डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

हिवाळ्यात पडणाऱ्या थंडीबद्दले जे तक्रार करतात, त्यांच्या अरसिकतेची आणि अज्ञानाची कीव करावी वाटते. सगळे ऋतू तीव्रच असायला हवेत. उन्हाळ्यात खूप ऊन हे पडायला हवे, त्याशिवाय समुद्राच्या पाण्याची वाफ होऊन भरपूर पाऊस पडणार कसा? पावसाळ्यात भरपूर पाऊस झाल्याशिवाय ‘आता जीवनमय संसार’ होणारच नाही. हिवाळ्यात खूप थंडी ही पडायलाच हवी. त्याशिवाय भरपूर आंबे येणारच नाहीत. गव्हाचे पीक चांगले येणार नाही. भरपूर थंडी पडली नाही, तर झाडांची साल कशी तडकेल? झाडाचा बुंधा साल न तकडता मोठा होणार कसा? सेलूच्या माझ्या शेवटच्या घरट्यात सागवानाची चार मोठी झाडे होती. मी रोज त्यांना म्हणायचो, तुमचा बुंधा खूप मोठा वाढू द्या अन्‌ मला प्रत्येकी पन्नास हजार रुपये आणून द्या.

कालिदासाच्या ऋतुसंहारातील पहिलाच श्लोक हेमंताच्या आगमनाचे वर्णन करणारा आहे. थंडी आणि दव यामुळे हेमंतात रब्बीची पिके वाढतात. काही कडधान्येही या ऋतूत येतात. या दिवसांत सर्वसामान्यपणे माणसाचे आरोग्य चांगले राहते. या ऋतूत दिवस लहान व रात्र मोठी असते. झाडांची पानगळ याच ऋतूत होते. त्यामुळे जंगलातील, वन-उपवनातील बरीचशी झाडे निष्पर्ण किंवा अल्पपर्ण बनतात.

सृष्टीतल्या याही परिवर्तनाकडे शायर कसा सकारात्मक नजरेनं पाहतो बघा-

    शाखों से बर्गे गुल नही झडते हैं बाग में
    जेवर उतर रहा है, उससे बहार का

(अरे वेड्या, ही पानगळती नव्हे. ही लावण्यमयी आता आपला शृंगार उतरवून ठेवत आहे.)

कमळाच्या फुलांचा हा या वर्षातला शेवटचा हंगाम. पावसाळ्याखेर येणाऱ्या कमळाला पुंडरिक नाव होते; त्याची प्रदले पांढरी असतात. कमळासाठी कुवलय असे एक नाव आहे. हे नुसते नाव नाही, तर त्यात कमळाच्या पाकळ्यांची मांडणीचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य सूचित झाले आहे. कमळाच्या पाकळ्या एका घेरात नसतात. त्या वाटोळ्या जिन्याच्या पायऱ्यांप्रमाणे क्रमश: वरच्या पातळीत असतात. सगळ्या प्रकारच्या कमळात हे लक्षण सर्वसाधारण असते. घेर हे सुवलय आणि सोपानरचना म्हणजे कुवलय होय.

कमळाच्या पानाच्या व फुलाच्या दांड्यात पोकळ नळ्या असतात. त्या थेट, पानाच्या उघड्या पृष्ठास श्वासरंध्रे असतात, तिथपर्यंत पोचलेल्या असतात. पानाच्या त्या पृष्ठास मेणाचा लेप असतो, त्यामुळे पाणी शिरत नाही. श्वास नीट चालतो. कमळाची खोडे म्हणजे कंद असतात. ते खाली चिखलात असतात. पाणी आटले तरी कंद जिवंत राहतो. नवीन पाणी आले म्हणजे त्यातून अंकुर फुटतात. हे सगळं मी देवीचे भोगाव येथील तळ्यात उतरून पाहिले आहे.

कमलपुष्पे दिवसाउजेडी उमलतात, रात्री मिटतात. हा हन्त हन्त नलिनी गजमुज्जहार! कमळाची फुले सुगंधी, एकाकी, मोठी 10-15 सेंमी व्यासाची, आकर्षक, लांब देठाची असतात. कमळाची खालची बाजू लोमश (लवदार) असते. फुले फक्त सकाळी उमलतात. या वनस्पतीत दुधी चीक असतो. गाथा सप्तशतीत कमळाच्या दोन जाती सांगितल्या आहेत. जलकमल आणि स्थलकमल. वर्णपरत्वे कमळाच्या जाती चार- नील, पीत, रक्त, श्वेत.

प्राचीन काळापासून कमल हे भारतीयांचे सर्वांत आवडते फूल आहे. लक्ष्मी आणि सरस्वती यांचे ते आसनच आहे. लक्ष्मीचे लाल कमळ तर सरस्वती श्वेतपद्मासन: गौतम बुद्धाचे आसनही कमळच. बुद्ध विकसित कमळावर बसतात आणि खालच्या कमळावर आपला पाय टेकवतात. गौतम बुद्ध चालू लागले की, त्यांच्या पावलागणिक कमळे उमलतात अशी बौद्धांची श्रद्धा आहे. आपल्या देशात जाती-धर्माची विविधता आहे. कमळाच्या प्रकारांतही ही असल्यामुळेच त्याला राष्ट्रीय फुलाचा मान मिळाला असावा. जलकमलाच्या सर्व रंगांची फुलं मी पाहिलीत. पिवळ्या सुवर्णकमळाचे विलोभनीय दर्शन मी उटीच्या बोटॅनिकल गार्डनमध्ये घेतले. आता कल्हार हे स्थलकमळ पाहण्याची तहान आहे. मी त्याच्याविषयी वाचले, ऐकले आहे. अप्रतिम सौंदर्य असते म्हणतात.

    पयसा कमलम कमलेन पय:
    पयसा कमलेन विभाति सर:

पाण्यामुळे कमळाला शोभा येते, कमळामुळे पाण्याला. पाणी आणि कमळामुळे सरोवर विलोभनीय सौंदर्याने नटते.
निरभ्र आकाश असताना चांदण्या रात्री सरोवराचे सौंदर्य न्याहाळण्यात केवढे सुख असेल नाही का? इथे पुन्हा एकदा स्पष्ट केले पाहिजे, चांदण्या रात्री उमलतात, त्या वॉटरलिली, कमळं नव्हेत. अर्थात वॉटरलिली काही इतकं उपेक्षणीय फूल नाही. ज्ञानेश्वरांनी वर्णन केलीय ती वॉटरलिलीच.

    ‘‘आपुला ठावो न सांडिता
    आलिंगिजे चंद्रू प्रकटिता
    हा अनुरागु भोगिता
    कुमुदिनी जाणे ॥’’

चांदण्या रात्रीत सरोवरच काय, सबंध सृष्टीला न्याहाळण्यात मौज आहे. संतकवींना चकोर भेटला, तो या चांदण्या रात्रीच. त्यांना वाटले अमावस्या म्हणजे चकोराची उपासमार, अष्टमी म्हणजे चकोराचा राईसप्लेट आणि पौर्णिमेचा चंद्र म्हणजे अन्‌लिमिटेड फूल मील. आपण पावसाळ्यातल्या चातकाला खोटं ठरवलं नाही, तसंच चांदण्यातल्या चकोरालाही अमान्य करत नाहीत. चातक हा खरोखर एक पक्षी आहे, हे आपण पाहिलं, तसाच चकोर हाही खरोखरीचा पक्षी आहे. फक्त चकोरी चांदण्यात आपल्या पिलांना वाळवीचे किडे खिलवते, चंद्रकिरण नव्हे.

चकोर आकाराने तित्तिर पक्षाएवढा असतो. नेपाळ, पंजाब आणि हिमालयात तो सापडतो. हिवाळ्यात म्हणजे या महिन्यात चकोर पक्षी खाली उतरतात. चकोरीची पिले तिच्याबरोबर शरद आणि हेमंतऋतूत जंगलात हिंडत फिरत चरताना दिसतात. आपल्या पिलांची वाढ जलद व्हावी म्हणून चकोरी पिलांना वाळवी चारते. वारुळातून वाळवी फक्त रात्री बाहेर पडते. चंद्राच्या प्रकाशात चकोरांना वाळवी सहज दृष्टीस पडते. म्हणून चकोराचे कुटुंब चांदण्यात वाळवी टिपताना दिसते. हे पाहून कवींना वाटते की, ते चांदणे टिपत आहेत. 

चांदण्या रात्री ताजमहाल पाहावा, तसेच समोरची सुरूची, कर्दळीची झाडंही न्याहाळावीत. शरद आणि हेमंतातल्या रात्री यक्षरात्री असतात!

डिसेंबर महिना हा रिठा उर्फ अरिष्टक या वृक्षाच्या फुलण्याचा, बहरण्याचा महिना आहे. आपल्याकडे आढळणारा ‘दक्षिणी’ रिठा मध्यम आकाराचा वृक्ष आहे. त्याच्या बुध्यांचा व्यास 50-60 सेंमी असतो. खोडाची साल गुळगुळीत असून ती करड्या रंगाची असते. रिठ्याला हेमंतात येणारा फुलांचा शाखायुक्त मोहोर आंब्याच्या मोहरापेक्षा लहान तर कुसुंब्याच्या मोहोरापेक्षा मोठा असतो. फुलांचा रंग मळकट-पांढरा असतो. रिठ्याची फळं उन्हाळ्यात तयार होता. या फळात साबणाचा अंश सुमारे 11 टक्के असतो. धुण्याचा साबण म्हणून पूर्वापार माणूस त्याचा उपयोग करत आला आहे. लोकरी, रेशमी आणि तलम नाजूक कपडे धुण्यासाठी त्याचा उपयोग करीत. माझ्या नूतन महाविद्यालयाच्या वानस्पत्योद्यानात रिठ्याचे मोठे झाड मी वर्षानुवर्षे न्याहाळत आलोय. त्याची फळे आणून त्यांचा फेसही मी काढून पाहिला आहे.

दर्शनमात्रे मन प्रसन्न करणारे या महिन्यातले दुसरे झाड आहे मुचकुंदाचे. मुचकुंदाच्या खोडावर आणि पानावरही तारकारूप लव असते. पानांच्या दोन रांगा असतात. प्रत्येक पान दीर्घवृत्त असून त्याला टोकदार शेंडा असतो. टोकाचे कोन विविध असतात. पान वरून गुळगुळीत असते. लव फक्त खालच्या अंगाला असते. मुचकुंदाची फुले पांढरी व सुवासिक असतात. त्यांची रुंदी 4-5 सेंमी असते. कळ्या लांबोळ्या असून त्यांना पाच धारा असतात. त्या सोललेल्या केळाच्या सालीसारख्या दिसतात. पांढऱ्याशुभ्र, नाजूक, सुवासिक पाकळ्या लांबट असतात. वाळल्यावर त्या पिवळसर बदामी झाल्या तरी त्यांना मंद सुवास येत राहतो. मुचकुंदाच्या पानाचा आकार हाताच्या पंजासारखा पण त्याहूनही मोठा असल्याने त्याच्या पानाचा वापर खाण्याचे पदार्थ त्यावर घेऊन एखाद्या प्लेटसारखा करतात. अतिसुंदर, औषधी आणि बहुगुणी असा हा भारतीय वृक्ष आहे.

नांद्रुक या वृक्षाचं एक नाव नंदीवृक्ष असंही आहे. मध्यम आकारमानाचा हा सदापर्णी वृक्ष रस्त्याच्या कडेने लावण्यासाठी योग्य, उत्तम सावली देणारा असा आहे. महाराष्ट्रात हा रस्त्याच्या कडेने लावलेला आढळेल. याची उंची 9-12 मीटर व घेर 2-4 मीटर असून त्याला वडाच्या झाडाप्रमाणे थोड्या पारंब्या असतात. निसर्गप्रेमी अरुंधती वर्तक म्हणतात तसे, वडाचे झाड म्हणजे जणू जटाधारी साधू, तर नांद्रुक म्हणजे बटाधारी सुंदरीसारखा दिसतो. त्याची फळे पक्ष्यांना अतिशय आवडतात. मे महिन्यात पाहाल तर नांद्रुकाच्या खाली वाळलेल्या आणि अर्धवट खाल्लेल्या फळांचा सडाच पडलेला दिसेल. फलटण-सातारा रस्त्यावर दुतर्फा लावलेले नंदीवृक्ष मुद्दामहून पाहण्यासारखे आहेत.

पर्जन्यवृक्ष मला आवडत नाही. पण निलगिरी ऊर्फ युकॅलिप्टस या वृक्षाचा तर मी तिरस्कारच करतो. इंग्रज राजवटीत वन विभागाने मुळच्या ऑस्ट्रेलिया आणि मलाया देशातील या वृक्षांना भारतात आणून त्याची मोठ्या प्रमाणावर लागवड केली. सर्वप्रथम ही लागवड तमिळनाडूमधील निलगिरी पर्वताच्या प्रदेशात करण्यात आली, म्हणून युकॅलिप्ट्‌सला निलगिरी हे नाव पडले. निलगिरीचे वृक्ष सरळ उंच वाढणारे असतात. पर्जन्याने तरी छाया मिळते, पण या निलगिरीपासून ‘पंथी को छाया नही.’ कोणताच चांगला गुण त्यात नाही. असो.

निलगिरीची पाने साधी, एकांतरित, लांबट, टोकदार आणि चंद्रकोरीसारखी दिसणारी, लोंबणारी असतात. वनस्पतींच्या मृतावशेषाचे, पालापाचोळ्याचे विघटन करून अत्यावश्यक मूलद्रव्याचे चक्रीकरण करण्याचे महत्त्वाचे काम जमिनीतील सूक्ष्मजीव करत असतात. त्यामुळे ही मूलद्रव्ये झाडांना शोषून घेण्यासाठी उपलब्ध होतात. निलगिरीच्या पानांमध्ये ‘युकॅलिप्टस ऑईल’ असते. त्याचं विघटन घडवून आणणारे जीवाणू (बॅक्टेरिया) ऑस्ट्रेलियातील जमिनीत आहेत, पण आपल्याकडे नाहीत. त्यामुळे निलगिरीची पाने इथे कुजत नाहीत. त्यातले तेल जंतुनाशक असल्यामुळे आपल्याकडील उपयुक्त जंतूंचाही ते नाश करते. परिणामी स्वाभाविक चक्रीकरणाला खीळ बसते. निलगिरीच्या लागवडीच्या परिसरात इतर झाडांची रोपे वाढत नाहीत, असेही दिसून आले आहे. इंग्रजांनी आपल्याला अनेक प्रकारे त्रास दिला. निलगिरी इथे आणून त्यांनी दिलेला उपद्रव मोठाच आहे. पण लक्षात ठेवा, हा देश पुण्यभूमी आहे, हे राष्ट्र बलवान आहे. सगळ्या जगाने ठरवले तरी, वो हमारा बाल भी बाका नही कर सकतें।

    कुछ बात है के हस्ती
    मिटती नही हमारी
    सदियों रहा है दुश्मन
    दौरे जहाँ हमारा

निलगिरी, काँग्रेस ऊर्फ गाजरगवत, कुबाभूळ ऊर्फ वेडी बाभूळ यांच्या हानीला परतवून लावत आम्ही आमचे पर्यावरण विशुद्ध राखूच.

डिसेंबरात आपण आणखी एका विदेशी पाहुण्याला भेटणार आहोत. निरुपद्रवी आहे बिचारा. चांगली सावली देणाराही आहे. या झाडाच्या वरवंट्यासारख्या दिसणाऱ्या फळांनी जी. एं.चं.देखील लक्ष वेधलं होतं. मध्यम आकाराचा हा सदाहरित वृक्ष आहे. सॉसेज ट्री. हा दहा ते पंधरा मीटरपर्यंत वाढतो. फुले निरनिराळ्या ठिकाणी वेगवेगळ्या काळात येऊ शकतात. पानाफांद्यामधून लांबलचक, पुष्पदांडी खाली लोंबकळते. तिच्यावर मोठाली, काहीशी पेल्याच्या आकाराची फुले येतात. फुलाचा व्यास सात-आठ सेंमी असतो. रंग, तांबूस, चॉकलेटी, मरून, जांभळट असा असतो. फुले रात्री उमलतात. त्यांचे परागीभवन मुख्यत्वे वटवाघळांकडून होते.

हिवाळ्यात म्हणजे सध्या फूट-दीड फूट लांबीची दुधी भोपळा, घोसाळी, शिराळ्याप्रमाणे दिसणारी लांबलचक फळं या दोरीच्या टोकाला लटकताना दिसतात. ह्या लांब दोरासारख्या देठांना लटकणाऱ्या जड लांबोळ्या फळांमुळेच ह्या झाडांना ‘सॉसेज ट्री’ हे नाव पडले आहे. पुण्याला क्रीडा संकुलात मी हे झाड पाहिले आहे. आणखीही पुष्कळ ठिकाणी पाहिले आहे.

काही झाडं प्रतिमा किंवा प्रतीक म्हणून आलेली कवितेत आधी भेटली. पुष्कळ फुले उपमान म्हणून आली. पायांना, डोळ्यांना कमळाची उपमा देतात, डोळ्यांना बदामाची, नर्गिसची उपमा देतात, लाल ओठांना पिकल्या तोंडल्याची उपमा देतात. मग माझ्यासारख्याचा उलटा प्रवास सुरू होतो. कवितेत ते झाड वा फूल आलं नसतं, तर मी त्याचा शोध घेण्याच्या भानगडीत पडलो नसतो.

सुरूचे वृक्ष दोन हात रुंदीचे पण उंचच उंच सुळुक्यासारखे वाढणारे म्हणून प्रसिद्ध आहेत. याला खडशेरणी असंही एक नावआहे. वृक्ष सदाहरित दिसला, ती त्याची काळसर हिरवी दिसणारी ती पाने नसतात. त्या असतात विशिष्ट हिरव्या डहाळ्या. दहा ते वीस सेंमी लांबीच्या या डहाळ्या दरवर्षी गळून पडत असतात आणि पुन्हा नवीन येत राहतात. त्यामुळे जमिनीवर त्यांचा थरावर थर साचून मऊ गालिचा तयार होतो. सुरूच्या झाडांना पाहण्याचे आणखी एक आकर्षण होते. मधु मंगेश कर्णिक यांनी केळवे माहिमचा समुद्रकिनारा असा काही वर्णिलेला आहे, की तो वाचून धावत गेलो. समुद्र किनारा तर सुंदर आणि वेगळा आहेच, तो अधिक सुंदर झाला सुरूच्या बनामुळे. किनाऱ्यावर मी समुद्राकडे तोंड करून असलेले हॉटेल निवडले. हॉटेल आणि समुद्र यात फक्त आणि फक्त सुरूचे बन होते. कहर म्हणजे त्या रात्री निरभ्र आकाश आणि पौर्णिमा होती! त्या रात्री चांदण्यात कोसळलीच ना सुरूची झाडे अंगावर!

सुरूचं झाड वेगळं अन्‌ मोरपंखी वेगळं. मोरपंखीला पौर्वात्य मयुर असंही नाव म.वि.आपट्यांनी दिले आहे. थुजा असंही त्याचं नाव आहे. देवदार, पाईन, ख्रिसमस ट्रीच्या कुळातला हा वृक्ष. याची पाने साधी, सूक्ष्म म्हणण्याइतकी लहान, चपटी आणि हिरवीगार असतात. ती डहाळ्यांना देठाशिवाय जवळजवळ चिकटून येतात. वृक्ष चार ते सहा मीटर उंच जातो. ही एक शंकूधारी वनस्पती आहे. फांद्यांच्या टोकाशी असलेल्या पानांवर कण्यासारखा उंचवटा काहींवर दिसतो. स्त्री-शंकू व पुं-शंकू लहान फांद्यांच्या टोकास एकाच झाडावर येतात. ते एक ते दीड सेंमी आकाराचे असतात.

मोरपंखीला जोडूनच त्याच्या एका चुलत भावाला भेटले पाहिजे. त्याचे नाव ख्रिसमस ट्री. हा सूचिपर्णी वृक्षाचा प्रकार आहे. इंग्रजीत त्यांना म्हणतात, ‘कोनिफर्स’. या वर्गातल्या वृक्षांना बिया येतात; पण फळे येत नाहीत! बिया उघड्या असतात. बियांना धारण करणारी छोटी पाने एकत्र येऊन त्यांचे शंकू किंवा ‘कोन’ झालेले असतात. ख्रिसमस ट्रीचे नाव आहे ऑकॅरिया. हे वृक्ष खूप वर्षे जगतात. ख्रिश्चन धर्मियांचा हा पवित्र मानला गेलेला वृक्ष आहे. नाताळात याच्या प्रतिकृती करून सजावट केलेली अनेक शहरात पाहायाला मिळेल. हा दिसायलाही देखणा आहे, हे या प्रतिकृतींवरून जाणवते.

प्रत्येक ऋतू सुंदर आहे आणि प्रत्येक ऋतूच्या सौंदर्यात वेगळेपण आहे, म्हणून तर ‘सहा ऋतूंचे सहा सोहळे’. हे प्रत्येक महिन्याबद्दलही म्हणता येईल. भगवान श्रीकृष्ण आपले लाडके-दोडके कशाच्या आधारावर जाहीर करतात कुणास ठाऊक. गीतेच्या दहाव्या अध्यायात त्यांनी जाहीर केलंय की, महिन्यांमध्ये मी मार्गशीर्ष आहे (मासांना मार्गशीर्षोऽहम). सध्या तोच चालू आहे का? गीतेच्या दृष्टिकोनातून मार्गशीर्षाचे वेगळे महत्त्व आहे. याच महिन्यामध्ये मोक्षदा एकादशी येते. याच एकादशीच्या दिवशी भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला गीता सांगितली. तसेच हा महिना तपश्चर्या करण्याचा महिना आहे. या महिन्यामध्ये पौर्णिमेला श्री दत्तात्रेयांचा जन्म झालेला आहे. याच महिन्यामध्ये नवीन धान्य येत असल्यामुळे धान्यपूजा होते. हाच सुबत्ता आणि समृद्धीचा महिना आहे. वगैरे.

खवैय्यांसाठी या महिन्यात एक मिष्टान्न योग असतो. या महिन्यात धनुर्मास येतो ना! सूर्य धनू राशीत असतो, त्या काळाला धनुर्मास असे म्हणतात. वास्तविक या काळात श्रद्धावानांनी प्रत्येक दिवशी सूर्योदयापूर्वी देवाला महानैवेद्य करून भोजन करणे अपेक्षित आहे. तेवढे शक्य नसल्यास निदान एक दिवस तरी तसे करावे, असे म्हणतात.
सदाफुलीच्या नावातच तिचे वैशिष्ट्य दडलेले आहे. सदासर्वदा ती फुललेलीच असते. तिचे रंगही अनेक. पांढरा, जांभळा आणि अनेक मिश्र रंग देऊन ती प्रसन्न करते. सदाफुलीची पानं हिरव्या किंवा हिरव्या-पिवळ्या मिश्र रंगांचीदेखील असतात. झाड चिकाळ असल्यामुळे जनावरांचा उपद्रव होत नाही. या चिमुकल्या झाडाला आपल्या बागेत, छोट्याही बागेत स्थान दिले तर, डोळ्यांपुढे सतत एक फूल बाळगल्याचे सुख मिळेल!

शुभ्रतेची मिसाल म्हणून कुंदपुष्पाचे उदाहरण दिले जाते. शारदावंदनातील पहिलीच ओळ आहे, या कुन्देन्दुतुषार हार धवला... सुंदर दंतपंक्तींना कुंदकळ्यांची उपमा देतात. माझ्या बागशाहीत कुंदाला स्थान दिलंय मी! सुगंधही छान येतो आणि कोणतेही नखरे न करता एका कोपऱ्यात राहून मला रंग-गंधाचे सुख देणारी वेल म्हणजे कुंद! गंमत पाहा, सदाफुलीचं नाव कुणी मुलीला ठेवत नाहीत, ‘कुंदा’ ठेवतात. शेवंती शहरातल्या मुलीचं नाव नसेल, पण खेड्यात शेवंताबाई असतात. त्यातही गंमत म्हणजे जितका सुगंध जास्त, तितकी नावे जास्त. शेवंतीला त्यामानाने कमी गंध असतो ना! अलीकडे तर हायब्रीड शेवंतीला नुसतेच रंग असतात. अशात तर शेवंती समारंभातल्या हारांमध्येच जास्त भेटते! शेवंतीचा गंध घेणारी पिढी आता मागे पडली आहे! 

माझ्या मते, डिसेंबर महिन्याचं वैशिष्ट्य दवबिंदूंचं सौंदर्य न्याहाळण्यात आहे. दवबिंदूंच्या सौंदर्यानं अनेकदा अक्षरश: वेडा झालोय मी. वेडे कोण नाही झाले? उर्दूतले सगळे शायर वेडे झाले. त्यांच्या हळुवारपणे गवताच्या पात्यावर अवतीर्ण होण्याचे सगळ्यांना भारी कौतुक! ते कसे, कधी, कुठून येतात हे एक आश्चर्यच आहे. त्यांचे येणे किती अप्रयास असते, हळुवार असते. ते राहिलं बाजूला आणि ‘जोश’ मलिहाबादींना दवबिंदूंच्या तुलनेत आपल्या प्रेयसीच्या चालण्याचंच कौतुक!

    ‘‘नर्मी-ओ-आहिस्तगी से
    पांव रखने की अदा
    सीख ले शबनम के कतरे
    आपकी रफ्तार से’’

दवबिंदूंसाठी किती सुंदर शब्द आहे शबनम! मराठवाड्यात मात्र तुच्छतादर्शनासाठी कोणत्याही  नामाला ‘आड’ लावायची पद्धत आहे. दव या शब्दात वर्णव्यत्यास करून तिथे दवबिंदूला नाव आहे ‘वदाड’! दवासारख्या नाजुक, सुंदर, इवल्या गोष्टीला म्हणतात, ‘काय वदाड पडलंय!’ (हात तुझ्या!) त्यापेक्षा प्रमाण मराठीतला दहिवर हा छान शब्द आहे.

बोरकरांनी दवबिंदूंना ‘अभिलाषांच्या ज्योती’ म्हटलं, ते मला आवडलं. ‘फुलराणी’ या बालकवींच्या परिकथेत रविकर आणि फुलराणीचे जेव्हा लग्न लागते, तेव्हा नवरदेव-नवरीमध्ये दवबिंदूंचा आंतरपाट धरला जातो. बालकवींची एक मोठी कविता ‘दवबिंदू’ म्हणून आहे, ती तर फारच सुंदर आहे. दवबिंदू या एका घटनेवर एका कवितेत इतक्या मोठ्या संख्येने उत्प्रेक्षा करणारे बालकवी हे जगातले एकमेव कवी आहेत.

दवबिंदूंचे विज्ञानही थोडे समजावू घेऊ या. दवबिंदू दोन प्रकारे तयार होतात. एक- तृणपात्याच्या काठांवरील रंध्रातून आलेले आतले पाणी सोडणारे छोटे-छोटे दवबिंदू आणि दुसरे दवबिंदू तयार होतात तृणपात्याच्या मध्यावर बाहेरील पाणी शोषून घेण्याने. दोन्ही प्रक्रियांमध्ये या दवबिंदूंचा अवकाशातील धुलिकणांशी वा मुळाजवळच्या मातीशी मातीशी वरून कुठलाही संपर्क येत नाही. त्यामुळे ते पाणी पराकोटीचे विमल राहते. इतके विमल की खलील जिब्रान आपल्या प्रेयसीला उद्देशून म्हणतो, ‘यू आर अ ड्यू ॲट डॉन, आय ॲम टीअर, अ टीअर!’ अश्रूदेखील दवबिंदूइतका विमल नसतो. तो खारट असतो ना, म्हणून. सुंदर चिमुकल्या दवाच्या थेंबा, तुझ्या इवल्याशा पवित्र पाण्यात धुवू दे मला जीवनाचे मलीन हात!

दवबिंदूसारखी ग्रेट गोष्ट पृथ्वीतलावर नाही हो, म्हणून तर रवींद्रनाथ म्हणतात, ‘मी जगभर हिंडून आलो आणि मला त्याचा अहंकार झाला की मी सर्वकाही पाहिलंय. पण एके दिवशी माझ्या असं लक्षात आलं की, माझ्या अंगणातील झाडांच्या पानांवर जे दवबिंदू पडले आहेत, त्यांच्यात सारे आकाश सामावले आहे आणि त्या दिवशी माझा अहंकार नष्ट झाला.

दवबिंदूच्या प्रेमात मी वाहवत तर जात नाही ना? कालिदासाला जवळ करून थांबूत हं! त्याची एक उपमा आहे ‘कुंदमन्तस्तुषार’. कुंद आपले याच महिन्याचे फूल आहे ना! कुंदमन्तस्तुषार म्हणजे दवाचे तुषार आत अडकलेले कुंदाचे फूल... गर्भवती शकुंतला कण्वमुनींच्या सूचनेवरून दुष्यंताकडे आलेली आहे. दुष्यंतापासून तिला गर्भ राहिला असला, तरी दुर्वासांच्या शापामुळे तो ते विसरून गेला आहे. आता ती तर समोर उभी आहे, अतिशय सुंदर. जवळ घ्यावे वाटावे अशी मोहिनी. पण एक अडचण आहे. तिच्या उदरात कोवळ्या दवबिंदूसारखा असा गर्भ आहे. हा गर्भ त्या मीलनाच्या आड येत आहे. कसा? एखादी कुंदकळी उमलावी, तिचा गंध सर्वत्र पसरावा, रसिल्या भ्रमराला ते निमंत्रण मिळावे, तो पर्युत्सुक व्हावा, मधुपानासाठी पुढे सरसावा, तोच त्याला दिसावे की मधुबिंदूची वाट नेमकी अडवून त्या कळीच्या अंत:कोशात दवबिंदू विसावला आहे! इतका सुंदर अर्थ ‘कुन्दमन्तस्तुषार’ या एका उपमेतून कालिदास सुचवितो. आहे की नाही ग्रेट?

दवबिंदूंची भेट घडविणाऱ्या हेमंताची सुरुवात होते नोव्हेंबराच्या शेवटी-शेवटी. शरदात सुरू झालेला थंडीचा कडाका हेमंतात वाढतो खरा. पण दुर्गाबाई म्हणतात त्याप्रमाणे, एकदा फुफ्फुसे ताज्या हवेनं भरली की गात्रागात्रांतून एक प्रकारची शांती वाहू लागते. टागोरांनीही हेमंताचा शांतीशी असाच संबंध जोडला आहे. त्यांच्या कवितेची ओळच आहे, ‘हेमंतेर शांती व्याप्त चराचरे’ हिवाळ्यात खुराकाचे लाडू खाणे ही आमच्या घरातली पिढ्यान्‌ पिढ्या चालत आलेली परंपरा आहे आणि या एकाच बाबतीत मी अतिशय परंपरावादी आहे. हेमंतात डिंकाचे लाडू, मेथ्यांचे लाडू आणि उडदाचे लाडू प्रत्येकी एकवीस दिवस खायचे. डिंकाचे लाडू इतके श्रीमंत आणि महाग असतात, की बाळंतिणीसाठी केले, तर मुलांना प्रसाद वाटल्यासारखे चिमूटभर देतात. आपण बाळंतीण होऊ शकत नाही, याचे वैषम्य पुरुषांनी हिवाळ्यात डिंकाचे  लाडू खाऊन कमी करायचे!

डिंकाच्या लाडूत खारीक, खोबरं, खसखस, बदाम, काजू, बिब्ब्याच्या बियातल्या गोडंब्या, असं काय काय असतं. सगळं पोटात जातं, पण दाढेत आणि हिरड्यांवर कच्चा डिंक मात्र राहतो. मेथ्यांचे लाडू त्याच्या औषधी गुणांसाठी सहन करायचे. सगळ्यात स्वादिष्ट उडदाचे लाडू असत. मार्गशीर्ष आणि पौष महिना एकत्र केला तर हे तीन प्रकारचे लाडू प्रत्येकी एकवीस दिवस पुरतात.

हिवाळ्यात पडणाऱ्या थंडीबद्दले जे तक्रार करतात, त्यांच्या अरसिकतेची आणि अज्ञानाची कीव करावी वाटते. सगळे ऋतू तीव्रच असायला हवेत. उन्हाळ्यात खूप ऊन हे पडायला हवे, त्याशिवाय समुद्राच्या पाण्याची वाफ होऊन भरपूर पाऊस पडणार कसा? पावसाळ्यात भरपूर पाऊस झाल्याशिवाय ‘आता जीवनमय संसार’ होणारच नाही. हिवाळ्यात खूप थंडी ही पडायलाच हवी. त्याशिवाय भरपूर आंबे येणारच नाहीत. गव्हाचे पीक चांगले येणार नाही. भरपूर थंडी पडली नाही, तर झाडांची साल कशी तडकेल? झाडाचा बुंधा साल न तकडता मोठा होणार कसा? सेलूच्या माझ्या शेवटच्या घरट्यात सागवानाची चार मोठी झाडे होती. मी रोज त्यांना म्हणायचो, तुमचा बुंधा खूप मोठा वाढू द्या अन्‌ मला प्रत्येकी पन्नास हजार रुपये आणून द्या.

लहान मुलांचे गोबरे गाल थंडीमुळे उलले, की ती फारच गोड दिसतात. आमच्या लहानपणी उलणाऱ्या त्वचेचे कोण कौतुक चालायचे! आमसूल नावाचा पांढरा पदार्थ गरम केला, की त्याचे आमसूल तेल होते. उललेल्या जागी ते लावायचे. पूर्वी रंगीत आणि सुगंधी व्हॅसलिन होते, त्याची जागा आता पांढऱ्या पेट्रोलियम जेलीने घेतली आहे. श्रीमंतांना तर खूप प्रकारचे क्रीम्स उपलब्ध आहेत. दिवाळीत दोन-तीन दिवस तिळाचे उटणे लावून लेवाळ्या काढल्या, की त्वचा छान व्हायची. त्यासाठी मातीत खेळणेही महत्त्वाचे असते. हेमंतातले दिवस रक्त येईपर्यंत पाय उलण्याचे, ओठ उलण्याचे असत. मजा येई!

रामायणात ‘इष्ट ऋतू’ म्हणून हेमंताला गौरविले आहे. त्याचे हे रूप पाहण्यासाठी शेतात जायला हवे. आकाश निळे तो हरी अन्‌ क्षेत्र साळीचे राधा न्याहाळण्याचे हे दिवस. साळीच्या डोलणाऱ्या पिकातून जेव्हा वारा उधळत जातो, तेव्हा त्याचे ते सोनेरी अंग कसले सुंदर दिसते. केशवनं छानच लिहिलंय, ‘शेंगांच्या भारानं दोन्ही अंगी झुकलेल्या तुरी जणू आपल्या जन्मदात्या मातेचं दर्शन घेत आहेत. या तुरी आता कापायला आल्या आहेत.’ तुरीची कापणी, पेटे बांधणी आणि गोळा करणी संपली की तुरीचा सरवा पाहायला बायका सांगितल्या जातात. सरवा हा शब्द सगळ्या ग्रामीण महाराष्ट्राला माहीत आहे. कोरडवाहू जमिनीत भूईमूग, हरभरा, गहू, तूर, ज्वारी असलं पीक निघाल्यानंतर काही शेंगा, काही कणसं, काही ओंब्या, काही घाटे जमिनीत राहतात, ते वेचणं म्हणजे सरवा वेचणं. डिसेंबरात तुरीचा सरवा वेचायचा असतो. तूर कापणारांना घाई आहे. त्यांच्या कामाच्या घाईत कुठे कुठे तुरीची लहान झाडं सुटतात. अशा सुटलेल्या झाडांच्या शेंगा कापता-कापता हातातून विसरलेल्या फांद्या, तूर खळ्यात झोडपून झाल्यावर पेट्यांची विसरलेली आळपणं (म्हणजे पेटी बांधण्यासाठी वापरला जाणार त्याच पिकाचा भाग), त्यांना राहिलेल्या तुरीच्या शेंगा असा तुरीचा सरवा बायकांना मिळायचा. खळ्याभोवती टाकलेल्या तुरीच्या पेट्यांच्या जागेवर गळालेल्या शेंगा मिळायच्या. वर्षभराच्या डाळीचा प्रश्न सुटायचा.

असं हे सूर्याभोवती फिरणारं ऋतुचक्र. आपण पशू-पक्ष्यांऐवजी माणसांना या चक्रात फिरवले. विशेष करून मराठी माणसाला. मराठी माणूस म्हटले की, त्याची संस्कृती, सणवार, वने-उपवने-कृषी, खाणे-पिणे सगळेच आले. त्याची कोकण, खान्देश, विदर्भ, मराठवाडा अशी प्रादेशिक वैशिष्ट्येही आली. ऋतूचक्राबरोबर जसे जगत गेलो, तसेच लिहिणेही क्रमप्राप्त होते. ‘मी’ला मधे-मधे फार लुडबूड करू दिले नाही. पण लिहिणारा जर माणूस असेल तर त्याचा समाज, त्याचे मित्र, त्याची संस्कृती, त्याचे वाचन त्याच्या लिहिण्यात डोकावणारच. हूं जैसा तुमने कर डाला! एक मात्र खरे, अखेर माझा प्रत्येक ऋतू हा आनंदऋतूच होता, आहे आणि असेल.

(‘नवे ऋतुचक्र’ या सदराचे लवकरच पुस्तक प्रकाशित होत आहे. संपादक)

Tags: बोरकर हेमंत ऋतू विश्वास वसेकर नवे ऋतुचक्र डिसेंबर हेमंत weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके