील कोरडवाहू शेती संशोधन केंद्रास भेट देऊन तिथे या शेतीच्या विकासासाठी नेमके कोणते संशोधन चालते आणि ते संशोधन शेतीपर्यंत, शेतकऱ्यांपर्यंत नेण्याचे काय नियोजन आहे याचा शोध घेतला जावा, असाही एक टप्पा त्यामध्ये अंतर्भूत करण्यात आला.

सध्या मी लोकमतच्या कोल्हापूर आवृत्तीमध्ये मुख्य बातमीदार म्हणून काम करत आहे. वृतपत्राच्या दैनंदिन कामाचा व्याप सांभाळत या अभ्यासासाठी वेळ देताना मला मोठी कसरत करावी लागली. किंबहुना, असा काही वेगळ्या विषयाचा अभ्यास व वृत्तपत्राची नोकरी सांभाळणे शक्यच नाही. त्यामुळे मला हे फेलोशिपचे काम ठरलेल्या मुदतीत पूर्ण करता आले नाही. विदर्भ, मराठवाड्यात जाऊन चार-दोन दिवसांत फिरून माहिती घेणे हे तसे फारच जिकीरीचे काम होते. मी लोकमतसारख्या वृत्तपत्रात काम करत असल्याने ही माहिती मिळवणे व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणे किंवा सरकारी यंत्रणेकडून माहिती मिळवणे या गोष्टी काहीशा सुलभ झाल्या. परंतु वृत्तपत्रांत जबाबदारीच्या हुद्यावर काम करताना अशा अभ्यासासाठी वेगळा वेळ देता येत नाही.

दुसरे असे एक महत्त्वाचे कारण की, माझे दौरे पूर्ण होऊन लेखनास सुरुवात झाली आणि त्याच दरम्यान साधनाचे संपादक व अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे लढाऊ नेते डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या झाली. या विषयाचा अभ्यास सुरू झाल्यावर त्यांच्याशी किमान चार वेळा तास- दोन तासांच्या बैठका झाल्या. या विषयातील बारकावे मांडण्याचा त्यांचा आग्रह होता. आपण काही तरी निष्कर्ष काढून किंवा अमुक एका प्रश्नाचे उत्तर असेच हवे असे ठरवून अभ्यास केले जातात तसे या फेलोशिप्सचे होऊ नये, असे दाभोलकर सरांचे म्हणणे होते. जे काही चित्र पुढे येईल ते वास्तवाला भिडणारेच हवे; त्याबाबत कुठेही तडजोड केली जाऊ नये, असा त्यांचा आग्रह होता. त्यामुळे हे काम  सुरू असताना दाभोलकर सरांचा अधून-मधून फोन येई. आपण हाती घेतलेले काम वेळेत पूर्ण करायला हवे, ही नैतिक भीती त्यांच्यामुळे होती. त्यांच्या अचानक खून होण्याने सुरुवातीला या लेखनातील मन हरवून गेले. परंतु पुन्हा दुसरा विचार असा केला की, दाभोलकर सरांनी मोठ्या विश्वासाने माझ्यावर सोपवलेले हे काम आहे; ते अर्धवट सोडणे त्यांना कधीच पसंत पडले नसते. कारण घेतलेले काम जिद्दीने व कोणत्याही संकटाची तमा न बाळगता तडीस नेणे, हा त्यांचा पिंड होता. त्यामुळे ते हयात नसताना आपली जबाबदारी जास्त आहे, असे समजून मी फेलोशिपच्या लेखनाचे काम पूर्ण केले. कारणे काही असली तरी लेखनास विलंब झाला, हे खरेच आहे. परंतु त्याला जोडून हे देखील सत्य आहे की, जरी विलंब झाला तरी मी केलेल्या अभ्यासातील किंवा मांडलेल्या तथ्यांतील सत्य बदलणारे नाही. त्यामुळे विलंब झाला तरी त्याची मांडणी करावी, असा विचार करून हे काम मी पूर्ण केले.

अभ्यास करताना कोरडवाहू शेती, शेतकऱ्यांचे प्रयत्न, त्यांच्या अडचणी व शासनाचे धोरण यांची चिकित्सक मांडणी केली जावीच; परंतु ग्राऊंडलेव्हलवर या शेतीची सद्य:स्थिती ढोबळमानाने कशी आहे, हे या अभ्यासातून प्रतिबिंबित झाले पाहिजे, असा विचार जास्त करण्यात आला. तसा शासनापासून समाजापर्यंत व व्यवस्थेपासून धोरणनिश्चितीपर्यंत आता कोरडवाहू शेती हा विषय कुणाच्या खिजगणतीतही नाही. काँग्रेस आघाडीच्या मागच्या सरकारने कोरडवाहू मिशन हाती घेतले; परंतु अशी मिशन हाती घेतली जातात, त्यावर कोट्यवधी रुपये खर्च होतात व पुढे त्या मिशनचे काय होते हे शेतकऱ्यांनाच नव्हे तर सरकारलाही समजत नाही, असा अनुभव अनेक बाबतींत आला आहे.

महाराष्ट्रातील सिंचन प्रकल्पांवर जो पाण्यासारखा पैसा खर्च झाला व त्यातून राज्याचे सिंचन किती वाढले, त्यावर आरोप-प्रत्यारोप किती झाले, चौकशीआयोग नेले गेले; परंतु आता त्याचे पुढे काय होणार, हे भाजप सरकारला राष्ट्रवादीने छुपा पाठिंबा दिल्यावर स्पष्टच झाले आहे. त्यामुळे या प्रश्नाच्या सोडवणुकीतील सामाजिक हित जेवढे महत्त्वाचे आहे, तितकेच राजकारणही महत्त्वाचे आहे. कारण पक्ष व राज्यकर्ते कुणीही असोत; मोठा वर्ग याचकाच्या भूमिकेतच सतत राहिला पाहिजे, यातच राज्यकर्त्यांचे भले असते. तो स्वयंपूर्ण बनला तर व्यवस्थेला व सत्तेलाही आव्हान देऊ शकतो. म्हणून या मोठ्या वर्गाच्या भल्यासाठी आम्ही काही तरी करतो, हा देखावा तरी तयार करायचा आणि त्यातून त्याचे भले तर होणार नाही अशी नीती आखायची- असाच व्यवहार ढोबळमानाने कोरडवाहू शेतीच्या विकासामध्ये आतापर्यंत झाला आहे. मूळ प्रश्र मांडताना या बाजूंचा विचारही या अभ्यासात अंतर्भूत असेल.

या अभ्यासाची ‘साधना’मधील लेखमालेसाठी मांडणी करतानाही नुसते प्रश्नच मांडून अडचणी सांगण्याचा माझा हेतू नाही. त्या तर मांडूच; परंतु त्यासाठी काय करायला हवे, ही पर्यायी नीतीही समाजासमोर उलगडून सांगण्याचा प्रयत्न राहील. कोरडवाहू शेती हा प्रश्र फक्त त्या शेतकऱ्यांच्याच जगण्या-मरण्याशी संबंधित नाही; तो सगळ्या समाजाचा प्रश्न आहे. त्यामुळे कोरडवाहू शेतकऱ्यांपेक्षाही तो इतर समाजाला, धोरणकर्त्यांना जास्त तीव्रतेने समजला पाहिजे- समजून घेऊन तो सोडवण्यासाठीचा दबाव तयार व्हायला पाहिजे असा महत्त्वाचा दृष्टिकोन ही लेखमाला लिहिण्यामागे आहे. त्यामुळे निव्वळ कोरडवाहू शेतकरी एवढाच मर्यादित कॅनव्हास माझ्या डोळ्यांसमोर लेखन करताना असणार नाही. या प्रश्नांबद्दल इतर समाजाचेही भान जागे करण्याचा थोडा प्रयत्न व्हावा, अशी धडपड आहे. कोरडवाहू शेतकरी हा काही साधनाचा वाचक नाही, शिवाय त्याचे प्रश्न त्यानेच पुन्हा वाचून त्यांची सोडवणूकही होणार नाही. त्यामुळे ज्यांच्याकडे हे प्रश्न सोडविण्याची जबाबदारी आहे त्यांच्यावर दबाव वाढविण्याचे काम करणे हे सामाजिक उत्तरदायित्व आहे, अशा भूमिकेतून कोरडवाहू शेतीचा प्रश्न मी मांडणार आहे.

(२०११ मध्ये देवदत्त दाभोलकर यांनी साधना ट्रस्टला दिलेल्या देणगीतून तीन व्यक्तींना अभ्यासवृत्ती दिली होती. त्यापैकी एक विषय ‘कोरडवाहू शेती’ हा होता. या विषयाचा अभ्यास करून विश्वास पाटील यांनी लिहिलेली ही लेखमाला पुढील दहा महिने, महिन्यातून दोन वेळा याप्रमाणे प्रसिद्ध होईल.- संपादक)

Tags: देवदत्त दाभोलकर कृषी शेती कोरडवाहू शेती विश्वास पाटील krushi agriculture devdatta dabholkar koradvahu sheti vishwas patil weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

विश्वास पाटील.,  कोल्हापूर
vishwas07@gmail.com

पत्रकार, दै. लोकमत

 


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके