डिजिटल अर्काईव्ह (2009-2020)

आता म्हणजे फेब्रुवारी महिन्यातच आपल्याला जगातलं सर्वांत सुंदर फूल पाहायला जायाचं आहे. होय, जगातलं ते सर्वांत सुंदर फुलं आहे याबद्दल जगभरातल्या नव्वद टक्के निसर्गप्रेमींचं आणि वनस्पतीशास्त्रज्ञांचं एकमत आहे. जसं चित्रांतल्या लिओनार्दो द विंचीतल्या मोनालिसाबद्दल किंवा वास्तुकलेतल्या ताजमहालबद्दल पानंच्या पानं भरून लिहूनही त्यांचं सौंदर्य शब्दातीत राहिलं आहे, तसं ‘ॲम्हर्शिया’ या फुलाबद्दल मराठीत आणि जगभरात सर्वांनी भरभरून लिहूनही या फुलाकडे पाहताना आपण मंत्रमुग्ध होतो. जेते तीन-चार मीटर उंच असणारा हा वृक्ष ब्रह्मदेशातून भारतात आला. महाराष्ट्रात या वृक्षाची एकूण संख्या दहा-बारापेक्षा कमीच निघेल. ॲम्हर्शिया चांगला वाढण्यासाठी हवामान आणि जमिनीबद्दलच्या अटी फार आहेत. त्याला फार कडक ऊन चालत नाही, तसेच जमीन चांगली म्हणजे ‘लोमी सॉईल’ हवी, मराठीच्या लेखकांनी आणि शास्त्रज्ञांनी टमरू त्याचे नामकरण ‘उर्वशी’ असे केले आहे.

फेब्रुवारी महिन्यात महाराष्ट्रात सर्वत्र बोरी पिकतात. त्यामुळे त्यांच्या सेवनासाठी कोल्होबा महाशयांना निमंत्रण द्यायला हरकत नाही. अलीकडे बोरांचे पीक वगैरे कुणी फळबागावाले शेतकरी घेत असतील, तर माहीत नाही. परंतु पोरांचे आणि विशेषतः पोरींचे नाते असते (अर्थात खेड्यातल्या हं) ते, कुणी मुद्दाम लावलेल्या आणि धुऱ्यावर उगवलेल्या रानबोरांशी! जे बोर मुळीच आंबट नाही, ते कुळाला कलंक आहे. खारकी बोरात हमखास अळी निघते. आंबट नसलेले खारकी बोर एरवीच आवडत नाही, परंतु त्यातील अळी पाहिल्यानंतर तक्षक नावाचा नाग याच बोरात अळी झाला असेल आणि तो परीक्षिताला चावला असेल, यात शंका उरत नाही. शहरात जन्मलेल्यांना बोरं खाऊन माहिती असतील, पण त्याचे झाड कदाचित ओळखू येणार नाही. हा छोटा पण घातक काटेरी वृक्ष असतो. बोराच्या व काटेकोरांटीच्या फांदीला आणि मांजरीच्या पिलाला कितीही हळुवार स्पर्श करा- ते कडाडून चावल्याखेरीज राहणार नाही. बोराचा एक काटा सरळ, तर त्याच्या जोडीला असणारा आणखी एक वेडावाकडा असतो. टेढी उंगलीसे घी नहीं, बल्की खून निकलता है। तेव्हा जरा जपून आणि जरा लांबून...

आपल्या गावठी बोरांना एक खास गंध असतो- आंबूस- गोड आणि दात लावताच अंगावर गोड शहारा आणणारा स्वाद असतो. माफक रस, माफक गर आणि तोंडात सुखानं घोळविण्यासाठी कठीण आठोळी किंचित कोट होतात. एवढ्या सुखद संवेदना एक समय वच्छेदेकरून आणखी कोणतं फळ खाताना होत असतील?’ संक्रातीच्या करीपासून पुढे रथ सप्तमीपर्यंत लहान मुलांसाठी बुडबुड गाडगं ऊर्फ बोरन्हाण नावाचा उत्सव चालतो. बाळाच्या वयाच्या तिसऱ्या वर्षापर्यंत त्याला प्रामुख्यानं बोरं आणि त्या काळात येणारे पेरू इत्यादी फळांचे स्नान घालतात आणि त्याच्या वयोगटातली मंडळी हाती लागतील तेवढी फळं जिंकून घेतात. बोर फळांचा आकार लहान असल्याने बाळाला फारसा त्रास न होता, सर्वांनाच मजा येते. मराठवाड्यात ज्वारीचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. मंठा नावाचे तालुक्याचे गाव आहे. त्याचे नाव ज्वारीच्या एका प्रकारावरून पडले असावे. मला आठवते- माझ्या लहानपणी आमच्या घरी गव्हाची पोळी फक्त सणावाराला किंवा कोणी पाहुणा आला तरच होत असे. 

फेब्रुवारीत ज्वारीचे पीक काढले जाते, विळ्याने कापून. खाली उरते त्याला ‘धसकट’ म्हणतात. ते पायाला फार जखमा करायचे. ज्वारी काढल्यानंतर शेतात फक्त करडीचे पाटे दिसत. त्याच्या लाल-पिवळ्या शोभिवंत फुलांकडे नीट पाहता येते. खळे-दळे आटोपल्यानंतर रानात हरभरा, करडी, लाख, जवस फक्त बाकी असे. काढलेल्या पिकांपैकी चुकून काही वेचायचे राही. त्याला ‘सरवा’ म्हणत. जिरायती पिकं संपून जात, केवळ बागायती शेती तेवढी उरत असे. शेतातून आणलेले धान्य कणगीत साठवून खेड्यातील माणसं जत्रा-यात्रा करायला, थोडी मौजमजा करायला निवांत होत. लोणीची, गाणगापूरची, औंढा नागनाथची यात्रा- उदाहरणार्थ... फेबु्रवारी हा शिशिर आणि वसंताच्या मध्यावर येतो. काही झाडांची पानगळ शिगेला पोहोचलेली असते. बांबू, कांचन, आपटा, साग यांची पानगळ पाहवत नाही. झाडांचे नुसते सांगाडे उभे असतात. चाफ्याचे तर एकूणएक पान गळालेले असते. पहिल्यांदा घरात, बागेत मी लावलेला चाफा फेबु्रवारीच्या एका सकाळी पाहतो तर- काल होती ती सगळी दहा-पंधरा पानं एकाच वेळी कुणी तरी दुष्टाने तोडून शिस्तीत खाली ठेवल्यासारखी पाहून धक्काच बसला. तसे नव्हते, शेजाऱ्यावर उगीच संशय घेतला, असे चाफ्याच्या पानगळीचे ज्ञान झाल्यावर वाटले. 

काही झाडांच्या बाबतीत शिशिर आणि वसंत एवढे चिकटून असतात की, पानगळीच्या दुसऱ्या क्षणी ते वसंताच्या स्वागताची तयारी करतात, असे वाटते. काही झाडे तर फुलण्यासाठी एवढी अधीर झालेली असतात की, नवी पालवी-बिलवी येण्याचं नंतर पाहू म्हणत लगेचच फुलायलाही लागतात. पळस, सावर आणि चाफाच पहा ना उदाहरणार्थ. निष्पर्णांचे हे पुष्पवैभव मोठे देखणे आणि आश्वासक असते. तामण हा महाराष्ट्राचा राजवृक्ष. वसंताची चाहूल लागली की, त्याला नवी पालवी फुटू लागते. बरोबरच किंवा आगे-मागे फुलांचा बहरही सुरू होतो. फुलांचा रंग जांभळा (मॉव्ह) असतो. कोकणात त्याचे प्रमाण जास्त असले तरी सर्वत्र हा दिसतो. त्याची पाने मेंदीसारखी, पण थोडी मोठी असतात. तामणचे वनस्पतीशास्त्रीय नाव लॅगरस्ट्रोमिया रेगिनी असं आहे. पूर्णोन्मीलित फूल सहा ते सात सेंमी व्यासाचे असते. झालरीसारखी दुड असलेल्या चुणीदार पाकळ्या हे खास तामणचे वैशिष्ट्य आहे. 

महाराष्ट्राचा राजवृक्ष असणारा तामण प्रत्येक गावात आवर्जून लावला पाहिजे. चारोळी या कविताप्रकारचा आणि चारोळीच्या झाडाचा वा बियांचा अर्थाअर्थी संबंध नाही. कवितेत चार ओळींची म्हणून चारोळी. कोजागिरीच्या आटवलेल्या दुधाला किंवा सोनपापडी आणि किती तरी मिठायांना स्वाद आणणारी चारोळी आपण आस्वादली जरूर आहे. तिचे झाड मी प्रथम औंढा नागनाथ इथे पाहिले. मोहरलेला असताना कधी आंब्यासारखा वाटणारा, तर पानांमुळे मोहासारखा भासणारा हा एक मध्यम आकाराचा वृक्ष आहे. फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात तो फुलतो. एप्रिल आणि मेमध्ये फळे लागतात. प्रत्येक फळात एकच बी म्हणजे चारोळी असते. लहानपणापासून खोकला आणि सर्दीचा विलक्षण त्रास असल्यामुळे चिंच माझी नावडती आहे. माझ्यासमोर कोणी चिंचा (किंवा कैरी) कडाकडा खात असेल तरी ते नुसते पाहून माझे टॉन्सिल्स दुखतात. चिंच आवडत नसली तरी चिंचेचे झाड, तिचा पाला आणि चिगूर मला आवडतात. हे झाड दीर्घायुषी असते. खूप जुन्या आणि प्रचंड वाढलेल्या यांच्या बुंध्यामध्ये अनेक लहान-मोठे प्राणी त्यांचा बुंधा गुहेसारखा कोरून आपलं घर बनवितात. शिशिरात सांगाडा झालेल्या या झाडाला फेब्रुवारीत कोवळी पालवी फुटते. ही पाने खायला खूप छान असतात. चैत्रात बहुसंख्य झाडांना पालवी फुटते, पण चैत्रपालवी हा शब्द चिंचेच्या सुंदर पानांनाच लागू पडतो. हे झाड इतके महत्त्वाचे आहे की, मे- जूनमध्ये आपण पुन्हा त्याला भेटायला जाणार आहोत. या महिन्यात त्याची फक्त पाने पाहून (आणि खाऊन) घ्यायची. 

अजान या वृक्षाची ओळख अनेक जण ‘पिंपळ’ अशीच करून घेतात. कारण आळंदीच्या मंदिरातला पिंपळ ‘सोन्याचा पिंपळ’ म्हणून प्रसिध्द आहे. तिथे श्री ज्ञानेश्वरांच्या मंदिराला चिकटून एका जाळीत अजान वृक्ष जतन केलेला आहे, तो आळंदीला पुन्हा जाल तेव्हा जरूर पाहावा. या महिन्यात गेलात तर त्याच्या हिरव्याकंच पानांमधून डोकावणारे शुभ्र फुलांचे तुरे तुम्हाला दिसतील. पाच त्रिकोणी पाकळ्यांच्या अतिनाजूक फुलांधून एक सूक्ष्म पुंकेसर डोकावताना दिसेल. या वृक्षाचे वनस्पतिशास्त्रीय नाव आहे एहरेशिया लेविस. लेविस म्हणजे गुळगुळीत पानांचा. भाजी, वरण किंवा अन्य कशात शेवग्याच्या शेंगा खाण्याआधी लहानपणीच य. गो. जोशींची ‘शेवग्याच्या शेंगा’ ही कथा वाचून झाली होती आणि थोडंबहुत रडूनही झालं होतं. शहरातल्या माणसांना हे झाड शोधूनच पाहावं लागेल. त्याची सुंदर लागलेली फुलं पाहिल्यानंतर श्रमपरिहार व्हावा इतकं हे झाडही सुंदर आहे. फेबु्रवारीत त्याला फुलं यायला लागतात. मंद गोडसर सुगंध असलेली, फांद्यांना लागलेली ऑफ व्हाईट रंगाची फुलं भाजीच्यासुध्दा कामी येतात. शेंगांच्या लांबलचक आकारामुळं त्याचं इंग्रजी नाव ड्रमस्टिक ट्री (ढोल बडविण्याच्या काड्या) असं आहे. 

आपल्या आहारात दुधापेक्षा चौपट जास्त कॅल्शियम देणारा, सहा-सात संत्र्यांनी मिळून एकत्रित होईल एवढं ‘क’ जीवनसत्त्व देणारा; आणखी तीन केळ्यांध्ये असते तेवढे पोटॅशियम देणारा शेवगा एकदा मुद्दाम पाहायला काय हरकत आहे? फेबु्रवारीत भोकराच्या झाडाला फुलं येतात. भोकराचं लोणचं करतात. महाधावडा या दुर्मिळ झाडाला फेब्रुवारीत आलेला बहर मुद्दाम पाहावा एवढा सुंदर असतो. त्याच्या सौंदर्याचं मर्म आहे, त्या फुलांच्या संख्येमध्ये. महाजनसर लिहितात, ‘शेकडो-हजारोच नव्हेत, तर दशसहस्रावधी पिवळसर गोंड्यांनी लगडल्यामुळे त्याच्या आणखीनच खाली झुकलेला फांद्या अप्रतिम सुंदर दिसतात. एक अनोखा मंद सुवास आसमंतात दरवळलेला जाणवतो, विशेषत सकाळच्या वेळी.’ या सुंदर वृक्षाचं वनस्पतीशास्त्रीय नाव आहे- ॲनोगिसस्‌ ॲक्युमिनाटा. शमी या वृक्षाची आठवण आपल्याला दसऱ्याच्या वेळी होते; पण संपूर्ण झाडाची नाही, त्याच्या फक्त पानांची. तिथेही आपट्यासारखीच आपली दिशाभूल होते. बाभळीसारखाच शमीचा वृक्ष उंच व कणखर असतो. त्याच्या शाखांवर बारीकसे काटे असतात. 

फेब्रुवारी अखेरीस फुले यायला लागतात. ते पानांच्या बगलांमध्ये येतात. किंचित गुलाबी आणि पिवळसर अशी ती असतात. शमीला बाभळीसारख्याच शेंगा येतात, शेळ्यांना त्या खायला आवडतात. अशा प्रकारे बाभळीशी साम्य असणारे हे झाड आहे. अज्ञातवासात जाताना याच वृक्षावर पांडवांनी आपली शस्त्रे लपवून ठेवली होती. राजस्थानात याला खेजडी असे नाव आहे. 1730 मध्ये जोधपूरच्या महाराजांनी राजवाड्याच्या बांधकामासाठी झाडे तोडून आणण्याची आज्ञा केली. खेजरली नावाच्या गावच्या लोकांनी ‘चिपको’ आंदोलन करून ही झाडे वाचवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा सैनिकांनी झाडांना मिठ्या मारणाऱ्या 363 गाववाल्यांना ठार मारले. राजाला हे कळताच त्याने वृक्षतोडीची आज्ञा मागे घेतली. लोकांनी बलिदान करून शमीचे वृक्ष वाचवले- ही घटना घडली त्या गावाचे नाव होते ‘खेजरली’. तेव्हापासून राजस्थानक च्छ- हरियानात या झाडाला खेजडी नाव पडले असावे. याचे वनस्पतीशास्त्रीय नाव आहे प्रोसोपिस सिनेरारिया. शतकानुशतके दसऱ्याला याचे सोने लुटल्यामुळे महाराष्ट्रात शमीचा वृक्ष दुर्मिळ झाला असेल का? लहानपणी माझ्या शेतात खणल्या गेलेल्या विहिरीचे चार महिने चाललेले खोदकाम मी प्रत्येक दिवशी बारकाईने पाहिले होते. विहिरीला पाणी लागले तरी साठा भरपूर असावा, म्हणून अजून खोलवर खंदतच होते. ते पूर्ण झाल्यावर तिच्यावर मोट बसवण्यासाठी साधारणतः वीसपंचवीस मीटर लांबीचे मजबूत लाकूड ‘आडू’ म्हणून टाकणे आवश्यक होते. तेव्हा ज्या झाडाने ते आम्हाला दिले, त्याचे लहानपणी ऐकलेले नाव अजून माझ्या लक्षात आहे. त्याचे ग्रांथिक किंवा प्रमाण मराठीत नाव आहे- शिसवी, डालनर्जिया शिसू. याचे लाकूड सागवानच्या खालोखाल अतिशय मजबूत आणि टिकाऊ असते. प्रचंड वजनदार असते. सुतार काम करणाराचं अत्यंत आवडतं असं हे ‘मटेरियल’ आहे.

शिसवीचा वृक्ष चांगल्या वातावरणात वीस ते पंचवीस मीटर उंच वाढू शकतो. अशा वाढलेल्या वृक्षाच्या बुंध्याचा व्यास ही एक मीटरपर्यंत आढळू शकेल. वसंत ॠतू हा त्याची पालवी फुटण्याचा ॠतू. नवपालवीमुळे होणारे या वृक्षाचे दर्शन घेण्यासाठी आता मोठी जंगले पालथी घालावी लागतील. फेब्रुवारीत येणारी त्याची फुले मात्र प्रयत्नपूर्वक तपासावी लागतील. कारण ती फारच लहान, अनाकर्षक असून भरगच्च पानांध्ये ती कदाचित दिसणारही नाहीत. या महान वृक्षाचं वनस्पतीशास्त्रीय नाव आहे- डालबर्जिया सिसू. फेब्रुवारी महिन्यात फुलून येणाऱ्या वेली आवर्जून पाहाव्या लागतात. ताम्रवेल नावाचा महावेल (वनस्पतीशास्त्रीय नाव combretum coccinea ) तसा हिवाळ्याच्या अखेरपासून फुलायला लागतो. फेब्रुवारीत त्याच्या फुलण्याचा बहर असतो. लक्ष वेधून घेणारे लालभडक, आकर्षक फुलांचे लांबट, घट्ट कणसासारखे फुलोरे फांद्यांच्या टोकाला येत राहतात. 

या फुलोऱ्यांत असंख्य छोटी-छोटी सुंदर फुले असतात. हा विदेशी महावेल असून त्याचे मूळ मादागास्कर आहे. ताम्रवेलाच्या प्रजातीतलाच पिळूक नावाचा वेल आहे. खूप वर्षे आर्युान असणारा हा महावेल सह्याद्रीच्या कुशीमध्ये सर्वत्र सापडेल. याच्या फांद्या खूप पिळे देऊन आधारावर चढलेल्या दिसतात, म्हणून मराठीत याचे नाव पिळूक पडले असावे. त त्याचा बहर परमोत्कर्षाला पोहोचलेला असतो. जंगलातून हिंडताना मोहरलेल्या पिळूकचा सुगंध आधी दरवळतो आणि मग या सुंदर वासाचा मागोवा घेत या योजनगंधेचा आपण शोध घेतो! पुण्याच्या एम्प्रेस गार्डनमध्ये आवर्जून पाहावा आणि आपल्या बागेत आणून लावावा, असा हा सुंदर महावेल आहे. पांढऱ्या फुला-फळांचे गुच्छ लगडलेले रानघेवड्याचे वेल सह्याद्री परिसरातील रानात याच काळात पाहायला मिळतील. याच परिसरातील जंगलात, तसेच माथेरानमध्ये दिसणारा महावेल म्हणजे ‘लोखंडी’. त्याचप्रमाणे कर्नाळा पानशेत, फणसाड, आंबेवाडी, पन्हाळा आदी भागांतील जंगलांत फेबु्रवारीत फुलणारा वाकेरी (वनस्पतीशास्त्रीय नाव- मौलावा स्पायकाटा) हाही तसा दुर्मिळ; पण नजरेत आला, तर लाल फुलांच्या मंजिऱ्यांनी लक्ष वेधणारा महावेल आहे. मोगऱ्याचे फुलझाड कोणाला माहिती नाही? मुख्य मोगऱ्याला बहर तीव्र उन्हाळ्यात येतो, परंतु मोगऱ्याचे उपप्रकार खूप आहेत. दूधमोगरा आणि हजारी मोगरा यांना फेबु्रवारीत बहर येतो. आलेली शुभ्र पांढरी फुलं कित्येक दिवस झाडावर अम्लान टिकून राहतात. त्यामुळे बागेची शोभा वाढते, एवढं खरं. पण मुख्य मोगऱ्यासारखा घमघमणारा सुगंध या फुलांना नसतो. हजारी मोगऱ्याची फुले एकेरी असतात. मुंग्राच्या फुलांच्या पाकळ्यांची बरीच मंडले (वेढे) असतात आणि त्या गोलसर कळ्यांचा व्यास सुमारे 2.50 सें.मी. असतो. 

बटमोगरा या प्रकारची फुलं बटणासारखी घट्ट विणेची असतात. त्याच्या पाकळ्या क्वचितच उमलतात. कोशिंब आणि कुसुंभ यांतील उच्चार साम्यामुळे ओळखण्यात गोंधळ होऊ शकतो. कोशिंब हा सुमारे पंधरा मीटर वाढणारा वृक्ष असून कुसुंभ हे अर्धा ते जास्तीत जास्त एक मीटर वाढू शकणारे झुडूप आहे. कोशिंब हा रानात आढळणारा वृक्ष असून त्याच्या खोडाची साल करड्या रंगाची असते. फुलांचा रंग पांढरा किंवा पिवळसर असतो. कोशिंबाचे फळ बोराएवढे, आंबट-गोड असते. कोशिबाच्या वृक्षावर लाखेचे किडे चांगल्या प्रकारे पोसतात. कुसुंभ म्हणजे आपली करडई. माझी अत्यंत आवडती पालेभाजी. घोळणा करून कच्ची पानं खायलासुध्दा आवडते. फुले मोठ्या झेंडूच्या फुलाएवढी असतात. करडईचं (गोडं) तेल तर विशिष्ट प्रकारे घरी केलं, तर फारच स्वादिष्ट लागतं. लहानपणी मी नुसत्या तेलासोबतही भाकरी खायचो. अर्थात, करडई भरडून पाण्यात उकळायची आणि त्यावरचा तवंग म्हणजे हे आरडीचे तेल. करडीच्या घाण्यातून काढलेल्या तेलाची शहरात मिळणाऱ्या तेलाला नखाचीही सर नसते. करडीचं पेंड बैलांसाठी पौष्टिक खाद्य मानले जाते. कालिदासाने आपल्या ‘ॠतुसंहारात’ याच्या रंगाचे बहारदार वर्णन केले आहे. कधी काळी त्याच्या फुलांपासून केलेल्या रंगात वस्त्रे रंगवत असत. ‘आपुला ठावो न सांडिता’ प्रे कसे करावे; तर ज्ञानेश्वर म्हणतात, कुमुदिनीसारखे. यात कुमुदिनी प्रेयसी आहे, तर चंद्र प्रियकर. कुमुदिनी म्हणजे कुठल्याही अर्थाने ‘कमळ’ नाही. कुमुदिनी म्हणजे वॉटर लिली.

फेब्रुवारीत जलाशयात ती हमखास फुललेली दिसेल. लाल-गुलाबी, पांढरीशुभ्र, पिवळी आणि निळसर जांभळी. विविध रंगांत बहरलेली कुमुदिनी भले कमळ नसेल, पण फुलं प्रमुदिती करणारी आहेत. कोकणात अनेक देवळांच्या बाहेर ‘कमळ’ समजून ती विकायला ठेवलेली असतात. कुमुदिनी वेगळी तशी कुमुदही वेगळी. कुमुद हिवाळ्यात फुलणारी, तर कुमुदिनी फेब्रुवारीत फुलणारी आहे. श्री ज्ञानेश्वरांना हे सगळे बारकाईने माहिती होते. त्यांचे निसर्गभान चकित करणारे आहे. आयुर्वेदाच्या अभ्यासकांचे असे म्हणणे असते की, आपला सह्याद्री पर्वत म्हणजे औषधी वनस्पतींचा प्रचंड मोठा कोशच आहे. फेबु्रवारीत तिथे हमखास सापडणारे फूल म्हणजे धायटीचे फूल. धायटीचे शास्त्रीय नाव वुडफोर्डिया फ्लोरिबंडा असून सुमारे 20 सें.मी. उंचीचे हे झुडूप सह्याद्रीसह महाबळेश्वर, कोकण, कारवार या भागात आढळते. फुले असंख्य, लहान, गर्द शेंदरी रंगाची असून फुलांपासून लाल रंग मिळतो; तो ‘आसवा’त घालतात. त्यामुळे आसवांना लाल रंग प्राप्त होतो. फुलांत कषाय आम्ले असतात, त्यांतून तांबडे पिवळे रंगद्रव्य निघते. फुलांचे चूर्ण व्रणरोधक म्हणून वापरतात. वाळलेल्या फुलांचा उपयोग रक्ती आव, अतिसार आणि अनार्तव या विकारांवर औषध म्हणून करतात. 

धायटीची फुलं म्हणजे इंचभर लांबीची केशरी रंगाची जणू नळीच असते. त्याच्यामध्ये निसर्गाने साखरेसारखा गोडवा भरलेला असतो. आयुर्वेदातील पातळ औषधांना ‘आरिष्ट’ आणि ‘आसव’ असा शेवट असणारी नावं असतात ना, त्यांत ही धायटीची फुलं मोठ्या प्रमाणात वापरतात. फुलपाखरांचा एक चांगला कोश मराठीत तयार होत असल्याचे वाचले. विलास बरडेंचं नावही त्यात होतं. काळ्या रंगाच्या ‘कॉन क्रो‘ या फुलपाखराचे छायाचित्रही त्यात होतं. हे फुलपाखरू सह्याद्री परिसरात आढळणाऱ्या घागरीच्या फुलांचं परागसिंचन करतं. पिवळ्या रंगाचं हे फुलं आकारानं वैशिष्ट्यपूर्ण असतं. दोन छोट्या पाकळ्या आणि तिसऱ्या पाकळीनं पक्ष्याच्या चोचीचा आकार धारण केलेला. त्यात असलेलं अल्कलाईड कॉन क्रोसारख्या फुलपाखराला आकर्षित करतं. विलास बरडेंच्या फुलपाखरू कोशात घागरीचे वनस्पतीशास्त्रीय नाव मिळेल, अशी अपेक्षा आहे. घागरी हे बोलीभाषेतलं नाव आहे. पिवळा टॅबुबिया ऊर्फ गोल्डन बेल नावाचे झाड आपल्याकडे बागांमध्ये मोठ्या प्रमाणात लावलेले दिसते. डिसेंबर-जानेवारीत शिशिराच्या कडाक्यात निष्पर्ण झालेली ही झाडे फेब्रुवारीमध्ये बेसुमार बहरतात. पिवळ्याधम्म सुवर्णकांतीच्या फुलांनी हे झाड बहरते, तेव्हा त्याच्यावर नुसती फुलेच फुले असतात. त्याच्याविषयी ‘बहर’ पुस्तकात डॉ. श्रीश. क्षीरसागर भरभरून लिहिताना म्हणतात- पिवळ्याधमक फुलांनी अक्षरशः निथळणारं झाड नजरबंदी करून सोडतं. फुलं 4 ते 6 सें.मी. आकाराची, नरसाळ्यासारखी, पाच तलम-नाजूक चमकील्या पाकळ्यांची! 

निष्पर्ण झाडावर येणारा पहिला बहर थोडा रोडावला की, नवी पालवी फुटायला सुरुवात होते आणि पालवी आल्यावर पुन्हा एकदा धाकला बहर येतो. हा वृक्ष अगदी अलीकडे म्हणजे स्वातंत्र्योत्तर काळात आपल्या देशात आणला गेला. गोल्डन बेल या इंग्रजी नावाने प्रसिध्द असलेला हा पिवळ्या फुलांचा-टॅबुबिया अर्जेंशिया आणि दुसरा गुलाबी टॅबुनिया म्हणजे टॅबुनिया रोझिया या दोन्ही सुंदर रंगांच्या जाती स्वतंत्र भारतात मोठ्या प्रमाणात लावण्यात आल्या. दोन्हींना एकाच काळात- म्हणजे फेबु्रवारी महिन्यात फुले यायला लागतात. दोन्हींचे कुल आहे बिग्नोनिएसी. नुसतं शोधायला लागा- चटकन ओळखू येईल आणि पटकन सापडेलही! 

आता म्हणजे फेब्रुवारी महिन्यातच आपल्याला जगातलं सर्वांत सुंदर फूल पाहायला जायाचं आहे. होय, जगातलं ते सर्वांत सुंदर फुलं आहे याबद्दल जगभरातल्या नव्वद टक्के निसर्गप्रेमींचं आणि वनस्पतीशास्त्रज्ञांचं एकमत आहे. जसं चित्रांतल्या लिओनार्दो द विंचीतल्या मोनालिसाबद्दल किंवा वास्तुकलेतल्या ताजमहालबद्दल पानंच्या पानं भरून लिहूनही त्यांचं सौंदर्य शब्दातीत राहिलं आहे, तसं ‘ॲम्हर्शिया’ या फुलाबद्दल मराठीत आणि जगभरात सर्वांनी भरभरून लिहूनही या फुलाकडे पाहताना आपण मंत्रमुग्ध होतो. जेते तीन-चार मीटर उंच असणारा हा वृक्ष ब्रह्मदेशातून भारतात आला. महाराष्ट्रात या वृक्षाची एकूण संख्या दहा-बारापेक्षा कमीच निघेल. मुंबई विद्यापीठात तो आहे. राणीच्या बागेतही एक झाड आहे. पुण्यामध्ये बावधन भागात आर्किटेक्ट श्री. डेंगळे यांच्या बंगल्यात तो आहे. ब्रह्मदेशातून तो पहिल्यांदा कलकत्त्यात दाखल झाल्याने तिथे त्यांची संख्या जरा जास्त आहे. बंगळुरूमध्ये बऱ्यापैकी तो भेटेल. केरळमध्ये तिरुअनंतपुरमच्या प्राणिसंग्रहालयाच्या आवारात दोन-तीन झाडे आहेत. ॲम्हर्शिया चांगला वाढण्यासाठी हवामान आणि जमिनीबद्दलच्या अटी फार आहेत. त्याला फार कडक ऊन चालत नाही, तसेच जमीन चांगली म्हणजे ‘लोमी सॉईल’ हवी, मराठीच्या लेखकांनी आणि शास्त्रज्ञांनी त्याचे नामकरण ‘उर्वशी’ असे केले आहे. महाजनसर लिहितात- फेब्रुवारीतमधले उर्वशीचे फुलणे म्हणजे जणू लावण्यवती नर्तिकेचा बहारदार नृत्याविष्कारच! 

फांद्या-फांद्यांना लोंबणारे मेणबत्त्यांच्या झुंबरांसारखे (कँडलबॅ्र) लांबच लांब फुलोरे येतात. त्यांच्या लोंबणाऱ्या शाखेचा रंगसुध्दा लालसर असतो. बोटभर लांबीच्या टोकदार गुलाबी कळ्या क्रमाक्रमाने वरून खाली उमलत राहतात आणि आपण पाहतच राहतो. उमललेल्या स्वर्गीय फुलांचे शब्दांत वर्णन करणे केवळ अशक्य! उर्वशीची फुले केवळ उर्वशीच्या फुलासारखीच असतात. अनुपमेय सौंदर्याने नटलेली असतात. नाचत असतात. एका फुलोऱ्यात वीस-पंचवीस फुले असतात. ती काहीशी ऑर्किडच्या फुलासारखी दिसतात, अनियमित आकाराची (झागोमार्फिक). पाच सुट्या पाकळ्यांपैकी तीन मोठ्या व दोन लहान असतात. त्यांचा रंग नारंगी म्हणावा की लाल, का लालसर गुलाबी- कसाही असला तरी फारच नेत्रदीपक असतो. सर्वांत मोठ्या पाकळीवर एक सोनेरी ठिपका असतो. फुलांची लांबी पंधरा-वीस सेंटिमीटर सहज भरेल. दहा अक्कडबाज पुंकेसरही लाल रंगसंगतीशी मिळत्या-जुळत्या रंगाचे, पण परागकोश मात्र हिरवट रंगाचे असतात. डॉ. वालिश या वनस्पतींच्या अभ्यासकाने 1824 मध्ये हे झाड ब्रह्मदेशात पाहिलं आणि त्याच्या अप्रतिम सौंदर्याने तो वेडा झाला. त्याचं रोप घेऊन तो भारतात आला. कोलकत्याच्या वनस्पती उद्यानात हे झाड लावून वालिशनं त्याचं नामकरण ‘ॲम्हशिया नोबिलिस’ असं केलं. 

भारतीय वृक्षांबद्दल विशेष प्रेम असणाऱ्या ब्रह्मदेशाच्या माजी गव्हर्नरांच्या पत्नीच्या स्मरणार्थ ‘ॲहर्स्टिया’ हे नाव, तर ‘नोबेलिस’ आलंय फुलांच्या देखणेपणावरून. प्रतिभासंपन्न निसर्गलेखक श्रीकांत इंगळ हळ्ळीकर या झाडाबद्दल लिहिताना कसं भारावून जातात, ते पाहा- ‘ज्या फुलांचं सौंदर्य बंदिस्त करताना कॅमेरा स्तब्ध होतो, कुंचले थरथरतात, शब्द लपून बसतात आणि प्रतिभा अवाक्‌ होते- अशी ‘ॲम्हर्शिया’ या जगातल्या सर्वांत सुंदर वृक्षाची फुलं फेबु्रवारी महिन्यात जगातल्या मोजक्या ठिकाणी फुलतात. ॲम्हर्शियाचा फुलणारा वृक्ष बागेत असणं म्हणजे सुंदर वृक्षांधला कोहिनूर हिरा बाळगण्यासारखं अभिमानास्पद समजलं जातं. युरोपातल्या बागांध्ये बंदिस्त अनुकूल वातावरण देण्यापासून आयुर्विमा उतरवण्यापर्यंत या अप्सरेचं कौतुक केलं जातं. आपण 1854 च्या आधी जन्मलो असतो ना, तर काही उपयोग नव्हता. एकविसाव्या शतकात वावरणारे आपण भाग्यवान आहोत, कारण आपल्याला या जन्मात ॲम्हर्शिया ऊर्फ उर्वशी पाहायला मिळू शकतो. 

फेब्रुवारी म्हणजे वसंत अगदी जवळ येऊन ठेपला आहे. काही उतावीळ झाडांनी तर वसंतोत्सव घोषितसुध्दा केला. वसंतात प्रत्येक नवे-जुने झाड फुलून येते, असे म्हणतात. पण शिशिर ॠतूमुळे झडून गेलेली पालवी आधी यावी आणि मग फुले, हा क्रम योग्य वाटतो; नाही का? फेबु्रवारी हा नवपल्लवीचा महिना... अर्जुन, तामण, मेडशिंगी, अजान, कांचनचंपा (ऑक्ना ऑब्ट्युझाटा), कुसुंब, वारंग इत्यादी बहुतांश झाडांना नवी पालवी येते- चैत्रपालवी. सीताअशोक हा वृक्ष तर नुसत्या नवपल्लवीनेही सुंदर (फोलिएज ब्युटी) दिसतो. त्याची कोवळी पाने सुरुवातीला पांढरट करड्या रंगाची, अतिनाजुक व मुलायम असतात. लवकरच ती जांभळट, लाल, गुलाबी आणि लाल- किरमिजी असे रंग बदलत पोपटी व शेवटी हिरवी होतात. करंज तसे सदाहरित झाड आहे. हिवाळ्याच्या अखेरीस थोडी पानगळ होते, पण लगेच त्याला फेब्रुवारीत तजेलदार हिरवी लवलवती पालवी येते. बेलाचा वृक्ष पानझडी असतो. हिवाळ्याअखेर त्याची पानगळ होते आणि फेबु्रवारीत नवी पालवी येते. बेलाची पाने एकांतरित, संयुक्त प्रकारची, त्रिदल म्हणजे तीन पर्णिकांची, हिरवीगार व चकचकीत असतात. त्याच्या पानांचा (फळाप्रमाणे) औषधी उपयोग खूप आहे. महादेवाला ही पाने (बिल्वपत्र) वाहतात. 

शिवण या पर्णसुंदर वृक्षाला फेबु्रवारीअखेरीस फुले व पाने एकदमच येतात. आयुर्वेदात या झाडाला त्याच्या पानांवरून दिलेली संस्कृत नावे पर्णसौंदर्याचा गौरव करणारी आहेत. उदा. भद्रपर्णी, श्रीपर्णी, मधुपर्णिका, पीतरोहिणी इत्यादी. पानांचे सौंदर्य लक्षात घेण्यासाठी मुद्दाम पाहावा असा शिवण (मेलिना अर्बोरिया) वृक्ष आहे. टेरू (डायॉस्पायरास मलबारिका) आपल्या पर्णसौंदर्याच्या दिमाखामुळे फेबु्रवारीअखेरीस आपले लक्ष वेधून घेतो. त्याची नवपल्लवी सुरुवातीला लालभडक आणि तजेलदार असते. एखादा आठवडा फक्त हे सौंदर्यदर्शन घडविल्यानंतर पानांचा रंग लालसर बदामी, पोपटी आणि शेवटी हिरवा होतो. लहानपणी मला ‘किसलय’ या शब्दाने फार वेड लावले होते. शंभर कोशांत अर्थ शोधल्यावर एखाद्या कोशात तो सापडायचा, पुन्हा मी विसरायचो अन्‌ पुन्हा हा शब्द भेटायचा. किसलय म्हणजे नवपल्लवी! त्याचा आता वाक्यात उपयोग करतोच. फेबु्रवारीत आंब्याच्या किसलयात लपलेला कोकिळ पक्षी आपल्या प्रियेला साद घालण्यासाठी एक सणसणीत सूर काढतो अन्‌ सृष्टी वसंतोत्सवांचं उद्‌घाटन झाल्याचे घोषित करते. 

एकदा बाबा भिडे पुलाजवळून जाताना ओरडून प्रज्ञा म्हणाली, ‘अहो, ते बघा पत्रावळीचं झाड!’ तिला काय म्हणायचं आहे हे लक्षात घेऊन माझी उत्सुकता वाढली, पळसाचे झाड आणि महानगराच्या मध्यभागी? पळसाचे संस्कृतात एक नाव ‘त्रिपत्रक’ आहे. त्यावरून मराठीत म्हण आली, ‘कुठेही जा, पळसाला पाने तीनच.’ मधले पान मोठे आणि गोल असते. बाजूची दोन्ही पाने तिरकस अंडाकृती असतात. त्यांच्या या वैशिष्ट्यामुळे मध्यभागी गोल पान घेऊन तिरकस पानांनी भोवतीची पत्रावळ तयार करता येते. ज्वारीच्या वाळलेल्या कडब्याच्या बारीक काड्यांनी ही पाने विणता येणे ही सुंदर कला मला अवगत आहे. पळसाची झाडे कुणी मुद्दाम लावत नाहीत, आणि आहेत ती पिढ्यान्‌पिढ्या पत्रावळीसाठी ओरबाडली गेल्यामुळे आता पळसाच्या पानाच्या पत्रावळी फारशा दिसत नाहीत. पर्यावरणीय विकृतीतून आता पळसाच्या पानाचा बाह्य आकार आणि रूप असणाऱ्या प्लॅस्टिकच्या पत्रावळी तयार होणे पहावे लागते. सुदैवाने मी खऱ्या पळसाच्या पत्रावळींवर जास्त जेवलो आहे. गेले ते दिन गेले! 

माझे आणखी एक सुदैव असे की, मी खऱ्याखुऱ्या पलाशपुष्पांच्या बुडवून, भिजवून केलेल्या रंगाची लहानपणी होळी खेळलो आहे. पळसाच्या फुलांच्या रूपरंगाने मी अक्षरश: वेडावलो आहे. त्याच्या भडक रंगाने आकर्षित झालेले अनेक पक्षी झाडावर गर्दी करताना पुसदजवळच्या जंगलात मी अनुभवले आहेत. त्याच्या मुळापासून तयार केलेला दोरीचा चाबूक पोळ्याच्या काळात मी वाजवलेला आहे. सोडमुंज झाल्यानंतर विद्याभ्यासासाठी गुरूच्या घरी वगैरे गेलो नाही, पण त्याच्या तयारीचा भाग असणारी पळसाच्या फांदीची काठी काही काळ हातात धरताना थरारून गेलो आहे. समीधा म्हणून जतन केलेल्या पळसाच्या काड्या बाळगणारं माझं घर होतं, कारण त्या घरात पाच कुंडाचं अग्निहोत्र होतं. संगीत, शास्त्रीय संगीत घरात असल्यामुळे भीमपलाश या रागाच्या नुसत्या नावातच पळस नसून या रागाचा पळसाशी प्रत्यक्ष संबंध आहे. गावाबाहेर राहणाऱ्या या पळसाने माझे घर आणि जगणं असं व्यापून टाकलेलं आहे. 

पळस हे जंगली झाड असल्यामुळे आदिवासींच्या जीवनात त्याला असाधारण महत्त्व आहे. रामनवमीच्या काळात पळस फुलतो, म्हणून आदिवासी स्त्रियांना पळस म्हणजे ‘सीतामायचा पुरुष राम’ वाटतो. वनवासात असताना आदिवासींच्या लक्ष्मणाने सीतेसाठी पळसाच्या द्रोणात पाणी आणलं. तेव्हा सीतामाई म्हणते, ‘‘हा माझा पुरुष आहे, मी यातून पाणी पीत नाही.’’ पळस माझे तर लाडके झाड आहेच, एकदा ‘प्रेरणा’ या नूतन महाविद्यालयाच्या वार्षिकांचा मी निसर्ग विशेषांक काढला, तेव्हा ज्येष्ठ वनस्पतिशास्त्रज्ञ डॉ. वा. ना. नाईक यांची मुलाखत घ्यायला औरंगाबादला गेलो. त्यांना प्रश्न केला की, ‘तामण हा महाराष्ट्राचा राज्यवृक्ष आहे. जर समजा आपला मराठवाडा स्वतंत्र राज्य झाले, तर मराठवाड्याच्या राज्यवृक्षाचा मान तुम्ही कोणत्या झाडाला द्याल?’ तेव्हा क्षणाचाही विलंब न लावता सर म्हणाले, ‘पळस.’ त्याचे स्पष्टीकरण देताना त्यांनी पळसावर जे दीर्घ, काव्यात्म भाषण दिले ते ऐकायला पळसावर प्रेम करणारे कालिदास किंवा बहिणाबाई चौधरींसारखे कवी असते तर मंत्रमुग्ध होऊन गेले असते. वसंत ऋतू आकाशातून येऊन उतरतो तो आधी पळसाच्या झाडावर. नंतर एक-एक झाडाचा ताबा घेत आपल्याही शरीरमनाचं ताबा त्याने कसा, केव्हा घेतला हे आपले-आपल्यालाच कळत नाही. 

Tags: नवे ऋतुचक्र फेब्रुवारी february vishwas vasekar weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात