डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

जुलै महिन्यात हिरवा चाफा ऊर्फ मदनमस्त बहरून येतो. त्याची फुले हिरव्या रंगाची असल्यामुळे हिरव्या पानांत ती दिसत नाहीत. मग प्रेयसी विचारते, ‘लपविलास तू हिरवा चाफा, सुगंध त्याचा लपेल का? प्रीत लपवून लपेल का?’ इष्क आणि मुष्क (मिशी) छुपाए नहीं छुपते, हे खरंच आहे. नैसर्गिक असो की कृत्रिम- मला उग्र गंध आवडत नाहीत. त्यामुळे हिरवा चाफा माझा नावडता आहे.

जुलैमध्ये फुलणारा पांढरा चाफा प्लुमेरिया ॲक्युटिफोलिया या नावाने वनस्पतीशास्त्रात ओळखला जातो आणि तो दक्षिण अमेरिकेतून भारतात आला. त्याला ‘टेंपल ट्री’ असेही म्हणतात. लागवडीच्या दृष्टीनं चाफ्यासारखं अनाग्रही झाड नाही. मी केलेल्या पहिल्या बागेत, ऐन पावसात जमिनीत त्याची एक काडी खोवली अन्‌ तो वाढायला लागला. ॲक्युटिफोलिया ही चाफ्याची खूप प्रचलित जात आहे. याची फुले पांढरी असून केंद्रभागी सोनेरी पिवळा रंग असतो.

नवकाव्य कळते म्हणता? सांगा तर मग अनिलांच्या ‘धडकी’ या कवितेचा अर्थ-

‘सत्ताविसांतून जाऊन नऊ

शून्यच राहिले बाकी

तर...?

चिंता जडून धडकी भरे’

सांगा नं? जाऊ द्या. वर्षाची एकूण नक्षत्रं सत्तावीस. त्यातली नऊ नक्षत्रं पावसाची. नऊ नक्षत्रं पाऊस पडला नाही, याचा अर्थ सत्ताविसातून नऊ गेले; बाकी उरले शून्य! असे हे विचित्र गणित आहे.

आपला कृषिप्रधान देश सर्वस्वी मॉन्सूनवर अवलंबून आहे. म्हणून पावसाळा हा सगळ्यात महत्त्वाचा ॠतू आहे. वर्षा ॠतू. वर्ष हा शब्दच मुळी ‘वर्षा’पासून आला. आपलं सगळं पावसावरच आहे. म्हणून आपण बारा महिन्यांच्या कालखंडाला ‘वर्ष’ म्हणतो.

मराठीत जसे दुर्गा भागवतांचे ‘ॠतुचक्र’ तसे संस्कृतामध्ये महाकवी कालिदासाचे ‘ॠतुसंहार’ हे अप्रतिम निसर्गकाव्य आहे. आधी मी या नावाला दचकलो होतो. ‘संहार’ या शब्दाचा मराठीत अर्थ नकारात्मक, विध्वंसक आहे आणि संस्कृत हा माझा कधीच विषय नव्हता. संस्कृतांमध्ये संहार या शब्दाचा एक अर्थ- संघ, जमाव असा असून दुसरा अर्थ- संचय किंवा गोळा करणे असा होतो. म्हणून कालिदासाचे ॠतुसंहार म्हणजेच दुर्गाबार्इंचे  ‘ॠतुचक्र’.

कालिदासाने आपल्या ॠतुसंहाराचा आरंभ पावसाळ्यापासून केला आहे. आणखी एक गमतीची गोष्ट इथे नोंदवली पाहिजे. महाकवी कालिदासदिन जुलै महिन्यातच सहसा येतो, आषाढ शुद्ध प्रतिपदेला. पण आषाढ शुद्ध प्रतिपदा ही काही कालिदासाची जन्मतिथी नव्हे. तर, ‘मेघदूत’ या त्याच्या सर्वश्रेष्ठ कवितेचा आरंभ ‘आषाढस्य प्रथम दिवसे’ या शब्दांनी होतो, म्हणून हा कालिदासदिन. कालिदास हा माझाही अत्यंत आवडता कवी. त्याचे आणि वर्षा ॠतूचे नाते मला मोठेच वेधक वाटते, म्हणून पुन्हा एवढे विषयांतर!

जुलै महिन्यात आषाढी एकादशी येते आणि सगळ्या महाराष्ट्राचे हृदय पंढरीकडे धाव घेते. याच महिन्यात ‘चातुर्मासारंभ’ होतो. गटारी अमावास्या मनसोक्त साजरी करून पुढचा महिना मद्य आणि मांस वर्ज्य करणारे मोठ्या संख्येचे लोक इथे अजूनही आहेत. याच महिन्यात इथले देव चार महिन्यांसाठी झोपायला जातात. जुलै आणि ऑगस्ट हे पावसाचे मध्यवर्ती महिने. ‘बरसात की बहार है’ ही सुंदर गझल माहीत आहे नं?

क्या भुरी भुरी छाई है

मैखाने पर घटा

यह ॠतही खुशगँवार है

साकी खराब ला...

पावसाळ्यासारखा आनंददायी ॠतू खरोखर कोणता नाही. जुलै आणि आगॅस्ट या दोन शब्दांचे भाषांतर करत मर्ढेकर लिहितात,

‘आला आषाढ, श्रावण,

आल्या पावसाच्या सरी,

किती चातक चोचीने,

प्यावा वर्षाॠतू तरी!’

चातकाचा जुलै महिन्यासाठी संबंध असल्यामुळे पुन्हा थोडे विषयांतर करणे आले. आतापर्यंत चातक हा चकोरासारखा काल्पनिक पक्षी म्हणून ललित साहित्यामध्ये भेटत होता. चकोर हा चांदण्याशिवाय काही खात नाही आणि चातक हा पावसाच्या पाण्याखेरीज काही पीत नाही, अशी कवीची कल्पना. अगदी संतसाहित्यापर्यंत चकोर आणि चातकाचे या अर्थांने उल्लेख येतात. आत्तापर्यंत त्यांनी कविसंकेत म्हणून मानण्याची पद्धत होती.

वास्तवात चातक हा एनसायक्लोपीडियामध्ये ज्याची माहिती ‘पाइड क्रेस्टेड ककू’ या नावाने येते, तो पक्षी आहे. पावसाळा सुरू झाला की, हे पक्षी उत्तरेकडून भारतात येतात आणि सप्टेंबर-ऑक्टोबरच्या सुमारास ते भारत सोडून जातात. फक्त पावसाळ्यात निर्माण होणारे किडे, अळ्या, सुरवंट आणि झाडांची पाने हे चातकाचे खाद्य आहे. पंख फुटलेले वाळवीचे किडे उडू लागताच झडप घालून चातक त्यांना टिपतात. हे टिपताना अर्थातच चातक पक्ष्यांची चोच आकाशाच्या दिशेने असते. चातक हा पक्षी आणि त्याचे हे खाणे फक्त पावसाळ्यातच दृष्टोत्पत्तीस येते. म्हणून चातक हा फक्त पावसाचे पाणीच पितो, असे पाहणाऱ्याला वाटते.

शेतकऱ्यांच्या दृष्टीने जुलै हा अतिशय महत्त्वाचा महिना आहे. सृजनाचा, नवनिर्मितीचा हा महिना आहे. या महिन्यात सगळं गाव आपापल्या शेतात उलथलेलं दिसेल. अबक पेरणीचं बी एव्हाना तरारून उगवलेलं असतं. लोकगीतांमधून पेरणीची सुंदर-सुंदर चित्रं उमटलेली पाहायला मिळतात-

‘शेताला जाईन

उभी ऱ्हायीन धुऱ्यावरी

कंथ पेरीतो जवारीऽ

तीनी तासनी बरोबरी’

तासणी म्हणजे पेरलेल्या दोन ओळींच्या मधली काळी पट्टी. पेरलेले वर आले की, या पट्ट्या उठून दिसतात.

लोकगीतामधली ही कृषिकन्या पेरणी करायला गेलेल्या नवऱ्यासाठी शेतावर जाते. धुऱ्यावर म्हणजे बांधावर उभी राहून ती नवऱ्याकडे पाहते. तेव्हा दूरवर पेरणी करत असलेला तिचा नवरा तिला दिसतो. त्याच्या अलीकडे पेरणी केलेल्या पिकाच्या रांगा दिसतात. दोन ओळींमधल्या अत्यंत रेखीव अशा जमिनीच्या पट्ट्या समांतर गेलेल्या तिला दिसतात. सर्जनाच्या या दृश्याने ती हरखून जाते.

इंदिरा संतांना ग्रामीण व कृषिजीवनाचे अत्यंत आकर्षण होते आणि ते त्यांच्या लेखनातूनही उतरले आहे, असे म्हटले तर कुणाचा फारसा विश्वास बसणार नाही. शेती, सुगी आणि पावसाळ्याचे अन्योन्य संबंध वर्णन करताना त्यांची लेखणी कशी बहरून येते! पाहा जुलै महिन्याचे त्यांच्या शब्दांतील वर्णन-

शेतीची भरपूर मशागत मोठ्या हौसेने करावी. बी-बियाणे काळजीपूर्वक पेरावे. पावसाच्या नऊही नक्षत्रांचा हवा तेवढा पाऊस पडावा आणि शेतकऱ्याने आपल्या शेतात पावले टाकत येणाऱ्या हिरव्या लक्ष्मीकडे डोळे भरून पाहत राहावे. शेतकऱ्याच्या जीवनातील ही मोठी रम्य स्वप्नमाला- त्याच्या जीवनातील हा पुत्रजन्मोत्सवासारखा जीवनाला व्यापून टाकणारा आनंद! प्रथम हिरवे पांढरे कोेंब... मग दुपानी-चौपानी अशी दिसामाशी वाढत जाणारी ती बाळरोपे... नंतर सळसळणारे हिरवेगार शेत- त्याचा फुलोरा- त्याला धरलेली कणसे, शेंगा... किती पाहू, किती नकोसे होते.

इंदिरा संतांना वाटते- जिच्या शेतात हा सोहळा चालला आहे, त्या कृषिकन्येला काय वाटत असेल? आपल्या शिवारात उभ्या असलेल्या धानलक्ष्मीला बघत असताना तिचा ऊर भरून येत असेल. त्या भरात या हिरव्या चैतन्याने तिच्या मनात हिरवी गाणी उमलत असतील. ज्या पावसाने तिला साथ दिली, तो अधूनमधून पडत असेल. तिला उत्स्फूर्त ओव्या सुचत असतील. ही तिची गीतं वर्षागीताची भैरवीच गातात तितकीच प्रसन्न-समृद्ध आणि रसरशीत!

जून महिन्यात आपण छोटी-छोटी आळी तयार करून आपल्या अंगणात आणि परसात भोपळा, दोडके, तोेंडले कारले, काकडी, पडवळ यांच्या बिया लावल्या. त्यात शेळ्या वगैरेंनी तोंड घालू नये म्हणून तुऱ्हाट्यांचे गोल आणि गोड कुंपण तयार केले. महिनाभरात रोपे वाढली. चांगले सशक्त रोप शिल्लक ठेवत हळूहळू, एकेक करत प्रत्येक आळ्यातले दुर्बल रोप कमी करत गेलो. आता प्रत्येक आळ्यात भाजीचा एकेकच वेल वाढत आहे.

जुलैमध्ये फळभाज्यांच्या वेलींना फुले यायला लागली. यातला तोंडल्याचा वेल बहुवर्षायू आहे. त्याचे खोड आणि फांद्या बऱ्यापैकी जाड होतात. त्यामुळे श्री.द.महाजनांनी आपल्या पुस्तकात तोंडल्याच्या वेलाला ‘महावेल’ म्हणायला काही हरकत नाही, असे म्हणत त्याचा समावेश मात्र ‘वेल’मध्येच केला आहे; कारण तोंडल्याचे खोड काष्ठरूप नाही. भाजीवेलांपैकी तोंडले आणि पडवळ यांची फुले पांढऱ्या रंगाची असतात. पडवळाचे फूल गुंतागुंतीचे पण दिसायला सुंदर असते. तोंडल्याची भाजी करतात. आम्ही त्याचे लोणचेही करतो. पडवळाची भाजी, भजी आणि पचडी करता येते. बाकी फळभाज्यांची फुलं पिवळ्या किंवा तांबूस पिवळ्या रंगाची असतात. सगळीच फुलं दिसायला सुंदर असतात. त्यातल्या दोडकीच्या फुलांची रचना विशेष सुंदर असते. कविवर्य बा.भ. बोरकरांनी आपल्या ‘स्मृति’ या कवितेत दोडकीच्या फुलांना ‘स्वप्नफुले’ म्हटले आहे. आपणही जरा वेगळ्या नजरेने त्या फुलाकडे पाहू शकलो तर बोरकर त्याला ‘स्वप्नपुष्प’ का म्हणतात, ते कळेल.

जुलैमध्ये अनंतमूळ, अबई, अमरवेल (आकाशवेल), आंबटी, आयस्क्रीम स्क्रीपर, उतरण, तेलित (रानद्राक्षे), शिवलिंगी, सोमवल्ली या छोट्या-छोट्या वेलींना फुले येतात. गाईच्या कानासारखा आकार असणारे फूल ते गोकर्ण. जुलैमध्ये गोकर्णाला निळ्या-पांढऱ्या रंगाची फुले येतात. देवपूजेतही या फुलाला मान आहे.

या महिन्यात मालती आणि जाई या महावेलींना बहर येतो. मालतीची फुले महाराष्ट्रात उमलत नाहीत, तरी महाराष्ट्राइतकं मुलीचं नाव मालती कुठंच ठेवलं जात नाही. याचं कारण ही पुष्प महावेली नसून नाथमाधवांची गाजलेली कादंबरी ‘मालतीमाधव’ हे आहे. लग्न झाल्यावर मुलींची नावं काही मराठी कुटुंबांत बदलतात. तेव्हा माधव नावाच्या नवऱ्याच्या बायकोचे नाव मालती ठेवलं जातं.

मालती-माधव संस्कृतातसुद्धा आहे. मालती ही महावेल भारतामध्ये फक्त बंगालमध्ये पाहायला मिळते. तिचे शास्त्रीय नाव ॲगॅनोस्मा सायमोझा असे आहे. कालिदासाच्या ‘ॠतुसंहार’ आणि ‘मेघदूतात’ मालतीच्या सुवासिक फुलांचा उल्लेख आहे.

जुलैपासून पुढे फुलत जाणारे माझे सर्वांत आवडते फूल जुईचे आहे. जाईच्या फुलापेक्षा थोडी लहान, स्वच्छ पांढरी, नाजूक आणि सुवासिक फुले असणारी जुई कुणाला आवडणार नाही? महाकवी कालिदास तिचा उल्लेख युथिका असा करतो. उत्तर भारतात युथिका हे मुलीचे नाव याच फुलावरून ठेवतात. जुईचे नेमके सौंदर्य कवी अनिलांना टिपता आले. तिच्या सुवासाला त्यांनी ‘हळवा-कोमल’ म्हटले आहे. तिच्या रूपाला ते ‘नितळ देखणे’ म्हणतात.

‘कवळ्या फांद्यांचा लवचिक बांधा

पाचूच्या पानांत झाकून घेत

शुभ्र शुचितेची सौजन्यकांती

हिरवे लावण्य लेऊन येत’

जुईवर प्रेम करणाऱ्याने ‘दशपदी’ या संग्रहातली ‘जुई’ ही कविता जरूर वाचली पाहिजे. आपल्या बागेत तिला जरूर लावा. ती बहुवर्षायू आहे. तुमचं जगणं सुंदर करेल. पुण्याच्या अहिल्यादेवी शाळेकडून शिंदे पाराकडे जाऊ लागलो की, लगेच उजव्या हाती रामदास हॉटेलवर जुईचा सुंदर वेल झेपावला आहे.

पावसाळ्यात आणखी एक बहरणारे झाड म्हणजे रातराणी, ‘रातराणीवर’ मी स्वतंत्र लेख लिहिला आहे. त्यापेक्षा जी.ए. कुलकर्णी किती छान लिहितात पाहा-

महादेवाच्या देवळामागे कुंपणाप्रमाणे वाढलेली रातराणी. तिच्या जवळून जाताना ब्लॅक ॲण्ड व्हाईट चित्रपटात मधेच एखादे दृश्य टेक्निकलर व्हावे, त्याप्रमाणे एक क्षण धुंद सुगंधी होत असे. त्या वेळच्या एका कल्पनेची मला आजही गंमत वाटते. त्या वेळी आपण रातराणीजवळून जात नसून आपल्या जवळून एक शुचिर्भूत स्त्री पुढे गेली, असेच वाटे.

एका मराठी भावगीतात रातराणीवर एक पूर्ण कडवे आहे आणि त्यातील तिचे वर्णन यथार्थ आणि नेटके आहे-

‘रातराणीचा गंध दरवळेे

धुंद काहीसे आतून उसळे

चंद्र लाभला वरती,

खाली नक्षत्रांची वेल’

अशा या रातराणीचा दरवळ सुरू होतो जुलै महिन्यात. मात्र दुर्गा भागवतांना हेमंत ॠतूमध्ये तिच्या सुगंधाचा उतू जाणारा आवेग विशेष भावतो.

जुलैमध्ये तगरीच्या झाडाला विशेषकरून फुले येतात. मराठवाड्यात फुलाच्या आकारावरून याच झाडाला ‘स्वास्तिक’ असे नाव आहे. हे नाव ‘तगर’पेक्षा निश्चितच चांगले आहे. हे फूल डोळ्यांत भरेल एवढे रूपवान नाही. सुगंधी तर मुळीच नाही. याच्या या साधेपणावरच सीताराम गोखलेनामक कवीने कविता केली असून, ‘आठवणींच्या कविता’ या संग्रहात ती आहे.

               ‘फूल तगरीचे सर्व गुणी साधे

               दृष्टी पडता सहज हे चित्त वेधे

               रूप नखऱ्यावीन रूचिर कसे पाही

               डौल नसुनी बेडौल मुळी नाही’

हे झाड बेटे एका अर्थाने भाग्यवान आहे. त्याची एक अद्‌भुतरम्य आठवण सांगणारा ‘झाडाचे आकंदन’ नावाचा लेख ‘दुपानी’ या पुुस्तकात लिहिला आहे, तर ‘फुलवा’ या पुस्तकात स्वतंत्र लेख लिहून डॉ.शरदिनी डहाणूकरांनी त्याला ‘नक्षत्रांची छत्री’ असे अन्वर्थक नाव दिले आहे.

जुलै महिन्यात हिरवा चाफा ऊर्फ मदनमस्त बहरून येतो. त्याची फुले हिरव्या रंगाची असल्यामुळे हिरव्या पानांत ती दिसत नाहीत. मग प्रेयसी विचारते, ‘लपविलास तू हिरवा चाफा, सुगंध त्याचा लपेल का? प्रीत लपवून लपेल का?’ इष्क आणि मुष्क (मिशी) छुपाए नहीं छुपते, हे खरंच आहे. नैसर्गिक असो की कृत्रिम- मला उग्र गंध आवडत नाहीत. त्यामुळे हिरवा चाफा माझा नावडता आहे.

जुलैमध्ये फुलणारा पांढरा चाफा प्लुमेरिया ॲक्युटिफोलिया या नावाने वनस्पतीशास्त्रात ओळखला जातो आणि तो दक्षिण अमेरिकेतून भारतात आला. त्याला ‘टेंपल ट्री’ असेही म्हणतात. लागवडीच्या दृष्टीनं चाफ्यासारखं अनाग्रही झाड नाही. मी केलेल्या पहिल्या बागेत, ऐन पावसात जमिनीत त्याची एक काडी खोवली अन्‌ तो वाढायला लागला. ॲक्युटिफोलिया ही चाफ्याची खूप प्रचलित जात आहे. याची फुले पांढरी असून केंद्रभागी सोनेरी पिवळा रंग असतो. ॲब्ट्युसा या दुसऱ्या प्रकारच्या चाफ्याची पाने गोलसर टोक असणारी आणि त्याच्या फुलांत पिवळा रंग नसतो.

जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या तिन्ही महिन्यांत कास पठाराला वेगवेगळी भेट द्यायला पाहिजे. कास पठार यातील प्रत्येक महिन्याला- नव्हे, पंधरवड्याला आपल्याला रानफुलांचा नवनवा नजराणा बहाल करतं. सातारा शहराच्या पश्चिम दिशेला सज्जनगडाकडे जाणाऱ्या रस्त्याने सुरुवात करायची. बोगद्याच्या अलीकडे कास- बामणोलीचा रस्ता उजवीकडे वळतो. या प्रवासात श्रीकांत इंगळहळ्ळीकरांचे शब्द सोबतीला घ्यायचे.’ हिरव्या गालिच्यात कोरलेला वळणा-वळणाचा रस्ता समोर धुक्याच्या गूढ पदराखाली शिरलेला- शांत आसमंताचा... चंडोलाची मंजुळ लकेर... वाऱ्याच्या झुळुकीनं दृश्याची उघडझाप करून उत्कंठा लावावी, पाठोपाठ वाऱ्याचा झोत येऊन धुक्याचा पदर उलगडावा... पठारावरचं दृश्य क्षणात क्षितिजापर्यंत प्रकाशमान व्हावं, पठारावरची रानफुलं दवबिंदूंसह सूर्यप्रकाशात चमकावीत आणि बघणाराचं भान हरपून जावं...’ हे सगळं वर्णन स्वप्नातलं किंवा पऱ्यांच्या स्वर्गातलं नाही. किंवा पऱ्यांच्या स्वर्गातलं नाही. हा प्रत्यक्ष अनुभव कासच्या पुष्पपठारावरचा. हा सौंदर्याचा खजिना प्रत्येकानं अवश्य पाहावा असा आहे.

कास पठाराचा अभ्यास न करता, माहिती न घेता तिथे जाऊन धडकणे व्यर्थ आहे. या माहितीची छोटी-छोटी चार-पाच तरी पुस्तकं निघालीत. लॅटेराईट किंवा जांभा या नावानं ओळखल्या जाणाऱ्या ठिसूळ, लाल-जांभळ्या दगडानं हे पठार तयार झालेलं आहे. या पठारावर मातीचा यत्किंचितही थर नाही. त्यामुळं इथं कोणताही वृक्ष किंवा कोणतीही झुडपे नाहीत. ऐन पावसाळ्यातच जे काही आहे, ते इथलं वनस्पती-जीवन आहे.

जुलै महिन्यात कास पठारासह सगळ्याच सह्याद्रीवर असंख्य तृणपुष्पे उगवतात. अगदी सिंहगडाच्या अवतीभोवतीसुद्धा तेरडा आणि सोनकीसारखी फुलं विपुल प्रमाणात आढळतात. कास पठारावर आढळणारा तेरडा मात्र छोटेखानी असतो. गौरी-गणपतीच्या काळात कोकणात तेरड्याला फार महत्त्व असते. सर्वत्र आढळणाऱ्या तेरड्याची कास पठारावर आढळणारी छोटी आवृत्ती चटकन्‌ ओळखता येईल.

सोनकी (सिनेसिमोग्राह्मी) नाव सार्थ करणाऱ्या छोट्या-छोट्या एकपदरी पिवळ्या धम्म फुलांची ही वनस्पती सिंहगडाच्या परिसरात या दिवसांत इतकी विपुल असते की, तिला ओळखणेही फारसे कठीण नाही. जुलै महिन्यात कास पठारावर अमरी आणि दीपकाडी या दोनच प्रकारची रानफुलं तुम्हाला दिसतील, कारण इतक्या लवकर बाकीचं गवत तिथं उगवलेलं नसतं. दीपकाडी (दीपकाडी मोंट्यॅनम) या नावातच तिच्या रूपाचं वर्णन आहे. अमरी आणि दीपकाडी या दोन्हींची फुलं पांढरी-पांढरी असतात. खाली लालबुंद जमीन आणि वर ही शुभ्र पांढरी शुभ्र फुलं फारच सुशोभित दिसतात.

जुलै महिन्यात शेवटी हिरव्या झालेल्या कास पठारावर ‘सीतेचे पोहे’ ऊर्फ ‘सीतेची आसवं’ नावाची फुलं उमलतात आणि सगळेच्या सगळे कास पठार एखादी जादू झाल्यासारखं बदलतं.

‘वद जादूगारिणी कसली

मारलीस फुंकार असली

ओसाड माळ हा सारा

पुष्पांनी बहरून गेला...’

या ओळी कवीला कास पठारावरचं हे दृश्य पाहूनच सुचल्या असाव्यात, असं हे विराट आणि विशाल सौंदर्य पाहून वाटतं.

‘सीतेचे पोहे’ या फुलांचं वनस्पतीशास्त्रीय नाव ‘युट्रिक्युलेरिया मलाबरिका’ असं आहे. बालकुमारांसाठी या फुलांची जन्मकथा मी लिहिली आहे. कोकण परिसरात एक लोककथा प्रचलित आहे. ती अशी : एक गरीब कुटुंब. आई आणि तिची दोन मुलं- सीता आणि परशुराम. मुलगा छोटी-मोठी कामं करून चार पैसे घरात घेऊन यायचा. बहीण घरात आईला मदत करायची. भावावर तिचे खूप प्रेम होते. स्वतः जेवायची नाही, पण भावासाठी काही तरी खायला करून ठेवायची. एकदा सीता खूप आजारी पडली. घरात तांदळाचा दाणादेखील नाही. थोडे पोहे होते. तापानं फणफणलेल्या सीतेला तेवढे पोहे खाऊन आराम कर, असे आई म्हणते. तिला मात्र भावाची काळजी. ती अंथरूणात असतानाच भुकेला भाऊ घरी येतो. सीता उठते, आईने करून ठेवलेले पोहे त्याच्या हातात ठेवते. काही बोलण्याचीसुद्धा शक्ती तिच्या अंगात नसते. ती परत जाऊन अंग टाकते. भाऊ एका घासात ते पोहे संपवून भांडं भिरकावतो. बहिणीशी भांडण काढतो. म्हणतो, ‘आईनं माझ्यासाठी ठेवलेले पोहे तू संपवलेस!’ असं भांडून रागारागात निघून जातो. भावाला आपण पोटभर पोहे देऊ शकलो नाही, या दुःखातच सीता आपला प्राण ठेवते. भावाला बहिणीच्या मृत्यूची बातमी कळताच तो धावत येतो. आपण केलेला आरोप तिला सहन झाला नाही आणि त्यातच ती गेली, म्हणून मोठा आकांत करतो... आणि बहिणीच्या दुःखात तोही प्राण सोडतो.

लोक असं सांगतात की- हे बहीण-भाऊ परस्परांवर प्रेम करायला पुन्हा पृथ्वीवर आले. फक्त कोकणात (आणि कास पठारावर) माळरानावर, पुन्हा पृथ्वीवर आले. फक्त कोकणात (आणि कास पठारावर) माळरानावर, निळ्या फुलांच्या टोकावर पोह्याचा आकार असलेला पांढरा ठिपका घेऊन आलेली ही फुले म्हणजेच सीतेचे पोहे. भाऊ कवडा पक्षी झाला. हा पक्षी आकारानं कबुतरापेक्षा लहान आहे. त्याचं शास्त्रीय नाव.????

पिवळसर राखी-उदी रंगाचा हा पक्षी कोकणात माळरानातून, शेतातून सारखा फिरत असतो. विशेषत: सीतेचे पोहे या वनस्पतीमधून. तो जे खिन्न-उदास गाणे गातो, त्याचे शब्द असे-

‘सीते कवडा पोर पोर

सीतेच्या हातचे पोहे गोड गोड...’

कास पठारावर जुलैच्या शेवटच्या आठवड्यात फक्त हीच फुलं दिसतील. त्याचं एक नाव ‘सीतेची आसवं’ असंही आहे. रावणाने पळवून नेताना आकाशातून सीतेने जी आसवं गाळली, त्याची झालेली ही फुलं- अर्थात सीतेची आसवं!

कास पठारावरच काय, सह्याद्रीच्या डोंगरमाथ्यावर संबंध पावसाळाभर शेकडो- नव्हे, हजारो जाती-प्रजातींच्या वनस्पतींच्या उगवण्या-वाढण्याची जणू चढाओढ चाललेली असते. दोन डोळ्यांत काय काय म्हणून आणि किती-किती साठवावे, असे होते. एक गमतीदार वनस्पती दिसेल- सापकांदा ऊर्फ कोब्रा लिली. हिचे दोन प्रकार आहेत. जुलै महिन्यात फुलतो त्याचे नाव आहे ‘ॲरिसीमा टॉरच्युओसम’. याला आधी फुलं येतात. ती सुकून गेली की, मग पानं फुटायला आरंभ होतो. फुलाचा आकार नागफण्यासारखा असतो. अत्यंत उग्र वास असतो त्याचा. अर्धा पावसाळा उलटला की, त्यांच्या जाड देठावर लंबगोलाकार कणसं धरतात.

काही फुलं आणि काही झाडं मी प्रथमतः कोकणातच पाहिली आहेत. उदा.- सोनटका हे फूल. पर्यटनासाठी रत्नागिरीला गेलो असता मला ते दिसलं. त्याचं रूप आणि गंध दोन्ही आवडलं, पण अनेकांना विचारल्यानंतर नाव कळालं. कसलं सुंदर फूल! दहा वर्षांपासून पुण्याच्या माझ्या घरातील निवडक फुलझाडांत त्याला अढळ स्थान दिलंय. वसंत बापटांनी तर त्यांना आवडणाऱ्या तीन-चार फुलांत एक सोनटका असल्याचे म्हटले आहे.

‘निसर्गाचे नवे अनुष्टुभ छंद

केवळ सौंदर्य केवळ आनंद

निशिगंधावर सुगंधाचे पेले

प्राजक्त झेलतो चमेलीचे झेले

नागांनाही मोही असा सोनचाफा

ओलेत्या पृथ्वीच्या नव्हाळीच्या वाफा’

कुंती हा सुगंधी फुलांचा छोटा वृक्ष जुलै महिन्यात बहरतो. त्याची पाने काहीशी कढीपत्त्यासारखी दिसतात. इंग्रजीत याचे नाव सॅटिन वूड, ऑरेंज जॅस्मिन असे असून वनस्पतीशास्त्रीय नाव ‘मुराया पॅनिकुलाटा’ असे आहे. कोकणात मोठ्या प्रमाणात आढळणारा करमळ हा अतिशय सुंदर, सुगंधी फुलांचा छोटेखानी आणि सदाहरित वृक्ष आहे. ज्याला मोठा करमळ म्हणतात, त्याची फुले पांढरीशुभ्र असतात. श्री.द. महाजन लिहितात- मोठ्या करमळच्या फुलांच्या सुंदरतेचे वर्णन करणे केवळ अशक्य! शब्दांपलीकडचे! तो सौंदर्योत्सव पाहावा, अनुभवावा, पाहतच राहावे आणि तृप व्हावे.

जुलै महिन्यात करंजवेल हा सुवासिक फुले असलेला महावेल जरूर पाहावा. पुण्याच्या एम्प्रेस बोटॅनिकल गार्डनमध्ये तो आहे. एम्प्रेसचे वैशिष्ट्य म्हणजे, तिथे वृक्ष-वेलींना नावे दिलेली असतात. एखाद्या वृक्षाचा असावा असा एक-दीड फूट रुंदीचा त्याचा बुंधा असू शकतो. याचा सुगंध दूरवर दरवळतो.

दिडशे-दोनशे वर्षांपासून आपल्या देशात राहायला आलेल्या विदेशी झाडाबद्दल माझे मत प्रतिकूल नाही. आपल्या पर्यावरणाचा छळ करणारी तीनच झाडे किंवा वनस्पती आहेत. निलगिरी, कुबाभूळ (ल्यूसेना ल्यूकोसेफेला) आणि गाजर गवत. या तीन वनस्पती आपल्या पर्यावरणासाठी बाधक आणि विषारी आहेत. त्यांचा प्रचंड विस्तार काळजी करायला लावणारा आहे. जमेल तेवढा, संधी मिळेल तेव्हा त्यांचा नायनाट केला पाहिजे, या मताचा मी आहे.

पण महोगनी, उर्वशी, गोरखचिंच, अनंत, सुरू, गुलमोहर, हादगा, जॅकॅरांडा, शंकासुर, गुलाबी सावर, चाफा, बॉटलब्रश, बूच, खोटा बदाम, टिकोमा ही सुंदर झाडं विदेशी असली तरी माझी अत्यंत लाडकी आहेत. त्यांना या देशातून घालवायला माझी मुळीच परवानगी नाही.    

गोरखचिंच हा परदेशातून आपल्या देशात आलेला कदाचित सर्वांत जुना वृक्ष. विदेशी असला तरी भारतीय पर्यावरणाला त्याचा कुठलाही उपद्रव नाही. सगळ्यात मोठ्या आकाराची गोरखचिंच मी बंगळुरूच्या बोटॅनिकल गार्डनमध्ये पाहिली. सुमारे पाच मीटर व्यासाचा तिचा बुंधा आहे. आंध्रातल्या गोवळकोंडा किल्ल्याच्या आवारात देशातली सर्वांत मोठी गोरखचिंच आहे. बाओबाब असं तिचं विदेशी नाव असून वनस्पतीशास्त्रीय नाव ‘ॲडॅनसोनिया डिजिडाटा’ असं आहे. तिची फुलं मोठी, लांब देठाची, उलटी, खाली लोंबणारी, पिवळसर पांढरी (ऑफ व्हाइट) असतात. नाथपंथीय गोरक्षनाथांनी त्यांच्या शिष्यांना या झाडाखाली उपदेश केला, म्हणून तिच्या नावात ‘गोरख’ आलं; पण ‘चिंच’ला चिंचेचा काहीच संदर्भ नाही. फुलांचा हंगाम जुलैमध्ये संपतो. आफ्रिकेत तर याला कल्पवृक्षच मानतात.

जुलै महिन्यात आवर्जून पाहावे असे झाड आहे आफ्रिकन पेल्टोफोरम. पीतमोहर किंवा पिवळा गुलमोहर. गुलमोहर या सर्वपरिचित वृक्षाच्या जातकुळीतला हा तसा दुर्मिळ प्रकार आहे. पुण्यात नळस्टॉपवर आणि स्वीकार हॉटेलच्या जवळच्या रस्त्यावर एकाच इमारतीच्या आवारात याचे पाच वृक्ष आहेत. नुसती पाने असतानाही हा वृक्ष शोभिवंत दिसतो. पण पावसाळ्यात पिवळेधम्म फुलांचे लांबसडक आकाशोन्मुख तुरे त्यावर येतात, तेव्हा त्याच्या सौंदर्याचे वर्णन शब्दातीत असते.

जुलै हा अनंत या सुगंधी फुलझाडाच्या बहराचा महिना आहे. इंग्रजीत त्याला केप जॅस्मिन म्हणतात. त्याचे बंगाली आणि हिंदी भाषेतलं नाव सुंदरच आहे- गंधराज. घरोघरप्रमाणे माझ्याही बागेत मी त्याला वाढवला आहे. अजिबात उग्र नसलेला त्याचा सुगंध प्रेमात पडावा असाच आहे. याच कारणाने त्याच्या फुलांपासून अत्तर, उदबत्त्या आणि सुवासिक तेल तयार करतात. आवर्जून लावावे असे हे फुलझाड चीनमधून भारतात आले आणि बहुतेक उष्ण कटिबंधीय देशांत ते आढळते. त्याचे फूल 3 ते 5 सेंमी. व्यासाचे म्हणजे खूपच टपोरे असते. जुलै ते सप्टेंबर हा त्याच्या बहराचा काळ आहे.

जुलैपर्यंत आपल्याकडे पाऊस चांगलाच स्थिरावतो. त्याचा लगोलग परिणाम सगळ्या वनश्रीसृष्टीवर जाणवतो. फुललेला गुलमोहर पाहावा एप्रिल-मेमध्ये. पण हिरवागार गुलमोहर पाहायचा जुलैमध्ये, सुंदर अशी पालवी तो या महिन्यात परिधान करतो. आपले मोठमोठे पण हजारो हात हलवीत जणू काही गुलमोहर वर्षा ॠतूला अगत्यपूर्वक आमंत्रणच देतो, असे कुणी म्हटल्याचे आठवते.

सेलूच्या नूतन महाविद्यालयात सागवानाचे मोठे बन आहे. उन्हाळ्यात त्या झाडांचे एवढे वाईट सांगाडे होतात की, त्यांच्या बाजूला मला फिरकावेसुद्धा वाटत नसे. एका जुलैमध्ये चुकून माझी पावलं तिकडे वळली आणि वर्षा ॠतूच्या संजीवकत्वाने मी मोहरून उठलो! पाहतच राहावी अशी सुंदर, मोठमोठी पाने सर्व झाडांना अगदी टरटरून फुटली होती!

माझ्या या लेखनात ‘सुंदर’ हा शब्द बऱ्याचदा येतो आणि येणारेय याची मला जाणीव आहे. पण लक्षात घ्या- माणसं कुरूप असतील, कुत्री-डुक्कर-घाणेरडी असतील; पण झाडाकडे पाहून किळस यावी असे एकही झाड या जगात नाही. ‘अग्ली ट्री इज टू बी बॉर्न.’

पाडगावकरांच्या कवितेतील एका ओळीचा मला फार राग आला होता. ‘बाभळीवरही गुच्छ फुलांचे होते लगडत!’ अरे, बाभळीवरही म्हणजे काय? वा रे वा! तुम्ही जुलै महिन्यातली बाभूळ पाहिली आहे का महाशय? ही कविता वाचण्यापेक्षा इंदिरा संतांची किंवा वसंत बापटांची कविता वाचा ना!

मराठवाड्यात खूप बाभूळबनं आहेत. इंदिरा संतांना जालना जिल्ह्यातल्या बाभळींनी मोहविले. ‘मृद्‌गंध’ या त्यांच्या पुस्तकात जालन्याच्या बाभळीविषयी सुंदर लिहिले आहे. मराठवाड्यात बाभळीची पूजा करतात. बाभळीच्या झाडाखालीच ललाटावर भाग्य लिहिणारी सटवाईदेवी राहते. जुलै महिन्यात बाभळीला येणारी पिवळी फुलं दांड्यासकट सोन्याच्या कर्णफुलासारखी असतात. ललिता गादगे, इंद्रजित भालेराव, भास्कर चंदनशिव आणि महावीर जोंधळे या मराठवाड्याच्या लेखकांनी बाभळीविषयी सुंदर ललित गद्य लिहिले आहे. इंद्रजितला तर बाभूळ हे मराठवाडी माणसाचेच रूप वाटते. सर्व प्रकारच्या अभावांना सामोरे जात स्वतःला टिकवत जाणारे बाभळीचे झाड पाहायला जुलै महिन्यात मराठवाड्यात एखाद्या बाभूळबनाला भेट द्यायला हवी.

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


Comments

 1. Hemant Malekar- 20 Jul 2020

  छान माहिती,

  save

 1. chandan- 22 Jul 2020

  सर, ओढीने वाचावे असे हे ऋतुचक्र, पण ऋतुचक्रातील मे महिना कोणत्या अंकात आहे?

  save

 1. Vishal- 10 Aug 2020

  खूपच सुंदर आणि रोचक लेख, पुन्हा पुन्हा वाचावेसे वाटणारे, आणि तितकेच अभ्यासपूर्ण

  save

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके