डिजिटल अर्काईव्ह (2009-2020)

सप्टेंबरात गणपतीबाप्पांना भेटायला येणारे एक फूल म्हणजे गणेशपुष्प. कधी काळी ही वेल अमेरिकेतून इथं आली आणि इथलीच झाली. ही वळसे घालत चढते. पाने पिच्छाकृती (पिसासारखी) संयुक्तपर्ण प्रकारची, पाच ते आठ सेंमी लांबीची असून अतिशय नाजूक व सुंदर दिसतात. सुारे पंचवीस, केसासारख्या, पण चपट्या, अरुंद हिरव्यागार पर्णिका हे गणेशवेलाचे वैशिष्ट्य आहे. फुले लहान, दोन-तीन सेंटिमीटर व्यासाची, आकर्षक लालभडक रंगाची, अतिशय नाजूक असतात. फुलांत समान आकाराच्या पाच पाकळ्या काहीशा टोकदार असतात. त्यामुळे त्यांना चांदणीसारखा आकार प्राप्त होतो. पाकळ्या एकमेकांना जोडल्या जाऊन फुलाच्या तळाशी त्यांची एक नलिका तयार झालेली असते. मोठी उद्याने, घरगुती बागा, तसेच कुंडीतही गणेशवेल लावलेला आणि छान वाढलेला दिसतो. 

तालुक्याच्या गावात राहणारा मी. जवळजवळ सगळ्यांचा व्यवसाय शेती. सध्या मूग काढणीला आला आहे. प्रत्येक शेतकऱ्याने तो लावलेला आहेच. मुगाच्या शेंगांचं वैशिष्ट्य असं की, त्या परिपक्व झाल्या की जागच्या जागी तडकतात. त्यामुळे काढणीला आलेला मूग तत्काळ पदरात पाडून घ्यायचा असतो. प्रत्येक शेतकऱ्याला तशी घाई झालेली असते. अन्‌ मूग काढण्यासाठी बायका मिळाल्या नाहीत, तर नुसते मूग गिळून गप्प बसता येत नाही. त्यामुळे भल्या सकाळी नाक्या-नाक्यावर मोटरसायकल घेऊन बायांना (चांगल्या अर्थाने आणि कारणास्तव) पळवून न्यायला शेतकरी टपलेले असतात. सकाळी फिरायला जाताना सध्या रोज मला हे दृश्य दिसते. एक दिवस बायको सोबत फिरायला आली नाही, तेव्हा घरी परतल्यावर मी तिला म्हटले, ‘‘बरं झालं, तू आली नाहीस. नाही तर एखाद्या मोटरसायकलस्वाराने मूग तोडायला म्हणून जबरदस्तीने तुला नेले असते आणि त्याच्या मुगाची मला काळजी असल्याने मीही त्याला विरोध केला नसता! पाऊस उघडलेला असल्याने त्वराच करायला हवी, नाही का?’’ 

सध्या कवठाला छान फळं लागलीत. सगळ्यांना पिकलेल्या कवठाची चटणी आवडते. पिकलेले कवठ गोल आकाराचे, पाच ते सहा सेंमी व्यासाचे, कठीण कवचाचे आणि सुवासिक असते. त्यातला गर तांबूस विटकरी रंगाचा असतो. खाणारे तो नुसताही खातात, खाऊ शकतात. चटणीखेरीज त्याचे जॅ, जेली आणि सरबतही करता येते. बर्फीसुद्धा करतात. माकड आणि हत्ती यांनाही कवठफळे आवडतात. म्हणून तर त्याला संस्कृतात ‘कपिप्रिय’, तर इंग्रजीत ‘एलिफंट ॲपल’ असं नाव आहे. 

कवठाचे झाड सदाहरित असते. उंची सहा ते बारा मीटर, दाट पर्णसंभार असलेले ते आहे. त्याची साल खरखरीत, भेगाळलेली, काळपट रंगाची दिसते. पानांच्या बगलेत अत्यंत तीक्ष्ण, सरळ आणि मजबूत काटे असतात. वसंत ऋतूत त्यांना मोहर येतो आणि सप्टेंबरात फळे लागतात. महाशिवरात्रीच्या सुमारास बाजारात ती विकायला पण येतात. सध्या सागवानाच्या झाडांना फुलांच्या जागी बोराच्या आकाराची फळे लागली आहेत. सुबाभळीला खूपशा शेंगा आलेल्या आहेत. बकाना लिंबाला जांभळी फुलं लागली आहेत. कापसाला पण पिवळी, सुंदर फुलं येऊ लागलीत. शेवग्याला फुलं लगडलीत. पिवळ्या कण्हेरीला आणि सगळ्या झुडपांना फुलंच फुलं लगडलेली दिसताहेत. उगीच नाही दुर्गा भागवतांनी भाद्रपदाला ‘पुष्पमंडित भाद्रपद’ म्हटलं! 

एकेका झाडाला एकेक महिना बहाल करावयाचा झाल्यास सप्टेंबर हा पारिजातकाचा महिना म्हणावा लागेल. पारिजातकाची जन्मकथा मोठीच वेधक आहे. झालं असं की, देवांना पाहिजे होतं अमृत. त्यासाठी अख्खा क्षीरसागर ढवळून काढावा लागणार होता. ही सामान्य बाब तर नव्हतीच, पण निव्वळ देवांच्या आटोक्यातलीही नव्हती. त्यासाठी त्यांना दानवांची मदत घ्यावी लागली. मग मंदार पर्वताची रवी करावी लागली. ती टेकवण्याकरता विष्णूंना कूर्मावतार घ्यावा लागला. वासुकी सर्पाची दोरी करावी लागली आणि तिला पकडून एकीकडून देवांनी अन्‌ दुसरीकडून दानवांनी समुद्रमंथन केले. 

या समुद्रमंथनातून अमृतासकट चौदा रत्ने बाहेर आली. त्यातले लक्ष्मी आणि कौस्तुभ यानंतरचे तिसरे रत्न म्हणजे पारिजातकाचे झाड. इंद्र हा देवांचा राजा. त्यानं तत्काळ त्याला स्वीकारून स्वर्गातल्या नंदनवनात लावलं. तेव्हापासून पाच देववृक्षांत (इतर मंदार, संतान, हरिचंदन आणि कल्पवृक्ष) पारिजातकाची गणना व्हायला लागली. 

एकदा भटके आणि विमुक्त देवर्षी नारद स्वर्गातून फिरत- फिरत द्वारकेला आले आणि स्वर्गातल्या या प्राजक्ताचे फूल त्यांनी कृष्णाला दिले. कृष्णाने रुक्मिणीला. या एकाच फुलाचा दरवळ एवढा होता की, त्याने अख्खी द्वारका सुगंधित झाली. ‘हे फूल तिलाच का दिले, मला का नाही’ म्हणून सत्यभामा रुसली. आता तर तिला सगळे झाडच हवे होते! काय करावे या स्त्रीहट्टाला? शेवटी भामा मनीचा रोष मावळण्यासाठी कृष्णानं तो वृक्ष पृथ्वीवर आणण्याचा निर्णय घेतला. परंतु इंद्र कृष्णाला तो काही देईना, तेव्हा कृष्णाला इंद्राशी युद्धाची भाषा वापरावी लागली. अखेर हे देवपुष्प सत्यभामेच्या दारात लागले! (पुढे ‘फुले का पडती शेजारी?’ हा मत्सर प्रश्न निर्माण झाला, ते असो.) 

पारिजातकाचं लहानपणी माझं एक संख्यात्मक फक्त नातं होतं. आजीला चार्तुासात महादेवाला लाखोली वाहण्यासाठी पारिजातकाची फुलं आणून द्यावी लागायची. आजीनं अंगणातल्या वृंदावनासमोरचा मोठा दगडी महादेव उचलून, धुऊन देवघरात ठेवलेला असायचा. त्याला एक लाख फुले म्हणजे ‘लाखोली’ वाहणे, हे तिचे व्रत. खरोखर एक-एक फूल मोजून एक लाख फुलांची भरती होईपर्यंत फुले वाहणे म्हणजे लाखोली वाहणे. ती फक्त महादेव याच देवाला वाहतात आणि फक्त पारिजातकाचीच फुले संख्येने एवढी भरणे शक्य असते. हिंदीत पारिजातकाचे नाव ‘हरसिंगार’ का आहे, हे आता कळले. या पळापळीत या फुलांकडे डोळे भरून पाहणे झाले नाही वा कधी नाक भरून गंध घेणे झाले नाही. तोबा-तोबा! देवाला वाहायच्या फुलांचा गंध घेण्यास सक्त मनाई असते. म्हणून लहानपणी माझी पारिजातकाशी नीट ओळख झाली, तरी दोस्ती अशी झालीच नाही. म्हणून म्हटलं- माझं-त्याचं नातं लहानपणी फक्त संख्यात्मक राहिलं, गुणात्मक कधी झालंच नाही. वयाच्या विशीनंतर तो भेटला औरंगाबादला. 

दिसायलाच किती नाजुकसाजुक आहे हा. आठ पाकळ्यांची त्याची फुलं म्हणजे मार्दवाची मिसालच. त्याच्या पाकळ्या तर जाई-जुईपेक्षा नाजुक असतात. बोटांच्या चिमटीत एक पाकळी फार न दाबता नुसती पकडून जरी ठेवली, तरी पाणी-पाणी होईल! प्राजक्ताच्या पाकळ्या मोठ्या बारीक चणीच्या आणि आकडेबाज असतात. बासमती तांदळाचा भात ताटात वाढला की, मला दर वेळी या अष्टदलांची आठवण येते. लांबड्या, टोकाला दुभंगलेल्या, मोठ्या कुर्रेबाज अशा असतात त्या. दुसऱ्या प्रकारच्या प्राजक्ताच्या पाकळ्या भदाड्या, बुट्ट्या, एकमेकींना बिलगू पाहणाऱ्या. सहा पाकळ्यांची फुलं म्हणजे शालीन सौंदर्य. गंधाच्या बाबतीत तरतम करता येणार नाही, पण रूपाच्या बाबतीत दोन प्राजक्तांत नक्कीच फरक आहे. पहिली सुंदरी शेलाट्या बांध्याची, तर दुसरी मांसल. या मांसलपणाला उर्दूत छान शब्द आहे- गुदाज बदन. 

श्रावण, पारिजात आणि पाऊस असा एक त्रिकोणच आहे. इंदिरा संतांना भारी कौतुक. त्या पारिजाताला ‘श्रावणाचा राजा’ म्हणतात. वारा, पाऊस नि ऊन हे तिघं पारिजाताचे ‘मैत्र जीवाचे’ आहेत, असं म्हणतात. इतकंच नाही, तर मूळचा आपला- स्वर्गातला- पारिजात पृथ्वीवर कसा नांदतोय हे पाहायला आकाशात इंद्रधनू डोकावते, असेही म्हणतात. पारिजाताच्या केसरिया देठांचं कवींना भारी कौतुक. वसंत बापटांनी पारिजातकाचे देठ वनदेवीच्या पायाखाली येऊन तिच्या मेंदीमुळे लालीलाल झाले, अशी उपपत्ती मांडली आहे. मराठी कवीपेक्षाही ‘विश्वकवी’नी या सौंदर्यवर्णनात बाजी मारली आहे, हे कबूलच करायला हवे
सुंदर, तुमि असेछिले प्राते 
अरुण बरन पारिजात लये हाते 
(अरुण वर्णाचा पारिजात हाती घेऊन आज सकाळी तू आलास... हे परमसुंदर!) 

पारिजाताचा स्पर्श महसूस करण्यासाठी रवींद्रनाथांची हळुवारता पाहिजे. टागोरांनी मृत्युदेवतेला विनंती केली होती की, तुझा शेवटचा स्पर्श पारिजातकाच्या फुलासारखा नाजूक असू दे! घरात दोन मृत्यू पाहिले मी. माझ्या पंचविशीतल्या भावाला मृत्यूने स्पर्श केला तो डोक्यात दगड घातल्यासारखा. माझ्या वडिलांना मात्र मृत्यूने पारिजातकासारखा स्पर्श केला. माझे वडील एक गाणं म्हणायचे, ‘सदय, शांत असशी तू मरणा, भीती तुझी वाटेना...’ आणि खरंच, दारावर बोलवायला आलेल्या मित्रासारखा मृत्यू त्यांना बोलवायला आला आणि त्या पारिजाताला बिलगूनच ते शांत, हास्यवदनाने त्याच्यासोबत गेले. पारिजाताच्या शांत रसात डुंबून गेले. 

इंदिरा संतांएवढ्या पारिजातावर कुणी कविता लिहिल्या नसतील, त्यांच्याएवढ्या चांगल्या कविता तर कुणीच नाही. 
पृथ्वी निरागस फूल 
जीव सूर्याचा जडतो 
हातातील पारिजात 
तिच्या भांगात माळतो 

तेव्हापासून नियमाने 
उगवता सूर्य येतो 
उभ्या पृथ्वीच्या हातात 
एक प्राजक्त ठेवतो 


या कवितेत कुणाला कुंती-सूर्य-कर्ण ही कथा दिसल्याचे मी कुठं तरी वाचलं आहे. पृथ्वी म्हणजे कुंती आणि अर्थातच प्राजक्त म्हणजे सूर्यापासून तिला झालेला कर्ण. 

कुंतीचे पारिजातिका असेही नाव आहे. देवाला तिने वर म्हणून दु:ख मागितलं होतं. ‘दु:खात कायम देवाची आठवण राहते, म्हणून मला दु:ख दे!’ प्राजक्ताचं दु:खाशी एक अतूट नातं आहे. कुंतीइतकंच. त्याच्या लॅटिन नावाचा अर्थ ‘ट्री ऑफ सॉरो’ होतो. दु:खी दिसणारं, असणारं झाड. फुलं गाळणारं म्हणजेच अश्रू ढाळणारं झाड! ‘ट्री ऑफ सॉरो.’ पारिजातकाच्या कुंतीविषयक अस्तित्वाची आणखी एक गंत वनस्पतीशास्त्रीय आहे. ती म्हणजे, कुंती या नावाची वनस्पती खरोखरच असते आणि ती डिट्टो पारिजातकासारखीच असते. 

सेलूला नोकरीवर जाताना मला बुचाच्या पंधरा-वीस झाडांखालून चालत जावे लागायचे. सप्टेंबर महिना उजाडला की, माझी या झाडाशी एक अघोषित स्पर्धा सुरू होई. मला या महिन्यात बुचाला आलेले पहिलेवहिले फूल झाडाच्या शेंड्यावर पाहायचे असायचे. कळ्यांचे झुबके दिसायचे, पण उमललेले फूल नाही. असेच कधी तरी खाली लक्ष गेले की, ते बेटे हळूच कधी तरी जमिनीवर पडलेले दिसे. तेहेतीस वर्षे मी ही स्पर्धा हरत आलोय. 

बुचाचे नाव मात्र मला अजिबात आवडलेले नाही. रबरी आणि प्लॅस्टिकचा मोठ्या प्रमाणात वापर सुरू होण्यापूर्वी बाटल्यांची बुचे ज्या झाडाच्या सालीपासून तयार करीत त्यात हे झाड होते, म्हणून त्याचे मराठी नाव बूच. इतर भाषांतली नावे सुंदर आहेत. हिंदीमध्ये आकाशनीम आणि नीमचमेली हे नाव आहे. गगनजाई, आकाशमोगरी, गगनमल्लिका आदी. इंदिरा संतांच्या ‘शेला’ या अजरामर कवितेत बुचाला बूच म्हणावं लागलं, याचं त्यांना वाईट वाटलेलं आहे. 
थंड गुलाबी कार्तिकातला 
हवाहवासा स्पर्श धुक्याचा 
सुगंध त्याला नाजूक, मादक 
नव्या उमलत्या बूच फुलांचा 

‘‘कविता लिहिली. प्रसिद्ध झाली. पण एक मात्र रुखरुख राहून गेली- इतक्या सुंदर शेल्याला इतका मधुर, मादक सुवास त्या बूच फुलांचा, हे ठीक आहे. पण त्या फुलाला ‘बूच’ म्हणायचे, हे मला कसे तरीच वाटले. पण मला दुसरा शब्द सापडेना. कुणाला विचारावे कळेना... आणि शेवटी ‘गर्भरेशीम’ हा संग्रह निघाल्यानंतर मला त्या कामाला वेळ मिळाला. बूचऐवजी मी ‘गगनमोगरा’ हा शब्द जुळवून घेतला आणि आता ती कविता पूर्ण मनासारखी झाली.’’ 

सप्टेंबर महिन्याचा मानकरी असणारं हे सुंदर फूल. सप्टेंबरात त्याच्या शाखा-उपशाखांच्या अग्रभागी सुमारे तीस सेंमी लांबीचे फुलांचे घोस येतात. फुले मध्यम आकाराची, पांढरीशुभ्र, अत्यंत सुवासिक असतात. पाकळ्यांची नलिका चांगली बोटभर लांबीची असल्यामुळे फुले एकमेकांत गुंफून त्यांची माळ करता येते. पाकळ्या खरं तर पाच असतात, पण त्यांपैकी दोन एकत्र जडल्या जाऊन त्यांची एकच जरा मोठी, किंचित दुभंगलेली पाकळी तयार झालेली असते. त्यामुळे चारच पाकळ्या आहेत, असे वाटते. बुचाचे पुंकेसर चार असून परागकोश पिवळे असतात. 

पावसाळ्याचा बराच पाऊस झाला आहे. चिंब भिजल्या पावसातच हरितालिका, गणेश चतुर्थी आणि ऋषिपंचमी झाली. मराठवाड्यात गौरी-गणपती म्हणत नाहीत, तर महालक्ष्मीचा तीनदिवसीय सण असतो. मस्त खाण्या- पिण्याचे हे दिवस. 

घाणेरी हे माझे अत्यंत आवडते झुडूप आहे. तिची-माझी मैत्री चाळीस वर्षांची जुनी आहे. माझ्या कॉलेजमध्ये अगदी दर्शनी भागाला हौदाभोवती तिचे कुंपण आहे. त्या हौदावर बसून घाणेरीशी मी खूप गप्पा मारल्या आहेत. तिच्यावर बसणारी फुलपाखरं न्याहाळीत तासन्‌ तास बसलो आहे. तिची पानं चुरगाळून येणाऱ्या गंधाला कुणी उग्र म्हणत असले, तरी मला तो सुगंधच वाटलेला आहे. तिचे पंचांगच मुळी मला आवडलेले आहे. काय करू माझ्या आवडीला? 

ही वनस्पती अमेरिकेतून 1824 मध्ये श्रीलंकेत आली. शोभेकरता म्हणून आणलेल्या तिचा आपल्या देशात प्रचंड प्रसार झाला आहे. हे झाड एवढे झपाट्याने वाढते की, त्याला कायम खच्चीकरण करत नियंत्रणात ठेवावे लागते. याच कारणाने कुंपणासाठी म्हणून ते उपयुक्त आहे. रंग बदलणारे असे ते असल्याने त्याच्या फुलांचा मुळी कंटाळा येत नाही. त्या रंगात पुन्हा रंगीबेरंगी फुलपाखरांची भर! वाहवा! घाणेरीला आणखी एक मराठी नाव डॉ. म. वि. आपटे यांनी ‘टणटणी’ असे दिले आहे. दोन्ही नावे कुरूप आहेत. त्याबद्दल एकदा मला ती सपाटून भांडलीही आहे. भांडता-भांडता चौथ्या कडव्यात तिने तिचे विज्ञानही सांगून टाकले आहे. 
राजस्थानमध्ये मला 
लोक ‘चुनडी’ म्हणती 
आणि ‘इंद्रधनु’ आहे 
माझे नाव गुजराती 

किती वाईट साईट 
नावं फुलांना हो देता 
आणि मराठी लोकांनो 
तुम्ही बदनाम होता 

आता माझेच पाहा ना 
काय इथे ‘घाण’ आहे? 
पुष्पपरायणतेत 
तुमच्याच खोट आहे! 

फुलांतला मी सरडा 
काम होता बदलते 
पुन्हा घेऊ नये कोणी 
मुळी मी न वाया जाते 

मला ठेवून कुंपणी 
धाव तुमची कळते 
जरा जवळ या, पाहा 
कशी रंग उधळिते! 
विठ्ठल वाघांची ती कविता तुम्ही ऐकली आहे काय? मला त्यांनी अनेकदा ऐकवली आहे. ‘गुलबासाची शप्पथ, सये तू ये संध्याकाई, तुझ्यावाचून मुचूक, मले करमत न्हाई!’ संध्याकाळी बोलवण्यासाठी गुलबासच का? तर, हे सुंदर झाड संध्याकाळी फुलणारं आहे. म्हणूनच त्याचं एक नाव ‘सायंकाळी’ असेही आहे. गुलबासाची फुले आकुंचित नरसाळ्यासारखी असतात. हे नरसाळे संदलाचे बनलेले असते. त्यास विविध रंग असतात. लाल, गुलाबी, पांढरा हे रंग नेहमी दिसतात. पिवळा, शेंदरी असेही रंग आढळतात. गुलबासाच्या एका फांदीवर एका रंगाची तर दुसऱ्या फांदीवर दुसऱ्या रंगाची फुले येतात, असेही दृश्य कधी-कधी दिसते. 

तेरडा हे अल्पायुषी झाड सप्टेंबरात उगवते अन्‌ मावळतेही. मराठवाड्यात उर्दू भाषेचा प्रभाव आहे. त्यामुळे तिथं तेरडा म्हटल्यावर कळत नाही. करंदीकरांची ‘त्रिवेणी’ वाचली, तेव्हा मलाही ‘तेरडा’चा खरा अर्थ वा वैशिष्ट्य कळलं नव्हतं. तेरड्याला मराठवाड्यात गुलछबू हा शब्द आहे. लावणीकारांनी त्याला ‘इष्कपेच’ का म्हटलं, हा मलाही न उलगडलेला पेच आहे! जुलै महिन्यात कास पठारावर आपण भेटलो, तो होता रानतेरडा. बागेतल्या किंवा आपल्या अंगणातल्या संकरित तेरड्यापेक्षा छोटेखानी. बागेतला सप्टेंबरातला तेरडा फूलच काय पण खोडदेखील लाल-गुलाबी, रसरशीत. त्याच्या बियांची मला फार गंत वाटायची. लहानशा देठाला टपोऱ्या, शेंगदाण्यासारख्या. पण मोठ्या शेंगांना नुसता धक्का लावला, तरी ताड्‌ताड्‌  फुटतात. या फुलाला देवपूजेत स्थान असायचं. फुलांचा तुटवडा असला, तर गंधावर याची पाकळी चिकटवूनदेखील देवाला समजावयाचे. त्याच्या रंग बदलण्याची मोठीच गंत वाटायची. जगभरात तेरड्याच्या जवळजवळ दीडशे जाती आढळतात. 

सप्टेंबरात गणपतीबाप्पांना भेटायला येणारे एक फूल म्हणजे गणेशपुष्प. कधी काळी ही वेल अमेरिकेतून इथं आली आणि इथलीच झाली. ही वळसे घालत चढते. पाने पिच्छाकृती (पिसासारखी) संयुक्तपर्ण प्रकारची, पाच ते आठ सेंमी लांबीची असून अतिशय नाजूक व सुंदर दिसतात. सुमारे पंचवीस, केसासारख्या, पण चपट्या, अरुंद हिरव्यागार पर्णिका हे गणेशवेलाचे वैशिष्ट्य आहे. फुले लहान, दोन-तीन सेंटिमीटर व्यासाची, आकर्षक लालभडक रंगाची, अतिशय नाजूक असतात. फुलांत समान आकाराच्या पाच पाकळ्या काहीशा टोकदार असतात. त्यामुळे त्यांना साधारण चांदणीसारखा आकार प्राप्त होतो. पाकळ्या एकमेकांना जोडल्या जाऊन फुलाच्या तळाशी त्यांची एक नलिका तयार झालेली असते. मोठी उद्याने, घरगुती बागा, तसेच कुंडीतही गणेशवेल लावलेला आणि छान वाढलेला दिसतो. 

भरपूर गवत माजल्यामुळे गवत खाणारे सगळेच प्राणी सप्टेंबरात खूश असतात. ओला चारा, बैल मातले! ‘भादव्यात भट्टू आणि अश्विनात तट्टू’ अशी एक म्हण आहे. भादवा म्हणजे भाद्रपद आणि तट्टू म्हणजे लहान चणीचा घोडा. भाद्रपद महिन्यात श्राद्धाची जेवणे करून भटजीबोवा मंडळी पुष्ट बनतात आणि अश्विन महिन्यात हिरवे गवत खाऊन घोडी पुष्ट बनतात. या महिन्यात जनावरांना खाण्यासाठी बंधन नसते, काटकसर नसते! 

कारळ्याच्या फुलांचा पुसटसा उल्लेख आपण पूर्वी कधी तरी केला. दिसायला फार सुंदर फूल असते ते आणि समूहाने तर ती फारच सुंदर दिसतात. याची कांडे सूर्यफुलासारखी असतात आणि पानांची ठेवणही तशीच असते. याची फुले बिंबकिरणवंत असतात. म्हणजे असे की, त्यात बिंबपुष्पके आणि किरणपुष्पके अशा दोनही प्रकारची पुष्पके असतात. कारळ्याची चटणी करणे फार अवघड कर्म आहे. बाजारात आयती मिळते ती फार करपलेली आणि तपकिरी झालेली असते. बिनतिखटाच्या कारळ्याच्या चटणीला एक खास रंग असतो. 

बागेत शोभेसाठी लावलेली नागदवणा ही वनस्पती अनेकांनी पाहिली आहे. पण हिला नागदवणा म्हणतात, हे कदाचित माहीत नसेल. तिची पाने वैशिष्टपूर्ण असतात. पाने मूलज म्हणजे मुळातून आल्यासारखी, वीस-तीस, हिरवी, लांबट व पातळ असतात. फुलोरा चवरीसारखा असून जाड दांड्यावर आलेला या महिन्यात हमखास दिसतो. त्यावर 15-20 सच्छर म्हणजे तळाशी पानासारखी उपांगे असलेली सुगंधी, पांढरी फुले येतात. नागदवण्याचे शास्त्रीय नाव कायमन एशियाटिकम असून कुमूर (पॅक्रॅशियम ट्रायफ्लोरम) ती त्याच वंशातली, नागदवण्याशी खूप साम्य असणारी जातीही बागेत सहज पाहायला मिळेल. 

नासपती किंवा पेअर नावाचे फळ आपल्याकडे बाजारात विकायला येऊ लागले आहे. दक्षिण भारतात मे ते सप्टेंबर हा या फळांच्या तोडणीचा काळ असतो. पेअरची मृदु फळे सफरचंदापेक्षा अधिक नरम व गोड असतात. (काही जातींत) मगजात रवाळ कण असतात. बहुधा ही फळे लांबट आणि पेरूसारखी (देठाजवळ निमुळती परंतु दुसऱ्या टोकास रुंद गोलसर असतात. पेअरच्या फळांत थोडे अधिक प्रथिन आणि अधिक खनिजे व साखर असते. 

उर्दू शायरीचा वेडा असल्यामुळे मला नर्गिसच्या फुलांचे प्रचंड आकर्षण आहे. सुंदरीच्या डोळ्यांना या फुलांची उपमा देतात. सिनेमा नटीचे नर्गिस हे नाव याच फुलांवरून ठेवण्यात आले आहे. मी ही फुले पाहिली आहेत आणि अनेकांना दाखवली आहेत. घरात छोटाशी जरी बाग असली, तरी नर्गिस असते. पण आपण लक्षपूर्वक तिच्याकडे पाहत नाही आणि तिच्या सौंदर्याची उपेक्षा करतो. डॉ. इक्बाल लिहितात, 

हजारो साल नर्गिस 
अपनी बेनुरी पे रोती है 
बडी मुश्कील से होता है 
चमन में दिदावर पैदा 

बेनुरी म्हणजे दुर्लक्ष, उपेक्षा. दिदावर म्हणजे पाहणारा. हे फूल चटकन दिसत नाही. कारण ते फांदीच्या शेंड्याला येत नाही, तर ते दोन पानांच्या बेचक्यात असते. मी त्याची शास्त्रीय माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला. नार्सिसस हे फूल म्हणजे नर्गिस या निष्कर्षाप्रत आलो ते पुस्तकी माहितीवरून. पण प्रत्यक्षात त्याचा फोटो- रेखाचित्र पाहिले, तेव्हा डोळ्यांशी या फुलांचं काहीच साम्य नाही, हे लक्षात आलं. जाऊ द्या. मला नर्गिस भेटली आहे. प्रत्यक्ष भेटलात तर तुम्हालाही दाखवीन.  

कपाळफोडी मात्र तुम्हाला नक्की माहीत असेल. त्याची फळे फुग्यासारखी गोलसर किंवा काहीशी लांबगोल आकाराची, दोन-तीन सेंमी व्यासाची, फारच वेगळी दिसतात. त्यांना तीन कडा असतात. फुगारूपी फळामध्ये हवा असल्याने ते कपाळावर मारल्यावर फुगा फुटून फट्‌कन आवाज येतो. म्हणून या संपूर्ण वनस्पतीचेच नाव ‘कपाळफोडी’ पडले आहे. या वनस्पतीला कानफुटी किंवा ज्योतिष्मती असेही म्हणतात. 

या काळात कोकणात रोझ ॲपल नावाची सुंदर फळं खायला मिळतात. कोकणातल्या डोंगरदऱ्यांत निसर्गत: ही झाडे वाढतात. मध्यम उंचीचं, खडबडीत सालीचं त्याचं झाड असतं. हाताच्या तळव्यापेक्षा मोठी, गर्द हिरवी, चिवट, समोरासमोर येणारी त्याची पानं टोकदार असतात. पानं जर चुरगाळली, तर छानसा गंध येतो. मेपासून जुलैअखेरपर्यंत सगळं झाड त्रिकोणी फळांच्या गुच्छामध्ये लगडून जातं. त्याच्या स्वादाविषयी श्रीश लिहितात : मांसल, करकरीत अशा शीतल गुणाच्या या फळात पाण्याचं प्रमाण भरपूर. त्यामुळे चावा घेतल्यावर फळ तोंडात कधी विरघळतं, ते कळतही नाही. आगळ्याच स्वादाच्या या फळाच्या मध्यभागी असलेल्या पोकळीत राखी रंगाच्या एक-दोन बिया असतात. मे महिन्यात व त्यानंतर पावसाळ्यात सारा रानमेवा संपल्यावरही रोझ ॲपलचे रसाळ जाम कोकणवासीयांची रसना सुखावत राहतात. 

पाऊस एखाद दोन दिवस जरी उघडला असेल, तर आपण वेगाने कास पठार गाठायला हवे. सध्या तिथे पिवळी सोनकीची फुलं लाखो-करोडोंच्या संख्येने उगवली आहेत. ‘ॲस्टरेसी’ कुळातील ‘सोनकी’चे मूळ नाव ‘सेनिशिओ बॉम्बेयेन्सीस’ किंवा ‘सेनिशिओ ग्रॅहमी’ असे आहे. पन्नास ते साठ सेंमी उंचीच्या या झाडावर सप्टेंबरात मोठ्या संख्येनं ही फुलं फुललेली दिसतील. सोनकीच्या बव्हंश जातींना पाच, तर काही जातींना पंधरापर्यंत पाकळ्या असतात. दीड-दोन सेंमी व्यासाच्या फुलाच्या मध्यभागी सूर्यफूलासारखी डिश असते. या डिशवर सूक्ष्म ‘रे’ फ्लॉवर्स असतात. सोनकीचं फूल म्हणजे प्रत्यक्षात पाच-पन्नास लघुपुष्पांचा गुच्छ असतो. प्रत्येक पाकळी असते किरणफूल! तर मध्यभागी असतात काळसर मध्यफुले. तीच पुनरुत्पादनात भाग घेतात. एकदा ही फुले फुलली की पर्यटकाच्या अगोदर फुलपाखरे, भुंगे, नाकतोड्यासारख्या कीटकांची झुंबड उडते. तीच परागीभवन घडवतात. कास पठारावर सोनकीची फुले बहुसंख्येने दिसतातच. परंतु डॉ. संदीप श्रोत्रींसम जाणकार नजरेला त्यातही विविध प्रकार ओळखता येतात. त्यांना नावे पण अगदी सुंदर-सुंदर मिळाली आहेत. उदा. सोनकाडी, सोनसळी, सोनतारा, सोनटिकली, ताग, रानतूर, लाजवंती आदी. 

‘वायुतुरा’ नावाची रानफुले कास पठार आणि साताऱ्याचे खास वैशिष्ट्य आहे. हिरवीगार पाने असणाऱ्या वायुतुऱ्याची उंची साधारणपणे पंधरा ते वीस सेंमी असते. पानांतून एक लांब देठ बाहेर येतो. त्याला दोन फाटे फुटतात, त्यावर बारीक गुलाबी रंगाची फुले असतात. जमिनीखाली त्यांचा कंद असतो. ही वनस्पती सातारा जिल्ह्याच्या बाहेर कुठेही आढळत नाही. त्यामुळेच तिच्या ‘ॲपोनोजेटान सातारेन्सिस’ या शास्त्रीय नावात साताऱ्याचा उल्लेख आहे. ‘आभाळी’ आणि ‘मिकी माऊस’ या दोन वनस्पती याच महिन्यात पाहायला मिळतील. नावाप्रमाणे आभाळीची फुलं निळ्या रंगाची असतात. मिकी माऊस पाहून मी तर चक्रावून गेलो! किती गंभीर माणूस असला, तरी मिकी माऊसशी या फुलांचे साम्य पाहून हसू आल्याशिवाय राहणार नाही. ‘स्मिथिया’ हे त्याचं आणखी एक नाव. सप्टेंबर महिन्यात कास पठारावरून खरोखर पाय निघत नाही. 

कोकण आणि गोव्यात नको इतकं फोफावलेलं ऑस्ट्रेलियन बाभूळ हे झाड आहे. सध्या पिवळ्या रंगाच्या असंख्य तुऱ्यांनी लगडलेले ते दिसेल. या तुऱ्यांची लांबी आठ-दहा सेंमी असून त्यामध्ये बारीक-बारीक फुलं गोलाकार रचनेत उमलतात. फुलं गळून गेल्यावर झाडावर शेंगा दिसू लागतात. माणसाच्या कानाशी त्याचं थोडं साम्य असतं, त्यामुळं या झाडाचं नाव ‘ॲकॅशिया ऑरिक्युलिफॉर्मिस’ असं आहे. (ऑरिकल म्हणजे बाह्य कर्ण.) सौम्य शब्दांत या झाडाला शिवी द्यायची झाल्यास ‘यूजलेस’ ही शिवी चालेल. या शेंगांना भारतीय प्राणी, पक्षी शिवतदेखील नाहीत. औषधी गुणधर्माच्या बाबतीतही हे झाड यूजलेस आहे. माणसाच्या, गुरांच्या, पक्ष्यांच्या दृष्टीने याची पाचही अंगे निरुपयोगी. 

सप्टेंबर संपता-संपता पावसाची बहुतेक नक्षत्रं संपत असावीत. आपल्याला त्यातलं काय कळत नाय! एवढं मात्र खरं की, शरद ऋतूचे आगमन झाले आहे! 

Tags: प्रा. विश्वास वसेकर पुष्पमंडित भाद्रपद भाद्रपद इंदिरा संत दुर्गा भागवत नवे ऋतुचक्र Indira sant vihswas vasekar on flowers Nave rutuchakara weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


Comments

  1. Vishal Shinde- 10 Oct 2020

    नेहमीप्रमाणे सुंदर, माहितीपूर्ण लेख

    save

प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात