डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

शरद ऋतूतल्या स्वर्गीय पुष्पसोहळ्यावेळी कास पठारावर जो आसमंत उतरतो, त्याची नेकी कल्पना येण्यासाठी ही चित्रं आणि वर्णनं तोकडी पडतात. कास पठारावर एकामागून दुसऱ्या जातीची रानफुलं बहरण्याचे नेके दिवस गाठणं महत्त्वाचं आहे. नाही तर हे सगळं वर्णन काल्पनिक वाटेल. ही फुलं विशिष्ट काळात फुलत असली, तरी तो आठवडा कुठला, हे कॅलेंडरपेक्षा पावसावर अवलंबून असतं. ठरावीक आठवड्यात पाऊस झाला नाही, तर काही जाती फुलतही नाहीत. बऱ्याच दिवसांच्या पावसाच्या उघडिपीनंतर फुलं फुलतात, कारण बहरण्यासाठी सूर्यप्रकाश आणि किड्यांची आवश्यकता असते. एकदा कासच्या पावसाळी रानफुलांची ओळख झाली की, दर वेळी वेगळ्या आठवड्यात अनेकदा इथे येण्याची ओढ लागते.  

शरद ऋतूचे आगमन झाले आहे. हा कोजागरीचा महिना. आकाश निरभ्र झाले आहे. थंडी हळूहळू प्रवेश करत आहे. असं म्हणतात की, हीव विजयादशमीच्या दिवशी गावाच्या शिवेवर येऊन बसलेलं असतं. सीमोल्लंघनाला माणसं गेली की, त्यांच्यासोबत ते हळूच गावात येतं आणि हिवाळा सुरू होतो. वसंत, शरद आणि हेंत ही ऋतूंची तीन नावे आपल्याकडे माणसांना ठेवतात, पण हेंतपेक्षा वसंतची जास्त आणि वसंतपेक्षा शरद नावाची माणसे जास्त. उत्तर भारतात वसंतचं जास्त कौतुक, तर दक्षिण भारताचा शरद लाडका. अहो, बापट आडनावाच्या वसंत कवीनेदेखील ‘शरदा’वर जास्त लिहिलंय. 

शरदामधली पहाट आली तरणीताठी 
हिरवे हिरवे चुडे चकमती दोन्ही हाती 
शिरी मोत्यांचे कणिस तरारून झुलते आहे 
खांद्यावरती शुभ्र कबुतर झुलते आहे 

ही शरदातली पहाट... इंदिरा संतांना शरदातली दुपार भावली -

ही निळी पांढरी शरदातील दुपार 
तापल्या दुधापरी ऊन हिचे हळुवार 
दाटली साय की स्निग्ध शुभ्र आकाशी 
फिरतात तशा या शुभ्र ढगांच्या राशी 

मला शरद ऋतूतलं सर्वांत काही प्रिय असेल, तर निरभ्र- निळ्या आकाशात उमलणाऱ्या शुभ्र ढगांच्या राशी. निळ्या-निळ्या पार्श्वभूीवर खुलणारा शुभ्रतेचा महोत्सव. ‘बगळ्यांची माळ फुले अजून अंबरात’ या ओळीतही हाच महोत्सव आहे. ‘शरदागम’ या अनिलांच्या कवितेची सुरुवात ‘आभाळ निळे नि ढग पांढरे’ अशी आहे. बापुड्या कवींनो, छातीवर हात ठेवून प्रामाणिकपणे सांगा- तुम्हाला आकाश निळेशार खरोखरीच दिसले आहे? वाहनांचा, गिरण्यांचा, कारखान्यांचा आणि त्यांच्या हजार प्रकारच्या वायुप्रदूषणाचा प्रचंड मोठा थर तुच्या डोळ्यांवर असतो. तो पार करून, त्याही पलीकडचे खरेखुरे निळेशार आकाश या जमिनीवर राहून एकविसाव्या शतकात कुणी तरी पाहिले आहे काय? 

मी पाहिले आहे. वयाच्या पासष्टाव्या वर्षी. पण एकदाच पाहिले आहे. चेन्नईहून सिंगापूरला केलेल्या आयुष्यातल्या पहिल्यावहिल्या विमानप्रवासात. ढगांच्याही वर जाऊन ढगांचे सौंदर्य पाहण्याचा अननभूत आनंद मी अनिमिष नेत्रांनी सलग पाच-सहा तास उपभोगला आहे. ती डोळ्यांत साठवलेले दृश्यं मी अजूनही विसरू शकलो नाही. ढगांची शुभ्रता एवढी चमकदार असू शकते; ढगांचे आकार एवढे वैविध्यपूर्ण आणि सुंदर असू शकतात, यावर एरवी माझा विश्वास बसू शकला नसता. ऑक्टोबरपासून जूनअखेरपर्यंत असाच सोहळा आकाशात रंगत असेल? मला मॉन्सूनची आठवण झाली. मॉन्सूनचे करुणाघन कोणत्या दिशेने आणि कसे येत असतील... त्यांचे येणे विमानातून पाहणे केवढे सुखद असेल, याचा किंचित प्रत्यय याच प्रवासात मला एका ठिकाणी आला. कारण तिथे मी इंद्रवर्तुळ पाहिले. इंद्रधनुष्य तर नेहमी पाहतो, पण हे दिसलेले इंद्रवर्तुळ केवळ अवर्णनीय होते! कोणत्या शब्दांत ते मी सांगू? या प्रवासात सहस्ररश्मींनी ढगावर प्रक्षेपिलेली तेज:पुंज शुभ्रता कशी शब्दांकित करू? आकाशाचा अर्थ मला गवसेल का? आकाशाचा अर्थ करंदीकरांना ठावा, आम्ही तो पाहावा डोळियांनी! 

तुमच्या-माझियामध्ये ‘सेतू’ झालेली ही शरदाची पहाट पाहायला, आता पुन्हा जमिनीवर उतरू. एखादी जादू व्हावी, असे वातावरण शरदामुळे बदलले आहे. पावसाने, पुरामुळे पाण्याला नदी-नद-नाल्यांना आलेला गढूळपणा गायब होऊन पाणी नितळ झाले आहे! द. भिं.चा तो कोणता खास शब्द? हं, पाणी निवळशंख झाले आहे! हिरव्या रंगाचे साम्राज्य सर्वत्र धरतीवर पसरले आहे. कवी अनिलांना दिसते की, जलाशयाच्या काठावर उभ्या राहून बाभळी खाली वाकून आपले सावळे रूप न्याहाळताहेत. टवटवलेली सगळी शेते ‘ज्वारीच्या कुसेत’ अधीर होत तान्ह्या कणसाचा टपोर गर्भ पानांच्या आडोशाला सांभाळताहेत. अजून कापूस का फुलला नाही, हे पुसायला निळे तास पक्षी पंख हलवीत जमिनीवर उतरू पाहताहेत. या साऱ्या सौंदर्यदर्शनात आपली हजेरी लावावी, असे शेवंतीलाही वाटते. पण कवी अनिल म्हणतात, अजून गवते पिवळी पडलेली नाहीत. (त्यांचे सोने झालेले नाही.) तेव्हा तू आपल्या पिवळ्या फुलांची एवढ्यात घाई करू नकोस. आपणही या शेवंतीला डिसेंबरात भेटणार आहोत, आत्ताच नाही. 

गेल्या चार महिन्यांपासून रानफुलांनी कास पठारावर जो पुष्पोत्सव साजरा केलाय, त्याचा या महिन्यात समारोप. या पुष्पोत्सवात कास पठारावर शेवटी-शेवटी दिसणारे फूल म्हणजे चिमिन. श्वेता असेही याचे एक नाव आहे. शास्त्रीय नाव आहे थुनबर्जिया फ्रॅग्रन्स. त्याला कुठलाही गंध नसतो, असते फक्त रंगांची शुभ्रता. डॉ. संदीप श्रोत्री यांनी यथार्थपणे म्हटले आहे की, कितीही पंचपक्वान्नाचे जेवण असू देत, शेवटी दहीभात खाल्ला नाही, तर ते अपूर्णच ठरते. त्याचप्रमाणे पुष्पपठार कास पुन:पुन्हा बघताना, इंद्रधनुषी रंगांची उधळण अनुभवूनसुद्धा पोट भरत नाही. त्यासाठी मग शेवटी दहीभाताचे फूल (हे चिमिनचे नवे नाव) नजरेने आकंठ प्यावे लागते. ऋतुचक्रात आतापर्यंत आपण अनेक फुले पाहिली, पण रानफुलांचे सौंदर्य आणि वैशिष्ट्य खरोखर काही औरच आहे. विल्यम ब्लेक म्हणतो, 


सारे विश्व सामावले एका रेतीच्या कणात 
एका रानफुलामध्ये अंतर्भूत स्वर्ग सात 
उभा आकाश तुम्ही तोलाल या ओंजळीत 
आणि एका तासामध्ये सामावे काळ अनंत 

परंतु या रानफुलांकडे पाहायला आपल्याजवळ श्रीकांत इंगळहळ्ळीकरांची आशिकी नजर हवी. नुसती नजरच नाही, तर हे सौंदर्य टिपण्यासाठी त्यांची सुंदर शब्दकळा नि शैली हवी. बघा, ऑक्टोबरातल्या कास पठारावरील पुष्पसौंदर्याचं त्यांनी कसं आरेखन केलं आहे. शरद ऋतूतल्या स्वर्गीय पुष्पसोहळ्यावेळी कास पठारावर जो आसमंत उतरतो, त्याची नेकी कल्पना येण्यासाठी ही चित्रं आणि वर्णनं तोकडी पडतात. कास पठारावर एकामागून दुसऱ्या जातीची रानफुलं बहरण्याचे नेके दिवस गाठणं महत्त्वाचं आहे. नाही तर हे सगळं वर्णन काल्पनिक वाटेल. ही फुलं विशिष्ट काळात फुलत असली, तरी तो आठवडा कुठला, हे कॅलेंडरपेक्षा पावसावर अवलंबून असतं. ठरावीक आठवड्यात पाऊस झाला नाही, तर काही जाती फुलतही नाहीत. बऱ्याच दिवसांच्या पावसाच्या उघडिपीनंतर फुलं फुलतात, कारण बहरण्यासाठी सूर्यप्रकाश आणि किड्यांची आवश्यकता असते. एकदा कासच्या पावसाळी रानफुलांची ओळख झाली की, दर वेळी वेगळ्या आठवड्यात अनेकदा इथे येण्याची ओढ लागते. 

सातारा किंवा जिल्ह्यात राहणाऱ्यांना हे आठवड्याला वगैरे येणे शक्य आहे. पण आपण इतक्या लांबून पण  बऱ्याचदा आलो, नाही का? बऱ्यापैकी महत्त्वाची फुलं पाहिली. सगळ्याच फुलांना नाव देणे आणि त्यांना ओळखणे केवळ अशक्य आहे. हे काम करताना आपण जशी वनस्पती-शास्त्रज्ञांची मदत घेतो, तशी कवींचीही खूपच मदत घेतो; नाही का? कारण कवी हे नुसते मर्मज्ञच नसतात, तर शब्दप्रभूही असतात. त्यांनी जे पाहिले- अनुभवले, ते सांगण्यासाठी नेके शब्द त्यांच्यापुढे हात जोडून उभे असतात. अशाच एका महान कवीच्या शब्दांत आपण या सातारा जिल्ह्यातल्या या रानफुलांना निरोप देऊ 


वनफूल 


वनफूल 
त्याला आवडते धूळ 
गाई उदास गाणे 
कुठेच येणे ना जाणे 
घालविते शूल 
वनफूल 
बाजूला वाहते नदी 
वारा विचारतो कधी 
पृथ्वीवर आकाशाचे 
निनावी हे मूल 
वनफूल 
गोड रंग, उग्र वास 
तयाचा न कुणा त्रास 
कधी कधी पांथाला 
पडते पण भूल 
वनफूल 

- म. म. देशपांडे 

शहरातील रस्त्याच्या बाजूने विपुल प्रमाणात लावला गेलेला सातवीण यासारखा ओळखायला सोपा वृक्ष नाही. कारण त्याच्या पेरावर सात पाने असतात. ऑक्टोबरात कुड्याच्या धरतीची आणि तशीच बारीक फुले त्याला येतात. फुलारा वल्लरीरूप असतो. शेंगा एका डेखावर दोन अशा येतात. हे झाड चिकाळ असते आणि त्यातून काही तीव्र गंधही निघतो. रघुवंशात असे वर्णन आहे की, वन्य गजांच्या मदाचा दर्प इतका तीव्र होता की, त्यामुळे सेनेतील गज परत फिरले. हा दर्प सप्तछंदाच्या (सातवीण) चिकासारखा होता. 

सातवीण हा एक भव्य, देखणा, उभा वाढणारा वृक्ष असल्यामुळे सुंदर उद्यानवृक्ष म्हणूनही मान्यता पावला आहे. रस्त्याकडेने आणि दुभाजकांध्ये लावण्यासाठी हा एक आदर्श, बहुगुणी पर्याय आहे आणि त्याचा भरपूर विनियोग पुणे शहरात केलेला दिसून येईल. ॲव्हेन्यू ट्री म्हणून हा फारच चांगला आहे, हे पुणेकरांनी सिद्ध करून दाखवले आहे. 

आश्विन हा देशभर कुमारिकांच्या सणांचा महिना म्हणून साजरा होतो. महाराष्ट्रात हादग्याच्या सणाला विशेष महत्त्व आहे, त्यालाच भोंडला म्हणतात. कुमारिका एकत्र येऊन गाणी म्हणतात. हस्त नक्षत्रापासून पुढचे सोळा दिवस मुली हा हादगा खेळतात. गाणी म्हणून झाली की, यजमान मुलगी सर्वांना ‘खिरापत’ वाटते. वऱ्हाड, खान्देश आणि मराठवाड्यात यालाच ‘भुलाबाई’ असे म्हणतात. पूर्वी हादग्याच्या फांदीभोवती फेर धरला जात असे. 

वाटाणा, घेवडा, पळस, पांगारा यांच्या कुळातला तो असून, पावसाळ्याच्या शेवटी-शेवटी त्याला फुले यायला लागतात. हा बहर हिवाळ्याच्या मध्यापर्यंत टिकतो. हादग्याचे फुल आकाराने मोठी, पांढरी, सुारे आठ सेीं लांबीची असतात. त्यांची भाजी आणि भजीदेखील छान होतात. हादग्याला अगस्ता हे एक नाव आहे. अगस्ती म्हणजे दक्षिण दिशा. त्या दिशेकडील मलेशियापासून उत्तर ऑस्ट्रेलिया हा प्रदेश हादग्याचे मूळ वसतिस्थान असल्याने त्याला अगस्ता हे नाव पडले असावे. 

महिन्याचं फूल असं एखादं पारितोषिक ठेवलं, तर ऑक्टोबरात तो मान झेंडूच्या फुलांना जाईल. दसऱ्यापासून दिवाळीपर्यंत जिकडे-तिकडे झेंडूच्या माळाच तुम्हाला दिसतील. बाजारात ढिगांनी झेंडू विकायला आलेले दिसतील. सण जवळ येईल तसतशी चढ्या भावाने त्यांची विक्री होते. चार हजार वर्षांपूर्वी तो भारतात आला. आपल्याकडे प्रामुख्याने दिसतो तो आफ्रिकन झेंडू. याला थोड्याशा फांद्या येतात. हिवाळ्यात फुले येतात. त्यात बिंबपुष्पके आणि किरणपुष्पके असतात. तळाशी ‘खोबरे’ असते. झेंडूच्या पाकळ्यांना रांगोळीत सुरेख वापर करायची पद्धत आहे. हे झाड शेतात, अंगणात वाढण्यासाठी फार नखरे करत नाही. 

कोरांटी हे फुलांचे झुडूप. फुले निर्गंध असतात, पण रंग अत्यंत प्रसन्न आणि वैशिष्ट्यपूर्ण असतो. गुलाबाचा गुलाबी, जांभळाचा जांभळा- तसे कोरांटीच्या रंगाला तिचे नाव द्यायला हरकत नाही, इतका वैशिष्ट्यपूर्ण तो रंग. अत्यंत काटेरी असे हे झुडूप असल्याने कुंपणाच्या कडेलाही लावता येते. याची उंची एक ते दोन मीटर असते. पाने कांडाच्या पेरावर समोरासमोर येतात. काटे पानांच्या बेचक्यात असतात. फुले एकेकटी असतात आणि शाखाग्री त्यांचे तुरे असतात. फुलांचा देखावा उघडलेल्या तोंडासारखा असतो. खालचा ओठ म्हणून एकच दल असते. वरती चार प्रदले असतात. चार केसर असतात, त्यापैकी दोन प्रदलाबाहेर डोकावण्याइतके लांब असतात. बिचारी कोरांटी आहे रूपवान, पण दोन उणिवाही आहेत सुगंध नसणे आणि काटे असणे. देवपूजेस्तव अन्य फुले न सापडल्यास हिला कशी तरी अंगणी बाळगावे म्हणजे तेवढी तरी कामास येईल, असे भा. रा. तांब्यांना वाटते. 

सुंदर स्त्रीने कोरांटीला स्पर्श केला की, ती बहरते, असा काव्यसंकेत आहे. गाथासप्तशतीत यावर एक सुंदर गाथा आहे. नायकाला हा संकेत माहीत असल्यामुळे शेताच्या कडेला मुकीच बसलेली कोरांटी पाहून तो आपल्या प्रियेला सांगतो, ‘‘हिला जरा हात लाव, म्हणजे ती फुलेल.’’ यावर मान एकीकडे करून ती त्याच्या वेडेपणाला हसते. व्यंग्यर्थ मोठा सूचक आणि सुंदर आहे. असो. 

एकदा आम्ही सहकुटुंब चंद्रपूरला चाललो होतो. बसमध्ये लोक चौकशी करतातच, ‘‘चंद्रपूरची देवी तुमचे कुलदैवत आहे का?’’ 

मी म्हणालो, ‘‘नाही. देवीसाठी नाही चाललो.’’ 
‘‘मग तुमचा काही व्यवसाय आहे का?’’ 
‘‘नाही. आमचा कोणताच व्यवसाय नाही.’’ 
त्यांचं कुतूहल काही शमेचना. शेवटी त्यांनी थेट विचारले, ‘‘एवढ्या लांब कशासाठी चाललात?’’ 
मी म्हणालो, ‘‘बांबूच्या झाडाला चाळीस वर्षांनी एकदा फुलं येतात. ती पाहायला चाललो.’’ 

त्यांचा विश्वास बसला की नाही माहीत नाही; नंतरचे पाच-सहा तास ते एकही वाक्य बोलले नाहीत. फक्त भुताकडे किंवा वेड्याकडे पाहावे, तशा भयमिश्रित नजरेनं माझ्याकडे पाहात होते. ताडोबा अभयारण्यात गेलो, तेव्हा सर्व बांबूंना फुलं आली होती. फुले आली की बांबू मरतो, म्हणून एकीकडे हेलिकॉप्टरमधून बांबूची पेरणीही चालली होती. फूल जवळून पाहिले. फुलाच्या तळाशी तीन खवले व फुलात तीन लहान तुसे, सहा केंसरदले, किंजमंडळ स्तंभासारखे व त्यावर तीन किंजक लघुतुष असतात. लांबसडक अशा तुऱ्यावर ही फुले आलेली होती. बांबूच्या फुलोऱ्याच्या शेंड्याला नरफुले अथवा वांझ फुले येतात आणि त्याच्या खाली द्विलिंग फुले असतात. 

संपूर्ण वाढ झाली की, हिरव्या बांबूचा रंग पिवळा होतो. भारतात त्याची एक सुंदर प्राक्कथा आहे. एकदा अग्निदेवाचं बाकीच्या सगळ्या देवांबरोबर जोरदार भांडण झालं. तेव्हा मुळात रागीट असलेल्या अग्नीनं देवांना चांगलाच धडा शिकवायचा ठरवला आणि तो अज्ञात ठिकाणी दडून बसला. अग्नीच्या अनुपस्थितीत सगळे व्यवहारच नाहीत, तर जगदेखील थंड व्हायला लागलं. सूर्याचासुद्धा काही उपयोग होईना. सगळ्या देवांची अशी मस्तपैकी जिरली! शेवटी देवेंद्रानं सगळ्या देवांना आज्ञा केली की- जा, जिथं कुठं तो लपून बसला आहे, त्याला शोधून काढा. त्याची मनधरणी करा आणि त्याला परत कामाला लावा. अग्नी लपून बसला होता बांबूच्या झाडांत. वंशवनातल्या थंडाव्यामुळे अग्नीचा राग शमला खरा; पण त्याच्या दाहकतेुळं मुळातला हिरवाकंच असलेला बांबू मात्र पिवळा झाला. 

मुळात बांबू हे नावच मला अमान्य आहे. किती गद्यप्राय नाव आहे हे! बांबूला चांगलं नाव काय द्यावं, हा प्रश्न रवींद्रनाथांसारख्या नावं देण्यात निष्णात असलेल्या प्रतिभावंतालाही पडला होता आणि तेही त्याचं बारसं करू शकले नाहीत. त्यांच्या प्रसिद्ध पत्रव्यवहारात त्यांनी एका चित्रकार मित्राला विचारले होते, ‘वेळूच्या फुलाला काय नाव आहे, हे शोधले पाहिजे. संस्कृतमध्ये ‘वंशपुष्प’ म्हणतात. जिथे विचारावे, तिथे वासाचा फुले म्हणतात. मला कुतूहल आहे...’ 

बांबूला विलक्षण अशी वाढ असते. सगळ्याच वनस्पती वाढतात, पण त्यांचे वाढणे प्रत्यक्षात दिसत नाही. काळजीपूर्वक जर निरीक्षण केले, तर बांबू आपल्या डोळ्यांसमोर वाढत-वाढत वर जातोय, असा अनुभव घेता येतो. वनस्पतीच काय, जगातले कोणतेही सजीव इतक्या झपाट्याने वाढत नाहीत. 

पिवळ्या रंगाची फुलं आवडणाऱ्या मला, टिकोमाच्या फुलांचा उज्ज्वल रंग अतिशय आवडतो. कुठे अभावितपणे ते दिसलं की, माझ्या चित्तवृत्ती प्रफुल्ल होतात. काय नातं आणि ऋणानुबंध आहेत, माहीत नाही. पण कितीही घाईत झालेली त्याची भेट आनंदी करतेच. जॉन एफ. केनेडी लहानपणी माझे आवडते होते. मी लिहिलेली दुसरी का तिसरी कविता त्यांच्या निधनाची होती. टिकोमा आणि त्याच्या सोळाच्या सोळा जाती केनेडींच्या देशातल्या. अर्थात टिकोमा- केनेडी- अमेरिका हे परस्परसंबंध मला नंतर उमगले. पण त्याच्याही आधीपासून टिकोमा मला आवडतो. महाजनसरांनी त्याला ‘सोनतुतारी’ असे नाव दिले आहे. 

हा वृक्ष चार ते सहा मीटर इतका उंच वाढतो. त्याची जवळजवळ वर्षभर हिरवीगार राहणारी पाने मन लुभावतात. फुलेसुद्धा वर्षभर असतात. फूल तुतारीच्या आकाराचे सुारे पाच सेंमी लांबीचे, पिवळेधमक असते. त्यात एक भगवीही झाक आहे, म्हणून ‘सोनेरी’ रंगाचे म्हणता येईल. फुलांचे गुच्छ फांद्यांच्या टोकावर दाटीवाटीने येत राहतात. पाच पाकळ्या जोडल्या जाऊन त्यांचे तुतारीसारखे नरसाळे झालेले असते. प्रत्येक फुलात चार पुंकेसर असून, फुलांना मंद सुवास असतो. 

रुई... किती शिल्पमय पुष्प... सागवानाच्या लाकडात कुसुंब्याच्या गुलजार हाताने निर्माण केलेले नक्षीदार पुष्पशिल्प... त्याच्या सौंदर्याकडे तर कुणाचे लक्ष जात नाही, पण शनी आणि मारुतीच्या पूजेसाठी म्हणून दर शनिवार-सोमवार-अमावास्येला त्याला भरपूर ओरबाडलं जातं. वास्तविक रुईमध्ये साक्षात हे दोन देव वास करीत असल्यामुळे धर्मशास्त्राने रुई किंवा मांदाराची पाने तोडणे हे महत्पाप असल्याचे म्हटले असून, त्याचे प्रायश्चित्त म्हणून कडुनिंबाची दहा झाडे लावण्याची शिक्षा सांगितली आहे. वसंत इन्तु... इन्नू रंत्य: (सामवेद 6-4-2) 

रूईचे दोन प्रकार आहेत. त्यातल्या पहिल्या रुईला रुईच म्हणतात. तिची फुले पांढरी, जणू काही सृष्टीने सुती गुंडीसारख्या दिसणाऱ्या बटणासारख्या दगडाला छिन्नीहातोडीने तासून विलक्षण सुरेख बनवलेली. पाच पाकळ्या बेमालूमपणे पुष्पकोशाशी संलग्न झालेल्या. इतक्या की, पुष्पकोशच त्या पाकळ्यांच्या बुडाशी कोरून काढल्यासारखा दिसतो. काही मूर्ती एका शिळेतून अभंग कोरलेल्या असतात ना, तसंच! रुईला नंतर आखूड काकडीसारखी हिरवी फळं येतात. वाळल्यानंतर ती फुटून बिया हवेत तरंगतात. पांढरी, पिसांसारखी व पंख असतात ना, त्यांना ‘म्हातारी’ म्हणतात. माझ्या वर्गात ही म्हातारी शिरून विद्यार्थी ती पकडायला धावले, तेव्हा मी अनंत काणेकरांना स्मरून म्हणालो, ‘अरे, तरुण पोरं ना तुम्ही? मग त्या म्हातारीच्या काय मागं लागता?’ आणि वर्ग शांत झाला. 

या रुईच्या कळ्या लंबगोल असतात, तर मंदार (किंवा मांदार) या दुसऱ्या प्रकारच्या रुईच्या कळ्या गोलसर असून फुले लालसर व त्यावर पांढरे ठिपके असतात. बिचारी रुई आणि बिचारा मंदार. एखादी मुलगी ‘मंगळी’ असेल, तर तिचे पहिले लग्न मांदारासोबत लावतात- म्हणजे मरायचे त्याने! एखादा अविवाहित मेला, तर रुईबरोबर आधी त्याचे लग्न लावून मग अंत्यविधी करतात; म्हणजे सती गेली रुई! महाराष्ट्रापेक्षा पंजाबात रुईचा अधिक अपमान झालेला आहे. अमृता प्रीतमच्या एका कादंबरीचं नाव आहे, ‘अक्कदाबूटा’ म्हणजे रुईचं पान. कटू सत्याचं ते प्रतीक म्हणून वापरलं गेलेलं आहे. जाऊ द्या! कडू, गोड ही निष्पाप वनस्पतींना माणसानं त्याच्या स्वार्थासाठी दिलेली नावं आहेत. त्या त्यांच्याजागी असतात, त्यांच्यासाठी असतात. माणूस आपल्या दृष्टिकोनातून, लाभालाभातून त्यांच्याकडे पाहतो आणि काहींना अकारण बदनाम करतो. टागोरांची एक छोटी गोष्ट आहे. बंगालात ‘माकोल’ नावाचं आंब्यासारखं दिसणारं एक कडू फळ असतं. ते आंब्यावरची लोकांची भक्ती म्हणून दु:खी असतं. त्याला आंबा म्हणतो, ‘‘माकोलभाऊ, अरे तुझ्या-माझ्यात फरक नाही. आपण फळंच. पण माणसानं आपली ‘जीभ’ आणली आणि तुला वाईट नि मला चांगलं ठरवलं.’’ तात्पर्य हेच की- आपल्याला स्वार्थनिरपेक्ष, निखळ अशा सौंदर्यदृष्टीने वृक्षवल्लीकडे पाहता आले पाहिजे. 

आता हेच बघा ना- या महिन्यात खाजकुयरी नावाचा वेल फुलतो, फळतो. त्याच्या बिया, शेंगेवरचे केस आणि मूळ हे औषधी उपयोगाचे म्हणून आयुर्वेदात महत्त्वाचे आहेत. पण व्रात्यपणाने करण्याचा त्याचा दुरुपयोग सर्वांना माहीत आहे. या महिन्यात येणारी तिची फुले दोन-तीन सेंमी आकाराची गुलाबी किंवा जांभळट दिसतात. फुलाच्या संदलावर झोंबरे केस असतात. पाकळ्या दाट गुलाबी अगर जांभळ्या रंगांच्या असतात. शेंगा पाच ते आठ सेंमी लांब, सुमारे एक सेंमी रुंदीच्या असून त्यांच्यावर खाजऱ्या करड्या रंगाच्या केसांचे दाट आवरण असते. शेंगेस कुयरीसारखे वळण असते, म्हणून या वेलाचे नाव खाजकुयरी असे पडले आहे. शेंगांवरचे केस किंवा तुसे अंगास लागल्यावर फार खाज सुटून सूज येते. 

गुंजेचा पाला, विड्याचे पान खाणाऱ्यांना खाऊन माहीत आहे. गुंजेचा वेल असतो आणि त्याची पाने एकंदरीत संयुक्तपर्ण प्रकारची असून पाच ते दहा सेंमी आकाराची असतात. गुंजेच्या बिया साधारणपणे वाटाण्याएवढ्या, गोल, कठीण, गुळगुळीत, चकचकीत, लालभडक रंगाच्या असून त्यावर एक काळा ठिपका असतो. या बियांचा उपयोग सोन्याचे वजन करण्यासाठी पूर्वापार केला जातो, कारण सर्व बिया अगदी एकसारख्या वजनाच्या असतात. या बिया मात्र अत्यंत विषारी असतात. 

हा महिना तीन वनस्पतींच्या गौरवाचा. त्यात घाईघाईने उल्लेख करावयाचा तो कांद्याचा. कांदा माझा एवढा आवडता आहे की, मला घरात कांदे संपायच्या आत दुसरे आणावे लागतात. पण माझी आई, आजी चार्तुमासात कांदा खात नाही. म्हणजे आषाढ शुद्ध नवमीला कांद्याचा महोत्सव साजरा करायचा आणि आषाढी एकादशीपासून कांदा बंद! ज्यांच्याकडे खंडोबा आहे, ते चंपाषष्ठीनंतर कांदे खाणार आणि आमच्या घरी खंडोबा नसल्यामुळे कार्तिकी पौर्णिेमेनंतर कांदा खाणे सुरू व्हायचे. हे चार महिने स्वयंपाकघराची फार कुचंबणा व्हायची. मी हुकूमशाही वृत्तीचा असल्याने कांद्याखेरीज जेवणार नाही आणि आई- आजी कर्मठ असल्याने कांदा खाणार नाही. आई-आजी तर कांद्यासोबत वांगी पण चार महिने खाणार नाही. वा रे वा! कार्तिक पौर्णिमा हा त्यामुळे कांदामुक्तीचा उत्सव. 

मी कुठल्याही अर्थाने, यत्किंचितही धार्मिक नाही. पण तुळशीचा मात्र भक्त आहे. माझ्या घराभोवतीच्या खिडक्यांमध्ये आणि गॅलरीत मिळून मी तुळशीची पंचवीस तरी झाडं वाढवली आहेत. त्यात हिरव्या रंगाची (श्वेत तुळस) आणि काळपट तांबूस (कृष्णतुळस) संख्येने निम्मी-निम्मी आहेत. तुळशीची नावं आणि त्यामागील कथा मला आवडतात. उदाहरणार्थ- रुक्मिणीने एका तुलसीदलाने गिरीधर प्रभू तुळिला।तुला करण्यास ती उपयोगी पडली म्हणून ‘तुलसी’. वृंदा, वैजयंती ही तुळशीचीच नावं. ज्या जोडप्याला मुलीची हौस होती, पण त्यांना सगळी मुलंच झाली. त्याने अंगणात तुळस लावावी. म्हणजे त्याला थेट परमेश्वरच मिळतो. 

ज्याला नाही ल्येक 
त्येनं तुळस लावावी 
आपुल्या अंगणात 
देव करावे जावाई 


हा महिना तुळशीच्या विवाहाचा. लहानपणी अंगणात रंगवलेले तुळशी वृंदावन, विवाहाचे सगळे साहित्य आणून भटजींना बोलावून लावलेले तुळशीचे लग्न... दिवाळीत त्यासाठी मुद्दाम बाजूला काढून ठेवलेले फटाके वाजवणे वगैरे सगळे आठवते. उपवर मुलीचे लग्न जमवण्याकरता तुळशीचे लग्न आटोपले की तिचे वडील, चुलते बाहेर पडतात. ऊस खायलाही यानंतरच आरंभ होतो. तुळशीच्या जन्मकथा, तिची पाने, मंजिऱ्या, वृंदावन- सारेच काही नितांत सुंदर आहे. 

या महिन्याची तिसरी उत्सवमूर्ती आवळीचं झाड. कार्तिक शुद्ध चतुर्दशीला वैकुंठ चतुर्दशी म्हणतात. या दिवशी आवळीपूजन व भोजन असत. घराबाहेर, गावाबाहेर मळ्यात जाऊन आवळीच्या निमित्ताने वनभोजन करावयाचे! 

आवळा हे फळ असा गौरव करण्याच्या योग्यतेचे आहेच मुळी. भारतात सर्वत्र आढळणारा आवळा निसर्गत: उगवलेला आणि मुद्दाम लावलेला असा वृक्ष आहे. पृथ्वीच्या आकाराचे फळ म्हणून याला ‘धात्रीफळ’ असेही नाव आहे. आवळा या एका फळामध्ये इतके औषधी व पोषकतेचे गुणधर्म आहेत की, इंग्रजीत त्याला ‘वन फ्रूट फार्मसी’ म्हणून गौरवण्यात आले आहे. आवळ्याच्या फळात ‘क’ जीवनसत्त्व सर्वाधिक असते. आवळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे त्याला वाळवले, तापवले किंवा तो शिळा झाला तरी त्याचे गुणधर्म कमी होत नाहीत. 

आवळा तोंडात चघळायला घेतला तर प्रथम आंबट, तुरट लागतो. नंतर गोड लागतो. तोंडातील लाळेच्या क्रियेमुळे ग्लायकोसाइड्‌सचे विघटन झाल्यामुळे असे घडते. आवळ्यावर पाणी प्यायले तर ते विशेष गोड लागते. माझी लहानपणी मार खाण्याची एक आठवण या वैशिष्ट्याशी निगडित आहे. आश्विनापासून- ऑक्टोबरपासून रात्री सुंदर होत जातात. दिवस हे इंद्रदिन असतात आणि रात्री यक्षरात्री. क्रमाने सुंदर पौर्णिमा ऑक्टोबरानंतर येतात. कोजागरी पौर्णिमा, त्रिपुरारी पौर्णिमा, मार्गशीर्ष पौर्णिमा, शांकभरी पौर्णिमा, होळीची पौर्णिमा. यक्षरात्रींचे चांदणे. 

मी वाचलंय- ज्याप्रमाणे चंद्रामुळे रात्र, रात्रीमुळे चंद्र, चंद्र आणि रात्री यांमुळे आकाश शोभते; त्याचप्रमाणे झाडांमुळे आकाश आणि सरोवरे शोभून दिसतात. आकाश, सरोवरे आणि झाडांमुळे पृथ्वी शोभून दिसते. 

Tags: ऑक्टोबर मराठी साहित्य ललित नवे ऋतुचक्र विश्वास वसेकर weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


Comments

  1. Vishal Shinde- 02 Nov 2020

    मस्त लेख

    save

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके