अमुक एका झाडावर प्रेम करा, हे सांगण्यापेक्षा अमुक एका झाडावर प्रेम करू नका- हे सांगणे मला जिवावर येते. महाराष्ट्रात मधुमालती म्हणून ओळखली जाणारी वेल त्यापैकी एक आहे. तिच्यावर प्रेम करू नका, असं मला सांगायचंय. पण प्रेम आंधळ असतं, हेही खरं आहे. या झाडाला रंगूनचा वेल किंवा बारमासी म्हणतात. मालतीची फुलं अशी असतात का? अशी दिसतात का? मधुमालती म्हणताना तुम्हाला यात मालती दिसलीच नाही, तरी तिला हे नाव? बरं, मालती हे अत्यंत सुगंधी असं फूल आहे. तुम्ही मधुमालती म्हणता, त्याला कुठे आहे सुगंध? म्हणजेच प्रेम करणाऱ्यांना धड काही दिसत नाही, तसंच त्याचा धड वासही घेता येत नाही. याचा अर्थ तुमचं प्रेम नुसतं आंधळंच नाही, तर ‘सर्दुलं’सुद्धा आहे. तर ही तुमची तथाकथित मधुमालती किंवा मालती नसून रंगूनचा वेल किंवा बारमासी आहे. वनस्पतीशास्त्रीय नाव कॉमब्रेटम इंडिकम असून पानांच्या कक्षात फुलांचे खाली लोंबणारे तुरे येतात.
मार्च महिना वसंत ॠतूच्या बहराचा आणि कहराचा. खरे तर त्यालाच ‘वसंतात्मा’ म्हटले पाहिजे. माणसाच्या शरीराचं दर सात वर्षांनी नूतनीकरण होतं, असं म्हणतात. वसंत ॠतू तर झाडांचं नूतनीकरण प्रतिवर्षी करून टाकतो. कात टाकलेल्या सापाच्या शरीराचं नवं चकाकतं, सळसळतं चैतन्यदायी रूप जसं डोळ्यांना सुखावून टाकतं, तशी वसंतात झाडं नवनवोन्मेषानं फुलून येतात. सर्जनशील असणं हे माणसाचं आणि झाडाचं समान वैशिष्ट्य आहे. माणसाला फुलांची आवड, ओढ का असते? कवी ग्रेस म्हणतात- माणसाच्या मेंदूलाच वसंतनाद असतो, म्हणून तो मोगऱ्याची मागणी करतो.
15 फेबु्रवारी ते 15 मार्च या काळातला वसंत पूर्ववसंत असतो. उरलेला वसंत हा उत्तरवसंत. पूर्ववसंत हा आंब्याच्या फुलांचा, पळसाचा तर उत्तर वसंत हा अमलतास आणि गुलमोहराच्या भडक फुलांचा. पूर्ववसंत हा सुगंधोत्सव असतो, तर उत्तरवसंत हा रूपोत्सव.
फळांचा राजा आंबा आणि आंब्यांचा राजा हापूस. भारतात आहेत तितकी आंब्यांची झाडं दुसऱ्या कोणत्याही देशात नाहीत. संस्कृत कवींना आंब्याच्या रसापेक्षा गंध अधिक प्रिय आहे. आम्रमंजिरीच्या दर्शनाने व सुगंधाने स्त्री-पुरुषांच्या अंगी उन्माद संचारतो (असे म्हणतात), म्हणून कामदेव असणाऱ्या मदनाच्या पंचबाणात (म्हणजे पाच फुलांत) आम्रमंजिरीला स्थान मिळाले आहे. गुप्त काळामध्ये मद्य सुगंधित करण्यासाठी आम्रमंजिरीचा उपयोग केला जात असे. आंब्याची कोवळी पाने व मोहोर कलशात घालून शुभ शकुनासाठी समोर ठेवण्याची प्रथा मध्ययुगात प्रचलित होती. अजूनही मंगल कलशात त्यांची योजना केलेली असते.
निसर्गोत्सव पुस्तकात आम्रमोहोराचे बहारदार वर्णन येते. ‘मोहोराचे तुरे किती भरदार, लांब, डौलदार फुलांच्या भाराने लवलेले दिसत. त्यांचे नाजूक तांबूस देठ व पांढरी बारीक-बारीक फुले पहिल्याने हिरवट, मागून पांढरी, पिवळी व काळसर होऊन गळणारी. तांबड्या दांड्यांच्या कैऱ्यांचे बारीक-बारीक मणी चिकटलेले किती मजेदार दिसत आहेत! मोहाराबरोबरच काही ठिकाणी नवी तांबूस-अंजिरी पालवी वाऱ्याबरोबर डुलत आहे. घरात बसून आमरसाचे भुरके मारण्याइतकेच नखशिखान्त मोहोरलेला आंबा पाहणे तेवढेच सुखावह असते, याचे भान किती जणांना असते?
आंब्यावर आणि आमरसावर प्रेम करण्यासाठी किंवा करू इच्छिणाऱ्यांसाठी गो.वि. करंदीकर नावाच्या गुरुजींनी एक चिमुकली मार्गदर्शिका (गाईड) लिहिली आहे. पॉप्युलर नावाच्या दुकानात ती मिळते. आमरस सेवन करणाऱ्यांना त्यांच्याही पुढे जाऊन माझा एक रानटी पण वैज्ञानिक सल्ला आहे. पोळीचा तुकडा रसात बुडवून तो बिलकुल आवाज होऊ न देता खाणे अवैज्ञानिक आहे. हाताच्या खोल्या करून फुर्रफुर्र आवाज करतच तो खाल्ला पाहिजे. माझे आजोबा सगळ्यांच्या वाट्यांमध्ये किंवा द्रोणात रस वाढून झाला की म्हणायचे, ‘पोरं हो, आता लावा घोडे पव्हणीला!’ की आम्ही मोठ्याने फुर्रफुर्र आवाज करत तो संपवायचो. शास्त्र हे आहे की, आपल्या जिभेच्या मध्यभागी काही ग्रंथी असतात, केवळ या पद्धतीने रस खाल्ला तरच त्या स्रवतात! लक्षात ठेवा.
भारतीय संस्कृतीची तोंडओळख करून देताना एका लेखकाने कोकिळा व्रताविषयी फार छान लिहिले आहे. दर अठरा वर्षांनी हे कोकिळाव्रत येते. त्या वर्षी आंब्याची रोपे घरोघरी आणून कुंडीत लावतात. घरातील गृहिणींच्या संख्येत त्या रोपांची संख्या असते. प्रत्येक गृहिणी त्या रोपाची महिनाभर पूजा करते व त्यानंतर ते रोप घराभोवती किंवा शेतात लावण्यात येते. महिनाभराच्या सान्निध्यामुळे प्रत्येक गृहिणीत त्या रोपाविषयी एक प्रकारची आपुलकी, जिव्हाळा निर्माण झालेला असतो. त्यामुळे त्या रोपांचे काळजीपूर्वक जतन केले जाते. त्या आंब्याच्या रोपाचे अठरा वर्षांनी वृक्षात रूपांतर होऊन फलधारणा होते आणि त्या पुढच्या पिढीस त्याची फळे चाखावयास मिळतात.
आपण मदनाला कामदेव केले आणि त्याचे शर म्हणजे बाण हे फुलांना केले. मदनाचे पाच बाण आहेत- पंचशर. अरविंद (लाल कमळ), अशोक, आम्रमंजिरी, जाईचे फूल किंवा मोगरा आणि नीलकमळ. ह्या पाचही फुलांना मार्च महिन्यात बहर येतो. म्हणून ‘वसंतात्मा’ असा गौरव जर कोणाचा करावयाचा असेल, तर तो मार्च महिन्याचाच करावा लागेल. या मदनपारध्याने समाधीत मग्न असणाऱ्या शंकरालाही कामातुर केले, तिथे तुमची-आमची काय कथा! फुलं माणसांतला मदन जागवतात. वसंत ॠतूत याचा कहर होतो.
अशोकाचे दोन प्रकार आहेत. त्यातला खोटा किंवा हिरवा अशोक हा उंचच्या उंच वाढणारा ‘मास्ट ट्री’ आपल्याला बहुधा माहीत असतो. त्याला वसंतात फुलं येत नाहीत. वसंतात फुलणारा अशोक हा सीता-अशोक. आधी लाल रंगाचे त्याचे फुलोरे (पुष्पबंध) पानांच्या बगलेत येतात; नंतर त्यावर प्रथम पिवळसर, नंतर नारंगी व शेवटी लाल दिसणारी फुले येतात. ती मदनाच्या ‘पंचशरां’पैकी एक! अशोकाची पाने लांब, अणकुचीदार, शोभिवंत, कुरळी व नाजूक असतात. म्हणून सुंदरीच्या बोटांना त्याची उपमा देतात. प्राचीन वाङ्मयातील दोहद संकेतानुसार सुंदरीने लत्ताप्रहार केल्याशिवाय अशोकाला फुलेच येत नाहीत. बहरलेला, फुललेला हा वृक्ष पाहणे हा एक नवलनयनोत्सवच असतो.
बा.भ. बोरकर प्रेयसीला सुचवितात- आकळू ॠतू गात्रांनी. आपण सदासर्वकाळ हा प्रयोग करत राहिलं पाहिजे. कडुनिंबाच्या झाडावर वसंत ॠतू सगळ्या संवेदनांच्या दारांतून आकळून घेऊ या. मार्चमध्ये त्याला आलेली नवपल्लवी डोळे भरून पाहा. ती नव्याने डोळ्यांत उतरते, तेव्हा फारच सुंदर दिसते. तांब्याच्या किंवा ब्राँझ धातूच्या रंगाची ती आहे. तिच्यावर हळुवार हात फिरवून पाहा. काही दिवसांत ती हिरवी होणार आहे. पानं लांबट, टोकदार, वाकड्या वळलेल्या करवती कडांची आहेत. गुढी पाडव्याच्या सुमारास पानांच्या बेचक्यात अतिशय बारीक, पिवळसर पांढऱ्या फुलांचे तुरे येतात. एखाद्या सुवर्णकाराने नाजूक कर्णफुले घडवावीत अशी ती असतात. कवी गुलजार यांचं अत्यंत आवडतं असं शैलेंद्रांनी लिहिलेलं गाणं आता ऐका-
मिला है किसी का झुमका
ठंडे ठंडे हरे हरे नीम तले...
पाडव्याला उभारलेल्या गुढीला सजवण्यासाठी लिंबाची पुष्पवंत डहाळी वापरतात. त्यामुळे गुढी अतिशय देखणी अन् शोभिवंत दिसते. गुढी उभारून झाली. पाडव्याचे पुरणवरणाचे किंवा श्रीखंडाचे जेवण. तत्पूर्वी हिंग, चिंच, गूळ आणि कडुनिंबाच्या फुलोऱ्याचे तयार केलेले पंचामृत चाखून पाहा. पुढचे वर्षभर आजार होणार नाही. जूनमध्ये लिंबोळ्या पिकतील तेव्हा त्या आंब्यासारख्या माचून आणि नंतर चाखून पाहा. तारुण्यात कितीही रागीट आणि कडू असलेला माणूस- बहिणाबाई म्हणते म्हातारपणी ‘गोड’ होतो कसा...
कडू निंबोणी शेवटी
पिकीसनी गोड झाली
रूप, रस, स्पर्श या संवेदना तृप्त झाल्या; आता जरा दूर- आणखी दूर कडुनिंबाच्या झाडावरून वारा येईल, अशा जागी थांबून अनुभवा. जगातली लाखो अत्तरं. ज्याच्यावर कुर्बान करावीत, असा एका मंद-मधुर, अनवट सुगंध... एका झाडातून एवढ्या प्रचंड प्रमाणात सुगंधाची निर्मिती करेल, असं दुसरं कोणतंही झाड नाही.
पुष्पपरायण माणसाला हा वसंत ॠतू वेडा करून टाकतो. एक हजार वर्षांपूर्वी लिहिलेली ही चिनी कविता काय म्हणते बघा-
मी जर असतो एखादे झाड
एखादी कळी, एखादं पान
तरीही या वसंत ॠतूची सौम्य सुंदरता
जाणवली असती मला
मग मी तर आहे जिवंत माणूस
नवल कसले यात-
जर मी झालो हर्षाने बेभान, उन्मत्त?
होय फुलांनो, झालोय मी बेभान, उन्मत्त. आपले दोन्ही बाहू पसरून निमंत्रित करतोय तुम्हाला. या, ॠतुराज वसंत दाखल झाले आहेत. आता तुम्ही वेळ नका लावू! मी कोण आहे विचारता? सांगू?
मी रंगवतीचा भुलवा
मी गंधवतीचा फुलवा
मी शब्दवतीचा झुलवा
तुज बाहतसें
ओऽ होऽ! याऽ या, मि.नागकेशर. नागचाफा तुम्हालाच म्हणतात ना? तुमचं शास्त्रीय नाव मेसुआ फेरिया आहे. होय ना? अहो, तुम्हाला कल्पना आहे का- रंग-रूप आणि गंध या दोन्ही निकषांवर भारतातलं सर्वांत सुंदर फुलझाड तुम्ही आहात! तुमची पांढरी सुवासिक फुलं पाहणाऱ्याला वेड लावतात. तुमच्या फुलांच्या मध्यभागी जो पिवळ्या पुष्केसराचा गुच्छ असतो ना, त्यामुळं तुमचं सौंदर्य अनुपम झालं आहे. तुमची कोवळी पालवी वरच्या अंगाला गर्द किरमिजी आणि खालच्या अंगाकडून चंदेरी शुभ्र असते. तुम्हाला खास भारतीय वृक्ष म्हणून गौरविताना आम्हाला धन्य वाटते.
एखाद्या फुलाला मानपत्र द्यायची वेळ आली, तर हा छोटा लेखक निश्चितपणे तुम्हाला देईल. विल्यम जोन्स हे नाव तुम्ही कधी ऐकलंत का? भारतातल्या पहिल्या पिढीतले ते आंग्ल प्राच्यविद्याविशारद. जोन्सनी भारतीय वनश्री सृष्टीवर विलक्षण प्रेम केले. बरं का नागकेशरसर, आपल्या पुस्तकात त्यांनी असं लिहून ठेवलं आहे, ‘मी जगातल्या बहुतेक देशांतली उत्तमोत्तम फुले पाहिली. पण आकार, रंग, सौंदर्य आणि सुगंध या चारही बाबतींत नागकेशराच्या फुलांची बरोबरी करील असे फूल मी अद्याप पाहिलेले नाही.’ बघा पुष्पराज, आता आम्हाला आमचे कामधंदे सोडून तुम्हाला शोधत कोकण, बेळगाव, कारवारचा प्रदेश याच महिन्यात पालथा घालावा लागणार. एरवी औषधांत, काळ्या मसाल्यात तुम्ही भेटता ते रसनेच्या भाषेत. जोन्सनना जसे दिसलात, भावलात, तो अनुभव आम्हाला घ्यायचा आहे.
‘माझ्या गोव्याच्या भूमीत, चाफा पानावीन फुले’ असे बोरकर ज्या चाफ्याविषयी लिहितात, तो खुरचाफा असला पाहिजे. त्यालाच पांढरा चाफा म्हणून संबोधतात. त्याचे झाड खूप वाढते. लांबट पानांना त्यांच्या लांबीइतकी शीर असते. खोड वेडेवाकडे वाढते. अनाग्रही झाड आहे बिचारे. एखादी छोटी फांदी मातीत खुपसून थोडे पाणी दिले की, कुठेही वाढायला लागते. मार्चमध्ये हा ‘पानावीन’ फुलतो. गोव्यातच काय, कुठल्याही देवळात तो हमखास सापडेल. म्हणून याचे एक नाव ‘टेम्पल ट्री’ असेही आहे. फ्लुमेरिया ॲक्युटिफोलिया असे त्याचे शास्त्रीय नाव असून, हा मेक्सिकोतून आलेला वृक्ष आता भारतभर आढळतो. वसंत ॠतूत प्रामुख्याने फुलणारा कवठी चाफा दाट हिरव्या पानांचा सदाहरित वृक्ष आहे.
त्याची फुलं पिवळसर पांढऱ्या रंगाची असून फांद्यांच्या टोकाकडे एकेकटी येतात. सगळ्यात सुंदर आणि भारीचा चाफा आहे सोनचाफा. त्याचे फूल एक रुपयाला मिळते. मंद पिवळ्यापासून गडद सोनेरी रंगापर्यंत याच्या अनेक छटा आहेत. सोनचाफ्याला आपण ऑगस्ट महिन्यात पुन्हा भेटणार आहोत. भारतीय मनाला चाफ्याचे विलक्षण आकर्षण आहे, एवढे मात्र खरे. म्हणून तर मुलीचं नाव चंपा असतं. आपण माणसांना नाव देऊन फार कमी फुलांचा गौरव करतो, नाही का?
खिरणी या नितांत सुंदर झाडाशी माझे पिढीजात भांडण आहे. जशी आमराई, जांबवाडी असते, तशी खिरणीची प्रचंड संख्येची एकत्रित झाडं जहागिरीचा भाग म्हणून आम्हाला मिळाली होती. पण सहा पिढ्यांपासून आमची वाटणी मिळाली नाही. एरवी मला आमच्या खिरण्यांचा केवढा अभिमान वाटला असता! क्षीर म्हणजे खीर, दुधाची खीर. खिरीसारख्या गोडवा या फळांना असतो आणि ती मार्चमध्ये येतात. ही फळं नाही, पण वाटणीचे दुःख मला दर मार्चमध्ये खायला येतं. जाऊ द्या!
खिरणीचं झाड आंबा, बकुळ आणि चिकू या तिन्ही झाडांची एकत्रित आठवण करून देणारं सदाहरित झाड आहे. पावसाळा संपता-संपता त्याला फुलं येतात आणि हिवाळ्यात खारकी बोरांसारखी फळं लागतात. सुरुवातीला हिरवी असणारी ही फळं मार्चमध्ये पिवळी होतात. खाण्याजोगी होतात. जिंतूरला आमच्या वाट्याची खिरणीची झाडं आता माझा चिरदाह झाली आहेत.
बकुळीची फुलं कुणाला आवडत नाहीत? मार्चमध्ये बकुळ फुलायला लागते. तिची फुलं सुगंधी असून टिकाऊही असतात. फुलं वाळतात, पण कुजत नाहीत. वाळलेल्या फुलांनाही गंध येतो. ती ज्या मातीत उभी आहे, तिच्याखालची मातीही गंधवती झालेली असते. या फुलांचा एकंदर देखावा केसाळ असतो, म्हणून संपूर्ण झाडालाच केसरवृक्ष म्हणतात. तिची खाली गळून पडणारी फुलं म्हणजे केवळ केसर आणि केसरकल्पांची मंडले असतात. ती माळा करण्यासाठी सोयीची असतात. बकुळफुलांचा उपयोग मद्य सुगंधी करण्यासाठी प्राचीन काळात करीत असत. बकुळाच्या प्रदलापासून अत्तर निघते पावसाळ्यातही बकुळीला फुले येत राहतात. ती वसंत ग्रीष्मातल्यापेक्षा कमी असतात, एवढेच.
इंदिरा संतांची ‘लयवेल्हाळ’ नावाची कविता बकुळीवर आहे. त्या कवितेच्या सुरुवातीला त्यांनी बकुळीसाठी ‘ओवळी’ हा शब्द वापरला होता. ओवळी हे बकुळीचं कोकणी नाव. जिची फुले ओवायला येतात, ती ओवळी! बकुळीच्या वृक्षाखाली सकाळ-संध्याकाळ मुली फुले वेचतात आणि केळीच्या सोपटाच्या दोऱ्यात ओवून त्यांचे ‘वळेसर’ करतात. ओवळीचा सर याचेच संक्षिप्त रूप वळेसर हे झाले असावे, असे इंदिरा संतांना वाटते. महाकवी कालिदासाचं हे सर्वांत आवडतं फूल. पार्वतीच्या कमरेभोवती जी मेखला होती ती सोन्या-चांदीची नव्हती, ती होती बकुळफुलांची. कामदेव मदनाच्या धनुष्याची प्रत्यंचा बकुळफुलांची होती.
सेवाग्रामला महात्मा गांधींनी लावलेला एक पिंपळ आहे, त्याच्या शेजारी कस्तुरबांनी लावलेली बकुळ उभी आहे. शाहीर अमरशेखांनी ‘आपल्या समाधीवर बकुळीचे झाड लावावे’ असे लिहून ठेवले होते. बकुळीबद्दल गो.नी.दां.शी बोलताना त्यांनी बकुळीला हिंदीत ‘मौलश्री’ असे नाव असल्याचे सांगितल्यावर त्या नावाच्या व्यंजनेवर मी बेहद्द खूष झालो. बकुळीच्या फुलांची नाजूक रचना पाहताना मला तिचं इवलेपण आणि नक्षीदारपणा निसर्गाने जणू सुवर्णकारांसाठी आव्हान म्हणूनच तयार करून ठेवलाय, असे वाटायचे. बायकोला बकुळहार करू शकलो, याचा मला केवढा आनंद झाला! विशेषत: त्याला ‘मॅचिंग’ आणलेली, बकुळपुष्पांची कर्णफुले कसली गोड दिसत होती! खरोखर वनस्पतीसृष्टीतले बकुळीचे अस्तित्व लाजबाब आहे.
सिल्व्हर ओक मी पहिल्यांदा पाहिला चिखलदऱ्याच्या बागेत. हे महाशय ऑस्ट्रेलियाचे. एकोणिसाव्या शतेकाच्या उत्तरार्धात तो भारतात आला आणि सर्वत्र पसरला. त्याची ओळख पटते पानांवरून. पाने संयुक्त प्रकारची, 20 ते 30 सेंमी लांबीची, पिसाच्या आकाराची आणि सुंदर घडणीची असतात. याची पाने बारा महिने दिसतात. मार्चमध्ये पानझड होणे आणि लगेचच नवी पाने येणे हे कधी घडून गेले, कळतही नाही. धुळीने माखलेल्या शहरात याच्या पानांचे सौंदर्य कळत नाही. पाचगणीला भरपूर म्हणजे 25-30 मीटर वाढलेले सिल्व्हर ओक दिसतील. एरवी सिल्व्हर ओकची फुलं कधीच दिसत नाहीत. डॉ.सुनीला रेड्डींना एकदाच महाबळेश्वरला अनपेक्षितपणे दिसली अन् त्या हरखून गेल्या.
‘शंभर-दोनशे छोटी फुलं असलेले हे वीतभर लांबीचे तुरे म्हणजे निसर्गाच्या अदाकारीचा उत्तम नमुना. मातकट चॉकलेटी देठांवर असलेल्या पिवळट हिरव्या रंगाच्या कळ्या, त्या कळ्या उमलल्यावर दिसणारी स्वल्पविरामा-सारखी पिवळी फुलं, इवल्याशा नखुल्याएवढ्या चॉकलेटी दोन पाकळ्या अन् बरोबर मध्यात अडकलेला पिवळा स्त्री-केसर; दोन इवले हिरवे ठिपके खाली-वरती बीजकोश अन् त्याच्या देठाचे. फुलं उमलता-उमलता त्या चॉकलेटी पाकळ्यांच्या मिठीतून पिवळा केसर आपली हळुवारपणे सुटका कधी करून घेतो अन् त्या पंखुडिया विरहाने कधी गळून पडतात, ते कळतच नाही. मातकट देठावर तो पिवळा, दोन हिरवे ठिपके असलेला केशराचा गुच्छसुध्दा खुबसूरत दिसतो.
शंकासुर हे एक आवडते, दिसायला सुंदर ठिबक-ठाकडे झाड आहे. गुलमोहराची छोटी आवृत्ती वाटावी अशी त्याची फुलं. त्यातून मोराच्या तुऱ्यासारखे पुंकेसर ऐटीत बाहेर येतात, म्हणून त्याचे एक नाव ‘पिकॉक फ्लॉवर’ असेही आहे. मार्च आणि सप्टेंबर असा दोनदा त्याला बहर येत असला, तरी आपल्या रंगवैभवाने मिरवणारी ही फुलं वर्षभर दिसतात.
असं म्हणतात की, ब्राझील या देशाने जगाला तीन महान गोष्टी दिल्या- फुटबॉल, कॉफी आणि जॅकरँडा. निळ्या रंगाची फुलं एकूणच कमी. जॅकरँडा आपल्याकडे निळाई घेऊन आला. हे छानच झाले. आपण त्याला नीलमोहोर हे नाव देऊन अजून आपलंसं केलं. गुलमोहोर किंवा शंकासुराइतका अजून तो सर्वत्र झाला नाही, पण पुण्यात खूप आहे. म्हणून तर पुण्यातील वसंत बापटांनी त्याच्यावर पूर्ण कविता लिहिली. मात्र ती पुण्यापुरतीच खरी आहे.
जॅकरँडा जॅकरँडा
वाट भरून, घाट भरून
बागांमध्ये जागा धरून
इथे तिथे जिथे तिथे
वळणावरून फिरून फिरून
खूप खूप जॅकरँडा...
देविकाराणी या अभिनेत्रीने रशियाहून येताना एका सुगंधी झाडांची रोपं आणून त्यांची बंगळुरू भागात लागवड केली. बरसेरा त्याचे नाव. बंगळुरूहून 1970 च्या नंतर बरसेराची काही रोपं पुण्यात आली. त्यापैकी एक झाड पुणे विद्यापीठात आहे. तेही सर्वत्र व्हावे, ही इच्छा. कारण गुग्गळ, सालईप्रमाणे सुगंधी द्रव्य देणाऱ्या ‘धूपकूळ’ या फॅमिलीत त्याचा समावेश होतो. धन्यवाद देविकाराणी!
कॉपर पॉड किंवा पेल्टोफोरम हा पिवळ्या फुलांचा वृक्ष आला श्रीलंकेतून आणि सगळीकडे खूप-खूप झाला आहे. उंच आणि मोठा वाढणारा हा अनाग्रही वृक्ष वसंत ॠतूत नवी पालवी येते तेव्हा फारच सुंदर दिसतो. त्याला लोखंडाच्या गंजाच्या रंगासारख्या शेंगा येतात, म्हणून याच्या नावाला ‘फेरूजीनियस’ लागले. मार्चमध्ये आलेल्या पिवळ्या फुलांचा बहर मेअखेरपर्यंत चालतो. इतकेच नाही, तर जुलै-ऑगस्टमध्ये पुन्हा छोटा बहर येतो. तशी तर वर्षभर काही पिवळी फुलं याच्यावर दिसतातच. डोळ्याला बरे दिसण्याखेरीज कोणताही चांगला गुण यात नाही.
पांढरा कुडा या औषधी वनस्पतीला मार्चमध्ये फुले येण्यास आरंभ होतो आणि हा बहर जुलैपर्यंत चालू राहतो. शुभ्र आणि सुवासिक अशी त्याची फुले गुच्छानेच येतात, संस्कृतात त्याला कुटज असे नाव आहे. सातवीण, करवंद, कण्हेर यांच्या कुळामध्ये त्याचा समावेश होतो. काळा कुडाही असतो.
कढी, पोहे, आमटी किंवा भाजीच्या कुठल्याही फोडणीत ज्याची सुगंधीत पानं वापरतात, तो कढीपत्ता कुणाला माहीत नाही? बिचारा! पण पदार्थांना त्याने एकदा स्वाद आणून दिला की, ताटातून किंवा वाटीतून तो बाजूला काढला जातो. बागेत कढीपत्ता लावण्याचा प्रयोग मी चारही घरांत केला आहे. आणताना सुगंधी असल्याची नीट खात्री करूनच तो लावावा, कारण काहींना मुळीच सुगंध नसतो. वसंत ॠतूत त्याला फुले येतात. पावसाळ्यात मोठ्या झाडाच्या पायथ्याशी कोवळी-कोवळी अनेक रोपे उगवतात. कढीपत्त्याला कढीनिंब असेही म्हणतात.
रानपांगारा हा कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात आढळणारा वृक्ष मार्चमध्ये जेव्हा फुलांच्या ऐन बहरात असतो, तेव्हा आपले डोळे त्याला टाळू शकत नाहीत. परिचित पांगाऱ्यापेक्षा रानपांगाऱ्याच्या फुलांचा रंग जास्त भडक आणि तेजस्वी असतो. दोन-तीन फुलांच्या गुच्छाने दाटीवाटीने ही फुले फांद्यांवर येतात. हा अस्सल भारतीय वृक्ष शोभा वाढविणारा असल्याने मोठ्या प्रमाणात त्याची लागवड व्हायला हवी.
अमुक एका झाडावर प्रेम करा, हे सांगण्यापेक्षा अमुक एका झाडावर प्रेम करू नका- हे सांगणे मला जिवावर येते. महाराष्ट्रात मधुमालती म्हणून ओळखली जाणारी वेल त्यापैकी एक आहे. तिच्यावर प्रेम करू नका, असं मला सांगायचंय. पण प्रेम आंधळ असतं, हेही खरं आहे. या झाडाला रंगूनचा वेल किंवा बारमासी म्हणतात. मालतीची फुलं अशी असतात का? अशी दिसतात का? मधुमालती म्हणताना तुम्हाला यात मालती दिसलीच नाही, तरी तिला हे नाव? बरं, मालती हे अत्यंत सुगंधी असं फूल आहे. तुम्ही मधुमालती म्हणता, त्याला कुठे आहे सुगंध? म्हणजेच प्रेम करणाऱ्यांना धड काही दिसत नाही, तसंच त्याचा धड वासही घेता येत नाही. याचा अर्थ तुमचं प्रेम नुसतं आंधळंच नाही, तर ‘सर्दुलं’सुध्दा आहे. तर ही तुमची तथाकथित मधुमालती किंवा मालती नसून रंगूनचा वेल किंवा बारमासी आहे.
वनस्पतीशास्त्रीय नाव कॉमब्रेटम इंडिकम असून पानांच्या कक्षात फुलांचे खाली लोंबणारे तुरे येतात. बहुधा खऱ्या मधुमालतीला आपण पावसाळ्यात भेटणार आहोत. तिचे वनस्पतीशास्त्रीय नाव ॲगॅनोस्मा सायमोझा आहे. बंगालमधून घेऊन याना तिची रोपं. या मालतीचं ‘मधु-मालती’ हे रवींद्रनाथ टागोरांनी केलं असावं. या नावानं त्यांची छान कविता मराठीतसुध्दा अनुवादित आहे. ती कविता वाचून आपण या नावाच्याच प्रेमात पडलो आणि भलत्याच वेलीला मधुमालती म्हणत राहिलो. अगदी डॉ.शरदिनी डहाणूकर यांच्याकडूनसुध्दा ही चूक होत राहिली. असो.
जिला मधुमालती समजून मी तिच्यावर प्रेम केलं, कविता लिहिल्या, कवितेत प्रतिमा म्हणून आणले; ती मधुमालती नाही, हा धक्का माझ्यासाठी मोठा होता. पण एवढ्यावर तो थांबला नाही, आणखी एक धक्का बसला. म्हणजे हे कसे झाले? तर-
‘‘बाळू, तुला एवढं घाबरून थरथरायला काय झालं?’’
‘‘मी ज्याला साप समजून काठीने मारायला गेलो तर ती दोरी निघाली.’’
‘‘ठीक आहे ना, मग थरथरा कापतोस कशासाठी?’’
‘‘मी काठी समजून मारायला घेतली, तो साप निघाला!’’
म्हणजे असं की, बंगालमधला महावेल मालती- ॲगॅनोस्मा सायनोझा- हीसुध्दा खरी मधुमालती नाही आणि टागोरांनी लिहिलेली कविता तिच्यावरची नाही. वैताग साला! थांबवायचा का शोध खऱ्या मधुमालतीचा? का जाऊ या, या गुलबकावलीपर्यंत? ठीक आहे, तुम्ही म्हणता तर जाऊ या. खऱ्या-खुऱ्या मधुमालतीकडे. महाकवी कालिदास जिच्या प्रेमात पडला, अभिज्ञान शकुंतलम्मध्ये जिचं भावोत्कट असं सौंदर्यदर्शन कालिदास घडवतो आणि कालिदासानं जिला ‘वसंतदूती’ हे बिरूद बहाल केलंय, ती मधुमालती.
कालिदासाने दिलेलं वसंतदूती हे नाव अगदी अन्वर्थक आहे, कारण मधुमालतीला फेब्रुवारीत फुलं यायला लागतात. वसंत ॠतूच्या आगमनासोबतच ती हळूहळू बहरायला लागते. हा वेल प्रचंड मोठा वाढणारा, भरपूर पसरणारा आणि बहुवर्षायू असा महावेल आहे. त्याचा बुंधा पंधरा ते पंचवीस सेंमी एवढा वाढू शकतो आणि एखाद्या वृक्षाचे वाटावे असे त्याचे लाकूड असते. सदाहरित असा हा महावेल फुलतो, तेव्हा दूरपर्यंत सगळ्या आसमंतात त्याचा सुगंध दरवळतो. फुलं पांढरट पिवळी दिसतात याचे कारण, पाच पाकळ्यांपैकी एक थोडी लहान पण पिवळसर रंगाची असते. या वेलीचे शास्त्रीय नाव Hiptage benghalensis असे आहे. ॠतूसंहाराच्या वि.वा. भिडे यांनी केलेल्या मराठी भाषांतरात मात्र हे नाव Aganosma Caryophyllata
Don. Apocynacege असं दिलं असून ‘ॠतुसंहार’च्या सर्ग 2-24 आणि 3-18,19 मध्ये या वेलीचा उल्लेख आला आहे. सबंध देशभर- विशेषत: हिमालयाच्या पायथ्याच्या शिवालिक पर्वतापासून सह्याद्रीच्या जंगलापर्यंत हा महावेल सापडतो- मधुमालती.
पळसवेल नावाचा महावेल मार्चमध्ये फुलतो. त्याची फुले रंग आणि रूपाने पळसासारखीच असतात, म्हणून याचे संस्कृतात नाव लतापलाश असे आहे. उन्हाळ्यात त्याला शेंगा येतात, त्या शेंगांना पळसपापड्या म्हणतात. उत्तर कोकण आणि पुणे जिल्ह्यातील मुळशी भागातल्या जंगलांमध्ये आढळणारा पळसवेल एकंदरीत दुर्मिळच म्हणावा लागेल. पेंटकूळ, येकेल किंवा गरुडवेल नावाच्या महावेलाला याच काळात मोहोरासारखी असंख्य तांबूस, लवयुक्त फुले येतात. मूळ दक्षिण अमेरिकेतल्या उष्ण कटिबंधातून आलेला पोपटवेल किंवा बदकवेल मार्च ते ऑगस्ट या काळात बहरतो. अतिशय सुंदर आणि मोठी फुले असल्याने त्याला बागेत मुद्दाम लावतात.
वाघाटी किंवा गोविंदफळ नावाचा महावेल आठवतो. आषाढी एकादशीचे पारणे सोडताना- का कुणास ठाऊक- त्याच्या फळाची भाजी आवर्जून केली जाते. कुंपणावर ही वेल वाढलेली मी पाहिली आहे. आणखी एक वेल तारेच्या काटेरी जाळीपेक्षा भक्कम कुंपण असलेली लक्षात आहे. ती म्हणजे सागरगोटा. त्याच्या फळाला गजगे म्हणतात आणि मुली त्यांचा छान खेळ खेळतात. काटेरी डबी (पेटी) ठेवल्यासारखे हे गजगे वेलीवर येतात. सुरक्षित अंतर ठेवून, हा वेल जरूर पाहण्यासारखा आहे. अनंतवेल, उक्षी, मंडवेल, वतनवेल, सोनजाई याही वेलींना मार्चमध्ये फुले येतात.
बी.रघुनाथ माझे लाडके कवी. त्यांच्या एका कवितेवर कृष्णकमळ कसलं छान उगवलंय पाहा-
कृष्णकमळ जणू रात उमलली
प्रीत आपुली तिलाही कळली
कोमल तमतंतूंनी बघते
आपुले तुटले अंतर जुळवुनी
कृष्णकमळाच्या पाकळ्यांत जे केस असतात, त्यांचा रंगही काळसर असतो. त्यांना कोमलतम तंतू म्हणणे किती सुंदर आहे! इंग्रजीत पॅशन फ्लॉवर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या वेलीच्या भारतात एकूण सहा जाती आहेत. त्यांतली एक वन्य असून तिला पांढरी फुले येतात आणि त्यांना किंचित दुर्गंध येतो. उर्वरीत सर्व जाती उपवन्य आहेत. तणाव्याच्या साह्याने आधारांवर चढणारे कृष्णकमळ बागेत, मांडवावर, कमानीवर किंवा घराच्या काही भागावर चढवितात. कृष्णकमळाची फुले मोठी, आकर्षक, व्दिलिंगी, नियमित अशी असतात. फुलात पाच परिदले असतात. प्रदलांना खाली-वर आयाळ असते. या आयाळीला पुष्कळ केस तंतुमय असतात. वसंतात सुरुवात होत असली तरी कृष्णकमळाला पावसाळ्यात अधिक फुले येतात. गंध तर सुंदर असतोच.
कमळ या फुलाइतके सौंदर्य जगात कुठेही नाही. उगीच नाही सौंदर्यप्रेमी भारताने त्याला आपले राष्ट्रीय फूल बनविले! कमळाला वर्षातून तीन वेळा फुलं येतात. म्हणून आपल्या ॠतुचक्रात त्याचा गौरव आपण कमीत कमी तीन लेखांत करणार आहोत. कमळफुलाचे आयुष्य तीन वर्षांचे असते, तर कमळाचे बी हजारो वर्षे टिकते.
मदनाचा बाण असलेले- कामशर- सुगंधित असलेच पाहिजेत. लाल रंगाची कमळं विशेष सुगंधित असतात. निळ्या रंगाची कमळे- नीलोत्पलदेखील सुगंधी असतात. नीलकमळाने मध सुगंधित करतात आणि नील कन्दोट्टाने जल सुगंधित होते, असे गाथा सप्तशतीत (अनुक्रमे गाथा 534 व 622) म्हटले आहे. गाथा सप्तशतीत कमलपुष्पांइतके उल्लेख दुसऱ्या कोणत्याही फुलांच्या वाट्याला आले नाहीत.
कमळाच्या सुगंधाचे फार सूक्ष्म आकलन महाकवी कालिदासाला होते. ‘मेघदूत’मधील एका श्लोकात ‘प्रत्युषेषु स्फुटितकमला मोदमैत्रीकषाय:’ असे वर्णन येते. शांता शेळके या रसिकतेचा परमोत्कर्ष. त्यांनी या ओळीचे आकलन ‘उमलत्या कमळांचा कडवट, गोड स्वाद ही मुखचुंबनाची सुगंधी रुची’ या शब्दांत केले आहे.
दुर्गा भागवतांनी ‘भावमुद्रा’मध्ये एक जुनी कथा सांगितली आहे- वेदकाळाची. उषेच्या लग्नप्रसंगी देवांनी भूमीतल्या गंधातला अर्क काढून तो कमळांत भरला आणि ती अभिनव भेट तिला दिली. कमळाच्या गंधाला निखळ मधुर गंध असे कुणीही म्हणत नाही, तर त्या गंधाच्या कडवट छटेचा उल्लेख प्रत्येक जण करतो. हेच कमळगंधाचे वैशिष्ट्य आहे, असे म्हणता येईल. या अनोख्या गंधाच्या निर्मितीचे श्रेय मात्र कवी ब्रह्मदेवाला देतात.
सौवर्णानि सरोजानि निर्मातुं सन्ति शिल्पित:
तत्र सौरभनिर्माणे चतुरश्चतुराननं
अर्थ- कोणताही कुशल कारागीर सुवर्णाची आकर्षक कमळे तयार करू शकेल. ती लोकांना मोह पाडतील. पण ताज्या सोनकळ्यांमध्ये अंगचा सुगंध पेरून ठेवण्याची किमया फक्त ब्रह्मदेवाजवळ असते. कोणत्याही कारागिराची ती ऐपत नाही.
आपल्या कवितेतून ‘पृथ्वीचे प्रेमगीत’सारखी भव्य रूपकं निर्माण करावीत फक्त कुसुमाग्रजांनी. त्यांचे हे रूपक कमलामुळे मला आवडते.
आकाशाच्या सरोवरात
पृथ्वीचे हे विराट कमलपुष्प उमललेले आहे
आणि तो भ्रमरचंद्र
आपले रुपेरी पंख पालवून
त्या कमलाभोवती अखंड गुंजारव
करीत आहे
त्या कमळाच्या पाकळीवर
एक सुंदर दवबिंदू पडला आहे-
त्याचे नाव जीवन.
Tags: ब्राझील निसर्ग फुल सिल्व्हर ओक कोकण रानपांगरा जॅकरँडा सर्जनशील वसंत ॠतू मार्च महिना brazil nisarg ful silvhar oak kokan ranpangra jakranda sarjanshil wasant rutu march mahina weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
प्रतिक्रिया द्या