डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

नोव्हेंबर : दिवस सुगीचे सुरू जाहले!

शेतकऱ्यांच्या जीवनात मोठ्या सुगीत- म्हणजे नोव्हेंबर-डिसेंबरात येणारी खळीदळी. खळं म्हटलं की, ते ज्वारीचं. इतकं साग्रसंगीत खळं इतर कोणत्याही पिकाचं होत नाही. एक प्रकारे सुगीचा कळसाध्याय असतो खळं. पुढील सर्व वर्ष याच पिकावर अवलंबून असतं. पुढील वर्षीची ज्वारी येईपर्यंत ही ज्वारी पुरली पाहिजे, असा ध्यास असायचा. पूर्णपणे पक्व झालेली ज्वारी ‘पाडायला’ आली की, खळ्याचा सोहळा सुरू होई. पाच-सहा माणसं आपापली पाती धरून ज्वारी पाडायला आरंभ होई.  गोळा केलेल्या ज्वारीच्या पेंढ्या बांधून जिथे खळे करायचे, त्या जागेभोवती गोल रचून ठेवत. पाणी टाकून आणि धम्मस करून ही जागा खळ्यासाठी पक्की करून ठेवत. खळ्याचे सात टप्पे करता येतील. पाडणी, बांधणी, गूड गोळा करणे, मोडणी, मळणी आणि शेवटी उधळणी. पहिले तीन टप्पे पुरुषगडी पार पाडत.

नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला आपण काही वेलींबरोबर रांगणार आहोत. सुरुवात करू या,  मायाळूच्या वेलापासून. हा बहुवर्षायू, भराभर वाढणारा आणि खूप पसरणारा वेल आहे. त्याच्या लालसर-जांभळट गुळगुळीत फांद्या आणि खोडे फारच सुंदर दिसतात. पाने हिरवी, मध्यम आकाराची, जाडसर, मऊ, गुळगुळीत असतात. नोव्हेंबरात फुलांचा बहर असतो. मायाळूच्या पानांची भाजी, सूप आणि भजी करतात, ती अतिशय चवदार व पौष्टिक असतात. फळांपासून जांभळा-तांबडा रस निघतो, तो नैसर्गिक खाद्यरंग म्हणून वापरतात. रबरी शिक्क्यांची जांभळी शाई बनविण्यासाठी ही फळे वापरली जातात. छानच वेल आहे हा. कुंडीत, घरातही लावता येतो. जरूर लावावा. मायाळूला वेलबोंडी व पुई अशीही नावे आहेत.

सध्या आंबगूळ किंवा आंबुळगी हा वेलही फुलांनी बहरला आहे. कोवळ्या फांद्या आणि पानांवर चमकदार चंदेरी सूक्ष्म खवले असणे, हे आंबगुळीचे खास वैशिष्ट्य! त्यामुळे वेल सुंदर दिसतो. फुलांच्या तुऱ्यामध्ये मोठ्या संख्येने छोटी फुले असतात. फुलांवरसुद्धा चमकदार चंदेरी केस किंवा खवले असतातच. फुलात जोडली गेलेली चार सूक्ष्म परिदले आणि चार सुटे पुंकेसर दिसतात. फळे खाण्याजोगी आंबट-गोड असून मे महिन्यात पुण्याच्या बाजारात विकायलाही येतात.

मसाल्याच्या पदार्थांतील महत्त्वाचा घटक असणारी काळी मिरी सर्वांनी पाहिलेली असते. तिची चव झोंबणारी आणि तिखटसर असून त्याला विशिष्ट स्वाद असतो. काळ्या मिरीचा वेल असतो. तो दुसऱ्या वृक्षाच्या खोडावर वाढतो. नोव्हेंबरात त्याला फुलोरे येतात आणि उन्हाळ्यात फळे धरतात. अंगावर पित्त उठले की, आजी मला साजुक तुपाबरोबर काळी मिरी चावून खायला लावायची.

बाजीरावी घेवड्याला पेशव्यांचे नाव का दिले, माहीत नाही; पण प्रचंड उंच वाढणारा महावेल आहे हा. ऑक्टोबरपासून त्याच्या फुला-फळाचा हंगाम सुरू होत असला, तरी आता तो ऐन बहरात आहे. त्याच्या कोवळ्या कच्च्या शेंगांची भाजी करतात. एक मोठा वेल चार-पाच कुटुंबांना आठवड्यातील तीन-चार दिवस भाजी पुरवू शकतो. बियांची उसळसुद्धा छान होते. शेंगांची भाजी पौष्टिक आणि सारक असते. घेवड्याचे आणखी दोन-तीन उपप्रकार ज्ञात आहेत.

ज्येष्ठ समीक्षक डॉ. द. भि. कुलकर्णी यांनी त्यांच्या अंगणात बसलो असताना मला अचानक प्रश्न केला, ‘‘बालकवींनी फुलराणी ही त्यांची कविता कोणत्या फुलावर लिहिली?’’ या आकस्मिक प्रश्नानं मी भांबावून तर गेलोच, पण हा प्रश्न आपल्याला कधीच कसा पडला नाही याचे नवल वाटले. मला फार कोड्यात न ठेवता त्यांनी त्यांच्या अंगणातील एक चिरपरिचित गवत दाखवलं. त्याला एका लांब दांडीवर एक-एकटे फूल होते. तीच ती बालकवींची फुलराणी. एखादे दिव्य ज्ञान व्हावे, तशी अनुभूती आली आणि माझ्याशी ती ‘फुलराणी’ बोलायला लागली. आपली स्वयंवरकथाच तिने मला सांगितली.

फुलराणी (एक दांडी / Tridax procumbens)
    पाने, बाप, काका, मामा
    पेंगतात, लोळतात
    खडबडून उठती
    येता मुलगी वयात

    कडे करून पानांचे
    कौतुकाने उचलते
    मीही ठावो न सांडिता    
    रविकराला भेटते

    रूप पाहता दर्पणी
    न दिसे वो आपुले
    नवरदेवाच्या रूपाचे
    मीही छान फूल झाले

    (चाल बदलून)
    जिराफ मानेखालील माझ्या
    कॉलर झाली ताठ त्या क्षणी
    द. भि. म्हणाले, माझ्या कवीला
    ‘बालकवींची मी फुलराणी’

एकदांडी, दगडी, जखमजोडी या वनस्पतीची सर्वांना विनंती आहे की, यापुढे तिला फुलराणी हे नाव मिळावे. याच नावाने तिला संबोधले जावे. फुलराणी ही एक विज्ञान कविता आहे. कारण जमिनीवर लोळणारी या जातींतील ही वनस्पती तिला फुलं आली की, उठून उभी राहते.

कारवी नावाचे एक वैशिष्ट्यपूर्ण झुडूप सातारा जिल्ह्यात पाहायला मिळते. याचे वैशिष्ट्य हेच की, त्याला आठ-दहा वर्षांनी एकदाच फुले येतात. मध्य भारतातही ते आढळते. इतर वेळी म्हणजे फुले नसलेल्या वर्षात नुसती हिरवीगार पाने फक्त असतात. फुलाला हिरवी छदे असतात. सुंदर जांभळा रंग फुलांना असतो. कास पठार, आंबोलीचे कावळेसाद पठार, राजगड, माथेरान आदी ठिकाणी कारवी फुलल्याचे कळणे ही पर्यटकांसाठी पर्वणी असते. कारवी मधमाश्यांची फार आवडती फुले आहेत. या मधात काही विशेष औषधी गुण असतो, असे म्हणतात. उघड्या टोपलीच्या आकारात वाढणारी माळ-कारवी हे कास पठाराचं खास वैशिष्ट्य आहे. फुलण्याच्या वर्षी ही फुलं ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्येच येतात.

ज्याच्या असे असण्याची कल्पनाच मोठी सुंदर आहे, त्या लाजाळूच्या झुडुपाला इथेच भेटून घेऊ. हे गुडघ्याइतके उंच होते. याच्या खोडाला काटे असतात. याच्यासंबंधी आश्चर्याची गोष्ट म्हणजे, त्याची पाने आपला अंगस्पर्श जरा जोराने झाला की मिटतात, ही होय. जनावराचेसुद्धा तोंड लागले किंवा जोराने वारा आला, तरीसुद्धा असे घडते. या चमत्काराला पाहून जनावरेसुद्धा बिचकतात. गंमत आहे, नाही?

मी असे एक सुंदर वाक्य वाचले, ज्यामुळे झाडांकडे पाहण्याचा माझा दृष्टिकोनच बदलून गेला. ते वाक्य आहे,  Ugly tree is yet to be born. जगात कुरूप म्हणता येईल, असे झाड अजून जन्मायचे आहे. प्राणी कुरूप असतात, असू शकतात; पण झाड मात्र कधीही कुरूप असू शकत नाही. फक्त आपला दृष्टिकोन बदलणे आवश्यक आहे. माणसाने केवळ आपल्या उपयुक्ततेच्या भूमिकेतून झाडांकडे पाहणे अन्यायकारक आहे.

बिब्बा या झाडाचे उदाहरण घेऊ. माझ्या आजीला बिब्ब्याचे अनेक औषधी उपयोग माहीत होते. बाकीचे जग मात्र बिब्ब्याला भिणारे, त्याचा तिरस्कार करणारेच मी पाहिले आहे. मला दहा-अकरा वर्षांपर्यंत ‘पोटातलं येण्याचा’ त्रास होता. एखाद्या भात्यासारखे पोट छातीच्याही वर उडायचे. आजी गोडेतेलाच्या दिव्यावर बिब्बा धरून त्याचे तीन-चार मोठे थेंब दुधात पाडायची आणि ओठ किंवा आजूबाजूला त्याचा संसर्ग होणार नाही, अशी काळजी घेत मला ते प्यायला लावायची. बिब्बा ठेचून, चुन्यात कालवून पायाला लावला तर पाय दुखणे थांबायचे. सुईच्या अग्राने ती डोळ्यांतसुद्धा बिब्बा लावायची. ठेच लागली तर ठेचून लावलेला बिब्बा जखम त्वरित बरी करायचा. इकडे शाळेत मला मातीचे वांगे आणि बिब्बा ही दोन फळं करायला आवडायची, कारण त्यांचे रंग. काळ्या गोट्याखाली शेंदरी फूल किती गोड असे; फक्त ते खाताना तोटरा बसायचा. मग आम्ही वासणीच्या वेलाचा दोर करून त्यात हे शेंदरी बिब्बेफूल ओवायचो. बिब्ब्यासारखे सुंदर औषध नाही, एवढे मात्र खरे!

दोन सुगंधी पानांनी मला खूप तरसत ठेवलं आहे. त्यातलं एक पान केवड्याचं. कवितेत आणि गाण्यात खूप भेटला, पण प्रत्यक्षात कमी. एक तर त्याचं घडी केलेलं पान एखाद्या पुरंध्रीच्या केशकलापात असायचं किंवा गणपतीच्या पूजेत. कोकणात जेव्हा पहिल्यांदा गेलो, तेव्हा दिवेआगरला समुद्रकिनाऱ्यावर केवड्याचे बन पाहून अक्षरश: वेडा झालो. इतकी झाडं, इतकी कणसं, इतकी पानं... वाह वा! प्रत्येक झाडाला जवळजवळ पंचवीस-तीस पिवळीधम्म कणसे होती. केवड्याचे अत्तर मात्र मला आवडत नाही. उग्र सुगंधाच्या बाबतीत मी रजनीशभक्त आहे. केवड्याच्या पानाचा एक तुकडा भातात शिजवताना टाकला, तर भाताला आंबेमोहोरसारखा वास येतो. केवडाधारी कोकणवासीयांनो, आपण धन्य आहात.

केवड्याला बागेत लावण्याचा प्रश्नच नव्हता; पण दुसरं पान, मरव्याला बागेत लावण्याचा मी अनेकदा प्रयत्न केला- पण हाय! तेही मला जुमानत नव्हते. माझ्याकडे येती ती ही बहुवर्षायू वनस्पती आहे. तीसुद्धा ‘शालू हिरवा, पाचू नि मरवा, वेणी तिपेडी घाला’ या भौगोलिक अवस्थेत पाहण्यावरच समाधान बाळगावं लागलं. इवलंच पण बोटात पकडून चुरगळावं असं पानआणि फुप्फुसात भरून घ्यावा, असा अनवट गंध. ‘स्वामी’ कादंबरीत माधवरावांच्या तोंडी ‘अत्तर जरी झालं, तरी चुरगळल्याखेरीज दरवळत नाही’, हे विप्रलंभ शृंगाराचे वाक्य आहे. मरव्याला ते अधिक लागू आहे. इंदिरा संतांची कविता वाचली नसती, तर कदाचित मरव्यावर एवढे प्रेम जडले नसते!

    असेच काही द्यावे... घ्यावे
    दिला एकदा ताजा मरवा;
    देता घेता त्यात मिसळला
    गंध मनातील त्याहून हिरवा

कसा असतो बरं हा ‘हिरवा गंध’? इंदिराबाई असत्या तर त्यांना विचारले असते. भेटलोय मी त्यांना. असे काही विचारले असते, तर त्यांनी फक्त स्मित केले असते. 
    
    रंग बाते करें, और बातोंसे खुशबू आए
    दर्द फुलों की तरह महके, अगर तू आए

ही गझल मला कळते, तर मग मरव्याच्या गंधाचे हिरवेपण का बरे अनुभवता नाही येणार? यायला पाहिजे. मला येतं.

फुलं कोणती असावीत? रंगीबिरंगी का सुगंधी? भारतीय परंपरा सुगंधी फुलांना मानणारी आहे. अध्यात्म रामायणात म्हटले आहे की- जेव्हा अयोध्येत रामाला राज्याभिषेक झाला, तेव्हा सगळी गंधहीन पुष्पे सुगंधी झाली. मी ही मर्यादा स्वत:ला का घालून घेऊ? मला गंध नसलेली पण रंगीबिरंगी फुलंदेखील आवडतात. कारण ‘रंग बातें करें’! रंगांची भाषा मला आकृष्ट करते. बोलावते. आणि हे रंगबावरेपण मला तिकडे घेऊन जाते. मी खेड्यातून शहरात आलो नि मला सर्वांत आधी भेटली, ती रंगीत फुलझाडेच. तेव्हा मला त्यांचा नावानिशी परिचय नव्हता. पुढे आम्ही केलेल्या आंदोलनामुळे परभणीला कृषी विद्यापीठ मिळाले. तिथे रंगीत फुलझाडांना स्वतंत्र स्थान होते. तेव्हा मी त्यांचा नावानिशी अभ्यास केला, निरीक्षण केले.

ॲस्टर नावाचे फूल माझ्या अजून लक्षात आहे. लाल, पांढरे आणि निळे अशी ॲस्टरची तीन रंगातील फुले कृषी विद्यापीठात होती. स्तबकात जांभळ्या फुलांची अनेक स्तबके आठवतात. स्तबकात बाहेरची किरण-पुष्पके जिव्हाकृती, द्विलिंगी व फलनक्षम; आतील बिंब-पुष्पके तशीच पण नलिकाकृती असतात. ॲस्टरच्या फुलांना आलेला बहर सुमारे महिनाभर टिकतो.

ड्युरांटाचे झाड मात्र बहुवर्षायू आहे. याची खोडे काटेरी असल्यामुळे याचा उपयोग कुंपणासाठीही करतात. ड्युरांटाच्या दोन जाती आहेत. एकाची फुले पांढरी व दुसऱ्याची निळी असतात. फुलांची पाच संदले असून ती संलग्न असतात. डालियाची उंची एक ते दोन मीटर असून पर्णपत्राची लांबी आठ ते दहा सेंमी असते. याचे खोड काळसर असते. त्यावर पाने समोरासमोर येतात. फुले मुख्य खोडाच्या  व फांद्यांच्या टोकाशी येतात. बिंब चार सेंमी असते व ते पिवळे असते. बिंब-पुष्पकाभोवती पापुद्र्यासारखे पारदर्शी वेष्टन असते. किरण-पुष्पकाचे तीन-चार घेर असतात. छदे किरणांपेक्षा पुष्कळ आखूड असतात. प्रदलांचा रंग किरमिजी, जांभळा, पिवळा अथवा पांढरादेखील असतो.

कोयनेल हे प्रसिद्ध झुडूप ड्युरांटाप्रमाणेच कुंपणाच्या कडेने लावतात. फुलोरे तीन फुलांच्या गुच्छाने येतात. फुलांत संदले आणि प्रदले पाच-पाच आणि संलग्न असतात. संदलांचा रंग हिरवा असून त्यांची नळी लहान असते. प्रदलांचा रंग पांढरा असून त्यांची नळी लांब असते. क्लेरोडॅड्रोनचे फूल संध्याकाळी उमलते.

जिरेनियम माझं आवडतं फुलझाड. मी डॉ. सुधीर रसाळ यांच्या बागेत प्रथम पाहिलं. कुंडीत लावलेलं. याचे खोड हातभर उंच वाढते, पण तेवढ्यातच त्याला पाने-फुले येतात. फळे येतात. बी धरते. याची पाने वाटोळेसर असतात. काठाशी तरंग असतो. पान चुरगाळले म्हणजे विशेष सुगंध येतो. पानाच्या बगलेत सहा-आठ फुले येतात, ती विविध रंगांची असतात. डॉ. रसाळांकडे पाहिलेले फूल लालभडक होते. फुलांना सुगंधही असतो. बागशाहीत शोभावे असेच हे झाड. जरबेरा हे असेच शोभिवंत फुलझाड. याचा कंद असतो. वर येणारी पाने वीत-दीड वीत लांब असतात. मधून फुलांचा दांडा येतो. फूल पाच-सहा सेंमी रुंद असते. त्यात बिंब आणि किरण-पुष्पके असतात. त्यांचा रंग नारिंगी असतो. हे सुंदर झाड दक्षिण आफ्रिकेतून आपल्याकडे आले आहे.

झिनिया हे सूर्यफूल कुलातील फुलझाड असून याच्या वीस जाती आहेत. पाने समोरासमोर, बिनदेठाची, खरबरीत, अंडाकृती व सुमारे अडीच सेंमी रुंद असून सुंदर फुलोरे फांद्यांच्या टोकास येतात. स्तबकातील किरण-पुष्पके व बिंब-पुष्पके यांचे विविध रंग असतात, पण त्यात हिरवा व निळा हे रंग नसतात.

सध्या गॅलार्डियाला फुले आलेली आहेत. याची उंची पन्नास ते शंभर सेंमी असते. याचे खोड चपटे व किंचित त्रिकोनी असते. पाने एकांतराने येतात. फुलांचे गेंद चार सेंमी रुंद असतात. प्रदले किरमिजी असून त्यांची टोके पिवळी असतात. कॉसमॉस हे मेक्सिकोतून भारतात आणलेले एक सुंदर फूल असून, त्या नावाच्या बँकेत नोकरी करणाऱ्याला तरी हे फूल परिचित असायला हवे. आत्ता, सध्या त्याला फुलं आलेली आहेत. त्यात थोडीशीच किरणे असतात. ती रुंद-रुंद असतात. प्रदलांचा रंग पांढरा किंवा गुलाबी असतो. अशी ही सुंदर ती दुसरी दुनिया.

ही होती विदेशी, रंगीबिरंगी फुलांची झुडुपं. आता दोन-चार विदेशी रंगीबेरंगी फुलांच्या वृक्षांकडे वळू या. पुण्याच्या बालगंधर्व रंगमंदिरासमोरून जाताना राणीच्या पुतळ्यामागे काही अशी फुलं पडलेली असायची की, मला वाटायचं- पाडळ या माझ्या लाडक्या फुलांचं ते उत्क्रांत रूप नाही ना? पण पाडळ हा खास भारतीय आहे. मग मला त्या फुलांचे नाव कळाले- ट्रम्पेट फ्लॉवर. ट्रम्पेट म्हणजे तुतारी. प्रचंड संख्येने खाली पडलेली फुलं जवळ घेऊन पाहिली, तर ती नलिकाकार, कर्ण्यासारखं पसरलेलं तोंड असलेली होती. चांगली तीन-चार इंच लांबीची फुलं. फिकट गुलाबी-पांढरट रंगाच्या, पातळ झालरीच्या फुलांच्या अंतर्भागात जाणवेल न जाणवेल असा हलकासा पिवळा रंग असतो. गगनभेदी उंची, ऐसपैस पसारा आणि बारमाही फुलांची संगत बाळगणारे हे वृक्ष. त्यांना वीतभर लांबीच्या शेंगाही येतात.

सध्या स्पॅथोडिया या पूर्व आफ्रिकेतून आलेल्या झाडाला लाल-केशरी रंगाची भडक फुलं आलेली आहेत. ट्युलिप ट्री हे त्याचं आणखी एक नाव. चांगला वाढला तर तीस-पस्तीस फूट उंची सहज गाठतो. याला वर्षातून दोनदा बहर येतो. नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये एकदा आणि फेब्रुवारी-एप्रिलमध्ये एकदा. तळव्याएवढे मोठे कळ्यांचे गुच्छ आधी येतात. त्यामध्ये एकात एक अशा वर्तुळाकार रचनेत बाहेर मोठ्या, तर मध्याकडे कच्च्या कळ्या असतात. फुलांचा आकार ट्युलिप फुलासारखा असून फुलांचे तोंड आकाशाकडे असते. रत्नागिरी भागात हे झाड मोठ्या प्रमाणात दिसेल.

माझ्या बायकोने- प्रज्ञाने एका नव्या फुलाचा शोध लावला. फुलाच्या रचनेत महादेवाची पिंड आणि त्यावर नागाचा फणा धरलेला- असे होते. छान सुगंधही होता. आम्ही आनंदाने महाजनसरांना फोन करून वर्णन सांगितले. तेव्हा त्यांनी त्या फुलाचे नाव सांगितले, कैलासपती. कोकणात देवाचिये द्वारीदेखील विकायला ठेवलेली ही फुले दिसली. बालगंधर्व रंगमंदिरात, पुणे मनपाच्या मुख्य इमारतीबाहेर अशी ही झाडं शोधण्याचा नादच लागला. पण जेव्हा कळले की- हे भारतीय झाड नसून, दक्षिण अमेरिकेतून आलंय, तेव्हा फार विरस झाला.

कैलासपतीचं वनस्पतीशास्त्रीय नाव आहे- कौरोपिटा गायनेन्सिस. हा दहा ते वीस मीटर उंच वाढतो. त्याचे खोड मजबूत, खरखरीत, गर्द तपकिरी रंगाचे असते. हिवाळ्यात तो फुलायला आरंभ करतो. त्याचे वैशिष्ट्य म्हणजे, फुले मुख्य खोडावर आणि मोठ्या फांद्यांवर लोंबणाऱ्या जाडसर शाखांवर येतात. ॲस्टर, ड्युरांटा, जिरेनियम, झिनिया नावानं विदेशी झाडं ही. पण ज्यांच्याजवळ ती असतात, त्यांना केवढं सुख देतात! मला तर बुवा बायको आणि प्रेयसी, आई आणि वडील, नातेवाईक आणि मित्र या सर्वांनी मिळून जेवढं प्रेम दिलं असेल, त्यापेक्षा किती तरी  जास्त प्रेम झाडांनी दिलंय. पुढील शेर मी प्रियजनांना उद्देशून कधी म्हटला नसेल, एवढा माझ्या वृक्षवल्लींना उद्देशून म्हणालो आहे- खरंच!

    आप जिनके करीब होते है
    वो बडे खुशनसीब होते है

मी माझ्या झाडांशी खूप-खूप गप्पा मारल्या आहेत. त्यांना उद्देशून गाणी म्हटली आहेत. विद्यानगरमध्ये शिरीषाजवळ प्लॉट घेऊन मी घर बांधले, तेव्हा तर मी केवळ झाडांमध्येच दंग होतो. तिथे फुलारी नावाचे माझे मित्र सख्खे शेजारी होते. त्यांनी आणि मी एका वेळी अळूचे (चमकोरा) गड्डे आणून लावले. तीन महिन्यांत त्यांचे अळू वाळून गेले. मला त्यांनी जाब विचारला, तेव्हा मी म्हणालो, ‘मी रोज त्यांना गाणं म्हणतो.’ फुलारी माझ्या घराला चिकटून पण वरच्या मजल्यावर राहायचे. त्यांनी तळमजल्यावरच्या त्यांच्या भाडेकरूला खरे-खोटे विचारले. ते म्हणाले, ‘खरं आहे. तो तुमचा मित्र वेडाच आहे.’

याच घरात मी लॉन लावण्याचा प्रयत्न केला. मला मलेरिया झाला. महाजनसरांनी लिहिलं होतं, ‘लॉन लावू नये.’ म्हणून मी लॉनपुढे हात जोडून म्हणालो, ‘सॉरी. पण मला तुम्ही नकोत.’ पंधरा दिवसांत लॉन स्वत:हून जळून गेलं.

आणखी एक घटना याच घरातली. घरातून गेटपर्यंत जाताना डाव्या हाताला मी ‘दिन का राजा’ नावाचे झाड लावले होते. माझ्याएवढेच ते उंच झाले होते. येता-जाता त्याच्या शेंड्यावरून मी प्रेमानं हात फिरवायचो आणि स्नेहार्द्र दृष्टीने त्याच्याकडे पाहायचो. हा भास नाही, पण त्याच्यापर्यंत पोहाचायच्या आतच दिन का राजा जाणवेल इतका माझ्याकडे झुकत असे. हे मी जगदीशचंद्र बोस यांच्या सिद्धान्तावरून किंवा पुस्तकी अनुभवावरून सांगत नाही.

अलीकडचा अनुभव. पुण्यात 2011 मध्ये फ्लॅट घेतला आणि वाटले- छोटी का असेना, पण आपली बागशाही हवीच. बायकोचे आवडते म्हणून पहिले झाड अनंताचे आणले. पाच वर्षे पाणी घालून मेलो, पण गडी फूल काही देईना. त्यानंतर अनंत भालेराव यांची जन्मशताब्दी आली. ते एक माझं जिव्हाळघरटं होतं. ती साजरी करण्याचा भाग म्हणून अनंताचे नवे रोप आणले. अनंतरावांना मी ‘अण्णा’ म्हणायचो. याही रोपाशी अण्णा म्हणून मी वागायला, बोलायला लागलो. एकदा-दोनदा तर रडलोही त्यांच्याजवळ. रोज पाणी देताना त्यांच्या पाया पडायचो, तसा नमस्कार करायचो. बोलायचो. जन्मशताब्दी वर्षात टपोऱ्या सहा-सात कळ्या आल्या आणि ‘अण्णा’ खुलले!

मी मूलत: आणि अंतिमत: एक शेतकरी. शेतकऱ्यांच्या जीवनात मोठ्या सुगीत- म्हणजे नोव्हेंबर-डिसेंबरात येणारी खळीदळी आणि बागायती शेती असेल, तर उसाचं गुऱ्हाळ ही फार मोठी आणि महत्त्वाची घटना असते. मराठवाड्यात ज्वारी हेच महत्त्वाचे पीक आणि वर्षभर खावयाचे धान्य असल्यामुळे ज्वारीच्या खळ्याला अतिशय महत्त्व असे. खळ्यांचा काळ कदाचित थोडाबहुत पुढे जात असेल, पण उसाची गुऱ्हाळं सुरू होण्याचा हंगाम याच महिन्यातला, यात शंका नाही.

खळं म्हटलं की, ते ज्वारीचं. इतकं साग्रसंगीत खळं इतर कोणत्याही पिकाचं होत नाही. एक प्रकारे सुगीचा कळसाध्याय असतो खळं. पुढील सर्व वर्ष याच पिकावर अवलंबून असतं. पुढील वर्षीची ज्वारी येईपर्यंत ही ज्वारी पुरली पाहिजे, असा ध्यास असायचा. पूर्णपणे पक्व झालेली ज्वारी ‘पाडायला’ आली की, खळ्याचा सोहळा सुरू होई. पाच-सहा माणसं आपापली पाती धरून ज्वारी पाडायला आरंभ होई. हे करताना कंबरेला आडवे पोते बांधत. ज्वारी उपटण्याच्या कामात अंगावरचे धोतर फाटता कामा नये.

गोळा केलेल्या ज्वारीच्या पेंढ्या बांधून जिथे खळे करायचे, त्या जागेभोवती गोल रचून ठेवत. पाणी टाकून आणि धम्मस करून ही जागा खळ्यासाठी पक्की करून ठेवत. खळ्याचे सात टप्पे करता येतील. पाडणी, बांधणी, गूड गोळा करणे, मोडणी, मळणी आणि शेवटी उधळणी. पहिले तीन टप्पे पुरुषगडी पार पाडत. मोडणीसाठी महिलांना पाचारण करीत. पेंढ्याची कणसे मोडून ती ‘मदना’त टाकणे हे त्यांचे काम. मोडणीचे काम पूर्ण झाले की, शेताचा मालक कणसांच्या स्वरूपात बायकांना मजुरी अदा करत असे. हे सगळे हास्यविनोद करत, खेळीमेळीच्या वातावरणात चाले. बायकांना उखाण्यातून नवऱ्याचे नाव घ्यायचा आग्रह होई. बायका नाव घ्यायला उशीर लावीत. त्या वेळचे त्यांचे लाजणे, नखरे, मनाशी शब्दयोजना आठवणे- हे चेहऱ्यावरचे भाव पाहण्यासारखे असतात. त्यांच्या उखाण्यातूनही निसर्ग आणि कृषिसंस्कृतीचे मनोज्ञ दर्शन घडत असे-    

    दात मोठा नांगराचा । फूल मोठं कापसाचं
    धर्म मोठा कुणब्याचा । अन्‌ मन मोठं... रावांचं

त्यातही पुन्हा प्रचंड आशावाद आणि आत्मविश्वास...
    
    दुधी भोपळ्याचा वेल
    छपरावर फुलणार
    ....रावांनी केला पेरा
    पीक भरपूर येणार...

केशवने आपल्या ललितगद्यात या सगळ्यांचे सुंदर वर्णन केले आहे. मोडणी झाली की, मळणी सुरू व्हायची. खळ्याच्या आकाराप्रमाणे दोन-चार असे बैल खळ्याच्या मध्यभागी रोवलेल्या मेढीला (खांब) बांधून त्यांच्या तोंडाला मुंगसे बांधून मळणी सुरू करीत. किती तरी घंटे ही मळणी सुरू राहायची. दाताळ्याने कणसं खालीवर करावी लागायची. मळणी झाल्यानंतर बैल सोडून खाकऱ्या व कंडऱ्या गोळा करून बाहेर टाकायच्या. त्यानंतर भुसासह ज्वारी खळ्याच्या एका बाजूस गोळा करायची. हे ज्वारीचे मदन आता तिवशावरून उधळायचं असतं. तिव्ह्यावरचा हात उंच करून वाऱ्याच्या अंदाजानुसार उधळीत राहायचं. खळ्याच्या सोहळ्याचा शेवट घरात धान्य येणे आणि कणगीत भरून ठेवणे यात व्हायचा.

खळ्यापेक्षा गुऱ्हाळाचा सांस्कृतिक, सामाजिक आणि कौटुंबिक आशय महत्त्वाचा असतो. मराठवाड्यात गुऱ्हाळासाठी ‘थळ’ हा शब्द आहे. गुऱ्हाळ सुरू झाले की, महिना-महिना चालू राहायचे. एखाद्या गोष्टीची लांबण लागली त्यासाठी ‘गुऱ्हाळ लावणे’ हा वाक्प्रचार आहे, तो याच कारणाने. किती तरी प्रकारची कौशल्ये असलेली माणसे गुऱ्हाळासाठी काम करीत असत. ऊसतोड कामगार, प्रत्यक्ष चरकावर आणि भट्टीवर काम करणारे. प्रत्येकाला आगळेवेगळे नाव. गुळण्या काय, जाळण्या काय! चुलांगणावर ठेवलेल्या कढईतून गूळ काढण्याचे काम करतो तो गुळण्या, तर चुलांगणात जाळ घालण्याचे काम करतो तो जाळण्या. चरकात घातलेल्या उसाची चिपटी पलीकडच्या बाजूने निघायची आणि खाली रसाची धार लागायची. रस आटवण्याची भली मोठी कढई एक-दीड फूट उंच व आठ-दहा फूट लांबीच्या घेराची असायची. ही कढई चुलांगणावर ठेवून तिला खालून सारखा जाळ लावत. रसाचे गुळात रूपांतर होईपर्यंत जाळ लावला जाई. उकळी फुटताना फेस म्हणजे मळी वरच्या बाजूस जमा होई. गुळव्या भल्या मोठ्या (लाकडी) उलथण्याने रस ढवळीत राही आणि मोठ्या झाऱ्यासारख्या साधनाने येणारी मळी बाहेर काढी. आता गूळ तयार होतोय. मग ही कढाई उतरून घेत. जमिनीत ढेपीच्या आकाराचे खड्डे करून ठेवलेले असत. या खड्ड्यांवर कापड टाकून त्यात, थोडा थंड झाल्यावर रस ओतला जात असे. दुसऱ्या दिवशी घट्ट होऊन गुळाची ढेप तयार व्हायची. गुऱ्हाळावर येणाऱ्या बिनओळखीच्या माणसांनासुद्धा उसाचा रस मोठ्या प्रेमाने दिला जाई. या निमित्ताने सगळे पाव्हणे-रावळे जमा होत. लेक-जावई, विहीण-व्याही- सगळे. एक आनंदोत्सव असे. मला गुळाचा  पाक फार आवडायचा. भाकरीसोबत तो असला की, बाकी जेवणात कशाची गरज नसे. गुळाच्या पाकाला इकडे काकवी म्हणतात. आनंदाची गोष्ट ही आहे की, गूळ कालबाह्य कधी झाला नाही न्‌ होणार नाही. पुरणाची पोळी ही गुळाचीच छान होते. साखर हा गुळाचा पर्याय कधीही होणार नाही, उलट सध्या सेंद्रिय गुळाची एक लाट आलेली आहे. गुऱ्हाळ शब्द गेला, तरी गुळाचे कारखाने निर्माण झाले आहेत. काही खाद्य पदार्थ तर गुळाचेच चांगले लागतात. अनारसे, कैरीचे पन्हे, आंबट वरण, तिळाचे लाडू, गुडदाणी! माझ्या घरी लाडवाचा एक खास प्रकार केला जातो- गुळपापडीचे लाडू!

नोव्हेंबर महिना एकंदरीत आनंदाचा असतो. घरात आणि शेतात दोन्हीकडे. गुऱ्हाळासारख्या घटनेने तर घराचे नंदनवन होते. ही गुऱ्हाळाच्या निमित्ताने माहेरी आलेली लेक काय म्हणते बघा-

चला जाऊ पाह्या ऽ  तेच्या गुऱ्हाळघराला ऽऽ
मखमालीचं पडदं ऽ  सोडलंत मांडवाला ऽऽ
हाकावर ऽ हाका ऽ  गुराळाच्या लेका ऽऽ
सांगा गुळण्याला ऽ  तुझी कव्हई आली पाका ऽऽ
कव्हई आली पाका ऽ  लोणी टाकून थीर करा ऽऽ
बंधव्याला माझ्या ऽ गुळण्याला हाका मारा ऽऽ
शेजी गऽ नटऽती ऽ मान्याच्या ताकायाला ऽऽ
सक्याच्या गुराळाऽ त ऽ आली कव्हई पाकायाला ऽऽ
कव्हई आली पाका ऽ  इंद्रसभंला गेला वास ऽऽ
असा भागेवान बंधू ऽ  वरसाभरा ऽ लावी ऊस ऽऽ

Tags: फुलराणी एकदांडी कारवी मराठी साहित्य बालकवी नोव्हेंबर विश्वास वसेकर नवे ऋतुचक्र weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके