डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

जांभूळ हा मूळचा भारतीय वृक्ष आहे. सदापर्णी आणि दाट अशी छाया देणारा. पुण्यात जांभळाची झाडे रस्तोरस्ती आणि या महिन्यात त्याच्याखाली पडलेल्या जांभळांचा खच पाहून वाईट वाटते. ते जर न फुटलेले, पूर्ण शाबूत असेल, तर इकडे-तिकडे पाहून उचलून घ्यायला हरकत नाही. घरी आल्यावर धुऊन मात्र खावे. जांभळाची पाने साधी, समोरासमोर, चिवट, गर्द हिरवी, टोकदार, लंबगोल व त्यांच्यावर अंतर्धारी (कडांजवळून जाणारी) शीर असते. फुलोरे शाखायुक्त आणि शेवटी गुच्छाप्रमाणे असून त्यावर मार्च ते मेमध्ये लहान, पांढरट किंवा हिरवट सुगंधी फुले येतात. मधमाश्यांना ती फार आवडतात. महाबळेश्वरला तुम्हाला जांभळाचा मध मिळेल. जांभळाची फळे मृदू, लांबट, वाटोळी, जांभळी, मांसल व एकबीजी असतात. जांभूळ खाल्ल्यावर आरशात जांभळी झालेली जीभ पाहण्यात मजा येते. भारतात जांभळाची लागवड इतर फळझाडांसारखी व्यापारी तत्त्वावर खास मोठ्या प्रमाणात संघटितपणे करीत नाहीत, हे दुर्दैव आहे.

कबूल आहे की, तुम्ही खूप ऊन सोसलंत. मान्य आहे की, रोहिणीचा नाही तरी वळवाचा तरी पाऊस यावा. पण त्याची उगीच वाट पाहू नका. अजून पंधरा दिवस शाळांना सुट्‌ट्या आहेत. चवींचा बराच महोत्सव साजरा करणे अजून बाकी आहे. शेतं तयार आहेत, पण पाऊस येणं अजून बाकी आहे. आषाढ आलाय, तर आखाड तळणं अजून बाकी आहे.

दुपारची जेवणं होऊन वामकुक्षी झाली, चारबीर वाजले की, काही खावंसं वाटतं. म्हातारी आईसुद्धा म्हणते, ‘तोंड हलवायला काही तरी दे.’ मुरमुऱ्याचा चिवडासुद्धा चालतो तिला. मराठवाड्यात त्याला ‘भपका’ असा शब्द आहे. खाणे नाही, खाण्याचं नुसतं प्रदर्शन! मुरमुऱ्याच्या चिवड्यानं काही होत नाही, मग ‘खारोड्या काढा’ म्हणतात. बाजरीच्या करतात. बाजरीचा भरडा करतात. शिजवतात. त्यात तिखट-मीठ घालतात आणि छोटे-छोटे गोळे करून कडक उन्हात वाळवतात. त्या खारोड्या. कांदा आणि शेंगदाण्यासोबत कुडूम-कुडूम खातात. त्यानंतर सातूचं पीठ गुळात कालवून खातात. ज्या भांड्यातून ते खाल्लं (किंवा प्यायलं), तेही विसळून प्यायचं असतं. रामनवमीला लाह्यांचं कालवलेलं पीठ हा प्रसाद असायचा. घरीही ते करता येतं. बदली होणारी नोकरी असेल तर, बदली हवी असल्यास धिरडे करा. आंब्याच्या रसाबरोबरसुद्धा ते लावून खाता येतील. रसनेचा आनंद तर मिळेलच, पण बदलीही मिळेल. थोडं ऊन उतरल्यावर आपण पुन्हा झाडांकडे जाऊ.

‘हे चिंचेचे झाड दिसे मज चिनार वृक्षापरी’ असं गाणं म्हणत, आपण काश्मीर न पाहिल्याचं दु:ख विसरायचं आणि समोरच्या स्त्रीलाच ‘दिसशी तू नवतरुणी काश्मिरी’ म्हणायचं. ‘एवढी का कुरूप आहे मी?’ असं ती नाही, तर चिंच आपल्याला विचारते. आपल्याला चिंचेची ओळख करून द्यायची तर एकच वाक्य- चिंचा दोन प्रकारच्या असतात. आतला गर (गीर) लाल असणाऱ्या आणि फिक्या रंगाच्या गराच्या. दुसऱ्या प्रकारच्या चिंचांचे प्रमाण जास्त आहे. गरज आहे चिंचेच्या अलक्षित सौंदर्याकडे लक्ष देण्याची.

चिंचोक्यातून उगवलेला चिंचेचा पहिला-पहिला अंकुर मोठा पाहण्यासारखा असतो. सुरुवातीला चिंचोका धरून ते रोप प्रश्नार्थक चिन्हासारखा आकार धारण करतं. मग कधी तरी चिंचोका गळून पडतो आणि रोप नीट उभं राहतं. चैत्रपालवी शब्द खऱ्या अर्थाने चिंचेच्या वसंतातल्या पालवीला जास्त लागू पडतो. अठ्ठावीस पानांच्या त्या पुंजक्यावर हळुवार हात फिरवून पाहा. मखमली स्पर्श कशाला म्हणतात, ते कळेल. चिंचेच्या इवल्या कळीत आणि फुलात जगातला सगळा नाजुक नखरा अवतीर्ण झाला आहे. फुलांच्या बहराला खास नाव असलेले चिंच हे एकच झाड आहे. बाकीच्यांना फुलोरा, बहर इ. समान शब्द आहेत. पण ‘चिगूर’ असतो फक्त आणि फक्त चिंचेचा. बोधे लिहितात- पिवळ्या नांगड्यावर गुलाबी कळ्या फुललेल्या. प्रत्येक कळी टम्म फुगलेली. कळी फुगली की, चार पाकळ्या पसरतात. आत पिवळे चार केशर. मंद रंगाच्या गुलाबी पाकळ्या. फुलांची चवही आंबट-गोड.’

मी चिंचेचा पाला खाल्ला आहे. चिगुराची भाजी करण्याची कल्पनाच मला क्रूरपणाची वाटते, पण करणारे करतात. गुंजेप्रमाणे चिंचेचा पाला खाणाऱ्या गायकांबद्दलही मी वाचले आहे. गाण्याच्या मैफलीला जाण्यापूर्वी महान गायक तानसेन चिंचेचा पाला खाऊन जात असत, अशी आख्यायिका ग्वाल्हेरात आहे. ती खरी असेल वा खोटी- पण ग्वाल्हेर शहरात एका मोठ्या चिंचवृक्षाखाली त्यांची कबर आहे, हे मात्र सत्य आहे. चैतन्य महाप्रभूंना चिंचेच्या वृक्षाखाली बोध झाला. हा चिंचेचा वृक्ष आजही वृंदावनात आहे, असं म्हणतात. व्यवस्थितपणे केलेले, फोडलेल्या चिंचेचे लाडू दोन-दोन वर्षं टिकतात. हिंग आणि मिठाच्या पाण्याचा स्पर्श देऊन हे चिंचेचे लाडू केले जातात. झाडावर दीर्घ काळ टिकून राहणारं असं हे गमतीदार फळ आहे.

‘गोईण’मध्ये चिंचेविषयीचं आदिवासींचं एक गाणं डॉ. राणी बंग यांनी दिलंय. त्यावरून कच्च्या चिंचा सहा महिने व पिकलेल्या चिंचा झाडावर सहा महिने राहतात, असा बोध होतो.

‘माझ्या मन आवडीनं, झाड लावी ग चिंच

आन्‌ तिची सावली, उंच उंच!

आपयेला हस्तकानं (हातानं) ग

झाड रोवयलो चिंच

अन्‌ तिचा फळ ‘बारो’ (बारा) मास

तुकाराम बोले।।’

मोहाचे झाड मी पाहिले नाही. पण श्राद्धपक्षाला त्याच्या पानांच्या पत्रावळीवर जेवलो मात्र आहे. आदिवासी स्त्रिया झाडांना आपली ‘गोईण’ म्हणजे मैत्रीण मानतात. ‘गोईण’ पुस्तकात पहिली मैत्रीण मोहाचे झाड आहे. बाकी झाडांना अर्धे ते एक पान जागा मिळाली, तर मोहाला सहा पाने मिळालीत; म्हणजे आदिवासींच्या जीवनात हे झाड अनेक कारणांनी महत्त्वाचे आहे. इतके की, आदिवासी या मोहाच्या झाडाला देव मानतात.

माझंही मन अजून मेंदीच्या पानावर झुलतंय. कारण सातवीपर्यंत मी ज्या शाळेत शिकलो, त्या वस्सा येथील शाळेला सुंदर आणि विस्तीर्ण असे मेंदीच्या पूर्ण वाढलेल्या झाडांचे कुंपण होते. तिची छोटी-छोटी चोपडी पाने अजून डोळ्यांसमोर आहेत. तिची वाळलेली लहानगी गोलसर वाटाण्याच्या आकाराची फळं अजूनही डोळ्यांसमोर डोलताहेत. इजिप्त, सुदान आणि भारत या तीन देशांत मेंदीच्या पानांचा पुरवठा करण्याकरता मोठ्या प्रमाणात मेदींची लागवड केली जाते. भारतात पंजाब व गुजरात या राज्यांत मोठ्या प्रमाणावर आणि मध्य प्रदेश व राजस्थानात कमी प्रमाणात लागवड केली जाते.

हातांवर मेंदी काढणे, ही एक कला आहे. मेंदीच्या रचनेची पुस्तकं बाजारात मिळतात. गौरवर्ण स्त्रियांच्या नुसती तळहातावरच नाही, तर मळहात आणि कोपरापर्यंत मेंदी काढता येते. ‘खुलविते मेंदी माझा रंग गोरापान’ हे खरं आहे. पुरुषसुद्धा दाढी, भिवया, मिश्या आणि पांढरे झालेले केस मेंदीने रंगवतात. लग्नसमारंभात- विशेषत: उत्तर भारतात- मेंदी काढणे हा एक महत्त्वाचा सोहळा असतो. हिंदीत मेंदीसाठी हिना असा शब्द आहे. मेहंदीसुद्धा आहे. दोन्ही शब्द उर्दूत आहेत.

वसंताची काढती, अगदी शेवटची पावलं दिसतात वरुण ऊर्फ वायवर्ण या वृक्षात. उष्ण व दमट हवामानात विशेष चांगला वाढणारा हा वृक्ष संपूर्ण भारतात आढळतो. याची बेलासारखी तीन पर्णिकांची संयुक्त पानं असतात. हिवाळ्यात पूर्ण पानगळ होते आणि एप्रिलमध्ये हा बहरू लागतो. श्रीश लिहितात : वरुणाची फुलं म्हणजे देठाजवळच्या पानांसारख्या दिसणाऱ्या पांढऱ्या पाकळ्या व त्यामधून निघालेल्या फिकट जांभळ्या पुंकेसरांचा झुबकाच! अत्यंत आकर्षक व नाजुक फुलांनी बहरलेला वरुणाचा वृक्ष वसंत ऋतूत खूपच देखणा दिसतो. जून फुलांच्या पाकळ्या पिवळ्या होतात आणि बहार संपता-संपता नवी पालवी येते. सुरुवातीला हिरवी दिसणारी वरुणाची लंबगोलाकार फळं पिकल्यावर लाल होतात. त्यामधल्या पिवळ्या गराचा वास मात्र आंबूस, थेट शिळ्या बिअरसारखा.

जूनच्या पुढे मुरुडशेंग या औषधी वनस्पतीला फुले यायला आरंभ होतो. ही वनस्पती महाराष्ट्र, गुजरात व म्हैसूर येथील रानात विपुल आहे. तिची खोडे बारीक असतात आणि त्यांवर पानांच्या दोन रांगा एकांतराने उगवलेल्या असतात. या वनस्पतीची सर्वांगे केसाळ आहेत. पीळदार अशी त्याची शेंग असते. कुरंग हरिणांचा जो पुढारी नर एणजातीचा असतो, त्याची शिंगे अशी पीळदार असतात. त्यावरून मृगशृंग असे या झाडाला नाव मिळालेले आहे.

मोहरीचे पीक महाराष्ट्रात घेतले जात नाही, पण विहिरीच्या जवळ शेतात अनाहूतपणे उगवलेली मोहरीची झाडे आपण नक्की पाहिली आहेत. मोहरीचे चार तरी प्रकार आहेत. तिची उंची प्रकारानुसार एक ते दोन मीटर असते. पाने 15 ते 30 सेंमी लांब, साधी, संवृत्त म्हणजे देठ असलेली लवदार असतात. खोडाच्या तळाकडील पाने वरच्या पानापेक्षा मोठी व वीणाकृती असतात. फुले पिवळ्या रंगाची असतात. ज्यांचे चित्रीकरण उत्तर भारतात झाले आहे, अशा अनेक हिंदी गाण्यांत नायक-नायिका मोहरीच्या पिकात नाचत असतात. ती शेतं इतकी सुंदर असतात की, त्यांच्यापुढे नाचणारे नायक-नायिकासुद्धा पाहायला नकोसे वाटतात. (मला अशा शेतांमध्ये जाऊन एकदा नाचायचे आहे.)

मराठीत ‘राईचा पर्वत करणे’ अशी म्हण आहे. म्हणजे राई हा मोहरीसाठी मराठी शब्द आहे. मराठवाड्यात लोणच्याला रायतं म्हणतात, कारण लोणच्यात वाटलेली मोहरी हा महत्त्वाचा घटक असतो. लोणची अनेक असतात- म्हणून आंब्याचं रायतं, लिंबाचं रायतं वगैरे. शेतात फुटलेली मोहरीची झाडं ही फोडणीत न फुटलेल्या मोहरीचं कोरड्यास असलेलं भांडं विसळून किंवा धुऊन टाकलेल्या पाण्यातून गेलेल्या मोहरीतून येतं. काही का असेना, त्यामुळे पीक न घेता सबंध मोहरीचं, पिवळ्या फुलांचं झाड आपल्याला दिसतं ना! फोडणीतली मोहरी फार हट्टी असते. तेलतव्यातले (हा कढईसाठी वापरण्यात येणारा मराठवाड्याच्या बोलीतला सुंदर शब्द) तेल गरम झाले की, आधी मोहरी टाकायची- तडतड आवाज करीत टाकलेली प्रत्येक मोहरी फुटेपर्यंत लसूण किंवा जिरे टाकायचे नाहीत. असे ते टाकले, तर मोहरी फुटत नाही आणि न फुटलेली मोहरी वाईट लागते; कोरड्यासाची चव बिघडवते!

रोहितक (अमुरा रोहितक) हे नितांत सुंदर झाड मी मंचरच्या महाविद्यालयात पाहिले आहे. तज्ज्ञांचे तर असे म्हणणे आहे की- सुंदर पाने लाभलेल्या, प्रसन्न, सदाहरित भारतीय वृक्षोत्तमांची यादी करायला घेतली, तर पहिल्या पाचांमध्ये रोहितक मोजावा लागेल. मध्यम आकाराचा हा एक डेरेदार वृक्ष आहे. पाने सुंदर, खूप मोठी, पन्नास सेंमी ते एक मीटर लांबीची असतात. गडद, तजेलदार हिरव्यागार पानांवरच्या शिरा फारच सुंदर दिसतात. ती भरगच्च असल्यामुळे बाकी अंगांकडे लक्षच जात नाही. फळा येणाऱ्या तीन बिया लालभडकतेमुळे उठून दिसतात. अतिशय देखणा असा हा वृक्ष पुण्याला पाहायला मिळेल. एक तर अगदी पुण्याच्या जोगेश्वरी मंदिराजवळ आपल्या प्रसन्नतेसह विराजमान झालेला आहे.

बोरकरांची ओळ आहे- ‘रुमडाला सुम आले गं!’ रुमड म्हणजे उंबर. औदुंबर. उंबराला फूल येणे ही अशक्यप्राय गोष्ट असते. उंबराचे फूल कोणाला दिसत नाही. पण फुलाशिवाय फळ अशक्य. तर, उंबराचे फळ हीच त्याची फुले. उंबर आणि अंजीर या फायकस प्रजातीमध्ये फुले अत्यंत सूक्ष्म आकाराची असून फुलोरा कुंभाच्या अगर कुंडाच्या आकाराचा असतो. उंबराच्या वरच्या टोकाला एक छिद्र असते आणि आतल्या अस्तरावर असंख्य फुले असतात. यामध्ये नरफुले आणि मादीफुले निरनिराळी असतात. वरच्या बाजूने किडे आत जातात. वरच्या बाजूला नरफुले असतात. इथून किड्यांना सरळ जाता यावे म्हणून केस असतात. ते किड्यांना पुन्हा बाहेर येऊ देत नाहीत. नरफुलांवरचे परागकण घेऊन किडे मादीफुलांपर्यंत जातात आणि परागसिंचनातून आतमध्ये मोहरीच्या आकाराची फळं तयार होतात. या किड्यांनी परत बाहेर येण्याचा प्रश्नच नसतो. मग किडे आतमध्ये अंडी घालतात आणि नव्या किड्यांना जन्म देतात. पंखवाले किडे. पक्षी उंबरातला गर खातो, पण त्यात तयार झालेली फळं त्याला पचत नाहीत. मग ती त्याच्या विष्ठेतून एखाद्या फांदीवर, कडेकपारीत पडतात. ही फळं फांदीतील, फटीतील किंवा जमिनीतली ओल धरतात व त्यातून उंबराची रोपं तयार होतात. पुष्कळदा उंबर आणि कडुनिंब एकत्र वाढतात, याचे कारण हेच आहे. व्यंकटेशस्तोत्र लिहिणाऱ्या कवीला हे विज्ञान माहीत होते.

काकविष्ठेचे झाले पिंपळ

त्याते निंद्य कोण म्हणे?

विष्ठेतून जन्मलेले उंबर, पिंपळ पवित्र मानले जातात. अंडी घातलेले किडे जन्माला येतात, तसतसे हिरवे उंबर लाल होत जाते. उंबराच्या एका फळात इतक्या मोठ्या संख्येत घडामोडी घडतात. पक्व फळांतून बाहेर पडलेले हे किडे पुन्हा मरायला म्हणून दुसऱ्या उंबराच्या आत शिरतात! अशी ही गंमत आहे.

उंबराचे फळ मधुर, शीत व शक्तिवर्धक आहे. भगवान विष्णूने नरसिंह अवतार घेऊन हिरण्यकश्यपू या राक्षसाचे पोट नखांनी फाडून त्याचा वध केला. हिरण्यकश्यपूच्या पोटात अतिदाहक विष होते. त्याला फाडण्याने विष्णूच्या नखांचा दाह झाला. हा दाह शमविण्यासाठी लक्ष्मीने उंबराची फळे आणली. त्या फळांत विष्णूने आपली नखे खुपसली आणि त्याचा दाह शांत झाला. तेव्हा त्यांनी औदुंबर वृक्षाला वर दिला की, ‘तू कल्पवृक्ष होशील, तू नेहमी फलयुक्त राहशील. मी लक्ष्मीसहित तुझ्याजवळ राहीन.’

आम्ही लहानपणी खूप उंबरं खायचो. त्याच्या पानांवर फोडांसारखे येते, तेही पानांवरून उपटून खाल्ले आहे. ते खाल्ल्याने ‘तोंडात आले असले’ तर जाते, असा आमचा समज होता. उष्णतेने तोंडात फोड येतात आणि उंबर ‘शीत’ आहे, नाही का? उंबरठ्यासाठी पूर्वी उंबराच्या झाडाच्या लाकडाचा उपयोग केला जात असे.

यावरूनच ‘उंबरठा’ हा शब्द प्रचलित झाला असावा. बालकवींची ‘औदुंबर’ ही कविता सोडल्यास उंबराचे झाड समजून घ्यायला अतिशय सोपे आहे.

कवठाची चटणी तुम्ही कधी चाखलीय का? जेली? मिठाई? त्याच्या फळात सायट्रिक ॲसिड आणि क जीवनसत्त्व असते. कवठ फोडून याचा गर नुसताही खाता येतो. स्वाद आणि औषधी गुण या दोन्ही दृष्टीने कवठ हे फळ उपयुक्त असतं. हा मध्यम प्रतीचा वृक्ष असतो. बुंध्याचा घेर एखादा मीटर असतो. पानाच्या बगलात काटे असतात. कवठाची साल काळी, खरखरीत असून तिला उभ्या चिरा पडतात. पाने एकांतरित, संयुक्त प्रकारची, तुकतुकीत, गडद काळसर हिरव्या रंगाची असून ती चुरगाळून त्यांचा वास घेतल्यास बडीशेपेच्या सुवासाची आठवण येते. वसंत ऋतूअखेर कवठाला बहर येतो. दाट पर्णसंभारात लपलेले कवठाच्या फुलांचे तुरे बारकाईने पाहिल्याशिवाय लक्षात येत नाहीत. पावसाळ्यात छोटी-छोटी गोल-गोल फळं दिसू लागतात. ती हिवाळ्यात पूर्ण वाढून पिकतात. महाशिवरात्रीच्या सुमारास मोठ्या प्रमाणात ही फळे बाजारात दिसू लागतात. सर्व देशभर कवठाचे वृक्ष तुरळकपणे का असेना, आढळतात.

चढत्या क्रमाने कुरूप दिसणारी शुष्क फळे कोणती? तर हिरडा, बेहडा आणि आवळकंठी. अतिशय कुरूप स्त्रीचं वर्णन मराठवाड्यात ही तीन नावं सलगपणे घेत केलं जातं. रूपाने कसेही असोत, पण गुणाने किती महान आहे तिघं! त्यांपासून केलेलं त्रिफळा चूर्ण घरात सदैव बाळगावं असं औषध आहे. यापैकी कफनाशक बेहडा फेब्रुवारी ते मे या काळात फुलतो; पण त्याची फुलं इतकी लहान आणि अनाकर्षक असतात की, त्यांच्या फुलण्याकडे लक्षच जात नाही.

बेहड्याचं झाड मौल्यवान आहे ते त्याच्या फळांमुळे. ही फळे मे ते जुलै या काळात पिकून खाली पडतात. गंमत म्हणजे, ही फळे गतवर्षीच्या फुलांची आहेत. म्हणजे फुलांची फळे होणे, ही प्रक्रिया वर्षभर चालू राहते. बेहडा महाराष्ट्रात सगळीकडे आढळतो.

हा महिना चंदनाच्या झाडांना- म्हणजे फांद्यांच्या टोकांना फुलांचे शंकूच्या आकाराचे गुच्छ यायला आरंभ होतो, तो थेट हिवाळ्यापर्यंत. गुच्छामध्ये अर्धा सेंमी आकाराची छोटी-छोटी निर्गंध फुले असतात. ह्या फुलांच्या पाकळ्या टोकदार, खाली वळलेल्या असतात. सुरुवातीला फिकट हिरव्या रंगाच्या असणाऱ्या ह्या पाकळ्या नंतर गर्द तपकिरी, जांभळ्या रंगाच्या होतात. नंतर काळपट रंगाची एक सेंमी आकाराची फळेही झाडावर लगडतात.

‘चंदनाचे हात, पायही चंदन’ हा अभंग मी दहा वर्षे शिकवला आणि महाविद्यालयातील चंदनाचे हात-पाय हुंगण्यात पस्तीस वर्षे घालवली, पण शेकडो झाडांत वावरून त्यांनी कधी सुगंध नाही दिला! निवृत्त झाल्यावर कळले की, चंदनाला सुगंध प्राप्त व्हायला पंचवीसावर वर्षे जावी लागतात! ताप्तर्य- आपल्या अवतीभवती चंदनाची झाडं असली, तरी त्याचे म्हणून सुख दुकानातच विकत मिळते.

इंग्रजी ही मराठी-हिंदीप्रमाणे आर्यभाषा वंशातली भाषा आहे, हे ‘चंदना’च्या उदाहरणावरून समजून घेता येते. एका भाषावंशातले नातेविषयक, अंकविषयक आणि वृक्षविषयक शब्द फार बदलत नाहीत. चंदन या शब्दाचा  व्युत्पत्त्यर्थ मुळी सुगंध असा आहे. अरबी या आर्यभाषावंशीय भाषेत त्याचे झाले चंडल किंवा संडल. त्यावरून इंग्रजीत झालं सँडल. अन्य विषयबाह्य उदाहरणे. पितृ-फादर-पिता, मातृ-मदर-माता, सप्टें-सात, ऑक्टो-आठ, नोव्हें-नऊ इत्यादी.

गेला महिना ‘आंब्याचे दिवस’ होता. पाऊस पडून हिरवी माशी घरात घोंघावायला लागली की, आंबे खाणे बंद. आंब्यांचे दिवस संपले की, जांभळांचे दिवस सुरू होतात. एरवी मराठवाड्यात जांभूळ हे मिडकवायला लावणारे झाड आहे. चांगली जांभळेच येत नाहीत. नुसती आंठोळी असते आणि तिला जांभळे कव्हर! पुण्यात मात्र या दिवसांत उत्कृष्ट, मोठमोठी, खूप गर असणारी जांभळं खायला मिळतात. ‘जांभळाचे दिवस’ तसे थोडेच असतात. या नावाची कथाच असते, कादंबरी नाही. जांभळाचे दिवस संपतातही लवकर...

जांभूळ हा मूळचा भारतीय वृक्ष आहे. सदापर्णी आणि दाट अशी छाया देणारा. पुण्यात जांभळाची झाडे रस्तोरस्ती आणि या महिन्यात त्याच्याखाली पडलेल्या जांभळांचा खच पाहून वाईट वाटते. ते जर न फुटलेले, पूर्ण शाबूत असेल, तर इकडे-तिकडे पाहून उचलून घ्यायला हरकत नाही. घरी आल्यावर धुऊन मात्र खावे. जांभळाची पाने साधी, समोरासमोर, चिवट, गर्द हिरवी, टोकदार, लंबगोल व त्यांच्यावर अंतर्धारी (कडांजवळून जाणारी) शीर असते. फुलोरे शाखायुक्त आणि शेवटी गुच्छाप्रमाणे असून त्यावर मार्च ते मेमध्ये लहान, पांढरट किंवा हिरवट सुगंधी फुले येतात. मधमाश्यांना ती फार आवडतात. महाबळेश्वरला तुम्हाला जांभळाचा मध मिळेल.

जांभळाची फळे मृदू, लांबट, वाटोळी, जांभळी, मांसल व एकबीजी असतात. जांभूळ खाल्ल्यावर आरशात जांभळी झालेली जीभ पाहण्यात मजा येते. भारतात जांभळाची लागवड इतर फळझाडांसारखी व्यापारी तत्त्वावर खास मोठ्या प्रमाणात संघटितपणे करीत नाहीत, हे दुर्दैव आहे. इंडोनेशियात तशी करतात. रोपापासून वाढविलेल्या झाडाला आठ-दहा वर्षांनी फळे येतात. फुले मार्चमध्ये येऊन फळे जून-जुलैत पिकून तयार होतात. कलमी झाडांना लवकर फळे येतात. खास मेहनत, मशागत केलेल्या झाडाचे फळ अंड्याएवढे मोठे होते. प्रत्येक झाडापासून प्रतिवर्षी 50-75 किलोग्रॅम फळे मिळतात.

रंगाला वनस्पतीचे नाव मिळाल्याने जांभूळ हे गुलाबानंतरचे उदाहरण. एका खाद्य पदार्थाचा आकार जांभळासारखा असून रंग मात्र गुलाबी असतो, तो म्हणजे गुलाबजामून. ‘मामाच्या गावाला जाऊ या’ या गाण्यात सुगरण मामीच्या हातचे ‘गुलाबजामून खाऊ या’ असे म्हटले आहे. परभणी जिल्ह्यात गोदावरीचे पात्र दुभंगून जांभळाची विपुल झाडे असलेले सुंदर बेट तयार झाले आहे. त्याचे नाव आहे जांभूळबेट.

आता चालू महिन्यात फुलणाऱ्या काही वेलींना पाहायला जाऊ या. फुलांचा बहर निरनिराळ्या वेलींमध्ये वेगवेगळा असला, तरी सामान्यपणे मार्च ते ऑगस्ट या काळात अनेक जातींचे वेल फुलतात. ‘बदकवेल’ या महावेलीचा उल्लेख औषधी वनस्पती या पुस्तकामध्येही आढळतो. या वेलीला इंग्रजीत ‘इंडियन बर्थवर्ट’ही म्हणतात. त्याला ॲरिस्टोलॉकिया या शास्त्रीय नावानेही जाणले जाते. हिचे खोड खालच्या बाजूला (जमिनीकडे) टणक आणि वर मऊ असते. पाने विविध आकाराची आणि लांबीची, रेषाकृती, टोकाकडे अधोमुख अंडाकार होत जाणारी असतात. फुले हिरवट पांढरी असून, पानाच्या अक्षकोनातून निघणाऱ्या लहान समूहात असणारी अशी असतात. प्रदलमंडळ (करोला) हे बहुधा पाच पाकळ्या पूर्णपणे जोडल्या जाऊन बदकाच्या डोक्याची आठवण करून देणारे असते. जांभळ्या रंगावर नक्षीदार रेषा व ठिपके असू शकतात.

कावळी या वेलाला वाकुंडी, बेडकी अशीही नावे असून, संस्कृतात मेषशिंगी असे नाव आहे. ही वेल उंच झाड्यांच्या शेंड्यापर्यंत जाऊ शकते. तिच्या कोवळ्या खोडावर दाट व बारीक लव असते. पाने साधी, समोरासमोर, टोकदार, तळाशी गोलाकार किंवा हृदयाकृती असतात. फुले मे अखेरीस येतात. ती लहान, लांब व पिवळ्या रंगाची असतात. कावळीच्या पानांचा एक गुणधर्म असा की- तिची पाने चांगली चावली, तर तोंडातली गोड व कडू चव नाहीशी होते; मात्र आंबटपणा व खारटपणा कळतो. काही तासांनंतर तोंडास खरी चव परत कळू लागते. तिच्यात औषधी गुणधर्म बरेच आहेत.

जून महिना रानजाईच्या वेलीला बहर येण्यास सुरुवात करणारा आहे. हा बहर पूर्ण पावसाळाभर चालू राहतो. अतिशय सुगंधी आणि लगडलेल्या फुलांमध्ये सुंदर दिसणारा असा हा महावेल आहे. सह्याद्रीच्या परिसरात- विशेषत: मावळ भागातील डोंगराळ भागात सगळीकडे आढळणारा हा महावेल भरपूर मोठा वाढू शकतो. उद्यानात आणि परसबागेतही तो लावता येईल. पुण्यात खूप ठिकाणी हा वेल पाहायला मिळतो.

घोसाळी या वेलीला मराठवाड्यात ‘पारसे दोडके’ असे नाव आहे. दोडक्याला शिरा असतात, त्यामुळे त्याचा गडद हिरवा रंग अधिक तुकतुकीत दिसतो. घोसाळ्याला शिरा नसतात, त्यामुळे त्याचा रंग दोडक्याच्या तुलनेत फिकट-पांढरट दिसतो; पारसा म्हणजे अंघोळ न केलेला. अंघोळ केलेल्या माणसाच्या कांतीवर एक तजेलदारपणा दिसतो. तसा तो दोडक्याला आहे, घोसाळ्याला नाही. म्हणून बिचाऱ्यालाा ‘पारसे’ नाव पडले असावे.

व्यक्तिश: मला दोडक्यापेक्षा घोसाळ्याची भाजी जास्त आवडते. घोसाळे जेवढे कोवळे तेवढी भाजी सुंदर. मसाला, शेंगदाण्याचा कूट वगैरे काही न टाकता तेलावर वाफवलेली घोसाळ्याची भाजी दोडक्यापेक्षा चवदार लागते. घोसाळ्यामध्ये दोडक्यापेक्षा दोन गुण अधिक आहेत. घोसाळ्याची भजी करता येतात आणि ती खूप स्वादिष्ट असतात. कोवळ्या घोसाळ्याच्या गोल-गोल चकत्या करायच्या व त्यांची भजी करायची! घोसाळ्याचे भरीतही करता येते, हा त्याचा दोडक्यापेक्षा अधिकचा गुण. इतक्या सुंदर, गुणी भाजी वानसाला ‘पारसे’ म्हणू नका हो! फार तर दोडक्याला ‘न्हालेले घोसाळे’ म्हणा. चालेल? एका बाबतीत मात्र घोसाळे दोडक्यापेक्षा कमी आहे. त्याचे फूल दोडक्यासारखे सुंदर नाही. खूप वेळ पाहावेसे वाटावे आणि त्याचे शिल्प आकळावे, असे सुंदर फूल असते दोडक्याचे. उगीच नाही कवी बोरकरांनी त्याला ‘स्वप्नपुष्प’ म्हटलंय.

ज्यांच्या घरात बागबगीचा लावण्यासाठी थोडीही जागा आहे, त्यांनी घोसाळीचा वेल जरूर लावावा. हाच महिना आहे आळ्यात घोसाळीचे बी लावून रुजविण्याचा. घोसाळ्याचा वेल कोणत्याही प्रकारच्या हवामानात आणि कसल्याही मातीमध्ये सहजपणे, कुठेही वाढवता येत असल्यामुळे अवश्य लावावेत. माझ्या लहानपणी भरपूर मोठे अंगण असल्यामुळे आजीच्या मार्गदर्शनाखाली मी घोसाळे, दोडके, दुधी भोपळा (कद्दू), देवडांगर, पडवळ, कारले यांच्या बिया वर्षभर जपून ठेवत असे. जूनमध्ये ठरावीक अंतरावर माती कुदळीने व्यवस्थित उकरून-मोकळी करून, आठ-दहा आळे बनवत असे. त्या आळ्यांमध्ये प्रत्येक वेलीच्या चार-पाच बिया टोबायचे. रोपे उगविल्यावर त्यांची क्षमता लक्षात घेऊन कमजोर रोपे कमी करत जायचे. शेवटी एकच जोरकस रोप वाढू द्यायचे. त्याच्याभोवती तुऱ्हाट्यांचे कुंपण करायचे. असा मोठा सोहळा जूनमध्ये चालायचा. पारखी नजरेला हा जोरकसपणा ओळखता येतो.

भगवान महावीर आणि त्यांचा शिष्य गोशालक कुठे तरी चालले होते. गोशालकाने अचानक एका छोट्या रोपट्यापाशी उभं राहून विचारलं, ‘‘गुरू, या रोपट्याला फुलं येतील की नाही?’’ महावीर थोडा वेळ त्या रोपट्याजवळ शांत उभे राहिले आणि म्हणाले, ‘‘येतील.’’ तेव्हा गोशालक मोठ्याने हसला आणि ते रोपटे उपटून एकीकडे फेकत म्हणाला, ‘‘आता कशी येतील फुले?’’ महावीरांनी स्मित केले आणि ते दोघे पुढे चालत राहिले. त्यांना ज्या गावी जायचं होतं, तिथं पोहोचले. पण सात दिवसांची पावसाची झड लागली आणि त्यांना तिथेच थांबावे लागले. सात दिवसांनंतर दोघे त्याच रस्त्याने परतले. मग ती जागा आली, जिथं रोप उपटून फेकून दिलं होतं. पाहतात तो काय- त्या रोपट्यावर एक मोठं फूल फुललं होतं. गोशालक परेशान झाला. ‘‘हे कसे घडले? कसे शक्य झाले?’’ तेव्हा महावीर म्हणाले, ‘‘त्या दिवशी मी त्या रोपाजवळ थांबून निरीक्षण केलं. पाहिलं की, यात आत्मशक्ती केवढी आहे? जगण्याची अन्‌ फुलाला जन्म देण्याची शक्ती आहे का याच्यात? वाऱ्या-वादळासमोर त्याची ही शक्ती टिकून राहील? मला जाणवलं की- आहे, शक्ती आहे. म्हणून तुला म्हणालो की, याला फुलं येतील. तू याला उपटलंस, फेकून दिलंस. परंतु पावसाच्या ओहळाने जेव्हा याच्याजवळ माती वाहत आली. याने त्या मातीत मुळं रोवून धरली. आणि बघ- आता हे जिवंत आहे. फुलले आहे, दरवळत आहे.’’

मांजर आपल्या कमजोर बाळांना मारून टाकते, म्हणतात. याचा अर्थ तिच्यात वात्सल्य नसते का? असते. सर्वच जीवितांना एकच न्याय लागू आहे. ‘सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट’ हा तो न्याय. कमजोर रोपटे आपण उपटून फेकून दिले नाही, तरी जळून जाते. मरून जाते. मी हे सगळं जून महिन्यात पाच-सहा बिया लावून त्यातल्या एकाला वाढू देण्याबद्दल सांगत होतो; होय ना?

बागायती शेती ज्यांची आहे, शेतात मी ऐन उन्हाळ्यात पाहिलेली काही दृश्य अजून डोळ्यांसमोर आहेत. एक पशुखाद्य म्हणून लावलेलं कडुळं हे पीक. कडुळ्याचे बी म्हणजे ज्वारीचं. पण पशुखाद्य म्हणून हे पीक करायचे असल्यामुळे दाट बी टाकले जाते आणि कडुळाचे एक मस्त हिरवेगार ढेलेच तयार होते. दुसरे पशुखाद्य म्हणजे आवरा. मराठवाड्यात पावटा नावाची भाजी कुणी खात नसावेत. या पावट्याचं बी दाट टाकून असंच पुन्हा एक पशुखाद्य तयार करतात. पण ते उसाच्या जोडीने. ऊस वाढेपर्यंत पावटा वाढून पशुखाद्य म्हणून उन्हाळ्यात हाताशी येतोही. माझ्या डोळ्यांपुढे अजून पावट्याचे वर आलेले टेंड्रिल्स नाचताहेत. तसेच नाचताहेत- कांद्याच्या आणि गाजराच्या बियांसाठी म्हणून वाढवलेले त्यांचे डौलदार तुरे. या दोन्हींची डिझाइन्स मला फारच नयनरम्य वाटायची. पाहता-पाहता किती बदललंय सगळं! माझ्या लहानपणी सोयाबीन नावाचं पीक नव्हतं. आता ते उगवल्यावर, वाढल्यावर कसं दिसतं, हेसुद्धा मला माहीत नाही. असो.

मला लिलीची फुले आवडतात. म्हणून या शीर्षकाची पु.शि. रेगे यांची कविता आवडते, की रेग्यांची कविता विलक्षण आवडलेली म्हणून मला लिलीची फुले आवडायला लागली- ते सांगता येणार नाही. छोटीशी कविता, पण नादावून टाकणारी...

लिलीची फुले

तिने एकदा

चुंबिता डोळा

पाणी मी पाहिले...!

लिलीची फुले

आता कधीही

पाहता डोळा

पाणी हे साकळे...!

लिली अनेक रंगांची असते. पांढरी, लाल- पण मला पिवळी लिली जास्त आवडते. जून उजाडला की, ती जमिनीतून बाहेर यायला लागते. किती नाजूक फूल! लसणासारखे कांदे असतात- निशिगंधासारखे म्हणू या. फुले येऊन गेली की कांद्यांचा गुणाकार होतो.

जून महिन्यापासून पुढचे चार महिने आपण सातत्याने कास पठाराला भेट देणार आहोत. प्रत्येक वेळी नवी आणि नवनवी रानफुले आपल्याला भेटतील. जून संपता-संपता कास पठारावर पांढरे हबे, अमरीचे कोंभ उगवतात. अधून-मधून ‘वायुतुरा’ ही दोन तुरे असणारी वनस्पती दिसते. अर्ध्या-पाऊण फुटाची उंची. हिरवीकच्च पाने, त्यातूनच एक लांब देठ बाहेर येतो. त्याला दोन फाटे फुटतात आणि बारकी गुलाबी फुले असतात. कास पठार हे साताऱ्याचं भूषण आहे आणि वायुतुरा हे कास पठाराचं. म्हणून तर तिच्या नावामध्येच साताऱ्याचं नाव अनुस्यूत आहे- ॲपोनोजटान सातारेन्सिस.

 

Tags: जांभूळ जून नवे ऋतुचक्र विश्वास वसेकर jambhul series sadhana sadar nave rutuchakra vishvas vasekar weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके